अजिंठा लेणी संपूर्ण माहिती मराठी : Ajintha Leni Information In Marathi – नमस्कार मित्रांनो, एखाद्या नाजूक वेलीसारखी नखरेदार वळणे घेत असलेली आणि हिरव्या दाट वनश्रीने नटलेली दरी तसेच सतारीच्या नादासारखा वाघुरा नदीचा कर्णमधूर कलकल ध्वनी आणि भोवतालच्या झाडीतील पक्षांची किलबिल, असे वातावरण मनाला मोहरून टाकणारे, भारावून टाकणारे दिसून येते. या जादू भरलेला निसर्ग त्यात लेणी कोरण्याची दिव्य कल्पना ज्या कुणाच्या मनात प्रथम आली असेल त्याला धन्यच म्हणावे लागेल. निसर्गाचे हे अनुपम सौंदर्य आणि अजिंठा लेण्यातील मनमोहक सृष्टी हा अगदी अपूर्व संगम आहे. चला तर मग, वेळ न घालवता पाहुयात अशा या अजिंठा लेण्यांची माहिती.
अजिंठा लेणी माहिती मराठी | Ajintha Leni Information In Marathi
नाव | अजिंठा लेणी |
ठिकाण | संभाजीनगर, महाराष्ट्र |
नदी | वाघुर |
नदीपात्रापासून उंची | पंधरा ते तीस मीटर (४०-१०० फूट) |
लेणी | ३० बौद्ध लेणी |
लेणीचा शोध | इसवी सन अठराशे एकोणीस |
लेणी चा शोध कोणी लावला | जॉन स्मिथ |
प्रस्तावना (Introduction Of Ajanta Caves)
महाराष्ट्र राज्यातील, संभाजीनगर शहरामधील, सिल्लोड तालुक्यातील, अजिंठा गावातील, वाघुर नदीच्या परिसराजवळ म्हणजेच संभाजीनगर शहरापासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर अजिंठा लेण्या आहेत. रमणीय सृष्टी सौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घडीमध्ये खडकात कोरलेली अजिंठा लेणी बसलेली आहेत. बौद्ध वास्तुशास्त्र, भिती चित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेली चैत्य दालने म्हणजेच, प्रार्थना गृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार म्हणजेच आश्रम. यांचा समावेश आहे. यातील लेणी क्रमांक ९, १०, १९, १६ आणि २९ ही चैत्यगृहे आहेत. बाकी सर्व विहार आहेत.
अजिंठा लेणी स्थान – नकाशा
अजिंठा लेणींचा शोध
जवळजवळ ७०० वर्ष वापरात असलेली अजिंठा लेणी काहीशी अचानक सोडून दिली गेल्याचे दिसते. नंतर या लेण्यांचा वापर बंद झाला. त्यानंतर जवळजवळ १००० वर्षाहून ही अधिक काळ ही लेणी अज्ञात राहिली. आजूबाजूला घनदाट जंगले वाढलेली, त्यातही पावसाचे पाणी साठले. माती भरली. जिथे अवघ्या विश्वाला अहिंसा आणि समता यांचा उद्देश करणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या प्रार्थना निनादल्या तिथे आता वाघांच्या डरकाळी आणि वटवाघळांचे चित्कार घुमू लागले.
सन १८१९ ला शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याच्या ती अवचितपणे नजरेस पडली. आणि पुन्हा प्रकाशात आली. सध्या लेणींच्या समोर पहाडावर ज्याला. “व्ह्यू पॉईंट” म्हणतात, तेथे तो उभा असताना त्याला लेणी क्रमांक १० ची भव्य कमान दिसली आणि या लेण्यांचा शोध लागला.

हिनयान आणि महायान पंथ
बौद्ध धर्मात हिनयान आणि महायान असे दोन पंथ आहेत. या दोन्हींमधील महत्त्वाचा भेद म्हणजे हे नियम. हिनयान पंथीय अनुयायी मूर्ती पूजा करीत नाहीत त्या ऐवजी ते भगवान बुद्धांच्या प्रतिकांची, बोधी वृक्ष, चरण चिन्ह, धर्मचक्र आदींची पूजा करतात. आणि महायान पंथीय अनुयायी भगवान बुद्धांच्या मूर्तींची पूजा करतात.
अजिंठा येथील हिनयान पंथांची लेणी म्हणून लेणी क्रमांक ८, ९, १०, ११, १३ आणि १५ अशी आहेत. त्यांचा काळ इसवी सन पूर्व दुसरे शतक इसवी, सन तिसरे शतक असा येतो. त्यापैकी काही लेणी प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. आणि महायान पंथातील लेणी ही लेणी क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ११, १४, १५ ते ३० ही आहेत.
अजिंठा लेण्यांचा इतिहास (History Of Ajanta Caves)
सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगर रांगेतील नालेचा आकार असलेल्या एका डोंगर उतारावर या गुंफा खोदण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३० लेणी असून ती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन नंतरचे पाचवे शतक अशा सुमारे ८०० वर्षाच्या काळात कोरण्यात आली आहेत. या लेण्यांमध्ये मुख्यतः चैत्य प्रार्थना मंदिर, सभागृह, विहार आणि मठांची व्यवस्था आहे. या ठिकाणी धार्मिक स्वरूपाची नित्य कर्मे व कर्मकांड पार पाडली जात असावीत.
ज्या डोंगरातील लेणी खोदण्यात आली आहेत, त्याच्या माथ्यावर डोंगरावरून फेसाळत खाली कोसळणाऱ्या सात धबधब्याचे पाणी असून एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते. याला सप्तकुंड असे म्हणतात. अजिंठा येथील या लेण्या ५६ मीटर उंचीवर असून एकंदरीत ५५० मीटरपर्यंत नालेच्या आकारात पसरलेल्या आहेत. या लेण्या नदीपात्रापासून १५ ते ३० मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगर रांगांमध्ये कातळांवर कोरलेल्या आढळून येतात. पुरातत्व शास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली.
अजिंठा लेण्यांचे वैशिष्ट्य
अजिंठा लेण्यांना १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. सध्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखिखाली या अद्भुत लेण्या आहेत. या लेण्यांचा वापर बौद्ध मठ म्हणून केला जात होता. जेथे विद्यार्थी आणि भिक्षू एकांत वासासह त्या ठिकाणी अभ्यास करत होते. अजिंठा लेणीतील रंगवलेली भिंतीवरची चित्रे या लेण्या मधील सौंदर्य कामातील उत्कृष्ट पणा, विविध रंग व त्यांची रचना, छाया, सुबकता पाहून येथे येणारा प्रत्येक प्रेक्षक या कलेच्या मोहात पडतो. या लेण्यांमध्ये प्राचीन चित्रकला आणि शिल्पकलेची उत्तम उदाहरणे पहावयास मिळतात. या लेण्यांमध्ये बौद्ध काळातील स्तूप आढळून येतात.
अजिंठा लेणीतील चित्रकला
अजिंठा या ठिकाणांमध्ये लेणी ही विश्वविख्यात आहेत, ती येथील अप्रतिम चित्रांसाठी. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून या लेण्यांची नियुक्ती केली गेली. अजिंठा येथील लेण्यांमध्ये ५ हिंदू मंदिरे आणि २४ बौद्ध विहार आहेत. अजिंठा येथील लेण्यांमध्ये जी अप्रतिम अशी चित्रे आढळून येतात, त्याचा केंद्रबिंदू भगवान बुद्ध आहेत. त्यांच्या भोवती त्यांची सगळी चित्रसृष्टी फिरते. भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग,त्यांचा जन्म, गृहत्याग, मार नामक राक्षस आणि त्यांना तपस्येपासून परावर्त करण्यासाठी केलेला प्रयत्न, श्रावस्तीचा चमत्कार म्हणजेच भगवान बुद्धांनी एकाच वेळी एक हजार ठिकाणी प्रकट होणे, तसेच नालगिरी नामक मत्त हत्तीचे दमन, भगवान बुद्ध ,राहुल आणि यशोधरा अजिंठा लेणीत रंगवलेले आहे.

पण या चित्रांचा सगळ्यात मोठा भाग बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथा यांनी व्यापला आहे. अजिंठा लेण्यांमध्ये एकूण ३६ जातक कथांची चित्रे रंगविली आहेत. बौद्धाचार्य आणि पंडित यांनी भारतीय साहित्यात प्रचंड भर घातली. त्यापैकी महाकवी अश्वघोष यांचे सौंदर नंद हे नाटक प्रख्यात आहे. ही कथा आहे सुंदरी आणि नंद यांची.
नंद याने तथागत भगवान बुद्ध यांच्या उपदेशाने संन्यास घेण्याची या नाटकातील प्रसंगाची चित्रे अजंठा लेणी कोरलेली आहेत. अजिंठा लेणीतील चित्रे म्हणजे एक सर्वांग सुंदर अद्भुत विश्व आहे. राजे, त्यांचे महाराज ,राजपुत्र, राजकन्या, त्यांच्या भव्य मिरवणुकी, भिक्ष-भिक्षुणी, पुरोहित, शिकारी, साप खेळवणारे गारुडी, दास -दासी, यक्ष- यक्षणी, गंधर्व, अप्सरा, किन्नर, व्यापारी, नर्तकी, ज्योतिषी, साधू- संन्याशी, हत्ती, घोडे, बैल, मगर, नाना प्रकारच्या वनस्पती, फुले ,नक्षी ,वेलपत्री यांची कलाकारांनी अक्षरशा चित्रमय प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती अपरंपार आहे.
अजिंठा लेणीतील भिंतीवरच्या चित्रांचे रंग
लेण्यांच्या भिंती अगदी पार गुळगुळीत न करता किंचित खडबडीत म्हणजे त्यावर लेप लावता येईल, आणि हा लेप अतिशय बारीक वस्त्रगाळ असे. प्रथम धातू मिश्रित माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण, वनस्पती, पदार्थांचे भुसावळ, लहान वाळू इत्यादी गोष्टींचा तयार करीत आणि तो भिंतीवर लावीत. आणि पेंटिंग पूर्वीचा पाया तयार करणे, त्यानंतर त्यावर चुन्याचा अगदी पातळ थर देत. रंग देण्याची पद्धत सरळ आणि सुटसुटीत होती.
पेंटिंगच्या आधी आऊटलाईन काढून त्यात वेगवेगळे रंग चिकटवण्यात येत. जेथे आवश्यक आहे तेथे आवश्यक आणि तेवढेच रंग वापरले आहेत. त्यामुळे येथील चित्रशैली ही जगात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. अजिंठा लेण्यातील चित्रकार कलेत निष्णात होते. चित्रातील भाव जाणूनच त्यांची रंगसंगतीची योजना केली जायची. चित्रातील भाव आनंदी असेल तर लाल, पिवळा आणि उदास असेल तर काळा रंग वापरला जाई.
चित्रातील स्त्री-पुरुष, वनस्पती, वृक्ष-वेली यांचा उत्तम मेळ साधला गेला आहे. चित्रातील बारीक बारीक गोष्टींचे सुद्धा उत्तम काम केलेले आहे. झाडावरून जाणारी मुंगळ्यांची रांगोळी त्यांच्या नजरेतून सुटली गेली नाहीये. केश रचना व स्त्रिया, अलंकार यांचे अक्षरशा असंख्य नमुने इथे पाहायला मिळतात. म्हणूनच अजिंठा ची लेणी ही महाराष्ट्रातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट केली गेली आहेत.
अजिंठा लेणी माहिती – ajanta caves information in marathi
लेणी क्रमांक 1
या लेणीमध्ये २० खांबावर आधारित एक दालन आहे. खांबावर फारच सुंदर असे नक्षीकाम केलेले आढळून येते. चित्रांमध्ये महात्मा बुद्धांच्या पूर्व जन्मावर आधारित अशा काही कथा दर्शविलेल्या आहेत. पूजा स्थळी बुद्धाची एक विशाल मूर्ती आहे, जिच्या चेहऱ्यावर उजव्या, डाव्या व समोरील बाजूंनी प्रकाश टाकल्यास गंभीर तपस्या आणि शांती तसेच वेगवेगळे भाव दिसून येतात. बाहेरील भिंतीवर मोराचे चित्र आहे. ती प्रेम देवता आहे. बुद्धास आपल्या उद्दिष्टापासून रोखून ठेवत आहे, तपस्या न करण्यास सांगत आहे असे दिसून येते.
दुसऱ्या एका चित्रात बुद्धाच्या अनेक मुद्रा दर्शविण्यात आलेल्या आहेत. डाव्या बाजूला असलेल्या सभा दालनामध्ये शिबी राजाची कथा दर्शवली आहे. त्यामध्ये शिबी राजा एका कबुतराचे ससाण्यापासून संरक्षण करीत आहे. राजा नागराज याची जन्मकथा व एक महिला ही रथात बसलेली आहे हे दृश्यही त्याच ठिकाणी आहे.
पूजास्थानाजवळच्या भिंतीवर जगप्रसिद्ध पद्मपाणि ची मूर्ती मुद्रा दर्शविलेली आहे. महात्मा बुद्धाचे प्रसिद्ध चित्र इटालियन समकालीन युगातील चित्राप्रमाणे जगप्रसिद्ध आहे. महात्मा बुद्धाच्या एका हातातील कमळ, शांती आणि पवित्रतेची निशाणी आहे. पद्मपाणि यांच्या जवळ एका नारीची आकृती असून उजव्या बाजूस भिंतीवर वज्रपाणी आणि राजकुमारी ची आकृती आहे, जिच्या शरीरावर फक्त आभूषणे दिसतात.
लेणी क्रमांक 2
या लेणीच्या डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा दर्शवण्यात आली आहे. बुद्धाची माता आपले स्वप्न राज्यात सांगत आहे. बुद्धाचा जन्म आणि बुद्धाची माता पिता त्यांच्यावर प्रेम करतानाचे चित्र चित्रित करण्यात आले आहे. डाव्या बाजूस एका खोलीत बुद्धांची मूर्ती आहे. त्याच्या छतावर पक्षाचा थवा दर्शवण्यात आला आहे.
इतर चित्रात आजच्या युगातील उपयोगात येणाऱ्या प्रत्येक वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. जसे, मफलर, स्लीपर. पूजा स्थानावर बुद्धाची आकृती आहे. काही सुंदर चित्रे काढण्यात आलेली आहे. छतावर सुंदर नक्षीचे चित्रण करण्यात आलेले आहे. या नक्षीकामाच्या डिझाईनची नक्कल आजकाल साडी आणि शालींवर करण्यात येते.

लेणी क्रमांक 3 अपूर्ण आहे.
लेणी क्रमांक ४
ही सर्वात विशाल लेणी आहेत. यात २८ खांब आहेत. दारावर द्वारपालांची जोडी दर्शवण्यात आलेली आहे. आत पूजा स्थळे, महात्मा बुद्धांच्या सहा प्रचंड मूर्ती आहेत. ही अष्टभयापासून संरक्षण करीत आहे असे आढळून येते.
लेणी क्रमांक ५
ही लेणी अपूर्ण असून यात काही बुद्धाच्या आकृत्या आहेत.
लेणी क्रमांक ६
ही लेणी दोन मजली आहेत. सभा गृहात बुद्धाची पद्मासन मुद्रेता कृती आहे. दुसऱ्या मजल्यावर सभा भवनात खांब आहेत. तसेच प्रवेशद्वारावर मगरींचे आणि फुलांचे अर्धगोलाकार आर्ट बनविलेले आहे.
लेणी क्रमांक ७
ही विहार लेणी आहेत. या श्रावस्तीच्या चमत्कारांचा शिल्पपट आहे.
लेणी क्रमांक ८
यामधील लेणी ही नष्ट झालेली आहेत. या ठिकाणी पर्यटन विभागाने विद्युतगृह स्थापन केले आहे.
लेणी क्रमांक ९
हे एक चैत्यगृह आहे. प्रवेशद्वारावर जाळीयुक्त चैत्यगावाक्षे अलंकारण म्हणून कोरली आहेत. चैत्यगृहात २१ स्तंभ आहेत. या स्तंभाच्या रांगेने सभागृहाचे मुख्य सभागृह आणि प्रदक्षिणापत असे दोन भाग पडतात. सभागृह डाव्या हाताच्या भिंतीवर नाग उपासक आहे. कमळ आणि भगवान बुद्ध यांची चित्रे आहेत.
लेणी क्रमांक १०
ही लेणी म्हणजे एक हिनयान मंदिर आहे. ज्यात जवळपास ४० खांब आहेत. त्यावर उत्कृष्ट असे कोरीव काम केलेले आढळून येते. ते एक स्तूप आहे. ज्यावर पाली भाषेतील ब्राम्ही लिपीमध्ये लेख कोरलेले आहेत. या लेखावरून स्पष्ट होते की, या लेणींची निर्मिती इसवी सन पूर्व दोन शतका अगोदर झालेली आहे. या लेखात असेही दर्शवण्यात आले आहे की, या लेणीचा दर्शनी भाग बांबू लाकूड व्यापाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीने काढला होता.
लेणी क्रमांक ११
हा एक विहार आहे. याच्या छतावर काही चित्र दिसतात. लेणी क्रमांक एक मध्ये स्तंभावर हरिणीची चार धडे आणि एकच तोंड असे शिल्प आहे. त्याचे चित्र येथे पहावयास मिळते.
लेणी क्रमांक १२
ही विहार लेणी आहेत. अजिंठा लेणी समूहातील हा सर्वात प्राचीन विहार. यात बौद्ध भिक्षेसाठी छोट्या खोल्या आहेत. त्यात झोपण्यासाठी ओटी कोरलेले आहेत. समोरच्या भिंतीत अगदी उजव्या कोपरातील खोलीच्या अलीकडे होणाऱ्या एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहेत. त्यात घनामदंड नामक व्यापाराच्या दानाचा उल्लेख केलेला आढळून येतो.
लेणी क्रमांक १३, १४, १५अ
हे सगळे विहार आहेत आणि यामध्ये चांगली शिल्पे कोरलेली आहेत.
लेणी क्रमांक १६
या लेणीमध्ये फारच महत्त्वपूर्ण चित्रे आहेत. यामध्ये बुद्धाच्या जीवनावरील घटना दर्शवण्यात आल्या आहेत. डाव्या बाजूला एका दृश्यात बुद्धाचे चुलत बंधू नंद दाखविण्यात आलेले आहेत. संसारिक सुखाचा त्याग करून भिक्षुक बनलेली असे दाखवण्यात आले आहे. एका दृशावर नंदाची माता दाखवण्यात आलेली असून, जी मूर्चीत पडलेली आहे. एक नर्स तिची देखरेख करीत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, नर्स चा पेहराव तोच आहे जो आज काल उपयोगात आणला जातो.
कथकली नृत्य चे चित्र प्रशासिनी आहे. आत पूजास्थानी बुद्धाची विशाल आकृती आहे. हत्ती, घोडे, मगरींचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते. हे सुंदर आहे. छतावरी चित्रकला सुंदर आणि आकर्षक आहे. एक चित्र बुद्धाच्या मातेचे आहे. ज्यात ती आपल्या पतीस स्वप्न सांगत असून ज्योतिषी त्या स्वप्नांचा अर्थ सांगत आहे. या चित्रावर थ्री डीचा प्रभाव आहे.
लेणी क्रमांक १७
या लेणीमध्ये बुद्धाच्या जीवनावरील प्रत्येक घटना आणि जन्म कथा दर्शवण्यात आले आहेत. सभा भवन सुंदर आहे. व पूजा स्थानात बुद्धाची आकृती आहे. डाव्या बाजूस बुद्धाच्या पूर्व जन्माचे चित्र असून, ते एका हत्तीचे आहे. याच्या अनेक सोंडी आहेत असे दृश्य दाखविले आहे. महाकवी व कथेत बुद्धास वानराच्या जन्मी दाखवण्यात आले आहे.
दुसऱ्या एका दृश्यामध्ये राजकुमारास दयाळू दाखवण्यात आलेले असून, तो आपल्या परिवारासह भेटतो. आणि त्याचवेळी त्यांनी संसारिक वास्तूंचा त्याग केलेला आहे असे दिसून येते.
बुद्ध आपली पत्नी राजकुमारी यशोधरा आणि पुत्र राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असतानाचे चित्र दर्शवले आहे. बुद्धाने विशाल शरीर धारण केलेले असून यशोधरा आणि राहुलचे शरीर लहान दर्शवण्यात आलेले आहे. पूजास्थानी वाकाटका वंशातील हरीश यांची आकृती आहे.
राजा हरिसेन आणि त्याचा मंत्री वराहदेव आपल्या हातात दीपक घेऊन बुद्धासमोर उभे आहेत.
येथील छत इतके सुंदर चित्रित केले आहे की, असे भासते की, हा एक कपडा असून त्याच्या सर्व बाजूस काट किनारपट्टी आहे. छतावर परिकथा चित्रित केलेल्या आहेत. दालनात सुद्धा चित्रे आहेत, जे जीवनाच्या अनेकतेस दर्शवतात. शिवाय एक चित्र असे आहे, ज्याला हत्तीला बुद्धास मारण्यासाठी आणले होते, परंतु बुद्धाने या हत्तीला आपल्या अंकित करून घेतले. येथे एका अप्सरेचेही सुंदर चित्र दिसून येते.
लेणी क्रमांक १९
हे एक घोड्याच्या नालीच्या आकाराचे मंदिर आहे. बुद्धाच्या आकृत्या आहेत. आणि नागराजा आपल्या पत्नी समवेत दर्शवलेला आहे. डाव्या बाजूस बुद्ध आपल्या पत्नी आणि पुत्राकडून दीक्षा घेत आहे असे दिसून येते. तसेच तीन छत्रीचे स्तूप असून त्यावर बुद्धाच्या आकृत्या कोरलेल्या आढळून येतात.
लेणी क्रमांक २०, २१, २२, २३, २४, २५
या विहार लेण्या आहेत, पण त्यात फार शिल्पे व चित्रे नाहीत.
लेणी क्रमांक २६
या लेणीच्या डाव्या बाजूला बुद्धाच्या जीवनावर आधारित दोन चित्रे आहेत. पहिल्या चित्रात बुद्धाचे चित्र असून ते महापरिनिर्वाण मुद्रेत दर्शवण्यात आले आहे. तेथे पोहोचतो नंतर मारा आपल्या राक्षसी शक्ती परत घेऊन जातो. माराच्या कन्या बुद्धास आपल्या मायावी हावभावाने अपृष्ठ करताना व निराश मारा असे दृश्य दिसून येते.
लेणी क्रमांक २७
ही लहान लेणी आहेत. लेणी क्रमांक २६ चाच एक भाग आहे. असे वाटते की, लेणी दोन मजली असून भग्न झालेली आहेत. दुसरा मजला ही अपूर्ण आहे.
लेणी क्रमांक २८ आणि २९
या दोन लेण्या उंच दगडाच्या वर आहे यात पाहण्यासारखे विशेष असे काहीच नाही लेणी क्रमांक 28 मध्ये एक अंगण व स्तंभ आहे आणि लेणी क्रमांक 29 मध्ये फक्त खोदकाम झालेले दिसते परंतु तेथे जाण्यास पायऱ्या नाहीत.
अजिंठा लेणी व्हिडिओ
अजिंठा लेणी यथे कसे जायचे
संभाजीनगर हे शहर ऐतिहासिक असे प्रसिद्ध शहर आहे. हे एक मोठे शहर असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आकर्षण ठरलेले आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असल्यामुळे संभाजीनगर या शहराला विविध मार्गाने जोडण्यात आलेले आहे.
विमान
संभाजीनगर या शहराला छत्रपती संभाजीनगर विमानतळ आहे. या विमानतळावरून अजिंठा ची लेणी पाहण्यासाठी साधारणपणे अडीच तासाचा प्रवास म्हणजेच १०३ किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कॅब करू शकता.
ट्रेन
संभाजीनगर या ठिकाणी असलेले रेल्वे स्टेशन ते अजिंठा लेणी या ठिकाणचे अंतर साधारणपणे अडीच तासाची असून साधारणपणे १०३ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही कॅब ने येऊ शकता.
बस
संभाजीनगर बस स्थानक ते अजिंठा लेणी यामध्ये साधारणपणे अडीच तासाचे अंतर असून साधारणपणे १०१ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कॅब किंवा बस चा वापर करू शकता.
खासगी वाहने
संभाजीनगर हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही खाजगी वाहनाने देखील येऊ शकता, जे तुम्हाला प्रवासासाठी सोयीस्कर होते.
- मुंबई ते संभाजीनगर अंतर ३४० किलोमीटर
- पुणे ते संभाजीनगर अंतर ४२० किलोमीटर
अजिंठा लेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आणि वेळ
अजिंठा लेणी या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण जगभरातील पर्यटक येत असतात. भारतीय पर्यटकांसाठी दहा रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी अडीचशे रुपये असे प्रवेश शुल्क या ठिकाणी आकारले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी चा वेळ हा साधारणपणे सप्टेंबर पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत चा योग्य काळ मानला जातो. अजिंठा येथील लेणी ही सोमवारी पूर्णपणे बंद असतात. मंगळवार ते रविवार या दिवशी सकाळी नऊ पासून संध्याकाळी पाच पर्यंत ही लेणी आपण पाहू शकतो.
अजिंठा लेणी पाहताना घ्यावयाची काळजी
- अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाताना थोडा फार प्रमाणात खाण्याचे पदार्थ तसेच मुबलक प्रमाणात पाणी घेऊन जावे.
- या ठिकाणी जाताना कॅमेरा, मोबाईल यांची व्यवस्थित काळजी घ्यावी.
- अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाताना डोक्यावर कॅप घेऊन जावी जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही.
- अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाताना शक्यतो सप्टेंबरच्या नंतर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत चा वेळ काढावा कारण डोंगर माथ्यावर असल्यामुळे जून पासून साधारणपणे सप्टेंबर पर्यंत जोराचा पाऊस असतो त्यामुळे वर चढताना किंवा उतरताना वगैरे पाय घसरण्याची किंवा तेथील दगडांमध्ये अडकून पडण्याची शक्यता असते.
- या ठिकाणी हवामान हे साधारणपणे मार्चपासून मे महिन्यापर्यंत अति उष्ण असते. त्यावेळी ही लेणी पाहण्यास गेल्यावर आपल्याला उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
- अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाताना सुती आणि पातळ म्हणजे सुटसुटीत कपडे घालून जावे. जेणेकरून त्या तीन ते चार तासाच्या प्रवासात आपल्याला त्रास होणार नाही.
अजिंठा लेण्यांच्या आजूबाजूला असणारी पर्यटन स्थळे
संभाजीनगर हे ऐतिहासिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने तसे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पाहण्यासारखी काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –
दौलताबाद किल्ला
दौलताबाद हे भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, संभाजीनगर जिल्ह्यातील, एक गाव असून या ठिकाणी देवगिरीचे यादव यांचा हा ऐतिहासिक दौलताबाद देवगिरी किल्ला आहे. या देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरलेले आहे.
बीबी का मकबरा
बीबी का मकबरा हा मुगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. ताजमहालची प्रतिकृती म्हणून या बीबी का मकबराला ओळखले जाते. हा मकबरा लाल काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे. हा मकबरा एका भव्य ओट्यावर असा बांधलेला असून यामध्ये मधोमध बेगम राबिया दुरानीची कबर आहे. या कबरीच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत.
दौलताबाद, देवगिरी किल्ला माहिती मराठी
वेरूळ लेणी
वेरूळ या ठिकाणी लेण्याची रचना ही बारा बौद्ध लेणी (लेणी क्रमांक १ ते १२) सतरा हिंदू लेणी ( लेणी क्रमांक १३ ते २९) आणि पाच जैन लेणी (लेणी क्रमांक ३० ते ३४) अशी आहे. जरी या लेण्यांना तीन धर्मात विभागले असले आणि याचे खोदकाम विविध काळात झालेले असले तरी या लेण्यांमध्ये एक समान सूत्र आहे असे दिसते. यातील काही शिल्पाकृती यासारख्याच आहेत. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्य कला, शिल्पकला आणि चित्रकला यासाठी जगप्रसिद्ध आहे.
कैलास मंदिर
जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यंपैकी एक असे समजल्या जाणाऱ्या वेरूळच्या कैलास मंदिराला स्थापत्य कलेतील एक शिल्प म्हटले जाते. कारण ते पर्वताच्या उतरणीवर एका २७५ फुट लांब १५४ फूट रुंद आणि जवळपास ९० फूट उंच अशा प्रचंड खडकातून एकसंध मंदिर आतून बाहेरून कोरून काढलेले आहे. ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले. “आदी कळस मग पाया रे” या वर्णनानुसार हे एकाच कातळात प्रचंड मोठे असे शैल मंदिर बांधले गेले आहे. याची बांधणी द्रविड पद्धतीची असून प्रवेशद्वारी दुमजली गोपूर असून त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर शिवाच्या विविध मूर्ती कोरल्या गेल्या आहेत.
घृष्णेश्वर मंदिर
भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर मंदिर होय. हे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौलताबाद पासून जवळपास ११ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमी बाईंनी हे मंदिर बांधले असून, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराला घोषित करण्यात आले.
वॉटर पार्क
एलोरा रोड या राष्ट्रीय महामार्गावर हे वॉटर पार्क आहे. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी डिझाईन केलेल्या स्लाइड तसेच स्वतंत्र स्विमिंग पूल देखील आहेत. या ठिकाणी स्वादिष्ट स्नॅक्स आणि शीतपेय देणारे आणि फूड स्टॉल आणि काउंटर देखील आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत हे वॉटर पार्क चालू असते. ४५० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत याचे प्रवेश शुल्क आकारले जाते.
पाणचक्की
पाण्याच्या दाब निर्माण करून दगडी जाते फिरवण्याची किमया साध्य करण्याची ही कल्पना जवळपास ४०० वर्षांपूर्वी अमलात आणलेली आहे. ही पाणचक्की उभी करण्यामध्ये मलिक अंबरचे मोठे योगदान दिसून येते.१७व्या शतकाच्या सुरुवातीला आणि उत्तरार्धामध्ये पाणचक्कीचे बांधकाम सुरू झाले.
जायकवाडी धरण
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्रमुख धरण गोदावरी नदीवर आहे. ६० किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद इतका मोठा पसारा या जायकवाडी धरणाचा आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्यासाठी आणि चार वर्षाच्या पिण्याच्या पाण्यासाठी ची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र देखील समजलं जातं
गवताळा अभयारण्य
जवळपास कन्नड गावापासून १५ किलोमीटर आणि चाळीस गावापासून २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. त्या ठिकाणी चौकीमध्ये गेल्यावर नोंद केल्यानंतर आपल्याला आत मध्ये प्रवेश मिळतो. या अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. याच्या आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसून येतात. तसेच चंदनाच्या वनातून वाहणारा एक नाला देखील दिसतो. त्याला चंदन नाला असे म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट यासारखे रंगबिरंगी पक्षी त्याचप्रमाणे सातभाई, सुब्रह्मण, बुलबुल, कोतवाल, चंडोल, दयाळ यासारखे पक्षी दिसून येतात.
अजिंठा येथे राहण्यासाठी हॉटेल्स
अजिंठा लेणी पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी चांगली हॉटेल्स खालील प्रमाणे –
- हॉटेल पद्मपाणी पार्क
- हॉटेल अजंठा
- ग्रीन रेस्टॉरंट फरदापुर
- हॉटेल आर्यदीप
- हॉटेल मुरली मनोहर
- हॉटेल व्ह्यू पॉईंट
अजिंठा येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
औरंगाबाद म्हणजे आताचे संभाजीनगर या शहरावर मुघल आणि निजाम यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या ठिकाणी मांसाहाराचे प्रमाण अधिक आढळून येते. या ठिकाणी बिर्याणी, पुलाव यासारखे पदार्थ प्रसिद्ध आहेत.या ठिकाणची इम्रती हा विशेष असा प्रसिद्ध पदार्थ आहे. तसेच येथे जिलेबी व भज्यांपासून बनवलेले पदार्थ सुद्धा चविष्ट असतात.याठिकाणी परदेशी पर्यटक येत असल्यामुळे इटालियन लझानीया व्हेज, चीज पास्ता, जामून शॉट आणि आइस टी सारखे प्रसिद्ध पदार्थ देखील मिळतात.
प्रश्न
अजिंठा लेणी कुठे आहेत ?
महाराष्ट्र राज्यातील, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, सिल्लोड तालुक्यात, अजिंठा गावामध्ये ही अजिंठा लेणी आहेत.
अजिंठा लेणी कशासाठी प्रसिद्ध आहेत ?
येथील बौद्ध स्तूप यासाठी अजिंठा लेणी प्रसिद्ध आहे.
अजिंठा लेणी कोणत्या दिवशी बंद असतात?
अजिंठा लेणी सोमवारी बंद असतात.
अजिंठा आणि एलोरा लेणी एकच आहेत का?
अजिंठा आणि वेरूळची लेणी वेगवेगळी आहे.
अजिंठा आणि एलोरा लेणी फिरण्यासाठी किती वेळ लागतो?
अजिंठा लेणी फिरण्यासाठी साधारणपणे चार ते पाच तास लागतात .
अजिंठा येथे किती लेण्या आहेत?
अजिंठा येथे एकूण २९ लेण्या आहेत.
निष्कर्ष
तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमच्या ब्लॉग बद्दल काही मते असल्यास किंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा. आम्ही आपल्या मताचे नेहमी स्वागतच करू. आणि त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार बदल देखील घडवू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयांना घेऊन तोपर्यंत नमस्कार🙏🙏