गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती : Ganesh Chaturthi Information In Marathi

Ganesh Chaturthi Information In Marathi | गणेश चतुर्थी माहिती – आपल्या भारताला धार्मिक संस्कृती आहे. त्यामुळे येणारे प्रत्येक सण संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. श्रावण महिना लागला की, सण उत्सवांना सुरुवात होते. मग वेध लागतात, नागपंचमीचे, त्यानंतर गोकुळाष्टमीचे आणि नंतर गणेश चतुर्थीचे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

Table of Contents

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती : Ganesh Chaturthi Information In Marathi

सणाचे नावगणेश चतुर्थी
समर्पितभगवान श्री गणेश
दुसरे नावगणेशोत्सव
कोण साजरी करतातहिंदू
मराठी महिनाभाद्रपद
इंग्रजी महिनाऑगस्ट / सप्टेंबर
यावर्षी कधी आहे१९ सप्टेंबर
तिथीभाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला
मुहूर्त सुरूसकाळी ११.०७ पासून.
मुहूर्त समाप्तदुपारी ०१.३४ पर्यंत.

प्रस्तावना (Introduction Of Ganesh Festival 2023)

हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. या गणेश चतुर्थीचा इतिहास, आपण गणेश चतुर्थी का साजरी करतो? याचे महत्त्व, त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी कशाप्रकारे साजरी केली जाते? याबाबतची सगळी माहिती आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात गणेश चतुर्थीची माहिती.

गणेश चतुर्थीचा इतिहास (History Of Ganesh Chaturthi)

स्कंदपुराण, नारद पुराण, त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य स्मृती, महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये गणपतीचा उल्लेख आढळून येतो. पाचव्या आणि आठव्या शतकामध्ये एलोरा लेण्यांसारख्या हिंदू, बौद्ध, जैन मंदिरांमध्ये केलेल्या कोरीव कामांमध्ये गणेशाच्या मूर्ती विराजमान असल्याचे दिसून येते. गणेश चतुर्थीचा उगम हा प्राचीन काळापासून आहे. परंतु सतराव्या शतकात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या गणेश चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले.

नक्की वाचा 👉गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या सणाचे रूप बदलले. आणि लोकप्रिय केले. ब्रिटिश लोकांनी आपल्या भारतावर वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या देशाप्रती असलेली भावना वाढवण्यासाठी टिळकांनी हा गणेश उत्सव साजरा केला. यामुळे आता गणेश चतुर्थी हा सण देशभरात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण मानला जातो.

गणेश चतुर्थी मुहूर्त कधी आहे? (Ganesh Chaturthi Muhurat 2023)

यावर्षी गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३ मंगळवार या दिवशी आहे. याच दिवशी विनायक चतुर्थी देखील आली आहे.

 • मुहूर्त सुरू – सकाळी ११.०७ पासून.
 • मुहूर्त समाप्त – दुपारी ०१.३४ पर्यंत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र का बघत नाहीत?

गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्र दर्शन करू नये. यासाठी फार पूर्वीपासून एक कथा सांगितली जाते. एके दिवशी आपले लाडके बाप्पा श्री गणेश मूषकावर बसून मोठ्या लगबगिने कुठेतरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले आणि पडले. त्यांना पडलेले पाहून चंद्र जोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला राग आला. आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, आजपासून तुझं तोंड कोणीही पाहणार नाही. जो तुझे तोंड पाहिलं, त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. गणपती बाप्पाच्या या बोलण्यामुळे चंद्र मात्र चांगलाच घाबरला आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी मोठमोठे तप सुरू केले.

हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी

चंद्राच्या या भक्तीने गणपती बाप्पा देखील प्रसन्न झाले. आणि त्यांनी चंद्राला उ:शाप दिला की, फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझा तोंड कोणीही पाहणार नाही. त्यानंतर चंद्राने गणपती बाप्पा कडे विनंती केली की, जर एखाद्याने चुकून त्या दिवशी माझे दर्शन घेतले तर त्यांनी काय करावे माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला व्हायला नको. यावर बाप्पाने सांगितले की, संकष्टी चतुर्थी व्रत केल्यास त्या व्यक्तीची खोट्या आळातून मुक्तता होईल. म्हणून या दिवशी कोणीही चंद्र दर्शन करत नाही.

गणेश चतुर्थी का महत्वाची आहे? (Importance Of Ganesh Chaturthi)

हिंदू कॅलेंडर मधील एक महत्त्वाचा सण म्हणून गणेश चतुर्थीला पाहिले जाते. हा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने भक्तीने आनंदाने साजरा केला जातो. या सणाला अनेक कारणांमुळे महत्त्व प्राप्त होते. हा सण भारतीय संस्कृती, वारसा आणि विविधतेचा उत्सव आहे. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मुख्यतः आर्थिक दृष्टीने हा सण महत्त्वाचा समजला जातो.

१ सामाजिक महत्त्व

गणेश चतुर्थी ही काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस अशाप्रकारे साजरी केली जाते. संपूर्ण भारतामध्ये, त्याचप्रमाणे परदेशातही ज्या ठिकाणी भारतीय राहतात त्याठिकाणी मोठ्या आवडीने हा सण साजरा केला जातो. सामाजिक एकोपा राहण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरांमध्ये आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. हा गणेशोत्सव भाद्रपद महिन्यामध्ये दरवर्षी साजरा केला जातो.

त्यासाठी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी गणेश मंडळांची स्थापना केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये देखील दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणेशाची पूजा आणि आरती केली जाते. तसेच नैवेद्य दाखवून प्रसादाचे देखील वाटप करण्यात येते. या उत्सव प्रसंगी अनेक गणेश मंडळामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. तसेच या सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली पहावयास मिळते. या निमित्ताने समाजातील लोक एकत्र येतात आणि आपल्यातील मतभेद दूर करून हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.

२ सांस्कृतिक महत्त्व

आपला भारत देश हा संस्कृती धार्मिक परंपरा जपणारा देश आहे. या देशांमध्ये साजरे होणारे प्रत्येक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि एकत्र येऊन साजरे केले जातात. गणेश चतुर्थी हा भारतातील एक महत्त्वाचा असा सण आहे, जो विविधता आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण देशभरात विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात,आनंदात साजरा केला जातो. या उत्सवामुळे लोकांना एकत्र येण्यासाठी, त्याचप्रमाणे परंपरा साजरी करण्यासाठी, तसेच सांस्कृतिक पद्धत अवलंबण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.

३ पर्यावरणाचे महत्त्व

या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या पदार्थांचा वापर करून गणपतीच्या मूर्ती केल्या जातात. यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम घडून येत आहे. याला आळा घालण्यासाठी, पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच पर्यावरण पूरक उत्सवांना चालना देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साहित्यापासून म्हणजेच माती, कागद यापासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्ती उदयास येत आहे. यामुळे या मूर्तींचे पाण्यामध्ये विघटन होऊन पर्यावरणातील कुठल्याही जीवांना हानी होत नाही.

४ आर्थिक महत्त्व

गणेशोत्सवाला ज्याप्रमाणे संस्कृती, सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे. हा सण साजरा करण्यासाठी सणाला लागणाऱ्या सजावटीच्या, मिठाईच्या तसेच खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोक बाजारपेठेमध्ये येत असतात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. येथील कारागीर, सजावटकार, व्यापारी लोकांना यामुळे रोजगार निर्माण होतो.

रक्षाबंधन माहिती मराठी 

५ गणेश चतुर्थीचे महत्त्व

पुराण कथेनुसार माता-पार्वती चा पुत्र भगवान गणेश याचा जन्म भाद्रपद चतुर्थीला झाला होता. म्हणून आपण गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती बुद्धीची देवता आहे. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान असतो. कोणत्याही कार्य असल्यावर सर्वात आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. संकटाचा नाश करणारा, अडथळे दूर करणारा आणि आनंदी वातावरण निर्माण करणारा असा हा विघ्नहर्ता, गणपती म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

गणेश चतुर्थीचे महत्त्व

गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? (गणेश चतुर्थी माहिती मराठी)

पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला होता. म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार महर्षी व्यासांनी ज्यावेळी महाभारताची रचना लिहिण्यासाठी गणेशाची प्रार्थना केली होती. यानंतर महर्षी व्यासांनी भाद्रपद चतुर्थीला श्लोक पठण करायला सुरुवात केली. आणि श्री गणेशांनी ती लिहायला सुरुवात केली. गणेशांनी दहा दिवस न थांबता, न थकता लिखाण पूर्ण केले. या दहा दिवसांमध्ये श्री गणेशांवर धूळ आणि मातीचा थर चढला होता. हा थर स्वच्छ करण्यासाठी श्री गणेशांनी सरस्वती नदी स्नान केले होते. त्यावेळीपासून आपणही गणेश चतुर्थी सण साजरा करतो.

गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी हा सण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात भाद्रपद चतुर्थीला येतो. हा सण जवळपास दहा दिवस चालतो. आणि अनंत चतुर्दशी या दिवशी शेवटचा दिवस म्हणून गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. या गणेश चतुर्थीची तयारी काही महिने आधीच सुरू होते. गणेशाची मूर्ती तयार करणाऱ्या कुशल कारागिराकडे मूर्ती बनविण्यास सांगितले जाते. त्यानंतर घरामध्ये तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ केला जातो.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी काहीजण गणेशाची मूर्ती घरामध्ये आणून घेतात. त्याचप्रमाणे घरामध्ये लागणारे खाण्यापिण्याचे साहित्य तसेच सजावटीचे सामान, मिठाई यासारख्या गोष्टी आणल्या जातात. गणेश चतुर्थीच्या आधी सजावट केली जाते. यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, पूजेची तयारी सुरू केली जाते. संपूर्ण घर दिव्यांनी, रांगोळ्या आणि फुलांनी सजवून जाते.

या दिवसांमध्ये गणपतीच्या आवडीचे पदार्थ मोदक, लाडू, खीर,नैवेद्य म्हणून केले जातात. या दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ पूजा आरती केली जाते. त्याचप्रमाणे भजन, कीर्तन देखील केले जाते. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेशाची यथा सांग पूजा करून आरती करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी उत्तर पूजा केली जाते. त्यानंतर विसर्जनासाठी गणेशाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्या त्या ठिकाणच्या जलसाठ्यामध्ये गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे हा सण साजरा केला जातो.

 • गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर आपण जी समय पेटत ठेवतो ती गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत दिवस-रात्र तेवत राहिली पाहिजे.
 • गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री कोणीही चंद्र दर्शन करू नये.
 • श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये.
 • गणेश चतुर्थी मध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना शुभ मानले जाते.
 • या दिवसात गणपती बाप्पाला आवडणारे पदार्थ गणपती बाप्पाला अर्पण केले पाहिजे.
 • गणपती बाप्पाची पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे.
 • पूजेसाठी डाव्या सोंडेचा गणपती हा शुभ समजला जातो.
 • गणेशाची स्थापना देखील पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये करावी.

सार्वजनिक गणेशोत्सव (Sarvajanik Ganeshotsav)

ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठी ,लोकांना एकत्र आणण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये असलेली भावना वाढण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आता या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक संस्कृती कार्यक्रमाचे विविध स्पर्धांचे आयोजन केले.

सार्वजनिक गणेशोत्सव Sarvajanik Ganeshotsav देखावे पाहण्यासाठी लोक एकत्र येत असतात. या गणेशोत्सवामुळे अनेक जणांना रोजगार प्राप्त होऊन कोट्यावधी रुपयांची उलाढाल होताना दिसून येते. मूर्तिकार प्रत्येक महिने अगोदर मूर्ती बनवायला सुरू करत असतात. त्यामुळे मूर्तीकारांना देखील रोजगार प्राप्त होतो. या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे समाजातील लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यामुळे या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.

गणेश चतुर्थी कुठे कुठे साजरी केली जाते? (गणेश चतुर्थी २०२३)

गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभर मोठ्या आनंदाने आणि जल्लोषांमध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यापासून ते अगदी तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा यासारख्या राज्यांमध्ये हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सव तसेच घरोघरी देखील साजरा केला जातो. मातीच्या मूर्तीची स्थापना करून प्रत्येक कुटुंब आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची पूजा केली जाते. काही राज्यातील मंदिरांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या आनंदाने, धामधुमीत, यथासांग पूजा अर्चा करून साजरा केला जातो.

गणपतीला आवडणाऱ्या वस्तू

गणेश चतुर्थी म्हटली की, गणपतीला आवडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात.या गोष्टी काय आहेत, ते आपण जाणून घेऊया.

१. मोदक

गणपतीला सर्वात प्रिय पदार्थ मोदक हा आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. खोबऱ्याचे सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केलेले मोदक गणेशाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. आता मोदकांमध्ये देखील अनेक प्रकार उपलब्ध झालेले असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे मोदकांचा नैवेद्य दाखवतो.

२. दुर्वा

गणपतीला दुर्वा फार प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीची पूजा करताना आपण नेहमीच २१ दुर्वांची जुडी वाहतो. यामागे एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुरानी स्वर्गात तसेच पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणपतीला गाऱ्हाणे घातले गेले. गणपतीने त्या अनलासुराला गिळून सर्वांचा त्रास संपवला. अनलासूर राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्याने टी थांबेना. त्यामुळे कश्यप ऋषींनी गणपतीला दुर्वांचा रस प्यावल्यास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली. आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या. आणि तेव्हापासून गणपती पूजेमध्ये दुर्वा वाहिल्या जातात.

३. जास्वंद

गणपतीचा वर्ण हा शेंद्रिय किंवा लाल असा आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदाचे लाल फुल हे अतिशय प्रिय आहे. गणपती पूजेमध्ये जास्वंदाच्या लाल फुलाला त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे जास्वंदीच्या फुलांचा हार देखील गणपतीला वाहिला जातो.

गणेश चतुर्थी पूजा साहित्य (Pooja Sahitya Of Ganesh Chaturthi In Marathi)

पांढरी आणि लाल वस्त्र, लाल रंगाची फुले, केळीचे पान,फळे आणि फुले, बेल पत्र, शमी पत्र, गणपतीच्या पूजेतील 21 पत्री आंब्याची पाने, रांगोळी, अत्तर, श्रीफळ, तुळशी, नाडापुडी, माता गौरीचा मुखवटा, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, बिंदी, कुंकु, सिंदूर, इत्यादी. हळदकुंकू, ताम्हण, पळी, पंचपात्र,विड्याची पाने, सुटेपैसे, अगरबत्ती, सुपारी, घंटा, चौरंग, अष्टगंध, दूर्वा, जानवे, अक्षता, पुष्पहार, माचिस, समई, गुलाल, तूप, निरांजन, तेल, मिठाई, कापूस, हरतालिकेची मूर्ती, शिवलिंग, दिवा, कापूर, अक्षता, अबीर, चंदन,धूप, शहाळी, केळी, कलश. पंचामृत – (तूप, दही, साखर, दूध, मध.)

गणेश चतुर्थी पूजाविधी

 • सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
 • त्यानंतर पूजेची सर्व तयारी करावी.
 • त्यानंतर सोवळे नेसावे.
 • घरातील देवाची पूजा करावी.
 • ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापन करणार त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवावा.
 • त्यावर लाल रंगाचा कपडा घालावा व त्या कपड्यावर थोडेसे तांदूळ ठेवून नंतर गणपतीची मूर्ती स्थापन करून घ्यावी.
 • दोन बाजूला समया लावून घ्याव्या.
 • त्यानंतर दूर्वा पाण्यात बुडवून गणपतीच्या मूर्ती दर्शन करून तसेच गणपतीच्या पूजेच्या साहित्यावर शिंपडून घ्यावे.
 • गणपतीच्या मूर्तीला जानवे घालावे.
 • त्याचप्रमाणे फुलांची माळ घालावी.
 • नंतर गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळद, कुंकू, गुलाल लावून घ्यावा.
 • गणपतीच्या मूर्तीला फुले वाहावीत.
 • गौरी आणि गणपतीच्या मूर्तीला लाल वस्त्रे वाहवित.
 • गणपतीच्या मूर्तीला मिठाई, मोदकांचा तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
 • त्यानंतर मूर्ती समोर अगरबत्ती लावावी.
 • गणपती मूर्तीच्या बाजूला गौरीची मूर्ती एका कलशामध्ये स्थापन करून घ्यावी. त्यानंतर तिला हळद-कुंकू वाहून फुले वहावित.
 • त्यानंतर गौरीच्या मूर्तीला देखील निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर गणपतीला देखील निरांजनाने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.
 • गणपतीच्या मंत्रोच्चाराने यथासांग पूजा करावी.
 • गणपतीला धूप दाखवून संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.
 • त्यानंतर गणपतीची कापूर लावून आरती करावी.
 • पहिल्या दिवशी गणपतीच्या आवडीचे मोदक यांचा तसेच पंचपकवांनांचा नैवेद्य दाखवावा.

काहींच्या घरी दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, सात दिवसांचे, अकरा दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे प्रत्येक दिवशी वरील प्रमाणे गणपतीची पूजा करावी.

गणेश विसर्जन २०२३ पूजा (Ganesh Visarjan 2023)

ज्याप्रमाणे आपण गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाची स्थापना करून पूजा करतो, त्याच पद्धतीने गणपतीची विसर्जन पूजा देखील केली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची पूजाअर्चा करून विसर्जन केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभते असे सांगितले जाते. ही विसर्जन पूजा कशी करावी ते खालील प्रमाणे –

 • सर्वप्रथम गणपतीला फुलांचा हार घालावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्याव्यात.
 • त्यानंतर लाल वस्त्र वहावीत. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदीची फुले व्हावीत.
 • यानंतर अगरबत्ती लावावी. आणि घंटा वाजवून अगरबत्तीने ओवाळावे.
 • त्याचप्रमाणे तुपाचे निरांजन लावून, घंटा वाजवून, तुपाचे निरांजनाने ओवाळावे. गणपतीसाठी तयार केलेला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर विडा, सुपारी सुटे, पैसे यावर पाणी वहावे.
 • गणपतीची मनोभावे आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावे.
 • मंत्रपुष्पांजली नंतर पूजेच्या अक्षता आणि फुले गणपतीला वहावीत.
 • विसर्जनापर्यंतच्या पूजेमध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी.
 • उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला फुले, अक्षता वाहून नमस्कार करून घ्यावा.
 • त्यानंतर गणपतीवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहून गणपती जागेवरून थोडासा हलवायचा आहे.
 • गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य, त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे.
 • गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.

अष्टविनायक (गणपतीची नावे )

अष्टविनायक

महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात.

नावेस्थान जिल्हा
मोरेश्वर मोरगाव पुणे
सिद्धिविनायक सिद्धटेकअहमदनगर
बल्लाळेश्वरपाली रायगड
वरदविनायकमहाडरायगड
चिंतामणीथेऊरथेऊर
गिरिजात्मजलेण्याद्रीपुणे
विघ्नेश्वरओझरपुणे
महागणपतीरांजणगाव पुणे

भारतातील गणेश मंदिरे (गणेशोत्सव माहिती मराठी)

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती – भारतातील १० प्रसिद्ध गणपती मंदिरे आणि त्यांची ठिकाणे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे मंदिर भगवान गणेशाला समर्पीत असून हे एक हिंदू मंदिर आहे. आणि पुण्यामध्ये आहे. हे मंदिर १३० वर्षे जुने असून २०१७ मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीची १२५ वर्षे पूर्ण केली.

मानकुला विनायक मंदिर, पुडुचेरी

मानकुला विनायक मंदिर हे पूद्दुचेरी या ठिकाणी असून या मंदिराचा इतिहास १९६६ पासूनचा आहे. मंदिरातील गणपतीचे मूख समुद्राकडे आहे. म्हणून त्याला भुवनेश्वर गणपती असेही म्हणतात.

श्री सिद्धीविनायक मंदिर, मुंबई

सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पीत हिंदू मंदिर असून प्रभादेवी मुंबई या ठिकाणी आहे. आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी १८०१ मध्ये हे मंदिर बांधले होते. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.

मधुर महागणपती मंदिर, केरळ

केरळ मधील मधुर वाहिनी नदीच्या किनाऱ्यावर हे भगवान गणेशाचे मंदिर आहे. म्हणून या मंदिराचे नाव मधुर महागणपती असे आहे. या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात झाली होती असे सांगितले जाते.

कनिपक्कम विनायक मंदिर, चित्तूर

चित्तूर या ठिकाणी कनिपक्कम गणपतीचे मंदिर असून हे मंदिर कानिपक्कम विनायक मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये हे मंदिर असून या मंदिराचे निर्माण राजा कुलोतुंग पहिले यांनी केले होते.

रणथंबौर गणेश मंदिर, राजस्थान

भारताच्या राजस्थान प्रांतातील सवाई माधोपुर जिल्ह्यामध्ये रणथंबोर किल्ल्याच्या आत हे त्रिनेत्र गणेशाचे मंदिर आहे. महाराजा हमीरदेव चौहान यांनी हे गणेश मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते.

गणेश टोक मंदिर, जयपूर

गणेश टोक हे गंगटोक मधील एक छोटेसे मंदिर असून भगवान गणेशाला समर्पित असे आहे. हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर बसलेले आहे.

मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर

मोती डुंगरी हे जयपुर राजस्थान या ठिकाणी असलेले मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. १७६१ मध्ये सेठ जयराम पालीवाल यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधले गेले असल्याचे सांगितले जाते.

गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ठिकाणी गणपतीपुळे हे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी भगवान गणेशाला समर्पित असे हे गणपतीपुळे मंदिर आहे.

उच्ची पिल्लयार मंदिर, तामिळनाडू

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली या ठिकाणी गणपतीचे हे उच्ची पिल्लयार मंदिर सातव्या शतकात बांधले गेले आहे. त्रिची येथील खडकाच्या किल्ल्यावर हे मंदिर वसलेले आहे.

गणपतीची नावे

वेदांमध्ये श्री गणपतीची नावे १०८ सांगितली आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, गणपतीला १२ वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. नारद पुराणात गणेशाची १२ नावे खालीलप्रमाणे आहेत:

गणाध्यक्ष
एकदंत
गजकर्ण
भालचन्द्र
लंबोदर
सुमुख
धूम्रकेतु
कपिल
विघ्नविनाशक
विकट
विनायक
गजानन

गणेश चतुर्थी कथा (Ganesh Chaturthi Story)

शिवपुराणातील गणेश चतुर्थी कथा – एके दिवशी देवी पार्वतीने नंदीला आपला द्वारपाल म्हणून ठेवले. आणि देवी पार्वती स्नान करण्यासाठी गेल्या. त्याच वेळी महादेव त्या ठिकाणी आले आणि नंदीचे काहीही न ऐकता देवी पार्वती स्नान करत असलेल्या स्नानगृहात गेले. यामुळे देवी पार्वती अपमानित झाल्या. त्यांना खूप राग आला. मग पार्वतीने तिच्या सखी जया आणि विजया यांचे ऐकून आपल्या शरीराला लावलेला हळद आणि उटण्याचा लेप काढून देवी पार्वतीने एक छोटासा गोळा तयार केला. आणि त्यापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती तयार केली. आणि त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले.

एके दिवशी आपल्या ह्याच पुत्राला देवी पार्वती द्वारपाल म्हणून नेमतात. माझे स्नान होईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी स्पष्ट आज्ञा करतात. आणि स्नानगृहात स्नान करण्यासाठी निघून जातात. त्याचवेळी त्या ठिकाणी महादेव येतात. देवी पार्वतीचा तो द्वारपाल म्हणून नेमलेला पुत्र त्यांना स्नानगृहात जाऊ देत नाही. पुत्र सांगतो की, माझ्या मातेची अशी आज्ञा आहे की, स्नान गृहात कोणालाही प्रवेश देऊ नये. माझी माता यावेळी स्नान करीत आहे. म्हणून तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही.

MAHASHIVRATRI : महाशिवरात्र

महादेव पुत्राला विचारतात तू कोण आहेस? आणि मला स्नानगृहात का जाऊ देत नाहीस?
तो पुत्र म्हणतो की, मी कोण आहे ते सोडा, तुम्ही आधी इथून निघून जा. बालकाच्या अशा स्वरात बोलण्याने महादेव संतापतात. त्या पुत्रासोबत महादेव यांचा खूप मोठा वाद होतो. त्यानंतर त्या पुत्राला स्नानगृहापासून हटवण्यासाठी अनेक देवी देवता प्रयत्न करतात. पण यामध्ये त्यांना अपयश येते. तो पुत्र त्यांना युद्धामध्ये पराभूत करून टाकतो. या सगळ्या गोष्टीने संतप्त झालेले महादेव रागाने आपल्या त्रिशूलाने त्या पुत्राचे मस्तक धडा पासून अलग करतात. जेव्हा पार्वती देवी स्नान करून बाहेर येतात. आणि घडलेला सर्व प्रकार पाहतात, त्यावेळी देवी पार्वती क्रोधित होतात. सृष्टी नष्ट करू लागतात. त्यामुळे सर्व देवी देवता त्यांची प्रार्थना करू लागतात आणि क्षमा मागू लागतात.

त्यावेळी देवी पार्वती शांत होतात आणि पुत्राला पुनर्जीवित करावे, आणि त्या पुत्राला सर्वात उच्च स्थान दिले जावे अशी मागणी महादेवांकडे करतात. महादेव देवी पार्वती यांच्या मागणीला होकार देऊन आपल्या गणांना आदेश देतात की, पृथ्वीतलावर जा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्याचे शीर कापून घेऊन या. गण पृथ्वीतलावर जातात त्यावेळी त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसून येतो. मग त्या हत्तीचे शीर कापून घेऊन महादेवासमोर हजर होतात. तेच हत्तीचे शीर महादेव त्या पुत्राच्या धड्यावर लावतात. आणि त्या पुत्राला पुनर्जीवित करतात.

यानंतर महादेव, पार्वती त्याला स्वपुत्र म्हणून स्वीकार करतात. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मूख या दोघांचा मिळून गजानन असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे महादेवाने या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान केले आहे. हे सगळे प्रकार घडले तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. म्हणून या दिवसापासून गणेश चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले असून आपण हा दिवस मोठ्याने आनंदात साजरा करतो.

श्री गणेश मंत्र 01

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अर्थ – वक्राकार सोंड आणि विशाल शरीर आणि कोटी सूर्यासारखी महान प्रतिभा असलेले भगवान श्री. गणेश, आम्हाला आमच्या सर्व कार्य कोणत्याही अडथळा विना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या.

श्री गणेश मंत्र 02

एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।

अर्थ – या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा सण आर्थिक प्रगती आणि समृद्धी परिदान करणारा असा आहे. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीची साधना करावी. कोणत्याही प्रकारचे कार्य सुरू करण्यापूर्वी वरील मंत्रांनी भगवान गणेशाचे स्मरण अवश्य करावे. त्यामुळे तुमची शुभकार्य निश्चितच सिद्ध होतील.

आमचे हे लेख नक्की वाचा 👇

पुण्यातील मानाचे गणपती

FAQ

यावर्षी गणेश चतुर्थी कधी आहे?

यावर्षी गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३मंगळवार या दिवशी आहे.

गणपतीची स्थापना कधी करावी?

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतीची स्थापना करावी.

गणेश चतुर्थीच्या दिवशी काय करू नये?

गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदेव दर्शन करू नये.

गणपतीच्या आवडता पदार्थ कोणता?

मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ आहे.

गणेश चतुर्थी का साजरी करावी?

या दिवशी माता-पार्वतीच्या भागांनी गणपतीचा जन्म झाला होता. म्हणून ही गणेश चतुर्थी साजरी करावी.

सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला?

सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे गणेश चतुर्थी या सणाबद्दल गणेश चतुर्थी माहिती मराठी, कथा पूजा विधि, गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment