महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी : Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी | Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – भारत देशातील अनेक नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी व शिक्षणासाठी विविध नेत्यांनी त्यांच्या कामगिरीतून जनतेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यामध्ये अग्रेसर क्रमांक हा महात्मा ज्योतिबा फुले व त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा लागतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्या काळामध्ये मोठी कामगिरी केली असून, आज फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे शाळेत स्त्रियांना शिक्षणाचा मान मिळत आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही सविस्तर वाचावा.

Table of Contents

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले 
जन्मतारीख ११ एप्रिल, १८२७
वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले
आईचे नाव चिमणाबाई फुले
टोपण नाव जोतीबा, महात्मा
संघटना सत्यशोधक समाज
मुख्य स्मारके भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
धर्म हिंदू
प्रभाव थॉमस पेन, लहुजी साळवे, शिवाजी महाराज
पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले
मुले यशवंत फुले (दत्तक)
प्रभावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मृत्यू २८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३) पुणे, महाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा यांचा जन्म (Early Life of Jyotiba Phule in Marathi)

महात्मा ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण नाव हे ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. महात्मा यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुणे या जिल्ह्यामध्ये झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले व आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते. महात्मा ज्योतिबा यांचे आजोबा शेरीबा गोरे, माधवराव पेशव्यांच्या दरबाराची सजावट करण्याचे काम करत असत. या सजावटीच्या दरम्याने ते विविध फुलांचा वापर करत असत व फुलांनी पूर्ण दरबार सजवून टाकत असत. या त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्या घराण्याला फुले असे आडनाव मिळाले.

ज्योतिबा फुले यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या काकांनी, म्हणजेच रानोजींनी ३५ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून ती हडपून घेतली. यामुळे ज्योतिबांच्या वडिलांकडे उपजीविका करण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव हे कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे थोर विचारवंत होते तसेच ते लेखक व समाज सुधारक सुद्धा होते. महात्मा फुले यांनी स्वतःची सत्यशोधक समाज संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना त्यानी अग्रस्थानी ठेवून, याच्याबद्दल विचार मांडणी केली व याच संस्थेच्या मार्फत ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्र मधील स्त्रियांना शिक्षणामध्ये कमी भासू नये म्हणून, स्त्री शिक्षणाची सुरुवात केली.

काही कालांतराने म्हणजेच १८८८ मध्ये लोकांनी ज्योतिबांना मुंबईत झालेल्या सभेमध्ये महात्मा अशी पदवी बहाल केली गेली . महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या उत्तम पुस्तकांचा प्रभाव होता. उदा. द राईट ऑफ मॅन जस्टीस अँड ह्युमिनिटी, कॉमन सेन्स द एज ऑफ रीजन.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांचे बालपण व शिक्षण (Jyotiba Phule Education in Marathi)

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यामधील कटगुण येथे होते. याच त्यांच्या मूळ गावी ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.

ज्योतिबा हे अवघ्या नऊ महिन्याचे असतानाच ज्योतिबांची आई चिमणाबाई ह्या देवा घरी गेल्या. ज्योतिबांच्या वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ज्योतिबांचे लग्न सावित्रीबाई फुले यांच्याशी लावून देण्यात आले.

ज्योतिबांनी आपली प्राथमिक शिक्षण हे पुणे जिल्ह्यातील पंतजींच्या शाळेत मराठी माध्यमातून घेतले व यानंतर काही काळाने त्यांच्या वडिलोपार्जितचा व्यवसाय म्हणजेच त्यांच्या वडिलांनी चालू केलेला भाजी व्यवसाय त्यांनी स्वतः चालवायला सुरू केला.

शके १८४२ मध्ये ज्योतिबा हे त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी प्रवेश नोंदवला.

ज्योतिबा हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम हा पाच ते सहा वर्षांमध्ये अतिशय तल्लख बुद्धीने पूर्ण केला.

ज्योतिबा फुले यांना विविध भाषांचे ज्ञान होते. तामिळ, कन्नड, उर्दू, इंग्रजी, मराठी, गुजराती इत्यादी भाषांमध्ये ते निपुण होते.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य – भारतातील पहिली मुलींची शाळा (Indias First Girl’s School)

ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थेचे स्थापना केली व या संस्थेच्या मार्फत ज्योतिबा यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्राध्यापिका मिस फरार यांच्यापासून प्रेरित होऊन ज्योतिबा यांनी ०३ ऑगस्ट १९४८ रोजी पुणे जिल्ह्यातील बुधवार पेठेमध्ये, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात भारतामधील स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली.

सर्वप्रथम पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आठ मुलींनी उपस्थिती दर्शवली होती. थोड्या दिवसांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित बनवून भारतामधील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवले.

||स्वराज्यरक्षिणी फिरंगमर्दीनी||राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी||‌‌‌‌

परंतु त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लोक तितकेसे जागरूक नसल्यामुळे लोकांनी मुलींच्या शिक्षणासाठी नामंजुरी दर्शवत विरोध केला. यामुळे ज्योतिबांनी व त्यांच्या पत्नी यांनी स्वतःचा गृहत्याग करून पुण्यामधील गंज पेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये राहायला गेले.

१८४२ रोजी पहिली शाळा चालू केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ०३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी दुसरी शाळा चालू केली.

१७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठ मध्ये त्यांनी तिसऱ्या शाळेची स्थापना सुद्धा केली. यानंतर हळूहळू ज्योतिबांनी आपल्या शाळा स्थापनेच्या कार्यास प्रारंभ केला.

१८५२ रोजी त्यांनी वेताळ पेठेमध्ये भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची अजून एक शाळा सुरू करून मुलींना शिक्षणासाठी प्राधान्य दिले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

यानंतर १८५२ साली पुन्हा नेटिव्ह फीमेल स्कूल सभा, पूना लायब्ररीची स्थापना केली. जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी पुस्तकांचा वापर करता येईल व त्यांना अधिक ज्ञान प्राप्त करता येईल.

१९ मे १८५२ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या वेताळपेठेत, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू करून त्या ठिकाणी धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग या शिक्षकांची नेमणूक केली.

त्यावेळी ज्योतिबा फुले यांना सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर इत्यादी महान लोकांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.

ज्योतिबा फुले यांनी केलेल्या या परिश्रमांसाठी व शाळा उभारणीसाठी, शैक्षणिक क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे प्राध्यापक मेजर थॉमस कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली डेक्कन कॉलेज मधील विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सप्टेंबर १८५३ रोजी अस्पृश्य समाजातील लोकांना, म्हणजेच महार, मांग आदी लोकांच्या शिक्षणासाठी मंडळी नामक संस्था स्थापन केली.

१८५५ मध्ये देशातील प्रौढ नागरिकांसाठी पहिली रात्र शाळा स्थापन करून लोकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न ज्योतिबा यांनी केला.

महात्मा फुले यांचे विचार

इसवी सन १८८२ रोजी भारतामधील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर ज्योतिबा फुले यांनी स्वतःची साक्ष देऊन बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण हे मोफत व गरजेचे करावे, सक्तीचे करावे, तसेच शिक्षक प्रशिक्षक शाळेमध्ये मुलांना अध्यापनासाठी असावेत व बहुजन समाजातील शिक्षक सुद्धा मुलांना शिक्षणासाठी असावेत, त्याचबरोबर जीवन उपयोगी व्यवहारी शिक्षण मुलांना व मुलींना देण्यात यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षण त्यांना पहिले प्राधान्य, तसेच शेतीचे व तांत्रिक शिक्षण सुद्धा मुलांना शिक्षणासोबत देण्यात यावे, त्याचप्रमाणे वसूल केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी व महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे मुलांना शिक्षण हे त्यांच्या जीवनामध्ये गरजा भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण असावे, अशा विविध मागण्या ज्योतिबा फुले यांनी मांडल्या.

यामुळे ज्योतिबा फुले यांना आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ समजले जाते.

महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य (Social Work Of Jyotiba Phule in Marathi)

इसवी सन १८९५ रोजी ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पुणे जिल्ह्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. तृतीय रत्न हे ज्योतिबा फुले यांचे पहिले पुस्तक व मराठी मधील पहिले सामाजिक नाटक म्हणून याला प्रसिद्धी मिळाली.

ज्योतिबा फुले हे एक थोर समाज सुधारक असून त्यांनी २८जानेवारी १८६३ रोजी पुणे या ठिकाणी स्वतःच्या राहत्या घरात पहिली बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर काही काळाने त्यांनी पंढरपुरामध्ये सुद्धा अशा गृहांची स्थापना केली.

पसायदान मराठी रचना आणि भावार्थ : PASAYDAN LYRICS WITH MEANING IN MARATHI

या बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये काशीबाई नातू या महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८८३ साली काशीबाई नातू यांनी जन्माला दिलेल्या मुलाला ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत असे ठेवले व त्याला योग्य शिक्षण देऊन महात्मांनी यशवंतना डॉक्टर बनवले.

ज्योतिबा फुले हे करुणामय व उदार व्यक्तिमत्व होते त्यांनी समाजासाठी विविध कार्य केली व समाजाच्या हितासाठी नेहमी झटत राहिले १८७७ साली जोतिबांनी पुण्यातील धनकवडी येथे झालेल्या दुष्काळ पिढीत लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारून विक्टोरिया अनाथ आश्रमाची सुद्धा स्थापना केली.

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी

पूर्वीच्या काळामध्ये विधवांना स्वतःचा नवरा गेल्यानंतर केशवपनाची प्रथा पार पाडावी लागत असे. महिलांवर झालेला हा अत्याचार ज्योतिबा फुले यांना पहावला नाही व त्यांनी केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर या ठिकाणी एक दिवसीय संप घडवून आणला.

विधवा महिलेला सुद्धा तिचा नवरा मेल्यानंतर स्वतःचे जीवन जगण्याचा पूर्ण हक्क आहे, याची जाणीव समाजामध्ये करून देण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी ०८ मार्च १८६४रोजी गोखलेंच्या बागेमध्ये एका विधवा महिलेचा पुनर्विवाह लावून विधवा पुनर्विवाह प्रथेस सुरुवात केली.

महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी

  • महात्मा फुले हे पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनीचे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते.
  • या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली.  
  • कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही कामे महात्मा फुले यांच्या कंपनीने केली आहेत. 
  • महात्मा फुले यांच्या कंपनीचे भागिदार किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेल्या व्यक्तिंनी बांधकाम क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे.
  • मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे केली. 
  • भारतातील पहिली कामगार संघटना १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन महात्मा फुले यांचे होते.
  • राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते.
  • जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.
  • पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

महात्मा फुले यांचे ग्रंथ आणि साहित्य (Literature Of Jyotiba Phule in Marathi)

ज्योतिबा फुले हे जसे थोर समाज सुधारक होते तसे ते एक लेखक सुद्धा होते. त्यांनी विविध लेख लिहून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.

महात्मा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे.

या समाजाचे मुख्य पत्र म्हणून दिनबंधू नावाचे साप्ताहिक त्या काळात चालविले जात असे.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारित अनेक अखंड रचले व स्वतः लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेमधील कृष्णवर्णीय लोकांना म्हणजेच सावळ्या लोकांना त्यांनी समर्पित केला.

त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले. त्यामधील अस्पृश्यांची कैफियत हा अप्रकाशित ग्रंथ आहे.

यानंतर ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन १८९१ रोजी पूर्ण जनतेमध्ये प्रकाशित करण्यात आला.

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले

महात्मा फुले यांचे कार्य

महात्मा फुले यांची साहित्यरचना (Jyotiba Phule Books)

१) तृतीय रत्न (नाटक, इसवी सन १८५५)
२) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा (पोवाडा, जून इसवी सन १८६९)
३) विद्या खात्यातील ब्राह्मणपंतोजी (पोवाडा, जुन इसवी सन १८६९)
४) ब्राह्मणाचे कसंब (पुस्तक, इसवी सन १८६९)
५) गुलामगिरी (पुस्तक, इसवी सन १८७३)
६) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत (सप्टेंबर २४ इसवी सन १८७६)
७) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (अहवाल, मार्च २० इसवी सन १८७७)
८) दुष्काळ विषयक पत्र (पत्रक, २४ मे इसवी सन १८७७)
९) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (निवेदन, १९ ऑक्टोंबर इसवी सन १८८२)
१०) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक (पुस्तक, इसवी सन १८९१)

शेतकरी दलित आणि गरिबांच्या सुधारणेसाठी उपक्रम

महात्मा ज्योतिबा फुले हे उदार व्यक्तिमत्व असून त्यांनी शेतकरी दलित व गरिबांच्या राहणीमान सुधारण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले.

त्यावेळच्या काळी दलितांची परिस्थिती अत्यंत गरीब व दयनीय होती. दलित लोकांना म्हणजेच अस्पृश्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास सुद्धा लोकांनी बंदी घातली होती. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये दलितांसाठी पिण्याच्या विहिरी खोदून त्यांना पाणी देण्यास सुरुवात केली.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

काही कालावधीने ज्योतिबा फुले हे नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. ज्यावेळी ते सदस्य म्हणून निवडून आले, त्यांनी दलित लोकांच्या समस्या जाणून घेऊन दलितांसाठी सार्वजनिक ठिकाणी पाण्याची टाकी बांधली.

याशिवाय गरीब व ज्या लोकांना कोणत्याही व्यक्तींचा आधार नाही, अशा निराधार लोकांना न्याय प्राप्त करून देण्यासाठी, सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे १८८८ रोजी लोक त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागले.

यानंतर जोतिबा फुले यांनी शेतकरी कामगार चळवळीचे नेते बनून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कष्ट सोसून कामगारांसोबत बोलले व त्यांची मते जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.

लोकांना काम करण्यासाठी मर्यादित वेळ असावा तसेच त्यांना साप्ताहिक सुट्ट्या मिळाव्या व कामाबद्दल अशाच बऱ्याच चर्चा ज्योतिबा यांनी केल्यामुळे आज लोकांना मिळणाऱ्या या साप्ताहिक सुट्ट्या व कामांमधील मर्यादितपणा याचे सर्वस्वी श्रेय ज्योतिबा फुले यांना जाते.

ज्योतिबा फुले हे जिद्दी व चिकाटी असल्याकारणाने त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या लढायामुळे त्याकाळी सरकारने कृषी कायदा संमत करून शेतकऱ्यांना एक नवी दिशा प्रदान केली.

ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच सती प्रथेला त्यांनी कडाडून विरोध करून बालविवाह पद्धतीला आळा घातला.

ज्योतिबा फुले यांचे निधन

ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक विचारवंत व उदार व्यक्तिमत्व होते. ज्योतिबा फुले यांना अर्धांगवायचा झटका आला व यामुळे ज्योतिबा फुले हे फारच अशक्त होऊ लागले.

त्यांच्या वाढत्या आजारपणामुळे २८ नोव्हेंबर १८९० रोजी म्हणजेच वयाच्या ६३ व्या वर्षी ज्योतिबा फुले यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांनी समाजाला विविध गोष्टींमध्ये सहाय्य केल्यामुळे, ज्योतिबा फुले यांना एक थोर समाज सुधारक, विचारवंत, महात्मा, क्रांतिसूर्य अशा नावाने संबोधले जाते व त्यांचे कार्य अजून देखील लोकांच्या मनामध्ये सदैव स्मरणात आहे.

ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या स्त्री शिक्षणामुळे आज स्त्रियांना शिक्षणामध्ये अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. या सर्वांचे श्रेय फक्त ज्योतिबा फुले यांना जाते.

ज्योतिबा फुले व्हिडिओ

महात्मा फुले सत्यशोधक समाज (Jyotiba Phule Satyashodhak Samaj)

महात्मा जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. शुद्राना हीन वागणूक देणाऱ्या वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.

सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य उत्तम रीतीने करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. सत्यशोधक चळवळीस छत्रपती शाहू महाराजांनी पाठिंबा दिला. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.

“तृतीय रत्‍न” नाटक

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी वयाच्या २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली तृतीय रत्न हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू म्हणजे हिंदू धर्मातील पुरोहित धर्माच्या नावाखाली अज्ञानी जनतेस कसे लुबाडतात, धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात, याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती करणे हा होता.

नाटक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

“गुलामगिरी” पुस्तक

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर “गुलामगिरी” हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. हे अगदी छोटेसे पुस्तक असले तरीही या पुस्तकाने समाजातील विषमतेवर प्रकाश टाकण्याचे काम केले. महात्मा फुलेंच्या “गुलामगिरी” या पुस्तकाने पश्चिम आणि दक्षिण भारतातील समजव्यवस्थे वरील चळवळींचा पाया म्हणून काम केले. सत्यशोधक समाज आणि गुलामगिरी पुस्तक या दोन्ही गोष्टींचा पश्चिम आणि दक्षिण भारताच्या भविष्यातील विचार आणि इतिहासावर लक्षणीय परिणाम झाला.

गुलामगिरी पुस्तक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावरून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लोकांसाठी विविध सहाय्य केले जाणार आहे.

गरीब तसेच दुर्बल लोकांना, महागड्या दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया किंवा थेरपी करणे शक्य होत नाही. व त्यामुळे त्यांचा अनावश्यक खर्च भरू शकत नाहीत. यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब व दुर्बल लोकांच्या सहाय्यासाठी ज्योतिबा फुले नावाने ज्योतिबा फुले जनधन आरोग्य योजना सुरू केली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही अशा गरीब लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्या लोकांकडे महागड्या दवाखान्यांमध्ये उपचार करण्यासाठी पैसे नसतात त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो.

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत शस्त्रक्रिया कान घसा नाक यांच्या शस्त्रक्रिया नेत्ररोग शस्त्रक्रिया स्त्रीरोग शस्त्रक्रिया पोट व बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया, कर्करोग संसर्गजन्य रोग हृदयरोग अशा विविध रोगांच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

FAQ

ज्योतिबा फुले यांना महात्मा कोणी म्हटले?

समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी भारतीय समाजाला लाभलेल्या या थोर समाजसेवकाची आठवण चिरंतन राहावी म्हणून हा किताब देण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय आहे?

जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), हे महात्मा, क्रांतूसूर्य फुले नावाने लोकप्रिय असून, हे स्वातंत्र्य पूर्व भारतात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कधी आहे?

महाराष्ट्राच्या साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. दरवर्षी ११ एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते.

ज्योतिबा फुले कोणती जात आहेत?

फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी शेतकरी असलेल्या माळी कुटुंबात झाला. जन्मा नुसार ते माळी जातीचे होते. समाजातील जातीव्यवस्थेचा त्यांनी कायमच विरोध केला.

ज्योतिराव फुले यांचे सर्वात प्रसिद्ध कार्य कोणते?

सत्यशोधक समाजाची स्थापना, स्त्रीशिक्षण, बाल विवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन, सतीप्रथा प्रतिबंध, केशवपन प्रथा बंदी, विपुल लेखन हे ज्योतिराव फुले यांचे अलौकिक कार्य आहे.

महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कधी सुरू केली?

इसवी सन १८५२ मध्ये महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. ही शाळा पुण्याच्या वेताळपेठेत काढण्यात आली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध झाला पण ज्योतिबा फुले या परिस्थितीतही खंबीरपणे उभे होते.

ज्योतिबा फुले यांचे मुख्य योगदान काय होते?

राष्ट्रीय चळवळीसाठी समाज जागृती करण्यात ज्योतिबा फुले यांचे योगदान आहे. त्यांनी खालच्या वर्गाच्या उत्थानासाठी आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना, स्त्रीशिक्षण, बाल विवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन, सतीप्रथा प्रतिबंध, केशवपन प्रथा बंदी, विपुल लेखन हे ज्योतिराव फुले यांचे अलौकिक कार्य आहे. शेतकरी आणि खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या महात्मा ज्योतिबा फुले या लेखाद्वारे आम्ही आपणास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी केलेल्या समाजकार्यांबद्दल दलितांना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व लिहिलेल्या विविध साहित्यरचनांबद्दल या लेखाद्वारे आम्ही आपणास माहिती दिली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र आपणास कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत सुद्धा लेख शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a comment