मंगळागौर संपूर्ण माहिती मराठी Manglagaur Information In Marathi

Manglagaur Information In Marathi | मंगळागौर संपूर्ण माहिती मराठी – श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा, सणांचा पवित्र महिना समजला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे. तसे श्रावणात आठवड्यातील सातही वारांना महत्व आहे. कारण शिवपूजनाला महत्व असणाऱ्या या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. याच महिन्यात येणारे मंगळागौरीचं व्रत हे मुख्यत्वे नवविवाहित महिलांकडून तसेच सुहासिनी स्त्रियांकडून पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. श्रावण महिन्यातील हे व्रत नवविवाहीत मुलींसाठी खास असते.श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं हे व्रत करतात.

हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण असतो. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा करण्यात येतो. आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते. मंगळागौरीची पूजा नक्की काय असते, मंगळागौरी का पूजली जाते? याचे उद्यापन कसे होते? मंगळागौरीची कथा काय आहे?मंगळागौरीच्या पूजेचा विधी काय असतो? या सगळ्याची माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Table of Contents

मंगळागौर संपूर्ण माहिती मराठी | Manglagaur Information In Marathi

सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह भगवान शंकर यांच्या समवेत गौरीची पूजा करते. ही पूजा करताना सुवासिनी पारंपरिक पोशाख म्हणजेच साडी किंवा नऊवारी नेसून या व्रताचा पूजा विधी करतात. पहिल्या वर्षी तिच्या माहेरी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषकरून महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, फुगडी, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून या व्रताचे उद्यापन करतात.

Manglagaur Information In Marathi

हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत करून नंतर त्याचे उद्यापन केले जाते. ‘जय जय मंगळगौरी’ म्हणून सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रियांकडून केली जाते. नंतर हातात तांदूळ घेऊन मंगळागौरीची कहाणी ऐकतात. सुशीला नावाच्या एका साध्वीस देवी प्रसन्न झाली. पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना देवीने यमाशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले.

ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी स्त्रिया हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात. पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात. आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करून सुहासिनी स्त्रिया गौरीचा आशीर्वाद घेतात.

मंगळागौरी व्रत तिथी २०२३ – Mangalagaur In Marathi

अधिक मास मंगळागौरी व्रत तिथी

पहिला मंगळवार- १८ जुलै २०२३
दुसरा मंगळवार – २५ जुलै २०२३
तीसरा मंगळवार – १ ऑगस्ट २०२३
चौथा मंगळवार – ८ ऑगस्ट २०२३
पाचवा मंगळवार – १५ ऑगस्ट २०२३

निज श्रावण मंगळागौरी व्रत तिथी

पहिला मंगळवार- २२ ऑगस्ट २०२३
दुसरा मंगळवार – २९ ऑगस्ट २०२३
तीसरा मंगळवार – ५ सप्टेंबर २०२३
चौथा मंगळवार – १२ सप्टेंबर २०२३

 • हे व्रत महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून सुरू होते आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी चालू राहते.
 • यावर्षी २०२३ मध्ये श्रावणातील अधिक मास पहिला मंगळवार १८ जुलैला सुरू होत आहे.
 • त्यानंतर २५ जुलै, १ ऑगस्ट, ८ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दिवशी मंगळागौरीचे पूजन केले जाऊ शकते.
 • तसेच निज श्रावण मंगळागौरीचा पहिला मंगळवार २२ ऑगस्ट त्यानंतर २९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर, १२ सप्टेंबर पर्यन्त आहे.
 • मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम, आदर व निष्ठेचा आदर्श म्हणून भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे पाहिले जाते.
 • त्यांचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा, त्यांची कृपादृष्टी असावी, या हेतूने ही पूजा केली जाते.

मंगळागौर मराठी माहिती – मंगळागौर पुजा विधी

मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्री ने करावयाचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच किंवा सात वर्षे हे व्रत करण्यात येते. त्यानंतर ती उद्यापन करू शकते. यासाठी नवविवाहित महिला सकाळी लवकर उठून, स्नान करून सोवळे नेसून, पूजेची सर्व तयारी करून, पूजा करण्यासाठी बसतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचाराने,यथासांग पूजा करण्यात येते. मंगळागौर म्हणजेच पार्वती. पार्वतीच्या बाजूलाच भगवान शंकराची पिंडी ही ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर सर्वजणी एकत्र बसून भटजींकडून मंगळागौरीची कथा ऐकतात.

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

त्यानंतर पंचपक्वान्नांचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे. पूजेनंतर रात्र जागवली जाते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून झाल्यानंतर गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात. यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं यासारखी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची मजा वेगळीच असते.

आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, पारंपरिक दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि तिची आपल्या घरातील विविध लोकांबरोबर ओळख करून देण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो. त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं,समाधानाचे आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येते.

मंगळागौर खेळ व गाणी (Manglagaur Sports)

मंगळागौरीचे पारंपरिक पद्धतीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये जवळपास ११० खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायामदेखील होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर खेळण्याचा,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेता यायचा.

हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत, आनंद घेत, आनंद देत असत. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून शरीराला आणि मनाला चपळता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी,साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुणी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, पाट फुगडी, लोळण फुगडी, लाटणे फुगडी आणि फुलपाखरू फुगडी कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, भुई फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात.

आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात. त्याचप्रमाणे आळुंकी-साळुंकी, सासू-सुनेचे अथवा सवतींचे भांडण, आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, माझी आई मोठी की तुझी आई मोठी, नखोल्या, ताक, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट, होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळ खेळत खेळत रंगत जातात.

साधारणतः २१ प्रकारच्या फुगड्या आणि ६ प्रकारचे आगोटेपागोटे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते. यावेळी खास मराठी उखाणेही घेतात. आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची मजाच काही वेगळी आहे.

का करतात मंगळागौरीची पूजा ? mangalagaur pooja in marathi

श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात होते. असे सांगितले जाते की, पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचे प्रत्येक श्रावणी मंगळवारी पूजन केले जाते.

महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाहितेचं गोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो. या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींबरोबर खेळण्याचा,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेता येतो.

मंगळागौरीची माहितीपूजनाचे महत्व

नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात म्हणजेच पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्यप्राप्ती आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले हे ‘सौभाग्य व्रत’ म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते. मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घ होते. अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात समाधान, सुख-शांती नांदावी यासाठीही पाळले जाते. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे देखील म्हटले जाते.

मंगळागौरीचं व्रत

मंगळागौरीचं व्रत कसं करतात ?

सकाळी स्नान केल्यानंतर सोवळं नेसून, पूजेची सर्व तयारी करून ही पूजा केली जाते. सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे किंवा पुरणाचे दिवे अशी आरास सजवण्यात येते. अन्नपूर्णेच्या मूर्तीवर भगवान शंकर आणि मंगलागौरीचं आवाहन करावं.

देवीला विविध फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कथा वाचावी. कथा वाचून झाली की, महानैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना १६ दिवे त्या नैवद्यासमोर लावावेत. यानंतर मनोभावे पूजा करुन कथा ऐकून अखंड सौभाग्य प्राप्तीचा वर मागावा.

गौरी आवाहन पूजा माहिती मराठी

मंगळागौरीच्या व्रताच्या दिवशी काय करावे ?

मंगळागौरीसाठी आजूबाजूच्या, ओळखीच्या तसेच नातेवाईक सर्व महिलांना आमत्रंण द्यावं. त्यांना भोजन, हळदी-कुंकू वाण द्यावे. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात. सकाळी पुनः पूजा आणि आरती करून व्रताची सांगता करावी.

मंगळागौरी व्रत पूजेच्या महत्वपूर्ण गोष्टी

 • मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी सुवासिनी उपवास करतात.
 • लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते.
 • ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो.
 • सकाळी स्नान केल्यानंतर दर श्रावण मंगळवारी ही पूजा करण्यात येते.
 • मंगळागौरीची पूजा करताना पार्वतीची धातूची मूर्ती किंवा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपात पूजेसाठी मांडण्यात येते.
 • या पूजेमध्ये गौरीच्या बाजूला भगवान शंकरांची पिंडी ही पुजायला ठेवण्यात येते.
 • मंगळागौरीची पूजा करताना भटजींकडून मंत्र म्हणून पार्वती आणि भगवान शंकरांची षोडषोपचाराने पूजा करण्यात येते.
 • मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही करण्यात येते.
 • आरतीनंतर त्या व्रतकर्तीने आणि इतर स्त्रियांनीही हातात अक्षता घेऊन मंगळागौरीची कथा ऐकण्यासाठी बसावे.
 • भगवान शंकर आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांची आराधना करण्यात येते.
 • माता, बुद्धी, विद्या आणि शक्ती यासारख्या विविध रूपात असणाऱ्या या पार्वती देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्या अंगी यावेत अश्या प्रकारची प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते.
 • “गौरी गौरी सौभाग्य दे” अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे,आपल्याला सौभाग्यप्रपटी व्हावी यासाठी ही नवविवाहिता प्रार्थना करते.
 • लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिक पद्धतीने करण्यात येते. यानिमित्ताने सर्व बहिणी,नातेवाईक,शेजारी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो.
 • ही पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते. कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा असतो ही शिकवण आपल्याला देण्यात आलेली असते.
 • हे व्रत खासकरून पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजींच्या हातून मोठी पूजा आणि मंत्रोच्चार करून करायची असते.
 • या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे असून परंपरागत चालत आलेली ही एक रीत आहे.

मंगळागौर पूजा साहित्य

दिव्यासाठी तेलजिरेकेळीखडीसाखरमंगळागौर / अन्नपूर्णा
विड्याची पानेस्टील ताटेगूळवाट्यापेढे
खारकापांढरे तीळखोबरेफुलवातीसुट्टे पैसे
बेलताम्हणतुपफळेमाचिस
दुर्वापत्रीमुगाची डाळतुळसधूप
बदामतांदूळहळकुंडेगजरेतेलवाती
तांब्याफुलेपळी भांडेकापूरघंटा
उदबत्तीहारसुपा-या कणकेचे अलंकारशंख
नारळ २पाट किंवा आसने ३समईनिरंजनपंचामृत
वस्त्र (ब्लाऊजपीस)१रांगोळीअत्तरकणकेचे दिवे १६कापुर
मधचौरंगकापसाची वस्त्रेजानवीजोडनारळ
हळदकुंकुगुलालबुक्का

मंगळागौर पूजा विधी – Mangalagaur Pooja Vidhi In Marathi

 • सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोवळं नेसावे.
 • पूजेची सर्व तयारी करून सर्वप्रथम घरातील देवाची आणि त्यानंतर विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी.
 • अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. त्याशेजारी शिवपिंडी ठेवावी. त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी.
 • सर्वप्रथम गणपतीपूजन करून, कलश-घंटा-दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन करावे.
 • यानंतर षोडशोपचारे पूजा करावी.
 • देवीला विविध झाडांची पाने, फुलं वाहावीत. नंतर पांढरे तीळ,तांदूळ, मुगाची डाळ, जिरे अशा धान्यांची एकत्रितपणे मूठ अर्पण करावी.
 • काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे.
 • धूप-दीप-आणि १६ दिव्यांनी आरती झाल्यानंतर मंगळागौरीची कथा वाचावी.
 • देवीला नैवेद्य अर्पण करावा.
 • षोडशोपचारे पूजा झाल्यावर अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता देवीला 3 अर्घ्य द्यावीत.
 • आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वाण देण्यात येते
 • मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावे. त्यांना भोजन, हळदी-कुंकू लावून वाण द्यावे.
 • सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपारिक खेळ खेळून जागरण करावे.
 • सकाळी स्वच्छ स्नान करून, देवीची पूजा करून, आरती आणि नैवेद्य दाखवून, व्रताची सांगता करावी.

मंगळागौरीसाठी लागणाऱ्या सोळा पत्री आणि फुले

Mangalagaur Pooja Vidhi In Marathi
आघाडातुळसजाईकण्हेर
अर्जुनसादडाचमेलीडाळिंबडोरली
दुर्वाविष्णुक्रांतामोगराधोत्रा
बोरबेलमकारुई

श्री मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।

लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।8।।

मंगळागौर उद्यापन माहिती (Mangalagaur Udyapan In Marathi)

कोणत्याही व्रताचे उद्यापन करणे हे तेवढेच गरजेचे असते. मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच किंवा सात वर्षानंतर करण्यात येते. लग्न झाल्यापासून ते अगदी पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी शक्यतो या व्रताचे उद्यापन केले जाते. नवविवाहित स्त्रिया या दिवशी स्नान आटोपून नववारी नेसून या पूजेला बसतात. यात जिची मंगळागौर असेल तिच्यासोबत गावातील, नात्यातील, ओळखीपाळखीतील इतरही नवविवाहित मुलींना या पूजेसाठी बोलावण्यात येते.

मंगळागौरीचे हे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक पद्धतीने केली जाते. ज्या नवविवाहित स्त्रीने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मणी, मंगळसूत्र, जोडवी, साडी, खण देण्याची पद्धत असते. पुण्यवचन करण्यासाठी आणि होमहवनासाठी भटजींना बोलावण्यात येते. या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना हे वाण देण्यात येते. यावेळी मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे.

हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी

तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्वपरंपरागत पद्धत चालून आली आहे. यामागेही पारंपरिक कथा असून नवरदेव अल्पायुषी असल्यामुळे त्याला साप चावतो. त्यानंतर नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे नवरदेवाचे प्राण वाचतात. असे सांगण्यात येते. त्या सापाचे रूपांतर नंतर हारामध्ये होते म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वाण म्हणून एकसर (काळे मणी आणि सोन्याचा मणी), जोडवी, कुंकू, कंगवा आणि आरसा असे देण्याची पद्धत आहे. तर मुलीच्या वडिलांना शर्ट, धोतर, टोपी आणि उपरणे अशी भेट देण्यात येते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावले जाते. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देऊन सवाष्णींची गव्हाने ओटी भरली जाते. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस केले जातात व सर्वांना जेवायला बोलावले जाते. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.

मंगळागौर जागवताना झिम्मा, फुगडीची गाणी म्हणतात. खेळीमेळीच्या वातावरणात म्हटलेली ही गाणी दु:ख विसरायला लावतात. असे म्हटले जाते की, दु:ख वाटलं तर कमी होतं आणि सुख वाटलं तर वाढतं. पूजा करताना वाहिलेली जाई, जुई, शेवंती, मोगरा, नागचाफा, गुलाब, जास्वंद ह्या फुलांमुळे मन प्रसन्न होऊन जाते. आघाडा, तुळस, कण्हेर, रूई, डाळिंब, अशोक यामुळे निसर्गाशी जवळीक साधता येते.

पूर्वीच्या काळी फार कमी वयात लग्न होत असत त्यामुळे या कमी वयाच्या मुलींना अशा व्रताच्या निमित्ताने एकत्र बोलावून त्यांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा हेतू असे. त्याचबरोबर आपल्या पतीबद्दल, कुटुंबाबद्दल प्रेम आपुलकी निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असे. यासाठी रात्रभर जागरण ठेऊन दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून जेवून मुली आपल्या घरी जात असत. अशा प्रकारे कौटुंबिक रहाटगाडग्यातून एक दिवस रजा मिळत असे. व पुनः आपल्या संसारात रमण्यासाठी उत्साह ही वाढत असे.

सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यांपैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.

मंगळागौरीचे गाणे

कीस बाई कीस दोडका कीस
दोडक्याची फोड लागते गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
कीस बाई कीस दोडका कीस
माझ्यान दोडका किसवना
दादाला बायको शोभना
कीस बाई कीस दोडका कीस

नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा कसर नाही आला
बांगड्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा सोनार नाही आला
पातल्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा माळी नाही
आला वेणी नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला
चोळी नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू

खुंटत मिरची जाशील कैशी
आई बोलवते ह्याबर करिते
बाबा बोलावतात ह्याबर करितात
सासू ओलाविते ह्याबर करिते
सासरा बोलवितो ह्याबर करितो
बाल बोलविते

मंगळागौर कथा (Manglagaur Story)

एक नगर होते. त्या ठिकाणी एक वाणी राहत होता. परंतु त्याला मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी यायचा अल्लख म्हणून हाक मारायचा. वाण्याची बायको त्याला भिक्षा आणून देई. परंतु मी निपुत्रकाच्या हातची दीक्षा घेत नाही, असे म्हणून निघून जायचा. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यावेळी वाण्याने तिला एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, दाराच्या आड लपून बस. अलक म्हणताच गोसाव्याला सुवर्णांची भिक्षा घाल. त्याप्रमाणे वाण्याच्या बायकोने गोसाव्याला भिक्षा घातली. गोसाव्याचा नियम मोडला गेला. त्यामुळे तो तिच्यावर फार रागावला. आणि तिला मूलबाळ होणार नाही, असा शाप दिला. त्यानंतर तिने त्याचे पाय धरले आणि क्षमा मागितली.

त्यामुळे गोसावींनी तिला उ:शाप दिला, ते गोसावी तिला म्हणाले की, तुझ्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस, निळे वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथे घोडा अडेल त्या ठिकाणी खण, देवीचे देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असे म्हणून गोसावी त्या ठिकाणी निघून गेले. ही गोष्ट तिने आपल्या पतीला सांगितली. वाणी रानात गेला, घोडा अडला, त्या ठिकाणी त्याने खणले, देवीचे देऊळ लागले. सुवर्णांचे देऊळ होते, माणकांचे कळस होते, आत देवीची मूर्ती होती, मनोभावे त्या देवीची वाण्याने पूजा केली.

त्याला देवी प्रसन्न झाली. आणि म्हणाले की, वर माग. त्यावेळी तो गोसावी म्हणाला माझ्याकडे घरदार आहे. गुरढोरे आहे. धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही, म्हणून दुखी आहे. त्यावर देवी म्हणाली, तुला संततीचे सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर, तुला वर देते. अल्पायुषी पूत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी पुत्र घेतला असता जन्मतच अंध होईल. कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल, इच्छा असेल तो वर माग. त्यावर वाण्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने सांगितले की, माझ्या मागच्या बाजूला जा त्या ठिकाणी गणपती आहे त्याच्यामागे आंब्याचे झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय देऊन एक फळ घे. घरी जाऊन ते बायकोला खाऊ घाल. म्हणजे तुझा कार्यभाग होईल.

यानंतर देवी अदृश्य झाली. देवीने सांगितल्याप्रमाणे वाणी देवळाच्या मागे गेला. गणपतीच्या दोंदावर पाय देऊन झाडावर चढला. पोटभर आंबे खाऊन पोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असे चार-पाच वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. आणि ते त्यांनी बायकोला खाऊ घातले.

त्यानंतर वाण्याची बायको गरोदर राहिली. दिवसा मास गर्भ वाढू लागला. नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर वाण्याला मुलगा झाला. हळूहळू तो मोठा होऊ लागला. आठव्या वर्षी त्याची मुंज केली. त्यानंतर दहाव्या वर्षी वण्याची बायको त्याला लग्न कर असं म्हणाली. परंतु काशी यात्रे शिवाय लग्न करणार नाही असा त्याचा नवस आहे, असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांनी तो मामाबरोबर यात्रेस निघाला. मामा भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता वाटेने एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यांच्यामध्ये भांडण लागली. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणून लागली काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण ऐकून मामाने मनात विचार केला की, हिच्याशी माझ्या भाच्याचे लगीन करावे, म्हणजे हा दीर्घ आयुष्य होईल. परंतु त्याच दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला.

इकडे काय झाले, त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. त्यामुळे त्या नवरी मुलीच्या आई-वडिलांना मोठी पंचायत पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढे करून ही वेळ आपण निभावून नेऊ. म्हणून तिचे आई-वडील धर्मशाळा पाहू लागले. यावेळी हे मामा भाचे त्यांच्या दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला ते घेऊन गेले आणि गोरज मुहूर्तावर वर त्यांचे लग्न लावून दिले. उभयतांना गौरीहरापाशी निजवले.

दोघे झोपी गेले. मुलीला देवीने दृष्टांत दिला की, अगं अग मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव आणि एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प त्या कऱ्यात शिरेल चोळीने तोंड बांधून टाक आणि सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे सगळे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यांनी तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन मामा भाचे मार्गस्थ झाले.

दुसऱ्या दिवशी काय झाले, हिने सकाळी उठून स्नान केले. आणि आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली तर त्यामध्ये हार निघाला. आईने तो हार लेकीच्या गळ्यात घातला. पुढे पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणले. ती मुलगी म्हणाली की, हा माझा नवरा नाही. मी त्याचे बरोबर खेळणार नाही. रात्रीची लाडवांची आणि अंगठीची आठवण होऊन कोणालाच पटेना. आई-वडिलांनाही पंचायत पडली. तिचा नवरा कसा सापडणार? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावे आणि भावाने गंध लावावे आणि बापाने विदा द्यावा. असा क्रम चालू केला.

शेकडो लोक येऊन जेऊ लागले. इकडे मामा भाचे काशीच गेले. पुष्कळ दान धर्म केला. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला चक्कर आली. यमदूत प्राण न्यायला आले. त्यावेळी मंगळागौर आडवी झाली, त्या दोघांचे युद्ध झाले. आणि यामधून पळून गेले. मंगळागौर त्या ठिकाणी अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असे असे स्वप्न पडले, मामा म्हणाला, ठीक आहे. तुझ्यावरचे विघ्न टळले. उद्या आपण घरी जाऊया आणि ते त्या ठिकाणाहून परत यायला निघाले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले.

त्यावेळी दासींनी त्यांना येऊन सांगितले की, या ठिकाणी अन्नछत्र चालू आहे. तिथे जाऊन जेवा. ते म्हणाले की, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी येऊन त्या यजमानीस सांगितले. त्यावेळी त्यांनी पालखी पाठवली आणि आदराने त्यांनी घरी नेले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारले, तुझ्याजवळ खूण काय आहे ?

त्यावेळी त्यांनी लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासू ने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाली. तिने सांगितले, मी मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे ही तिची सगळी कृपा आहे. यानंतर सगळ्या सासर माहेरच्या मंडळींनी एकत्र जमून या व्रताचे उद्यापन केले. त्या मुलीला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी आपल्याला सुद्धा होवो यासाठी हे व्रत केले जाते.

प्रश्न

मंगळागौर का साजरी केली जाते?

श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात होते. असे सांगितले जाते की, पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते.

मंगळागौरी पूजन कसे करावे?

सकाळी स्नान केल्यानंतर सोवळं नेसून, पूजेची सर्व तयारी करून ही पूजा केली जाते. सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे किंवा पुरणाचे दिवे अशी आरास सजवण्यात येते. अन्नपूर्णेच्या मूर्तीवर भगवान शंकर आणि मंगलागौरीचं आवाहन करावं.


यावर्षी मंगळागौर कधी आहे?

१८ जुलै पासून श्रावण मासारंभ होत असून अधिक मास पहिला मंगळवार- १८ जुलै २०२३ दुसरा मंगळवार – २५ जुलै २०२३ तीसरा मंगळवार – १ ऑगस्ट २०२३
चौथा मंगळवार – ८ ऑगस्ट २०२३ पाचवा मंगळवार – १५ ऑगस्ट २०२३ असून निज श्रावण पहिला मंगळवार- २२ ऑगस्ट २०२३ दुसरा मंगळवार – २९ ऑगस्ट २०२३ तीसरा मंगळवार – ५ सप्टेंबर २०२३ चौथा मंगळवार – १२ सप्टेंबर २०२३ यावेळी आहे

गौरी पूजन म्हणजे काय?

गौरी पूजन म्हणजे देवी पार्वती म्हणजेच गौरीची पूजा करणे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. तो गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी येतो.

मंगळागौरीला कोणते खेळ खेळले जाते?

बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी,साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुणी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, पाट फुगडी, लोळण फुगडी, लाटणे फुगडी आणि फुलपाखरू फुगडी कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, भुई फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात.
आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे मंगळागौर या सणाबद्दल कथा, पूजा विधि, मंगळागौर का केली जाते? याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

आपल्याला ही माहिती., मंगळागौर खेळ व गाणी वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

संदर्भ –

Leave a comment