श्री रामेश्वरम मंदिर माहिती मराठी : Shri Rameshwaram Temple Information In Marathi

Shri Rameshwaram Temple Information In Marathi : श्री रामेश्वरम मंदिर माहिती मराठी :- भारतातील, तामिळनाडू राज्यातील, रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये, रामेश्वरम् नावाच्या एका छोट्या शहरामध्ये, पंबन बेटावर हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या पवित्र स्थळाची यात्रा केल्याने पाप धुवून जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला, गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी देखील ओळखले जाते.

एकूणच, रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि ते भगवान शिवाच्या कृपेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या इतिहास याबाबतची सगळी माहिती आपण आजच्या या लेखामधून पाहणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया रामेश्वर मंदिराची माहिती.

श्री रामेश्वरम मंदिर माहिती मराठी : Shri Rameshwaram Temple Information In Marathi
श्री रामेश्वरम मंदिर माहिती मराठी : Shri Rameshwaram Temple Information In Marathi

Table of Contents

रामेश्वरम मंदिर माहिती मराठी (Shri Rameshwaram Temple Information In Marathi)

नाव –श्री रामेश्वरम
स्थान –भगवान शंकर
दुसरे नाव –रामनाथ मंदिर
ज्योतिर्लिंग –११ वे
कुठे आहे –तामिळनाडू राज्यामध्ये रामनाथपुरम जिल्ह्यात
समुद्र –हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर
स्थापक –लंकेचा राजा पराक्रम बाहू व रामनाथपुरमचा राजा उदयन सेतुपती
स्थापना –इ. स. ११७३
गोपुरम उंची –७८ फूट
नंदी मंडप –२२ फूट लांब, १२ फूट रुंद, १७ फूट उंच
प्रवेशद्वार –४० फूट उंच

रामेश्वरम मंदिर नकाशा

रामेश्वरम मंदिराचा इतिहास (Rameshwaram Temple History)

रामेश्वरम मंदिरातील शिलालेखांवरून असे सांगितले जाते की, सण ११७३ मध्ये श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहू यांनी मूळ लिंगाचे गर्भगृह बांधले होते. त्या मंदिरामध्ये एकट्या शिवलिंगाची स्थापना झाली. देवीची मूर्ती ठेवली गेली नाही, म्हणूनच त्याला “निसंगेश्वराचे मंदिर’ म्हटले जाते.

नंतर १५व्या शतकामध्ये राजा उदयन सेतुपती आणि जवळच्या नागुरचे वैश्य यांनी त्याचे ७८ फूट उंच असे गोपुर बांधले. नंतर मदुराई येथील एका देवी भक्ताने त्याचा जिर्णोद्धार करून घेतला. दक्षिणेकडे असणाऱ्या तटबंदीची भिंत ही १६व्या शतकात तिरुमलया सेतुपतीने बांधली होती. त्यांचा आणि मुलाचा पुतळा ही गेटवर बसवलेला आहे.

याच शतकामध्ये मदुराईचा राजा विश्वनाथ तसेच उदयन सेतूपतु यांनी नंदीमंडप बांधून घेतला. हा मंडप जवळपास २२ फूट लांब, १२ फूट रुंद आणि १७ फूट उंच असा आहे. १८व्या शतकामध्ये रवीविजय सेतुपतीने देवतांसाठी एक शयनगृह आणि मंडप बांधला.

नंतर मोठू रामलिंग सेतुपतीने बाहेरची भिंत बांधली. १८९७ ते १९०४ च्या दरम्यान मध्य देवकोटई येथील एका कुटुंबाने नऊ दरवाजे असलेले १२६ फूट उंच असे गोपुरम बांधले. या कुटुंबाने १९०७ ते १९२५ च्या मध्ये गर्भगृहाची दुरुस्ती केली. पुढे १९४७ मध्ये त्याचा महाकुंभाभिषेकही झाला.

🙏श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी 🙏

श्री रामेश्वरम मंदिराची माहिती

सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जेव्हा सर्वात उच्च अशी देवता कोण? यावरून भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यावेळी भगवान शंकरांनी प्रकाशाच्या किरणांच्या रूपात प्रकट होऊन, या प्रकाश किरणांचा शेवट शोधण्यासाठी दोघांनाही सांगितले. परंतु दोघेही या कार्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. हे प्रकाश किरण पृथ्वीवर ज्या बारा ठिकाणी पडले त्यांना आज ज्योतिर्लिंग म्हणून पुजले जाते. तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम नावाच्या शहरांमध्ये हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेल्या अशा या सुंदर बेटावर ज्याचा आकार शंखासारखा आहे, अशा ठिकाणी हे रामेश्वरम मंदिर आहे. रामनाथपुरमचे हे रामेश्वरम बेट पंबन ओळखले जाते.

रामेश्वरम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक असणारे हे मंदिर आहे. यामुळे या तीर्थक्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. उत्तर भारतामध्ये असणाऱ्या काशी प्रदेशाला जे वैभव आहे तेच वैभव दक्षिण भारतातील या रामेश्वर मंदिराला आहे. म्हणूनच रामेश्वर मंदिराला दक्षिण भारताची काशी असे देखील म्हटले जाते.

रामेश्वरम व्हिडिओ (Video Of Rameshwaram)

रामेश्वरम नावाचा अर्थ (Meaning Of Rameshwaram In Marathi)

हे मंदिर हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले असे एक सुंदर बेट आहे. ज्याचा आकार सुंदर शंखासारखा आहे. रामेश्वर म्हणजे भगवान राम यांचे ईश्वर, म्हणून या ठिकाणाला रामाच्या नावावरून “रामेश्वरम” हे नाव पडले.

रामेश्वरम मंत्र (Mantra Of Rameshwaram)

त्रिशताब्दीसुतमपर्निजलराशियोगेनिब्ध्य सेतुं विशिखारसंख्यः।
श्रीरामचंद्रें आणि रामेश्वराख्या नमामिलासमर्पित ॥

रामेश्वरम मंत्राचा अर्थ (Meaning Of Rameshwaram Mantra)

ताम्रपर्णी आणि सागर यांच्या संगमावर अनेक बाणांनी सेतू बांधून भगवान श्रीरामचंद्रजींनी स्थापन केलेल्या श्री रामेश्वराला मी नमस्कार करतो.

रामेश्वरम मंदिरातील देवता (Gods In Rameshwaram Mandir)

 Rameshwaram Temple

या मंदिरामध्ये दोन शिवलिंगांची पूजा केली जाते. पहिले शिवलिंग हे मंदिराच्या मध्यभागी माता सीता आणि प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले आहे. ज्याला रामलिंगम असे म्हणतात. याशिवाय मंदिराच्या आवारातच भगवान हनुमान यांनी कैलास पर्वतावरून आणलेले शिवलिंग ज्याला आपण काशिलिंगम विश्वलिंगम किंवा हनुमान लिंगम असेही म्हणतो. मंदिराच्या नैऋत्य बाजूला पर्वतवर्धिनी म्हणून ओळखले जाणारे माता-पार्वतीचे मंदिर आहे.

याबरोबरच मंदिर परिसरामध्ये दक्षिण मुखी हनुमान, विशालाक्षी माता, भगवान विष्णू आणि श्री गणेश जींची स्वतंत्र मंदिरे आहेत. लंकापती रावणाचा भाऊ बिभीषण याने विशालाक्षीच्या गर्भगृहाजवळ नऊ भगवान शंकरांच्या ज्योतिर्लिंगांची स्थापना देखील केलेली आहे.

रामेश्वरम मंदिर परिसरातील मंडप (Mandap Of Rameshwaram Jyotirlinga)

या मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठे हॉल बांधले गेले आहेत, त्यांना मंडप असे म्हणतात. नंदी मंडपम, सेतुपती मंडपम, कल्याण मंडपम, सुकरावर मंडपम आणि अनुप्पू मंडपम असे पाच मंडप या ठिकाणी आढळून येतात. २२ फूट लांब १२ फूट रुंद आणि १७ फूट उंच अशा या नंदी मंडपाचे प्रमुख आकर्षण आहे. यामध्ये बसवलेली नंदीची विशाल आणि आकर्षक अशी मूर्ती मनाला आकर्षित करून टाकते.

🙏श्री महाकालेश्वर मंदिर माहिती मराठी 🙏

रामेश्वरम मंदिरात राबवले जाणारे उत्सव (Festivals In Rameshwaram Temple)

भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरामध्ये अनेक सण उत्सव राबवले जातात. रामेश्वरम मंदिरामध्ये राबवले जाणारे उत्सव खालील प्रमाणे –

१. महाशिवरात्र

भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता. त्यानिमित्ताने या मंदिरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. फुलांची आरास, दिव्यांची रोषणाई तसेच वेदमंत्र यांचा जयघोष करून हा उत्सव दहा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो.

२. वसंतोत्सव

हा उत्सव मे – जून च्या दरम्याने दहा दिवस साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला हा उत्सव समाप्त होतो.

३. रामलिंग प्रतिष्ठा

मे ते जून या महिन्याच्या दरम्याने हा उत्सव सुरू होतो. आणि गुरुपौर्णिमेला ३ दिवसांनी संपतो. हा उत्सव देखील मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो.

४. तिरूकल्याणम

हा उत्सव जुलै किंवा ऑगस्टमध्ये संपूर्ण १७ दिवस साजरा केला जातो.

५. नवरात्री दसरा उत्सव

हा नवरात्री उत्सव आणि शस्त्र पूजन तसेच वेस ओलांडण्याचा दसरा उत्सव संपूर्ण दहा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

६. कंठषष्ठी

ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण ६ दिवस कंठषष्ठी आयोजित केली जाते.

७. अरुधीरा दर्शन

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात किंवा वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये १० दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

 Rameshwaram Temple
Rameshwaram Temple Information In Marathi

रामेश्वरम दर्शन पूजा वेळापत्रक (Rameshwaram Temple Timings)

हे मंदिर पहाटे ५ वाजता उघडते ते दुपारी १ वाजता बंद होते. तसेच दुपारी ३ वाजता उघडते. ते रात्री ९ वाजता बंद होते. या ठिकाणी रात्री ८ पर्यंत दर्शनाचा वेळ दिलेला आहे.

रामेश्वरम मणी दर्शन

मणी दर्शन हे रामेश्वरम मंदिरातील एक विशेष दर्शन आहे. हे दर्शन मंदिरामध्ये पहाटे ५ पासून सकाळी ७ पर्यंत करता येते. या मणी दर्शनामध्ये स्फटिकाचे शिवलिंग दिसते. सकाळी ७ नंतर मणी दर्शन बंद होते.

  • १) पल्ल्याराय दीपा आराधना पहाटे – ५.००
  • २) स्पदिगलिंग दीपा आराधना – पहाटे ५.१०
  • ३) तिरुवनंतल दीपा आराधना – सकाळी ५.४५
  • ४) व्हिला पूजा – सकाळी ७.००
  • ५) पल्ल्याराय पूजा – सकाळी ८.४५
  • ६) कलसंती पूजा – सकाळी १०:००
  • ७) उचिकाला पूजा – दुपारी १२.००
  • ८) सायराची पूजा – संध्याकाळी ६.००
  • ९) अर्थजमा पूजा – रात्री ८.३०

रामेश्वरम मंदिर पूजा विधि

या मंदिरामध्ये दर्शनाबरोबरच इतर पूजेचे कार्यक्रम विधी आयोजित केले जातात. त्यासाठी मात्र भक्तांना विशेष शुल्क भरावे लागते. या मंदिरामध्ये होणाऱ्या पूजा विधी खालील प्रमाणे –

  • ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक
  • ज्योतिर्लिंगावर दुग्धाभिषेक
  • नारळ अर्पण करणे
  • अष्टोत्तर रचन
  • रथोत्सव :- रथोत्सवामध्ये देवांच्या मुर्त्या चांदीच्या रथामध्ये विद्युत सजावटीची अबूतवर व रोषणाई करून केलेली असते त्यामुळे ही यात्रा अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटते.
  • पंचमुर्ती उत्सव :- भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या या मूर्ती वाहनांवर सजवून मंदिराच्या आणि मंदिराच्या बाहेरील तिन्ही मार्गांनी चांदीच्या रथातून ही यात्रा केली जाते.
  • माता पार्वती आणि श्री रामेश्वराचे दागिने पाहणे :- भगवान रामेश्वर आणि माता पार्वतीची अनेक वाहने आणि रत्ने सोन्या-चांदीची आहेत. हे दागिने सण उत्सवात वापरले जातात. भाविकांना हे दागिने पाहायचे असतील तर मंदिराच्या कार्यालयामध्ये ठराविक शुल्क जमा करून पावती करून घ्यावी लागते.

रामेश्वरम मंदिराला भेट देण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क

रामेश्वरम मंदिर हे समुद्रामध्ये बेटावर असल्याने तुम्ही वर्षभरामध्ये या ठिकाणी कधीही येऊ शकता हिवाळ्यामध्ये रामेश्वरमला भेट देणे अतिशय आनंददायी तसेच सुलभ असते. कारण यावेळी रामेश्वरम या ठिकाणी फारशी थंडी किंवा जास्त उष्णता नसते.

मार्चपासून जून पर्यंत ३१ अंश सेल्सिअस ते ४४ अंश सेल्सिअस आणि जुलै ते ऑक्टोबर पावसाळा २७ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा १७अंश सेल्सिअस ते २८ अंश सेल्सिअस असे ऋतूंचे मासिक तापमान साधारण वरील प्रमाणे असते. त्यामुळे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा काळ रामेश्वरम मंदिराला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो.

या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. परंतु भाविकांना विशेष दर्शन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तसेच तेथे होणाऱ्या पूजा विधींसाठी ठराविक रक्कम आकारली जाते.

  • विशेष दर्शन – ५०/-
  • स्वामी सन्नाथी दर्शन – १०/-
  • अम्मान मंदिर दर्शन – ५/

रामेश्वरम मंदिराची वास्तूकला (Architecture Of Rameshwaram Temple)

भगवान शंकराचे हे मंदिर १५ एकरामध्ये पसरलेली आहे. हे विशाल मंदिर जवळपास १००० फूट लांब साडेसहा फूट रुंद आणि १२५ फूट उंच आहे. हे मंदिर द्रविडी शैलीमध्ये बांधले गेले आहे. पूर्व गोपुरम, पश्चिम गोपुरम तसेच अंतर्गत कॉरिडॉर आणि बाह्य कॉरिडॉर असे तीन भागांमध्ये हे मंदिर बनवले गेले आहे. मंदिराभोवती उंच अशी भिंत बांधलेली आहे. ज्याची पूर्व ते पश्चिम लांबी ८६५ फूट उत्तर ते दक्षिण लांबी ६५७ फूट आहे.

मंदिराबाहेर असणारा कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर बनला आहे. सभा मंडपावर पाच फूट उंचीचे खांब तयार केले आहेत. खांबाच्या पायावर छप्पर बांधले आहे. कॉरिडोर ची उंची जवळपास ९ मीटर आहे. आणि भिंतीची रुंदी जवळपास ६ मीटर आहे. पूर्व पश्चिमेला लांबी १३३ मीटर दक्षिण उत्तर १९७ मीटर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे ३८ मीटर आहे. या कॉरिडॉर मध्ये १२१२ खांब आहेत. प्रथमदर्शनी ते सारखेच वाटतात पण बारकाईने पाहिल्यास प्रत्येक खांबाची कारागिरी वेगवेगळी आहे. प्रत्येक खांबावर विशिष्ट प्रकारची कलाकुसर करण्यात आली आहे.

या मंदिरामध्ये १ फूट पेक्षा जास्त उंचीची भगवान शंकरांची लिंगमूर्ती स्थापन केली आहे. याशिवाय मंदिरात अनेक शिवमुर्ती देखील आहेत. भगवान शंकर आणि माता-पार्वतीच्या जंगम मूर्ती देखील आढळून येतात. ज्यांची वार्षिक रथोत्सवात मिरवणूक काढली जाते. यावेळी भगवान शंकर आणि माता-पार्वतीला सोन्या-चांदीच्या वाहनांवर स्वार होऊन यात्रा काढली जाते.

भगवान शंकराला समर्पित असलेल्या रामेश्वरम मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना एक – एक दरवाजा बनवण्यात आला आहे. पूर्व दरवाजा, पश्चिम दरवाजा, उत्तर दरवाजा आणि दक्षिण दरवाजा म्हणून ओळखला जातो. या प्रत्येक दरवाजाच्या वर गोपुरम नावाची एक प्रचंड अश्या आकाराची रचना देखील आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यतः पूर्वेकडील दरवाजा आणि पश्चिम दरवाजाचा वापर केला जातो.

🙏काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी 🙏

रामेश्वरम मंदिराची वैशिष्ट्ये (Key Features Of Rameshwaram Temple)

मंदिर रचना

द्रविडी शैलीमध्ये बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम आणि कारागिरी अतिशय सुंदर अशा पद्धतीने केली गेली आहे. जवळपास १५ एकर मध्ये बांधलेले हे मंदिर १००० फुट लांब आणि ६५० फूट रुंद तसेच ४० फूट उंचीच्या दोन दगडांवर समान लांबीचे लांबलचक दगड ठेवून बांधकाम करण्यात आले आहे. असे मानले जाते की, रामेश्वर मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगड श्रीलंकेतून बोटीने आणले होते. या मंदिराचा परिसर हा एका उंच सीमा भिंतीने वेढलेला आहे. जो पूर्वेकडून पश्चिमेकडे जवळपास ८६५ फूट आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे ६५७ फूट असा आहे. आणि या चारही दिशांना मोठमोठे गोपुरम बांधलेले आहे.

कॉरिडॉ

या मंदिराचा कॉरिडॉर हा जगातील सर्वात मोठा कॉरिडॉर मानला जातो. पूर्व पश्चिम १३३ मीटर उत्तर दक्षिण १९७ मीटर आणि रुंदी ६ मीटर तसेच उंची ९ मीटर अशी असलेला हा कॉरिडॉर आहे. रामेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार हे ४० फूट उंच आहे. या मंदिरामध्ये शेकडो खांब आहेत आणि या प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर केलेली आहे.

दोन लिंगे

या मंदिराची मुख्य देवता ही शिवलिंगाच्या रूपात स्थापित केलेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन लिंगे आहेत. एक माता सीतेने वाळूने बनवलेले आहे, जी मुख्य देवता मानले जाते आणि रामलिंगम म्हणून देखील ओळखली जाते. दुसरे लिंग काशीहून हनुमानाने आणले होते जे विश्वलिंगम किंवा काशिलिंग किंवा हनुमानादिश्वर म्हणून ओळखले जाते.

नंदी मंदिर

या ठिकाणी एक मोठे नंदीचे मंदिर देखील आहे. या नंदीचा मंडप २२ फूट लांब १२ फूट रुंद तसेच १७ फूट उंच आहे. या मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजाबाहेर हनुमानजींची मोठी मूर्ती स्थापन केली आहे. सेतू माधव नावाचे भगवान विष्णूचे मंदिर देखील या ठिकाणी पहावयास मिळते.

पवित्र पाण्याची टाकी

या मंदिरामध्ये जाण्यापूर्वी समुद्रात स्नान केले जाते. समुद्रकिनाऱ्यावर सुंदर असा अग्निस्नान घाट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी भावीक तर्पण पूजा इत्यादी करताना दिसतात. या मंदिर परिसरामध्ये बांधलेल्या २२ पवित्र पाण्याच्या टाक्यांमध्ये स्नान केले जाते. असे मानले जाते की, या कुंडाची निर्मिती भगवान रामाच्या बाणांनी केली होती. अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी गोळा करून या टाकीमध्ये सोडले होते, म्हणूनच त्यांना तीर्थ असे देखील म्हटले जाते.

देवी पार्वती

या मंदिराच्या परिसरामध्ये ज्याप्रमाणे भगवान शंकराच्या दोन मुर्त्या आहेत. त्याचप्रमाणे पार्वतीच्या देखील दोन स्वतंत्र मूर्ती स्थापन केल्या आहेत. पार्वती मातेच्या एका मूर्तीला “पर्वत वर्धिनी” असे म्हणतात, तर दुसऱ्या मूर्तीला “विशालाक्षी” असे देखील म्हणतात. रावणाचा भाऊ विभीषणाने स्थापन केलेल्या नऊ शिवलिंगांची स्थापना विशालाक्षी मंदिराच्या गर्भगृहाजवळ केली आहे.

श्रीरामांनी केलेली शिवलिंगांची पूजा

रामायणानुसार एका ऋषींनी श्री प्रभू रामचंद्रांना सांगितले होते की, त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले तर रावणाच्या वधाच्या पापापासून मुक्ती मिळेल. म्हणूनच श्रीरामांनी हनुमानजिना कैलास पर्वतावर शिवलिंग आणण्यासाठी पाठवले होते. परंतु ते शिवलिंग घेऊन वेळेवर येऊ शकले नाहीत म्हणून माता सीतेने मातीच्या सहाय्याने एक शिवलिंग तयार केले. ज्याला रामलिंग असे म्हणतात आणि त्याची स्थापना केली.

जेव्हा हनुमानजी शिवलिंग घेऊन परत आले तेव्हा हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. हनुमानजींचे दुःख पाहून भगवान श्रीरामांनी हनुमानजींनी आणलेल्या शिवलिंगाचे देखील स्थापना करून पूजा केली. त्याचे नाव वैश्वलिंग असे ठेवले. या कारणास्तव या मंदिरामध्ये वैष्णव आणि शैव या दोन्ही धर्मांचा संगम असल्याचे म्हटले जाते.

जगातील सर्वात लांब कॉरिडॉर – रामेश्वरम

रामेश्वरम

या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी एकूण तीन स्वतंत्र असे कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत. पहिला कॉरिडॉर हा सर्वात जुना आहे. जो १२ व्या शतकामध्ये बांधला गेला होता. दुसऱ्या कॉरिडॉर मध्ये १०८ शिवलिंगे असून श्री गणेशाची मूर्ती देखील बसविण्यात आली आहे. आणि या मंदिराचा सर्वात प्रसिद्ध असा तिसरा कॉरिडॉर १८ व्या शतकामध्ये बांधला गेला होता. ज्याला जगातील सर्वात लांब कॉरिडॉरचा दर्जा दिलेला आहे. त्याची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे १३३ मीटर उत्तरेकडून दक्षिणेकडे १९७ मीटर अशी आहे या तिसऱ्या कॉरिडॉरला “चोक्कटन मंडपम” असेही म्हणतात.

मंदिरामध्ये बांधलेले या कॉरिडोरच्या भिंतींची रुंदी सहा मीटर आणि उंची नऊ मीटर अशी आहे. या तिसऱ्या कॉरिडोरच्या बांधकामासाठी जवळपास बाराशे बारा खांब वापरण्यात आले आहे. आणि येथील प्रत्येक खांब हा ३.६ मीटर उंचीचा ग्रॅनाईट दगडाचा बनवलेला आहे. सर्व खांब हे लांबून सारखेच दिसतात पण जवळून पाहिल्यास प्रत्येक खांबावर केलेली कारागिरी कलाकुसर ही खूप वेगवेगळी अशी आहे. हे खांब अशा पद्धतीने बनवण्यात आले आहेत की, तेथून चालत असताना असे वाटते की, हे खांब आपल्याबरोबरच चालत आहेत.

रामेश्वरम मंदिराबद्दल धार्मिक मान्यता

रामेश्वर मंदिरामध्ये पवित्र गंगेच्या पाण्याने ज्योतिर्लिंग अभिषेकाला खूप महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा केल्यावर ब्रम्हाच्या दोषांपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते. रामेश्वरम मंदिराला “दक्षिण भारतातील काशी” म्हणतात. कारण हे स्थान भगवान शिव आणि राम यांच्या कृपेने मुक्त झाले आहे.

चार धाम पैकी एक असणारे रामेश्वरम मंदिर

रामेश्वरम मंदिर हे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या ज्योतिर्लिंग बरोबरच ते चारधाम पैकी देखील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. धाम पुरी, द्वारका, बद्रीनाथ आणि रामेश्वर यांचा या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये समावेश होतो. ही चारधाम पवित्र स्थळे हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ठिकाणे आहेत. एखाद्या व्यक्तीने भारताच्या पूर्वेकडे ओडिसामध्ये असलेल्या धामपूर येथून चारधाम यात्रा सुरू करावी आणि घड्याळाच्या दिशेने दुसऱ्या ठिकाणी रामेश्वरमचे दर्शन घेऊन, पुढे द्वारके मार्गे बद्रीनाथ येथे दर्शन घेऊन चारधाम यात्रा संपवावी.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले असे हे सुंदर बेट याचा आकार सुंदर शंखासारखा आहे. रामेश्वर म्हणजे भगवान रामाचा ईश्वर. म्हणून या ठिकाणाला रामाच्या नावावरून रामेश्वर हे नाव पडले. रामेश्वर हे सामान्य शिवलिंग नाही. हे सीता मातेने स्वतःच्या हाताने बनवले होते. भगवान श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली होती. येथील प्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिर हे दशरथ नंदन भगवान श्रीराम यांना समर्पित आहे. माता सीतेने बांधलेल्या रामेश्वर लिंग शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी लाखो भावीक या मंदिरामध्ये येत असतात.

रामेश्वरम मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे?(How To Reach Rameshwaram Temple) –

तामिळनाडू राज्यातील, रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरांनी वेढलेले सुंदर बेट ज्याचा आकार सुंदर शंखासारखा आहे. या ठिकाणी रामेश्वर मंदिर वसलेले आहे.तामिळनाडू राज्य हे आधुनिकतेच्या दृष्टीने अनेक राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही विमान, ट्रेन किंवा बसने येऊ शकता.

विमान

या मंदिराजवळच्या सर्वात जवळ असणारे मदुराई हे विमानतळ १४९ किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुतीकोरीन विमानतळ हे जवळपास १४२ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत येण्यासाठी बस, कॅब, टॅक्सीने येऊ शकता.

ट्रेन

तामिळनाडू मधील मदुराई हे एक सर्वात मोठे शहर आहे. या ठिकाणाहून अनेक ट्रेन वेगवेगळ्या शहरांमधून येत जात असतात. मदुराईहून रामेश्वर मंदिराला ट्रेनने जाऊ शकता. जवळपास १७५ किलोमीटर अंतर असून तीन तासांचा वेळ लागतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही बस, टॅक्सी किंवा कॅब द्वारे येऊ शकता.

बस

रामेश्वरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे ते वेगवेगळ्या शहरांशी रस्त्याने जोडले गेले आहे. त्यामुळे मदुराई आणि इतर शहरांमधून रामेश्वरमला सरकारी, खाजगी, एसी,नॉन एसी बसेस जात येत असतात. मदूराईहून दर अर्धा तासाने एक बस या ठिकाणी येत असते. या ठिकाणाहून जवळपास १८० किलोमीटरचे अंतर असून मंदिरापर्यंत येण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो.

मुख्य शहर ते रामेश्वरम मंदिर अंतर

  • मदुराई ते रामेश्वरम अंतर १७३ किलोमीटर
  • चेन्नई ते रामेश्वरम अंतर ५५९ किलोमीटर
  • त्रिची ते रामेश्वरम अंतर २३५ किलोमीटर
  • कन्याकुमारी ते रामेश्वरम अंतर ३१० किलोमीटर
  • विशाखापट्टणम ते रामेश्वरम अंतर १३४६ किलोमीटर

रामेश्वरम मधील तीर्थे आणि तीर्थ स्नान

रामेश्वरम मंदिरामध्ये तीर्थ स्नानाला अतिशय महत्त्व दिले आहे. मंदिराच्या दर्शनाआधी प्रथम अग्नी तीर्थामध्ये स्नान करावे लागते. आणि त्यानंतर ओल्या कपड्यांमध्येच मंदिराच्या आवारातील इतर २२ तीर्थांमध्ये स्नान करावे लागते. शिवतीर्थ आणि माधवतीर्थ ही तलावाच्या रूपात आहेत, तर अगस्त्य तीर्थ आणि महालक्ष्मी तीर्थ हे बाऊलीच्या रूपात आहेत.

येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरातील कर्मचारी दोरी आणि बादल्या ठेवतात, ज्यातून तुम्ही पाणी काढू शकता. या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या तीर्थक्षेत्रांची संख्या ही २४ असून मंदिराच्या परिसरामध्ये २२ तीर्थक्षेत्रे आणि पूर्वेकडील दरवाजासमोर बाहेरील भागात दोन तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यामध्ये अग्नी तीर्थ हे सर्वोत्तम मानले जाते. कारण या ठिकाणी माता सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. आणखी काही तीर्थांची नावे खालील प्रमाणे –

  • माधवतीर्थ
  • ब्रह्म हत्य विमोचन तीर्थ
  • शंख गायत्री तीर्थ
  • गवया तीर्थ
  • गंगातीर्थ
  • चक्र तीर्थ
  • महालक्ष्मी तीर्थ
  • गावक्ष तीर्थ
  • यमुना तीर्थ
  • अमृत वापी तीर्थ
  • अग्निमंदिर
  • नल तीर्थ
  • गया तीर्थ
  • शिवतीर्थ
  • अगस्त्य तीर्थ
  • नील तीर्थ
  • सूर्यतीर्थ
  • सरस्वती तीर्थ
  • गंधमादन तीर्थ
  • कोटी तिर्थ
  • चंद्र मंदिर सावित्री तीर्थ

यासारखी तीर्थे मंदिर परिसरामध्ये आढळून येतात.

रामेश्वरम मंदिराबाबत महत्त्वाच्या गोष्टी (Important Things About Rameshwaram Temple)

  • या मंदिराच्या बांधकामात वापरले गेलेले दगड हे श्रीलंकेतून बोटी मधून आणले होते.
  • या मंदिराचा कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे.
  • पौराणिक कथा नुसार या मंदिरातील तीर्थे भगवान रामाने आपल्या बाणांनी बनवली होती. यामध्ये अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मिसळल्याचे मानले जाते.
  • रावणाच्या हत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान रामाने या ठिकाणी शिवलिंगांची स्थापना करून पूजा केली होती.
  • जो व्यक्ती भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाला पूर्ण भक्ती भावाने गंगाजल अर्पण करतो त्याला मोक्ष प्राप्ती मिळते असे देखील समजले जाते.
  • या मंदिर परिसरामध्ये असलेल्या तीर्थांमध्ये वेगवेगळे पाणी आढळून येते. या तीर्थांचे पाण्याचे तापमान आणि चवही वेगवेगळी आहे. काही तीर्थांमध्ये थंड पाणी आहे तर काही तीर्थांमध्ये गरम पाणी आहे. तसेच काही तीर्थांमध्ये गोड पाणी आहे.

रामेश्वरम मंदिराशी संबंधित तथ्य

  • पंबन ब्रिज हा पामबन बेटावरील रामेश्वरम शहराला जोडणारा एक रेल्वे पूल आहे.
  • रामायणानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यातील पुलाला रामसेतू पूल असे म्हणतात. जो रामाने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीलंकेत पोहोचण्यासाठी बांधला होता.त्यानंतर रावणाचा भाऊ बिभीषणाने रामाला हा पूल नष्ट करण्यास देखील सांगितले. रामाने आपले धनुष्याच्या फक्त एका टोकाने हे केले होते.म्हणून पंबन बेटाच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील टोकाला धनुष कोडी असे म्हणतात.
  • चारधाम पैकी एक असणारे असे हे रामेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी अकरावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.

रामेश्वरम मंदिरातील नियम

  • कोणताही भावीक या शिवलिंगावर आपल्या हाताने जल अर्पण करू शकत नाही. हरिद्वार किंवा गंगोत्री या ठिकाणाहून आणलेले गंगाजलच आपण या ज्योतिर्लिंगावर अर्पण करू शकतो.
  • पुजाऱ्यांनी दिलेले गंगा जल आपण या लिंगावर पूजारांच्या साहाय्याने अर्पण करू शकतो. त्यासाठी शुल्क आकारले जाते.
  • या ज्योतिर्लिंगावर फुले आणि हार अर्पण करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  • या ठिकाणच्या शिवलिंगाला पण हात लावू शकत नाही.
  • मंदिर परिसरातील तीर्थांमध्ये अंघोळ केल्यानंतर ओल्या कपड्यांनी मंदिरामध्ये प्रवेश करू नये.
  • या शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अग्नी तीर्थामध्ये स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते.
  • ज्या भाविकांना अंघोळ करायची नसेल त्यांनी किमान अग्नी तीर्थाचे पाणी संपूर्ण शरीरावर शिंपडून घ्यावे.
  • मंदिर परिसरामध्ये लॉकरची व्यवस्था मंदिरा मार्फत मोफत केलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही आपले बॅग, पर्स, वगैरेचे सामान ठेवू शकतात.
  • तसेच शूज रॅक देखील केलेले आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी आपल्या चपला किंवा शूज काढून ठेवले पाहिजेत. मंदिर परिसरामध्ये या वस्तूंना घेऊन जाता येत नाही.

रामेश्वरम जवळचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ

तामिळनाडूमधील पाककृती ही तमिळ पाकशैली म्हणून ओळखली जाते. तांदूळ, शेंगा, मसूर, मांस, आंबट चवीसाठी चिंच, दुग्धजन्य पदार्थ यांचा वापर तेथील जेवणामध्ये जास्तीत जास्त केला जातो. विशेष प्रसंगी तेथील पारंपारिक पदार्थ हे केळीच्या पानांवर वाढले जातात.

सकाळी नाश्त्यामध्ये इडली, डोसा, रवा डोसा, चटणी, सांबार यांचा समावेश असतो. जेवणामध्ये भात, सांबार, दही, कुळंबु, रस्सम तसेच पोरियाल जे ताक किंवा दही घालून पचडी तयार करतात. तसेच परूप्पू यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. जेवणानंतर पचन सुधारण्यासाठी सुपारी दिली जाते. कॉफी आणि चहा हे त्या ठिकाणचे मुख्य पेय आहे.

रामेश्वरम मंदिराजवळील हॉटेल्स

या मंदिराजवळ विश्रामगृह आहे. त्या ठिकाणी विनामूल्य किंवा कमी शुल्कामध्ये तुमच्या राहण्याची सोय केली जाते. त्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावे लागते. हे मंदिर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे संपूर्ण जगभरातून या ठिकाणी हजारोंनी भाविक येत असतात. त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी मोठी हॉटेल्स देखील बांधली गेली आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे –

  • हॉटेल रामेश्वरम
  • ग्रँडद रेसिडेन्सी टॉवर्स
  • रामेश्वरमदैविक हॉटेल्स
  • रामेश्वरमस्टार पॅलेस
  • हॉटेल अशोका
  • हॉटेल एस एस
  • ग्रँडहॉटेल
  • वृंदावन रेसिडेन्सी

रामेश्वरम मंदिराजवळील पर्यटन स्थळे (Rameshwaram Places To Visit)

रामेश्वरम मंदिराला भेट देताना त्याच्या आजूबाजूला असणारी काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे (Places To Visit In Rameshwaram) पाहण्यासारखी आहेत. ज्यांची नावे खालील प्रमाणे आहेत –

१. धनुष कोडी मंदिर (Places To Visit In Rameshwaram)

१९६४ मध्ये रामेश्वरम या ठिकाणी चक्रीवादळ झाले होते. यामध्ये धनुष्य कोडी मंदिराची प्राचीन वास्तु चे बऱ्यापैकी नुकसान झाले होते. यामध्ये काही अवशेष अजूनही शिल्लक आहेत. रामेश्वरम पासून जवळपास १६ किलोमीटर अंतरावर हे धनुष कोडी मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने जाऊ शकता. या मंदिरामध्ये जाण्याची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा अशी आहे.

२. जटायु तीर्थम

रामायणातील पक्षी जटायू याला हे समर्पित असे मंदिर आहे. हे जटायू तीर्थ मुख्य शहरापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर आहे. रावणाने माता सीतेचे अपहरण करण्यापासून रोखण्याचा जटायुने प्रयत्न केला होता, त्यामध्ये त्याचा वध केला गे.. हे मंदिर त्याच्या या शौर्याचे आणि प्रभू रामचंद्रावरील भक्तीचे प्रतीक म्हणून समर्पित केले आहे.

३. अरियामन बीच

रामेश्वरम मधील ठिकाणांच्या यादींमध्ये अवश्य जोडले जाणारे ठिकाण म्हणजे अरियामन बीच आहे. सुंदर असा पांढरा वाळूचा किनारा हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर पसरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्ट्स आनंद घेऊन तुमचा वेळ घालवू शकता. रामेश्वरम शहरापासून २१ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे ठिकाण सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत भेट देऊ शकता.

४. पंचमुखी हनुमान मंदिर

या शहरांमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असे हे पंचमुखी हनुमान मंदिर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. रामेश्वर मंदिरापासून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी सहा ते संध्याकाळी सातच्या दरम्यान मंदिराला भेट देऊ शकता.

५. लक्ष्मण तीर्थम

भगवान रामाचे भाऊ लक्ष्मण यांच्या पूजेला समर्पित असलेले हे मंदिर आहे. या मंदिरात येणारे भाविक या ठिकाणाला अत्यंत पवित्र असे मानतात. या मंदिराच्या दर्शनासाठी सकाळी सहा पासून संध्याकाळी सात पर्यंत कधीही येऊ शकता.

६. विलुंडी तीर्थम

धार्मिक दृष्ट्या पवित्र आणि नैसर्गिक दृष्ट्या सुंदर असे हे ठिकाण पाण्याचे पवित्र ठिकाण म्हणून मानले जाते. असे समजले जाते की शहरवासीयांना पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी प्रभू रामचंद्रांनी जमिनीमध्ये बाण मारून झरा निर्माण केला होता. सकाळी सहा पासून संध्याकाळी सात पर्यंत या तीर्थाला भेट देऊ शकता.

७. रेशीम खरेदी

या रामेश्वरम शहरांमध्ये अनेक दुकाने आहेत. ज्यामध्ये अनोखे रेशमाचे शिवलेले कपडे आणि न शिवलेले कापड दोन्हीही विकले जातात. या मार्केटमध्ये तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता.

८. सी वर्ल्ड एक्वेरियम

या शहरांमध्ये जागतिक दर्जाचे मत्स्यालय आढळून येते. या ठिकाणी जिवंत जलचर दिसून येतात. सकाळी दहा पासून संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी मोफत भेट देऊ शकता.

९. अन्नाई इंदिरा गांधी रोड ब्रिज

रामेश्वरम बेट आणि भारताच्या मुख्य भूभागाला जोडणारा सात किलोमीटरचा हा अन्नायी इंदिरा गांधी रोड ब्रिज आहे. दक्षिण भारतामधील सर्वात लांब पूल म्हणून याला ओळखले जाते.

१०. अब्दुल कलाम हाऊस

माजी राष्ट्रपती, ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान हे रामेश्वरम या ठिकाणी आहे. त्यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून अनेक पर्यटन त्यांच्या जुन्या घराकडे जातात. या इमारतिला सकाळी आठ पासून संध्याकाळी सात पर्यंत भेट देऊ शकता. या ठिकाणी भेट देण्यासाठी प्रति पाच रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते.

११. कोठंडाराम स्वामी मंदिर

हिंदी महासागराने वेढलेले हे मंदिर रामेश्वरम च्या बेटाच्या दक्षिण टोकावर आहे. प्रभू रामाने आपली पत्नी माता सीता हिला वाचवण्यासाठी रावणाच्या राज्याकडे नेलेल्या कठीण यात्रेला हे समर्पित असे ठिकाण आहे. या ठिकाणाला सकाळी सहा ते संध्याकाळी सात पर्यंत भेट देऊ शकता.

१२. साक्षी हनुमान मंदिर

रामेश्वरम मंदिरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर गंधमादन पर्वताकडे जाताना हे साक्षी हनुमान मंदिर दिसून येते. भगवान हनुमानाने भगवान रामांना माता सीतेच्या बाबतीत या ठिकाणी माहिती दिली होती की सीता माता श्रीलंकेमध्ये असून तिने दिलेला चुडामणी प्रभू रामचंद्रांना दाखवला होता.

१४. गंधमादन पर्वत

साक्षी हनुमान मंदिरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर हा पर्वत आहे. हे छोटेसे शिखर आहे जे रामेश्वरम मधील सर्वात उंच असे स्थान मानले जाते. भगवान हनुमानजी ने येथूनच समुद्राला पार करण्याचे ठरवले होते. तसेच प्रभू रामचंद्रांनी सुग्रीव आणि त्यांच्या वानर सेनेला त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी दिली होती. हे ठिकाण उंच असल्यामुळे संपूर्ण रामेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य दिसून येते.

१५. पंबन ब्रिज

हा भारताचा एक अप्रतिम असा पूल बांधला गेलेला आहे. पंबन गावाजवळ बांधला गेल्यामुळे या पुलाला पंबनपुर या नावाने ओळखले जाते. या पुलावरून रेल्वेने जाताना प्रचंड असा उत्साह जाणवतो. या पुलाखालून पाण्याची जहाजे जात असताना हा पूल मधोमध उचलला जातो आणि जहाज पुलाखालून गेल्यानंतर पूल पुन्हा खाली केला जातो.

१६. रामसेतू

कोठंडाराम स्वामी मंदिराजवळ हा रामसेतू आहे. भगवान रामाने हा सेतू बांधला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे आज हा पूल नामशेष झाला असला तरी हे ठिकाण रामसेतूचे मूळ स्थान मानले जाते.

श्री रामेश्वरम कथा

पौराणिक कथेनुसार लंका जिंकून प्रभू श्रीराम माता सीते सोबत परतत होते, तेव्हा त्यांनी समुद्र पार करून प्रथम गंधमादन पर्वतावर विसावा घेतला.तेव्हा गंधमादन पर्वतावर महान ऋषी त्यांना पाहण्यासाठी तेथे पोहोचले होते.ऋषींनी श्रीरामांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की रावणाचा वध केल्यामुळे तो ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप केले आहेस. त्यानंतर श्रीरामांनी ऋषीमुनींना या समस्येचे समाधान मागितले जेणेकरून ते यातून पापमुक्त होऊ शकतील. तेव्हा सर्व ऋषींनी भगवान रामांना सांगितले की, तुम्ही येथे शिवलिंगाची पूजा करा. भगवान शंकर प्रसन्न होतील. अशा प्रकारे तुम्ही या ब्रह्मत्तेच्या पापा पासून मुक्त होऊ शकतात.

तेव्हा भगवान श्रीरामांनी हनुमानजींना कैलास पर्वतावरून लिंग आणण्याच्या आज्ञा केली. हनुमानजींनी प्रचंड वेगाने आकाशातून कैलास पर्वताकडे धाव घेतली आणि जेव्हा ते कैलास पर्वतावर पोचले तेव्हा भगवान शंकर तपश्चर्ये मध्ये मग्न होते. हनुमान जी पण भगवान शंकराच्या डोळे उघडण्याची प्रतीक्षा करत होते. दुसरीकडे रामेश्वरम मधील शिवलिंगाच्या पूजेचा शुभ मुहूर्त जवळ येत होता. तेव्हा माता सीतेला काळजी वाटू लागली. पूजेची शुभ वेळ निघून जाईल या भीतीने माता सीतेने मातीचे शिवलिंग बनवले आणि प्रभू श्रीरामांनी शुभमुहूर्तावर सीता मातेने बनवलेल्या या शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. अशा प्रकारे ते ब्रह्मदेवाच्या हप्त्याच्या पापापासून मुक्त झाले

शिवलिंगाची पूजा आटोपल्यानंतर हनुमानजी आले. तेव्हा त्यांनी पाहिले की, शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना दुःखी पाहून भगवान श्रीरामांनी सांगितले की शुभ वेळ जाऊ नये म्हणून शिवलिंगाची स्थापना आणि पूजा करावी लागली. पण तरीही हनुमानजीना वाईट वाटले.

तेव्हा श्रीरामांनी हनुमानांनी आणलेल्या शिवलिंगाचा जिर्णोद्धार करण्यास सांगितले. अशाप्रकारे भगवान श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला रामलिंग आणि हनुमानानि स्थापन केलेल्या लिंगाला हनुमान लिंग असे नाव पडले. पुढे भगवान रामाच्या नावावरून या मंदिराला श्री रामेश्वरम असे नाव पडले.

FAQ

रामेश्वरम ज्योतिर्लिंग कुठे आहे?

भारतातील, तामिळनाडू राज्यातील, रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये, रामेश्वरम् नावाच्या एका छोट्या शहरामध्ये, पंबन बेटावर हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे.

रामेश्वरम मंदिराजवळ कोणत्या समुद्र आहे?

रामेश्वरम हे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात वसलेले आहे.

रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?

रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे अकरावे ज्योतिर्लिंग आहे.

रामेश्वरम ज्योतिर्लिंग का प्रसिद्ध आहे?

भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी रामेश्वरम हे एक ज्योतिर्लिंग आहे. याची स्थापना भगवान रामाने केली होती. तसेच ते चार धाम पैकी एक असणारे आहे.

रामेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ कोणते आहे?

रामेश्वरम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मदुराई हे १७७ किलोमीटर अंतरावर चे सर्वात जवळचे विमानतळ आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, हे होते रामेश्वरम् ज्योतिर्लिंग आणि त्याचा इतिहास. हा लेख वाचल्याबद्दल आपले मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे मनापासून आभार. आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.🙏🙏

Leave a comment