Rishi Panchami Information In Marathi | ऋषि पंचमी माहिती मराठी – ऋषिपंचमी (Rishipanchami)हा हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो. हा सण व्रत म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद पंचमीला हे व्रत साजरे केले जाते. भारतीय इतिहासातील होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण साजरा करतो. हा सण आपण कशा पद्धतीने साजरा करतो? या सणाचे महत्व काय आहे? तसेच या सणाची कथा आणि पूजा विधी काय आहेत? याबाबतची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे घेऊन आलो आहोत. चला तर मग, पाहूया ऋषिपंचमीचे व्रत.
ऋषि पंचमी संपूर्ण माहिती : Rishi Panchami Information In Marathi
सण – | ऋषि पंचमी |
मराठी महिना – | भाद्रपद |
तिथी – | शुक्ल पंचमी |
समर्पित – | सप्तर्षी |
दिनांक – | बुधवार २० सप्टेंबर २०२३ |
ऋषींची नावे – | कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ |
ऋषिपंचमी म्हणजे काय? (Meaning Of Rishi Panchami)
भाद्रपद महिन्यातील पंचमीला जे व्रत साजरे करतो, त्याला “ऋषीपंचमी” असे म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी महान सप्त ऋषींची पारंपारिक पूजा केली जाते. यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ यासारख्या ऋषींचा समावेश होतो. म्हणून या दिवसाला ऋषिपंचमी असे म्हणतात.

ऋषि पंचमी व्रताचा उद्देश | Rishi Panchami Information
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषिपंचमी साजरी करतो. या दिवशी सात ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी स्वकष्टाने केलेले अन्न ग्रहण केले जाते. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टाने अन्न खाल्ले जावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतीय इतिहासातील या दिग्गज ऋषींनी सांगितलेल्या रिती, रिवाज, ज्ञान, चिंतन, मनन हे पुढील पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी आपण हे व्रत साजरे करतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून देखील हे व्रत साजरे केले जाते.
असे म्हटले जाते की, हे व्रत केल्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या दोषांचे निवारण होते. या दिवशी स्त्रिया तसेच कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील ऋषी पंचमीचा उपवास करतात. तसेच या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांच्यापासून ऋषी ची भाजी तयार केली जाते. आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते. या ऋषीपंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो, त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे आपण ऋषीपंचमीचे (Rishipanchami) व्रत करतो.
नक्की वाचा👉 गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर
ऋषि पंचमीला या गोष्टी दान करा
या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी दान करावे. असे म्हटले जाते की, दान केल्याने उपवासाचा परिणाम लवकर दिसून येतो. कोणत्याही ब्राह्मणाला साखर, तूप, केळी यासारख्या वस्तू दान कराव्यात. आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या ऐपतीनुसार तुम्ही दक्षिणाही देऊ शकता.
ऋषीपंचमीच्या महत्त्वाच्या गोष्टी
- या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये.
- उपवास आणि उपासना करताना संयम ठेवून ध्यानधारणा करावी.
- या दिवशी साखर, तूप, केळी यासारख्या वस्तूंचे दान करू शकता. दक्षिणाही देऊ शकतात. तसेच अन्नदानही करू शकता.
- ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करणे अतिशय शुभ असे मानले जाते.
- या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये.
- या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान, धूम्रपान यापासून दूर राहावे.
- पूजेच्या वेळी ताजी फुले आणि फळे वापरावीत.
- पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना प्रसादाचे वाटप करावे.
ऋषीपंचमी 2023 कधी आहे ?(Rishi panchami 2023 Muhurat)
यावर्षी ऋषीपंचमी २०२३ बुधवार २० सप्टेंबर २०२३ बुधवार या दिवशी साजरी होणार आहे.
- ऋषी पंचमी पूजेच्या वेळा
- सकाळी ११.०१ ते दुपारी ०१.२८ पर्यंत
कालावधी ०२ तास २७ मिनिटे
- ऋषी पंचमी तिथी १९ सप्टेंबर २०२३ दुपारी ०१.४३ वाजता सुरू.
- ऋषी पंचमी तिथी २० सप्टेंबर २०२३ दुपारी ०२.१६ वाजता समाप्त.
ऋषी पंचमी पुजा विधी
ऋषीपंचमी 2023 साठी पुजा साहित्य
फुले, फळे, अगरबत्ती, विड्याची पाने, सुपारी, सुटे पैसे, ताम्हण, पळी, पंचपात्र, निरांजन, माचिस, कापूस, कापूर, धूप, मातीचा दिवा, केळीची पाने, नारळ, मातीचा कलश, पंचामृत, तांदुळ, दुध, दही, तुप, हळद, लवंग, विलायची, आंब्याची पाने, पीठ, किशमिश, काजु आणि सात प्रकारचे नैवैद्य, दहा बदाम, केळी आठ, गायीचे शेण, गोमुत्र, गाईचे दूध.
ऋषीपंचमी 2023 पूजाविधी
- या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
- पूजेचे सर्व साहित्य गोळा करावे.
- यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यावी, त्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यावी.
- ज्या ठिकाणी पूजा करावयाची आहे, त्या ठिकाणी हळदीने एक चौरस तयार करून घ्या. त्यावर सात ऋषींची स्थापना करावी.
- यानंतर सप्तऋषींना जानवे घालावे.
- यानंतर या सात ऋषींची हळद-कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. त्यानंतर त्यांना फुले अर्पण करावे.
- निरांजनाने आणि कापुराने घंटा वाजवून, ओवाळून घ्यावे. तसेच अगरबत्तीने देखील ओवाळावे.
- संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.
- पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
- त्यांना फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
- यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा.
- तसेच सप्तऋषींची व्रतकथा वाचावी.
- या व्रताची पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तशी क्षमा मागून प्रार्थना करावी.
- आरती करून प्रसादाचे वाटप करावे.
- या दिवशी केला जाणारा उपवास हा निर्जळी किंवा फलाहार करून करावा.
- उत्तर पूजेच्या अक्षता वाहून विधीवत सप्त ऋषींच्या मूर्तींचे विसर्जन करावे.
- हे व्रत सात वर्ष पूर्ण केल्यावर आणि उपवास केल्यावर आठव्या वर्षी मातीच्या सात ऋषींच्या सात मूर्ती बनवाव्या.
- त्यामध्ये कोणत्याही वनस्पतींच्या बिया टाकाव्या.
- त्यानंतर कलशाची स्थापना करून यथासांग पूजा करावी.
- सात ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे.
- जेवण झाल्यानंतर त्या मूर्ती एका भांड्यात ठेवा. नंतर त्यांचे विसर्जन करावे. त्यातील बियांमुळे झाडे तयार होऊन ऋषींच्या आठवणीने ती आपल्या आजूबाजूला राहतील.
ऋषी पंचमी चे सात ऋषी कोण होते ते खालील प्रमाणे
१. वशिष्ठ ऋषी
राजा दशरथ यांच्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार पुत्रांचे ते गुरु होते. भगवान ब्रह्मा यांच्यामुळे त्यांचा जन्म झाला होता.
२. अगस्त्य ऋषी
सात ऋषींमध्ये यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे.
३. अत्रि ऋषी
अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसया असे होते. भगवान राम आणि देवी सीता यांना ज्यावेळी १४ वर्षांचा वनवास झाला होता, त्यावेळी ते अत्री ऋषींच्या आश्रमात राहिले होते.
४. भृगु ऋषी
या सप्त ऋषींमध्ये भृगु ऋषींचे देखील महत्त्वपूर्ण स्थान आहे. सकाळी लवकर उठल्यावर या ऋषींच्या नावाचा जप करावा.
५. विश्वामित्र ऋषी
भगवान राम आणि लक्ष्मण यांचे गुरु म्हणून विश्वामित्र ऋषी यांना ओळखले जाते. त्यांनी गायत्री मंत्र लिहिला.
६. द्रोणाचार्य ऋषी
कौरव आणि पांडवांचे गुरु म्हणून या ऋषींना ओळखले जाते.
७. कश्यप ऋषी
कश्यप ऋषींनी कश्यप गोत्राची निर्मिती केली होती.
ऋषी पंचमी मंत्र –
‘कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः.
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥
दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः’ ||
ऋषी पंचमीला या ऋषी पंचमी मंत्र जप केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. घरात सुख-समृद्धी नांदते. विशेषत: महिलांना ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद मिळतो.
ऋषीपंचमीचे महत्त्व (Importance Of Rishi Panchami Vrat)
असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. असे देखील म्हटले जाते. ऋषीपंचमीचे व्रत केल्यास घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.
ऋषिपंचमी व्रताचे फायदे
ऋषी पंचमीच्या दिवशी केले जाणारे हे व्रत इतर व्रतांपेक्षा खूप वेगळे आहे. हे व्रत पाळण्याच्या पद्धती, त्याचा उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे. जाणून घेऊयात या व्रताचे फायदे.
- हे व्रत सर्व वयोगटातील महिला महिलांकडून केले जाणारे आहे. त्यांच्या हातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घडलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे मानले जाते.
- हे व्रत करताना कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही. या दिवशी फक्त सप्तऋषींची पूजा केली जाते.
- अपामार्ग नावाच्या वनस्पतीला या व्रतामध्ये विशेष महत्त्व आहे. या वनस्पतीच्या देठाने स्नान केल्याशिवाय ऋषीपंचमीचे व्रत पूर्ण होत नसते. सर्व पापांचा नाश करणारे हे व्रत अतिशय पुण्याचे आणि फलदायी आहे.
- ऋषीपंचमीचे हे व्रत स्त्रिया आणि अविवाहित मुली देखील करतात. लग्न होणे किंवा इच्छित वर मिळवणे यासाठी हे व्रत पाळले जात नाही. याचा एक विशिष्ट प्रकारचा उद्देश असतो.
- मासिक पाळीच्या वेळी महिलांच्या हातून ज्या धार्मिक दृष्ट्या चुका होतात आणि त्यापासून आपल्याला दोष मिळतो. त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे व्रत महत्त्वाचे समजले जाते.
हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी
ऋषिपंचमी का साजरी केली जाते?
ऋषिपंचमी संपूर्ण माहिती : मासिक पाळीच्या वेळी स्त्रिया नकळतपणे, अनावधानाने चुका करत असतात. तसेच आजच्या या कलियुगामध्ये पापाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकाच्या हातून कळत, नकळत चुका होत असतात. या पापांपासून मुक्ती करायची असेल तसेच दोषांचे निवारण करण्यासाठी आपणही ऋषिपंचमी हे व्रत साजरे करतो. या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. भारतीय इतिहासातील दिग्गज ऋषींनी शिकवलेले ज्ञान, चिंतन, मनन हे पुढच्या पिढीने चालू ठेवावे. याची आठवण म्हणून आपण हे व्रत साजरे करतो.

ऋषीपंचमीचे हे व्रत कसे साजरे करतो?
या दिवशी घरातील स्त्रिया आणि कुमारिका तसेच पुरुष देखील ऋषिपंचमीचा उपवास करतात. स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करून सप्तऋषींची म्हणजेच महर्षी कश्यप, भारद्वाज, अत्री, विश्वामित्र, गौतम ऋषी, वशिष्ठ, जमदग्नी या सगळ्यांची आपण पूजा करतो. या पूजेनंतर याचे नदीमध्ये विसर्जन करत असतो. या दिवशी स्वकष्टाने लावलेल्या झाडांच्या मुळांची तसेच भाज्यांची आपण ऋषीची भाजी म्हणून नैवेद्य दाखवून नंतर तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. या दिवशी कुटुंबातील स्त्रिया, पुरुष तसेच कुमारीका या व्रताचा उपवास करतात. पूजा झाल्यानंतर भगर, वरी तांदळाचा भात त्याचप्रमाणे दही यासारखे पदार्थ खाल्ले जातात.
ऋषिपंचमीचे नियम (ऋषि पंचमी माहिती मराठी)
- ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचे पूजन करावयाचे असते.
- या दिवशी गायीच्या शेणाने घरातील सर्व जमीन सारवली जाते. तसेच लादी असल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घेतली जाते.
- या दिवशी कोणाचीही निंदा करू नये. तसेच कोणाला अपशब्द वापरू नये.
- या दिवशी भिक्षुकांना दान करावे.
- ऋषीपंचमीच्या दिवशी घरामध्ये कांदा, लसूण यांचा वापर अजिबात करू नये.
- या दिवशी घरामध्ये मांसाहार तसेच मद्यपान, धूम्रपान देखील वर्ज्य करावे.
- या दिवशी कोणत्याही प्राण्याचा, पक्षाचा बळी देऊ नये.
- या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे ब्राह्मणांना दक्षिणा तसेच केळी, साखर यासारख्या वस्तूंचे दान करावे.
- स्वकष्टाने लावलेल्या झाडांच्या मुळे तसेच भाज्या यांचा अन्नामध्ये समावेश करावा.
ऋषिपंचमी आरती
जय जय ऋषिराजा, प्रभु जय जय ऋषि राजा ।
देव समाजाहृत मुनि, कृत सुरगया काजा ।।
जय दध्यगाथ वर्ण, भारद्वाज गौतम ।
जय श्रृंगी, पराशर अगस्त्य मुनि सत्तम ।।
वशिष्ठ, विश्वामित्र, गिर, अत्री जय जय ।
कश्यप भृगुप्रभृति जय जय कृप तप संचय ।।
वेद मन्त्र दृष्टावन, सबका भला किया ।
सब जनता को तुमने वैदिक ज्ञान दिया ।।
सब ब्राह्मण जनता के मूल पुरुष स्वामी ।
ऋषि संतति, हमको ज्ञानी हों सत्पथगामी ।।
हम में प्रभु आस्तिकता आप शीघ्र भर दो ।
शिक्षित सारे नर हो, यह हमको वर दो ।।
धरणीधर कृत ऋषिजन की आरती जो गावे ।
वह नर मुनिजन, कृपया सुख संपत्ति पावे ।।
ऋषि पंचमी ऋषिची भाजी का केली जाते?
ऋषिपंचमीला हे व्रत घरातील सुहासिनी, कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील करतात. या दिवशी उपवास केला जातो. असे म्हटले जाते की, या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये. असे देखील म्हटले जाते की, बैलाचे पाय धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्नपदार्थ ऋषिपंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाही. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या, कंदमुळे तसेच कष्टाने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांचा वापर करून ऋषीची भाजी तयार केली जाते. या सर्व भाज्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये देखील विकायला उपलब्ध असतात.
ऋषीपंचमीला ऋषी भाजी करताना कोणत्या भाज्या मिक्स कराव्या?
श्रावण, भाद्रपदच्या दरम्याने पावसाळा असतो. आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात. त्यामुळे या भाज्यांचा वापर ऋषीपंचमीच्या भाजी मध्ये केला जातो. कोकणात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि ऋषी पंचमीच्या या भाजीचे सुद्धा यादिवशी विशेष महत्व आहे.

ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात. आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक रानभाज्या, निरफणस, भेंडी, वांगी, गवार अशा भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनविली जाते.
त्यात लाल भोपळा, पडवळ, दोडकी या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते. अळूची पानं, बटाटा, लाल माठ, रताळं, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, ओले मटार, शिमला मिरची, टोमॅटो, खोबरं घालतात. मिरच्या घालतात. यात मुख्य भाजी ही अळूची असते. त्यात या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात.
आमचे गणेश चतुर्थी 2023 स्पेशल लेख नक्की वाचा 👇
- गणेश चतुर्थी 2023 तारीख, इतिहास, मुहूर्त, शुभ योग, मंत्र आणि पूजाविधी, विसर्जन
- गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि फोटो
- हरतालिका पूजन संपूर्ण माहिती
- गणपतीच्या पूजेतील 21 पत्री
- गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
- कोकणातील गणेशोत्सव : एक अद्भुत आनंद सोहळा
- ऋषिपंचमी संपूर्ण माहिती
- गौरी आवाहन – पूजन संपूर्ण माहिती आणि पूजविधी
- श्री गणेश विसर्जन संपूर्ण माहिती
ऋषि पंचमी व्रत कथा (Rishi panchami Story)
एका गावामध्ये एक शेतकरी ब्राह्मण राहत होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याच्या बायकोला मासिक पाळी आल्यामुळे ती तसाच विटाळ घेऊन संपूर्ण घरभर वावरली. यामुळे तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. आणि तिला कुत्रीचा जन्म आला. तिच्या या पापामुळे देवाची करणी झाली. दोघेही पुन्हा आपल्या मुलाच्या घरी आली. तो मुलगा मोठा धार्मिक होता. पूजा अर्चा, देवधर्म करी. आलेल्या ब्राह्मणांचा आदर करी, त्यांना भोजन अर्पण करी.
एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला सांगितले की, आज माझ्या आईचे श्राद्ध आहे. तिने श्राद्धाच्या दिवशी खिरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात एक चमत्कार झाला, खिरीचे भांडे उघडे होते, त्यात सर्पाने आपली गरळ टाकली. हे त्या कुत्रीने पाहिले. त्या कुत्रीच्या मनात विचार आला की, ब्राह्मणांनी ही खीर खाल्ली तर ते मरून जातिल. आणि आपल्या मुलाला ब्रह्म हत्येचे पाप लागेल. म्हणून ती खिरीच्या पातेल्याला शिवली. हे पाहून ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोलीत घेऊन त्या कुत्रीच्या कमरेत मारले. त्याचप्रमाणे तो स्वयंपाक देखील टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक करून ब्राह्मणांना जेऊ घातले.
यामुळे त्यादिवशी त्या कुत्रीला उपासमार झाली. रात्र झाली तशी ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले, तशी ती म्हणाली की, मी आज उपाशी आहे. मला अन्न, पाणी काहीही मिळाले नाही. खिरीच्या पातेल्यात सापाने गरळ टाकली ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यात जाऊन शिवले. त्यामुळे माझ्या सुनेला राग आला आणि तिने जळके कोलीत माझ्या कमरेत घातले.
त्यामुळे माझे संपूर्ण अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलाने उत्तर दिले. तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचे श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण त्याच्या मुलाने ऐकले. आणि लगेच उठून तो बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं. दोघांना पाणी प्यायला दिले. मनातून मात्र फार दु खी झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घोर अरण्यात गेला. त्या ठिकाणी ऋषींचा मेळा भरला होता. त्यांना साष्टांग नमस्कार करून त्या ऋषींनी त्या मुलाला प्रश्न केला की, तू असा चिंताक्रांत का दिसत आहेस? मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला. त्यांना मोक्ष कसा मिळेल? या चिंतेत मी पडलो आहे. यावर काही उपाय असेल तर मला सांगा. त्यावेळी ऋषींनी सांगितले की तू ऋषीपंचमीचे व्रत कर.
भाद्रपद महिन्याच्या पाचव्या दिवशी ही पंचमी येते. या दिवशी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या देठाने दात घासावे. आवळकाठी कुटून घ्यावी. त्याचप्रमाणे तीळ देखील वाटून घ्यावे. व ते तेल केसाला लावावे आणि मग आंघोळ करावी. आणि अरुंधती सह सप्त ऋषींची पूजा करावी. अशी सात वर्ष केल्यानंतर शेवटी आठव्या वर्षी त्याचे उद्यापन करावे. या व्रताने मासिक पाळीपासून आलेला दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. आणि पुण्य लाभते. त्याचप्रमाणे मनातील इच्छा पूर्ण होतात.
घरी जाऊन त्यांच्या मुलानेही व्रत पूर्ण केले. त्यामुळे त्याचे पुण्य त्याच्या आई-बाबांना मिळाले. आई-वडिलांची पापापासून, दोषापासून मुक्तता झाली. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री एक सुंदर स्त्री झाली. दोघेही विमानात बसून स्वर्गात गेली. यामुळे मुलाचा हेतू पूर्ण झाला. म्हणून हे ऋषीपंचमीचे व्रत आजही आपण मोठ्या भक्तीभावाने मोठ्या आनंदात करतो.
अशी आहे ऋषि पंचमी व्रत कथा.
ऋषीपंचमी 2023 प्रश्न
ऋषि पंचमी म्हणजे काय?
ऋषीपंचमी 2023 भाद्रपद शुक्ल पंचमीला भारतीय इतिहासातील ऋषींची या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या व्रताला सणाला ऋषिपंचमी असे म्हणतात.
ऋषिपंचमी का साजरी केली जाते?
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी अनावधानाने घडून गेलेल्या गोष्टींचा तसेच दोषांचे निवारण करण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.
ऋषि पंचमी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते?
ऋषी पंचमी भाद्रपद महिन्याच्या शुक्लपंचमीला साजरी केली जाते.
यावर्षी २०२३ मध्ये ऋषि पंचमी कधी आहे?
यावर्षी २०२३ मध्ये ऋषिपंचमी २० सप्टेंबर २०२३ बुधवार या दिवशी आहे.
ऋषिपंचमीला कोणत्या ऋषींची पूजा केली जाते?
ऋषिपंचमीला ऋषी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारतद्वाज या सात ऋषींची पूजा केली जाते.
ऋषीपंचमीच्या दिवशी काय केले जाते?
ऋषिपंचमी या दिवशी स्वकष्टाने लावलेल्या झाडांची मुळे आणि भाज्या यापासून ऋषीची भाजी तयार केली जाते.
ऋषीपंचमीचा उपवास कोण करू शकतो?
ऋषी पंचमी व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमिला केले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आणि मुलींसाठी महत्वाचे असून या व्रतामध्ये या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते. या दिवशी महिला आणि कन्या सात ऋषींचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच सुख, शांती,सौभाग्य आणि समृद्धीची कामना करण्यासाठी हे व्रत करतात.
निष्कर्ष
मित्रांनो, ऋषिपंचमी या सणाचे महत्व, पूजा विधि, कथा याबाबतची सगळी माहिती आम्ही या Rishi Panchami Information In Marathi लेखा द्वारे आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ऋषि पंचमी संपूर्ण माहिती वाचून कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.