गोकुळाष्टमी संपूर्ण माहिती : Shri Krishna Janmashtami Information In Marathi

Shri Krishna Janmashtami Information In Marathi । श्री कृष्ण जन्माष्टमी 2023 – भगवान श्रीकृष्णांचा जन्म, हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर, मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत झाला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून आपण हा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो

Table of Contents

गोकुळाष्टमी संपूर्ण माहिती : Shri Krishna Janmashtami Information In Marathi

Shri Krishna Janmashtami Information In Marathi

गोकुळाष्टमी प्रस्तावना (Introduction Of Shri Krishna Jayanti)

गोविंद, बाळ गोपाळ, कान्हा, कन्हैया, गोपाळ, केशव, कृष्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाच्या जन्मसणाचा इतिहास, या सणाचे महत्त्व, हा सण आपण का साजरा करतो? याबाबतची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे घेऊन आलो आहोत. चल तर मग, जाणून घेऊया श्रीकृष्ण जयंती.

आपला भारत देश हा धार्मिक परंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशामध्ये सगळे सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जयंती, म्हणजेच गोकुळाष्टमी.

गोकुळाष्टमी इतिहास (History Of Gokulashtami)

श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भाऊ कंसाचा अत्याचार सहन करणारी त्याची बहीण देवकी हिने, आठवे अपत्य म्हणून भगवान श्रीकृष्णाला जन्म दिला. पृथ्वीला कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशती पासून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता. या आख्यायिकेनुसार दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो.

गोकुळाष्टमीचे धार्मिकदृष्ट्या महत्व | Shri Krishna Jayanthi 2023 Information

सणाचे नाव –गोकुळाष्टमी
स्थान –भगवान कृष्ण
सणाचे दुसरे नाव –श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी
मराठी महिना –श्रावण
इंग्रजी महिना –ऑगस्ट/सप्टेंबर
कधी साजरा करतात –श्रावण कृष्ण अष्टमी
यावर्षी कधी आहे –६ सप्टेंबर २०२३

श्री कृष्ण जयंती माहिती मराठी

हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सणांपैकी एक म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी भगवान कृष्णाच्या भक्तीसाठी लोक उपवास करतात. आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी भगवान कृष्ण ला प्रार्थना करतात. कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे रात्री कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्यानंतर कृष्णाची गाणी, पाळणे म्हणून पाळण्याला झोका दिला जातो. पूजा अर्चा करून प्रार्थना केली जाते.

ज्या ज्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो त्या त्या ठिकाणी फुलांची, दिव्यांची आरास केली जाते. कृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केले जाते. नाच गाण्यांनी संपूर्ण रात्र जागवली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्यानंतर काला करून कृष्णाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटप करून नंतर कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

श्रीकृष्ण जयंती अर्थ (Meaning Of Gokulashtami)

श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून हा सण श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान कृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला ती जयंती म्हणजेच “श्रीकृष्ण जयंती”. या सणाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी देखील नावे आहेत. गोकुळामध्ये गाईंचे पालन करणाऱ्या कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला होता. म्हणून या सणाला “गोकुळाष्टमी” असे देखील म्हटले जाते. श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता. म्हणून हा सण “जन्माष्टमी” म्हणून साजरा करतात.

Shri Krishna Janmashtami Information In Marathi

गोकुळाष्टमीचे महत्व

 • श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रतवैकल्य केले केले जाते. ज्या ठिकाणी कृष्णाची पूजा केली जाते, ते ठिकाण फुलांनी तसेच दिव्यांनी सुशोभित केले जाते. त्यानंतर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्याच बाजूला वसुदेव आणि देवकी यांच्या देखील मूर्ती बसवल्या जातात. अष्टमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जातो.
 • वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
 • भगवान विष्णू कृष्णाच्या रूपामध्ये सृष्टीच्या कल्याणासाठी तसे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि या पृथ्वीला पापांपासून मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन आपला आठवा अवतार धारण केला.

कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?

 • श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळेस मथुरा नगरीत कंसाच्या कारागृहात देवकीच्या गर्भातुन श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
 • असे म्हटले जाते की, द्वापर युगात पृथ्वीवर जेव्हा राक्षसांचे अन्याय अत्याचार हे वाढत होते, तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण करून ती ब्रम्हा अणि विष्णु या दोघांकडे भेटीस जाते.
  अणि पृथ्वी माता ब्रम्हा अणि विष्णु या दोघांना पृथ्वीवर राक्षसांकडून मानव जातीवर होत असलेल्या सर्व अन्याय अत्याचारा बद्दल सांगते.
 • तेव्हा ब्रम्हदेव हे विष्णुंना म्हणतात हे प्रभु पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करायची वेळ आता आली आहे.
 • तेव्हा विष्णु म्हणतात, ठिक आहे. पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अणि राक्षसांपासुन तिचे रक्षण करायला, पापींचा, अत्याचारींचा संहार करण्यासाठी मी मानव रूपात नक्की जन्म घेईल.
 • हिंदु मान्यतेनुसार देखील भगवान विष्णुच्या दहा अवताराविषयी सांगितले गेले आहे. जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीवर पाप वाढेल, अन्याय, अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतील.
 • श्रीकृष्ण देखील भगवान विष्णु यांच्या दहा अवतारांपैकी एक आहे.
 • भगवान विष्णुंच्या ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम, पापी अत्याचारी राक्षसाचा अंत करणे यासाठी झाली होती.
 • म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे, अत्याचारी, दुराचारी नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसापासुन मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एका बालकाच्या रूपात जन्म घेतला होता.
 • म्हणून कृष्णाच्या जन्मनिमित्त हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते?

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मथुरा नगरीमध्ये कंसाच्या कारागृहात देवकीने ज्या आठव्या अपत्याला जन्म दिला ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. त्यांच्या जन्माचा दिवस हा जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. परदेशात राहणारे भारतीय लोक सुद्धा ही गोकुळाष्टमी धुमधडाक्यात साजरी करतात.

या दिवशी भक्त गोकुळाष्टमीचा उपवास करतात. या दिवशी त्या त्या ठिकाणच्या मंदिरांना संपूर्ण फुलांनी दिव्यांनी सजवले जाते. तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. यानंतर भजन, कीर्तन केले जातात. त्यानंतर नाच गाण्यांचा कार्यक्रम देखील केला जातो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू असते. संपूर्ण भारतभरातून भक्त दर्शनासाठी येत असतात.

भगवान श्रीकृष्णाचे दही हे आवडते होते. तो आपल्या मित्रांसोबत लोणी, दही, दूध चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असे. म्हणून त्याच्या या आठवणींना दहीहंडी महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाला काला असे म्हणतात. दही काल्याच्या दिवशी भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवून उपवास सोडून सोडला जातो. नैवेद्याचा काला सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करून त्यानंतर भगवान कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

गोकुळाष्टमी कधी आहे आणि मुहूर्त?(Krishna Janmashtami 2023)

 • श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी गोकुळाष्टमी आहे.
 • अष्टमी तिथी सुरू – दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटांनी
 • अष्टमी तिथी समाप्त – ७ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ०४ वाजून १४ मिनिटांनी.
 • रात्री पूजेचा मुहूर्त – १२ वाजून ०२ मिनिटे ते १२.४८ मिनिटांपर्यंत

जन्माष्टमी पूजा विधि

Shri Krishna Janmashtami Information In Marathi

गोकुळाष्टमी पूजा साहित्य

श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा, गणेशपूजन, जानवे, गणेशाला अर्पण करण्याचे वस्त्र, विड्याची पाने, केळीची पाने, फुलदाणी, पांढरे वस्त्र, लाल वस्त्र, पंचरत्न दिवा, मोठ्या दिव्यासाठी तेल, समई, नारळ, तांदूळ, निरांजन, गुलाब आणि लाल कमळाची फुले, तुळशी, दुर्वा, अर्घ्य पात्र, कापूर, केशर, चंदन, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुपारी, पुष्पहार, तुळशीच्या माळा, अगरबत्ती, कुंकू, धूप, अक्षता, अबीर, गुलाल, हळद, दागिने, सुटे पैसे, धागा, कापूस, दुर्वा, सुका मेवा, गंगेचे पाणी, मध, साखर, शुद्ध तूप, दही, लाह्या, दूध, हंगामी फळे, नैवेद्य किंवा मिठाई, अत्तर, सिंहासन, झुला, पंचामृत, इत्यांदी वस्तूंचा पूजेत समावेश करावा.

गोकुळाष्टमी पूजा विधी

 • या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करणे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालणे.
 • पूजा साहित्य एकत्र करणे. फुले काढून आणणे. त्यानंतर वस्त्र वाती तयार करणे.
 • गणेश पूजन म्हणजेच एका ताटामध्ये तांदूळ आणि नारळ काढून ठेवणे.
 • नैवेद्यामध्ये कृष्णाला आवडतात ते पदार्थ म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी, आंबोळी, गुळचून आणि कुळीथाची उसळ तयार करून ठेवणे.
 • सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घेणे.
 • नंतर एका पाटावर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करणे. पाटाच्या बाजूला रांगोळी काढणे.
 • त्यानंतर समई पेटवून घेणे.
 • प्रथम गणेश पूजन करून घेणे.
 • नंतर कृष्णाला जानवे घालून हळद, कुंकू, चंदन, अबिर लावून घेणे.
 • त्यानंतर कृष्णाला फुले अर्पण करणे.
 • अगरबत्ती आणि निरांजनाने ओवाळणे
 • त्यानंतर धुपारती करणे.
 • मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे. कृष्णाची प्रार्थना करणे.
 • त्यानंतर लाह्या आणि दूध तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवणे.
 • त्यानंतर कृष्णाची आरती करणे.
 • आरती केल्यानंतर लगेचच कृष्णाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना वाटणे.
 • रात्री भजन, कीर्तनाचा, नाच गाण्यांचा कार्यक्रम करून रात्र जागवणे.

गोपाळकाला पूजा विधि

 • जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करणे.
 • त्यानंतर पूजेची सर्व तयारी करून घेणे.
 • नैवेद्याची पंचपक्वान्ने तयार करणे.
 • यानंतर सर्वप्रथम भगवान कृष्णाची यथासांग पूजा अर्चा आणि मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे.
 • आरती झाल्यानंतर लगेचच नैवेद्य दाखवून घेणे.

भारतातील काही प्रसिद्ध श्रीकृष्णाची मंदिरे

द्वारकाधीश मंदिर, मथुरा

हे मथुरा मधील दुसरे सर्वात प्रसिद्ध असे भगवान श्रीकृष्णांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये काळ्या रंगाच्या पुतळ्याची पूजा करण्यात येते. तसेच याच्या बाजूला राधाची देखील मूर्ती आहे. हे एक प्राचीन मंदिर असून त्याची वास्तू कला देखील भारतीय पुरातन वास्तू ने प्रेरित केली आहे. या ठिकाणी जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

श्रीकृष्ण मठ मंदिर, उडुपी

कर्नाटक मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असणारे हे भगवान कृष्णाचे मंदिर आहे. खिडकीच्या नऊ चित्रांमधून या ठिकाणी भगवान कृष्णाची पूजा केली जाते. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. जन्माष्टमीच्या दिवशी हे संपूर्ण मंदिर फुले आणि दिव्यांनी सजलेले असते.

भालका तीर्थ, गुजरात

सोमनाथ, गुजरात या ठिकाणी असलेले हे भालका तीर्थ भगवान कृष्णाला समर्पित आहे. झाडाखाली ध्यान करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला एका शिकाऱ्याने हरिण समजून त्याच्या पायाला बाण मारला होता. हे मंदिर एका वटवृक्षाखाली आहे, ज्या ठिकाणी कृष्ण बसले होते.

गुरु वायुर मंदिर, केरळ

या मंदिरामध्ये कृष्णाच्या बाल रूपांची पूजा केली जाते. तसेच विष्णूचे दहा अवतार देखील या मंदिरामध्ये दर्शवलेले आहेत. या ठिकाणी जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

बेट द्वारका मंदिर, गुजरात

असे समजले जाते की, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि मित्र सुदामा यांची भेट झाली होती. त्यामुळे या मंदिरामध्ये कृष्ण आणि सुदामाची मूर्ती आहे. आणि त्यांची पूजा केली जाते. गुजरात मधील द्वारकाधीश मंदिराप्रमाणे बेट द्वारका हे देखील एक प्रसिद्ध मंदिर आहे.

जगन्नाथ पुरी, उडीसा

या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आपले मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा समवेत बसले आहेत. या मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.

सावलिया सेठ मंदिर, राजस्थान

राजस्थान मधील हे एक प्रसिद्ध असे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. ज्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतात, त्यांनी या ठिकाणी एकदा अवश्य जाऊन आले पाहिजे.

द्वारकाधीश मंदिर, द्वारका, गुजरात

गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध असे कृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर गोमती खाडीवर आहे. जन्माष्टमीच्या वेळी या ठिकाणी उत्तम वातावरण असते. त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर हे आतून आणि बाहेरून सुशोभित केलेले असते.

श्री बाके बिहारी मंदिर, वृंदावन

या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपले बालपण घालवले होते. या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन असे मंदिर देखील आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बाके बिहारी असे म्हणतात. म्हणूनच या मंदिराचे नाव बाके बिहारी असे ठेवले आहे.

भारतात गोकुळाष्टमी कुठे कुठे साजरी केली जाते?

गुजरात आणि राजस्थान

गुजरात आणि राजस्थान मध्ये भगवान श्रीकृष्णाची मोठी मंदिरे आहेत. आणि ती प्रसिद्ध देखील आहेत. या मंदिरांमध्ये हा कृष्ण जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी कृष्णाचे मंदिर फुलांनी तसेच दिव्यांनी सजवले जाते. त्यानंतर रात्रभर या ठिकाणी भजन, कीर्तनाचा आणि नाच गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

महाराष्ट्र

महाराष्ट्र मध्ये कृष्णजन्म हा गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात. रात्री बारा वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्यानंतर दही दुधाचा प्रसाद दाखवून त्यानंतर कृष्ण जन्मावर आधारित पाळणे, गवळण, गाणी म्हणून कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कृष्णाचे आवडते दही आणि पोहे, लाह्या यासारखे बरेच पदार्थ एका हंडीमध्ये भरून दहीहंडी वरती अडकवली जाते. त्यानंतर गोविंदा पथक थरावर थर लावून हंडी फोडतात. जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हे हंडी फोडतात, त्यांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

दक्षिण भारत

दक्षिण भारतामध्ये कृष्णाचा जन्म मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या ठिकाणी काढल्या जातात. तसेच भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो. या दिवशी भगवद्गीतीचे वाचन केले जाते. अशा प्रकारे हा कृष्ण जन्माचा उत्सव या ठिकाणी मोठ्या जल्लोष आणि उत्साहात साजरा केला जातो.

ओरिसा आणि बंगाल

या ठिकाणी लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवले जाते. त्यानंतर त्यांचे कृष्ण जन्मावरील नृत्याविष्कार ही सादर केले जातात.

गोकुळाष्टमी निमित्ताने केले जाणारे खाद्यपदार्थ

जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारचे पंचपक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या पंचपक्वान्नमध्ये दही, दूध, लोणी यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे हे आवडते पदार्थ होते. या दिवशी दही, पोहे, आंबोळी, त्यानंतर शेवग्याच्या पानांची भाजी तसेच कुळथाची उसळ, गुळ चुन यासारखे पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी गोपाळकालाच्या च्या दिवशी वरण, भात, भाजी त्यानंतर काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते तर काही ठिकाणी शेवयाची खीर केली जाते तर काही ठिकाणी विविध प्रकारचे दुधाचे पदार्थ देखील केले जातात.

गोकुळाष्टमी कथा व्हिडिओ

गोकुळाष्टमी कथा

भोजवंशी राजा उग्रसेन हा मथुरेचा राजा होता. त्याच्या मुलाचे नाव कंस असे होते. जनतेवर तेथील लोकांवर खूप अन्याय अत्याचार करीत होता. त्याच्या या क्रूर स्वभावामुळे आणि त्याच्या या अत्याचाराला गावातील सगळी जनता कंटाळून गेली होती. याच त्याच्या स्वभावामुळे त्यांनी स्वतःच्या वडिलांना उग्रसेन राजांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते.

ज्यावेळी महाराज उग्रसेन यांना कारागृहात डांबून ठेवले गेले त्यावेळी उग्रसेन यांनी कंसाला शाप दिला की एक दिवस तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल. तसेच तू माझा मुलगा आहेस याची अत्यंत लाज वाटते असे देखील ते म्हणाले.

त्याचवेळी उग्रसेन यांच्या देवक नावाच्या भावाच्या मुलीचे म्हणजेच देवकीच्या विवाहाची तयारी चालू असते. तिचे लग्न वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदार सोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ज्यावेळी तिची पाठवणी केली जाते, त्यावेळी आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंसा, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने, आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, त्या देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे.

ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो आणि त्याचवेळी ठरवतो की मी जर वसुदेवाची हत्या केली तर देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून येणारे मृत्यूचे कुठलेच भय राहणार नाही. ज्यावेळी कंस वसुदेवाला मारायला जातो, त्यावेळी देवकी त्याच्या विनवण्या करते आणि त्याला वचन देते. माझ्या गर्भातून जेव्हा मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करीन. या वचनामुळे देवकी आणि वसुदेव या दोघांना देखील कंसाने मथुरेच्या महालामध्ये कारागृहात बंदी करून ठेवले.

कंस हा सतत वसुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांच्यावर अत्याचार करायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला कंस तिच्याकडून घेऊन तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाळाला मारून टाकत होता. असे एक एक करून, एकूण सात पुत्रांना या दुराचारी कंसाने तिच्या डोळ्यासमोर मारून टाकले होते.

कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते, म्हणून या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्यावर कडक पहारा ठेवला जातो. देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी वसुदेवाचा मित्र असलेला नंद गावातील राजा नंद याची पत्नी यशोदा देखील गर्भवती असते. राजा नंद देखील देवकीच्या या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतो. अशा प्रकारे भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म होतो. याचवेळी देवकी आणि वसुदेव राहत असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि कारागृहाचे दरवाजे उघडले जातात. याच वेळी वसुदेव त्या आपल्या पुत्राला घेऊन राजा नंद यांच्याकडे जातात.

आपला पुत्र त्यांना देऊन त्यांना झालेली कन्या घेऊन तो पुन्हा कारागृहात येतो. कारागृहात आल्यावर कारागृहातील दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतात. त्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. कंस लगेचच त्या ठिकाणी येतो आणि देवकीच्या हातातील त्या मुलीला हिसकावून घेतो आणि जमिनीवर फेकू लागतो. तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातून सुटून वर आकाशात जाते आणि त्याचवेळी पुन्हा आकाशवाणी होते की, कंसा तुला मारणारा या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे. आणि तो गोकुळात नांदतो आहे. पुढे कृष्ण मोठा झाल्यावर मथुरेत येऊन तो कंसाचा वध करून राजा उग्रसेन, वासुदेव आणि देवकी यांची कारागृहातून सुटका करतो.

श्री कृष्ण जन्माष्टमी 2023 प्रश्न

यावर्षी गोकुळाष्टमी किती तारखेला आहे?

यावर्षी गोकुळाष्टमी ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी आहे.

गोकुळाष्टमीला कोणाची पूजा केली जाते?

गोकुळाष्टमीला भगवान कृष्णाची पूजा केली जाते.

श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या वेळी झाला होता?

श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता त्यामुळे हा सण संध्याकाळी साजरा केला जातो.

जन्माष्टमी का साजरी केली जाते?

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते.

जन्माष्टमी कशी साजरी केली जाते?

भगवान कृष्णाची पूजा आमच्याकडून त्याचप्रमाणे आरती भजन कीर्तन करून तसेच दहीहंडी खेळून जन्माष्टमी साजरी केली जाते.

जन्माष्टमी म्हणजे काय?

श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता हा आनंद साजरा करण्यासाठी ही जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाच्या जन्माची अष्टमी म्हणून साजरी केली जाते.

निष्कर्ष

मित्रांनो,

गोकुळाष्टमी माहिती मराठी या लेखाद्वारे आम्ही जन्माष्टमी या सणाविषयीची माहिती, त्याबाबतचा इतिहास आणि हा सण कसा साजरा केला जातो? याबाबतची सगळी माहिती आपल्याला देण्याचा एक छोटासा प्रयत्न या मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला गोपाळकाला माहिती मराठीही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment