सोमवती अमावस्या संपूर्ण माहिती : Somvati Amavasya Information In Marathi – हिंदू पंचांगानुसार सोमवती श्रावण सोमवार या दिवशी येणाऱ्या अमावास्येला “सोमवती अमावस्या” असे म्हणतात आणि ही हिंदू धर्मातील लोकांसाठी अतिशय शुभ अशी अमावस्या मानली जाते. ही अमावस्या सोमवार या दिवशी येत असल्याने, या दिवशी भगवान शंकरांचे देखील महत्त्व आहे. मृत पावलेल्या पूर्वजांना ही अमावस्या समर्पित आहे. त्या दिवशी पितरांना प्रार्थना करण्याला एक विशेष महत्त्व असे प्राप्त झालेले आहे.
हे महत्त्व नेमके काय आहे? आणि सोमवती अमावस्या यावर्षी कधी आहे ? तसेच ही पूजा कशी साजरी केली जाते ? तसेच दीप अमावस्या आणि गटारी अमावस्या म्हणजे काय? याबाबतची माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊया सोमवती अमावास्या.
सोमवती अमावस्या संपूर्ण माहिती : Somvati Amavasya Information In Marathi
सणाचे नाव | सोमवती अमावस्या |
दुसरे नाव | दीप अमावस्या, गटारी अमावस्या |
धर्म | हिंदू |
कधी आहे | १७ जुलै २०२३ |
मराठी महिना | आषाढ |
इंग्रजी महिना | जुलै |
समर्पित | भगवान शंकर |
वार | सोमवार |
सोमवती अमावस्या म्हणजे काय (Meaning Of Somvati Amavasya 2023)
प्रत्येक महिन्याला अमावास्या येत असते. परंतु श्रावण सोमवार या दिवशी येणाऱ्या अमावास्येला “सोमवती अमावस्या” असे म्हणतात. सोम म्हणजे चंद्र.
दीप अमावस्या या अमावास्येला दिव्यांना खूप महत्त्व आहे. संपूर्ण घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. म्हणून या अमावस्येला “दीप अमावस्या” असे म्हणतात.
श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणे टाळले जाते. म्हणून या दिवशी जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान करून लोक हे रस्त्यांवर लोळत पडलेले पहावयास मिळतात. म्हणून या अमावस्येला “गटारी अमावस्या” असे देखील म्हटले जाते.
सोमवती अमावास्येचे महत्त्व (Importence Of Somvati Amavasya)
सोमवती अमावस्येच्या दिवशी तर्पण श्राद्ध, कर्म स्नान आणि दान केल्याने करणाऱ्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या ही दूर होतात. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची देखील आराधना केल्यामुळे आराधना करणाऱ्या व्यक्ती ची रोग, सगळ्या दोषांमधून, त्याचप्रमाणे भीतीपासून मुक्ती मिळवून, धनधान्य, सुख-समृद्धी लाभ होऊन, भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
असे म्हटले जाते की, ज्या स्त्रिया सोमवती अमावस्याचे व्रत करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात, त्यांना नेहमी सुख, समाधानी राहण्याचे वरदान मिळते. त्याचप्रमाणे पती आणि मुलांना दीर्घायुष्य मिळते. शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजल अभिषेक केल्यामुळे पितृदोष, कालसर्पदोष यापासून मुक्ती मिळून पितरांच्या कृपेने तसेच भगवान शंकरांच्या कृपेने कुटुंबामध्ये समृद्धी प्राप्त होते.

सोमवती अमावस्येला काय करू नये ?
- सोमवती अमावस्या या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार आणि अल्कोहोल यांचे सेवन करू नये. तसेच नखे किंवा केस कापणे देखील निशिद्ध मानले गेले आहे.
- ज्योतिष शास्त्राप्रमाणे असे मानले जाते की, या दिवशी चुकूनही कोणीही स्मशान भूमीत जाऊ नये.
- असे म्हटले जाते की, या अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा करावी, अजिबात झोपू नये.
- या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधी आहे. परंतु या झाडाला पूजेच्या वेळेस स्पर्श करणे शुभ मानले जात नाही.
- या अमावास्येच्या दिवशी आपल्यापेक्षा लहान किंवा मोठ्या कोणालाही दुखवू नये, कठोर शब्द वापरू नये.
या अमावास्येला गटारी अमावस्या का म्हणतात?(Gatari Amavasya 2023)
या अमावस्येनंतर श्रावण महिना येतो. या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करणे टाळले जाते. म्हणून या दिवशी जास्त प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान केले जाते. मद्यपान करणारे लोक या दिवशी जास्त प्रमाणात मद्यपान करतात. त्यामुळे बऱ्याच अंशी मद्यपान करणारे लोक हे रस्त्यांवर लोळत पडलेले पहावयास मिळतात. म्हणून या अमावस्येला गटारी असे देखील म्हटले जाते.
सोमवती अमावस्या 2023 शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यामध्ये सोमवार या दिवशी येणारी ही सोमवती अमावस्या यावर्षी १७ जुलै २०२३ या दिवशी आहे. श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार देखील आहे. सोमवती अमावस्या आणि सोमवार या म्हणून या दिवशी शिवपूजा विशेष मानली जाते. त्यामुळे आपल्याला यथोचित फळ मिळते.
सोमवती अमावस्या सुरूवात
१६ जुलै रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी.
सोमवती अमावस्या तिथी समाप्ती
१८ जुलै २०२३ सकाळी बारा वाजून एक मिनिटांनी.
सोमवती अमावस्या पूजा विधि
- या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करावे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
- नंतर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
- पूजेची जागा स्वच्छ करून भगवान शंकर आणि माता पार्वती ची पूजा करावी.
- नंतर शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र, फुले, इत्यादी अर्पण करावे.
- शिव महिमा, शिव चालीसा, शिवमंत्रंचा उच्चार करताना रुद्राक्षांची जपमाळ करावी.
- पूजा संपल्यानंतर ब्राह्मणांना आपल्या ऐपतीनुसार दक्षिणा द्यावी.
सोमवती अमवास्येबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी
- हिंदू परंपरेनुसार पिंपळाच्या झाडाला या दिवशी अतिशय पवित्र असे स्थान आहे. या झाडाला प्रदक्षिणा घालून पूजा करून प्रार्थना केल्याने आपल्याला लाभ होतो.
- कुरुक्षेत्रामध्ये झालेल्या युद्धानंतर युधिष्ठराला पांडवांच्या वंशाची काळजी वाटत असल्यामुळे याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते भीष्म पितामह यांच्याकडे गेले. त्यांनी युधिष्ठराला सोमवती अमावस्येचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, जो कोणी सोमवती अमावस्या पाळतो त्याला दीर्घायुष्य आणि उत्तम संतती प्राप्त होते.
- या दिवशी गंगा, यमुना या पवित्र नद्यांमध्ये पवित्र असे स्नान केल्यामुळे स्नान करणाऱ्या व्यक्तींना विविध समस्यांपासून मुक्ती मिळते.
- विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात.
- पितृदोष दूर होण्यासाठी देखील या दिवशी पिंडदान केले जाते.
- सोमवती अमावस्येला केलेले पुजा, साधना यामुळे दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्रासापासून मुक्ती होण्यासाठी मदत होते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी करावयाचे उपाय
- या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळून काळया मुंग्यांना खायला दिली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. तसेच दुःख नाहीसे होऊन दुःखापासून मुक्ती मिळते.
- सोमवती अमावस्येच्या रात्री एक चमचा कच्चे दूध आणि एक नाणे विहिरीत टाकावे. जेणेकरून आपले दारिद्र्य दुःख दूर होऊन संपत्ती मिळते.
- या दिवशी सकाळी पूजेच्या ठिकाणी एक लिंबू ठेवावे.
सोमवती अमावस्येला करावयाचे दान
१७ जुलै २०२३ रोजी येणाऱ्या या अमावास्येला अनेक शुभ योग आहेत. घरामध्ये दारिद्र्य असेल, सुख शांतीचा अभाव असेल, मुलांच्या सुखापासून वंचित असतील किंवा संतती वाढत नसेल, पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नसेल, तर या सर्व समस्यांपासून या अमावास्येला मुक्ती मिळू शकते. या दिवशी दान केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून तुमची सगळ्या समस्यांपासून मुक्ती होऊन घरात सुख, शांती, समाधान, संतती सुख मिळते. चला तर जाणून घेऊयात, सोमवती अमावस्येला करावयाचे दान
या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर काळे तीळ दान करावे. हे दान करताना हाताच्या अनामिकेत कुशाचा पवित्र धागा बांधावा. या कुशामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश राहतात असे मानले जाते.
या दिवशी चंद्राशी संबंधित असलेल्या वस्तू म्हणजेच दूध, पांढरे वस्त्र, तांदूळ, चांदी यासारख्या वस्तू तुम्ही दान करू शकता.
दीप अमावस्या म्हणजे काय ?
या अमावास्येला सोमवार येत असल्यामुळे आणि ही दीप अमावस्या असल्यामुळे या दिवशी दिव्यांची आरास करून दिवे प्रज्वलित केले जातात. म्हणून ही दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. तर काहींच्या मते यानंतर श्रावण महिना येत असल्यामुळे मांसाहार करावयाची अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या होय.
या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक कुटुंबामध्ये दिव्यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विविध मंदिरामध्ये, शाळांमध्ये देखील दीप प्रज्वलन केले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रार्थना देखील करतात.
श्रावण महिन्यामध्ये पावसाळा येत असल्यामुळे कांदा, लसूण देखील वर्ज्य मानले जाते. म्हणून काही कुटुंबांमध्ये या दिवशी मांसाहार याचे प्रमाण जास्त असून मद्यपान करणारी देखील या दिवशी जास्त प्रमाणात मध्ये मद्यपान करतात.
दीप अमावस्या माहिती (Deep Amavasya Information)

संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हात पाय धुवून देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणणे. त्यानंतर घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करणे. हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला एक संस्कारच आहे. आताच्या काळामध्ये दिव्यांचे हजारो प्रकार उपलब्ध झालेले आहेत. परंतु आपण देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावतो, जो पवित्र आणि मांगल्याचे प्रतीक समजला जातो. या अमावासाच्या नंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे घरातील असलेले सगळे दिवे समई, निरांजन, लामणगिरी यांना घासून पुसून स्वच्छ करण्याचा हा दिवस असतो.
या दिवशी सर्व दिवे स्वच्छ धुऊन पाटावर मांडून घ्यावे. त्यानंतर पाटापोटी सुंदर रांगोळी काढून फुलांची आरास करावी. त्यानंतर दिव्यांमध्ये तेल वात घालून ते प्रज्वलित करावे. नंतर कणकेचे दिवे म्हणजेच उकडलेले दिवे तयार करावे. या सर्वांना हळद कुंकू वहावे. त्याचप्रमाणे फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करून गोड पदार्थचा नैवेद्य दाखवावा.
सोमवती अमावास्येचा नैवेद्य
या दिवशी अनेक प्रांतात, विभागात, प्रदेशांनी शहरांनी त्याचप्रमाणे समाजामध्ये, कुटुंबामध्ये काही खास पदार्थ करण्याची एक सुंदर अशी खाद्य संस्कृती संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे. प्रत्येक घरांमध्ये त्यांच्या परंपरेनुसार खीर, पुरण, उकडीचे मोदक, उकडीचे दिवे, कणकेचे गोड दिवे, कानवले, दिंड पुरण यासारखे पदार्थ केले जातात. आणि त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी काही ठिकाणी मुलांना ओवाळले देखील जाते. कारण मुले म्हणजे वंशाचे दिवे असे समजले जातात. दिव्यांचे तोंड म्हणजे वाती. म्हणून हे तोंड गोड करण्यासाठी खडीसाखरेच्या खड्याने वाती पुढे सरकवले जातात. आणि त्यानंतर त्या उजळतात. काही जण वातीच्या मुखाशी साखरेचे दाणे ठेवतात. अशाप्रकारे प्रत्येक घरामध्ये आपली परंपरा जपली जाते.
सोमवती अमावास्येला दक्षिण दिशेला दिवा का लावला जातो ?
या अमावास्येला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. या अमावास्येला दिव्यांच्या पूजनाचे अतिशय महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे श्रावणात येणाऱ्या सणांच्या स्वागताची तयारीच असते. या दिवशी कणकेचे दिवे तयार करून दिव्यांची आरास केली जाते. यातील एक दिवा दक्षिण दिशेला लावला जातो. हा दिवा पितरांची पूजा म्हणून ठेवला जातो. या दिव्याची पूजा करून दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यम सदनी केलेल्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते असे समजले जाते.
असे देखील समजले जाते की, हे दिवे गुळाच्या पाण्यात बनवले जातात. आणि ते नैवेद्य म्हणून खाल्ले जातात. तसेच हे दिवे बनवणे सोपे आणि फार खर्चिक असे असत नाहीत. या दिव्यामध्ये साजूक तूप घातले की याची चव आणखी छान लागते. हे दिवे आपल्या पितरांनी खावेत आणि ते तृप्त व्हावेत, यासाठी या कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते.
सोमवती अमावास्येला कणकेचे दिवे कसे बनवाल?
पाव वाटी गूळ घेऊन त्यात गुळ बुडेल एवढे पाणी घेऊन गुळ पूर्णपणे वितळून घ्यावा. त्यानंतर एक वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि थोडे तूप घालून गरजेप्रमाणे गुळाचे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून त्यांना दिवा पणतीचा आकार द्यावा. एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून हे दिवे त्यामध्ये ठेवावेत. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर राहील अशी बेताची चाळणी घेऊन त्यामध्ये ते दिवे ठेवावे व ताट ठेवून पातेले झाकून घ्यावे. आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटे शिजू द्यावे. त्यानंतर दिवे थोडे गार झाल्यावर साजूक तूप घालून खावे. हे दिवे उकडीच्या मोदकाप्रमाणेच उकडावेत. आपण हे दिवे इडलीपात्रातही करू शकतो.
सोमवती अमावास्येची आरती
पंचप्राणांचे नीरांजन करुनी ।
पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ॥
मोहममतेचें समूळ भिजवोनि ।
अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥
जय देव जय देव जय नीरांजना ।
नीरांजन ओंवाळूं तुझिया समचरणां ॥ ध्रु० ॥
ज्वाला ना काजळी दिवस ना राती ।
सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ॥
पूर्णानंदें धालों बोलों मी किती ।
उजळों हे शिवराम भावें ओंवाळिती ॥
जय देव जय देव० ॥
सोमवती अमावस्या कथा (Somvati Amavasya Story)
एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते. या कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि एक मुलगी होती. हळूहळू त्यांची मुलगी मोठी होऊ लागली. या मुलींमध्ये वाढत्या वयाबरोबर स्त्री गुण विकसित होत होते. ही मुलगी अतिशय सुंदर सुसंस्कृत आणि गुणी होती. पण गरिबी असल्यामुळे तिचे लग्न होत नव्हते. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक साधू महाराज आले होते. त्या मुलीच्या सेवेने हे साधू प्रसन्न झाले आणि त्या मुलीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देत म्हणाले की, या मुलीच्या हातात विवाहाची रेषा नाही.
तेव्हा या ब्राह्मणाने आणि त्याच्या बायकोने साधूला उपाय विचारला की, असा कोणता उपाय आहे की, ज्यामुळे आमच्या मुलीचे लग्न होईल. साधू महाराजांनी काही वेळ विचार करून सांगितले की, सोना नावाची एक धोबिण आपल्या मुलासोबत आणि सुने सोबत एका गावामध्ये राहत आहे. तिचे आचार विचार आणि ती संस्कार संपन्न अशी असून पतीशी एकनिष्ठ अशी आहे. तुमची मुलगी त्या धोबिणीची सेवा करेल आणि ती धोबीण तिला ज्यावेळी तिच्या भांगेमध्ये कुंकू लावेल, त्यावेळी हिचा विवाह होईल. तसेच तुमच्या मुलीचे वैधव्य देखील नष्ट होईल. परंतु ती धोबीण कुठेही बाहेर जात नाही.
त्या मुलीच्या आईने आपल्या मुलीला धोबीणीची सेवा करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी सकाळी उठून सोना नावाच्या या धोबिणकडे जाऊन तिच्या घरची साफसफाई आणि बाकी सगळे कामे करून घरी आली. एक दिवस ती सोना धोबिण आपल्या सुनेला सांगते की, तू सकाळी उठून घरातील सगळी कामे करतेस आणि आम्हाला कळत सुद्धा नाही.
त्यावेळी धोबीणीची सून म्हणते की, मला वाटते की, घरची सगळी कामे तुम्ही सकाळी लवकर उठून करत असाल, मी तर दिवसभर आराम करत असते. मग धोबीण आणि तिची सून विचार करू लागली की आपण कामे करत नाही तर मग घरची कामे आपोआप कशी होतात. एक दिवस ती आपल्या घरावर नजर ठेवून होती.
त्यावेळी त्या दोन्हींनी बघितले की, एक मुलगी या अंधाऱ्या घरामध्ये स्वतःचा चेहरा झाकून येते आणि घरातील सगळी कामे करून निघून जाते. ती मुलगी जेव्हा कामे करून निघू लागली, त्यावेळी सोना धोबीण तिच्या पाया पडून तिला विचारू लागली की, तू आहेस तरी कोण? माझ्या घरची कामे तू का करीत आहेस? त्यावेळी त्या मुलीने साधुनी सांगितलेली सगळी गोष्ट तिला सांगितली.
सोना धोबिण पतीनिष्ठ होती. ती त्या मुलीच्या भांगेमध्ये सिंदूर भरायला तयार झाली. सोना धोबिणचा पती हा आजारी असल्यामुळे तिने आपल्या सुनेला आपण येईपर्यंत घरी राहण्यासाठी सांगितले आणि सोना धोबीण त्या मुलीच्या घरी गेली. त्या मुलीच्या भांगेमध्ये कुंकू भरले. त्यामुळे सोना धोबिणचा पती मरण पावला. ज्यावेळी तिला हे समजले, तेव्हा त्या धोबिणीने त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी मिळालेल्या पदार्थांचा पिंपळाच्या झाडाला नैवेद्य दाखवून त्याची पूजा करून १०८ वेळा प्रदक्षिणा घालून त्यानंतर तिने जलग्रहण केले. यामुळे तिचा मेलेला पती पुन्हा जिवंत झाला. तो दिवस सोमवती अमावास्येचा दिवस होता.
प्रश्न
सोमवती अमावस्येचे दुसरे नाव काय आहे?
सोमवती अमावस्येचे दुसरे नाव दीप अमावस्या आणि गटारी अमावस्या आहे.
आपण सोमवती अमावस्या का साजरी करतो?
या दिवशी पितृ पूजा केल्यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळून घरामध्ये सुख शांती आरोग्य नांदते. म्हणून आपण सोमवती अमावस्या साजरी करावी.
सोमवती अमावस्या कधी आहे?
सोमवती अमावस्या १७ जुलै २०२३ सोमवार या दिवशी आहे.
सोमवती अमावस्या शुभ आहे का?
या दिवशी पितृ पूजा केल्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून ही अमावस्या शुभ आहे.
सोमवती अमावस्येची पूजा कशी केली जाते?
या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते, त्याचप्रमाणे पिंडदान केले जाते, तसेच पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालून त्याची विधिवत पूजा केली जाते आणि पक्वान्न नैवेद्य दाखवला जातो.
निष्कर्ष
मित्रांनो, आजच्या या सोमवती अमावस्येच्या लेखांमध्ये आम्ही आपल्याला सोमवती अमावस्येचे महत्त्व त्याचप्रमाणे त्याचा पूजा विधी यासारखी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती, हा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.