तळाशील तोंडवली बीच संपूर्ण माहिती : Tondavali Beach Information In Marathi

तळाशील तोंडवली बीच संपूर्ण माहिती : Tondavali Beach Information In Marathi – परशुराम भूमी म्हणून जिला ओळखले जाते आणि सृष्टीच्या निर्मात्याने मुक्तहस्ताने उधळण केलेली भूमी म्हणजेच आपली कोकण भूमी. याच कोकण भूमीत, डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य तसेच अथांग सागर, रुपेरी वाळूचे समुद्रकिनारे, मोठी वनसंपदा, नद्या, खाडी, डोंगरदऱ्या, हिरवेगार शेतमळे, दूर दूर पसरलेल्या माड बागायती, फळ फळावळ, फुलशेती, मासेमारी आदींनी सुख संपन्न असा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा होय. या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या महत्त्व आहे.

या जिल्ह्यात गडकिल्ले आणि जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन देवळे यामुळे सिंधुदुर्गाच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. अश्या या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश विदेशातील पर्यटकांना भुरळ घालत आहे. म्हणूनच आज आपण मालवण तालुक्यातील अशा एका गावाची भटकंती करणार आहोत तो म्हणजे तोंडवळी – तळाशील.

Table of Contents

तळाशील, तोंडवली बीच संपूर्ण माहिती : Tondavali Beach Information In Marathi

कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला, असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिणभिणता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीकडे. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे.

ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र “वस्त्रहरण‘ कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा अप्रतीम आहे.

Tondavali Beach Information In Marathi

तोंडवलीचे भौगोलिक स्थान

गाव तोंडवली, तळाशील
तालुका मालवण
जिल्हा सिंधुदुर्ग
ओळख पर्यटन स्थळ
व्यवसाय मासेमारी, पर्यटन
आकर्षण किनारा, बॅक वॉटर, वॉटर स्पोर्ट्स
पिन कोड416 601

तळाशील तोंडवली बीच कुठे आहे ?

तोंडवली हे गाव मालवण तालुक्यात कालावल खाडी आणि अरबी समुद्राच्यामध्ये वसलेले आहे. हे मालवणपासून सुमारे 25 किमी आणि कणकवलीपासून 45 किमी अंतरावर आहे.

तोंडवली हे मालवण तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. याचे मुख्यालय ओरोस येथे आहे. ओरोसवरून 28 किलोमीटरच्या अंतरावर, तसेच मालवण पासून वीस किलोमीटर आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई पासून 478 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. तळाशील तोंडवली बीच हे हडी पासून दोन किलोमीटर, सर्जेकोटपासून चार किलोमीटर, आचरे बीच पासून सहा किलोमीटर, कोळंब पासून सात किलोमीटर ही तोंडवळीच्या आसपासची गावी आहेत. तोंडवलीच्या उत्तरेकडे देवगड तालुका आहे तसेच पूर्वेकडे कुडाळ तालुका आहे.

तळाशील तोंडवली बीच नकाशा

तळाशील तोंडवलीचा ऐतिहासिक संदर्भ

कोकणातील काही किल्ले काळाच्या ओघात नष्ट झाले असले तरी या किल्ल्यांची नोंद इतिहासाच्या पानात उरली आहे. इतिहासाच्या या कागदपत्रात डोकावणारे हे किल्ले प्रत्यक्ष होते की नव्हते याबाबत प्रश्नचिन्हच उद्भवते. आपल्या अस्तित्वाबद्दल अशीच काही गुपिते वाढवणारा किल्ला म्हणजे तोंडवलीचा कोट. तोंडवली गावात या किल्ल्याचे अवशेष सापडले नसले तरी गावात असलेल्या वाघेश्वर मंदिराच्या मागील बाजूने एक घडीव दगडात बांधलेली पायऱ्यांची वाट, पाठीमागील दीडशे फूट उंचीच्या टेकडीवर जाते. या वाटेच्या शेवटी टेकडीचे पठार असून तेथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. वाघेश्वर मंदिराच्या अलीकडे रस्त्याशेजारी खोदलेली गुहा आपल्याला पाहायला मिळते. या गुहेत शिरण्यासाठी दोन बाय तीन फूट आकार आकाराचा दरवाजा कोरलेला आहे, पण किल्ल्याच्या अस्तित्वावर मात्र ठोस विधान करता येत नाही.

तळाशील तोंडवली बीच माहिती व्हिडिओ

या गावात चक्क वाघाची पूजा होते

याच गावात चक्क वाघाची पूजा होते. यासाठी गावात वाघ हे व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे आणि गावाच्या ग्रामदैवतेच्या प्रांगणात दोन वाघांची समाधीही आहे. पूर्वी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंग शेजारी वाघ बिबट्या ठाण असायचे पण गावकऱ्यांना त्याचे काहीही वाटत नव्हते. गावाच्या शेती वाड्यातून जंगलातून वाघ, बिबट्या व अन्य जंगली प्राणी बिनधास्त फिरत असतात. तोंडवलीच्या छोटेखानी गावाच्या हद्दीत कोणी घुसखोरी करू नये म्हणून हद्दीवर निशाण फडकताना दिसते. गावाच्या सीमारेषेवर एक स्तंभ उभा केला आहे. या भागाला ना कोणी अभयारण्य ठरवला आहे ना शासनाचा फतवा आहे. परंतु देवाचा आदेश म्हणून अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ या भागात कोणाला शिकारी करू देत नाहीत आणि स्वतःही करत नाहीत.

तळाशील तोंडवली मधील पर्यटन स्थळे

तोंडवली – तळाशील समुद्रकिनारा

तोंडवली ते तळाशीलचा साधारण दोन ते तीन किलोमीटरचा असा सुंदर आणि स्वच्छ फेसाळणाऱ्या लाटांचा समुद्र आपणास पहावयास मिळतो. तळाशील समुद्रकिनाऱ्याच्या पुढे गड नदीच्या पैलतीरावर समोरच सर्जेकोट किल्ला आणि सर्जेकोट बंदर आपल्यास पहावयास मिळते. सर्जेकोट बंदरावर उभ्या असलेल्या बोटी म्हणजे एखादी शाळा भरल्यासारखी वाटते. सर्जेकोट बंदर ते तळाशील बोटीने सुद्धा आपण प्रवास करू शकतो. तेथील स्थानिक आकर्षणे दाखवण्यासाठी पर्यटकांसाठी बोटीची सुविधा असते. तळाशील समुद्राच्या मध्यभागी जे छोटेसे आपल्याला बेट पहावयास मिळते त्याला शिंपला पॉईंट असे म्हणतात. अतिशय सुंदर असा खडकांचा हा भाग जिथे आपण बोटीने जाऊ शकतो तिथले पाणी नितळ आणि अगदी स्वच्छ आहे. सकाळी किंवा संध्याकाळी आपण तेथे जाऊ शकतो. तेथे डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते.

सागर किनाऱ्यावरील सुरुचे बन

तोंडवली गावाच्या सुरुवातीला आपण जेव्हा प्रवेश करतो, त्यावेळी हे सुरूचे बन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू होते. या सुरूच्या बनाचे निसर्ग सौंदर्य पाहताना खूप मजा येते. या सुरूच्या बनामध्ये पक्षांचे आवाज, मनमोहक झाडांच्या सावल्या आणि दोन्ही बाजूचे सुंदर असे जलाशय पाहणे हा अनुभव खूप जबरदस्त आहे.

नक्की वाचा 👉 तारकर्ली – देवबाग संपूर्ण माहिती

श्री देव वाघेश्वर मंदिर

मालवणपासून 24 किलोमीटरच्या अंतरावर तोंडवली तळाशीच्या मध्यभागी एका मोठ्या दगडाच्या गुहेत शिवलिंग आहे. प्रत्येक सोमवारी या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी गावातील आणि अनेक लोक येत असतात. यामागील आख्यायिका आहे की खलाशी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले तेव्हा ते जाळे ओढू शकले नाहीत कारण ते शिवलिंग त्यामध्ये अडकले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना ते शिवलिंग सापडले. त्यांच्या स्वतःच्या योगदानाने त्या स्थानावर मंदिर बांधले.

मंदिराच्या मागील बाजूस वन्य प्राण्यांचे जंगल आहे. लोक म्हणतात की जुन्या दिवसात मंदिरात वाघ येत होते पण त्यांनी मानव जातीला कधीही त्रास दिला नाही म्हणूनच या मंदिराला वाघेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या बाजूलाच एक मोठा खडक आहे, ज्यामध्ये 80 चौरस फूट आकाराची गुहा कोरलेली आहे. या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा महाशिवरात्री सारखे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

पाणखोल जुवा बेट(बॅक वॉटर)

तोंडवली तळाशील या गावाच्या एका बाजूला असलेल्या गडनदीच्या मध्यभागी हे पाणखोल जुवाबेट आहे. या बेटावरती अजूनही 25 ते 30 कुटुंबे राहत आहेत. साधारणतः तळाशील वरून जुवा बेटावर जाण्यासाठी बोटीने पंधरा मिनिटे लागतात. या बेटावरील काही लोक खेकड्याची शेती देखील करतात आणि गंमत म्हणजे या बेटाच्या चारी बाजूला खारे पाणी असले तरी या बेटाच्या मधोमध असणारी विहीर गोड्या पाण्याची आहे. या बेटावरील लोक नारळ सुपारीची झाडे तसेच शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. या बेटावर पहिली ते चौथी अशी प्राथमिक शाळा देखील आहे. त्या बेटाच्या मध्यभागी एक वाडुळेश्वराचे मंदिर देखील आहे.

तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स

तळाशील तोंडवली संगम पॉईंट

तोंडवलीकडून तळाशीलकडे जाताना एका बाजूला गड नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारा यांचा मेळ म्हणजेच एकत्र येण्याचे ठिकाण. याला संगम पॉईंट म्हणतात. इथे वॉटर स्पोर्ट्स होतात.

तळाशील तोंडवली मधील मंदिरे

  • श्री देवदत्त मंदिर
  • श्री देव वाघेश्वर मंदिर
  • श्री देव गोपाळ कृष्ण मंदिर
तळाशील तोंडवली

तळाशील तोंडवली मधील वॉटर ऍक्टिव्हिटीज

सी वॉटर स्पोर्ट्स ही भारतातील अग्रगण्य वॉटरस्पोर्ट्स कंपन्यांपैकी एक आहे जी तुम्हाला तुमच्या सुट्टीचा सर्वोत्तम मार्गाने आनंद लुटण्यास मदत करते. त्या ठिकाणी सर्वोत्तम किमतीत साहसी खेळांचे पॅकेज ऑफर केले जातात. तर या, आणि तुमच्या प्रियजनांसोबत मस्त वेळ घालवा. या वॉटर ऍक्टिव्हिटीज मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
पॅरासीलिंग
जेट्स की
बनाना राईड
स्पीड बोटींग
कयाकिंग
स्कुबा

तोंडावली बीच जवळील इतर फिरण्याची ठिकाणे

मालवण बीच
सिंधुदुर्ग किल्ला
तारकर्ली बीच
देवबाग बीच
भोगवे बीच

तळाशील तोंडवली येथे कसे यायचे?

रस्त्याने तोंडवली बीचवर कसे जायचे?
तोंडवली बीच मुंबई शहरापासून सुमारे 480 किमी अंतरावर आहे आणि रस्त्याने पोहोचता येते. कणकवली हे मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात जवळचे शहर आहे जे मुंबई, पुणे आणि गोवा येथून खाजगी आणि राज्य परिवहन बसने खूप चांगले जोडलेले आहे. कणकवलीहून तुम्ही खाजगी कॅब किंवा ऑटोने तोंडवली बीचवर पोहोचू शकता.

मुंबईहून तोंडवली बीचवर कसे जायचे:
मुंबईहून पनवेल-पोलादपूर-चिपळूण-हातखंबा-लांजा-कणकवली-कसाळ-मालवण-तोंडवली मार्गाने तोंडवलीला पोहोचता येते.

पुण्याहून तोंडवली बीचवर कसे जायचे:
पुणे ते तोंडवली बीच सुमारे 380 किमी आहे आणि पुणे ते सातारा-कोल्हापूर-कणकवली-कसाळ-मालवण-तोंडवलीपर्यंत पोहोचू शकता.

तोंडवली बीच रेल्वेने कसे पोहोचायचे?
तोंडवली समुद्रकिनाऱ्यासाठी सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि कणकवली ही जवळची रेल्वे स्थानके तोंडवलीपासून अनुक्रमे ४५ किमी, ६५ किमी आणि ४० किमी अंतरावर आहेत. रेल्वे स्थानकांवरून, एक ऑटो भाड्याने किंवा तोंडवली बीच किंवा राज्य परिवहन बसने पोहोचू शकता.

तोंडवली बीचवर विमानाने कसे पोहोचायचे
मोपा येथील विमानतळ हे तोंडवली समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे विमानतळ आहे जे सुमारे 100 किमी अंतरावर आहे. गोवा विमानतळावरून पर्यटक बस किंवा खाजगी कॅबने तोंडवलीला पोहोचू शकतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअरपोर्ट – तोंडवली या गावी जाण्यासाठी साधारण चीपी एअरपोर्ट वरून 35 किलोमीटरचे अंतर आहे.

प्रमुख शहरांपासून तोंडवली बीचपर्यंतचे अंतर

मालवण ते तोंडवली बीच अंतर – २० किमी
कणकवली ते तोंडवली बीच अंतर – ४० किमी
सिंधुदुर्ग ते तोंडवली बीच अंतर – ४७ किमी
गोवा ते तोंडवली बीच अंतर – 150 किमी
कोल्हापूर ते तोंडवली बीच अंतर – 150 किमी
सातारा ते तोंडवली बीच अंतर – २६८ किमी
पुणे ते तोंडवली बीच अंतर – ३७९ किमी
मुंबई ते तोंडवली बीच अंतर – ४६६ किमी

तळाशील तोंडवली मधील हॉटेल्स

अथांग सी फेसिंग होम स्टे तोंडवली
अथांग बीच रिसॉर्ट
कॅपसुल बीच रिसॉर्ट
लक्ष्मी कृपा हॉलिडे होमकॅप्सूल रिसॉर्ट
चार्वी होम स्टे
नित्यानंद प्राइड बीच रिसॉर्ट
चैतन्य हॉलिडे होम
किनारा बीच रिसॉर्ट

तळाशील, तोंडवली बीच इतर माहिती

गावाची लोकसंख्या

तोंडवळीची स्थानिक भाषा ही मराठी मालवणी आहे या गावची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार 1741 असून घरांची संख्या 437 आहे तसेच महिलांची लोकसंख्या 45 टक्के आहे आणि या गावातील साक्षरता दर 79 टक्के आहे त्यातील महिला साक्षरता दर 36 टक्के आहे.

गावातील प्रमुख व्यवसाय

तोंडवली तळाशील गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे पण आज आर्थिक दृष्ट्या पर्यटनावर देखील अवलंबून आहे.

FAQ

तोंडवली बीच कुठे आहे?

तोंडवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव असून मालवण पासून 25 किलोमीटर आणि मुंबई पासून 478 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. हडी पासून दोन किलोमीटर, सर्जेकोटपासून चार किलोमीटर, आचरे बीच पासून सहा किलोमीटर, कोळंब पासून सात किलोमीटर ही तोंडवळीच्या आसपासची गावी आहेत. तोंडवलीच्या उत्तरेकडे देवगड तालुका आहे तसेच पूर्वेकडे कुडाळ तालुका आहे. हे मालवणचा सुपुत्र “वस्त्रहरण‘ कार मच्छिंद्र कांबळींचं गाव.

तोंडवली बीचवर विमानाने कसे पोहोचायचे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअरपोर्ट हे जवळचे विमानतळ आहे. तोंडवली या गावी जाण्यासाठी चीपी एअरपोर्ट वरून 35 किलोमीटरचे अंतर आहे.
मोपा येथील विमानतळ हे तोंडवली समुद्रकिनाऱ्यापासून दुसरे जवळचे विमानतळ आहे जे सुमारे 100 किमी अंतरावर आहे. गोवा विमानतळावरून पर्यटक बस किंवा खाजगी कॅबने तोंडवलीला पोहोचू शकतात.

रस्त्याने तोंडवली बीचवर कसे जायचे?

तोंडवली बीच मुंबई शहरापासून सुमारे 480 किमी अंतरावर आणि पुणे ते तोंडवली बीच सुमारे 380 किमी आहे. कणकवली हे मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात जवळचे शहर आहे जे मुंबई, पुणे आणि गोवा येथून खाजगी आणि राज्य परिवहन बसने खूप चांगले जोडलेले आहे. कणकवलीहून तुम्ही खाजगी कॅब किंवा ऑटोने तोंडवली बीचवर पोहोचू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्याला तळाशील, तोंडवली बीच याबद्दल माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती, हा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या देखील आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू.

पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment