केदारनाथ मंदिर माहिती मराठी : Kedarnath Temple Information in Marathi Language – भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे हे उत्तराखंड राज्यामध्ये, बर्फाच्या चादरीने वेढलेले, भगवान शंकराचे एक अनोखे निवासस्थान, संपूर्ण जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. याचा इतिहास, मंदिराबाबत चमत्कार, तसेच कथा याबाबतची माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग, पाहूया केदारनाथ मंदिराची माहिती.
केदारनाथ मंदिर माहिती मराठी : Kedarnath Temple Information in Marathi Language
नाव – | केदारनाथ |
स्थान – | भगवान शंकर |
दुसरे नाव – | बाबा केदारनाथ, पंचकेदार |
ज्योतिर्लिंग – | ५ वे |
कुठे आहे – | उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यात |
निर्मिती – | आठव्या शतकात आदि शंकराचार्य |
नदी – | मंदाकिनी |
पर्वत – | हिमालय |
उंची – | समुद्रसपाटीपासून ३५८३ मीटर |
मंदिराची उंची – | लांबी १८७ फूट, रुंदी ८५ फूट आणि उंची ८५ फूट |
शिवलिंग – | उंची आणि घेर ३.६ मीटर |
मंदिराच्या भिंतींची जाडी – | १२ फूट |
केदारनाथ मंदिर इतिहास (History Of Kedarnath Temple In Marathi)
हे मंदिर कोणी बांधले? याबाबत वेगवेगळी मते मांडली जातात. अगदी महाभारत काळातील पांडव काळापासून ते आदि शंकराचार्य पर्यंत. हे मंदिर जवळपास बाराशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. कदाचित ते आठव्या शतकात बांधले गेले असावे असे आजचे विज्ञान सांगते. १४ व्या शतकापासून १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हे मंदिर पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले असल्याचे संदर्भ आढळून येतात.
जवळपास ४०० वर्षे बर्फाखाली राहून सुद्धा या मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. राहुल सांकृत्यायन यांच्या मते १२ व्या,१३ व्या शतकातील हे मंदिर एक महत्त्वपूर्ण असे तीर्थक्षेत्र राहिले आहे. एका मान्यतेनुसार सध्याचे मंदिर हे आदी शंकराचार्यांनी ८ व्या शतकामध्ये जिर्णोद्धारीत केले होते. जे पांडवांनी बांधलेल्या मंदिराला लागून आहे. आदि शंकराचार्य यांच्या काळापासून दक्षिण भारतातील जंगम समाजातील रावळ आणि पुजारी या मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा करतात.
हे मंदिर अतिशय प्राचीन असे असून काही विद्वान आणि ऋषींच्या मते, हे मंदिर द्वापार युगात बांधले गेले होते. हे मंदिर कत्यूरी शैलीत बांधण्यात आले असून त्याचा निर्माता पांडव राजवंश जनमेजया आहे असे देखील सांगितले जाते.
केदारनाथ मंदिर नकाशा
केदारनाथ मंदिर भूगोल
उत्तराखंड राज्यातील, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, हिमालय पर्वतावर, मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे हिंदूंचे प्रसिद्ध मंदिर असून भगवान शंकराला समर्पित आहे. चारधाम यात्रेमधील एक असणारे असे पवित्र तीर्थक्षेत्र देखील आहे. साधारणपणे एप्रिल ते नोव्हेंबरच्या दरम्याने हे मंदिर दर्शनासाठी उघडे असते. त्या पुढील सहा महिने हे मंदिर बर्फाच्छादित प्रदेशात असल्यामुळे बंद केले जाते.
पांडवांचे नातू महाराज जनमेजय यांनी हे मंदिर बांधले असून याचा जीर्णोद्धार आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी केला. चौदाव्या शतकापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत म्हणजे ४०० वर्ष हे मंदिर बर्फाखाली पूर्णपणे गाडले गेले होते. ज्यावेळी हे मंदिर बर्फातून बाहेर निघाले त्यावेळी या मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्याचप्रमाणे २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये देखील या मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही.
दर्शनासाठी हे मंदिर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत उघडे असते. या मंदिराच्या आजूबाजूला पाच नद्यांचा संगम आपल्याला पहावयास मिळतो. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी गौरी कुंड पासून साधारणपणे १६ किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो किंवा प्राण्यांची सवारी. आता हेलिकॉप्टरची देखील सुविधा उपलब्ध आहे. असे समजले जाते की, या यात्रेने मनुष्याची सगळी पापे धुऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच भगवान शंकर यांचा आशीर्वाद देखील मिळतो.
🙏दहावे ज्योतिर्लिंग – श्री त्र्यंबकेश्वर 🙏
केदारनाथ नावाचा अर्थ
असे म्हटले जाते की, भगवान शंकर पाच वेगवेगळ्या वेषात निघून गुप्तकाशीमध्ये प्रकट झाले होते. मध्य महेश्वरमध्ये नाभी, आणि पोट केदारनाथ मध्ये, त्यांचे नितंब रुद्रनाथ, तुंगनाथ मध्ये त्यांचे दात आणि कल्पेश्वर मध्ये त्यांचे केस म्हणूनच या पाच ठिकाणी प्रकट झाल्यामुळे त्यांना “पंच केदार” हे नाव मिळाले.
केदारनाथ या शब्दाचा अर्थ “क्षेत्राचा स्वामी”. केदार हे भगवान शंकरांचे एक नाव आहे. ज्याचा अर्थ “संरक्षक” असा देखील होतो. म्हणून या ठिकाणच्या संरक्षकाला “केदारनाथ” असे नाव देण्यात आले.
केदारनाथ मंदिराबाबत महत्वपूर्ण गोष्टी
केदारनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे असणारे उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या शिखरावर आहे. चारधाम यात्रेपैकी एक असे असणारे हे पवित्र तीर्थस्थान देखील आहे. या मंदिराबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे –
- १. एका आख्यायिकेनुसार जेव्हा पांडव स्वर्गात होते त्यावेळी भगवान शंकर एका वृषभाच्या रूपात प्रकट झाले. नंतर पांडवांना दर्शन देऊन पृथ्वीमध्ये विलीन झाले. परंतु याआधी भिमाने त्या वृषभाची शेपटी पूर्णपणे विरघळण्यापूर्वीच पकडले. भीमाने हे काम ज्या ठिकाणी केले ते केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध झाले.
- २. केदारनाथ आणि रामेश्वर मंदिर एका ओळीमध्ये बांधली गेली आहेत. असे मानले जाते. या दोन मंदिरांच्यामध्ये कालेश्वर तेलंगणा, श्री कालहस्ती मंदिर आंध्र प्रदेश, एकंबरेश्वर मंदिर तामिळनाडू, अरुणाचल मंदिर तामिळनाडू, थिलाई नटराज मंदिर चिदंबरम आणि रामेश्वरम तामिळनाडू अशीही शिवलिंगे पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.
- ३. १६ जून २०१३ ला आलेल्या महापुरामुळे अनेक मोठ्या इमारती आणि आजूबाजूचा परिसर याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पाण्यामध्ये वाहून गेले होते. परंतु केदारनाथ मंदिराला एकही ओरखडा आलेला नाही.
- ४.एक मोठा खडक पाण्याच्या प्रवाहामध्ये मागच्या टेकडीवरून खाली कोसळला आणि अचानक मंदिराच्या मागे येऊन थांबला हा खडक थांबल्यामुळे पुराचे पाणी हे दोन भागांमध्ये विभागले गेले आणि हे मंदिर सुरक्षित झाले. या महापुरामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
- ५.या मंदिराच्या एका बाजूला जवळपास १२००० फूट उंच केदार पर्वत, दुसऱ्या बाजूला २१६०० फूट उंच खारकुंड आणि तिसऱ्या बाजूला २२७०० फूट उंच भरत कुंड असे पर्वत आहेत. तसेच मंदाकिनी, मधुगंगा, क्षीरगंगा, सरस्वती आणि स्वर्ण गौरी या पाच नद्यांचा संगमही या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतो.
- ६. केदार पर्वतामध्ये नर आणि नारायण असे दोन पर्वत आहे. विष्णूच्या२४ अवतारांपैकी एक असणारे हे नर आणि नारायण ऋषींची ही तपोभूमी आहे.
- ७. पुराण काळातील भाकितानुसार असे मानले जाते की, ज्या दिवशी नर आणि नारायण पर्वत एकत्र येतील त्या दिवशी बद्रीनाथ चा मार्ग हा पूर्णपणे बंद होऊन भविष्यात “भविष्य बद्री” नावाचे एक नवीन तीर्थक्षेत्र उदयास येईल असे सांगितले जाते. परंतु याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही.
- ८. हे मंदिर तपकिरी रंगाच्या कापलेल्या मोठ्या दगडांना जोडून बांधले गेले आहे. एवढ्या उंचीवर इतके वजनदार दगड आणून कोरीव मंदिर कसे बांधले गेले असेल? याचे आश्चर्य वाटते. कारण हे मंदिर कसे बांधले असेल हेही एक रहस्यच आहे.
- ९. केदारनाथ आणि पशुपतिनाथ ही दोन मंदिरे मिळून शिवलिंग बनते. केदारनाथ मंदिर जे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे त्याला अर्ध ज्योतिर्लिंग असे म्हणतात. नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिराचा समावेश होऊन ते पूर्ण झाले आहे. येथील हे मंदिर जनमेजयाने बांधले आणि आदी शंकराचार्यांनी जिर्णोद्धार केला.
- १०. हे मंदिर बर्फाच्छादित प्रदेशात असल्यामुळे सहा महिने बंद केले जाते. दिवाळीच्या दरम्याने हे मंदिर बंद केले जाते. मंदिर बंद करताना या ठिकाणी दिवा लावला जातो. सहा महिन्यानंतर हे मंदिर ज्यावेळी एप्रिल मे च्या दरम्याने उघडले जाते, त्यावेळी सुद्धा हा दिवा अखंड तेवत असतो. तसेच हे मंदिर जसेच्या तसे स्वच्छ दिसून येते.
- ११. जवळपास ४०० वर्ष हे मंदिर बर्फाखाली गाडले गेले होते. सद्यस्थितीत असलेले हे मंदिर पांडवांच्या काळामध्ये बनवले गेले होते. ज्याचा जिर्णोद्धार आठव्या शतकामध्ये आदि शंकराचार्यांनी केला होता. हे मंदिर ज्यावेळी बर्फा मधून बाहेर आले, त्यावेळी त्या मंदिराला एकही ओरखडा आलेला नव्हता. शास्त्रज्ञांच्या मतानुसार आजही या मंदिराच्या भिंतींवर, दगडांवर असलेल्या चिन्हांनी दिसून येते.
केदारनाथ मंदिराचे नियम
- तेरा वर्षाखालील मुलांना या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही.
- गर्भवती महिलांना सहा आठवड्यांपेक्षा जास्त झालेल्या महिलांना परवानगी दिली जात नाही.
- ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.
- या ठिकाणी कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
- कोणतेही मांसाहारी पदार्थ आपल्याबरोबर या ठिकाणी येण्यासाठी बाळगू नये.
- मंदिर प्रशासनामार्फत दिलेले नियम पाळणे अत्यावश्यक आहे.
केदारनाथ मंदिर परिसर
मंदिराच्या परिसरामध्ये द्रौपदीसह पाच पांडवांच्या भव्य मूर्ती दिसून येतात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची एक विशाल मूर्ती स्थापन केलेली आहे. तसेच दक्षिण बाजूला एका टेकडीवर भैरवनाथाचे सुंदर मंदिर देखील आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्ती आढळून येतात. केदारनाथची शृंगार मूर्ती ही पाचमुखी असून ती नेहमी वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवलेली असते.
या मूर्ती व्यतिरिक्त आणखी १५ देवतांची ही या मंदिरामध्ये स्थापना केली गेली आहे. मंदिराच्या मागील भागात एक कुंड आहे. त्याला अमृतकुंड असे म्हणतात. या अमृतकुंडांमध्ये दोन शिवलिंग आहेत, हंस कुंड आणि रेता कुंड. रेता कुंडच्या ठिकाणी ईशानेश्वर महादेवाची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरासमोर एका छोट्या मंदिरामध्ये उडताकुंड आहे. या कुंडात आचमन घेण्याची प्रथा आहे.
मंदिराच्या पाठीमागे गोड पाण्याचे कुंड देखील आहे. ज्याचे पाणी भावीक पिऊ शकतात. या केदार पर्वतामध्ये पंचकेदार मंदिरे आहेत.
- 🙏पाचवे ज्योतिर्लिंग : श्री परळी वैजनाथ 🙏
- 🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏
- 🙏सहावे ज्योतिर्लिंग : श्री भीमाशंकर 🙏
- 🙏बारावे ज्योतिर्लिंग – श्री घृष्णेश्वर 🙏
केदारनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व
भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे असणारे हे केदारनाथ चार धाम यात्रा पैकी एक असे पवित्र तीर्थक्षेत्र देखील आहे. त्यामुळे या देवाची यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र अशी यात्रा मानली जाते. या ठिकाणी येणारे भावीक एक कठोर ट्रेक देखील करतात. जो गौरीकुंड ते केदारनाथ यादरम्याने जवळपास १६ किलोमीटरचा आहे. या तीर्थयात्रेमुळे पापांचा नाश होऊन आपल्या मोक्ष प्राप्त होतो. आणि भगवान शंकराचे आशीर्वादही मिळतात. म्हणून या मंदिराला असे वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
केदारनाथ मंदिराचे स्वरूप
हे मंदिर हिमालय पर्वत आणि पाच नद्यांच्या संगमाने वेढलेले असे आहे. या मंदिराच्या एका बाजूला जवळपास बावीस हजार उंचीचा केदार पर्वत आहे आणि दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सहाशे फूट उंच खारकुंड पर्वत तसेच बावीस हजार सातशे फूट उंच भरत कुंड पर्वत आहेत. या मंदिराभोवती ज्या पाच नद्यांचा संगम होतो, त्या मंदाकिनी, स्वर्ण गौरी, सरस्वती, चिरगंगा आणि मधुगंगा यांचा समावेश होतो. त्यापैकी मंदाकिनी नदी ही मंदिराच्या बाजूने वाहते.
हे मंदिर हिमालयात असल्यामुळे तेथील बर्फामुळे आणि आजूबाजूला असणाऱ्या नद्यांमुळे या ठिकाणी ढगफुटी तसेच पूर येण्याचा धोका कायमच संभवत असतो.
भगवान शंकर यांचे वृषभ रूप
एका आख्यायिकेनुसार भगवान शंकर यांचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले होते. परंतु भगवान शंकर आणि त्यांना दर्शन देण्यास नकार दिला. आणि पांडवांना समजू नये म्हणून त्यांनी वृषभ रूप धारण केले आणि प्राण्यांच्या एका कळपामध्ये जाऊन सहभागी झाले. पांडवांमधील भीमाला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्याने विशालकाय रूप धारण केले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले बाकीचे प्राणी भिमाच्या दोन पायांमधून निघून गेले मात्र भगवान शंकर तेथेच राहिले तेव्हा भिमाने या वृषभ रूपाला त्याच्या पाठीवरील वाशिंडाला धरले.
अशाप्रकारे पांडवांचा हा दृढ संकल्प पाहून भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिले. आणि त्यांच्या सर्व पापातून त्यांना मुक्ती मिळवून दिली. हेच वृषबाच्या पाठीवरील वाशिंडाच्या आकारात असलेल्या शिवलिंगाची या मंदिरामध्ये पूजा केली जाते.
केदारनाथ मंदिराबाबत रहस्य
- हे मंदिर सहा महिने उघडे तर सहा महिने बंद असते.
- हे मंदिर उघडण्याची तारीख ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अवलंबून असते आणि ती तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केली जाते.
- हे मंदिर जवळपास ४०० वर्षे बर्फामध्ये गाडले गेले होते. ज्यावेळी हे मंदिर बाहेर काढले त्यावेळी ते पूर्णपणे सुरक्षित असे दिसून आले.
- या मंदिराच्या सभोवताली पाच नद्यांचा म्हणजेच मंदाकिनी, स्वर्ण गौरी, चिरगंगा, मधुगंगा, सरस्वती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे याला पंच केदार म्हणून देखील ओळखले जाते.
- गौरीकुंड हे केदारनाथ मंदिर परिसरातील शेवटचा थांबा आहे.
- गौरी कुंडहून केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास १६ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो.
- हे मंदिर सहा महिने बंद असल्यामुळे दरवाजे बंद करताना मंदिरामध्ये एक दिवा लावला जातो तो सहा महिने मंदिराच्या आजूबाजूला कोणी नसताना सुद्धा सतत तेवत असतो.
- असे म्हटले जाते की, मंदिर बंद असले तरी ज्यावेळी मंदिर उघडले जाते त्यावेळी मंदिरातील स्वच्छता ही तशीच असते.
केदारनाथ मंदिराची वास्तुकला
तपकिरी रंगाच्या दगडांच्या भक्कम आणि मोठ्या दगडांनी बांधले गेलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि नयनरम्य असे आहे. सहा फूट उंचीच्या चबुतरावर बांधण्यात आलेल्या या मंदिराची उंची जवळपास ८५ फूट लांबी १८७ फूट आणि रुंदी ८५ फूट आहे. तसेच मंदिराच्या भिंतींची जाडी साधारणपणे १२ फूट आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण असलेले शिवलिंग हे दंडगोलाकार असून त्याचा घेर आणि उंची ३.६ मीटर अशी आहे.
मंदिरासमोर असलेल्या सभामंडपामध्ये पार्वती मातेची आणि पाच पांडवांच्या मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर भगवान कृष्ण, पांडव, द्रौपदी, नंदी, वीरभद्र तसेच इतर देवीदेवतांच्या देखील मूर्ती आहेत. या मंदिराच्या दरवाजासमोर नंदीची मोठी मूर्ती विराजमान आहे.
हे मंदिर अद्वितीय वास्तुकलेसाठी ओळखले जाते. ज्यामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय शैलीचे मिश्रण आपल्याच पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर हिंदू पौराणिक कथा मधील विविध दृश्य दाखविण्यात आलेली आहेत. या मंदिरात उंच आणि टोकदार असे शिखर दिसून येते. तसेच या मंदिराचे प्रवेशद्वार हे सुंदर कमानीने सजवलेले आहे. ज्याला खांबांचा आधार आहे.
या मंदिराचा आतला भाग देखील तितकाच महत्वपूर्ण असा आहे. एक मोठा हॉल आहे, ज्यामध्ये मुख्य देवता भगवान शंकर दिसून येतात. या सभा मंडपाच्या भिंतींमध्ये अतिशय उत्कृष्टपणे कोरीव काम आणि चित्रांनी सजवले गेलेले आहेत. गर्भगृहामध्ये भगवान शंकरांचे शिवलिंग आहे जे चांदीच्या छताने झाकलेले आहे. हे मंदिर म्हणजे भारतीय स्थापत्य कलेचा एक अद्भुत असा नमुना असल्यामुळे या मंदिरामध्ये संपूर्ण जगभरातून भाविक येत असतात.
केदारनाथ मंदिराविषयी मनोरंजक माहिती
- या मंदिरामध्ये मैसूरचे जंगम ब्राह्मण केदारनाथ ची पूजा करू शकतात.
- केदारनाथ मंदिर हे सहा फूट उंचीच्या चौकोनी चबुतरावर बांधले गेले आहे.
- या मंदिरामध्ये भक्तांना दुरूनच भगवान शंकराचे दर्शन होते.
- २०१३ साली आलेल्या महापुरामध्ये या मंदिराला एक ओरखडा देखील आला नव्हता.
- हे मंदिर किती वर्षे जुने आहे? याचा ऐतिहासिक पुरावा कोणाकडेच नाही.
- शास्त्रज्ञांच्या मते हे मंदिर जवळपास ४०० वर्षे बर्फाखाली गाडले गेले होते. तरीही या मंदिराला काहीही झालेले नाही.
- या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गौरीकुंड पासून जवळपास १६ किलोमीटरचा पायी किंवा प्राण्यांच्या सवारी तसेच हेलिकॉप्टर द्वारे पोहोचावे लागते.
केदारनाथ यात्रा : Kedarnath Yatra
ही यात्रा गौरीकुंड पासून सुरू होते आणि साधारणपणे १६ किलोमीटरचा प्रवास पार करून मंदिरापर्यंत पोहोचता येते. हा यात्रेचा प्रवास करताना तुमचे सामान तुम्ही स्वतः घेऊन जाऊ शकता किंवा यासाठी प्राणी सवारी, पालखी किंवा आता हेलिकॉप्टरची देखील सोय करण्यात आलेली आहे, पण त्यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम आकारली जाते.
ही यात्रा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे सहा ते आठ तास लागू शकतात. हा प्रवास करताना आजूबाजूला नद्या, तलाव, निसर्गरम्य वातावरण तसेच बर्फाच्छादित प्रदेश यामुळे आपल्याला ही यात्रा एक वेगळाच आनंद देऊन जाते.
केदारनाथ १६ किलोमीटरचा प्रवास
गौरीकुंड पासून साधारणपणे १६ किलोमीटरच्या प्रवास हा तुम्ही पायी करू शकता. त्याचप्रमाणे प्राणी सवारी आणि हेलिकॉप्टरची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे.
केदारनाथ मंदिर हेलिकॉप्टर प्रवास
केदारनाथ मंदिरापर्यंतचा १६ किलोमीटरचा प्रवास हा तुम्हाला हेलिकॉप्टरने करायचा असल्यास या ठिकाणी हेलिकॉप्टर चे रजिस्ट्रेशन करावे लागते. ऑनलाईन किंवा ऑफलाइन या दोन्ही मार्गांनी रजिस्ट्रेशन करू शकतो.
यात्रेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन
आपल्याला हेलिकॉप्टरचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर जाऊन केदारनाथ मंदिराचे रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच उत्तराखंड सरकार द्वारा सुरू केलेल्या पोर्टल मार्फत देखील रजिस्ट्रेशन करू शकता.
यात्रेचे ऑफलाइन रजिस्ट्रेशन
केदारनाथ मंदिरापर्यंत हेलिकॉप्टरने जायचे असल्यास या ठिकाणी आपण ऑफलाइन रजिस्ट्रेशन देखील करू शकतो. उत्तराखंड मधील चार धाम यात्रेच्या मार्गांमध्ये अनेक काउंटर या ठिकाणी दिसून येतात ज्या ठिकाणी जाऊन आपण ऑफलाईन रजिस्टर करू शकतो.
या हेलिकॉप्टर सेवेसाठी ५ हजार पासून ७ हजार पर्यंतचा पास आपल्याला मिळू शकतो.
पालखी आणि प्राणी सवारी –
प्रती व्यक्ति अंदाजे ४०००/- ते ५०००/-
केदारनाथ यात्रेसाठी घ्यावयाची काळजी
- उत्तराखंड मधील हवामान हे अतिशय थंड असल्यामुळे केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी उबदार कपडे घेऊन जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरामदायक शूज देखील घालणे अतिशय महत्त्वाचे आहे.
- गौरीकुंड पासून केदारनाथ मंदिरापर्यंतचा हा १६ किलोमीटरचा प्रवास ट्रेकिंगचा असल्यामुळे प्रथम डॉक्टरांचा आरोग्य विषयक सल्ला घेणे आवश्यक आहे.
- आपल्याबरोबर प्रथमोपचार किट आणि औषधे सोबत ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
- पाणी आणि खाण्याच्या काही वस्तू आपल्याबरोबर घेऊन जाणे महत्त्वाचे राहील.
- या ठिकाणी यात्रेला जाताना स्वेटर, हिवाळ्यातील टोप्या, जॅकेट, स्पोर्ट शूज, हात मौजे आपल्या जवळ बाळगले पाहिजे.
- या यात्रेदरम्यान या ठिकाणी मोबाईल ला कधी कधी नेटवर्क मिळत नाही तसेच वीजही या ठिकाणी बऱ्याच अंशी जात येत असते. त्यामुळे आपल्या सोबत बॅटरी आणि पावर बॅंक सोबत ठेवणे अतिशय योग्य आहे.
- आपल्याजवळ एक डायरी ठेवावी ज्यामध्ये जवळचे पोलीस स्टेशन, मित्र, कुटुंबातील व्यक्तींचे फोन नंबर असतील.
- हा ट्रेक १६ किलोमीटरचा असल्यामुळे या यात्रेदरम्यान विश्रांती घेणे आवश्यक आहे. या विश्रांती दरम्याने जेवण करणे तसेच एनर्जी येणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवणार नाही.
- यात्रेला निघण्याआधी महिनाभर आपल्या शरीराचा व्यायाम करणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला नंतर त्रास होणार नाही.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यात्रेदरम्यान आपल्याकडे रोख रक्कम ठेवणे आवश्यक आहे कारण या ठिकाणी कोणतेही डेबिट क्रेडिट, कार्ड चालत नाहीत.
केदारनाथ मंदिरामध्ये भेट देण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क
केदारनाथ मंदिर हे चार धाम यात्रेपैकी एक असे मानले जाणारे प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या चारधाम यात्रेमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांचा समावेश होतो. बर्फाच्छादित असलेल्या या प्रदेशांमध्ये हे हिंदू मंदिर जवळपास सहा महिने बंद असते. कारण हे उंच शिखरावर असून याच्या आजूबाजूला नद्यांचा संगम असल्यामुळे या ठिकाणी पूर, नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी जाताना साधारणपणे एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंतचा काळ योग्य समजला जातो.
या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. परंतु आपल्याला काही विधी करायचे असल्यास त्याची रक्कम आपल्याला द्यावी लागते.
केदारनाथ मंदिरात राबवले जाणारे उत्सव
केदारनाथ मंदिरामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील काही प्रमुख सणांची माहिती खालील प्रमाणे –
समाधी पूजा
केदारनाथ हे मंदिर सहा महिने बंद असते. तर सहा महिने चालू असते. ज्या दिवशी केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद केले जातात. त्या दिवशी ही पूजा केली जाते.
श्रावणी अन्नकुट मेळा
रक्षाबंधनच्या एक दिवस आधी या मंदिरामध्ये जत्रा भरवली जाते.
बद्री केदार उत्सव
हा उत्सव साधारणपणे जून महिन्यात साजरा केला जातो.
दिवाळी
या मंदिरामध्ये दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा अतिशय धामधुमीत साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर रंगीबेरंगी फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने सजविला जातो. या मंदिरामध्ये या दिवशी साधारणपणे सहा हजार पेक्षा जास्त दिव्यांनी मंदिर परिसर उजळला जातो.
केदारनाथ मंदिर उघडणे आणि बंद करण्याच्या वेळा
साधारणपणे एप्रिल ते मे च्या दरम्याने हे मंदिर उघडले जाते. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर च्या दरम्यान हे मंदिर सहा महिन्यांसाठी बंद केले जाते. मंदिर उघडण्याची वेळ ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अवलंबून असते आणि ती महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केले जाते. ओंकारेश्वर मंदिराचे पुजारी हिंदू कॅलेंडरच्या पंचांगाप्रमाणे या मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करतात.
केदारनाथ मंदिर दर्शन आणि आरतीच्या वेळा
केदारनाथ मंदिर हे सकाळी चार वाजता उघडते आणि रात्री साडेआठ वाजता बंद केले जाते.
- पहाटे – ०४.०० वाजता महा अभिषेक आणि आरती.
- दर्शन – सकाळी ०६.०० ते दुपारी ०१.०० आणि संध्याकाळी ०५.०० ते ०७.३०
- विशेष पूजा – दुपारी ०१.०० ते ०२.००
- शृंगार आरती – संध्याकाळी ०७.००
- शयन आरती – संध्याकाळी ०७.३० ते रात्री ०८.३०
- मंदिर बंद – रात्री ८.३०
केदारनाथ मंदिर पूजा विधि
या मंदिरामध्ये अनेक प्रकारच्या पूजा विधी केल्या जातात.
- पहाटेची पूजा
- महाभिषेक पूजा
- अभिषेक
- लघु रुद्राभिषेक
- अष्टोपचार पूजा
- गणेश पूजा
- श्री भैरव पूजा
- शिव सहस्रनाम
- षोडशोपचार पूजा
- संपूर्ण आरती
- पार्वती पूजा
- पांडवपूजा
केदारनाथ मंत्र
- महाद्रिपार्श्वेच तते रमंतं समपूज्यमानं सत्तम मुनिंद्राय:।
- सुरसुरैर्यक्षमहोर्गदायिः केदार्मिशां शिवमकेमिडे ॥
केदारनाथ मंत्राचा अर्थ
हिमालयाजवळील मंदाकिनीच्या काठी वसलेल्या आणि ऋषीमुनी ज्यांची सदैव पूजा करतात असे हे भगवान शंकर अद्वितीय आहेत. कल्याणकारी केदारनाथ नावाच्या शिवाला मी नमस्कार करतो.
केदारनाथ मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे?
- उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी नदीकाठी आणि हिमालय पर्वतावर केदारनाथ मंदिर आहे.
- उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित असल्यामुळे अनेक राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेलेला आहे.
विमान –
केदारनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ हे डेहराडून जॉली ग्रेट विमानतळ आहे. या विमानतळापासून हे मंदिर जवळपास २४० किलोमीटर लांब आहे. या विमानतळावरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी बस किंवा टॅक्सीने जाऊ शकता.
ट्रेन –
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेन मार्गे हरिद्वार पर्यंत पोहोचू शकता. हरिद्वार हून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा रस्त्याने म्हणजेच बस किंवा टॅक्सीने जावे लागते. ऋषिकेश रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत जवळपास २२८ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करावा लागेल.
बस –
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बस ने जाण्याचा विचार करत असाल तर दिल्ली मधून हरिद्वार आणि हरिद्वार मधून रुद्रप्रयाग तसेच रुद्रप्रयागून केदारनाथ असा बस प्रवास करावा लागेल. तसेच हरिद्वार किंवा ऋषिकेशहून सुद्धा बस मार्गे या ठिकाणी जाऊ शकता. ऋषिकेशहून केदारनाथ मंदिराचा रस्ता हा जवळपास २३२ किलोमीटर इतका आहे.
हरिद्वार पासून केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास २४७ किलोमीटरचे अंतर आहे. बस ने तुम्ही गौरीकुंड या ठिकाणापर्यंत येऊ शकता. गौरी कुंड पासून जवळपास १६ किलोमीटरचा रस्ता आपल्याला पायी किंवा घोडे सवारी किंवा खेचर सवारी तसेच हेलिकॉप्टरने मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
- ऋषिकेश ते देवप्रयाग – ७१ किमी
- देवप्रयाग ते श्रीनगर – ३५ किमी
- श्रीनगर ते रुद्रप्रयाग – ३२ किमी
- रुद्रप्रयाग ते गुप्तकाशी – ४५ किमी
- गुप्तकाशी ते सोनप्रयाग – ३१ किमी
- सोनप्रयाग ते गौरीकुंड – ५ किमी
- गौरीकुंड ते केदारनाथ – १६ किमी
मुख्य शहर ते केदारनाथ अंतर
- दिल्ली ते केदारनाथ मंदिर अंतर ४६० किलोमीटर
- जयपूर ते केदारनाथ मंदिर अंतर ७३० किलोमीटर
- लखनऊ ते केदारनाथ मंदिर अंतर ७५५ किलोमीटर
- मुरादाबाद ते केदारनाथ मंदिर अंतर ३१६ किलोमीटर
- शिमला ते केदारनाथ मंदिर अंतर ४९३ किलोमीटर
- मुंबई ते केदारनाथ मंदिर अंतर १९१२ किलोमीटर
- पुणे ते केदारनाथ मंदिर अंतर १९१३ किलोमीटर
केदारनाथ मंदिराजवळील पर्यटन स्थळे
या मंदिराच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. ही ठिकाणे निसर्गरम्य तर आहेत पण येणाऱ्या भाविकांना धार्मिक प्रकारचा आनंद देऊन जातात. यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –
१. सोनप्रयाग
प्रयाग म्हणजे संगम. वासुकी आणि मंदाकिनी या दोन पवित्र नद्यांचा संगम या ठिकाणी होतो म्हणून याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचे स्थान म्हणून देखील याला ओळखले जाते. असे म्हटले जाते की, या दोन प्रयाग मध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. केदारनाथ मंदिरापासून जवळपास १८ किलोमीटरच्या अंतरावर हे सोनप्रयाग आहे.
२. वासुकी ताल
या मंदिरापासून आठ किलोमीटरच्या अंतरावर जवळपास ४१३५ मीटर उंचीवर असलेले हे वासूकी ताल म्हणजेच तलाव आहे. येथे येणाऱ्या ट्रेकर्स साठी सुद्धा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले दिसून येतात. त्यापैकीच एक असणारे ब्रह्म कमळ हे अतिशय लोकप्रिय आहे. हिवाळ्यामध्ये हा तलाव पूर्णपणे बर्फाने गोठलेला असतो.
३. शंकराचार्यांची समाधी
हिंदू धर्माच्या अनेक विचारसरणींना एकत्र आणण्याचे आणि त्याचा पाया निर्माण करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, ते म्हणजे धर्मशास्त्रज्ञ आणि विचारवंत आदी शंकराचार्य हे आहेत. यांनी आठव्या शतकामध्ये केदारनाथ मंदिराची निर्मिती केल्याचे आढळून येते. त्यांची ही समाधी या परिसरातील अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या अश्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो भाविक येत असतात.
४. गौरीकुंड
केदारनाथ पासून १४ किलोमीटर आणि सोनप्रयाग पासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले, या मंदिराच्या मार्गावरील गौरीकुंड हे हिंदूंचे प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिर देखील आहे जे पार्वती मातेला समर्पित आहे. केदारनाथ मंदिरामध्ये येणारे भावीक कॅम्प म्हणून गौरीकुंडला राहतात.
५. चोर बारी ताल / गांधी सरोवर
केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या पर्वतांच्या विलोभनीय दृश्यांमध्ये हे तलाव ओळखले जाते. यामधील पाणी स्फटिका सारखे स्वच्छ असे दिसून येते. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या काही असतील अस्थि या तलावामध्ये विखुरल्या गेल्यामुळे या तलावाचे नाव गांधी सरोवर असे ठेवण्यात आले. या तलावापर्यंत जाण्यासाठी सतरा किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. मंदिरापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर हा तलाव आहे.
६. अगस्त्य मुनी
मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे शहर, जवळपास एक हजार मीटर उंचीवर आहे. अगस्त्य मुनी यांच्या नावावरून या शहराचे नाव पडले आहे. बैसाखीच्या उत्सवादरम्यान या ठिकाणी जत्रा आयोजित केली जाते.
७. उखीमठ
मंदिरापासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेले हे ओंकारेश्वराचे मंदिर आहे. ज्यावेळी केदारनाथ मंदिर बंद होते, त्यानंतर ओंकारेश्वर मंदिरातच पूजा सेवा केल्या जातात.
८. गुप्तकाशी
गुप्तकाशी हे रुद्रप्रयाग मधील मुख्य शहरांपैकी एक आहे. केदारनाथ मंदिराच्या मार्गावर असलेल्या स्थानामुळे या ठिकाणी राहण्याच्या सोयी आपल्याला उपलब्ध होतात. मंदिरापासून ४७ किलोमीटर अंतरावर असलेले हे गुप्तकाशी १३१९ मीटर उंचीवर वसलेले असून बर्फाच्छादित शिखरांनी वेढले गेले आहे.
९. भैरवनाथ मंदिर
केदारनाथ मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेले हे मंदिर दक्षिण दिशेला दिसून येते. भगवान भैरव म्हणजेच भगवान शिव आहे. त्यामुळे या मंदिराला देखील महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मंदिरामध्ये असलेल्या देवाला क्षेत्रपाल म्हणून देखील ओळखले जाते.
१०. श्री युगी नारायण
हे प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र असून केदारनाथ मंदिरापासून जवळपास १५ किलोमीटरच्या अंतरावर तसेच १९८० मीटर उंचीवर वसलेले आहे. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. या मंदिराची रचना ही बद्रीनाथ मंदिराच्या स्थापत्य कलेशी जुळून येते.
११. देवरिया ताल
रुद्रप्रयापासून ५६ किलोमीटर आणि केदारनाथ मंदिरापासून ७३ किलोमीटरच्या अंतरावर हा तलाव आहे. या ठिकाणाला ट्रेकिंग साठी सुद्धा ओळखले जाते.
१२. तुंगनाथ मंदिर
उत्तराखंड मधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर ट्रेकिंग साठी सुद्धा लोकप्रिय असे ठिकाण आहे. केदारनाथ मंदिरापासून ८८ किलोमीटर आणि चोपटापासून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थापन केलेले आहे. एक फूट उंच असलेल्या भगवान शंकराचे प्रतिनिधित्व करणारा मूल्यवान असा काळा दगड, गर्भगृहात पुजला जातो.
१३. रुद्रप्रयाग
भगवान शंकराच्या रुद्र अवतारामुळे या ठिकाणाला रुद्रप्रयाग हे नाव पडले आहे. बर्फाच्छादित पर्वत, वाहणाऱ्या नद्या, झरे आणि तलावांनी वेढलेला हा असा परिसर आहे.
१४. चोपटा
मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड मधील हे ठिकाण केदारनाथ मंदिरापासून जवळपास ८५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच्या डावीकडे केदारनाथ आणि मध्यमेश्वरची तीर्थे आहेत. तसेच उजवीकडे रुद्रनाथ आणि कल्पेश्वराची तीर्थे आहेत. त्याच्या वरच्या भागाला तुंगनाथ मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी जवळपास २४० हून अधिक असे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळे ते पक्षी निरीक्षकांसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे.
केदारनाथ मंदिराजवळील हॉटेल्स
केदारनाथ मंदिर हे भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असून चारधाम यात्रेपैकी एक पवित्र तीर्थस्थळ देखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातून या मंदिरामध्ये दर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. यांच्या राहण्याच्या सोयीसाठी या ठिकाणी धर्मशाळा विश्रामगृह बांधले गेले आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला हॉटेल्स देखील बांधले गेले आहे. आपल्या बजेटनुसार आपल्या सोयीनुसार आपण एसी, नॉन एसी हॉटेल्स बुक करू शकता. त्यापैकी काही प्रमुख हॉटेल्स खालील प्रमाणे –
- केदार भैरव कॅम्प
- राणा महादेव स्टे कॅम्प
- शिवाय गेस्ट हाऊस
- राजस्थान भवन
- न्यू मंदाकिनी रिवर रिसॉर्ट
- केदार यतीह रिसॉर्ट
- केदार व्हॅली रिसॉर्ट
- हॉटेल जयपूर हाऊस
- केदार रिवर
- पंजाब सिंध आवास
- हॉटेल रामा पॅलेस
- मरवार हाऊस
उत्तराखंडचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ
उत्तराखंड हे देवांची भूमी म्हणून जसे ओळखले जाते. त्याचप्रमाणे नैसर्गिक दृश्यासाठी बर्फाच्छादित पर्वतांसाठी ही ओळखले जाते. त्याचप्रमाणे तोंडाला पाणी आणणाऱ्या अशा तेथील प्रसिद्ध पदार्थांसाठी देखील उत्तराखंड ओळखले जाते. उत्तराखंड मधील अन्नपदार्थ इतर ठिकाणांप्रमाणे साधे असून यांच्या जेवणामध्ये विविध प्रकारचे पीठ आणि विविध प्रकारचे मसूर हे प्रमुख घटक असतात. त्यातील काही प्रसिद्ध पदार्थ खालील प्रमाणे –
काफुली, चेनसू, अरसा, सिंगोरी, कुमाऊनी रायता, गहतचे पराठे, भांगकी चटणी, फणू, आलू तमतर का झोल तसेच कंदली का साग, दुबुक, आलू गुटुक, झांगोरा की खीर, थटवाणी यासारखे पदार्थ प्रसिद्ध आहेत.
केदारनाथ येथील चित्रीकरण
सन २०१३ मध्ये आलेल्या पुराचे दर्शन आणि वर्णन करण्यासाठी केदारनाथ नावाच्या फिल्मची निर्मिती केली गेली होती. यामध्ये सुशांत सिंग रजपूत आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचे दर्शन घडवले गेले होते, त्याचप्रमाणे एक प्रेमकथा देखील दाखवली गेली होती. या रोमँटिक ड्रामा चित्रपटामध्ये गौरीकुंड पासून ट्रेकिंगचा प्रवास, त्याचप्रमाणे केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तसेच केदारनाथ मंदिराचे दर्शन देखील या चित्रपटांमध्ये घडवले गेले होते. हा चित्रपट सात डिसेंबर २०१८ साली प्रदर्शित करण्यात आला होता.
केदारनाथ कथा – kedarnath story
पौराणिक कथेनुसार महाभारतातील युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर पांडवाना भातृमृत्यूच्या पापातून मुक्ती मिळवायची होती आणि यासाठी त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा होता. पण भगवान शंकर त्यांच्यावर रागवले होते. पांडव भगवान शंकरांच्या दर्शनासाठी काशी या ठिकाणी गेले. परंतु त्या ठिकाणी ते त्यांना सापडले नाहीत.
पांडव या ठिकाणी येत असल्याचे पाहून भगवान शंकर केदार पर्वतावर गेले. तेथेही पांडव शोध घेत त्या ठिकाणी आले. शंकरांनी पापी पांडवांचा स्पर्श होऊ नये म्हणून, एका बैलाचे रूप घेतले आणि ते आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सहभागी झाले. पांडवांना संशय आला म्हणून भीमाने आपले विशाल रूप धारण केले.
भिमाच्या या विशाल रूपाच्या दोन पायांमधून सगळे प्राणी निघून गेले. परंतु शंकराच्या रूपातील बैल त्यांच्या पायाखाली जायला तयार नव्हता. त्यावेळी भीमाने या बैलाच्या पाठीचा त्रिकोणी भाग पकडला. यामुळे पांडवांची भक्ती आणि निश्चय पाहून भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना पापमुक्त केले.
केदारनाथ मंदिरामध्ये या बैलाच्या पाठीच्या आकृतीच्या रूपात भगवान शंकरांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की भगवान शंकर या बैलाच्या रूपात अदृश्य झाले तेव्हा त्यांच्या धडाचा वरचा भाग काठमांडू मध्ये प्रकट झाला. तुंगनाथमध्ये शिवाचे हात, रुद्रनाथमध्ये चेहरा, नाभी मध्यमहेश्वरामध्ये आणि जटा कल्पेश्वरामध्ये प्रकट झाली. म्हणून या चारीही स्थानांसह केदारनाथला पंचकेदार असे म्हटले जाते.
FAQ
केदारनाथ मंदिर कुठे आहे?
केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यात, मंदाकिनी नदीच्या काठी, हिमालयाच्या शिखरावर हे केदारनाथ मंदिर आहे.
केदारनाथ मंदिर कोणी बांधले?
हे केदारनाथ मंदिर आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकामध्ये बांधले.
केदारनाथ हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?
केदारनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे.
केदारनाथ मंदिराची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे?
केदारनाथ मंदिराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५५३ मीटर म्हणजेच ११६५७ फूट आहे.
निष्कर्ष
आजच्या आमच्या Kedarnath Temple Information in Marathi Language या लेखामध्ये केदारनाथ विषयी पौराणिक कथा इतिहास आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या मंदिराची माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. काही चुका असतील तर त्या सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.
तोपर्यंत नमस्कार