KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE । खिद्रापूर कोपेश्वर मंदिर माहिती मराठी :- महाराष्ट्रातील ऐतिहासिक संस्कृती आणि पर्यटन जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखले जाते तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर नामक एक गाव आहे हे. गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. कोल्हापूर पासून साधारणपणे किलोमीटरवर असलेल्या या गावात कोपेश्वर या महादेवाचे मंदिर आहे. पाहूया या मंदिराची माहिती.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर माहिती मराठी – KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE
स्थान – | कोपेश्वर मंदिर |
गाव – | खिद्रापूर |
तालुका – | शिरोळ |
जिल्हा – | कोल्हापूर |
मंदिर कोणी बांधले – | बाराव्या शतकात शिलाहार राजवटीतील एका राजाने |
दुसरे नाव – | कोप्पम |
देवस्थान – | श्री. शंकर |
उत्सव – | महाशिवरात्र |
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर नकाशा
कोपेश्वर मंदिर इतिहास
साधारणपणे सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. एक ११०९ ते ११७८ या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. म्हणजे जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसाच आहे.
या मंदिराची रचना करताना हे मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला ०२ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराला घोषित केले आहे.
कोपेश्वर मंदिराची रचना
कोणतेही मंदिर उभारताना त्यातले स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती हे सर्व त्या वस्तूशी निगडीत असते. त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्या मंदिरामध्ये प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडित सगळ्यात गोष्टींना यामध्ये एकत्रित गुंफले जाते. अशी मंदिरे उभारताना गणित, वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक अडीअडचणी यांचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणूनच ही मंदिरे हजारो वर्षानंतरही, त्यावेळी झालेल्या आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात.
अशाच मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील हे कोपेश्वर मंदिर कोल्हापूर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. या मंदिरामध्ये महादेव शिवशंकर आणि विष्णू या दोन्ही देवांची पूजा अर्चा केली जाते. हे मंदिर बाराव्या शतकाची राजवटीतील एका राजाने बांधले गेल्याचे सांगितले जाते. हे मंदिर कोल्हापूर आणि कर्नाटक सीमेवर आढळून येते. प्राचीन काळातील कोप्पम या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे.
🙏सहावे ज्योतिर्लिंग : श्री भीमाशंकर 🙏
१०८ खांबांचे वैशिष्ट्य
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील या कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख पद्धतीने सजावट केलेले १०८ खांब आहेत. या मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात केलेली दिसून येते. या मंदिरातील स्वर्गमंडळ हा ४८ खांबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिशय सुंदर असा अविष्कार म्हणावा लागेल.
या ठिकाणी असलेल्या या खांबांचा आकार हा गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा सगळ्याच आकारात दिसून येतो. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम् या ठिकाणी रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या जागेमध्ये यज्ञ कार्य केले जातात. त्यामुळे होमहवनाचा जो धूर आहे, तो बाहेर जाण्यासाठी ही जागा योग्य आहे.
कोपेश्वर मंदिर कोल्हापूर शिलालेख
शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन आपण ज्यावेळी सभामंडपात येतो, त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. इतिहासकारांच्या माहितीनुसार यादव सम्राट सिंहणदेव यांनी खीद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी “कुडलदामवाड” नावाचे दान दिल्याच्या या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितले जाते.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे रहस्य
खिद्रापूर गावातील कोपेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर असून या मंदिरात शिवलिंग आहे. पण जसे महादेवाच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतो तसा या मंदिरात कुठेही नंदीची मूर्ती दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी झालेल्या आक्रमणामुळे या नंदीचे स्थलांतर झाले असावे असे मानले जाते. खिद्रापूर गाव हे कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवर येत असल्याने येथील नंदी कर्नाटकातील येडूर या गावात गेला असे मानले जाते. येडूर या गावात नंदीचे मंदिर आहे. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून येडूर गावातील नंदीच्या मंदिरातील नंदी हा पश्चिम दिशेला तोंड करून बसलेला दिसून येतो.
🙏पाचवे ज्योतिर्लिंग : श्री परळी वैजनाथ 🙏
कोपेश्वर मंदिराचा परिसर
या मंदिराचा बाहेरील भाग सुद्धा अतिशय कोरीव कामाने परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध प्रकारच्या मानवी आकृती सुमारे पाच ते सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेले आहे असे दिसून येते. सभा मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे.
या मंदिरावरील सुंदर शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजतरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवतांची शिल्पे आढळून येतात. या ठिकाणी विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे देखील आढळून येतात.
कोपेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये
कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या मंदिराला स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या मुख्य मंडपापासून थोडासा लांब असलेला हा खुला मंडप स्वर्गमंडप म्हणून देखील ओळखला जातो. खिद्रापूर मंदिराचे मुख हे पूर्वेच्या दिशेने असल्यामुळे सर्वात पुढच्या बाजूस प्रमुख मंडपा ऐवजी त्रिरथपूर्ण मंडप आहे. या मंडपाच्या मध्यभागी गोलाकार आकाराची शिळा असून तिच्या बाजूला अर्धवट गुंताकार छताचा तोल सावरणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील बाजूस कार्तिकेय व अष्टदीग्पाल वाहनांसोबत दर्शविले आहे.
या बारा स्तंभांच्या मागे रुंदीने कमी असलेले नऊ स्तंभ आहेत. या वर्ग मंडपाच्या आतमध्ये एक सभामंडप आहे आणि या सभा मंडपाचे प्रवेशद्वार हे उत्तर दक्षिण दिशेस आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक एक स्तंभ आहे. या सभा मंडपाच्या आतल्या बाजूस वीस चौकोनी आकाराचे स्तंभ आहेत. या मंडपाला दोन्ही बाजूंनी प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. मंडपामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत… या मंदिरावरील बारीक बारीक कोरलेली सुंदर नक्षीकामे अतिशय बघण्यासारखी आहेत.
कोपेश्वर मंदिराचा अनुभव
कोपेश्वर मंदिराचा परिसर तसा सुनासुनाच वाटतो. आजकाल बऱ्याच देवळांच्या नशिबी भक्तगणांचा आणि पैशाचा ओघ असतो. तसा अजून तरी या कोपेश्वरच्या नशिबी नाही. ५००० वर्षापासूनचा इतिहास पाठीशी असूनही आणि शिल्पाकृतीचे अनमोल लेणे असलेले हे ठिकाण भक्तगण, कलाप्रेमी आणि पर्यटक सर्वांकडून तसे उपेक्षितच राहिले आहे. कदाचित त्याचमुळे मंदिराच्या ठिकाणी अपेक्षित असणारा निवांतपणा मात्र इथे भरपूर लाभतो.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क
खिद्रापूर मधील कोपेश्वर हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने वाढीस आले नसल्यामुळे या ठिकाणी जाताना तुम्ही कोणत्याही वेळी जाऊ शकता. हे मंदिर 24 तास उघडे असते. तसेच या मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे जून पासून ते अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा योग्य कालावधी असतो.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावात हे कोपेश्वराचे मंदिर आहे. स्थापत्य कलेचा मूर्तिमंत उदाहरण असूनही या मंदिराची पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झालेली दिसून येत नाही.
विमान – कोल्हापूर विमानतळापासून खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ५५ किलोमीटर म्हणजेच साधारणपणे सव्वा तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी विमानतळावरून येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकतो.
ट्रेन – कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे साधारणपणे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे. रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत येताना ऑटो किंवा केबने येऊ शकता.
बस – कोल्हापूर बस स्थानक ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे या ठिकाणी येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.
खाजगी वाहने – कोल्हापूर हायवे हा आजूबाजूच्या शहरांनाही जोडला गेल्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी स्वतःच्या खाजगी गाडीने येणे सोयीस्कर होते.
मुंबई ते कोल्हापूर – मुंबई ते कोल्हापूर पुणे मार्गे साधारणता सात तासाचे म्हणजे जवळपास ३८० किलोमीटरचे अंतर आहे
पुणे ते कोल्हापूर – पुणे ते कोल्हापूर साधारण साडेचार तासाचे म्हणजे जवळपास २०० किलोमीटरचे अंतर आहे.
kohhapur to khidrapur distance – 60 km
narsobawadi to khidrapur distance – 19.05 km
🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏
कोपेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे
कोल्हापूर हे जसे ऐतिहासिक शहर आहे तसेच निसर्ग सौंदर्य याचा अमोल ठेवा असलेले शहर आहे. विविधतेने नटलेले इथले पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावत असते. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि प्रत्येक शहरातून कोल्हापूरला हायवे जोडला गेला असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर हे शहर पर्यटनासाठी सोयीस्कर वाटते.
कोपेश्वर मंदिराखेरीज कोल्हापूर मधील आणखीन काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- कणेरी मठ
- दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर
- रंकाळा तलाव
- भवानी मंडप
- न्यू पॅलेस
- पंचगंगा नदी घाट
- विशाळगड
- पन्हाळगड
- दाजीपूर अभयारण्य
- राधानगरी धरण
- श्री क्षेत्र नृसिंहवाडी
ही कोल्हापुरातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर तिथून तुम्हाला जावेसे वाटणार नाही याची खात्री आहे.
कोपेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स
कोपेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण असूनही या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झालेली नाही. त्यामुळे येथील गाव आणि आजूबाजूचा परिसर शांत दिसून येते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी हॉटेल सोडली, तर बाकी पर्यटकांसाठी कोणतीच व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे कोपेश्वर मंदिर अजूनही तसे फार प्रसिद्धीला आलेले नाही.
- हॉटेल माऊली
- हॉटेल गुरुप्रसाद
- हॉटेल कन्हैया
कोपेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो तांबडा पांढरा रस्सा नंतर आठवते ते झणझणीत कोल्हापुरी मिसळ. हे दोन पदार्थ फारच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर कोल्हापुरी चटणी, दावणगिरी लोणी डोसा याची सुद्धा खासियत आहे. सुके मटण, सुके चिकन, खिमा हे प्रकार संपूर्ण कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्या म्हणजे चपात्यांची खासियत आहे ती तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली गरम चपाती अप्रतिम लागते. या ठिकाणची पोकळा नावाची पालेभाजी सुद्धा अप्रतिम लागते. येथे मिळणारी भाकरी आणि खर्डा सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे.
खिद्रापूर कोपेश्वर कथा
हे मंदिर महादेवाचे असून ते कोपेश्वर नावाने प्रसिद्ध आहे..खिद्रापूर येथे आख्यायिका अशी आहे की दक्षक कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने रागावलेला असा हा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते. ते काम श्री विष्णू केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शीळा आहेत. एक कोपेश्वर आणि दुसरा त्या उंच धोपेश्वर.
दुसरे एक वैशिष्ट्य असे आहे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. त्यावेळी झालेल्या आक्रमणामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे असे मानले जाते. हा नंदी खिद्रापूर पासून १२ किलोमीटर दूर कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले हे एकमेव मंदिर असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे, आणि येडू येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसलेला आढळून येतो.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथील चित्रीकरण
खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला तेथे झालेल्या चित्रीकरणामुळे प्रसिद्धी निर्माण झालेली आहे. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण या मंदिरात झाले. तसेच विटी दांडू हिरवा कुंकू या मराठी चित्रपटांचे काही भाग या मंदिरात चित्रीत करण्यात आले आहेत.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथील उत्सव
महाशिवरात्र हा आपल्या भारतातील सगळ्यात मोठा साजरा केला जाणारा उत्सव मानला जातो. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. दक्षाची कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा हा महादेव. प्रत्येक वर्षी येथे महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात जत्रा आणि उत्सव साजरा केला जातो.
FAQ
कोपेश्वर मंदिर कोणी बांधले?
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील शिवाला समर्पित कोपेश्वर मंदिर बाराव्या शतकात, शिलाहार राजा, गंधाराधित्य यांनी ११०९ ते ११७८ या काळात बांधल्याचे सांगितले जाते.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर कोठे आहे?
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावात आहे.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर हे कोणाचे मंदिर आहे?
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे.
कोपेश्वरचे प्राचीन नाव कोणते आहे?
कोपेश्वरचे प्राचीन नाव कोप्पम असे आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून कोणाला घोषित केले?
महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून कोपेश्वर मंदिराला घोषित केले गेले.
कोपेश्वर मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून कधी घोषित केले गेले?
कोपेश्वर मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ०२ जानेवारी १९५४ मध्ये घोषित केले गेले.
निष्कर्ष
मित्रांनो, आम्हाला आशा आहे की खिद्रापूर कोपेश्वर मंदिराबाबत आमचा हा लेख KHIDRAPUR KOPESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE तुम्हाला आवडला असेल. या लेखाद्वारे आम्ही या मंदिराच्या इतिहासाविषयी आणि तेथील स्थापत्य कलेविषयी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर अशा ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू विषयीची ठिकाणे जाणून घ्यायची असतील, तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद 🙏🙏