ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि अर्थ | PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI – निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्नीयंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात यक्तींचीतही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान. आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नंदावे, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान.
मनाला थक्क करणारी निस्प्रूह विश्वप्रार्थना म्हणजेच पसायदान
ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि अर्थ : PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI
रचना | पसायदान |
कोणी लिहिले | संत ज्ञानेश्वर |
रचनेचा प्रकार | प्रार्थना |
एकूण ओव्या | नऊ |
भाषा | प्राकृत मराठी |
PASAYDAN PDF DOWNLOAD – pasaydan marathi pdf download
पसायदानाचे महत्व
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ महाग्रंथ भगवद्गीता मूळ संस्कृत भाषेत आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील संस्कृत अध्यायांचे सर्वसामान्य माणसाला समजावे असे मराठी सुलभ भाषेत भाषांतर केले. हे फक्त भाषांतर नसून अगदी ओघवत्या शैलीत, सर्वसामान्य बहुजनांना समजावे अशा ओव्यांच्या रूपात या भगवद्गीतेची मांडणी केली आणि हा वांग्मयरुपी यज्ञ पूर्ण करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर परमेश्वराकडे अखिल विश्वासाठी आशीर्वाद रुपी प्रसाद पसायदानाच्या रूपाने मागत आहेत.
श्री ज्ञानेश्वर रचित भगवद्गीता हा जर वाङ्मयातला मुकुट मानला तर पसायदान हा त्यातील चमचमणारा कौस्तुभमणीच होय.
पसायदानाची रचना
श्री ज्ञानेश्वर यांनी पसायदान मराठी ही प्रार्थना लिहिली. यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर, ज्यांना सर्व भागवत भक्त “माऊली” अशी प्रेमळ हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा असा हा अवलिया म्हणजेच श्री ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.
पसायदान – संत ज्ञानेश्वर
रचनाकार : संत ज्ञानेश्वर
पसायदान प्रार्थना व्हिडिओ
ज्ञानेश्वरांचे पसायदान मूळ रचना
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान म्हणजे काय ?
पसायदान या प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे आहे की धर्म, पंथ, जात या सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊन अखिल विश्वातील मानवांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी केलेली ही प्रार्थना आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ओघवत्या वाणीतून सरळ साध्या शब्दात परमेश्वराला आर्तपणे विश्वकल्याणासाठी हे मागणं करतात
पसायदान कोणी लिहिले?
ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांना आपले कार्य सादर केले आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. पसायदान नावाच्या अवघ्या नऊ श्लोकांच्या कवितेतून त्यांनी हे केले आहे. पसायदानाचा शब्दशः अर्थ म्हणजे विनंती, देवाकडून वरदान मागणे. पसायदानात ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही तर त्यांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे.
पसायदानाचे महत्त्व
पसायदान ही एक सुंदर प्रार्थना आहे ज्यामध्ये सर्व लोकांच्या उन्नतीसाठी आणि हितासाठी ज्ञानेश्वर महाराज गुरूंचे आशीर्वाद घेतात. तो धार्मिकतेचा सूर्य तेजस्वीपणे चमकण्यासाठी, जगात शांती आणि सुसंवाद आणण्यासाठी प्रार्थना करतात. ज्ञानेश्वर महाराज हे भारतातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहेत.
ज्ञानेश्वरांचा भाव हृदय परिवर्तनावर दिसतो. मानवी मनाला अंतरिक आनंद लाभावा, सर्वांना अनन्यसाधारण शांती मिळावी यासाठी ही प्रार्थना केली आहे. म्हणून ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि अर्थ – संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी पसायदान लिहिले आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो अशी प्रार्थना आपल्या पुरती मर्यादित असते परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला, सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण तयार करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे गुरु त्यांना म्हणाले आपण ग्रंथ पूर्ण करत आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा.
यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे तुम्ही सुरुवातीला मंगला शरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली pasaydan marathi ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती.
निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वर यांनी सांगितले. म्हणूनच आपल्यासाठी ज्ञानेश्वरांचे पसायदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोणी, कसे आणि पसायदान कधी म्हणावे ?
पसायदान प्रार्थना ही एक संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली अशी प्रार्थना आहे जी म्हणण्यासाठी खरे तर वेळ आणि काळाची आवश्यकता नाही. आपण ती कधीही म्हणू शकतो सकाळी स्नान झाल्यानंतर तसेच संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास जर ही प्रार्थना म्हटली तर ती खरोखरच उत्तम असेल. या वेळात ही प्रार्थना म्हटली की मन प्रसन्न होते. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटी सुद्धा कधीकधी पसायदान म्हटले जाते.
पसायदान कोणी म्हणावे ?
बऱ्याच अंशी शाळांमध्ये सुद्धा परिपाठच्या वेळी – पसायदान इन मराठी -ही प्रार्थना म्हणून घेतली जाते तीन ते चार वर्षाच्या मुलापासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत ही प्रार्थना कोणीही म्हणू शकते.
पसायदान मराठी भावार्थ
पसायदान ओवी १
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
ज्ञानेश्वराने विश्व देवतेकडे पसायदानाद्वारे आशीर्वाद मागितला आहे. या विश्वात्मक देवाला संत ज्ञानेश्वर विनंती करतात की हा वाग्यज्ञ आपल्यासाठी केलेला आहे. म्हणजेच ही केलेले जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेने आपण आनंदी होऊन माझी ही विश्वप्रार्थना मान्य करून मला आशीर्वाद द्यावा. संत ज्ञानेश्वराचे बंधू श्री निवृत्तीनाथ हे त्यांचे प्रथम गुरु होते.
आपली पहिली प्रार्थना त्यांनी आपल्या गुरुबंधू निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केली कारण गुरुबंधूच ज्ञानेश्वरांच्या सद्गुरु स्थानी होते आणि त्यामुळेच त्यांची दृढ बुद्धी गुरुविण चरणाशीच होती.
पसायदान ओवी – २
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुसऱ्या ओवीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर अखिल जगातील दुष्ट वृत्ती नाहीशी व्हावी यासाठी परमेश्वराकडे मागणं करताना दिसत आहेत. इथे खळ म्हणजे वाईट किंवा दुष्ट आणि व्यंकटी म्हणजे दुर्गुण . येथे श्री ज्ञानेश्वर परमेश्वराकडे दुर्जनांचे दुर्गुण नाहीसे व्हावे यासाठी प्रार्थना करतात.
म्हणजेच जे दुर्जन आहेत त्यांच्या मनातील, अंतःकरणातील दुष्टपणा, वाईटपणा कुटीलता नष्ट होवो आणि फक्त कुटीलता नष्ट होउदे एवढंच नाही, तर त्याचबरोबर चांगल्या कर्मांची, चांगल्या गुणांनी त्यांना गोडी निर्माण व्हावी. त्यांच्या हातून चांगली कामे घडावीत.
त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जीव, प्राणिमात्रांची त्यांची मैत्री जुळावी. या सर्व प्राणिमात्रांचे एकमेकांबरोबर सदासर्वदा चांगले संबंध निर्माण व्हावे आणि सर्वजण एकमेकांचे मित्र व्हावे अशी प्रार्थना करतात. इथे दृष्टांचा नायनाट करणे ही भावना कुठेही दिसत नाही. या प्रार्थनेत दृष्टांची दृष्टता, कटूता, कुटिल पणा, दुर्गुण नष्ट होऊन त्या दुर्गुणी व्यक्तींमधून सद्गुण वाढीस लागो आणि त्यामुळे त्याचे स्वतःचे कल्याण होण्याबरोबरच त्याला इतर प्राणिमात्रांचे, मनुष्य जीवांचे कल्याण करण्याची बुद्धी येवो अशी गुरुचरणी प्रार्थना केली आहे.
पसायदान ओवी ३
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
तिसऱ्या ओळीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर तीन मागण्या करताना दिसतात. पहिल्यांदा दुरीत म्हणजे वाईट किंवा पाप आणि तिमिर म्हणजे अंधार. दूरीतांचे तिमिर जावो म्हणजेच हा पापरुपी असलेला अंधार संपूर्णपणे नष्ट होवो आणि हा नष्ट होण्यासाठी जो स्वधर्माचा प्रकाश आहे तो सनातन सूर्य उदयाला येऊन त्याने पापरुपी अंधाराला नष्ट करून पुण्यरूपी प्रकाशाची स्थापना व्हावी.
इथे स्वधर्म सूर्य उदयास येवो याचा अर्थ सनातन धर्मात जी सदगुणांची, सद्वर्तनाची लक्षणे दिलेली आहेत त्या लक्षणांप्रमाणे समाजात सर्वप्रथम चांगल्या बुद्धीचे, चांगल्या प्रज्ञेचे अधिष्ठान होऊन पाप बुद्धी नष्ट व्हावी, त्याचबरोबर या सद्बुद्धीने सर्व मनुष्य प्राणी परमेश्वराकडे जे काही मागतील त्या चांगल्या मगण्यांची पूर्तता व्हावी अशी प्रार्थना श्री ज्ञानेश्वरांनी केलेली आहे अवघ्या प्राणीमात्रांची परस्परांशी मैत्री व्हावी आणि त्यामुळे अवघ्या प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे अशी ही त्यांची तिसरी मागणी आहे.
अशा तीन गोष्टी या ओवी मध्ये संत ज्ञानेश्वरांनी मागितले आहे. तिसरी मागणी म्हणजे विश्वातील सर्व प्राणी जातीसाठी आहे जो जीवांशील म्हणजे इच्छा करील ती वस्तू किंवा गोष्ट त्याला प्राप्त होऊ अशा या तीन अलौकिक मागणी आहे की ज्यामुळे पसायदान हे वैश्विक पातळीवर पोहोचले आहे.
पसायदान ओवी ४
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
या ओवीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर अखिल जनांच्या कल्याणाचा एक मार्ग सांगून त्याबद्दल परमेश्वराकडे याचना करताना दिसतात. या पृथ्वीतलावर बद्ध, मुमुक्ष, साधक, सिद्ध अशा विविध अध्यात्मिक पातळीवरची माणसे असतात आणि बद्धा पासून सिध्दा पर्यंत चा प्रवास सोपा आणि सुगम होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींना ईश्वरनिष्ठ संत समागमाची गरज असते.
संपूर्ण लोककल्याणासाठी झटणारे जी ईश्वरनिष्ठ संत मंडळी आहेत ती मंडळी, त्यांचा समुदाय एकत्र येऊ दे. त्या समुदायाला सर्वसामान्य अशिक्षित ,अडाणी, बुद्ध समाज जोडला जाऊ दे. आणि या सर्व मंडळींनी एक चांगला सूसंस्कृत आणि बुद्धिवान, प्रज्ञावान, ईश्वरनिष्ठ असा पूर्ण समाज निर्माण होउदे.
सद्बुद्धीचे, परमेश्वर भक्तीचे, ईश्वर निष्ठेचे जे मिळणारे आनंद आहेत त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला या संत समागमा ने मिळू दे अशी प्रार्थना श्री ज्ञानेश्वर करतात. स्वधर्म सूर्याचा प्रकाश पसरावा म्हणून आपण स्व धर्माचे आचरण केले पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आपोआ पूर्ण होतील स्वधर्म कामधेनुक्रमाणे इच्छापूर्ती करणारा आहे कारण त्याला बैठक स्वकर्माची आणि स्वधर्माची असणार आहे यास्वधर्मासाठी सगळ्यांना प्रवृत्त कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरांनी पुढील ओवी दिली आहे.
पसायदान अर्थ –ओवी ५
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चिंतामणी मनातील इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक अचेतन म्हणी असतो पण संतरूपी चिंतामणी सचेतन असून जनकल्याणासाठी भक्तीचे अमृतकुंभ घेऊन अमृत वाटत निघाले आहे हा संत समुदाय नसून अर्णव म्हणजे सागर आहे पण हा अर्णव खाऱ्या पाण्याचा किंवा दुधाचा सागर नसून अमृताचा महासागर आहे विशेष म्हणजे हा सागर सचेतन असून जनसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना भक्तीरूपी अमृताचे म्हणजेच पियुष्याचे पान घडवतात.
पसायदान ओवी ६
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
जरी चंद्र पौर्णिमेचा असला तरीही त्यावर डाग दिसतात. पण ईश्वरावर श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ठेवणारे संत हे कलंक विरहित असतात. मार्तंड म्हणजे सूर्याचे तेज. पण सूर्याचा प्रकाश जरी तेजःपुंज असला तरी सूर्य तापमान विरहित कधीच असू शकत नाही. पण संत हे असे आहेत की ज्यांचे तेज तापदायक नसते. तर ते आनंददायक शितल असते. ज्ञानाच्या प्रकाशाने ते अज्ञानाचा काळोख दूर करतात.
त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर सर्वच जणांवर शीतलतेचा, आनंदाचा वर्षाव होतो. सज्जनांच्या अंगी चंद्राचा कलंक नाही, सूर्याची दाहकता नाही, किंवा डागही नाहीत. सर्व आनंदाचे मूळ स्थान, ब्रह्म विद्येचे ब्रह्मस्थान आणि आत्मप्रचितीचा, आत्मसाक्षात्काराचा अनुभव जर घ्यायचा असेल तर सज्जनांच्या संगतीत सर्वानी यावे आणि सर्वजण एकमेकांचे सगळे सोयरे व्हावेत. अशी प्रार्थना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर करतात
पसायदान ओवी ७
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
संत श्री ज्ञानेश्वरांचे मागणे हे विश्वव्यापक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात असणारा आनंद हा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही बाह्य गोष्टी, संपत्ती भौतिक वस्तू, यावर अवलंबून न. तर हा आनंद अंतर्मनात निर्माण होणाऱ्या आनंद लहरींवर, सद्बुद्धीवर आणि त्या व्यक्तीच्या आत्मसाक्षात्कारावर अवलंबून असतो.
श्री ज्ञानेश्वर मागतात की हे सर्व सुख, प्रत्येक जीवमात्राच्या प्राणिमात्राच्या आयुष्यात येण्यासाठी आणि त्याचे आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी त्याला परमात्म्याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. आणि हे ज्ञान होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने हा भगवान भक्तीचा सोहळा आयुष्यभर अनुभवणे गरजेचे आहे.
या विश्वव्यापी परमेश्वराच्या चरणी शरण जाऊन, आपण इंद्रिय सुख दूर करून जर ईशतत्त्व अंगीकारले तर परमात्म्याला मिळणारा आनंद हा कधीच नाशिवंत असणार नाही. अंतर्मनात निर्माण होणारे हे सुख कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून असणार नाही. आणि अशा अंतर्मनात निर्माण होणाऱ्या आनंद लहरींनी परिपूर्ण होऊन जो व्यक्ती परमेश्वरचरणी लीन होतो अशा सर्व लोकांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना संत श्री ज्ञानेश्वर करतात.
सगुण परमेश्वराची उपासना करताना हळूहळू निर्गुणाकडे जाता येते. म्हणून प्रतिमा रुपी परमेश्वराची पूजा करून शेवटी अंतरातम्यात विराजमान असलेल्या अविनाशी परमेश्वराशी लीन होऊन परमानंदाची प्राप्ती करून घेणे हे प्राणीमात्रांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे
पसायदान ओवी ८
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
संत श्री ज्ञानेश्वर म्हणतात की ग्रंथ हेच जीवन व्हावे. म्हणजेच अखिल संत मंडळींनी आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले जे आयुष्य आहे तसे आयुष्य प्रत्येक प्राणी मात्राच्या नशीबी यावे. त्याद्वारे सद्गुणांची वाढ, दुर्गुणांचा नाश व्हावा, सत्कर्म हातून घडावे, दुष्कर्म , दुर्विचार नाहीसे व्हावेत. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी निश्चयात्मक, परमेश्वर साक्षी बनावी आणि त्यायोगे भक्ती मार्गाला लागावे.
सर्वसामान्य जनांना भक्ती मार्गाकडे जाण्यासाठी ग्रंथांसारखा गुरु नाही. या ग्रंथ गुरूंच्या सोबतीने आयुष्य चालताना मनुष्याने आपल्या गुणांचे रूपांतर सदगुणांमध्ये करून आपली उन्नती गाठावयाची आहे.
श्रवण, मनन, अध्ययन, कीर्तन या मार्गाने ग्रंथ आत्मसात करावेत, आणि एक वेळ अशी यावी की मनातील दुर्बुद्धी, आपपरभाव, चिंता, क्लेश, दारिद्र्य, दुःख सर्व नष्ट होऊन अतिशय परमानंदाची प्राप्ती व्हावी. यासाठी ज्ञानेश्वर परमेश्वर चरणी प्रार्थना करतात
पसायदान ओवी ९
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
संत श्री ज्ञानेश्वरांनी ही विश्वप्रार्थना श्री निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केली आहे. येथे ते म्हणतात हे दान मी आपल्या चरणी मागितले आहे. हा कृपाप्रसाद आपण द्यावा. जेणेकरून त्यायोगे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे, सर्वांना सद्बुद्धी या, अखिल पृथ्वीतलावर आनंदी आनंद व्हावा. पापाचा अंधकार नाहीसा व्हावा.
स्वधर्माचा सूर्य उदयास यावा. ईश्वरनिष्ठ संतांची मांदियाळी या पृथ्वीतलावर प्रकट व्हावी. प्रत्येक जीवाचे आत्मकल्याण व्हावे आणि त्यांचा आयुष्य मार्ग सुकर व्हावा. ज्ञानाचा अमृतसागर प्रत्येकाच्या नशिबी यावा. सूर्यासारखे तेजस्वी असणारे संत सज्जन प्रत्येकाच्या आयुष्यात यावेत आणि त्यांच्याकडून इतर सर्व जणांना कृपाप्रसाद मिळावा.
- कोकणचे शिवमंदिर – श्री मार्लेश्वर
- पाचवे ज्योतिर्लिंग – श्री परळी वैजनाथ
- महाराष्ट्राची आई – कोल्हापूरची अंबाबाई
FAQ
पसायदान म्हणजे काय?
निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्नीयंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात व्यक्तींचीतही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान. आपले इवलेसे हात पसरून त्या ओंजळीत परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती, समृद्धी, ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नंदावे, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान.
पसायदान मध्ये एकूण किती ओव्या आहेत ?
पसायदान मध्ये एकूण नऊ ओव्या आहेत.
पसायदान कोणी लिहिले ?
श्री ज्ञानेश्वर यांनी पसायदान मराठी ही प्रार्थना लिहिली. यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर, ज्यांना सर्व भागवत भक्त “माऊली” अशी प्रेमळ हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा असा हा अवलिया म्हणजेच श्री ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.
पसायदान मराठी अर्थ सारांश
ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रातील संत कवी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत रचलेली श्रीमद भगवत गीतेची भावार्थ रचना आहे. खरे तर हे प्रवचन आहे जे संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून दिले होते. भगवद्गीतेचे मूळ ७०० श्लोक आहेत. तीच भगवद्मगीता मराठी भाषेत ९०००ओव्यांमध्ये अनुवादित आहेत.
श्री ज्ञानेश्वरांनी मूळ भगवद्गीतेतील अध्याय अतिशय सुंदरपणे आपल्या ९०० ओव्यांमध्ये स्पष्ट केल्या आहेत, प्रत्यक्षात ती भगवद्गीतेची भावार्थ दीपिका आहे.
संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाच्या शेवटच्या ओळी म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायाचा समारोप केला आहे. त्याच ओळी पसायदान आहेत. पसायदानाचा अर्थ प्रसाद आहे.
ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी ज्या स्वरूपाचे वर्णन केले आहे आणि ते स्वस्वरूपात वास करत आहे, शेवटी ज्ञानेश्वर त्याच विश्वव्यापी जगातून अद्वितीय ईश्वराला बोलावून पसायदान म्हणजेच प्रसाद मागतात. ज्ञानेश्वरी स्वतः रचली. हे प्रभो, माझ्या या वाग्यज्ञावर प्रसन्न होऊन मला प्रसाद दे.
मित्रहो आम्ही आमच्या अल्पमतीने आपल्यासाठी PASAYDAN LYRICS AND MEANING IN MARATHI हा लेख लिहिलेला आहे. काही चुका झाल्या असल्यास त्याबद्दल क्षमस्व. आमच्या कडून काही सुधारणा हवी असल्यास कमेंट करून नक्की कळवा .
धन्यवाद 🙏
🙏|| जय जय राम कृष्ण हरी ||🙏