FORTS IN SINDHUDURG : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले -मुंबई पासून कारवार पर्यंत असलेल्या कोकण प्रांतात आजही ठिकठिकाणी छोटे मोठे गिरीदुर्ग स्थलदुर्ग आणि जलदुर्ग इतिहासाची साक्ष देत डौलाने उभे आहेत. राजा भोज यांच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या किल्ल्यांनी वेगवेगळा शासन काळ अनुभवला, आक्रमणे झेलली, किनारपट्टीचे, स्वराज्याचे संरक्षण सुद्धा केले. कालौघात हळूहळू नष्ट होत जाणाऱ्या, पडझड होणाऱ्या या किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, देखभाल करण्याची आता आपली जबाबदारी आहे. तरच हा ऐतिहासिक वारसा, आपण पुढल्या पिढीला देऊ शकतो.
कोकण हे जसं निसर्गसौंदर्याने, समुद्रकिनाऱ्याने जेवढे समृद्ध आहे, तितकाच कोकणचा इतिहास प्रसिद्ध आहे. भारताचे प्रिय राजे, स्वराज्य रक्षक, यशवंत, किर्तीवंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म देखील याच कोकणातील रायगड या जिल्ह्यामध्ये झाला होता. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सिंधुदुर्ग जिल्हा देखील महाराजांच्या पराक्रमांमुळे व महाराजांनी बांधलेल्या विविध गडकिल्ल्यांमुळे प्रसिद्धीस आला. आज या लेखाद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधलेल्या आणि इतर गडकिल्ल्यांची माहिती दिलेली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण ज्ञात आणि अज्ञात असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले | FORTS IN SINDHUDURG
मालवण तालुका (FORTS IN SINDHUDURG – MALVAN)
१ ) सिंधुदुर्ग किल्ला (SINDHUDURG FORT)
- उंची – 0
- प्रकार – जलदुर्ग
- गाव – मालवण
- तालुका – मालवण
सिंधुदुर्ग किल्ला (SINDHUDURG FORT) हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. इसवी सन २५ नोव्हेंबर १६६४ रोजी हा किल्ला बांधला. बांधकामाचे कार्य महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना सोपवले होते. शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्य स्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला. इसवी सन १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली.
या किल्ल्यावरती जरीमरी मातेचे मंदिर, हनुमंताचे मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या पुत्रांनी म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी देखील आहेत. ज्या विहिरींची नावे दूध विहीर, साखर विहीर, व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यावरती अजूनही लोक वस्ती करून राहतात. या किल्ल्याच्या चारही बाजूला निळा समुद्र असून, हा किल्ला त्या समुद्राच्या आत मध्ये वसलेला आहे. असे मानले जाते की, या किल्ल्यामधून एक भुयार आहे, जे सिंधुदुर्ग किल्ल्यातून, थेट आठ किलोमीटर अंतरावर ओझर या गावांमध्ये बाहेर निघते. ज्या कोळी बांधवांनी महाराजांना हे कुरटे बेट किल्ल्यासाठी शोधून देण्याचे काम केले त्या कोळी बांधवांना महाराजांनी गावे इनाम म्हणून दिलीत. समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूंना आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला अर्थात मालवण जलदुर्गाची निर्मिती केली.
२) भगवंत गड
- उंची – २० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरिदुर्ग
- गाव – बांदिवडे
- तालका – मालवण
मसुरे गावाजवळील मालवण तालुक्यामधील १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खाडीच्या पलीकडच्या तीरावर हा भुईकोट किल्ला स्थित आहे. सद्य परिस्थितीत हा किल्ला भग्न अवस्थेत असून, आजूबाजूला जंगल, झाडी आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत भगवंतगड पर्यटकांसाठी चालू असतो, नंतर हा गड पर्यटकांसाठी बघण्यास बंद होतो.
३) पद्मदुर्ग
- उंची – २० मी. स.स. पासून
- प्रकार – किनारी दुर्ग
- गाव – मालवण
- तालका – मालवण
मालवणहून सिंधुदुर्गाकडे जाताना डावीकडे पद्मदुर्ग दिसतो. सिंधुदुर्ग पाहून येताना बोटीनेच पद्मदुर्ग पाहण्यास जावे किंवा मालवण किनाऱ्याहून चालत दक्षिणेकडे मोरयाच्या धोंड्याकडे निघताना दांडगेश्वराचे देऊळ लागते. या देवळाजवळून पद्मदुर्गावर चालत जाण्याचा मार्ग आहे. पण फक्त ओहोटीच्या वेळी. कारण भरतीच्या वेळी पद्मदुर्गाला चारही बाजूने समुद्राचा वेढा पडतो.
पद्मदुर्गाला पश्चिम दिशेला एकमेव दरवाजा आहे. सर्व बाजूनी बळकट तटबंदी उभारण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गासोबतच याचीही उभारणी झाली. याठिकाणी आरमारी नौकांची बांधणी, दुरुस्ती अशी कामे केली जात. इथं लहानशी गोदी होती.
सध्या तटबंदीची थोडीफार पडझड झाली असून, तटावर झाडी उगवली आहेत. प्रवेशद्वार आणि दुर्गातदेखील बरीच झाडी आहेत. वेताळाचं मंदिर आहे. तसेच पाण्याची एक आटलेली टाकी आहे. गडाचा विस्तार लहान आहे. सन १७६३ मध्ये पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर हल्ला केला. त्यावेळी सिंधुदुर्गाजवळ एका आमच्या दुर्गावर मराठ्यांचे २०० लोक व सहा तोफा होत्या, तो दुर्ग फिरंग्यांनी ताब्यात घेतला असा उल्लेख आहे. हा दुर्ग म्हणजेच पद्मदुर्ग असावा.
४) राजकोट किल्ला
- उंची – ०५ मी. स.स. पासून
- प्रकार – किनारी दुर्ग
- गाव – मालवण
- तालका – मालवण
मालवणच्या धक्क्याहून उजव्या बाजूस उत्तरेकडे दहा-पंधरा मिनीटे चालत गेल्यावर राजकोट लागतो. आज गडाची एक मात्र बुरुजच उभारलेल्या अवस्थेत आहे. बाकी सर्व भुईसपाट झाले आहे. गावातील लोक मासळी वाळविण्यासाठी राजकोटचा उपयोग करतात. सन १८६२ मध्ये गडाची तटबंदी थोडीफार अस्तित्वात होती व एक तोफ देखील होती.
सिंधुदुर्गाचा हा सोबती पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीर यांच्यात झालेल्या तहानुसार, मालवण जवळच्या राजकोटात, इंग्रज कंपनीस वखारीस जागा द्यावी आणि मोठ्या जहाजांना तेथे राहण्यास परवानगी असावी, असे एक कलम होते.
५) सर्जेकोट किल्ला
- उंची – १० मी. स.स. पासून
- प्रकार – किनारी दुर्ग
- गाव – मालवण
- तालुका – मालवण
मालवणच्या उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर, कोळंब खाडीच्या रेवंडी गावाच्या हद्दीत, खाडीच्या ऐन तोंडाशी हा दुर्ग वसविलेला आहे. मालवणहून इथवर येण्यासाठी बसची सोय आहे. पश्चिमेस समुद्र असणारा सर्जेकोट आकाराने लहान आहे. सात बुरुजांनी व तटबंदीने बंदिस्त सर्जेकोटला फक्त पूर्वेला एकच प्रवेशद्वार आहे.
दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यावर एक बुजत आलेली पडकी विहिर दिसते, व एक मोठा वाडा दिसतो. या वाड्याला चार बाजूला चार बुरुज आहेत. आतमध्ये तुळशी कट्टा आहे. तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पश्चिमेला सागर लाटा सर्जेकोटाला येऊन धडकतात. इथून सिंधु सागराचे विराट दर्शन घडते. या लहान गडाला वालावलीच्या खाडीच्या मुखाशी असल्याने महत्व होते.
६) रामगड किल्ला
- उंची – ५० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरी दुर्ग
- गाव – वेले
- तालुका – मालवण
कोकणांत गड नदी (कालावली) नदीच्या काठावर लहानसा पण बळकट व सुंदर गड उभा आहे. त्याचे नांव रामगड. याच्या सभोवतालचा परिसर निसर्गरम्य आहे. पक्क्या रस्त्यापासून रामगड गावातून दहा मिनिटांत गड गाठता येतो. असे असून देखील हा गड पाहण्यास मात्र फारसे कोणी फिरकत नाही. त्यामुळे हा गड उपेक्षित राहिला आहे. मालवण कणकवली रस्त्यावर रामगड गांव उंचावर वसले आहे. गांव लहान आहे.
गांवामधील लाकडाच्या कारखान्याला लागूनच उजव्या बाजूने रामगडाकडे जाणाऱ्या वाटेने चालावे. पाच मिनिटांत पाण्याची टाकी लागते. तेथून थोडे पुढे चढल्यावर आपण दोन बुरुजांच्या आड लपलेल्या गडाच्या प्रवेशद्वारात येतो. या प्रवेशद्वाराच्या बाजूस असणाऱ्या दोन बुरुज दरवाजाच्या बाहेर १५ ते २० फुटापर्यंत पुढे वळवून आणले आहेत. त्यामुळे दरवाजापुढील ही १५-२० फुटाचा मार्ग दोन बुरुजांमधून जाते आणि हा मार्ग पूर्णपणे बुरुजाच्या मान्याच्या टप्प्यात येतो, हे या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य. जांभ्या दगडांत चुन्याचा अगर इतर लेप यांचा वापर न करता रामगड बांधला गेला आहे.
प्रवेशद्वार चांगल्या अवस्थेत आहे. यामधून आत यावे. दोन्ही बाजूस देवडी आहेत. दरवाजाच्या रामगडावरील उभ्या तोफा माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा सोपान आहे. माथ्यावरुन झाडांनी भरलेला संपूर्ण रामगड न्याहाळता येत नाही. दरवाजासमोरच अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष दिसतात. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस जवळ दुसरा दरवाजा आहे. दुसरा दरवाजा देखील मोठा असून त्यातून गडाखाली उतरता येते. पहिल्या दरवाजापासून अवघ्या ५० फुटावरच हा दुसरा दरवाजा का उभारण्यात आला? एका दरवाजावर हल्ला झाल्यास दुसऱ्या दरवाजामधून बाहेर पडून हल्ला चढवता यावा म्हणून कि अन्य कारणामुळे याचे उत्तर शोधत पुढे निघावे.
रामगडची तटबंदी व बुरुज एक दोन ठिकाणी थोडी कोसळलेली आहे. इतरत्र तट चांगल्या अवस्थेत आहे. गडाला एकूण पंधरा बुरुज आहेत. तटाची उंची १५ ते २० फूट इतकी उंच असून रुंदीला ७ ते १० फुटापर्यंत आहे. गडामध्ये फिरताना वाड्याचे अवशेष लक्ष वेधून घेतात. अवशेष पाहताना पूर्वी हा वाडा किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. वाडाच नव्हे तर रामगडच किती सुंदर असेल, याची कल्पना याठिकाणी आल्यावर करता येते. दरवाजापासून डाव्या बाजूस असणाऱ्या बुरुजामध्ये एक खोली आहे. एका वाड्याच्या चौथऱ्यावर सात तोफा मातीत उलट्या रोवून उभ्या करण्यात आल्या आहेत.
गडावरील अवशेष पाहत नदीच्या बाजूस यावे. याठिकाणी एक दरवाजा आहे. या दरवाजाची अवस्था थोडी वाईट आहे. या दरवाजाची लौकर डागडुजी केली नाही तर दरवाजा कोसळून पडायला वेळ लागणार नाही. या दरवाजामध्ये उभे राहिल्यावर खालून वाहणारी गडनदी लक्ष वेधून घेते. याठिकाणी बसून समोरचे दृश्य पाहण्यात वेळ कसा निघून जातो, हे कळत नाही. एके ठिकाणी सुंदर गणेश मूर्ती आहे. या ठिकाणी मोठे मंदिर होते.
गडामध्ये पाणी नाही. तटावरुन फेरी मारत मुख्य दरवाजाजवळ यावे. याठिकाणी आपली गडफेरी संपते. गड पाहण्यास किमान दोन तास तरी हवेत. सन १८६२ मध्ये गडामध्ये २१ तोफा होत्या आणि १०६ तोफगोळे होते. पण सध्या फक्त सहा तोफा आहेत.
रामगडची उभारणी शिवाजीमहाराजांनी केली. गडाचा इतिहास उजेडात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेंव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होऊन फेब्रुवारी १७५६ मध्ये रामगड जिंकून घेतला.
पुढे ६ एप्रिल १८१८ मध्ये रामगडने कॅप्टन पिअरसनच्या पुढे शरणागती पत्करली. या गडासंबंधी अन्य कांही ऐतिहासिक मिळते का याचा शोध घेतला पाहिजे.
७) सिद्धगड किल्ला
- उंची – १५० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – ओवाळीये
- तालुका – मालवण
सिद्धगड पाहण्याची इच्छा असल्यास कसालहून मालवणला जाणाऱ्या मार्गावरील ओवळिये गांव गाठावे. ओवाळिये गावाला लागूनच उत्तरेस सिद्धगड आहे. गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या उजव्या बाजूस प्रशस्त वाटेने तासाभरात गडावर पोहोचता येईल किंवा ग्रामपंचायत इमारतीपासून दोन मिनिट मालवणच्या रस्त्याने पुढे निघाल्यावर उजव्या बाजूस कच्च्या गाडी रस्त्याने जाता येईल. हा रस्ता अगदी गडाजवळ नेऊन सोडतो. पण पावसाळ्यात या वाटेने वाहन नेणे कठीण.
सिद्धगडाचे दरवाजे, तट नामशेष झाले आहेत. सिद्धमहापुरुषाचे भग्न मंदिर आहे. खांब तेवढे शिल्लक आहेत. जवळच बांधीव तळे असून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पण तळे दगड-मातीने भरले आहे. गडाच्या पूर्वेकडील सड्यावर जवळच धनगरवाडा आहे. तिथं पाणी मिळेल. मंदिराजवळ एका घुमटीत दोन पादुका आहेत. या पादुका शिवाजीमहाराजांच्या आहेत असं परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. गडावर दाट जंगलच पसरले आहे. वरुन भोवतालचा परिसर देखणा दिसतो. पूर्वेस दूरवर सह्याद्रीचे दर्शन घडते. गड पाहून ओवळिये गावात उतरावे.
८) वेताळगड
- उंची – २०० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – गुरामवाडी
- तालुका – मालवण
ओवळियेतून मालवणला जाणाऱ्या बसने कट्टा गावी उतरावे. कट्टापासून डाव्या हातास धामापूर तलावाच्या वाटेवर तीन कि. मी. अंतरावर चरीवाडी आहे. या लहानशा वाडीला खेटूनच वेताळगड उभा आहे. गड फारसा उंच नाही. अर्धा पाऊण तासात गडावर पोहोचता येईल. तट, बुरुज, दरवाजे इतिहासजमा झाले आहेत. गडावर विहीर आहे, पण पाणी नाही. गावातील लोकांच्या मते गडाबाहेर पाण्याची सोय आहे. पण त्याचा ठावठिकाणा सापडणे अवघड. चरिवाडीतून पाणी सोबत घेणे उत्तम. गडाला विस्तृत पठार लाभले आहे.
गडावरुन आजूबाजूचा परिसर पहात असतांना सावधगिरी बाळगण्यास विसरु नये. कारण गडावर बिबट्यांची बिळे आहेत. बिबटे व डुक्करांची संख्या बऱ्यापैकी आहे. बिबट्यांचे दर्शन होण्याची शक्यता फार. तेव्हा थोडे सांभाळून राहणे आवश्यक आहे. गड पाहून चरीवाडीत उतरावे. हा गड तसा अप्रसिद्ध. या गडासंबंधी माहिती देखील मिळत नाही. इथून धामापूरच्या दिशेने चालत निघावे. पंधरा मिनिटात आपण धामापूर तलावाकाठी पोहोचतो. सर्व बाजूंनी डोंगराने वेढलेला हा भला मोठा तलाव सुंदर आहे. तलावाकाठच्या कच्च्या रस्त्याने पंधरा-वीस मिनीटात धामापूर गाठता येईल आणि धामापूरला तलावाकाठी मुक्काम करता येईल.
९) भरतगड
- उंची – ७५ मी. स.स. पासून
- प्रकार – गिरिदुर्ग
- गाव – मसुरे
- तालुका – मालवण
मसुरे हे गाव भरतगडाच्या पायथ्याला आहे. कालावल खाडीच्या दक्षिण तीरावर भरतगड आहे. मालवण- -मसुरे असा गाडी मार्ग आहे. मसुरे जवळील डोंगरावर भरतगड किल्ला आहे. किल्ला लांबुळक्या आकाराचा आहे.
भरतगड किल्ल्याचे बुरूज आणि पायऱ्या त्याच्या भव्यतेची साक्ष देतात. ५ ते ६ एकरवर पसरलेला भरतगड मसुरे गावातील टेकडीवर उभा आहे. गडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायर्या बांधून काढलेल्या आहेत. भरतगडावर खाजगी मालकीची आमराइ असल्यामुळे गड साफ ठेवला गेला आहे. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोनही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत. •
गडमाथा व डोंगर झाडीने झाकला गेल्याने दुरून किल्ला ओळखू येत नाही. गडाची तटबंदी तसेच गडाचे बुरूज, तोफा, विहीर इ. पाहायला मिळतात. गडाला परकोटही आहे. गडावरून कालावल खाडीचे दृश्य तसेच भगवंतगड देखील दिसतो.
ब) देवगड तालुका (FORTS IN SINDHUDURG – DEVGAD)
१) विजयदुर्ग किल्ला (VIJAYDURG FORT)
- उंची – 0
- प्रकार – किनारीदुर्ग
- गाव – देवगड
- तालुका – देवगड
सिंधुदुर्ग मधील सर्वात जुना किल्ला VIJAYDURG FORT, मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. या किल्ल्याला इस्टर्न जिब्राल्टर असे देखील म्हणतात. कारण तो एक अजिंक्य जलदुर्ग होता १७ एकर अशा विशाल जागेवर पसरलेल्या या किल्ल्याला तीन भक्कम तटबंदी असून, त्या काळामध्ये पाषणाने बांधलेल्या आहेत. तीन बाजू पाण्याने वेढलेल्या असून किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी २०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग असून, तो गावातल्या धुळप्याच्या राजवाड्यात निघतो. किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी एक शुद्ध पाण्याचा तलाव देखील आहे.
विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. हा किल्ला ३० मीटर उंच खडकावर आहे. किल्ल्याला तीन भिंती आहेत. एक आहे ती समुद्रकिनाऱ्यालगत आहे, दुसरी बुरुजाची म्हणजे संरक्षक भिंत आणि तिसरी मुख्य किल्ल्याची भिंत. शत्रुने अचानक हल्ला केला तर बचावासाठी किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी पश्चिमेकडे आहे. या किल्ल्यावर हनुमान मंदिर, तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा, ध्वजस्तंभ, जिभेचा दरवाजा, खलबतखाना, सदर अशी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.
२) देवगड किल्ला
- उंची – 0
- प्रकार – किनारी दुर्ग
- गाव – देवगड
- तालुका – देवगड
देवगड किल्ला हा जंजिरा देवगड किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो. देवगड पासून पाच किलोमीटर अंतरावर देवगड किल्ला उभारला गेला आहे. हा एक जलदुर्गाचा प्रकार आहे. किल्ल्यावर दीपगृह गणेश मंदिर, तीन तोफा, बुरुज इत्यादी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.
हा किल्ला १७२९ मध्ये दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला व नंतर कान्होजी आंग्रे यांच्या नियंत्रणामध्ये बरेच वर्ष होता.
३) सदानंदगड
- उंची – १०० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – साळशी
- तालुका – देवगड
रामगड-शिरगांव मार्गावर रामगडहून अर्ध्यापाऊण तासाच्या अंतरावर कुवळे गांव आहे. हा संपूर्ण भाग, डोंगर व दाट जंगलाने व्यापलेला असल्याने हा प्रवास सुखद आहे. कुवळे गांवाला लागूनच आचरे नदी आहे. नदीपलिकडेसुद्धा वस्ती आहे. इथून सदानंदगडावर जाण्यासाठी वाट आहे, पण सदानंदगड या नांवाने हा गड पूर्णपणे अपरिचित आहे.
गावातून दहा मिनिटात आपण माथ्याजवळील कातळाजवळ येऊन पोहचतो. या ठिकाणी रुंद पायऱ्या खोदल्या आहेत. पायऱ्या चढून माथ्यावर यावे. याठिकाणी दरवाजा, तट, बुरुज यांचे कांहीच अवशेष शिल्लक नाहीत. गडाचा विस्तार मोठा आहे. थोडे पुढे गेल्यावर २० फूट लांबी रुंदीची विहीर आहे. खोली २५ फुटापर्यंत असावी. दगड, माती पडून थोडी बुजली आहे, पूर्वी ही विहीर खोल होती, असे सांगितले जाते. यात पाणी नाही, येथून दहा मिनिटांच्या अंतरावर सरळ रेषेत दुसरी विहीर आहे. पहिल्या विहिरीइतकीच मोठी असून यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, पण पाणी नाही. जवळ एक लहान गुहा आहे. आतमध्ये २५-३० वर्षापूर्वी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त गडावर फारसे अवशेष नाहीत.
गडावर येण्यासाठी साळशीहून देखील मार्ग आहे. त्याबाजूने येताना देखील खोदीव पायऱ्या लागतात. याठिकाणी एक उद्ध्वस्त मंदिर आहे. दुरचा चाळ (?) या देवाचे. सदानंदगडाजवळ सडे देवीचा डोंगर आहे. गडावरुन हा डोंगर दिसतो, या डोंगरावर कुकटबाव या नावाची विहीर आहे. यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या मोठ्या विहिरीत बाराही महिने पाणी असते. येथील ही देवी या भागात प्रसिद्ध आहे. कुवळे गावामध्ये सदानंदगडाबद्दल चौकशी केल्यावर या सडे देवीच्या डोंगरावर जाण्यास सांगतात. जाऊन येण्यास कांही हरकत नाही, पण गडदेखील पाहून घ्यावा.
क) वेंगुर्ला तालुका (FORTS IN SINDHUDURG– VENGURLA)
१) यशवंत गड
- उंची – २० मी. स.स. पासून
- प्रकार – किनारीदुर्ग
- गाव – रेडी
- तालुका – वेंगुर्ला
यशवंत किल्ला हा रेडी या गावामध्ये स्थित आहे. “राज्य संरक्षित स्मारक” म्हणून जाहीर झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ गड आहेत त्या पैकी एक रेडी गावातील यशवंतगड आहे.
श्री अनिरुद्ध प्रभू यांच्या लेखानुसार 👇
इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. १६ व्या शतकाच्या आसपास हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाने बांधला असावा असेही काही इतिहासकार सांगतात. १६६४ च्या सुमारास मालवणच्या कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘सिंधुदुर्ग’ हा किल्ला बांधला. त्याच सुमारास हा किल्ला महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्याची दुरुस्ती करून आज दिसते त्याप्रमाणे त्यास बळकट असे रूप तर दिलेच पण ‘यशवंतगड ‘ नावही त्यांनीच दिलं.
यशवंतगडाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची बांधणी व गडावरील मोठ्या प्रमाणात आस्तित्वात असलेले अवशेष होत. रेडी गावातून गडावर प्रवेश करण्यासाठी छोटेखाणी प्रवेशद्वार व त्याचे रक्षण करणारे बुरुज व तटबंदी नजरेस पडते. किल्ल्याच्या तटबंदीच्या घेर हा जवळपास दीड मैल एवढी आहे. ताटाच्या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पाखाडी बांधलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. पायवाटेने चालत गेल्यावर थोड्या उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो. या दरवाज्यापासून थेट बालेकिल्ल्यापर्यंत पाय-या होत्या.
बालेकिल्ल्याचा घेर जवळपास पाव मैल आहे. बालेकिल्ल्याच्या तटाची उंची सुमारे ३० मीटर असून तटाच्या आग्नेय दिशा वगळता खंदक खोदलेला आहे. त्याची रुंदी २४ फूट आणि खोली सुमारे १३ फूट आहे. हा खंदक पूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेला असून तो दगडांनी बांधून काढलेला आहे. खंदकाच्या पूढे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा पहिल्या दरवाजाच्या काटकोनात आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. पुढे थोड्याउंचीवर तिसरा दरवाजा (मुख्य प्रवेशद्वार) लागतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या डाव्या हाताच्या बुरूजात छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळणरस्ता (भूयार) आहे.
मुख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे. गडावरील सर्व दरवाजांच्या कमानी शाबूत आहेत. मुख्य प्रवेशद्वारातूनआत शिरल्यावर समोर व उजव्याबाजूला पहारेकर्यांसाठी बांधलेल्या कमानदार खोल्या (देवड्या) आहेत. चौथा दरवाजा तिसऱ्या दरवाजाच्या काटकोनात असून त्यापूढे (अंदाजे ७ फूट लांब) बोगद्याप्रमाणे रचना केलेली आहे. आतमध्ये पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. या दरवाजाच्या बाजूने असलेली २० फूट उंच तटबंदी सर्व किल्ल्याला वेढते. बालेकिल्ल्यात आत शिरल्यावर आपल्याला राजवाडा आणि कचेरीची दुमजली इमारत दिसते. या इमारतीची रचना भुलभुलैयासारखी आहे.
बालेकिल्ल्याचा १/३ भाग व्यापणाऱ्या या इमारतीत फिरतांना आपण कुठल्या दालनातून कोठे आलो हे कळत नाही. इमारतीचा पहिला व दुसरा मजला शाबूत नाही. पण तूळ्यांसाठी भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या उंचीवर असलेले दरवाजे, खिडक्या, कोनाडे, झरोके पाहाता येतात. या इमारतीच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झालेले आहेत. इमारतीच्या एका चौकात हौद किंवा तरण तलाव असून तो २०×२० फूट मापाचा आहे. त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. हौदाच्या काठावर दगडी स्तंभ असून त्यावर चुन्यात रेखलेली पानफूल आहेत. इमारतीच्या भूलभूलैयातून बाहेर पडल्यावर उत्तरेकडील व पूर्वेकडील तटात आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पहाऱ्याच्या जागा पाहायला मिळतात.
तटाच्या आत जाण्यासाठी चोर दरवाजांप्रमाणे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत. त्याच्या आत ३ फूट उंच भिंतीचा आडोसा केला असून त्या भिंतीच्या आड बसून दूर पर्यंतच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. उत्तर बुरुजावरुन अरबी समुद्र व रेडीची खाडी यांच्या संगमाचे अप्रतिम दृश्य दिसते. बुरुजावरील जंग्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या व्यतिरीक्त गडावर एक कोठारासारखी इमारत प्रवेशद्वारासमोर आहे. गडावर पाण्याची टाकी, तलाव अथवा विहिरीचे अवशेष दिसत नाहीत.
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या किल्ल्याची स्थिती उत्तम होती मात्र स्वातंत्र्यानंतर इतरांप्रमाणेच याही किल्ल्याची स्थिती ढासळत गेली. आज या गडाची अवस्था हि अन्य गडांपेक्षा जरा जास्तच हालाखीची असून प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या दुर्लक्षामुळे ती अजूनच खराब होत आहे. सध्या गरज आहे ती हा गड संवर्धित करण्याची आणि जगासमोर आणण्याची सुद्धा…..श्री. अनिरुद्ध प्रभू
२) निवती किल्ला
- उंची – २५ मी. स.स. पासून
- प्रकार – किनारी दुर्ग
- गाव – भोगवे-निवती
- तालुका – वेंगुर्ले
कर्ली नदी रांगणाजवळ उगम पावून ज्याठिकाणी सागराला मिळते, त्या ठिकाणी, म्हणजे कर्ली खाडीच्या दक्षिणेला निवतीदुर्ग एका टेकडीवर शिवाजीमहाराजांनी उभारला. निवती गावातून निवती गडाच्या दरवाजापर्यंत गाडी रस्ता आहे. पाच मिनिटात पायवाटेने नष्ट झालेल्या प्रवेशद्वारातून गडामध्ये दाखल व्हावे. डाव्या बाजूस अवशेष दिसतात, उजवीकडे गडाचा पसारा आहे. पण सर्वत्र करवंदीची झाडे आहेत. या झाडीमध्ये अवशेष लपून राहिले असावेत. ते धुंडाळणे कठिण आहे. तटाकडेने नीट फेरीदेखील मारता येत नाही. या बाजूला तटाबाहेर खंदक खणलेला आहे.
दरवाजामधून आत आल्यावर थेट समोर चालत गेल्यावर आपण तटाजवळ पोहोचतो. उजव्या बाजूला खंदक दिसतो. हा खंदक तटाच्या आतून उजव्या बाजूस पुढेपर्यंत गेला आहे. बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी हा खंदक खणलेला आहे. तटापासून उजव्या बाजूस पुढे गेल्यावर दरवाजा लागतो. या दरवाजामधून आत प्रवेश केल्यावर आपण बालेकिल्ल्यात येतो. बालेकिल्ल्याचा परिसर फार मोठा नाही. तट, बुरुजांनी बंदिस्त आहे. इथून सिंधुसागराचे रम्य दर्शन घडते. गडामध्ये पूर्वी दोन विहिरी होत्या. पण सध्या त्या बुजल्या आहेत. अवशेष फारसे शिल्लक नाहीत. पण गड मात्र सुंदर आहे.
गडाजवळच भोगवे गांव आहे. येथील समुद्रकिनारा फारच सुंदर आहे. निवतीला आल्यावर, भोगवेला अवश्य भेट द्यावी.
१८ व्या शतकामध्ये निवती सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढविला. गड सावंतांच्या ताब्यात होता. त्यावेळी इस्माईलखान ह्या पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या कॅप्टनने शौर्याची कमाल करुन निवतीवर पोर्तुगीजांचे निशाण लावले. हा इस्माईलखान यापूर्वी संभाजी आंग्रेंच्या पदरी होता. त्यानंतर सावंतवाडीकरांच्या पदरी आला. तिथून आणखी थोड्यांच्या पदरी राहून तो पोर्तुगीजांच्या सेवेत आला.
निवतीमध्ये व्हाईसराय स्वतः होता. त्याला बातमी मिळाली की, कर्ली नदीत (निवतीच्या उत्तरेस) सावंतवाडीकर तारवे (नांव) बांधीत आहेत व त्यांच्या रक्षणार्थ त्याने नदीच्या तीरावर तोफा रचून ठेवल्या आहेत. ही गोष्ट इस्मालखानच्या कानावर गेल्यावर, तो व्हाईसरॉयची आज्ञा घेऊन कर्ली नदीकडे गेला. तेथील सावंतांची तारवे जाळून टाकली. करवीरकर (कोल्हापूर) व सावंतवाडीकर यांचे वैर होते. पोर्तुगीजांनी निवती घेतलेली पाहून सिंधुदुर्गच्या सुभेदाराने (सिंधुदुर्ग करवीरांच्या ताब्यात होता) व्हॉईसरॉयकडे निवतीमध्ये माणसे पाठवून सदिच्छा व्यक्त केली.
निवती कांही वर्षांनंतर परत सावंतांच्या ताब्यात आला. सन १७८७ मध्ये मोर्चेल प्रकरणावरुन करवीर व सावंतवाडीकर यांच्या मध्ये लढाई झाली त्यावेळी करवीरच्या छत्रपतींनी निवती किल्ला जिंकून घेतला. सन १८०३ मध्ये निवती सावंतांकडे आला. सन १८१८ मध्ये जनरल कीर याने निवती किल्ला ४ फेब्रुवारी रोजी घेतला, तेंव्हा प्रतिकार झाला नाही.
ड) कणकवली तालुका (FORTS IN SINDHUDURG –KANKAVLI)
१) भैरवगड
- उंची – ४८० मी. स.स. पासून
- प्रकार – वनदुर्ग
- गाव – भर्देवाडी – नरडवे
- तालुका – कणकवली
दुर्गवाडीतून सात-आठ कि. मी. अंतरावर नरवडे गांव आहे. नरवडेहून कच्च्या गाडीरस्त्याने वीस मिनिटात भैरवगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भेर्डेवाडी गावाकडे निघावे. भेर्देवाडीतून गडाकडे पाहिल्यावर गडाच्या डाव्या बाजूने एक सोंड गावापर्यंत उतरत आलेली आहे. त्या सोंडेवरुन चढणीला सरुवात करावे. वाट दाट झाडीमधून जाते. या ठिकाणी प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या घेतल्यास उत्तम.
समोर सह्याद्रिशी खिंडीने जोडलेला भैरवगड तर उजव्या हातास सह्याद्रिचे सुंदर दर्शन घेत पाऊण तासात माथ्यावर यावे. तिथून उजवी मारुन दहा पंधरा मिनिटात नामशेष झालेल्या दरवाजातून आपला प्रवेश गडामध्ये होतो. हा लहानसा गड तट बुरुजांनी बंदिस्त होता. पण सध्या तट-बुरुज ढासळले आहेत.
गडावर बरीच झाडी आहे. दुर्गावरील भैरवनाथाचे (ब्राम्हणभैरी) देवालय या रहाळात प्रसिध्द आहे. भेर्देवाडी व गडाच्या उत्तर पायथ्याशी असणाऱ्या रांजणगावातील लोकांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. आत भांडी देखील ठेवण्यात आली आहेत. मंदिरासमोर भग्न दीपमाळा, व जवळच दोन तोफा आहेत. फेब्रुवारी-मार्च मध्ये भेर्दे या ठिकाणी यात्रा भरते. पाण्याची तळी आहेत. पण त्या मध्ये फेब्रुवारीनंतर पाणी रहात नाही.
गडावरील इतर अवशेष झाडीमध्ये लपले आहेत. ते धुंडाळण्यास जावे तर या झाडीमध्ये अस्वल, डुकरे, बिबटे व इतर प्राणी बसले असण्याची शक्यता फार. गावातील लोक शिकार करण्यासाठी गडावर येतात. सह्याद्रीच्या माथ्यावरील दाट अरण्यातील पशू या गडावर येतात. गडावरुन सह्याद्रीचा माथा गाठणे अवघड नाही.
२) खारेपाटण किल्ला
- उंची – ५० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – खारेपाटण
- तालुका – कणकवली
महामार्गापासून दोन कि.मी. अंतरावर नदीच्या तीरावर असलेल्या लहानशा टेकडीवर खारेपाटण किल्ल्याचे अवशेष आढळून येतात. कालौघात दुर्लक्षित झाल्यामुळे या किल्ल्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गच्च झाडीमुळे दुरून त्याचे दुर्गपण ओळखू येत नाही. बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष काही ठिकाणी दिसतात.
तीन कोपर्यावरचे तीन बुरुज कसेबसे उभे आहेत. मुस्लीम आमदनीच्या काळात हा किल्ला बराच काळ त्यांच्या ताब्यात होता. पुढे १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी तो जिंकुन घेतला. इ.स.१७१३ मधे कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा ताबाही आंग्रेकडे राहीला.
इ) कुडाळ तालुका (FORTS IN SINDHUDURG – KUDAL)
१) नरसिंहगड/सोनगड
- उंची – ३५० मी. स.स. पासून
- प्रकार – वनदुर्ग
- गाव – घोटगे
- तालुका – कुडाळ
तटावरुन खालचा मुलुख न्याहाळीत फेरफटका मारण्यात वेगळाच आनंद आहे. गड फार मोठा नाही, परंतु आटोपशीर आहे. गडाच्या पश्चिम दिशेला खोलगट भाग आहे व पूर्व दिशेस सपाटी आहे. या ठिकाणी एका मोठ्या चौथऱ्यावर झाडीखाली सोनदेवाची मुर्ती आहे. जवळच दुसरी भग्न मूर्ती आहे. या ठिकाणी अनेक उद्ध्वस्त चौथरे पसरले आहेत.
सोनगड उत्तर दक्षिण असा सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी थोडे अंतर राखून समांतर उभा आहे. सोनगड व सह्याद्रीची मुख्य रांग यांच्यात अंतर फारतर दिडशे दोनशे फूट असेल. सोनगडच्या मध्यातून एक चिंचोळी सोंड सह्याद्रीशी जोडली गेली आहे. या सोंडेवरुन दाट झाडीने व्यापलेल्या सह्याद्रीच्या माथ्यावर जाता येईल. पण वाट थोडी अवघड आहे. सोनगड व सह्याद्री मधील दरी सुरेख आहे.
कोकणातून घाटमाथ्यावर घेऊन जाणाऱ्या घोटगे घाटावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची उभारणी झाली होती. गडासंबंधी महत्वाची माहिती उपलब्ध नाही. १८ व्या शतकात सावंतवाडीच्या सावंत-भोसलेंच्या ताब्यात हा दुर्ग होता. सावंतवाडीकरांनी बादशहाकडून स्वतः साठी मोर्चेल आणले, करवीरकरांना सावंतांचे असे वागणे मान्य नव्हते. करवीरकरांनी सावंतांविरुद्ध स्वारी केली. करवीरच्या फौजांनी घाटाखाली उतरुन सोनगड जिंकून घेतला.
सन १७८७ मध्ये करवीर सावंतामध्ये समेट झाल्यावर सोनगड पुन्हा सावंताच्या ताब्यात देण्यात आला. अशी माहिती गोव्याच्या व्हाईसरॉयला पाठविलेल्या पत्रात उल्लेखलेली आहे.
२) मनसंतोषगड
- उंची – ६८० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – शिवापूर
- तालुका – कुडाळ
सह्याद्रीच्या मुख्य रांगेलगतच मनोहरगड व मनसंतोषगड आहेत. हे दोन्ही जोडकिल्ले आहेत. या किल्ल्यांच्या माथ्याला कातळभिंती आहेत. पैकी मनसंतोषगडावर जाणारा मार्ग नष्ट झालेला आहे. त्यामुळे गडाच्या माथ्यावर जाता येत नाही.
३) मनोहर गड
प्रस्तररोहणाचे तंत्र वापरूनच गडाचा माथा गाठावा लागेल. मनसंतोषगडावरून सह्याद्रीची रांग व रांगणा, नारायणगड, महादेवगड असे किल्ले दिसतात.
- उंची – ६८० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – शिवापूर
- तालुका – कुडाळ
सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून सुटावलेल्या दांडावर मनोहरगड व मनसंतोषगड ही किल्ल्यांची जोडगोळी आहे. शिवापूरकडून अथवा शिरशिंगकडून गडावर जाण्यास मार्ग आहे.
कातळभिंतीसारखे असलेल्या या, दोन किल्ल्यांपैकी मनोहरगडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. मनसंतोषवर जाण्यासाठी रस्ता नाही. गडावर पाणी नाही. मनोहरगडावरून सह्याद्रीची रांग व रांगणा, नारायणगड असे किल्ले दिसतात.
फ) सावंतवाडी तालुका (FORTS IN SINDHUDURG – SAWANTWADI)
१) महादेव गड
- उंची – २५० मी. स.स. पासून
- प्रकार – गिरीदुर्ग
- गाव – आंबोली
- तालुका – सावंतवाडी
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येत आहे. आंबोलीहून तीन कि. मी. अंतरावरील महादेवगड पॉईंट बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. चांगला डांबरी रस्ता गडावर घेऊन जातो. लोकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. इथून दिसणारा सूर्यास्त भान हरपायला लावणारा आहे. तसेच वातावरण स्वच्छ असेल तर समुद्राची लकेर देखील दृष्टीस पडते.
या सुंदर स्थळी महादेवगड नांवाचा एक दुर्ग होता हे सांगूनही लोकांना पटणार नाही अशी या गडाची अवस्था झाली आहे. गडावरील सर्वच अवशेष नष्ट झाले आहेत. कधीकाळी हे ठिकाण दोन दरवाजे, पूर्व दिशेला तीन बुरुज व तटबंदीने युक्त होते. आंबोलीमुळे महादेवगड हे नांव तरी टिकून आहे नाहीतर दुर्गाप्रमाणे हे नांव देखील विस्मृतीत गेले असते. कोकणातून घाटावर घेऊन जाणाऱ्या पारपोली (आंबोली) घाटावर नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली होती. याचा निर्माता अज्ञात आहे. सावंतवाडीच्या सावंतानी या दुर्गाची उभारणी केली असावी.
महादेवगडाजवळच नारायणगड आहे. दोन्ही गडांची फारशी माहिती उपलब्ध नाही. करवीर राज्याचे सेवक सावंतवाडीचे सावंतांकडे हे दुर्ग होते. ते वारंवार करवीर राज्याविरुद्ध बंडखोरी करीत. सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी सावंतांकडील महादेवगड व नारायणगड पावसाळ्यामध्ये जिंकून घेतले. (सन १७७३ पूर्वी) करवीरकरांच्या ताब्यातील प्रसिद्धगड (रांगणा) देखील जिवाजी विश्रामने घेतला. तेव्हा संभाजी महाराजांची पत्नी राणी जिजाबाई महादेवगडावरती राहून मोहिम चालवीत नारायणगड जिंकून प्रसिद्धगडास वेढा दिला. पुढे सन १८३० मध्ये इंग्रज सेनानी कर्नल मॉर्गन याने महादेवगड व नारायणगड जिंकून घेतले.
२) नारायणगड
- उंची – ५०० मी. स.स. पासून
- प्रकार – वनदुर्ग
- गाव – गेळे
- तालुका – सावंतवाडी
महादेवगडाच्या उत्तरेस सह्यधारेशी एका खिंडीने जोडला गेलेला नारायणगड उभा आहे. आंबोलीहून गळे गांवात यावे. गळे गावात रवळनाथांचे सुंदर व प्रशस्त मंदिर आहे. गांवातून वाटाड्याला सोबत घ्यावे. तसेच गळे गांवात देखील कित्येकांना नारायणगड माहिती देखील नाही. त्यामुळे वाटाड्याला शोधणे देखील जिकीरीचे होईल. पण प्रयत्न केल्यास अवश्य मिळेल. मंदीराच्या डाव्या बाजूने चालण्यास सुरुवात करावी. वाट चढ उताराची नाही.
अर्ध्या तासात पठार ओलांडून आपण झाडीमध्ये शिरतो. याठिकाणी डाव्या बाजूस उद्ध्वस्त शंकराचे देऊळ आहे. आतमध्ये शिवपिंड आणि समोर नंदी आहे. उजव्या हातास देवीच्या दोन लहान मूर्ती आहेत. इथून पुढील वाट उतरतीला लागते. पाच मिनिटात आपण सह्याद्रीची मुख्य रांग व नारायणगड यांना जोडणाऱ्या खिंडीत येऊन पोहोचतो. शिरशिंगे, गोठवेवाडी गांवातून नारायणगडावर येणारी वाट याठिकाणी येऊन मिळते. खिंडीतून थोडा चढ चढून उद्ध्वस्त दरवाजातून आपला प्रवेश गडामध्ये होतो.
नारायणगड मध्यम आकाराचा गड, फार मोठा नाही. गडावर चौथऱ्यांचे अवशेष पसरले आहेत. अवशेष पाहात थोडे पुढे गेल्यावर उजव्या हातास सातेरी देवीचे उद्ध्वस्त देऊळ आहे. इथली मूर्ती गावात नेण्यात आली आहे. गडावर वनखात्याने झाडांची लागवड केली आहे. तटबंदीच थोडेफार अवशेष टिकून आहेत. गडाच्या पश्चिम टोकावर झाडीमधून वाट काढीत यावे. इथून कोकणचे सुंदर दृष्य दिसते. उजव्या बाजूस मनोहर-मनसंतोषगड दिसतात.
३) हनुमंत गड
- उंची – २५० मी. स.स. पासून
- प्रकार – वनदुर्ग
- गाव – फुकेरी
- तालुका – सावंतवाडी
बांदे-तळकट-झोळांबे-धारपी असा रस्ता आहे. झोळांबेपासून कच्च्या रस्त्याने चकूल डोंगरावरील फुकेरी गावाला जावे लागते. फुकेरी गावाच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहे. या डोंगरांच्या खळग्यामध्ये फुकेरी गाव आहे. फुकेरी हे गाव हनुमंतगडाच्या पदरात आहे. गडावर पाणी आहे. मुक्कामाची सोय नाही. फुकेरी गावात मुक्काम करणे सोयीचे आहे. हनुमंतगडावरून सह्याद्रीची रांग उत्तम दिसते. येथून पारगडाकडेही चालत जाता येते.
वेंगुर्ले डच वखार
- डच वखार – वेंगुर्ला कोट
- किल्ल्याचा प्रकार : भुई कोट
- डोंगररांग: डोंगररांग नाही
- जिल्हा : सिंधुदुर्ग
पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी युरोपातील विविध देशातील व्यापारी भारतात बनणारा माल (मसाले, सुती कपडे,सोन्या चांदीच्या वस्तू इ.) युरोपात विकून भरपूर नफा कमवत असत. तर युरोपात तयार होणारा माल (बंदुका, तोफा, दारू, काच सामान, लोकरीचे कपडे, दुरदर्शिका,चष्मे इ.) भारतात आणून विकत असत. या सागरी मार्गाने होणार्या व्यापारातील माल साठवण्यासाठी या परदेशी व्यापार्यांनी ठिकठिकाणी बंदरांजवळ आपल्या वखारी (वेअर हाऊस/ गोडाऊन) स्थापन केल्या. वेंगुर्ले शहरात आजही या वखारीचे अवशेष पहायला मिळतात.
वेंगुर्ले वखारीची तटबंदी १० फूट उंच व १ मीटर रूंद आहे. वखारीच्या चारही टोकाला पोर्तुगिज धाटणीचे चौकोनी बुरुज आहेत. बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जंग्यांची रचना केलेली आहे. वखारीच्या प्रवेशव्दाराची कमान अर्धवर्तूळकार आहे. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दातून आत शिरल्यावर समोरच ३० मीटर लांब व १५ मीटर रूंद दुमजली इमारत आहे. या इमारतीची बरीच पडझड झालेली आहे, तरी आपल्याला दुसर्या मजल्यावर जाता येते. इमारतीच्या मागच्या बाजूस चौकोनी विहिर आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर जीना आहे. दोनही मजल्यावर भरपूर दालन आहेत. पहिल्या मजल्यावरील एका दालनाच्या भिंतीत समोरासमोर अनेक खोबण्या आहेत व त्यातील बर्याच खोबण्यांत लाकडाचे तुकडे आहेत. या ठिकाणी पूर्वी लाकडाची मांडणी (रॅक्स) असावी, त्याचा उपयोग काच सामानाच्या वस्तू ठेवण्यासाठी होत असावा असा तर्क करता येतो. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद जीना आहे, वरून संपूर्ण वखार दृष्टीच्या टप्प्यात येते.
महादेव गड कुठे आहे ?
आंबोलीहून तीन कि. मी. अंतरावरील महादेवगड पॉईंट बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. चांगला डांबरी रस्ता गडावर घेऊन जातो.
सर्जेकोट किल्ला कुठे आहे ?
मालवणच्या उत्तरेस दीड किलोमीटर अंतरावर, कोळंब खाडीच्या रेवंडी गावाच्या हद्दीत, खाडीच्या ऐन तोंडाशी हा दुर्ग वसविलेला आहे. मालवणहून इथवर येण्यासाठी बसची सोय आहे. पश्चिमेस समुद्र असणारा सर्जेकोट आकाराने लहान आहे. सात बुरुजांनी व तटबंदीने बंदिस्त सर्जेकोटला फक्त पूर्वेला एकच प्रवेशद्वार आहे.
विजयदुर्ग किल्ला कसा आहे ?
विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. हा किल्ला ३० मीटर उंच खडकावर आहे. किल्ल्याला तीन भिंती आहेत. एक आहे ती समुद्रकिनाऱ्यालगत आहे, दुसरी बुरुजाची म्हणजे संरक्षक भिंत आणि तिसरी मुख्य किल्ल्याची भिंत. शत्रुने अचानक हल्ला केला तर बचावासाठी किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी पश्चिमेकडे आहे. या किल्ल्यावर हनुमान मंदिर, तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा, ध्वजस्तंभ, जिभेचा दरवाजा, खलबतखाना, सदर अशी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.
निष्कर्ष
आम्ही आमच्या लेखाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ल्याची माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि आम्हास कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद.