GRISHNESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE । घृष्णेश्वर मंदिर माहिती मराठी – भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगांमध्ये, ज्याचे दर्शन केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, ते शेवटचे शिवज्योतिर्लिंग म्हणजेच घृष्णेश्वर होय. भारतातील महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ३० किलोमीटर अंतरावर, वेरूळ गावा जवळ, हे घृष्णेश्वराचे दिव्य असे ज्योतिर्लिंग आहे. आज आपण या लेखाद्वारे या मंदिराचा इतिहास, या मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूयात घृष्णेश्वर मंदिर आणि त्याची माहिती.
घृष्णेश्वर मंदिर माहिती मराठी : GRISHNESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी
नाव – | घृष्णेश्वर मंदिर |
कुठे आहे – | संभाजीनगर, महाराष्ट्र |
स्थान – | भगवान शंकर |
दुसरे नाव – | घुश्मेश्वर, घृष्मेश्वर |
स्थापना – | १७३० मध्ये गौतमीबाई होळकर |
जीर्णोद्धार – | अहिल्याबाई होळकर |
बांधकाम – | २४० फूट लांब १८५ फूट रुंद म्हणजेच ४४ हजार ४०० चौरस फूट |
घृष्णेश्वराचा गाभारा – | १७ फूट लांब १७ फूट रुंद |
नदी – | येळगंगा नदी |
उत्सव – | महाशिवरात्र |
घृष्मेश्वर मंदिर नकाशा
घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास (GRISHNESHWAR TEMPLE HISTORY)
या मंदिराची ऐतिहासिक दृष्ट्या कोणतीही ठाम नोंद नसली, तरीही साधारणपणे या मंदिराचे मूळ १३ व्या शतकापूर्वीचे आहे असे मानले जाते. १३ व्या, १४ व्या शतकामध्ये दिल्ली सल्तनतच्या राजवटीत या मंदिराचा वारंवार नाश झाल्याचे आढळून येते. हे मंदिर इस्लामिक आक्रमणामुचे बळी ठरले होते. त्याची तोडफोड करण्यात आली होती.
यानंतर १६ व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी याची पुनर्बांधणी केली. त्यानंतरही या मंदिरावर हल्ले झाले. असे म्हटले जाते की, सन १७३० मध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाईंनी हे मंदिर बांधले असून नंतर शिवभक्त इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकामध्ये, मुघल साम्राज्याच्या पतनानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
या मंदिराजवळून अत्यंत पवित्र असलेली येळगंगा नदी वाहते. २४० फूट लांब आणि १८५ फूट रुंद असलेले हे मंदिर आजही अतिशय मजबूत आणि सुंदर आहे. मंदिराच्या अर्ध्या उंचीपर्यंत लाल रंगाच्या पाषाणात श्री विष्णूंचे दशावतार दाखवणाऱ्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. जयराम भाटिया नावाच्या दानशूर व्यक्तीने सुवर्णाने मढवलेले तांब्याचे कळस बनवून अर्पण केले आहे. मोठ्या दगडात घडवलेल्या २४ खांबांवर सभामंडप आधारलेला आहे. यातील प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले आहे. तसेच अनेक सुंदर चित्रे ही कोरलेली आहेत.
घृष्णेश्वराचा गाभारा १७ फूट लांब व १७ फूट रुंद असून श्री भगवान शंकराचे हे दिव्य ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यासमोर सभा मंडपात भला मोठा नंदी ही आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. याची रचना लाल रंगाच्या दगडांनी बनलेली आहे. तसेच याचे बांधकाम ४४ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. हे मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग आहे.
सुधर्मा, सुदेहा आणि घृष्मा यांच्या पौराणिक कथेनुसार याला घृष्मेश्वर हे देखील नाव पडले आहे.
घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती व्हिडिओ
घृष्णेश्वर नावाचा अर्थ (MEANING OF GRISHNESHWAR)
घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारावे ज्योतिर्लिंग असून याचा अर्थ घृष्ण + ईश्वर = घृष्णेश्वर असा होतो. घृष्णेश्वर म्हणजे करुणेचा स्वामी, म्हणजेच भगवान शंकर.
घृष्मेश्वर मंदिर वास्तुकला (ARCHITECTURE OF GRISHNESHWAR)
सन १७३० मध्ये मुघलांच्या पतनानंतर मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली आणि १८ व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या सभा मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला महाद्वार आणि इतर दोन दरवाजांना पक्ष द्वार असे म्हटले जाते.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सभा मंडपाच्या पायऱ्या चढताना एका बाजूला नंदीची कलात्मक नक्षीकाम केलेली अशी सुंदर मूर्ती दिसून येते. याशिवाय सभा मंडपाच्या मध्यभागी भिंतीच्या कमानीवर गणेशाची मूर्ती आणि कलात्मक कारागिरीने तयार केलेले पवित्र कासव आपल्यास दिसून येते.मोठ्या दगडामध्ये घडवलेल्या २४ खांबांवर हा सभा मंडप आधारलेला आहे. यातील प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले आहे. तसेच अनेक सुंदर चित्रे ही कोरलेली आहेत.
प्राचीन आणि मध्ययुगीन हिंदू शिल्प आणि कारागिरी केलेले हे मंदिर हिंदू शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचा गाभारा १७ फूट लांब व १७ फूट रुंद असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिरा शिवाय इतरही अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. हे मंदिर म्हणजे दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्य शैली, आणि संरचनेचे उत्तम उदाहरण आहे.
शिवालय कुंड (SHIVALAY KUND)
घृष्णेश्वर मंदिरापासून साधारणपणे पाचशे मीटर अंतरावर एक प्रसिद्ध कुंड आहे. या कुंडाचे नाव आहे शिवालय तीर्थ. हे कुंड साधारणपणे एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण ५६ पायऱ्या आहेत. तसेच या शिवालय कुंडात भगवान शंकराची आठ मंदिरे आहेत. उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगातीर्थ, आग्नेयेला वीरज, दक्षिणेस विशाल, नैऋत्येस नाशिक तीर्थ इत्यादी. अष्टतीर्थे या ठिकाणी पहावयास मिळतात.
महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या कुंडातूनच घृश्मा ने आपला मुलगा जिवंत मिळवला होता असेही समजले जाते.
घृष्णेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये (KEY FEATURESOF GRISHNESHWAR TEMPLE)
घृष्णेश्वर मंदिराच्या अर्ध्या उंचीपर्यंत लाल रंगाच्या पाषाणात बांधकाम करण्यात आलेले आहे. २७ सप्टेंबर १९६० रोजी या मंदिराला “राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. पुराणातील अनेक कथा या ठिकाणी कोरल्या गेलेल्या आहेत. यामध्ये शिवपार्वतीचा विवाह, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेशाच्या कथा देखील कोरल्या गेल्या आहेत.
घृष्णेश्वर मंदिरातील पूजापाठ (GRISHNESHWAR POOJA)
घृष्णेश्वर मंदिर हे सकाळी ५.३० वाजता उघडते. आणि रात्री ९.३० वाजता बंद होते. तसेच श्रावण महिन्यात हे मंदिर पहाटे ३ वाजता उघडते आणि रात्री ११ वाजता बंद होते.या मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी केले जातात तसेच दुपारची आणि संध्याकाळची आरती या मंदिरामध्ये केली जाते. या मंदिरातील आरती आणि धार्मिक विधींमध्ये येणारे भाविक सहभागी होऊ शकतात.
- दर्शन – सकाळी ५.३० – रात्री ९.३०
- श्रावण मास दर्शन – पहाटे ३.०० – रात्री ११.००
- दुपारची पूजा – दुपारी १.०० – १.३०
- संध्याकाळची पूजा – संध्याकाळी ४.३० – ५.३०
सण आणि विशेष दिवशी या वेळा बदलू शकतात
- पंचामृत अभिषेक – सकाळी ६.०० ते ११.०० वाजेपर्यंत दुपारी १.०० ते संध्याकाळी ७.००वाजेपर्यंत
- अभिषेक बिदागी – ५५१/-
घृष्णेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क
घृष्णेश्वर मंदिर हे संभाजी नगर जिल्ह्यामध्ये असल्याने या ठिकाणी जून ते सप्टेंबर अतिवृष्टीचे प्रमाण असते. तसेच एप्रिल मे च्या दरम्याने या ठिकाणी तीव्र उष्णता भासते. या दोन्ही गोष्टींमुळे येणाऱ्या भाविकांना त्रास होण्याची शक्यता असते.
म्हणून या ठिकाणी या मंदिराला भेट देण्यासाठी साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी – मार्च पर्यंतचा कालावधी योग्य समजला जातो. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारावे ज्योतिर्लिंग असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. येथे येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.
- 🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏
- 🙏पाचवे ज्योतिर्लिंग : श्री परळी वैजनाथ 🙏
- 🙏सहावे ज्योतिर्लिंग : श्री भीमाशंकर 🙏
घृष्णेश्वर मंदिरातील नियम
हे मंदिर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या मंदिरामध्ये जाण्यासाठी काही नियम केलेले आहेत. याचे पालन करणे अपेक्षित आहे. हे नियम मंदिरातील पावित्र्य तसेच सजावट राखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेले आहेत.
ड्रेस कोड –
या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी नम्रपणे शरीराला शोभतील असेच कपडे घालावे. उत्तेजक कपडे घालने टाळावे अपेक्षित आहे. या मंदिराला भेट देताना पारंपारिक भारतीय पोशाख घालून येणे बंधनकारक आहे. महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस आणि पुरुषांनी धोतर किंवा सोवळे घालून आत प्रवेश करावा.
पादत्राणे –
मंदिरात प्रवेश करताना बूट चप्पल किंवा इतर कोणतेही पादत्राणे घालून येऊ नये. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चपला ठेवण्यासाठी जे रॅक केलेले आहेत त्या ठिकाणी चप्पल ठेवणे अपेक्षित आहे. तसेच कोणत्याही चामड्याच्या वस्तू परिधान करून येऊ नये म्हणजेच कमरेचा बेल्ट, पाकीट, पर्स इत्यादी.
छायाचित्रण –
मंदिरामध्ये प्रवेश करताना कोणीही फोटोग्राफी चित्रण करू नये. मंदिराच्या काही भागांमध्ये ट्रस्टच्या परवानगीने छायाचित्रण करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
मांसाहार आणि मद्यपान –
मंदिराच्या आवारात मांसाहार आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई केलेली आहे. तसेच मंदिरात दर्शन करण्या अगोदर कोणताही मांसाहारी पदार्थ खाऊन येऊ नये. तसेच दर्शन घेण्यापूर्वी स्नान करून मग मंदिरामध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे.
शांतता –
या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी मंदिरामध्ये शांतता राखणे तसेच येथे असणाऱ्या पुजाऱ्यांचा आदर करणे आवश्यक आहे. मंदिर आवारामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा अनादर करू नये.
ज्योतिर्लिंगाला स्पर्श करणे –
या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी मंदिरातील ज्योतिर्लिंग किंवा इतर कोणत्याही देवी देवतांना स्पर्श करण्याची परवानगी नाही. तसेच लांबून धार्मिक विधी आणि प्रार्थना करू शकतात.
देणगी –
या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी या मंदिरासाठी आणि मंदिरातील पुजाऱ्यांना देणगी देण्याची परवानगी आहे. परंतु ही देणगी देताना योग्य पद्धतीने आणि आदराने दिली पाहिजे.
घृष्णेश्वर मंदिराला भेट देताना या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपली ही यात्रा प्रत्येकासाठी आनंददायी आणि आदरयुक्त अनुभवाची ठरेल.
घृष्णेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे? (HOW TO REACH GRISHNESHWAR TEMPLE)
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, वेरूळ गावामध्ये हे घृष्णेश्वराचे मंदिर आहे. संभाजीनगर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठे शहर म्हणून ओळखले जाते. या मोठ्या शहराला अनेक राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना विमान, ट्रेन, बस, तसेच खाजगी वाहनाने येणे सुद्धा सोयीस्कर होते.
विमान – संभाजीनगर विमानतळावरून घृष्णेश्वर मंदिरापर्यंत जवळपास ३६ किलोमीटरचे अंतर आहे. म्हणजेच या ठिकाणी येण्यासाठी जवळजवळ १ तासाचा कालावधी लागतो. येथे येण्यासाठी तुम्ही कॅबने किंवा बस ने येऊ शकता.
ट्रेन – संभाजीनगर रेल्वे स्टेशन ते घृष्णेश्वर मंदिर यामध्ये जवळपास ३८ किलोमीटरचे अंतर असून ४४ मिनिटांचा कालावधी लागतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही कॅब किंवा ऑटोने येऊ शकता.
बस – संभाजीनगर बस स्थानकापासून घृष्णेश्वर मंदिरापर्यंत जवळपास २८ किलोमीटरचे अंतर असून ४३ मिनिटांचा कालावधी लागतो. या ठिकाणी तुम्ही कॅब किंवा ऑटो ने येऊ शकता.
खाजगी वाहने – संभाजीनगर या मोठ्या शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असल्यामुळे तुम्ही खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी प्रवास करू शकता. जो तुमच्यासाठी सोयीस्कर आणि सुलभ असेल.
- मुंबई ते संभाजीनगर – ३२५ किलोमीटर
- पुणे ते संभाजीनगर – २३५ किलोमीटर
- नाशिक ते संभाजीनगर – १७८ किलोमीटर
घृष्णेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे (PLACES TO VISITNEAR GRISHNESHWAR TEMPLE)
घृष्णेश्वर मंदिर हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते संभाजीनगर जिल्हा हा जसा ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे तो पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर मंदिराखेरीज आणखीन काही पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –
अजिंठा लेणी
संभाजीनगर शहरापासून जवळपास १०५ किलोमीटर अंतरावर या अजिंठा गुहा आहेत. अजिंठाच्या या प्राचीन लेण्यांमध्ये भारतीय कलेचे सर्वात मोठे जिवंत नमुने पाहिले जाऊ शकतात.वाघूर नदीच्या काठावर या अजिंठा लेणी असलेल्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या खडकावर एकूण २६ लेणी आहेत.वेरूळ लेणी – संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या वेरूळच्या लेण्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील एक अशा आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन या तिन्ही धर्मांची त्रिवेणी संगम असलेली एकूण ३४ लेणी या ठिकाणी आढळून येतात.
दौलताबाद – देवगिरी किल्ला
महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक असा ओळखला जाणारा हा दौलताबाद देवगिरी किल्ला संभाजीनगर शहरापासून जवळपास १५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
पाणचक्की
ही पाणचक्की मलिक अंबर यांनी बांधली असून संभाजीनगर च्या वायव्येस, ओझर जटवाडा या भागात डोंगरावरून पडणारे पावसाचे पाणी डोंगराखाली आत चर खणून साठविले जाते. तसेच ते वक्रनलिकेच्या सहाय्याने पातळी वाढवीत खापरी नळांनी शहरात आणले जाते. त्यानंतर ते पाणचक्कीत उंचावरून खाली पडते. त्याने एक पंखा फिरतो यावर बसवलेले जाते फिरते आणि मनुष्य शक्ती शिवाय धान्य दळले जाते. म्हणून ही पाणचक्की प्रसिद्ध आहे.
भद्रा मारुती
संभाजीनगर मध्ये खुलताबाद येथे असलेले भद्रा मारुतीचे हे मंदिर हिंदू देवता हनुमान यांना समर्पित आहे. वेरूळच्या लेण्यांपासून सुमारे चार किलोमीटरवर हे मंदिर आहे.
बीबी का मकबरा
१९६१ मध्ये मुगल सम्राट औरंगजेबाने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा ची उभारणी केली होती. संपूर्ण जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणारी ताजमहालची प्रतिकृती म्हणूनही या बीबी का मकबराला ओळखले जाते.
सिद्धार्थ गार्डन
संभाजीनगर मध्ये असलेल्या या सिद्धार्थ गार्डनमध्ये प्राणी संग्रहालय, मत्स्यालय,फुले, आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. हे ठिकाण पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय आणि आराम करण्यासाठीचे उत्तम ठिकाण म्हणून समजले जाते. या ठिकाणी असणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, मगरी,हत्ती, बिबट्यांच्या विविध प्रजाती दिसून येतात.
सलीम अली तलाव
संभाजीनगर मध्ये असलेल्या या सलीम अली तलावात असलेला व्हीस्टा विशेष मोहक वाटतो. येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेक पक्षी दिसून येतात. पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये या ठिकाणी नौविहाराचा सुद्धा आनंद लुटता येतो.
पितळखोरा लेणी
पितळखोरा ही महाराष्ट्रातील जवळजवळ आद्य लेणी आहेत. ती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यामध्ये आहे.
खुलदाबाद
संभाजीनगर शहरापासून १३ किलोमीटरच्या अंतरावर आणि अजिंठा लेण्यांच्या अगदी जवळ असलेले हे छोटे शहर आहे. ही इस्लामी धर्मीयांची पवित्र भूमी आहे. या ठिकाणी अनेक सुफी संतांच्या कबरी आणि दर्गा दिसून येतात.
कैलास मंदिर
वेरूळ लेण्यांमध्ये असलेले हे कैलास मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर हिंदू धर्माशी संबंधित प्रसिद्ध मंदिर आहे जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
जामा मशीद
ही जामा मशीद मलिक अंबर याने बांधली असून ही नेहरू भवन जवळ आहे. तिची भव्यता आणि साधेपणा मन प्रसन्न करते.
घृष्णेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स (HOTELS NEAR GRISHNESHWAR TEMPLE)
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असे बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर आहे. या मंदिरामध्ये हजारो भावीक दर दिवशी येत असतात. या भाविकांना राहण्यासाठी त्यांना परवडणारी अशी काही हॉटेल्स खालील प्रमाणे.
- ओम सिद्धेश्वर भक्तनिवास
- हॉटेल कैलास
- हॉटेल हेरिटेज रिसॉर्ट
- शिवम रेसिडेन्सी
- हॉटेल ग्रेट अन्नपूर्णा
- हॉटेल निसर्ग रेस्टॉरंट
- हॉटेल कन्हैया
- सुंदर लॉज
- हॉटेल अथर्व
- हॉटेल मोदी सम्राट
घृष्णेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
संभाजीनगर हे जसे ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ते खाद्य संस्कृतीसाठी ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मुघलांचे साम्राज्य होते त्यामुळे हे शहर पुलाव, बिर्याणी यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी मिळणारे मिसळपाव, रगडा, समोसा, वडापाव देखील अतिशय चविष्ट आणि रुचकर मिळतात.
घृष्णेश्वर कथा (GRISHNESHWAR STORY)
दक्षिणेला असलेल्या देव पर्वतावर भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेला सुधर्मा नावाचा वेदज्ञ ब्राह्मण राहत होता. त्याला सुदेहा नावाची पत्नी होती. ही सुदेहा अतिशय पती परायण होती. पण या दोघांना काही मूलबाळ नसल्याने ते कष्टी दुःखी होते. ती दररोज शेजाऱ्यापणजारांकडून ऐकाव्या लागणाऱ्या व्यंग व कुचक्या बोलण्यामुळे व्यथित व्हायची. पण सुधर्मा मात्र या बोलण्याकडे लक्ष देत नसे तो तिलाही या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्यास सांगायचा.
असे बरेच दिवस गेले एके दिवशी या सुधेहाने आत्महत्येची धमकी देऊन आपल्या पतीला दुसरे लग्न करून घेण्यासाठी राजी करून घेतले. नंतर तिने आपली छोटी बहीण घृष्मा हिला बोलावून घेतले व तिच्याशी स्वतःच्या पतीचे लग्न लावून दिले. यावेळी आपण कोणताही सवती मत्सर करणार नाही, असे देखील आश्वासन तिने दिले.
बराच काळ लोटला. त्यानंतर घृष्मा गरोदर राहिली व कालांतराने तिला मुलगा झाला. यथावकाश तो मुलगा मोठा होऊन त्याचे लग्नही झाले. इकडे सुधर्मा व घृष्मा दोघेही सुदेहाचा खूप आदर करायचे पण तिच्या मनात मात्र आपली बहीण असलेल्या सवतीबाबत फार मोठी इर्षा व द्वेष निर्माण झाला होता. एकदा या द्वेषाचा अतिरेक झाला. त्यामुळे रात्री सुदेहाने घृष्माच्या झोपलेल्या तरुण मुलाची हत्या केली व त्याचे प्रेत जवळच असलेल्या तळ्यात नेऊन टाकले.
सकाळी घरात एकच गोंधळ रडारड सुरू झाली. घृष्मावर वज्राघात झाला ती व्याकुळ झाली. पण तिने आपला नित्य पूजेचा नियम काही सोडला नाही. आता तर ती रोज तळ्याकाठी जाऊ लागली व तेथे १०१ शिवलिंगे बनवून त्यांचे पूजन करू लागली. एकदा तिने आपली पूजा आटोपली व त्या शिवलिंगाचे विसर्जन करून जशी ती वळली तसा तिला तिचा मुलगा तळ्याकाठी उभा असलेला दिसला.
भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन सुदेहाचे कारस्थान उघडे केले आणि तिचा शिरच्छेद करण्यासाठी तत्पर झाले. यावर घृष्मा ने हात जोडून भगवान शंकरांची प्रार्थना केली. व सुदेहाला जीवदान द्यावे याबाबत विनंती देखील केली. याशिवाय ती म्हणाली देवा, सुदेहाची चूक क्षमा करा. जर आपण खरच माझ्यावर प्रसन्न असाल, तर जगाच्या रक्षणासाठी आपण येथेच निवास करावा.
श्री शंकराने तिची ही विनंती मान्य केली व आपल्या दिव्य ज्योतिर्लिंगाद्वारे घृष्मेष या नावे या ठिकाणी स्थित झाले. पुढे ते घृष्णेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले.
घृष्णेश्वर मंदिरात राबवले जाणारे उत्सव
घृष्णेश्वर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी वर्षभर अनेक सण, यात्रा होत असतात.
महाशिवरात्र
हिंदू सणातील सगळ्यात महत्त्वाचा असा हा महाशिवरात्रीचा सण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी हजारो भावीक या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी तसेच भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात या दिवशी हे मंदिर उत्कृष्टपणे सजवलेले तसेच दिव्यांनी उजळून निघालेले असते.
या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस प्रत्येक शंकराच्या देवळामध्ये साजरा केला जातो असे समजले जाते.
कार्तिक पौर्णिमा
कार्तिक पौर्णिमा हा एक हिंदूंचा महत्त्वाच्या सणांपैकी एक असा समजला जातो. साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर च्या दरम्याने हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची विधी व पूजा करून प्रार्थना केली जाते.
गंगोत्री यात्रा
गंगोत्री यात्रा ही एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या दिवशी हिमालयातील गंगा नदीच्या उगमापर्यंत भाविक जात असतात. तसेच या यात्रेदरम्यान अनेक यात्रेकरू घृष्णेश्वर मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.
प्रश्न
घृष्णेश्वर मंदिर कुठे आहे?
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वराचे मंदिर आहे.
घृष्णेश्वर मंदिर का प्रसिद्ध आहे?
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे बारावे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
घृष्णेश्वर हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?
घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी बारावे ज्योतिर्लिंग आहे.
घृष्णेश्वर मंदिर कोणी बांधले?
घृष्णेश्वर हे मंदिर १७३० मध्ये मल्हारराव होळकर यांची पत्नी गौतमीबाई यांनी बांधले असून शिवभक्त इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला
घृष्णेश्वर हे कोणाचे मंदिर आहे?
घृष्णेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे
घृष्णेश्वर मंदिराचे महत्त्व काय आहे?
घृष्णेश्वराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारावे ज्योतिर्लिंग आहे. तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या एलोरा लेण्याजवळ हे मंदिर आहे.
घृष्णेश्वर मंदिराचे प्रवेश शुल्क किती आहे?
घृष्णेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.
घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी किती वेळ लागतो?
घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १ ते १.३० तासाचा कालावधी लागतो. सणांच्या दिवशी किंवा विशेष उत्सवाच्या दिवशी या ठिकाणी गर्दी असल्यामुळे त्यावेळी दर्शनाला लागणारा वेळ सांगता येत नाही.
घृष्णेश्वर मंदिर संपूर्ण माहिती निष्कर्ष
मित्रांनो, ही होती आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी बारावे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर आणि त्याची माहिती, इतिहास. आमचा हा लेख GRISHNESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. घृष्णेश्वर मंदिर संपूर्ण माहिती हा लेख आपल्याला कसा वाटला? आपल्या कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा. या लेखामध्ये काही चुका असतील तर त्या सुद्धा आम्हाला सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयांना घेऊन.
तोपर्यंत नमस्कार.