श्री महाकालेश्वर मंदिर माहिती मराठी : MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI

श्री महाकालेश्वर मंदिर माहिती मराठी : MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI – बऱ्याच वेळा गावासाठी मंदिर असते, तर कधी मंदिरासाठी गाव असते. पण या ठिकाणी मंदिराचेच गाव असावे हा प्रकार फार कमी वेळा ऐकण्यात येतो. मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन हे शहर वसले आहे. या नगराला, या शहराला इंद्रपुरी अमरावती किंवा अवंतिकाही म्हटले जाते. या ठिकाणची शेकडो मंदिरांची सुवर्णमंडित शिखरे पाहून या नगरीला सुवर्णशृंगा असेही म्हणतात.

मोक्षदायक असलेल्या सप्तसुरांपैकी एक असलेल्या या अवंतिका नगरीत ७ सागर तीर्थ, २८ तीर्थ, ८४ सिद्धलिंगे, २५ ते ३० शिवलिंगे, अष्टभैरव तसेच एकादशी, रुद्र स्थानी विविध देवदेवतांची शेकडो मंदिरे, जलकुंडे व स्मारक आहेत. हे पाहून असे वाटते की जणू ३३ कोटी देवांची इंद्रपुरीत उज्जैन नगरीत अवतरली आहे.

याच उज्जैन नगरीत भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे असे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचा इतिहास, याबाबतची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. चला तर मग,पाहुयात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग.

MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION
श्री महाकालेश्वर मंदिर

Table of Contents

श्री महाकालेश्वर मंदिर माहिती मराठी : MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI

नाव – श्री महाकालेश्वर
स्थान – भगवान शंकर
दुसरे नाव – महाकाल
ज्योतिर्लिंग – ३ रे
कुठे आहे – मध्य प्रदेश राज्यात उज्जैन मध्ये
नदी – क्षिप्रा नदी
स्थापना – श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेना प्रमुख राणाजीराव शिंदे
स्थापना –१७३६
जीर्णोद्धार – महादजी शिंदे

श्री महाकालेश्वर मंदिराचा इतिहास

सन ११६० ते १७२८ पर्यंत उज्जैन या शहरावर मुसलमानांचे राज्य होते. या राजवटीमध्ये हिंदूंच्या प्राचीन परंपरा जवळपास त्यांनी नष्ट केल्या होत्या. यानंतर १६९० मध्ये मराठ्यांनी माळवा या प्रदेशावर हल्ला करून त्यानंतर १७२८ मध्ये माळवा ताब्यात घेतला. आणि उज्जैनचे हरवलेले वैभव परत मिळवले. सन १७२८ ते १७३१ पर्यंत ती माळव्याची राजधानी राहिली. मराठ्यांच्या राजवटीमध्ये या ठिकाणी दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठा पुन्हा मिळाली आणि दुसरी म्हणजे या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळाची स्थापना करण्यात आली. पुढे या मंदिराचा विस्तार राजा भोजने केला गेल्याचे सांगितले जाते. सन १७३६ मध्ये श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेना प्रमुख राणाजी राव शिंदे यांनी हे मंदिर बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा पुत्र म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी त्यामध्ये बदल दुरुस्ती करून जीर्णोद्धार केला.

श्री महाकालेश्वर मंदिर नकाशा

श्री महाकालेश्वर मंदिर व्हिडिओ

महाकालेश्वर मंदिर माहिती

या मंदिरातील मूर्ती दक्षिण दिशेला तोंड करून असल्यामुळे या मंदिरातील मूर्ती दक्षिणाभिमुख मूर्ती असे ओळखले जाते. या ठिकाणचे लिंग महादेव तीर्थस्थळाच्या वर स्थापित केले आहे. बाजूला गणेश, कार्तिकेय आणि पार्वती यांच्या देखील प्रतिमा आहेत. दक्षिण दिशेला नंदी स्थापित केला असून येथील नागचंद्रेश्वर मंदिर हे फक्त नागपंचमीसाठी उघडले जाते.

हे मंदिर पाच मजली असून यातील पहिला मजला हा जमिनीमध्ये आहे. या शेजारी रुद्रसागर सरोवर देखील आहे.

मंदिराच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. या ठिकाणी दररोज नित्यनेमाने पूजा केली जाते. आणि येथील लिंगास सजवले जाते. या मंदिराच्या परिसरामध्ये स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. या ठिकाणी भगवान शंकराची महाकाल रुपी पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, या ठिकाणी पूजा केल्यास आपली स्वप्न पूर्ण होतात. शक्तिपीठांमध्ये १८ शक्तिपीठांपैकी एक असे मानले जाणारे हे मंदिर सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत खुले राहते.

श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग

महाकाल नावाचा अर्थ – meaning of mahakal in marathi

काल या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे “वेळ” आणि दुसरा म्हणजे “मृत्यू”. प्राचीन काळी संपूर्ण जगाची प्रमाण वेळ इथूनच ठरवली जात होती. म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला “महाकालेश्वर” असे नाव पडले आहे.

महाकालेश्वर मंदिर परिसर

या मंदिराचा परिसर हा अतिशय भव्य असा आहे. या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये कोटीतीर्थ नावाचे मोठे कुंडही आहे. या तीर्थातील पाणी आणि हे तीर्थ अतिशय पवित्र असे मानले जाते. या कुंडाच्या पायऱ्याला लागून असलेल्या वाटेवर परमार काळात बांधलेल्या मंदिराच्या शिल्पकलेच्या अनेक प्रतिमा पहावयास मिळतात. या कुंडाच्या पूर्वेला जाणाऱ्या खिंडीचे प्रवेशद्वार असलेला मोठ्या आकाराचा व्हरांडा आहे. व्हरांड्याच्या उत्तर दिशेला एका खोलीत श्रीराम आणि देवी अवंतिका यांच्या मुर्त्या आहेत. मुख्य मंदिराच्या दक्षिण दिशेला अनेक छोटीशी मंदिरे आहेत. त्याच पैकी वृद्ध महाकालेश्वर, अनाडी कल्पेश्वर आणि सप्तर्षीही मंदिरे स्थापत्य कलेचा नमुना दिसून येतो.

हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असे हिंदूंचे पवित्र मंदिर आहे. या मंदिराचा परिसर जवळपास पाच एकर परिसरात पसरला गेला आहे. या मंदिराच्या आवारामध्ये ५३ छोटी मोठी मंदिरे देखील आहेत. हे मंदिर म्हणजे तीन मजली इमारत बांधलेली आहे. महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि नागचंद्रेश्वर यांची लिंगे मंदिराच्या खाली, मध्ये आणि वरच्या भागात स्थापित केलेली आहेत.

MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI
श्री महाकालेश्वर मंदिर माहिती

महाकालेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये

  • या मंदिरामध्ये पहाटे भगवान महाकालला थंड पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला जातो. भस्म तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शनि, पलाश, मनुका यांची पाने जाळली जातात. या भस्माने येथील आरती केली जाते.
  • या मंदिराच्या गर्भगृहामध्ये माता-पार्वती, कार्तिकेय आणि गणेश जी यांच्या मूर्ती आहेत.
  • उज्जैन याठिकाणी यांच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण, त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांचा मित्र सुदामा यांनी शिक्षण घेतले होते.
  • भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैन मधील हे महाकालेश्वर मंदिर असे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे.
  • महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. खालच्या भागामध्ये महाकालेश्वर मधल्या भागामध्ये ओंकारेश्वर आणि वरच्या भागामध्ये श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. हे श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशी दिसते.
  • महाकालेश्वर ची पालखी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये क्षिप्रा नदीच्या काठी सुरू होऊन उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परतते.
  • धार्मिक मान्यतेनुसार राजा विक्रमादित्यच्या राजवटीनंतर या ठिकाणी कोणताही राजा या ठिकाणी रात्रभर राहिलेला नाही. असे म्हटले जाते की, ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आले.

महाकालेश्वर मंदिराचे महत्त्व

  • महाकालेश्वर मंदिर हे खूप भव्य आणि सुंदर असे आहे. या मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. हे ज्योतिर्लिंग गर्भगृहात, भूगर्भात वसलेले आहे. त्याचप्रमाणे या लिंगाचा आकार देखील खूप मोठा आहे. आणि चांदीच्या नागाने वेढलेला आहे. या लिंगाच्या एका बाजूला गणेशाची मूर्ती असून दुसऱ्या बाजूला पार्वती आणि कार्तिकेची मूर्ती देखील आहे.
  • उज्जैन शहरांमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर होणारा कुंभमेळा हा सर्वात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी येणारे भावीक क्षिप्रा नदीचे पवित्र जल घेऊन महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन करून आशीर्वाद घेतात. या ठिकाणची मूर्ती ही दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते, म्हणजे ती दक्षिणेकडे तोंड करून आहे.
  • बारा ज्योतिर्लिंग पैकी महाकालेश्वर हे असे एकमेव मंदिर आहे, ज्याच्या परिसरामध्ये ३३ कोटी देवता वास करतात. हनुमान, शिव, देवी, नवग्रह, राधा-कृष्ण, गणेश यांची मंदिरे सुशोभीत करण्यात आलेली आहेत.
  • या मंदिरामध्ये केली जाणारी ही भस्मारती अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे. येणाऱ्या भाविकांची या भस्मारतीला उपस्थित राहण्याची दृढ इच्छा असते. असे म्हटले जाते की, दररोज सकाळी ज्या भस्माने शिवलिंगाला स्नान घातले जाते ती राख आदल्या दिवशी अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख असते. परंतु आता ही प्रथा बंद करण्यात आलेली आहे. ही प्रथा बघण्याचे ज्या भाविकांच्या नशिबात असते त्या भाविकांचा कधीही अकाली मृत्यू होत नाही, असे देखील मानले जाते.
  • याच उज्जैन शहरांमध्ये महर्षी सांदीपनी यांच्याकडे भगवान कृष्ण, त्यांचा भाऊ आणि त्यांचा मित्र सुदामा यांनी शिक्षण घेतले होते. सम्राट अशोक यांनी देखील या ठिकाणी अकरा वर्ष राहून शिक्षण घेतले होते.
  • राजा विक्रमादित्यची उज्जैन ही त्यावेळी राजधानी होती. त्यांचा भाऊ हा नाथ संप्रदायातील गुरु गोरखनाथांचा शिष्य बनून त्याने संसाराचा त्याग करून गुहेत तपश्चर्या करू लागला होता असे देखील सांगितले जाते.
mahakaleshwar temple ujjain
mahakaleshwar temple ujjain

महाकालेश्वर मंदिराची रचना

भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेले हे उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. या मंदिराच्या खालच्या भागात महाकालेश्वर, मध्यभागी ओंकारेश्वर आणि सर्वात वरच्या भागात नागचंद्रेश्वराचे शिवलिंग आहे.

या मंदिराच्या वरच्या भागात भगवान शंकर आणि माता पार्वती नागांच्या आसनावर विराजमान आहेत. या ठिकाणी शिवलिंग देखील आहे. ही सुंदर आणि दुर्मिळ अशी मूर्ती नागपंचमीच्या दिवशी आपल्याला पहावयास मिळते.

गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेला गणेश, कार्तिकेय आणि पार्वती देवी यांच्या प्रतिमा स्थापित केल्या आहेत. दक्षिण दिशेला नंदीची मूर्ती आहे. भिंतीवर भगवान शंकरांच्या सुंदर स्तूती लिहिलेल्या आहेत. कोटी तीर्थ या कुंडाच्या पूर्व दिशेला मोठा व्हरांडा आहे. या जवळून महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. उत्तर दिशेच्या टोकाला राम आणि देवी अवंतिका यांच्या आकर्षक मूर्ती देखील आहेत.

पूर्वी हे मंदिर जवळपास २ हेक्टर मध्ये होते. त्याची पुनर्बांधणी करून आता त्याची जागा २० हेक्टर अशी करण्यात आलेली आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार हे भव्य आणि प्रशस्त आहे. मागच्या बाजूस देवी देवतांच्या मूर्ती वसलेल्या आहेत. रुद्र सागरच्या आजूबाजूला उंच भिंती आहेत. या भिंतींवर म्यूरल्स बनवण्यात आले आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये भगवान महाकालेश्वराचे मोठे दक्षिणाभिमुख शिवलिंग आहे. गर्भगृहातच नंदी दिवा लावला जातो, जो रात्रंदिवस तेवत असतो. नंदीची ही मूर्ती गर्भगृहाच्या अगदी समोर दिसून येते. या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या करमणुकीचे वर्णन करणारी जवळपास २०० हून अधिक शिल्पे दिसून येतात.

मंदिरातील महाकाल कॉरिडॉर

मंदिराच्या या कॉरिडॉर मध्ये भगवान शंकरांचा विवाह, महाकालेश्वर वाटिका, महाकालेश्वर मार्ग, शिव अवतार, वाटिका, शिवतांडव मार्ग, धर्मशाळा इत्यादी सेवा बनवण्यात आलेल्या आहेत. याच्या उभारणीसाठी तेथील राज्य सरकारने जवळपास ४०० कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे.

या प्रकल्पामध्ये रुद्र सागर महाकाल मंदिराचे प्रवेशद्वार, दुकाने, मूर्ती यासाठी ९२० मीटर लांबीच्या कॉरिडॉरचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले आहे.

या मंदिरामध्ये कोणीही रात्र घालवीत नाही

धार्मिक कथेनुसार असे म्हटले जाते की, विक्रमादित्य राजाच्या राजवटीनंतर या मंदिरामध्ये कोणताही राजा किंवा मंत्री या मंदिरामध्ये रात्र घालवत नाही. आणि जी व्यक्ती हे धाडस करते, त्याला घेरुन मारण्यात येते किंव्हा त्याच्या बाबतीत अघटीत घटना घडल्या जातात असे म्हटले जाते.

येथील भाविकांच्या श्रद्धेनुसार, भगवान महाकाल हा येथील राजा आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही राजा होऊ शकत नाही. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आणि सध्या बीजेपी सांसद असणारे ज्योतिरादित्य सिंधिया जे ग्वाल्हेरचे राजा होते, ते सुद्धा या ठिकाणी रात्री राहिले नाहीत. या देशाचे चौथे प्रधानमंत्री मोरारजी देसाई मंदिरामध्ये दर्शन करून रात्री या ठिकाणी राहिले होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी त्यांचे सरकार पडले होते. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडूयूरप्पा उज्जैन मध्ये राहिल्यामुळे काही दिवसातच त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. अशा काही लोककथा, योगायोग किंवा येथील भाविकांचा समज आहे असे म्हटले जाते.

कालभैरव दर्शन

महाकालेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकराच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. हे उग्र रूप म्हणजेच कालभैरव म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, महाकालेश्वर मंदिर पाहण्यापूर्वी कालभैरव पाहणे कारण कालभैरवाला उज्जैनचा सेनापती असे म्हटले जाते. म्हणूनच महाकालेश्वराच्या दर्शनापूर्वी सेनापती कालभैरवाचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे.

भैरवगड येथे असणाऱ्या कालभैरव मंदिर बाबत असे म्हटले जाते की, जो या कालभैरवाचे दर्शन घेतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तसेच या मंदिरामध्ये कालभैरवाला दारू अर्पण केली जाते. एका प्लेटमध्ये वाईन ओतली जाते आणि कालभैरवाच्या तोंडाकडे नेली जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्लेटमध्ये सर्व वाईन संपते. हा कालभैरवाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

महाकालेश्वर दर्शन विधी वेळापत्रक

चैत्र महिन्यापासून अश्विनपर्यंत आणि कार्तिक महिन्यापासून फाल्गुनपर्यंत महाकालेश्वर मंदिराच्या वेळा ह्या बदलत असतात.

चैत्र महिना ते अश्विन महिना

  • सकाळची पूजा – सकाळी ०७.०० ते ०७.३०
  • मध्यान्ह पूजा – सकाळी १०.०० ते १०.३०
  • संध्याकाळची पूजा – संध्याकाळी ०५.०० ते ०५.३० पर्यंत
  • श्री महाकाल आरती – ०७.०० ते ०७.३०
  • मंदिर बंद होण्याची वेळ – रात्री ११.०० वाजता

कार्तिक ते फाल्गुन महिना

  • सकाळची पूजा – सकाळी ०७.३० ते ०८.०० पर्यंत
  • मध्यान्ह पूजा – सकाळी १०.३० ते ११.००
  • संध्याकाळची पूजा – संध्याकाळी ०५.३० ते ०६.०० पर्यंत
  • श्री महाकाल आरती – संध्याकाळी०७.३० ते ०८.०० पर्यंत
  • मंदिर बंद होण्याची वेळ – रात्री ११.०० वाजता
  • भस्म आरती – पहाटे ४:००

महाकालेश्वर मंदिराला भेट देण्यासाठीची वेळ आणि प्रवेश शुल्क

महाकालेश्वर मंदिर उज्जैन शहरामध्ये क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी साधारणपणे मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान तीव्र उष्णता असते. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये थंडीची लाट असते. त्यामुळे साधारणपणे ऑक्टोबर पासून मार्च पर्यंतचा काळ मंदिर दर्शनासाठी उत्तम समजला जातो. यावेळी हवामान अनुकूल असते. त्याचप्रमाणे आजूबाजूची पर्यटन स्थळे फिरण्यासाठी सुद्धा हा काळ योग्य समजला जातो.

या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही त्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. मात्र यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहून नंतर दर्शन घ्यावे लागते. अशावेळी या ठिकाणी विशेष पासची सोय केलेली आहे. त्यासाठी २५०/- रुपये आकारले जातात.

महाकालेश्वर मंदिरातील नियम

  • हे मंदिर पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. या वेळेतच दर्शन घेणे आवश्यक आहे.
  • मंदिरामध्ये प्रवेश करताना चप्पल, शूज त्याचप्रमाणे पर्स, चामड्याच्या वस्तू आत घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही.
  • मंदिराच्या बाहेर चपलांसाठी रॅक केलेला आहे त्या ठिकाणी चपला ठेवणे आवश्यक आहे.
  • अभिषेक पूजा करताना पुरुषांनी धोतर किंवा सोवळे आणि स्त्रियांनी साडी नेसणे बंधनकारक आहे.
  • या मंदिरामध्ये शांतता राखणे तसेच कोणाचाही अनादर होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

महाकालेश्वर मंदिरातील सुविधा

  • या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना मोबाईल फोन आणि मौल्यवान वस्तूंसाठी या ठिकाणी लॉकरची व्यवस्था केलेली आहे.
  • विशेष दर्शनासाठी या ठिकाणी २५० रुपये आकारून पावती दिली जाते. ज्यामुळे आपल्याला दर्शन लवकर मिळते.
  • अपंगत्व किंवा म्हाताऱ्या माणसांसाठी या ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा देखील मोफत करण्यात आली आहे.
  • अभिषेक करताना पुरुषांसाठी लागणारे धोतर किंवा सोहळे मंदिराच्या कार्यालयात कमी भाड्याने उपलब्ध केले जाते.

महाकालेश्वर मंदीराच्या जवळील हॉटेल्स

ही सर्व हॉटेल्स महाकालेश्वर मंदिर उज्जैनपासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत. जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या बजेट नुसार एसी, नॉन एसी रूम घेऊन राहू शकता.

  • हॉटेल अमर पॅलेस.
  • साहू गेस्ट हाऊस
  • हॉटेल शिवगंगा पॅलेस
  • हॉटेल महाकाल आश्रय
  • महाकाल यात्री निवास
  • रुद्राक्ष क्लब आणि रिसॉर्ट.
  • हॉटेल शिखर दर्शन
  • हॉटेल भगवती पार्क.
  • शांती गेस्ट हाऊस उज्जैन
  • हॉटेल रघुमणी पॅलेस.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ भेट देण्याची ठिकाणे

उज्जैन पाहाण्यासारखी ठिकाणे – महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आसपासच्या ठिकाणांची माहिती खाली दिली आहे. तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता.

१ देवास

देवास हे मध्य प्रदेश राज्यातील एक अतिशय प्राचीन शहर आहे. ज्यामध्ये अनेक लोकप्रिय मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. इतिहासप्रेमी आणि हिंदू धर्माचे पालन करणार्‍या लोकांसाठी उज्जैनजवळ भेट देण्याचे हे सर्वोत्तम ठिकाण आहे. देवासमधील खेनी वन्यजीव अभयारण्य हे भव्य वनस्पती आणि प्राणी यांच्या जवळच्या संबंधासाठी ओळखले जाते. जे प्रत्येक निसर्गप्रेमीसाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या मंदिरापासून देवासचे अंतर सुमारे ६ किलोमीटर आहे.

२. अनुभव कुंभमेळा

देशातील अनेक पवित्र शहरांमध्ये दर तीन वर्षांनी कुंभमेळा होत असतो. उज्जैन हे या शहरांपैकी एक आहे. या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करून संपूर्ण देशभरातून भावीक या ठिकाणी येत असतात.

३. हरसिद्धी मंदिर

उज्जैन मधील काही महत्त्वाच्या मंदिरांच्या यादीमध्ये हे हरसिद्धी मंदिर या मंदिराला अतिशय महत्त्व आहे. हे मंदिर दगडापासून बनवलेले आहे. तसेच प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या गुंतागुंतीत हे डिझाईन केलेले आहे. म्हणूनच या ठिकाणी दर महिन्याला हजारो भावीक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

४. काळभैरव मंदिर

आस्तिकांसाठी एक पवित्र स्थान म्हणजे उज्जैन मधील कालभैरव मंदिर होय. भगवान भैरव हे शिवाचे उग्र रूप मानले जाते. आणि आठ भैरवांमध्ये कालभैरव सर्वात महत्वाचे आहे. प्राचीन धर्मग्रंथानुसार, कालभैरव मंदिर तंत्रविद्याशी संबंधित आहे, ज्याचे अनुसरण म्हणजे काळ्या जादूवर आधारित आहे. खोलवर रुजलेल्या श्रद्धा अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी एक आकर्षण बनले आहे. या मंदिरात एक शिवलिंग आहे. महाशिवरात्री दरम्यान या धार्मिक स्थळाला हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. या मंदिरापासून काळभैरव मंदिराचे अंतर सुमारे ६ किलोमीटर आहे.

५. राम मंदिर घाट

या ठिकाणी पहाटेच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अनेक आरत्या होतात. राम मंदिर घाट हे हिंदूंसाठी एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे. कारण ते चार ठिकाणांपैकी एक आहे. जेथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. हा घाट कुंभ सोहळ्याच्या संदर्भात सर्वात प्राचीन स्नान घाटांपैकी एक मानला जातो. या ठिकाणी आपली जागा सुरक्षित करण्यासाठी २४ तास अगोदर आपल्या जागेचे बुकिंग करावे लागते. कुंभ उत्सवात लाखो लोक येथे स्नान करण्यासाठी येतात. येथे स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुऊन जातात असा समज आहे. या घाटावरून सूर्यास्त पाहणे हे सर्वात विलोभनीय दृश्य आहे. मंदिरापासून या घाटाचे अंतर सुमारे १ किलोमीटर आहे.

६. पीर मत्सेंद्रनाथ

या मंदिराच्या स्थापत्य कलेसाठी ओळखले जाणारे हे पीर मत्सेंद्रनाथ गंगा नदीच्या काठावर बांधले गेले आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील नदीची दृश्य अतिशय विलोभनीय असतात.

७. इस्कॉन उज्जैन

उज्जैनमधील इस्कॉन ही पांढऱ्या संगमरवरी बनलेली सुंदर इमारत आहे. गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनाचा विकास करण्याच्या दृष्टीने येथील सेवाभावी संस्थेने मंदिर वाढवले आहे. मंदिराजवळील उद्यानाचा परिसर देखील आपण फिरवू शकतो जो नयनरम्य आहे. येथे राधा, मदन मोहन , श्री कृष्ण-बलराम आणि श्री गौरी यांच्या संगमरवरी मूर्ती कोरलेल्या आहेत. ज्यांनी चमकदार रंगाचे कपडे आणि सुंदर दागिने घातले आहेत, जे नक्कीच तुमचा उत्साह वाढवतील आणि येथे थोडा वेळ घालवल्यानंतर तुम्हाला खूप आराम वाटेल. या मंदिराची स्थापत्य कला मनमोहक आहे. या मंदिरापासून इस्कॉनचे अंतर सुमारे ५ किलोमीटर आहे.

८. जंतर मंतर

हे उज्जैन मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता. भारतीय पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती ४० रुपये प्रवेश शुल्क आहे तर परदेशी पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये असे प्रवेश शुल्क आहे. आपल्याला गाईडची आवश्यकता असेल तर त्यासाठी अतिरिक्त १५० रुपये शुल्क आकारले जाते.

९. कालियादेह पॅलेस

हा राजवाडा क्षिप्रा नदीच्या काठावर आहे. हे सन १४५८ मध्ये बांधले गेले. हा वाडा दोन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याने वेढलेला आहे. हा राजवाडा उज्जैनचे सांस्कृतिक महत्त्व आणि राजे आणि राजपुत्रांच्या इतिहासाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, एकदा सम्राट अकबर आणि जहांगीर यांनी या भव्य स्मारकाला भेट दिली होती. पिंडारींच्या कारकिर्दीत हा वाडा पाडण्यात आला होता , परंतु माधवराव सिंधिया यांनी या वास्तूचे अंतर्गत सौंदर्य पाहिले आणि ते पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला. या राजवाड्याला भेट देण्यासाठी संपूर्ण दिवसभरात कधीही येऊ शकता, यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात नाही. मंदिरापासून या वाड्याचे अंतर सुमारे ८ किलोमीटर आहे.

१०. भर्त्रीहरी लेणी

या ठिकाणच्या लेण्यांना भेट देण्यासाठी सकाळी सहा पासून ते नऊ पर्यंत जाऊ शकता. प्रवेशासाठी कोणत्याही तिकिटाची आवश्यकता भासत नाही. पुरातत्वीय पैलूंचा आनंद मिळवण्यासाठी या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच येथील प्रदेशाच्या इतिहासाबद्दल आणि शतकांपूर्वी उज्जैन मध्ये राहिलेल्या लोकांचे जीवन कसे होते? याबाबतची माहिती या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मिळते.

११. भारत माता मंदिर

भारतीय लोकांमधील राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून भारत मातेला पाहिले जाते. देवतेप्रमाणे याची पूजा केली जाते. हे मंदिर आहे ज्या ठिकाणी बरेच लोक येथील देवीला आदर देतात.

१२. मंगलनाथ मंदिर

उज्जैन शहरातील आणखी एक प्रमुख मंदिर म्हणून मंगलनाथ मंदिराकडे पाहिले जाते. हे मंदिर भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या ठिकाणी मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी भावीक येत असतात.

महाकालेश्वर दर्शन

या मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथील मंदिराच्या प्रशासनाने महाकालेश्वराच्या दर्शनासाठी नियम केले आहेत. या नियमानुसार तुम्हाला मंदिरात दर्शन मिळते.

  • १. या मंदिरामध्ये तुम्हाला विनामूल्य दर्शन मिळते. यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज पडत नाही. हे दर्शन मोफत असते. त्यामुळे दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. त्यामुळे तुम्हाला साधारणपणे दोन ते तीन तास हे रांगेमध्ये उभे राहावे लागते आणि शिवलिंग हे आपल्याला दुरूनच दिसते.
  • २. दुसऱ्या प्रकारचे दर्शन म्हणजे २५० रुपयाचा विशेष पास काढून मंदिराच्या दुसऱ्या दरवाजातून भाविकांना प्रवेश दिला जातो. यामध्ये गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला लवकर दर्शन होते.
  • ३. या मंदिरामध्ये पहाटे चार वाजता महाकालेश्वराची भस्म आरती असते. भस्माने भगवान शंकराला अभिषेक केल्यानंतर आरती केली जाते. जिला भस्म आरती म्हणून ओळखले जाते. या आरतीमध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. या भस्मारतीमध्ये सहभागी झाल्यानंतर शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी धोती कुर्ता घालणे आवश्यक असते.
  • या आरती मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते. त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन ठराविक शुल्क जमा करून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. ऑफलाइन बुकिंग साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून काउंटर उघडे असतात. तसेच एक दिवस अगोदर तिकीट खरेदी करावे लागते.
  • ४. चौथ्या प्रकारच्या दर्शनामध्ये पंधराशे रुपये खर्च करावे लागतात. त्यानंतर तुम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन शिवलिंगाला फुले, हार अर्पण करून अभिषेक देखील करू शकता.

महाकालेश्वर आरती

१. भस्म आरती

या मंदिरातील भस्मारती ही विशेष मानली जाते. दररोज पहाटे चार वाजता सुरू होते. काही वर्षांपूर्वी महाकाल स्मशानभूमीच्या अस्थी कलशाने सजवले जात होते. पलाश, पिंपळाची पाने, शनि, मनुका यांची पाने तसेच यासारखी लाकडे जाळून राख तयार केली जाते. हे सगळ्यांनाच बघायला मिळते असे नाही फक्त काही भाग्यवान भक्तांना ही आरती बघायला मिळते. या भस्म आरतीमध्ये पुरुष सहभागी होऊ शकतात. महिलांनाही आरती पाहण्याची परवानगी नसते.

त्यांना भस्म आरतीच्या वेळी बुरखा घालावा लागतो. आरतीच्या वेळी धोतर प्रधान करावे लागते. इतर कोणतेही कपडे घालण्यास मनाई केलेली आहे. या भस्म आरतीमागे अशी श्रद्धा आहे की, या भस्माने मोठा आजार सुद्धा बरा होतो. या आरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुकिंग करावे लागते.

२. दत्तोदक आती

भस्म आरती नंतर सकाळी साडेसातच्या दरम्यान ही आरती केली जाते. यामध्ये मंदिराचे पुजारी भगवान महाकालेश्वराची अद्वितीय अशी सजावट करतात. या आरतीनंतर भगवान शंकरांना दहीभात अर्पण केला जातो.

३. महाभोग आरती

दत्तोदक आरती नंतर सकाळी साडेदहा वाजता महाभोग आरती होते. यामध्ये मंदिर प्रशासनाने तयार केलेला भोग मंदिरातील पुजाऱ्यांतर्फे भगवान महाकालेश्वरला अर्पण केला जातो.

४. महाकाल आरती

महाभोग आरतीनंतर संध्याकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये महाकालची आरती केली जाते.

५. शयन आरती

संध्याकाळच्या या आरतीनंतर महाकालेश्वरला आकर्षक शृंगार केला जातो. त्यानंतर रात्री साडेदहा वाजल्यापासून अर्धा तास बाबांची शयन आरती केली जाते. या आरती वेळी महाकालला गुलाबाच्या फुलांनी सजविण्यात येते.

महाकालेश्वर मंदिरातील सण

महाकालेश्वर मंदिरामध्ये अनेक सण साजरे केले जातात. या ठिकाणी वर्षभर पूजा आणि अभिषेक तसेच आरतीसह सर्व विधी नियमितपणे केले जातात. या ठिकाणी साजरे होणारे काही प्रमुख सण खालील प्रमाणे –

नित्य यात्रा

दररोजच्या यात्रेमध्ये सहभागी होणारे सर्व भावीक क्षिप्रा नदीमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर नागचंद्रेश्वर, कोटेश्वर, महाकालेश्वर, देवी अवंतिका, देवी हरसिद्धी इत्यादींना भेट देतात.

महाकाल यात्रा

वर्षातील श्रावण महिन्यामध्ये ही महाकाल यात्रा काढली जाते. ही यात्रा रुद्र सागरापासून सुरू होऊन क्षिप्रा नदीला प्रदक्षिणा घालून नंतर पुन्हा उज्जैन मध्ये मंदिरामध्ये येते. रुद्र सागरात स्नान करून भावीक येथील देवतांचे दर्शन घेतात.

सावरी मिरवणूक

महिन्याच्या प्रत्येक सोमवारी ठराविक वेळी उज्जैन शहराच्या रस्त्यावर पवित्र सावरी मिरवणूक काढली जाते. भाद्रपदाच्या पंधरवड्यामध्ये या सणाच्या वेळी लाखो भावीक या ठिकाणी सहभागी होतात. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

दसरा

विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवात ही मिरवणूक अतिशय रोमांचकारी आणि आकर्षक असते.

महाकालेश्वर मंदिर कुठे आहे आणि कसे जायचे?

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन शहरांमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर हे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी तिसरे असे असणारे महाकालेश्वर मंदिर आहे. उज्जैन हे विकसित असे शहर असल्यामुळे या शहराला अनेक राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही विमान, बस, ट्रेन, खाजगी वाहने यांचा वापर करून येऊ शकता.

विमान

उज्जैन हे विकसित शहर असल्यामुळे सर्वात जवळचे एअरपोर्ट इंदोर असून तेथून जवळपास ५८ किलोमीटरचे अंतर आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी विमानतळावरून टॅक्सी ने आपण येऊ शकता.

ट्रेन

आपल्याला जर ट्रेनने या मंदिरापर्यंत पोहोचायचे असेल तर उज्जैन जंक्शन रेल्वे स्टेशन या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता. उज्जैन रेल्वे स्टेशन पासून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही ऑटो, बस किंवा टॅक्सीने पोहोचू शकता.

बस

उज्जैन शहरांमधील जवळचे बस स्टेशन हे मालीपुरा बस स्टेशन आहे. येथून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही ऑटो किंवा टॅक्सी ने पोहोचू शकता.

खाजगी वाहने

उज्जैन हे शहर अनेक राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या खाजगी वाहनाने सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकता

मुख्य शहर ते महाकालेश्वर मंदिर अंतर

  • इंदोर ते उज्जैन अंतर ५४ किलोमीटर
  • बडोदरा ते उज्जैन अंतर ३४१ किलोमीटर
  • चित्तोडगढ ते उज्जैन अंतर २७० किलोमीटर
  • भोपाल ते उज्जैन अंतर १९४ किलोमीटर
  • खंडवा ते उज्जैन अंतर १९० किलोमीटर

महाकालेश्वर मंदिर जवळचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ

मध्यप्रदेश हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत विकसित असे राज्य आहे. या ठिकाणी संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात. पर्यटना बरोबरच येथील खाद्य संस्कृती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे.
पोहे हा तेथील लोकप्रिय आणि मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहे. कचोरी, जिलेबी, त्याचप्रमाणे रबडी, गुलाब जामुन यासारखे गोड पदार्थ, त्यानंतर दाल बाफला, आलू बडा हे स्ट्रीट फूड ही अतिशय प्रसिद्ध आहेत.

मध्यप्रदेश मधील लोकांची खाण्या बाबतची पसंती ही उत्तर भारतीय राज्यांप्रमाणेच आहे. या ठिकाणी भाजी, डाळ, तांदूळ भात, भाकरी ला पसंती दिली जाते. या ठिकाणच्या लोकांच्या खाण्यामध्ये गव्हाची चपाती आणि तुरीच्या डाळीचा समावेश असतो.

काही काळ मध्यप्रदेश वर मुघलांचे राज्य असल्यामुळे या ठिकाणी मोगलाई पदार्थ देखील खायला मिळतात. मांसाहारी पदार्थांमध्ये सीक कबाब सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ आहे. यानंतर भुट्टयाचा कीस तसेच चक्की की शाक, मालपुवा, मावा बाटी यासारखे पदार्थ अतिशय रुचकर आणि चविष्ट असतात.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कथा

अवंती नगरीमध्ये राहणाऱ्या एका ब्राह्मणाला चार शिवभक्त मुले होती. याच दरम्यान भूषण नावाचा राक्षस राजाने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला व नंतर अवंती नगरीत येऊन त्यांनी येथील ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. पण शिवभक्त ब्राह्मण थोडेही विचलित न होता शांत राहिले. हे पाहून दैत्य राजाने आपल्या सर्व साथिंना व अनुयायांना आदेश दिला की, या अवंती नगरीला चहूबाजूने घेरुन येथे होणारे वैदिक अनुष्ठान बंद पाडा. त्यांनी दिलेल्या त्रासामुळे दुःखी जनता ब्राह्मणाकडे आली. ब्राह्मणाने त्यांना धैर्य धारण करण्यास सांगितले व ते स्वतः भगवान शिवाच्या आराधने साठी तत्पर झाले. ब्राह्मणाने संकट निवारण करण्यासाठी भगवान शंकराचा धावा सुरू केला. त्याचवेळी भूषण दैत्यांने आपल्या सैन्यासमवेत त्या ब्राह्मणावर हल्ला केला.

त्यांनी हल्ला करताच पूजेतील पार्थिव मूर्तीच्या जागी अतिशय घनघोर आवाज होऊन जमीन दुभंगली व त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला. त्या खड्ड्यातून विक्राळ रूप धारण केलेले महाकाल भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी भूषण दैत्यांला ब्राह्मणांजवळ न येण्याबद्दल ताकीद दिली पण त्या उन्मत्त असुराने त्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. त्यामुळे आज्ञेचा भंग करणाऱ्या भूषण राक्षसाला महाकाल रुपी शंकराने भस्म करून टाकले. त्यांच्या या रूपाची ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वरूण यासारखे देवांनी स्तुती केली.

दुसऱ्या कथेनुसार उज्जैन नरेश चंद्रशेखर मोठा शिवभक्त होता. तसेच तो शास्त्रांचा नेता होता. त्याचा मित्र असलेल्या मणीभद्र नावाच्या शिवगणाने त्याला एक सुंदर चिंतामणी रत्न दिले होते. या रत्नाला चंद्रसेनाने धारण केले तर तो इतका सुंदर दिसायचा की, स्वर्गातील देवांनाही त्याचा हेवा वाटेल. काही राजांनी चंद्रसेन जवळ या रत्नाची मागणी केली पण त्यांना चंद्रसेननी नकार दिला. त्यामुळे चिडून त्यांनी चंद्रसेन वर आक्रमण केले. आपण चोहोबाजूंनी घेरलो आहोत हे पाहून चंद्रसेन महाकाल श्री शंकराला शरण गेला. भगवान शिवाने प्रसन्न होऊन त्याला अभय दिले. संयोगाने एक ब्राम्हण स्त्री फिरत फिरत महाकाल शिवाजवळ आली तिच्यासोबत तिचे बालकही होते.

महाकाल जवळ पोहोचताच ही विधवा झाली. त्या लहान बालकांनी मंदिरात गेल्यावर राजाला शिवपूजन करताना पाहिले. त्यामुळे त्याच्याही मनात भक्ती भाव जागृत झाला. त्याने आपल्या घरात एक सुंदर दगडाची स्थापना केली व त्यालाच शिवरूप मानून तो त्याची पूजा करू लागला. या पूजेत त्याला भूक तहान लागत नसे. इतका तल्लीन होऊन जाई की, एकदा त्याची आई त्याला बोलावण्यास गेली पण मुलगा तसाच ध्यानात मग्न राहिला. त्यामुळे त्या मातेने त्याचे शिवलिंग दूर फेकून दिले व त्याची पूजा सामग्री सुद्धा नष्ट केली.

आईच्या या कृत्यांनी तो मुलगा दुःखी झाला व अर्थ भावाने भगवान शंकराचे स्मरण करू लागला. त्याच्या या भावनेने शंकर प्रसन्न झाले व गोपी पुत्राकडून पुजला गेलेला दगड रत्नजडीत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने आविर्भूत झाले शिवा ची पूजा व स्तुति करून जेव्हा तो मुलगा आपल्या घरी गेला तेव्हा त्याला आपल्या झोपडीच्या जागी मोठा महाल उभा असलेला दिसला. अशा प्रकारे शिव कृपेने तो मुलगा धनधान्याने समृद्ध होऊन सुखी जीवन व्यतित करू लागला. इकडे शत्रू राजांनी जेव्हा चन्द्रसेन राजावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी आपसात बोलताना विचार केला की, चंद्रसेन राजा हा शिवभक्त आहे. आणि उज्जैन ही भगवान शंकरांची महाकाल यांची नगरी आहे. त्यामुळे आपली काही धडगत नाही. असे समजून त्यांनी राजा चंद्रशेखरशी मैत्री केली व सर्वांनी मिळून भगवान महाकालाची पूजा केली.

याचवेळी त्या ठिकाणी रामभक्त श्री हनुमान प्रकट झाले. त्यांनी उपस्थित राज्यांना गोपी पुत्राचे उदाहरण देऊन सांगितले की, भगवान महाकालचे पूजनच मनुष्यमात्राला मुक्ती देऊ शकते. फक्त भगवान शिव हेच असे आहेत की, जे मंत्र उच्चाराविना केलेल्या पूजेने व तांब्याभर पाण्याने ही प्रसन्न होतात. यानंतर वीर हनुमानाने चंद्रशेखर राजाकडे स्नेहपूर्ण व कृपेचा एक कटाक्ष टाकला आणि त्याला आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले.

प्रश्न

महाकालेश्वर मंदिर कोठे आहे?

मध्यप्रदेश राज्यातील क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन शहरामध्ये हे मंदिर आहे.

महाकालेश्वराचे हे मंदिर किती वर्ष जुने आहे?

महाकालेश्वराचे हे मंदिर जवळपास हजार वर्षाहून अधिक जुने आहे.

उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर का प्रसिद्ध आहे?

उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर भस्म आरती साठी प्रसिद्ध आहे.

महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागतो?

महाकालेश्वराचे विनामूल्य दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये जवळपास दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. परंतु विशेष पास घेतल्यावर लगेच दर्शन मिळते.

महाकालेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य कोणते?

महाकालेश्वर हे असे एकमेव ज्योतिर्लिंग आहे की, येथील महाकालेश्वराची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

निष्कर्ष

आजच्या आमच्या या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग विषयीचा लेख तुम्हाला वाचून कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील, तर त्या आम्ही सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

1 thought on “श्री महाकालेश्वर मंदिर माहिती मराठी : MAHAKALESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI”

  1. Hi, i think that i saw you visited my web site thus i came to ?eturn the favor텶 am attempting to find things to improve my web site!I suppose its ok to use some of your ideas!!

    Reply

Leave a comment