नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी : NAG PANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

Nag Panchami Festival Information In Marathi | नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी – श्रावण महिना आला की सणांना सुरुवात होते. भारतामध्ये अनेक जाती, धर्माचे लोक हे सगळे सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरे करतात. या श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हणून ओळखले जाते. याच श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. या सणाचा इतिहास, याचे महत्त्व नक्की काय आहे? हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग, पाहूया नागपंचमी सण संपूर्ण माहिती मराठी

Table of Contents

नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी : NAG PANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

नागपंचमीचा इतिहास

भारतामध्ये श्रावण महिना सुरू झाला की, श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमीला हा नागपंचमीचा सण साजरा केला जातो. पौराणिक आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की, जनमेजय राजा सर्पयज्ञ करत होता. त्यावेळी आस्तिक नावाच्या ऋषींनी त्याला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर जनमेजयने आस्तिक ऋषींना वर मागण्यासाठी सांगितल्यावर आस्तिक ऋषींनी त्यांना सर्पयज्ञ थांबवण्याचा वर मागून घेतला. त्यामुळे जनमेजयला सर्पयज्ञ थांबवावा लागला. तो दिवस श्रावण पंचमीचा होता.

हे सुद्धा वाचा👉 महाशिवरात्र संपूर्ण माहिती

कृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले होते. तो दिवस देखील श्रावण शुक्ल पंचमीचा होता. वृंदावनातील लोकांना या नागापासून कृष्णाने वाचवले. म्हणूनच वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

काही युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. तिच्या भावाचे नाव सत्येश्वर असे होते. या पंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा मृत्यू झाला होता. त्या नंतर सत्येश्वर हा तिचा भाऊ सत्येश्वरीला नागरूपात दिसला. त्या नागरूपाला तिने आपला भाऊ मानले. या नागरूपातल्या सत्येश्वराने तिला वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे मी सदैव रक्षण करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून हा सण साजरा केला जातो.

NAG PANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

नागपंचमी अर्थ

भगवान शंकरांचे निराकारी प्रतिकात्मक रूप म्हणून नागाला महत्त्व आहे. या नागदेवाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे हिंदू महिन्याच्या म्हणजेच श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. म्हणूनच या सणाला “नागपंचमी” असे म्हटले जाते.

प्रसिद्ध आठ नागांची नावे – नागपंचमी माहिती मराठी

  • अनंत
  • वासुकी
  • पद्म
  • महापद्म
  • तक्षक
  • कारकोटक
  • शंख
  • कालिया

श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी नागपंचमी सण माहिती

श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याचे पाणी बऱ्यापैकी कमी होऊन ते जमिनीत जिरते. तसेच ते सापांच्या बिळातही जाते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये साप बऱ्याच अंशी स्वतःच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी बाहेर पडत असतात. त्यांच्याविषयीच्या प्रेमासाठी तसेच त्यांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या मनातील भीतीची भावना कमी होण्यासाठी या दिवशी नागपूजा तसेच उपवास वगैरेची परंपरा श्रावण महिन्यामध्ये सुरू झालेली आहे.

नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी
नाग पंचमी संपूर्ण माहिती मराठी : NAG PANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

नागपंचमीचे महत्व

संपूर्ण भारत देशात हा सण मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. आणि त्याचा आशीर्वाद घेतला जातो. असे म्हटले जाते की, या दिवशी नागाची पूजा रुद्र, अभिषेक केल्यामुळे जीवनातील संकटे संपून जातात. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू यांच्या बाबतीत काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये नागाला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण भगवान शंकराच्या गळ्यात नाग आहे. त्याचबरोबर भगवान विष्णू हे देखील नागासोबत बसलेले, त्याचप्रमाणे झोपलेले दिसून येतात.

या दिवशी सापासाठी केलेले कोणतेही पूजाही साप किंवा नाग देवतेपर्यंत पोहोचतील असे म्हटले जाते म्हणूनच काही जण या दिवशी जिवंत सापाची पूजा करतात काहीजण सापाच्या मुर्त्यांची पूजा करतात या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे सर्पद औषध धोका कमी होऊन नागाला दुधाने स्नान घातल्यामुळे पुण्य प्राप्त होते असे देखील म्हटले जाते.

नागपंचमी आणि जत्रा

या सणाच्या दिवशी दरवर्षी विविध ठिकाणी मोठ्या जत्रा देखील भरवल्या जातात. या दिवशी अनेक गावांमध्ये विविध खेळांचे तसेच कुस्त्यांचे देखील आयोजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी गाय, बैल यासारख्या प्राण्यांना नदी तलावावर नेऊन त्यांना स्नान घातले जाते. कारण असे करणे अत्यंत शुभ आहे असे मानले जाते. काशी, वाराणसी सारख्या ठिकाणी मोठ्या जत्रा भरवल्या जातात.

संपूर्ण भारतातील असे एकमेव मंदिर आहे, जे वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते. ते म्हणजे उज्जैन शहरातील महाकालेश्वर मधील नागचंद्रेश्वराचे मंदिर. या दिवशी रात्री बारा वाजता हे मंदिर उघडले जाते आणि दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता वर्षभरासाठी पुन्हा बंद केले जाते. त्यामुळे या मंदिरातील देवतेचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतभरातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते.

नागपंचमीचे वारूळ पूजन

सामान्यतः वारूळामध्ये साप असतात. त्यामुळे या सणाला वारुळाचे पूजन ही प्रथा अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. काही लोक याला अंधश्रद्धा आहे असे देखील म्हणतात. या दिवशी रानातल्या वारुळांपुढे दुधाची वाटी ठेवून दुपारपर्यंत त्याच्यावरील गाण्यांचा कार्यक्रम चालतो.

नागपंचमीच्या उपवासाचे महत्त्व

एका पौराणिक आख्यायिकेनुसार, सत्येश्वरी नावाच्या देवतेच्या भावाचा सत्येश्वराचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखामध्ये तिने संपूर्ण दिवस अन्नग्रहण केले नव्हते. म्हणून या दिवशी उपास करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागपंचमी शुभमुहूर्त 2023 (NAGPANCHAMI MUHURAT 2023)

नागपंचमी सण मुहूर्त

ऑगस्ट महिन्यामध्ये साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी अधिक महिना आलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणारी ही नागपंचमी कधी आहे? आणि या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? हे जाणून घेऊया.

  • तारीख – २१ ऑगस्ट २०२३
  • मुहूर्त – सकाळी ०६.२१ ते ०८.५३ पर्यंत
  • राहुकाल – सकाळी ०७.५६ ते ०९.३१ पर्यंत ( या काळात पूजा करू नये.)

इतर मुहूर्त

  • ब्रह्म मुहूर्त – पहाटे ०४.५१ ते ०५.३६ पर्यंत
  • अभिजीत मुहूर्त – दुपारी १२.१६ ते ०१.०७ पर्यंत
  • विजय मुहूर्त – दुपारी ०२.४८ ते ०३.३९ पर्यंत
  • संधिप्रकाश मुहूर्त – संध्याकाळी ०७.०२ ते ०७.२५ पर्यंत
  • अमृत काळ – संपूर्ण दिवस

नाग पंचमी पूजा विधी

नाग पंचमी पूजा विधी

नाग पंचमी मंत्र (Nag Panchami Mantra)

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।
सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।।
ये च हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:।
ये च वापीतडागेषु तेषु सर्वेषु वै नम:।।

या प्रार्थनेनंतर नाग गायत्री मंत्राचा जप करावा.

वाऊँ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्।

नागपंचमी पूजा का करावी?

  • ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे त्याच्यावरील कालसर्प दोषाचा प्रभाव निघून जातो असा समज आहे.
  • या दिवशी कृष्णाने कालिया नागाचे मर्दन यमुनेच्या डोहामध्ये करून गावातील लोकांना या कालियापासून सुरक्षित केले होते म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
  • आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी नागपंचमीची पूजा करतात.
  • आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे आणि घरामध्ये शांतता नांदावी यासाठी घरातील स्त्रिया नागपंचमीची पूजा करतात.
  • आपल्या भावाच्या उत्तम तब्येतीसाठी, आरोग्यासाठी तसेच त्याच्या सुखशांतीसाठी बहिणी नागपंचमीची पूजा करतात.
  • असे म्हटले जाते की, नाग हा धनाची रक्षा करतो. त्यामुळे घरातील संपत्तीचे धनाचे रक्षण व्हावे यासाठी नागपंचमीची पूजा केली जाते.
  • ज्या व्यक्तींच्या स्वप्नामध्ये सारखे साप दिसत असेल त्यांनी ही पूजा केली तर त्यांची नागाबाबतची भीती नाहीशी होते असे म्हटले जाते. म्हणून ही पूजा केली जाते.
  • ही पूजा केल्यामुळे सर्पदोष होत नाही असे देखील सांगितले जाते.

नागपंचमी आणि स्त्रियांची श्रद्धा – नागपंचमी पूजा का करतात

  • या सणाच्या दिवशी विवाहित बहिणीला तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जातो अशी भारतामध्ये प्रथम रूढ झालेली आहे.
  • आपल्या भावाला चांगले आयुष्य आणि आरोग्य मिळावे तसेच सुख शांती मिळावी यासाठी बहिणी नागाची पूजा करतात.
  • सत्येश्वरी देवीच्या भावाच्या मृत्यूमुळे या देवीने त्या दिवशी अन्नग्रहण केले नाही नंतर तिचा भाऊ नागरूपात येऊन त्यांनी असे वचन दिले तिची बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल त्याचे रक्षण करेल. म्हणून या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात.
  • या दिवशी स्त्रिया गोलाकार आकार तयार करून झिम्मा, फुगडी सारखी नृत्य आणि खेळ खेळतात फेर धरून नाचतात.
  • पूजेला जाण्याआधी काही ठिकाणी स्त्रियांची हाताला मेहंदी लावण्याची देखील पद्धत रूढ झालेली आहे.
  • या दिवशी मुली, स्त्रिया झाडाला झोके बांधून झोके घेत असतात. आणि नागाची भाऊ म्हणून गाणी म्हणत असतात.

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा का करावी?

असे समजले जाते की, नाग भयंकर असा प्राणी आहे. पाहताक्षणी तो मनुष्याला दंश करतो. परंतु हा समज खरा नाही. सापाच्या खूप कमी जाती विषारी असतात आणि हा त्याचवेळी आपल्याला दंश करतो ज्यावेळी आपल्याकडून त्याला धोका निर्माण होतो. तो आपल्याला दंश करू नये म्हणून त्या आधीच आपल्या मनामध्ये त्याला मारण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे या पूजेद्वारे आपल्या मनातील भीती आणि वाईट भावना दूर करण्यासाठी या दिवशी त्याची पूजा केली जाते. त्याच्यावर अभिषेक करून त्याला सुगंधी फुले, त्याचप्रमाणे लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी गाणी वगैरे म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

नागपंचमी कशी साजरी करतात?

या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. संपूर्ण घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे परिधान केले जातात. आणि देवाची यथावकाश अभिषेक आणि पूजा केली जाते. त्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वारुळाची पूजा केली जाते. या दिवशी घरामध्ये नागाची चित्रे काढली जातात. शहरी भागांमध्ये पाटावर नागाची मातीची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर देवा पुढे ठेवलेला प्रसाद हा सगळ्यांना वाटला जातो. ग्रामीण भागातील लोक या दिवशी झाडाला झोके बांधून झोके घेतात. त्याचप्रमाणे पूजा करण्याआधी स्त्रिया हाताला मेहंदी लावतात. या दिवशी फुगड्या,नाच यांचा फेर धरून गाणी म्हणून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवशी मोठ्या जत्रा देखील भरल्या जातात.

या दिवशी काय करावे?

  • या दिवशी मातीची नागाची मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
  • या दिवशी कडक उपवास करून पूजा आणि अभिषेक केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्य लाभते.
  • या दिवशी आपण नागाची पूजा केल्यामुळे या रूढी, परंपरा पुढच्या पिढीला समजतात आणि त्या तशाच पुढे चालवल्या जातात.
  • या दिवशी यथासांग पूजा करून मंत्राचा जप करावा.
  • या दिवशी सात्विक भोजनाचा आहारामध्ये समावेश करावा.

या दिवशी काय करू नये?

  • या दिवशी शेतातील कोणतेही काम करू नये.
  • या दिवशी कोणतीही झाडे तोडू नयेत.
  • या दिवशी जेवण करताना काहीही चिरू नये, तसेच पदार्थ तळू नयेत.
  • लोखंडी भांड्यामध्ये किंवा तव्यामध्ये कोणतेही पदार्थ शिजवले जाऊ नयेत.
  • शिवणकामाविषयी कोणतेही काम करू नये.
  • या दिवशी मांस, मटन तसेच मदयाचा आहरात समावेश करू नये.

नागपंचमी पूजा साहित्य

ताम्हण, पळी, पंचपात्रे,घंटा, हळदी कुंकवाचा करंडा, अक्षता, विडा, नारळ, तांदूळ, फुले, बेल, दूध, लाह्या, जानवे जोड, अगरबत्ती, धूप, निरंजन, समई, पाट, गुळ किंवा साखर, चंदन, रांगोळी, कापसाचे वस्त्र इत्यादी

नागपंचमी पूजाविधी (POOJA OF NAGPANCHAMI)

  • सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी.
  • त्यानंतर एका पाटावर अक्षता ठेवून मातीच्या नागाच्या मूर्तीची स्थापना करावी.
  • पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी.
  • उजव्या बाजूला समय पेटवून घ्यावी.
  • नंतर एका बाजूला गणेश पूजन करून घ्यावे.
  • पाटाजवळ विडा ठेवावा. नागाला जानवे जोड घालावे.
  • नंतर नागाला दुधाचा अभिषेक करावा.
  • त्यानंतर हळद, चंदन लावून अक्षता वाहून फुले, बेल आणि कापसाची वस्त्रे वहावीत.
  • नंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा.
  • घंटा वाजवून निरांजन आणि अगरबत्ती ने ओवाळावे.
  • नंतर देवाला धूप दाखवून नागदेवतेचा मंत्र म्हणून कथा वाचावी.
  • नंतर आरती करून घरातील नैवेद्य दाखवावा.

नागपंचमी पूजेची सांगता

  • संध्याकाळी ०५.०० च्या दरम्याने नाग देवाची पुन्हा पूजा करावी.
  • त्यानंतर पूजेमध्ये काही राहून गेल्यास तशी क्षमा मागून आशीर्वाद घ्यावा.
  • प्रार्थना करावी.
  • यानंतर उत्तरपूजेची अक्षता वाहून नाग देवाला विसर्जनसाठी घेऊन जावे.
  • जाताना निर्माल्य सुद्धा पाण्यात सोडावे.
  • सगळ्यांना प्रसाद वाटप करावे.

नागपंचमी मधील पदार्थ

या दिवशी चिरणे, कापणे निषिद्ध असते. त्यामुळे नैवेद्य करताना जास्त करून उकडलेले किंवा शिजवलेले असे पदार्थ केले जातात. यामध्ये पुरणाचे दिंड, हळदीच्या पानातल्या पातोळ्या, मोदक, खीर यासारखे पारंपारिक आणि झटपट, घरच्या घरी केले जाणारे पदार्थ या दिवशी केले जातात.

नागपंचमी आणि सापांवरील अन्याय

हा सण प्राणी आणि निसर्ग याबाबत बाबतीत कृतज्ञता व्यक्त करायला लावणारा असा आहे. नाग हा प्राणी शेतातील किडे, बेडूक आणि उंदीर खाणारा आहे. म्हणून याला शेतकऱ्याचा मित्र देखिल संबोधले जाते. याबाबत कृतज्ञता म्हणून हिंदू धर्मातील पवित्र सण साजरा केला जातो. परंतु नागाला पकडून त्याचे दात काढले जातात. आणि त्याला टोपलीत घालून घरोघरी त्याचे दर्शन घेऊन उदरनिर्वाहासाठी पैसे कमवणारी आदिवासी, गारुडी लोक नागपंचमीच्या वेळी हमखास फिरतात. हा नागांवरील अन्याय आहे. याबाबत सामाजिक संघटना, नैसर्गिक प्राणी मित्र संघटना यांनी आवाज उठवून प्राणी संवर्धन आणि संरक्षण कायदा केला आहे. त्यामुळे आता या गोष्टीला, धंद्याला सरकारने कायमस्वरूपी बंदी केलेली आहे.

नागपंचमी कथा – नाग पंचमी कथा – (NAG PANCHAMI STORY)

एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतामध्ये एक वारूळ होते. तो श्रावण महिन्यातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. आणि शेत नांगरू लागला. त्या ठिकाणी असलेल्या वारुळाला नांगराचा फाळ लागून त्या वारुळात असलेल्या नागाची पिल्ले मरण पावली.

थोड्या वेळानंतर नागिण त्या ठिकाणी आल्यावर आपले वारूळ पाहू लागले तर त्या ठिकाणी तिला वारूळ आणि पिल्ले दिसली नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तिच्या मनात आले की, ह्या शेतकऱ्याने त्याच्या नांगराने माझी पिल्ले आणि वारूळ दोन्हीही उध्वस्त केले. रागाने ती त्या शेतकऱ्याच्या घरात गेली आणि घरात असलेल्या सगळ्यांना दंश करून तिने मारून टाकले नंतर तिला समजले की, शेतकऱ्याची एक मुलगी लग्न होऊन दुसऱ्या गावी राहत आहे.

नागाने तिच्या गावी जाऊन तिला देखील मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी नाग तिच्यापर्यंत पोहोचला त्यावेळी ती शेतकऱ्याची मुलगी नागाची पूजा करत होती. त्यानंतर तिने दुधाचा नैवेद्य दाखवून लाह्या, दुर्वा, फुले वाहिली. यामुळे तिची ही पूजा आणि श्रद्धा पाहून नाग खुश झाले. त्यानंतर त्या मुलीवर ते प्रसन्न होऊन आई-वडिलांबाबत विचारणा करू लागले. त्यावेळी तिला समजले की, आपण ज्या कुटुंबाला दंश करून मारले हेच तिचे कुटुंब.

झालेला सगळा प्रकार नागाने त्या मुलीला सांगितला. त्यामुळे मुलीला फार वाईट वाटले व तिने या सगळ्यांना कसे जिवंत करावे याविषयीची माहिती विचारली. त्यानंतर नागाने तिला अमृत आणून दिले. मुलगी अमृत घेऊन आपल्या माहेरी गेली. आणि सर्वांच्या तोंडात तिने अमृत घातले. त्यामुळे सगळी मंडळी, सगळे कुटुंब जिवंत झाले. आणि सगळ्यांना आनंद झाला.

पुढे घडलेला सगळ्या प्रकार तिने आपल्या आई-वडिलांना सांगितला आणि हे व्रत कसे करावे? याचा सगळा पूजेचा विधी सांगितला. त्यानंतर या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर काही शिजवू नये, तळलेले खाऊ नये असे देखील सांगितले. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. या कुटुंबाला जसा नाग प्रसन्न झाला, तसाच आपल्याला देखील नाग प्रसन्न व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया.

ही कथा सुद्धा नक्की ऐका

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नागपंचमी

पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी कोणत्याही प्राण्यांचे संरक्षण व्हावे त्यांच्या जीवाला इजा होऊ नये अशी सुद्धा परंपरा आहे. यातून एक वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला दिसून येतो. या दिवशी या सणाच्या निमित्ताने विज्ञान विषयक आस्था असणाऱ्या विज्ञान प्रेमींनी समाजातील लोकांचे सापांविषयीचे समज, गैरसमज तसेच अज्ञान दूर केले पाहिजे. सापांच्या विविध प्रजातींचे ज्ञान होण्यासाठी या ठिकाणी प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करता येईल याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे सापांवर आधारित विविध प्रकारची डॉक्युमेंटरी, व्हिडिओ सुद्धा समाजातील लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर करता येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

नागांविषयी असलेले गैरसमज

सणाच्या दिवशी अनेक गारुडी जिवंत नागाला दूध पाजतात. परंतु सर्प किंवा नाग कधीही दूध पीत नाही. कारण दूध पिणे हे त्याचे अन्न नसून साप किंवा नाग हा मांसाहारी प्राणी असून तो बेडूक,उंदीर, किडे असे जिवंत प्राणी पकडून खात असतो. परंतु या दिवशी काही गारुडी सापांना जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते अनेक दिवस त्यांना उपाशी ठेवतात. जेणेकरून भुकेच्या पोटी ते दूध प्राशन करतात. यामुळे त्यांना दुधाची विषबाधा होते. आणि हजारो नाग मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सापांविषयीचा हा गैरसमज लोकांचा दूर करणे अत्यावश्यक आहे.

नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी या सापांचे किंवा नागांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साप किंवा नाग आपल्याला दिसून आल्यास सर्वप्रथम आपण सर्पमित्राला फोन करून त्याच्या करवी त्याला जंगलात नेऊन सोडणे महत्त्वाचे आहे. प्राणीमात्रांविषयीची आपले प्रेमाची भावना वाढीस यावी यासाठी हा नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.

भारतातील नागपंचमी

नाग देवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतातील लोक नागदेवाची पूजा करतात. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये नागपंचमी कशाप्रकारे साजरी केली जाते याची माहिती खालील प्रमाणे –

१. उत्तर भारत

शारीरिक शक्तीचे प्रदर्शन आणि शारीरिक सामर्थ्य वाढवणे या दृष्टीने या दिवसाला उत्तर भारतामध्ये महत्त्व आहे. कुस्तीपटू कुस्तीचे सादरीकरण या दिवशी आखाड्यामध्ये करतात. या दिवशी कुस्तीची लढत ही पारंपारिक लढती सारखी होत नसून भगवान शंकर, श्रीराम तसेच हनुमान आणि आखाड्याची भूमी यांना अभिवादन करून केली जाते.

२. राजस्थान

एका पौराणिक आख्यायिकेनुसार नागिनी ने दिलेल्या मण्यामुळे एका सुनेचा घरामध्ये सन्मान झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणच्या प्रत्येक घरातील सुना ह्या मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा नागपंचमीचा सण साजरा करतात.

३. दक्षिण भारत

या ठिकाणी गाईच्या शेणापासून नागाची प्रतिमा तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते. या प्रतिमेवर चंदन, हळद यापासून पाच फण्यांचा नाग तयार करून त्याची पूजा करण्याची देखील या ठिकाणी प्रथा आहे.

४. कच्छ प्रदेशातील भूजगाव

या ठिकाणच्या नागा जमातीतील सदस्यांना नागपंचमीच्या मिरवणुकीमध्ये महत्त्वाचा मान दिला जातो. घोडे, हत्ती यांना सजवून मिरवणूक काढली जाते. स्त्री – पुरुष त्यांच्या पारंपारिक पोशाखामध्ये या मिरवणुकीमध्ये उत्साहाने सामील होतात. या मिरवणुकीसाठी नागांच्या मूळ जमातीचे सदस्य नेपाळ देशातून आवर्जून आमंत्रित केले जातात.

५. पंजाब

या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी घरोघरी भिंतींवर नागाची काळया रंगाची प्रतिकृती काढली जाते. आणि त्याची पूजा केली जाते. अशी पूजा केल्याने वर्षभर सापाचे दर्शन होत नाही असा त्या लोकांचा समज आहे.

६. आदिवासी समाज

या दिवशी या ठिकाणचे लोक एका मोठ्या झाडाची फांदी तोडून ती उलटी म्हणजेच निमूळती बाजू जमिनीत पुरतात. आणि फांदीचा मोठा भाग हा व्यवस्थित तासून घेतात. असे केल्यामुळे त्यावर्षी शेतामध्ये भरपूर पीक येते असे या ठिकाणच्या लोकांचा समज आहे.

७. नाथ संप्रदाय

नागपंचमीच्या दिवशी दर बारा वर्षांनी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा – गौतमी च्या संगमावर स्नान करतात.

८. इतर राज्ये

उत्तर प्रदेश, गुजरात, काश्मीर, मध्य प्रदेश, बंगाल यासारख्या राज्यांमध्ये या दिवशी नागांची पूजा केली जाते.

९. कश्मीर

या ठिकाणी संतनाथ, इंद्रनाथ, शेषनाग यासारखी देवळे असून चिनाब नदीच्या काठी वासूकीचे मंदिर देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

FAQ

नागपंचमी कधी असते?

हिंदू पंचांगानुसार मराठी श्रावण महिन्यामध्ये पाचव्या दिवशी नागपंचमी असते.

नागपंचमीला कोणाला पुजले जाते?

नागपंचमीला नागाला पुजले जाते.

नागपंचमीच्या दिवशी काय करू नये?

नागपंचमीच्या दिवशी शेतातील कामे, त्याचप्रमाणे खणू नये, तोडू नये, चिरु नये, कापू नये तसेच धारदार वस्तूंचा वापर करू नये, जेवणामध्ये काही तळू नये, लोखंडी तव्यावर काहीही करू नये.

नागाला दूध पाजावे का?

नागाला दूध पाजणे हे आपल्या श्रद्धेचे एक प्रतीक मानले जाते. परंतु नाग हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो बेडूक, उंदीर यासारखे प्राणी खातो. दूध पिल्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.

नागांचे आयुष्य किती वर्षांचे असते?

नागांचे आयुष्य हे साधारण दहा ते पंचवीस वर्षांच्या दरम्यान असते.

२०२३ ला नागपंचमी कधी आहे?

सन २०२३ ला नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ सोमवारी आहे.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये नागपंचमी सणाबाबतचा इतिहास आणि त्याबाबतची श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती देताना कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे या लेखांमध्ये काही चुका आढळल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment