मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर, जवळपास एक दशक रंजना ताईंनी मराठी सिनेमाजगत आणि प्रेक्षकांचा मनावर राज्य केलं. मात्र यशाच्या उच्च शिखरावर असताना रंजनाताईंच्या आयुष्यात अशी एक दुर्दैवी घटना घडली की त्यांच्या फिल्मी करिअरला मोठा ब्रेक लागला. रंजना ताईंचा सिनेजगतातील सुवर्णकाळ आणि एका दुर्दैवी घटनेनंतर झालेल्या त्यांच्या करिअरची वाताहात याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कायमच अनुत्तरित राहिलेल्या अशोक सराफ आणि रंजना यांच्या नातेसंबंधांबद्दल सुद्धा सांगणार आहोत.
रंजना देशमुख यांचं बालपण
रंजना या छोट्या नावाने जरी त्यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली असली तरी त्यांच पूर्ण नाव होतं रंजना गोवर्धन देशमुख. त्यांचा जन्म 23 जुलै 1955 रोजी झाला. त्यांचे वडील गोवर्धन देशमुख हे सुद्धा रंगमंचावरील नामांकित अभिनेते होते. गुजराती नाट्यसृष्टीत त्यांना बालगंधर्व अशी त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या आईचं नाव वत्सला देशमुख. पिंजरा चित्रपटात त्यांनी संध्या यांच्या मोठा बहिणीची भूमिका निभावली होती.
रंजना लहान असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे रंजनाताई आपल्या मावशीकडे राहायला होत्या. संध्या त्या काळी हिंदी चित्रपट क्षेत्रात कार्यरत होत्या. रंजना परेल इंग्लिश स्कूल मधून आपलं शिक्षण घेत होत्या. आपल्या मावशीला पाहून रंजनाताईंना आपणही अभिनेत्री व्हावं, असं मनोमन वाटायचं.
रंजना यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सिने सृष्टीत काम सुरू केलं होतं. हरिश्चंद्र तारामती या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. लडकी सह्याद्री की या हिंदी चित्रपटातील छोटा रोल केला होता. तरीही वत्सला बाईंचा त्यांना विरोध होता. रंजना यांना या क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना एका नामांकित इन्स्टिट्यूट मधून सेक्रेटरी, ब्युटी पार्लर, बेकिंग, केटरिंग असे वेगवेगळे कोर्स करायला लावले. त्यांनी ते सगळे कोर्स पूर्ण केले. अगदी रुईया महाविद्यालयातून तत्वज्ञान आणि साहित्य या विषयातही पदवी मिळवली.
पण शेवटी नियतीने रंजनाताईंना अभिनयाच्या वाटेवर आणलं. त्यांना पहिली संधी मिळाली ती व्ही. शांताराम यांच्यामुळे. चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही. शांताराम यांनी रंजना यांना विचारलं आणि रंजना यांच्या अभिनेत्री म्हणून करकीर्दीची सुरुवात झाली. त्या सिनेमा मधील छोटी भूमिका सुद्धा त्यांनी जबरदस्त गाजविली.
अल्पावधीत मिळवलं यश
गोरा रंग, सुंदर आणि सात्विक चेहरा, काळेभोर डोळे, नजरेतला करारीपणा, डौलदार बांधा धारदार नाक, गालावरचा मोहक तीळ आणि अंगी असलेल्या नटखटपणाच्या जोरावर रंजनाताईंना बराच काळ मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने वेड केलं. जितक्या सहज लोकांना त्या रडवायच्या तितक्यात सहज लोकांना हसवायच्या सुद्धा.
व्ही. शांताराम यांनी त्यांच्या झुंज या सिनेमात रंजनाताईंना मुख्य नायिकेची भूमिका दिली. त्या सिनेमातील ग्रामीण शाळेतल्या शिक्षिकेची भूमिका त्यांनी साकारली. हा चित्रपट हिट झाला. त्यानंतर रंजनाताई काय ताकदीच्या कलावंत आहेत याची सर्वांना खात्री पटली. पुढे 31 डिसेंबर 1976 रोजी रंजना यांची मुख्य भूमिका असणारा असला नवरा नको ग बाई हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्या सिनेमात राजा गोसावी या कसलेल्या कलाकारासोबत त्यांनी साकारलेली टिपिकल शहरी तरुणीची भूमिका सुद्धा खूप गाजली. लोकांनी तो सिनेमा डोक्यावर घेतला वर घेतला.
रंजनाताईंचा करिअरला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली
पुढे गावातील स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या संबंधामधून जन्माला आलेल्या आणि समाजाने नाकरलेल्या मुलीची भूमिका त्यांनी साकारली. याचवेळी सुशीला चित्रपटातील शिक्षिका ते खूनी ही भूमिका कौतुकास पात्र ठरली.
भुजंग चित्रपटात भस्म्या झालेला खादाड भुजंगराव उर्फ निळू फुलेंच्या त्रासलेल्या बायकोचा रोल सुद्धा त्यांनी उत्तम पद्धतीने केला. अरे संसार संसार या चित्रपटातील तरुण सून, नंतर तीन लेकरांची आई, मग वयोवृद्ध आई अशीही भूमिका त्यांनी लीलया पेलली. कुलदीप पवार, अशोक सराफ, रिमा लागू, मोहन गोखले, दिनकर इनामदार, अलका इनामदार यांच्यासोबत त्यांनी आर संसार संसार हा सिनेमा सुपरहिट करून दाखवला.
गरीब शेतकऱ्यांचा खांद्याला खांदा लावून उभी राहणारी बायको, नवऱ्याच्या मृत्यू नंतर मुलासाठी हिम्मत दाखवणारी आई आणि म्हातारपणी घरादाराची वाताहात होऊ नये म्हणून जीव तोडणारी गरीब सासू असा वयोपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास, रंजनाताईनी एकाच चित्रपटातून उलगडून दाखवला. तो त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा दिला. त्यानंतर रंजनाताई पुन्हा उठून दिसल्या त्या म्हणजे मुंबईचा फौजदारी या सिनेमामधून झालेले रवींद्र महाजन यांच्या सोबत त्यांनी खेडवळ बाई ते सुशीक्षीतस्त्री असा प्रवास रंजनाताईंनी लोकांसमोर नेमका मांडला.
रंजना – अशोक सराफ जोडी
रंजनाताईंनी त्यांच्या कारकीर्द अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. पण त्यांची खरी गट्टी जमली ती म्हणजे अशोक सराफ यांच्याबरोबर. गोंधळात गोंधळ, एक डाव भुताचा, सुशीला, खिचडी, बीन कामाचा नवरा, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, असे एकापेक्षा एक हिट आणि गाजलेले सिनेमे दिले. त्यापैकी बिन कामाचा नवरा आणि गुपचूप गुपचूप हे दोन मास्टरपीस आजच्या घडीला कल्ट क्लासीक म्हणून आजही लक्षात आहेत.
80 च्या दशकात अशोक सराफ आणि रंजनाताई यांची केमिस्ट्री लोकांना भरतीच आवडली होती. कधी कधी रंजनाताईं कॉमेडीच्या बाबतीत अशोक मामांना सुद्धा टक्कर द्यायच्या. दरम्यानच्या काळात अशोक सराफ आणि रंजनाताई यांच्या प्रेमाच्या इंडस्ट्रीत जोर धरू लागल्या होत्या. पुढे त्यांनी गुपचुप साखरपुडा उरकून घेतल्याची अफवा सुद्धा पसरली होती. मात्र अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांच्याशी लग्न केलं आणि या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
रंजना देशमुख यांचा दुर्दैवी अपघात
अजूनही सिनेरसिकांचं असं मानणं आहे की 1987 साली रंजनाताईंचा जो भयंकर अपघात झाला त्यानंतर त्यांच्यातलं नातं खऱ्या अर्थाने संपत गेलं. झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रंजनाताई मुंबईहून बेंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. आणि त्या अपघातात त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. त्यांना कायमचे अपंगत्व आले. त्या अपघातातून रंजनाताई शेवटपर्यंत सावरू शकल्या नाहीत. हा धक्का त्यांच्यासाठी आणि संबंध मराठी सिनेमासाठी ही प्रचंड आघात करणार होता.
अपघातानंतर रंजनाताईंच आयुष्यच बदलून गेलं. मराठी पडद्यावर राज्य करणारी चुलबुली रंजना आता व्हीलचेअर वर होती. याचवेळी अशोक सराफ, रंजना यांच्या आयुष्यातून कायमचे निघून गेल्याच्या चर्चाही रंगल्या. अशोक सराफ यांनी आजपर्यंत या विषयावर कधीच भाष्य केलं नाही.
रंजना ताईंचं शेवटचं नाटक
अपघातानंतर रंजनाताईंनी एका नाटकात आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. ते नाटक स्वतः त्यांच्याच आयुष्यवर आधारित असल्याचे बोललं जातं. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तीचा प्रियकर सोडून जातो अशा कथानकाचं ते नाटक होतं आणि त्या नाटकात स्वतः रंजनाताईंनी अखेरची भूमिका केली होती. त्यानंतर रंजनाताईंचा फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला.
आता अशोक सराफ आणि रंजनाताई यांच्यातील प्रेमाची चर्चा किती खरी होती हे माहित नाही.
रंजना ताईंचा शेवट
त्यांना शेवटच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. अक्षरशः व्हीलचेअरवर बसून किंवा बेडवर त्यांना दिवस काढावे लागले. वयाच्या 45 व्या वर्षी परेल इथे राहत्या घरी त्यांना हृदयाविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांच अकस्मात निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेमाचा एक सुवर्णकाळ झाकोळला गेला. मराठी सिनेमाची खूप मोठी हानी झाली.
रंजना ताईंची आठवण
त्यांच्या पुण्यतिथी दिवशी झी टॉकीज कडून त्यांचे काही गाजलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतात. राज्य सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुद्धा सुरू केला. पण त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून रंजनाताई लोकांचा मनात कायम जिवंत राहिल्यात हे मात्र नक्कीच. जिवंत असत्या तर त्यांच्याकडून फार मोठ्या भूमिका बघायला मिळाल्या असत्या. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेमाचं कधीही भरून न निघणाऱ्या नुकसान झाले. खऱ्या अर्थाने मराठी सिनेमाची सुपरस्टार गमावली.
हे सुद्धा वाचा 👇
- अॅमेझॉन प्राइम वरील 15 बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज
- नेटफ्लिक्स वरील 13 बेस्ट हिन्दी रोमॅंटिक वेब सिरिज