त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी : TRIMBAKESHWAR INFORMATION IN MARATHI

TRIMBAKESHWAR INFORMATION IN MARATHI | त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी – जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंगे आहेत. पण या सर्वांत भारतातील बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. यामध्ये गुजरात मधील सोमनाथ आणि नागेश्वर, मल्लिकार्जुन, उज्जैन मधील महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, पुण्याजवळील भीमाशंकर, काशी क्षेत्रात भगवान विश्वेश्वर, नाशिक मधील त्रंबकेश्वर, परळी वैजनाथ, संभाजीनगर मधील घृष्णेश्वर, केदारनाथ आणि तामिळनाडू मधील रामेश्वर ज्योतिर्लिंग यांचा समावेश होतो.

Table of Contents

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग माहिती मराठी : TRIMBAKESHWAR INFORMATION IN MARATHI

नाव –श्री त्र्यंबकेश्वर
स्थान –भगवान शंकर
ज्योतिर्लिंग –दहावे
गाव –त्र्यंबक
जिल्हा –नाशिक
कोणी बांधले –नानासाहेब पेशवे
स्थापना –१७८६
नदी –गोदावरी
उत्सव –महाशिवरात्र

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रस्तावना

भगवान शंकरांच्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या तेजोमुळे व पवित्र स्थानांचे महत्त्व फार मोठे आहे. सर्व ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शनासाठी वर्षभर भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. या शिवस्थानाच्या दर्शनाने आपले मनुष्य जीवन सुखी, समाधानी, पुण्यमय, आणि कृतार्थ होते, अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहे.

म्हणूनच आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेबपेज द्वारे त्रंबकेश्वर मंदिर आणि त्याबाबतचा इतिहास, वैशिष्ट्य याबाबतची सगळी माहिती या लेखाद्वारे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया त्र्यंबकेश्वर मंदिर आणि त्याची संपूर्ण माहिती.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक नकाशा

नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर इतिहास

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्रंबक गावामध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे दहावे ज्योतिर्लिंग आहे. दहाव्या शतकामध्ये शिलाहार राजा झंझ याने गोदावरी नदी ते भीमा नदी या नद्यांच्या दरम्याने एकूण बारा शिवालये बांधली होती. त्यातील हे एक शिवालय आहे असे समजले जाते. १७५५ – १७८६ या तब्बल ३१ वर्षांच्या काळा मध्ये तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची स्थापना करून या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. ३० एप्रिल १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून भारत सरकारने या मंदिराला घोषित केले.

TRIMBAKESHWAR TEMPLE

हे मंदिर काळया शिळेपासून बनवले गेले आहे. या मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे. मंदिराच्या चहू बाजूस दगडी तटबंदी आहे. या कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वज पंचधातूंचा आहे. मंदिराच्या बाजूला कुशावर्त तीर्थ आहे. याचा जिर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आत मध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे.

संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पुरातन काळात बनवल्या गेलेल्या या मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो आणि मंदिराच्या चहुकडे चार दरवाजे आहे. पश्चिमेला असलेल्या दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो. बाकी दिवस भक्तगण तीन दरवाज्यातून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती व्हिडिओ

त्र्यंबकेश्वर नावाचा अर्थ

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगावर इतर शिवलिंगांप्रमाणे शाळूंका नाहीत तर त्या ठिकाणी खलबत्त्यासारखा एक खोल खड्डा आहे. त्या खोल खड्ड्यात अंगठ्यासारखी तीन लिंगे आहेत. ही तीन लिंगे म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश. म्हणूनच या त्रिमूर्ती वरून याला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले आहे.

त्र्यंबकेश्वर शिवलिंग

मंदिरामधील त्र्यंबकेश्वर शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. तसेच या लिंगाच्या मध्यभागी अंगठ्या सारख्या आकाराची तीन लिंगे आहेत ही तीन लिंगे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पुजले जाते. या शिवलिंगाला इतर शिवलिंगाप्रमाणे शाळुंका नाहीत. तीन शिवलिंगे म्हणजेच त्रंबकेश्वर म्हणून ओळखले जाते.

या शिवलिंगावरून पाण्याचा छोटा झरा नेहमी वाहत असतो. निसर्गदेवतेने अविरत सुरू ठेवलेला हा जणू अखंड जलाभिषेकच आहे असे समजले जाते. या ज्योतिर्लिंग मधून कधीकधी सिंहगर्जना ऐकू येते तर कधी कधी वाफा निघून अग्नीच्या ज्वाला ही प्रकट होतात असे समजले जाते.

याचा बचाव करण्यासाठी भांग मिश्रीत दुधाचे हंडे भरभरून शिवलिंगाला अभिषेक घातला जातो. आणि रुद्र पाठ केला जातो. यावेळी जे भांग मिश्रीत दूध त्या शिवलिंगाच्या खड्ड्यात भरले जाऊन गायब होते या दुधाचे गायब होणे म्हणजेच महादेव शांत झाले असे समजले जाते.

Trimbakeshwar Mahadev Mandir

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती मराठी

  • १. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि नाथ समाजाला दीक्षा देणारे प्रसिद्ध संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी समाधी घेतली.
  • २. पितृदोष दूर करण्यासाठी केला जाणारा नारायण नागबळीसारखा अनोखा सोहळा भारतातील फक्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये केला जातो.
  • ३. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या कुशावर्त तलावात स्नान केल्याने सगळी पापे नष्ट होतात असे मानले जाते.
  • ४. दर बारा वर्षांनी कुशावर्त तलाव हा कुंभमेळासाठी प्रमुख केंद्र ठरला आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये होणाऱ्या कुंभमेळाला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात.
  • ५. या ठिकाणी असलेले शिवलिंग हे अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपारी सारख्या आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश विराजमान आहेत.
  • ६. ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी तेथील स्थानिक लोकांच्या माहितीप्रमाणे जवळपास ३५० वर्षापासून चालू आहे जी केवळ या मंदिरातच होते.
  • ७. हे मंदिर एका मोठ्या काळया दगडापासून बनवले गेले आहे.
  • ८. या लिंगाच्या चारही बाजूला एक रत्नजडित मुकुट ठेवण्यात आलेला आहे. हा मुकुट पांडव काळापासून असल्याचे सांगितले जाते. या मुकुटामध्ये अनमोल रत्ने देखील आहेत. हा मुकुट भाविकांना फक्त सोमवारच्या दिवशी चार ते पाच वाजेपर्यंत बघता येतो.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे रहस्य

ज्योर्तीलिंगाची सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की, ह्या ज्योर्तीलिंगाची तीन मुखे आहेत. ह्या लिंगाच्या चारही बाजुला एक रत्नजडीत मुकुट देखील ठेवण्यात आलेला आहे. ह्या मुकुटविषयी असे देखील म्हटले जाते की, हा मुकुट पांडवाच्या काळापासून इथे ठेवला गेला आहे. ह्या मुकुटामध्ये अनेक अनमोल रत्ने देखील आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हा मुकुट भाविकांना फक्त सोमवारच्या दिवशी चार ते पाच वाजेपर्यत बघता येतो.

TRIMBAKESHWAR JYOTIRLINGA

त्र्यंबकेश्वर पूजा वेळ

  • भगवान शंकराच्या सोन्याच्या मुकुटाच्या दर्शनाची वेळ : सकाळी ४.३० ते ५.०० वाजेपर्यंत
  • सकाळची मंगल आरती ची वेळ : ५.३० ते ६.०० वाजेपर्यंत.
  • मंदिरातील अभिषेक : सकाळी ६.०० ते ७.०० वाजेपर्यंत.
  • मंदिराच्या बाहेरील अभिषेक : सकाळी ७.०० ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
  • विशेष पूजा, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप : सकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत.
  • दुपारची पूजा : १.०० ते १.३० वाजेपर्यंत.
  • संध्याकाळची आरती : रात्री ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत

त्र्यंबकेश्वर दर्शन वेळ आणि प्रवेश शुल्क

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ योग्य समजला जातो. जून ते सप्टेंबर या ठिकाणी अतिवृष्टी होत असते. त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे एप्रिल मे या काळामध्ये उष्णतेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे आपल्याला उष्माघाताचा होण्याची शक्यता असते.

मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहावे लागते. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. परंतु आपल्याला दोनशे रुपयांचा पास काढून थेट दर्शन मिळू शकते.

त्र्यंबकेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे?


महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये त्र्यंबक गावामध्ये हे मंदिरआहे. नाशिक या मोठ्या शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी पर्यटकांना सुलभ होते.

  • विमान – नाशिकच्या ओझर विमानतळावरून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी एक तास तीस मिनिटांचा वेळ लागतो म्हणजेच ५० किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी तुम्ही कॅब किंवा बस ने प्रवास करू शकता.
  • ट्रेन – नाशिक रेल्वे स्टेशन वरून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी एक तासाचा वेळ म्हणजेच४० किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी तुम्ही बस किंवा कॅबने येऊ शकता.
  • बस – त्र्यंबकेश्वर बस स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे त्रंबकेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही ऑटो ने येऊ शकता.
  • खाजगी वाहने – नाशिक हा मोठमोठे राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेला असल्यामुळे खाजगी वाहनाने येणे सुद्धा सोयीस्कर ठरते.
  • नाशिक ते त्र्यंबकेश्वर मंदिर – ३० किलोमीटर
  • मुंबई ते नाशिक – १६५ किलोमीटर
  • पुणे ते नाशिक – २१३ किलोमीटर
त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक जवळील काही मंदिरे

१. केदारेश्वर मंदिर

हे मंदिर कुशावर्त तलावाच्या आग्नेय कोपऱ्यावर आहे. प्रमुख देवता ही केदारेश्वर आहे. भगवान शिवाचे एक रूप जे केदारभट्ट म्हणून प्रकट झाले आणि संत गौतमाच्या पापांना क्षमा केली. पुढे हे मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

२. अंजनेरी मंदिर

हे मंदिर अंजनी सुत भगवान हनुमानाचे आहे. टेकडी हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान आहे.

३. निवृत्तीनाथ मंदिर –

नाथ समाजाची सुरुवात करणारे आणि शास्त्रांचे अपार ज्ञान असलेल्या निवृत्तीनाथांनी येथे समाधी घेतली. हे मंदिर त्यांना समर्पित आहे.

४. श्री निलांबिका मंदिर /दत्तात्रेय मंदिर

हे मंदिर ब्रह्मगिरी टेकडीच्या पूर्वेकडील नील पर्वत शिखरावर आहे. पार्वती , रेणुका (लक्ष्मी) आणि सरस्वती या तिन्ही देवी भगवान शंकराच्या तपश्चर्येदरम्यान भेटायला आल्या असा भक्तांचा विश्वास आहे. तपश्चर्येनंतर त्यांना त्या ठिकाणी राहण्याची विनंती केली असावी असे मानले जाते.

५. कुशावर्त –

पवित्र तलाव त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा तलाव मुख्य केंद्रबिंदू आहे. शासकीय नियमानुसार शैव धर्माचे पालन करणारे साधू या तलावात स्नान करतात.

त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक

या मंदिरांव्यतिरिक्त, त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ अनेक पवित्र स्थाने आहेत. त्यापैकी काही खालील प्रमाणे

ब्रह्मगिरी टेकडी

टेकडी ही गोदावरी नदीचे उगमस्थान आहे, जी तीन बाजूंनी टेकडीवरून वाहते. पूर्वेकडे वाहणारा प्रवाह म्हणजे गोदावरी. एक दक्षिणेला वैतरणा आणि पश्चिमेला गंगा आहे. शिखरावर जाण्यासाठी ५०० पायऱ्या चढाव्या लागतात .

इंद्र तीर्थ

हे तीर्थ कुशावर्त कुंडाच्या पूर्वेस आहे. ऋषींची पत्नी अहिल्या हिला ऋषी गौतम यांनी दिलेला शाप पुसण्यासाठी भगवान इंद्राने या कुंडात स्नान केले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अहिल्या संगम तीर्थ

ऋषी गौतम यांनी केलेल्या गहन तपश्चर्येदरम्यान जटीलाने, त्यांची पत्नी अहिल्येचे रूप धारण केले. पण ऋषी गौतमने तिला ओळखले आणि तिला शाप दिला की, तिचे नदीत रूपांतर होईल. मात्र जटीलाने माफीची याचना केली तेव्हा ऋषी गौतम म्हणाले की, ती गोदावरी नदीत मिसळल्यावरच शाप मुक्त होईल अशी आख्यायिका आहे. गोदावरी नदीला मिळते ते ठिकाण म्हणजे अहिल्या संगम तीर्थ.

कुंभमेळा

गोदावरी नदी ही अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते. पुराणातील संदर्भानुसार गौतम ऋषी यांनी गंगा नदीला कुशावर्त तीर्थामध्ये अडवले होते. त्यामुळे या ठिकाणी पाप निवारण करण्यासाठी तसेच पुण्यप्राप्तीसाठी स्नान केले जाते. इथे येणारे अनेक भाविक या ठिकाणी स्नान करतात. विशेष करून या ठिकाणी बारा वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो.

त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक

नाशिक मधील पर्यटन स्थळे

मांगी तुंगी मंदिर

नाशिक पासून जवळपास १२५ किलोमीटर अंतरावर सटाणा तालुक्यात हे मांगीतुंगी चे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ४३४३ फूट उंचीवर मांगी शिखर तर समुद्रसपाटीपासून ४३६६ उंचीवर तुंगी शिखर आहे. हे एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरामध्ये साधना केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते, असे समजले जाते.

पंचवटी

नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर हा पंचवटीचा परिसर आहे. काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसराला पंचवटी असे म्हटले जाते. या मंदिराच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा, गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, पाताळेश्वर मंदिर, मारुती, कार्तिक स्वामी मंदिर, काट्या मारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर यांसारखी अनेक मंदिरे या परिसरामध्ये आहेत. म्हणून या मंदिरामुळेच नाशिकला “पश्चिम भारताची काशी” असे देखील म्हटले जाते.

सर्वधर्म मंदिर तपोवन

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे पंचवटीतील तपोवन परिसरात सर्वधर्म मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. १४ वर्षांच्या वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांनी या तपोवनात जास्तीत जास्त काळ घालवला गेल्याचे समजले जाते. शुर्पणखेचे नाक कापले होते त्या ठिकाणाहून हे तपोवन हाकेच्या अंतरावर असून कपिला गोदावरी संगमासमोर हे सर्व धर्म मंदिर असून या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसून येते.

शुर्पणखेचे नाक कापणे, सीतेचे अपहरण, प्रभू रामचंद्रांना शबरीने खाऊ घातलेली बोरे, प्रभू रामाच्या पादुका घेऊन निघालेला प्रिय बंधू भरत यासारखे प्रसंग या ठिकाणी उभे केलेले आहेत.

पांडव लेणी

नाशिक बस स्थानकापासून चार किलोमीटरच्या अंतरावर एका मोठ्या टेकडीवर असलेली पांडव लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत. ही लेणी अति प्राचीन आहेत. या ठिकाणी असलेला पाली भाषेतील शिलालेखावरून ही लेणी जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे समजले जाते. या ठिकाणी एकूण २४ लेणी आहेत.

सप्तशृंगी

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये जवळपास सात किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी आहे. या ठिकाणी असलेले हे देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले असल्यामुळे याला सप्तशृंग म्हणजे सप्तशृंगी असे म्हणतात. साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्धे शक्तीपीठ मानले जाते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून जवळपास ४६५९ फूट उंचीवर आहे. या देवीची मूर्ती आठ फूट उंचीची दगडामध्ये कोरलेली आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिक बस स्थानकापासून आठ किलोमीटरच्या अंतरावर गंगापूर रस्त्यावर हे मंदिर आहे. गोदावरी काठी असलेल्या या मंदिरामध्ये भगवान शंकराची आणि हनुमानाची मूर्ती असून आजूबाजूचा परिसर हा वृक्षवेलींनी वेढला गेलेला आहे.

रामकुंड

नाशिक बस स्थानकापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर गोदावरी नदीपात्रात हे रामकुंड आहे. वनवासा दरम्यान प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी स्नान केले होते अशी मान्यता असल्यामुळे हे ठिकाण पवित्र समजले जाते.

धम्मगिरी

एस एन गोयंका यांच्याद्वारे स्थापन केलेले हे धम्मगिरी ध्यान केंद्र आहे. हे केंद्र भारत आणि भारताच्या विविध भागातील बऱ्याच लोकांना आकर्षित करते.

काळाराम मंदिर

वनवासादरम्यान प्रभू रामचंद्र ज्या जागी राहिले होते त्या ठिकाणी हे मंदिर होते असे मानले जाते. या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या दगडातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

मंदिराजवळील हॉटेल्स

मंदिराजवळ कमी खर्चातील भक्तनिवास सुद्धा आपल्याला मिळू शकतात. या मंदिराजवळील काही प्रसिद्ध हॉटेल खालील प्रमाणे –

  • हॉटेल शिवानंद
  • गोल्डन पॅलेस
  • हॉटेल राधिका
  • हॉटेल मिडटाउन
  • हॉटेल शिवा
  • हॉटेल ध्रुव
  • हॉटेल तुलसी
  • हॉटेल संत निवास

प्रसिद्ध खाद्यपदार्थ

त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्यटन व नैसर्गिक थंड हवेचे ठिकाण म्हणून जसा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांसाठी ही प्रसिद्ध आहे. नाशिक हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्षांपासून जी वाईन तयार केली जाते त्यासाठी देखील नाशिक प्रसिद्ध आहे. साबुदाणा वडा, थालीपीठ, वडापाव, मिसळ यासारखे खाद्यपदार्थ तसेच चिवडा, लस्सी, जिलेबी यासारखी मिठाई देखील प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर

त्र्यंबकेश्वर कथाTRIMBAKESHWAR STORY

अहिल्याचे पती, श्री गौतम ऋषी दक्षिणेतील ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करीत होते. या काळात येथे सलग जवळपास शंभर वर्षे पाऊस पडला नव्हता. परिणामी पशुपक्षी मरू लागले. जमिनीवर व झाडावर हिरवे पानही दिसेना जे जिवंत होते ते पशुपक्षी, ऋषीमुनी यांना प्यायलाही पाणी न मिळाल्याने तेही तो परिसर सोडून जाऊ लागले. असा घनघोर दुष्काळ पाहून महर्षी गौतम व्याकुळ झाले व त्यांनी सहा महिन्यांपर्यंत प्राणायाम द्वारे मांगलिक तप केले.

यात प्रसन्न होऊन प्रकट झालेल्या देवाकडून त्यांनी पाण्यासाठी प्रार्थना केली. वरुण देवाच्या आदेशानुसार गौतम ऋषिंनी एक हातभर खोल असा खड्डा जमिनीत खोदला. त्यात वरून देवाच्या कृपेने पाणी भरले गेले. तेव्हा वरुण देव गौतम ऋषिना म्हणाले, तुमच्या पुण्य प्रतापाने या खड्ड्यातील पाणी अक्षय तीर्थ होईल व ते कधीही संपणार नाही. हे कुंड तुमच्याच नावाने प्रसिद्ध होईल व या ठिकाणी यज्ञ, हवन, श्रद्धा, कर्म व देवपूजा करणाऱ्याला पुण्य फल देणारे होईल, असे सांगून वरुण देव अंतर्धान पावले.

पाणी प्राप्त झाल्याने ऋषीमुनी आनंदीत झाले व आपल्या यज्ञ यागासाठी आवश्यक वस्तू त्यातून प्राप्त करू लागले व तिचे उत्पादन करू लागले. एकदा गौतम ऋषींचे शिष्य त्या खड्डा रुपी कुंडातून पाणी आणण्यासाठी गेले. त्याचवेळी इतर ऋषींच्या पत्नी ही तेथे पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.

आल्या आल्या त्या ऋषी पत्नीने अगोदर पाणी घेऊन द्यावे म्हणून हट्ट धरला. गौतम ऋषींच्या शिष्यांनी गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवी हिला बोलावून आणले आणि तिने मध्ये हस्तक्षेप करून शिष्यांना अगोदर पाणी मिळावे असा निर्णय केला. त्यामुळे इतर ऋषी पत्नींना ही गोष्ट अपमानास्पद वाटली. त्यांनी आपापल्या आश्रमात जाऊन ही गोष्ट आपापल्या पतीला तिखट मीठ लावून सांगितली व त्यांना भडकावून दिले या अपमनाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व ऋषींनी गणपतीला विनंती केली की गौतम ऋषींचे अहित व्हावे, त्यांचा अपमान होऊन त्यांनी येथून निघून जावे. श्री गणेशाला या सर्व ऋषींची गोष्ट पटली नाही त्यांनी इतर कोणताही वर मागण्याविषयी परोपरीने समजावून सांगितले.

परंतु ऋषिमुनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी गणेशाने नाईलाजाने त्यांना हवा असलेला वर दिला. पण यासोबतच परोपकारी गौतम ऋषींना त्रास दिल्याबद्दल होणाऱ्या भावी परिणामांना तोंड देण्यासाठी ही सज्ज राहण्याचा इशारा त्यांना दिला.

एके दिवशी गौतम ऋषी आपल्या हवनासाठी आवश्यक असणारी सामग्री घेण्यासाठी गेले असता, तेथे एक अतिशय अशक्त आणि हडकुळी गाय उभी होती. त्या गाईला तेथून बाजूला हटवण्यासाठी गौतम ऋषिंनी एका काठीद्वारे त्या गाईला हळूच मारले. तोच ती हडकुळी गाय तेथे कोसळून मरण पावली.

त्यामुळे इतर सर्व ऋषीमुनींनी एकच गोंधळ घातला. गाय मारल्याचे पातक गौतम ऋषींवर लादले. या गोष्टीमुळे गौतम ऋषी फार दुःखी झाले आणि त्या जागेला सोडून आपल्या पत्नीसह तेथून निघून गेले.

गोहत्त्येच्या पातकापासून मुक्तीसाठी गौतम ऋषिंना दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण केले. तो मार्ग म्हणजे स्वतः तप करून गंगेला धरतीवर आणून त्यात स्नान करणे आणि दुसरे म्हणजे एक कोटी शिवलिंग बनवून त्यांचे पूजन करणे. त्यांच्या या तपाचरणाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले व म्हणाले, तुम्ही तर शुद्ध अंतःकरणाचे ऋषी व महात्मा आहात. तुमच्यासोबत अन्याय झालेला आहे. तुम्ही कोणतेही पाप केलेले नाही. नंतर शिवाने त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यावर गौतम ऋषिंनी प्रार्थना केली की गंगेला धरतीवर प्रकट करून विश्वाचे कल्याण करावे.

भगवान शंकरांनी गंगेचे तत्वरूप अविशिष्ट जल ऋषींना प्रदान केले. या प्राप्त झालेल्या गंगेला गौतम ऋषिंनी नमन केले व स्वतः ला गोहत्येच्या पापा पासून मुक्त करण्याची प्रार्थना केली. गंगेने गौतम ऋषींना पवित्र केले व नंतर स्वर्गलोकी जाण्याची इच्छा प्रकट केली. पण भगवान शंकराने तिला या कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा आदेश दिला. यावर गंगेनेही भगवान शंकरांना प्रार्थना केली की, आपणही देवी पार्वतीसह पृथ्वीवर निवास करावा.

जगाच्या कल्याणासाठी तिची ही प्रार्थना शिवशंकराने मान्य केली. गंगेने भगवान शंकराला विचारले माझे महत्त्व जनतेला व जगाला कसे कळेल? तेव्हा सर्व ऋषीमुनी म्हणाले जोपर्यंत सिंह राशीत गुरु स्थित आहे, तोपर्यंत आम्ही सगळे गंगा किनारी राहू व रोज तिन्ही त्रिकाळ गंगेच्या या पवित्र जलामध्ये स्थान करून शिवपूजन करू. त्यांच्या पुण्य प्रभावाने आमची पापे नष्ट होतील. हे ऐकून भगवान शिव व गौतम ऋषी आणि गंगा तेथेच राहिले. गंगेला गौतमी हे नाव मिळाले तर शिवशंकराच्या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर हे नाव प्राप्त झाले.

त्र्यंबकेश्वर मंदिर

राबविल्या जाणाऱ्या पूजा आणि सेवा

१. कालसर्प पूजा

आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु काही लोकांना त्यांच्या जीवनामध्ये ग्रहांच्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्या लोकांसाठी ही कालसर्प पूजा केली जाते. या ठिकाणी पवित्र कुशावर्तात स्नान करून आपण केलेल्या पापाची क्षमा मागावी. या पूजेमध्ये तीळ, तूप, लोणी, दूध, गाय, सोने आणि इतर वस्तू देवाला दान केल्या जातात. या पूजेमध्ये फक्त नागाची पूजा केली जाते. त्यामुळे नाग पंचमीच्या दिवशी ही पूजा आपण केली तर अत्यंत शुभ समजली जाते.

२. नारायण नागबली पूजा

आपल्या हातून चुकून साप मारला गेला असेल तर ही पूजा करताना त्याबाबतीत क्षमा मागितली जाते. तसेच पूर्वजांच्या काही अपूर्ण इच्छा असतील तर पूर्वजा नाही या पूजे मार्गे शांत केले जाते. या ठिकाणी ही पूजा करताना गव्हाच्या पिठाचे एक कृत्रिम शरीर तयार केले जाते. ज्यावर तेथील भटजी पूर्वजांसाठी, अतृप्त आत्म्यासाठी सर्व संस्कार करतात. त्यानंतर ते मंत्राचा जप करतात जे पूर्वजांना, अतृप्त आत्म्यांना या पृथ्वीतला पासून मुक्त करतात. ही पूजा तीन दिवस चालते. ही पूजा करण्यासाठी पितृपक्ष हा उत्तम काळ समजला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी ही पूजा अद्वितीय अशी आहे.

३. त्रिपिंडी श्राद्ध पूजा

पूर्वजांच्या मोक्षासाठी, गोहत्येचा दोष दूर करण्यासाठी, बाळंतपणातील अडथळ्यांसाठी तसेच मृत आत्म्यांच्या अतृप्त इच्छांसाठी ही पूजा केली जाते.

४. महामृत्युंजय पूजा

दीर्घ आजारापासून मुक्त होण्यासाठी दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी आयुष्य मिळावे यासाठी ही पूजा केली जाते. भगवान शंकराची ही पूजा सर्वात शक्तिशाली पूजांपैकी एक आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तर्पण श्राद्ध, गंगापूजा, गंगा भेट यासारख्या पूजा देखील केल्या जातात. ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते.

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये राबवले जाणारे उत्सव

१. महाशिवरात्र

महाशिवरात्र भारतातील प्रमुख उत्सवांपैकी एक असा फाल्गुन कृष्ण चतुर्थीला असणारा सण आहे. पुराणातील संदर्भानुसार श्री भगवान शंकरांनी सृष्टीची रचना या दिवशी केली होती. तसेच या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती चा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये या दिवशी २४ तास हा उत्सव साजरा केला जातो.अनेक प्रकारे महादेवाची पूजा केली जाते. त्यामध्ये जलाभिषेक, रुद्राभिषेक केले जातात तसेच होम हवन आणि आरती देखील केली जाते. संपूर्ण भारतभरातून येणारे भावीक या दिवशी रुद्र जप करतात.

२. पिठोरी अमावस्या

या दिवशी म्हणजेच बैलपोळा उत्सवाच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये असलेल्या महानंदीचे पूजन केले जाते.

३. निवृत्तीनाथ महाराज यात्रा

शुद्ध एकादशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ व गुरु संत श्रेष्ठ श्री न्निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त संध्याकाळी निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये स्वागत करण्यात येते. त्यानंतर या मंदिरामध्ये अभंग आणि कीर्तन केले जाते.

४. गणेश चतुर्थी

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभागृहात पाच दिवस गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो या पाच दिवसांमध्ये सकाळ, संध्याकाळची आरती तसेच शांती पाठाचे पठण केले जाते. स्थानिक भजनी मंडळी कडून भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

५. पार्वती माता पूजन

अक्षय तृतीयेच्या दिवशी या ठिकाणी आरसे महालात पार्वती मातेची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा केली जाते तसेच आलेल्या सुहासिनींना हळदीकुंकू लावून हरभरे व खिरापत वाटून हा उत्सव साजरा केला जातो.

६. नवरात्र

त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असलेल्या देवींचा या देवस्थानाच्या वतीने नवचंडी यज्ञ केला जातो तसेच या परिसरातील नवदुर्गांचे पूजन आणि साडी चोळी चे कार्य पार पाडले जाते.

७. होळी

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरील मुख्य रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी होळी चे दहन केले जाते. या ठिकाणी फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड आणि फाल्गुन वद्य पंचमी रंगपंचमी उत्सव साजरे केली जातात.

८. दसरा

या दिवशी पहाटे येथील ज्योतिर्लिंगाचे पूजन केले जाते त्यानंतर देवस्थानच्या भांडारगृहात असणाऱ्या सगळ्या शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. यामध्ये आरसे महाल, ध्वजस्तंभ, पिंपळपार, नगारे, गोमाता तसेच देवस्थानची वाहने, आधुनिक उपकरणे, संगणक इत्यादींचा समावेश असतो. संध्याकाळी त्र्यंबकेश्वरच्या सुवर्ण मुखवट्याचे त्र्यंबकेश्वर नगरी मधून पालखी द्वारे सिमोलंगनासाठी या नगरीच्या सीमेवर नेऊन त्या ठिकाणी शमी या वृक्षाचे पूजन केले जाते. त्यानंतर पालखी पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आणली जाते. यावेळी या सुवर्ण मुखवट्याचे सुवासिनींकडून औक्षण केले जाते. अशा प्रकारे दसरा हा उत्सव साजरा केला जातो.

९. नागपंचमी

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभा मंडपात असलेल्या मोठ्या कासवावर नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नागाचे पूजन केले जाते.

१०. दिवाळी

या दिवशी या ज्योतिर्लिंगाला अभ्यंगस्नान घालून त्याची महापूजा केली जाते. त्र्यंबकेश्वराच्या सुवर्ण मुखवट्याचे तसेच रत्नजडित मुकुटाचे एकत्रित पूजन करून लक्ष्मीपूजन हा दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी ज्योतिर्लिंगाचे महापूजन केले जाते.

११. गुढीपाडवा

या दिवशी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महापूजन केले जाते. तसेच पंचांगाचे पूजन करून पंचांग वाचन केले जाते. गर्भगृहातील मुख्यपिंडीवर प्रदोष पुष्प पूजेवेळी श्री पंचमुखी परमेश्वराचे पूजन केले जाते. याचवेळी आरसे महाल उघडून श्री त्र्यंबक राजाच्या चांदीच्या मुखवट्याची आरसे महालामध्ये स्थापना केली जाते. संध्याकाळी गर्भगृहामध्ये असलेला त्र्यंबक राजाच्या सुवर्ण मुखवट्याचे सुवासिनींकडून औक्षण केले जाते.

प्रश्न

त्र्यंबकेश्वर मंदिर कुठे आहे?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामध्ये हे त्र्यंबकेश्वरचे मंदिर आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी किती वेळ लागतो?

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी साधारणपणे ४५ मिनिटे लागतात जर भरपूर गर्दी असेल तर वेळेचा अंदाज बांधता येत नाही.

त्र्यंबकेश्वर मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?

त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील दहाव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून तिर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर जवळ कोणती नदी आहे?

त्र्यंबकेश्वर जवळून गोदावरी नदी वाहते.

त्र्यंबकेश्वर हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?

त्र्यंबकेश्वर हे भारतातील दहावे ज्योतिर्लिंग आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर भारतात कुठे आहे?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर कोणी बांधले?

त्र्यंबकेश्वर मंदिर नानासाहेब पेशवे यांनी बांधले.

निष्कर्ष

मित्रांनो,
त्र्यंबकेश्वर मंदिरा बाबतचा इतिहास आणि याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा लेख TRIMBAKESHWAR JYOTIRLINGA TEMPLE INFORMATION IN MARATHI तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील तर त्याही आम्हाला कळवा, आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती द्वारे.

नवीन विषय, नवीन लेख, नमस्कार.

Leave a comment