KUDAL INFORMATION IN MARATHI : कुडाळ सिंधुदुर्ग माहिती मराठी – आमच्या मराठी झटका या वेबपेजवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रहो आम्ही आमच्या वेबपेज द्वारे तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती दर्जेदार पुरवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आजही आम्ही आमच्या लेखाद्वारे तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ या तालुक्याबद्दल माहिती देणार आहोत .
KUDAL INFORMATION IN MARATHI : कुडाळ सिंधुदुर्ग माहिती मराठी
प्रस्तावना
कुडाळ – महाराष्ट्रातील कोकण या प्रांतात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच कुडाळ शहर हे कुडाळ तालुक्याचे मुख्यालय असून हा तालुका लोकसंख्येच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शहर कोकणाच्या तळकोकण भागात मालवणच्या सुमारे ३० किलोमीटर पूर्वेस वेंगुर्ल्याच्या सुमारे ३० किलोमीटर उत्तरेस व मुंबईच्या ४७५ किलोमीटर दक्षिणेस वसलेले आहे.
कुडाळचा इतिहास
पूर्वीच्या काळी कुडाळ येथून कुडाळदेश ( रत्नागिरी ते गोवा ) या प्रांताचा कारभार चालायचा. या परागण्यावर कुडाळदेशस्थ प्रभू हे देशमूख होते. या सत्ताधीशांनी अनेक संघर्ष बघितले. सुरूवातीच्या काळात या प्रांतावर हिंदू राजांचा प्रभाव होता. पुढे विजापूरच्या आदीलशहाने येथे वर्चस्व मिळवले. त्यांनीही या परागण्यावर देसाई किंवा देशमुख यांची नियुक्ती केली. कुडाळदेशस्थ प्रभू हे इथले देशमूख होते.
कुडाळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रांताचे लखन सावंत हे देसाई होते. या प्रांतावर २३ मे १६६३ रोजी अचानक हल्ला केला गेला असे सांगितले जाते, आणि ०४ नोव्हेंबर १६६३ रोजी वेंगुर्ल्याहून आलेल्या डच पत्रात महाराजांनी ४००० घोडेस्वार व दहा हजार पायदळासह पोर्तुगीजांवर हल्ला केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर परत जाण्यापूर्वी त्यांनी रावजी पंडित यांची सुभेदार म्हणून नेमणूक केली.
कुडाळ हे नैऋत्य महाराष्ट्रामधील कर्ली नदीवर वसलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी, कणकवली, मालवण या मोठ्या तालुक्यांनंतर कुडाळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “चौथा” क्रमांक लागतो.
कुडाळचा नकाशा
भौगोलिक रचना
कुडाळची लोकसंख्या
तालुक्याची लोकसंख्या ही जवळपास एक लाख ९९१९९ एवढी आहे. साक्षर लोक ६४३४७आहेत त्यापैकी एक लाख २२४८४ पुरुष, आणि ५८१३७ महिला आहेत. एकूण कामगार ६५४९७ बहुकौशल्यावर अवलंबून आहेत. त्यापैकी ४३३७४ पुरुष, आणि २२१० महिला आहेत. कुडाळ या तालुक्यामध्ये १२४ गावे वसलेली आहेत.
हे पण वाचा 👉 देवगड संपूर्ण माहिती मराठी
कुडाळची बोलीभाषा
शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात व त्यांची वेगवेगळ्या प्रकारची बोली आहे, पण येथील मूळ प्रसिद्ध बोलीभाषा ही मालवणी आहे. मालवणी ही कोकणची बोलीभाषा आहे. मालवणीला वेगळी लिपी नाही. मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी व कुडाळदेशकर भाषा आहे.
धर्म, जाती-जमाती
शहरामध्ये हिंदू , मुस्लिम ख्रिश्चन या धर्मांची मिश्र संस्कृती आहे. कुडाळ गावामध्ये हिंदू धर्मातील वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे लोक राहतात. जसे की मराठा, भंडारी, कुंभार, चांभार, बौद्ध, माळी, शिंपी, लोहार इत्यादी.
प्रमुख अन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वसलेल्या या तालुक्याला, निसर्गाचे वरदान असलेले अप्रतिम समुद्रकिनारे लाभलेले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी सहज उपलब्ध होते . त्यामुळे जेवणाच्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीचा समावेश असतो. जसं की सुरमई, पापलेट ,कोलंबी, बांगडा, सौंदाळे, खेकडे, शिंपले इत्यादी.
त्याचसोबत इथे प्रामुख्याने नारळ सुपारी यांसारखी बारमाही बागायती पिके घेतली जातात. कुडाळ तालुका डोंगराळ भागात मोडत असल्याने डोंगर उतारावर हापुस आंबा आणि काजू यांचे उत्पन्न घेतले जाते.
येथील जेवणात प्रामुख्याने भात, मच्छी, सोलकढी, आमटी, पिठी, घावन, आंबोळी, उसळ, कोंबडी वडे, उकड्या तांदळाची पेज, मोदक यांचा समावेश होतो.
शिक्षण व्यवस्था
तालुक्यात एकूण १२४ गावे असून त्यापैकी प्रत्येक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळांची सोय आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेली महत्वाची शैक्षणिक केंद्रे खालील प्रमाणे
- ०१. न्यू इंग्लिश स्कूल,
- ०२. बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल
- ०३. कुडाळ हायस्कूल,
- ०४ . संत राऊळ महाराज कॉलेज,
- ०५. बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग स्कूल,
- ०६. SSPM मेडिकल कॉलेज ,पडवे
- ०७. छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर , ओरोस
- ०८. कोकण कृषि महाविद्यालय, मुळदे
- ०९. श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ डी एड
- १०. व्हेक्टर डॉन्टस लॉ कॉलेज,
- ११. बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ बी एड,
- १२. प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालय,
वाहतूक
बस सुविधा
शहरामध्ये मध्यवर्ती भागावर बस स्थानक आहे. इथे दोन बस स्थानक उपलब्ध आहेत. “नवीन बस स्थानक” व “जुने बस स्थानक” ही बस स्थानके वेगवेगळ्या गावांना जोडली गेल्यामुळे कुडाळमधून प्रवास करणे अतिशय सुलभ व सोयीचे झाले आहे. बस स्थानकावरून वेगवेगळ्या गावात जाणाऱ्या बसेस रवाना होतात. जसे की वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, पणजी, कोल्हापूर, पुणे, मुंबई. त्यामुळे नागरिकांना दूरच्या पल्ल्याचा प्रवास अतिशय सोयीने व सुलभपणे करता येतो.
रेल्वे सुविधा
रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई मेट्रोसह उत्तरेकडील मुंबई, मध्य भारत रेल्वे, आणि दक्षिणेकडील मंगळूर यांना जोडण्याचे काम हे रेल्वे स्थानक करते. हे रेल्वे स्थानक हे राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा थांबा असल्यामुळे कुडाळ मध्ये बऱ्याच रेल्वे थांबतात.
राष्ट्रीय महामार्ग
मुंबई – गोवा हा राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो.
विमानतळ
शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या परुळे – चिपी गावात राष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळ आहे. सद्य परिस्थितीत इथे दररोज ०२ विमाने सुटतात
कुडाळ तालुका हवामान व पर्जन्य
हे शहर कोकण किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे इकडचे हवामान हे दमट असते. कुडाळ मधील हवामान हे मध्यम असते. उन्हाळ्याच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मे च्या दरम्याने तापमान हे ३५ अंश सेल्सिअस पर्यंत असते. तर हिवाळ्याच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोंबर ते जानेवारीच्या दरम्याने २० अंश सेल्सिअस एवढे घसरते. पावसाळ्याच्या महिन्यामध्ये शहरामधील वातावरण हे आल्हाददायक असते. पावसामुळे कोकणचे नैसर्गिक रूप हे अजून खुलून येते.
कोकण किनारपट्टीच्या जवळच वसलेले शहर असल्यामुळे शहरामध्ये पावसाळ्याच्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात पर्जन्याचे प्रमाण असते.
कारखाने व उत्पादने
या शहराला ‘इंडस्ट्रियल एरिया’ असे देखील ओळखले जाते. या शहरामध्ये एमआयडीसी आहे. व यामध्ये विविध प्रकारचे कारखाने उपलब्ध आहेत. ज्यामधून विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होते. ज्यामध्ये लोणचे, जाम, फळांचे सरबत, भांडी, गावठी तूप व इतर सेंद्रिय उत्पादने तयार केली जातात.
त्याचप्रमाणे भात, काजू फॅक्टरी, वेगवेगळी यंत्रे, प्लॅस्टिक वस्तु, दोरखंड, आणि इतर सामग्री तयार करण्याचे कारखाने आहेत.
पाणीपुरवठा
इथून वाहणाऱ्या कर्ली नदी आणि बेल नदी यांच्या द्वारे पाणीपुरवठा केला आहे.
कृषी आणि पीक पद्धती
तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ, भुईमूग, नाचणी या पिकांची लागवड केली जाते. इथे प्रामुख्याने नारळ, सुपारी यांसारखी बारमाही बागायती पिके घेतली जातात. हातालुका डोंगराळ भागात मोडत असल्याने डोंगर उतारावर हापुस आंबा ,फणस आणि काजू यांचे उत्पन्न घेतले जाते. येथील कृषि महाविद्यालयाच्या सहयोगाने प्रगतिशील शेतकरी सध्या मसाल्याची पिके पण घेत आहेत
हे पण वाचा 👉 कणकवली संपूर्ण माहिती मराठी
कुडाळ पर्यटन स्थळे (PLACES TO VISIT IN KUDAL IN MARATHI)
०१. कुडाळेश्वर मंदिर (kudaleshwar temple kudal)
कुडाळेश्वर मंदिर हे लक्ष्मी वाडी मध्ये वसलेले आहे. हे मंदिर भक्तगणांसाठी २४ तास उघडे असते. कुडाळेश्वर मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागात सुंदर नक्षीकाम केलेले दिपमाळ आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डाव्या व उजव्या बाजूला छोटी मंदिरे आहेत.
मंदिराच्या सभामंडपाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. उजव्या बाजूला तारांग दिसतात. महालक्ष्मीचे सात तरंग, बाराचा पूर्व, कुडाळेश्वर, पवनई, भैरव आणि जोगेश्वरी या महत्त्वाच्या मानल्या जातात. श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या अगदी आतल्या भागात आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात समादेवी, पावणाई, गरुड तत्ववे, चाल्याचा अधिकारी, पवार वास, पूर्वेचा ब्राह्मण, मायेचा पूर्वेही आहेत. श्री देव सोमेश्वर पिंडी स्वरूपात आहेत.श्रीची काळ्या पाषाणातील मूर्ती चार फूट उंच आहे.
०२. पद्मश्री परशुराम गंगावणे ठाकर आदिवासी कला आंगण (thakar kala angan kudal)
पद्मश्री परशुराम गंगावणे हे पिंगुळी-गुढीपूर येथील आहेत. ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या कलाप्रकाराचे जतन करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. कलाप्रसाराच्या ध्यासातून त्यांनी देशभरात कळसुत्री बाहुल्याचे खेळ केले. तर कळसुत्री कलाप्रकाराचे जतन व्हावे, यासाठी आपल्या गावी पिंगुळी -गुढीपूर येथे त्यांनी कला आंगणची निर्मिती केली. त्या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. श्री गंगावणे हे गेली ४५ वर्षे हे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहेत. कठिण परिस्थीतीमध्ये त्यांनी ही लोककला जातन केली.
ठाकर आदिवासी कला आंगण Museum & Art Gallery हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे जे ३ मे २००६ रोजी सुरु झाले. हे म्युझियम त्यांनी गुरांच्या गोठ्यामध्ये सुरु केले. शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहिशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम त्यांनी केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल, डोना वाद्य, गोंधळ, पोतराज अशा लोककलांची मांडणी केली आहे. लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ व चेतन करीत आहेत. या लोककला जतन व संवर्धन करत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे.
गंगावणे कुटुंब ठाकर या आदिवासी समाजातले. ठाणे, रायगड जिल्ह्यात सह्याद्रीला धरून जो ठाकर समाज आहे त्यातलेच हे कुटुंब. यांचे पूर्वज पोटापाण्याकरिता दक्षिणेला सरकत सरकत गेले आणि नंतर कुडाळ इथे स्थायिक झाले.
गंगावणे यांनी आता पिंगुळीला सुसज्ज संग्रहालय उभारले आहे. त्याच ठिकाणी ते २-३ दिवसांची कार्यशाळासुद्धा आयोजित करतात. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळासुद्धा पिंगुळीला आयोजित केल्या जातात. पुणे आणि मुंबईलासुद्धा खास खेळ आणि कार्यशाळा घेतल्या जातात. खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हिरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आदींचे सुंदर प्रदर्शन पिंगुळीला ठाकर आदिवासी कला केंद्रात मांडलेले आहे. कलेचे एक विस्मयकारक दालनच आपल्यासमोर खुले होते. काही ठरावीक शुल्क देऊन हे प्रदर्शन पाहता येते. त्याचबरोबर इथेच कळसूत्री बाहुल्यांचे खेळसुद्धा दाखवले जातात.
खरं तर चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या यांचे कार्यक्रम वाढदिवस, विविध समारंभ अशा वेळी मुद्दाम या लोकांना बोलावून सादर केले गेले पाहिजेत. म्हणजे ही कला जिवंत ठेवणे आणि या कलाकार लोकांना आर्थिक मोबदला देऊन प्रोत्साहित करणे हे दोन्हीही साध्य होईल. हल्ली छोटय़ा छोटय़ा समारंभातूनसुद्धा विविध खेळ खेळले जातात. तिथे ही कला जर सादर केली तर आपला सांस्कृतिक वारसा लोकांसमोर आणण्यास हातभार लागेल. महाराष्ट्र शासनाने गंगावणे यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे. विविध सांस्कृतिक समित्यांवर कला सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. हे अत्यंत जिव्हाळ्याने जोपासलेले प्रदर्शन आणि टिकवून धरलेली ही चित्रकथीची कला मुद्दाम खास वेळ काढून भेट देण्याजोगी आहे.
शहरापासून अगदी तीन कि.मी. वर मुख्य हमरस्त्याच्या बाजूलाच असलेले हे प्रदर्शन प्रत्येकाने पाहावे असेच आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग किंवा गोव्याला जाताना अगदी आवर्जून पिंगुळीला थांबावे आणि कलेचा एक मोठा खजिना मनसोक्त पाहून घ्यावा.
०३. ठाकरवाडी संग्रहालय (thakarwadi museum kudal)
सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भुषण असलेली ठाकर समाजाची समृद्ध लोककला जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत सखाराम मसगे आणि त्यांचा उच्चविद्याविभूषित मुलगा कृष्णा आणि सगळे कुटुंबिय यांनी एक सुंदर ठाकर लोककला म्युझियम बनवलंय..
इथे ठाकर समाजाच्या कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, कळबहुली, पिंगळी, डोना गीत, गोंधळ आणि फुगडी या सर कलांची आणि त्यासाठी तयार केलेल्या कलाकृतींची सर्व माहिती मिळाली. कृष्णा या कलाकाराने या कलांची जोपासना केली आहे. कठपुतळी हा कला-मनोरंजनाच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक आहे जो अजूनही अस्तित्वात आहे आणि त्याहूनही अधिक वयोगटातील लोकांना आवडतो. जागतिक कठपुतळी दिवस साजरा करण्यामागे लहान मुले आणि तरुणांना कॉमिक-कला-मनोरंजन प्रकाराकडे रस वाढवणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.
पिंगुळी येथील ठाकरवाडी म्युझियम व मसगे परिवार त्यांचे कुटुंब कळसूत्री बाहुल्या ही कला त्यांची अनेक पिढ्यांपासून जोपासना करत आहे .
खरंतर पिंगुळी येथे असणारा बाहुल्या या कलेमध्ये चार प्रकारच्या बाहुल्या येतात कळसूत्री, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, व कळबाहुली या बाहुल्या करणारया सर्व कलाकारांना बावलेकर या नावाने संबोधले जाते. ठाकर आदिवासी कलाकार या सर्व कलांना आपल्यासोबत जोपासत आहे.
०४. साई मंदिर काविलकाटे (sai mandir kavilkate)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस अर्ध्या मैलांच्या अंतरावर गाव कविलकाटे आहे. या गावातील साई नगरात श्री साई बाबा यांचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरातील साईबाबांचे सुंदर पुतळे पाहताना डोळ्यांना अफाट आनंद होतो आणि येथील शांत वातावरण भाविकांना शांतता प्रदान करते. या मंदिराची निर्मिती हा श्री साईंच्या वास्तव्याचा पुरेसा पुरावा आहे.
कविलकाटे येथील रहिवासी स्व. रामचंद्र मडये हे दत्त भक्त होते. श्री रामचंद्र रावजी मडये यांनी हे मंदिर बांधले होते, बाबांनी त्यांना एक रुपया दिला आणि त्या एका रुपयाने १९१९ मध्ये कुडाळ येथे सर्वत्र पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आणि १९२२ मध्ये त्यांनी कुडाळ येथे बाबांचे मंदिर बांधले.
मंदिराचा इतिहास:
भगवान दत्त साईच्या रूपाने शिर्डीत वास्तव्य करत आहेत, असा त्यांना द्रष्टांत झाला होता. आणि त्यामुळेच हा दत्तांचा दास जो नेहमीच श्री गुरुदेव दत्तांच्या नावाचा जप करण्यात मग्न होता तो शिर्डीकडे वळला. श्री साईंचे प्रथम दर्शन झाल्यावर ते भारावून गेले व त्यांनी शुद्ध जवळजवळ गमावली. या भक्ताला दत्त भेटल्याचा अनोखा आनंद झाला. तेव्हा साईबाबांनी त्यांना एक रुपया दिला. तो कमी किंमतीचा खजिना म्हणून त्यांनी तो तसाच जतन केला. त्यानंतर त्यांनी कुडाळमधील अनेक रहिवाशांना आपल्याबरोबर शिर्डी येथे नेले आणि त्यांना साई दर्शनाचा लाभ दिला.
१९१८ मध्ये साईबाबांनी १५ ऑक्टोबरला मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी महासमाधी घेतली. १९१९ मध्ये बाबांची पहिली पुण्यतिथी शिर्डी व्यतिरिक्त पहिल्यांदा कुडाळमध्ये सार्वजनिकपणे मडये बुवा यांच्या निदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी बाबांनी दिलेला एक रुपया वापरला. त्यानंतर, १९२२ मध्ये साईबाबांच्या चौथ्या पुण्यतिथीला, मडये बुवा यांनी प्रत्यक्ष साई मंदिर बांधले. त्यांनी श्री बाबूराव सारंग यांच्या मूर्तीची साई बाबांची सहा फूट मूर्ती स्थापित केली.
बाबांच्या महासमाधी नंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नश्वर शरीर शिर्डी येथील बुट्टी वाड्यात ठेवण्यात आले आणि त्यावर एक थडगे उभारण्यात आले. तिथे एक फोटो फ्रेम ठेवली होती. ३६ वर्षानंतर १९५४ मध्ये श्री. बालाजी वसंत तालीम यांच्या शिर्डीच्या समाधी मंदिरात साडेपाच फुटांचा पुतळा बसविण्यात आला. स्वर्गीय श्री नागेश आत्माराम सावंत हे पुतळ्याच्या स्थापनेशी सक्रियपणे संबंधित होते. दीर्घ काळ ते साई संस्थानचे व्यवस्थापकीय होते. त्यांनी लिहिलेल्या एका ‘श्री साईलीला’ लेखात त्यांनी माडये बुवा मंदिराविषयी सांगितले आहे.
१९८३ मध्ये दत्तदास माडये बुवा यांनी बांधलेल्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आणि साडेसात फुटाची मूर्ती श्री शाम सारंग म्हणजेच श्री बाबुराव सारंग यांचा मुलगा यांनी स्थापित केले. १९२२ ते १९४६ या कालावधीत मंदिराचे व्यवस्थापन दत्तदास माडये बुवा यांनी केले आणि १९४६ ते १ १९९९ दरम्यान त्यांचा मुलगा श्रीपाद मडये आणि त्यानंतर त्यांचा थोरला नातू श्री राजन मडये यांनी केले.
कसे पोहोचाल
कोकण रेल्वेच्या कुडाळ रेल्वे स्टेशनच्या जवळच हे मंदिर असल्याने तुम्ही चालत तेथे जाऊ शकता. शहरासाठी सगळीकडून बससेवा उपलब्ध आहेत. रेल्वेस्टेशनला बसस्टॅण्डवरून बसेस जातात. तसेच रिक्षाने तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता.
०५. संत राऊळ महाराज मठ पिंगुळी (sant rawool maharaj math pinguli )
संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी येथील भक्तवत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभाऱ्यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे.
१९०५ साली पिंगुळी या तालुक्यातील एका छोट्याश्या खेडेगावात श्री देव रवळनाथाचे मानकरी असलेल्या राऊळ घराण्यामध्ये परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराज जन्माला आले. श्री. आप्पाजी गोपाळराव राऊळ व सौ. सावित्री आप्पाजी राऊळ या सत्शील दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या बालकाचे पाळण्यातील नाव “कृष्ण” आणि कृष्णलीला दाखवत “आबा” म्हणून एक अवलिया संत परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराज म्हणून नावारूपाला आले. त्यांनी ज्या पिंगुळी क्षेत्राला तपोभूमी मानली, तेथेच त्यांचे समाधी मंदिर परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराजांनी उभारले.
०६. श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल (laxmi narayan mandir walawal )
शहरापासुन १५ किमी अंतरावर असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत.
हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचना त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे.
या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. मंदिर सभोवतालचा परिसर पण निसर्गरम्य आहे.
मंदिरा शेजारी एक तलाव आहे.त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. असे म्हणतात गावातल्या माणसाला त्या तलावापासून काही भीती नाही.पण बाहेरच्या माणसाना मात्र तो हमखास ओढून नेतो.असे काही प्रकार झाले आहेत.त्यामुळे बाहेरील व्यक्ती तलावात सहसा उतरत नाही.रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे.
श्री देव नारायण देवस्थान जागृत असल्याचा तेथील लोकांचा अनुभव आहे. देवळातील नारायण मूर्तीच्या गाभाऱ्यात पूर्वी कधी ‘सिंहनाद’ होत असल्याचे सांगतात. देवालयाच्या महाव्दारावरील कोरीव काम व आतील सभामंडपाचे सहा पाषाणी स्तंभ प्राचीन शिल्पकलेचा अत्युत्क्रुष्ट नमुना आहे.या खांबांची उंचीसुमारे साडेसहा फूट असून त्याचा मध्यवर्ती घेर ही जवळजवळ तेवढाच आहे. प्रत्येक खांबांच्या मध्यावर देवादिकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. देवालयाची रचना दरवाज्यावरील आणि खांबावरील नवाग्रहादी देवतांच्या मूर्ती व कोरीव काम अत्यंत सुबक व मनोहर असून त्यांचे बारकाईने संशोधन करण्यासारखे आहे.
वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते.
इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते.
त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स. १३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली.
विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी! आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. नजिकच श्रीदेव रवळनाथ व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले उंचावर वसलेले माऊली मंदिर! सारेच अविस्मरणीय!
०७. ड्रीमलँड गार्डन कुडाळ (dreamland garden pinguli kudal )
ड्रीमलँड गार्डन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यामधील पिंगुळी या गावामध्ये वसलेले आहे.हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे ज्याच्या मनमोहक दृश्यामुळे व हिरवळ शांततेमुळे ड्रीम लँड गार्डन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे.
ड्रीमलँड गार्डन हे पर्यटकांसाठी सकाळी ०७ वाजता उघडते व रात्री ०८ वाजता बंद होते. शनिवारचे हे गार्डन बंद असते.
ड्रीमलँड मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश फी ही सुमारे १०० रुपये आहे.
ड्रीमलँड मध्ये पार्क उपलब्ध असून तुम्ही तिथे फन ऍक्टिव्हिटीज करू शकता.
०८. कलेश्वर मंदिर नेरूर (kaleshwar mandir nerur)
शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावात श्री देव कलेश्वर प्राचीन मंदिरान पैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. शैव, वैष्णव भेद विरहीत असलेले हे देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कलेश्वर या शब्दाचा अर्थ कलेचा ईश्वर असा आहे.
या मंदिराच्या बाजूला श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर असून कलेश्वराच्या दर्शनानंतर ब्रह्मनाथाचे दर्शन घेणेही महत्त्वाचे आहे, अशी येथील परंपरा आहे. चोहोबाजुनी डोंगर रांगानी आणि शेजारी असलेला कलेश्वर तलाव यांमुळे या मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलते.
श्री देव कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असून कोरीव कलाकुसरीने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी आहे. शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती आणि डाव्या बाजूस नंदीच्या समोर म्हणजेच पिंडी अन् नंदी यांच्यामध्ये शुक्राचार्यांची मूर्ती आहे या मंदिराचे हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीव कामाने सजवले आहेत.
या मंदिराच्या शेजारी असलेले दुसरे मंदिर आहे, ते श्री ब्रम्हदेवाचे. ब्रम्हदेवाची मंदिरे फारशी नसतात. त्यामुळे हे मंदिर अतिशय वेगळे आणि आवर्जून पाहण्यासारखे आहे.
ब्रम्हदेवाच्या शेजारी विष्णू, लक्ष्मी, सावित्री आणि गायत्री या देवता आहेत. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन देवतांची मंदिरे असणारी हे प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते. ईतर परिवार देवता मंदिराच्या आसपास स्वतंत्र मंदिरानमध्ये स्थापन केलेल्या आहेत.
श्री देव कलेश्वर मंदिरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांपैकी महत्त्वाचा उत्सव म्हणजे महाशिवरात्र !
०९. सरसोली धाम (sarsoli dham nerur kudal)
सरसोली धाम सिंधुदुर्गातील कविलगाव या गावी आहे. रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर सरसोली धाम हा कोकणातील सिंधी समाजाचा एकमेव मठ आहे. कविलगावच्या प्रसिद्ध साई मंदिरापासून हा मठ काही मिनिटांच्या अंतरावर आहे. हा मठ ३० एकर जागेवर पसरलेला आहे. त्याच्या निर्मितीचे आणि व्यवस्थापनाचे श्रेय लंडनमध्ये राहणाऱ्या एका सिंधी कुटुंबाला जाते. साई लीला शाह यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा मठ बांधला आहे.
मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे साई लीलाशाह यांचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिरासमोर एक सभामंडप आहे. या हॉलमध्ये दररोज दुपारी १२.३० ते 0२.00 आणि सायंकाळी ०७.३० ते ०९.०० या वेळेत प्रसादाची व्यवस्था केली जाते. मठाचा परिसर सुंदर हिरवाईने वेढलेला आहे. या धाममध्ये साई लीला शाह, देव झुलेलाल, गुरू नानक यांच्यासह गणेश, श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, शिव पार्वती, श्री कृष्ण यांच्या मूर्ती असलेले सुंदर मंदिर आहे. या धाममध्ये गोशाळाही आहे. मंदिरासमोर एक सुंदर तलावही बांधण्यात आला आहे. या अतिशय निसर्गरम्य आणि शांततेच्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्या.
१०. मामाचो गाव हीर्लोक (mamacha gaon hirlok )
कृषी व ग्रामीण पर्यटनातील दालन म्हणजे मामाचे गाव. हे हिर्लोक या ठिकाणी वसलेले आहे. हे एक कृषी पर्यटन स्थळ आहे. अनंत सावंत यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही एक सुंदर वास्तु, मामाचं गाव हे एक निसर्गाचा मनमुरात आनंदाबरोबर आध्यात्मिक शांतीचे ठिकाण आहे. उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असलेले साईबाबांचे मंदिर देखील मामाच्या गावामध्ये पर्यटकांसाठी व भक्तगणांसाठी आहे. मामाचं गाव म्हणजे गावापासून लांब असणाऱ्या मुलांना, परिवारांना व पर्यटकांना दगदगीच्या आयुष्यातून एका सुखाचा शांतीच्या व निसर्गरम्य वातावरणाच्या सहवासात घेऊन जाणारा गाव.
निसर्गाने नटलेला आजूबाजूला नारळा फोफळीची झाड असलेला आंब्याची झाडं असलेला ह्या मामाच्या गावाची ठेवण हि विलोभनीय आहे. पर्यटकांना गावाकडे खेचून घेणारी व त्यामध्येच मन रमून ठेवणारी संकल्पना अॅग्रो टुरिझम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.
११. रामेश्वर मंदिर हुमरमळा (rameshwar mandir humarmala kudal )
हुमरमळा हे छोटेसे, परंतु निसर्गसंपन्नतेने परिपूर्ण बहरलेले गाव. श्री देव रामेश्वराच्या छत्रछायेखाली या गावाची विकासाकडे घोडदौड चालूच आहे. हे गाव डोंगराळ असून या ठिकाणी डोंगर उतारावरची शेती, भात, भुईमूग व भाजीपाला पिकवला जातो. या भागात माडबागायती मोठय़ा प्रमाणात आहेत. कुपीच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले निसर्गसंपन्नतेने बहरलेले हुमरमळा गाव.
हुमरमळा गाव जसे शेतीप्रधान आहे तसेच सिंधुदुर्गात येथील गगनगिरी मसालाही प्रसिद्ध आहे. या गगनगिरी मसाल्याचे उत्पादन हुमरमळा गावातच केले जाते. यापासून तेथील महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
१२. श्री देव रामेश्वर मंदिरातील रथ
या सर्व गोष्टींबरोबरच गावाला धार्मिक संस्कृतीही लाभलेली आहे. येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील रथ अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवरात्रीला या ठिकाणी शिवरथोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या वेळी मुंबई, गोवा आणि सिंधुदुर्गातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. गावाला लागूनच असलेला कुपीचा डोंगर पर्यटन स्थळ आहे. येथे पर्यटकांची ये-जा असते.
याच गावातील पडोसवाडी येथे मोठा धबधबा आहे. या धबधब्यावर रॅपलिंगची व्यवस्था एका खासगी कंपनीने केली आहे. या ठिकाणी दत्तकानोबा मठ आहे. त्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.
१३. श्री दत्त मंदिर माणगाव (shri datta mandir mangaon)
माणगाव हे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली आहे. तेथे राहण्याची सोय उपलब्ध आहे.आकेरी – माणगाव दत्त मंदिर येथील डोंगरावर असणारी “सिद्धाची गुहा’ म्हणजे निसर्गाचा कलात्मक आविष्कारच म्हटला पाहिजे. गजबजाटापासून दूर असलेली
ध्यानधारणेसाठीची ही जागा पाहण्यासाठी पर्यटक खूप दूरवरून येथे येतात. ही सिद्धाची गुहा अतिशय प्रेक्षणीय आहे. दत्त मंदिराच्या नैर्ऋत्य दिशेस डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. ती हजारो वर्षे जुनी आहे. सुमारे पंधरा फूट लांब अशी ही गुहा असून गुहेत फिरण्यास पुरेशी जागा आहे.
कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पूण्यभूमी आहे.
या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षीणीचे मंदीर आहे. यक्षीणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षीणी मंदीर अत्यंत जागृत स्थान आहे.
१५. आजोळ वैद्यकीय पर्यटन नेरूर ( aajol medical center nerur kudal )
आजोळ म्हणजे आजी आजोबांचे घर. आजोळ नेरूर, ता. कुडाळ इथे २५ मे २०११ ला चालू झाले आणि तेथील उत्तम काळजीमुळे वृद्धांचे आयुष्य वाढू लागले. आयुष्य वाढल्याने त्यांना वृद्धपणातील अनेक आजार होऊ लागले . मग या शारीरिक व मानसिक आजाराची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेचा जन्म झाला व रेडकर रिसर्च संस्थेने दिलासाची स्थापना रेडी इथे केली.
इथे तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला दिसेल की विसावा व दिलासा या रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या शाखा वार्धक्याने थकलेल्या वृद्धांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सक्षम स्टाफ आहे, उत्तम स्वच्छता आहे, मनोरंजन, योगसाधना यांची सोय आहे. शारीरिक परिस्थितीमुळे विकल झालेले वृद्ध खाटेवरून खाली पडू नयेत म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला लावतो तशा पट्ट्या त्यांच्या खाटेला लावल्या आहेत, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दिसतील.
१६. श्री. केळबाई देवी मंदिर कुडाळ (shri kelbai devi mandir kudal)
नेरूर कलेश्वर नगरीतील देवी गावाच्या सीमेवर येऊन राहिली. गावाची कुडाळेश्वर (रवळनाथ) ची आदीशक्ती केळबाई, आदीमाया महालक्ष्मी. जोगियांची देवी जोगेश्वरी – काळभैरव व वेताळ हे रवळनाथचे सेनापती. केळबाई देवीचे डावी बाजू कुडाळ भाग व उजवे अंग नेरूर. हिला काळबाई, कालिका म्हणतात व कलेश्वर देवाला काळोबा म्हणतात.
हे एकमेव ठिकाण आहे जिथे देवस्थानात काळभैरव व वेताळ आहेत. हे दोन्ही महारुद्र आहेत.
प्रसिद्ध रेस्टॉरंट
- मालवणी
- भावोजींची खानावळ
- लक्ष्मी
- सदिच्छा
- सावली
- सत्कार
- सन्मान
- वायफाय
- कॉन्टिनेन्टल
- ला माफिया
- कोकोनट
- हीलरुफ
प्रसिद्ध हॉटेल्स
- 1. लेमनग्रास हॉटेल – अधिक माहिती साठी संपर्क करा- 08551085111
- 2. लाईम लाइट हॉटेल – अधिक माहिती साठी संपर्क करा – 07719992299
- 3. स्पाईस कोकण हॉटेल – अधिक माहिती साठी संपर्क करा – 07262823366
- 4. कोकोनट हॉटेल – अधिक माहिती साठी संपर्क करा – 02362221440
- 5. सोना व्हिला लेक रिसॉर्ट – अधिक माहिती साठी संपर्क करा – 09821418489
वैद्यकीय सुविधा
- जिल्हा रुग्णालय , ओरोस. सिंधुदुर्ग
- ग्रामीण रुग्णालय
- स्त्रीरोग तज्ञ : डॉ. निगुडकर, डॉ. कुलकर्णी, डॉ. परुळेकर, डॉ. पाटील ,
- बालरोग तज्ञ : डॉ. रावराणे, डॉ. चुबे
- अस्थीरोग तज्ञ : डॉ. परुळेकर डॉ. नावांगूळ
- शस्त्रक्रिया तज्ञ : डॉ. सामंत हॉस्पिटल
- कान नाक घास तज्ञ : डॉ. पाटील
- त्वचा रोग तज्ञ : डॉ. आंबेरकर, डॉ. म्हाडगुत
- आयुर्वेद : डॉ. करंबळेकर, डॉ. दामले
- दांतचिकित्सा : डॉ. सुतार , डॉ. सवदत्ती, डॉ. बाणावलीकर
- डोळ्यांचे तज्ञ: डॉ. सामंत, डॉ. गद्रे
- होमिओपॅथी: डॉ. सामंत
- रेडियोलॉजी सेंटर
कुडाळच्या जवळील समुद्रकिनारे (BEACHES NEAR KUDAL)
०१. भोगवे समुद्रकिनारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वसलेल्या वेंगुर्ले या तालुक्यामधील भोगवे या गावामध्ये असलेला सुंदर व निळाभोर समुद्रकिनारा. हा समुद्रकिनारा साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही कुडाळ वरून वैयक्तिक गाडीने किंवा सरकारी बसने सुद्धा जाऊ शकता. सरकारी बसची तिकीट साधारणतः ४५ रुपये आहे व तुम्ही कुडाळवरून भोगव्याला सुलभरीत्या पोहोचू शकता.
०२. देवबाग समुद्रकिनारा
मालवण या तालुक्यामधील देवबाग या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी साधारणतः ३० ते ३५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. व तुम्ही या समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेऊ शकता.
०३. तारकर्ली समुद्रकिनारा
तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरती जाण्यासाठी तुम्ही बसने किंवा तुमच्या वैयक्तिक गाडीने जाऊ शकता यासाठी साधारणतः तुम्हाला ४० किलोमीटर अंतर पार करावे लागते.
०४. किल्ले निवती समुद्रकिनारा
वेंगुर्ले या तालुक्यामधील किल्ले निवती या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी साधारणतः ३० किलोमीटर अंतर पार करावे लागते.
०५. मालवण समुद्रकिनारा
जवळची इतर प्रेक्षणीय स्थळे (PLACES TO VISIT NEAR KUDAL)
- मालवण शहर
- सिंधुदुर्ग किल्ला
- वेंगुर्ले बंदर
- सावंतवाडी
- आंबोली घाट
- धामापुर तलाव
लोककला
कुडाळ या शहरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लोककला म्हणजे
- दशावतार नाटक.
- कठपुतली नृत्य
- गजा नृत्य
- फुगडी नृत्य
- खेळे किंवा राधा नृत्य
- डबलबारी भजन
प्रसिद्ध सण व उत्सव
कुडाळ या शहरामध्ये “गणेश उत्सव” हा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. त्याचप्रमाणे कुडाळेश्वरची जत्रा असो किंवा आंगणेवाडीची जत्रा अशा मोठ्या जत्रा तसेच गावातल्या जत्रा मोठ्या उल्हासाने साजऱ्या केल्या जातात.
आमचे हे लेख सुद्धा वाचा :
पसायदान : संपूर्ण मराठी भावार्थ
FAQ
कुडाळ कशासाठी प्रसिद्ध आहे?
कुडाळ रेल्वे स्टेशन हे कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्वाचे स्टेशन आहे. इथे डेक्कन ओडिसी रेल्वे सुद्धा थांबते.
कुडाळ ते गोवा हे अंतर किती आहे ?
कुडाळ ते गोवा हे अंतर १२५ किलोमीटर आहे.
कुडाळ मधील स्थानिक आकर्षणे कोणती ?
कुडाळेश्वर मंदिर (kudaleshwar temple kudal)
ठाकर आदिवासी कला आंगण (thakar kala angan kudal)
ठाकरवाडी संग्रहालय (thakarwadi museum kudal)
साई मंदिर काविलकाटे (sai mandir, kavilkate)
संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी कुडाळ (rawool maharaj math kudal)
श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल (laxmi narayan mandir kudal)
ड्रीमलँड गार्डन ( dreamland garden kudal)
नेरूर कलेश्वरमंदिर(kaleshwar mandir nerur)
सरसोली धाम (sarsoli dham, nerur)
मामाचो गांव हीर्लोक (mamacho gaon hirlok)
श्री. केळबाई देवी मंदिर कुडाळ (shri kelbai devi mandir kudal)
आजोळ वैद्यकीय पर्यटन नेरूर (aajol, medical center, nerur)
कुडाळ मधील प्रसिद्ध थाळी कोणती ?
कुडाळमध्ये जेवणाच्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीचा समावेश असतो. जसं की सुरमई, पापलेट ,कोलंबी, बांगडा, सौंदाळे, खेकडे, शिंपले इत्यादी.
कुडाळमधील प्रसिद्ध सण कोणता ?
कुडाळ या शहरामध्ये “गणेश उत्सव” हा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो.
कुडाळजवळील समुद्रकिनारे कोणते ?
भोगवे समुद्रकिनारा, देवबाग समुद्रकिनारा, तारकर्ली समुद्रकिनारा आणि मालवण समुद्रकिनारा
कुडाळ मध्ये वसलेली गावे किती ?
कुडाळ तालुक्यामध्ये एकूण १२४ गावे आहेत .
निष्कर्ष
या लेखाद्वारे आम्ही कुडाळ विषयी माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे . ही माहिती आम्ही इंटरनेट ,पुस्तके याच्या मदतीने संकलित करून लिहिलेली आहे , ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. आपल्या काही सुचना किंवा लेखात सुधारणा आवश्यक असल्यास कमेंट करून नक्की कळवा
धन्यवाद .
एकदातरी भेट देण्याची तिव्र इच्छा आहे, फक्त राहण्याची माफक दरात अथवा मोफत व्यवस्था झाल्यास गणेशोत्सवात येईल म्हणतो. – बाळ वैद्य, अमरावती ९४२०५२०८६१