देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती मराठी : Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Language – मराठी झटका डॉट कॉम या वेबपेजवर आपले मनापासून स्वागत. या वेबपेज द्वारे आम्ही नवनवीन विषय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आजही आम्ही असाच एक दर्जेदार आणि उत्कृष्ट असा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे दौलताबाद देवगिरी किल्ला. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सातवे आश्चर्य म्हणून ओळखला जाणारा हा दौलताबाद किल्ला. हा किल्ला औरंगाबाद मध्ये असल्याने सर्रास औरंगाबाद किल्ला म्हणूनही ओळखला जातो.
देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती मराठी : Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Language
संभाजीनगरच्या मुख्य शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा दौलताबाद किल्ला एक प्राचीन तटबंदी असलेला किल्ला आहे. या किल्ल्यावरून तुम्ही संपूर्ण शहराचे विलोभनीय दृश्य पाहू शकता. मित्रांनो चला तर मग, वेळ न दवडता आपण पाहूया दौलताबाद किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ल्याविषयीची माहिती.
दौलताबाद किल्ला सारांश तक्ता
किल्ल्याचे नाव: | दौलताबाद किल्ला |
किल्ल्याचे जूने नाव: | देवगिरी किल्ला |
ठिकाण: | औरंगाबाद (संभाजीनगर), महाराष्ट्र |
किल्ल्याचा प्रकार: | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी: | मध्यम |
किल्ल्याची स्थापना: | इ.स. ७५६ ते ७७२ |
किल्ल्याचे संस्थापक: | राजा श्रीवल्लभ |
किल्ल्याचे क्षेत्रफळ: | ९४ एकर |
किल्ल्याची उंची: | २९७५ फुट |
शासक वंश: | यादव, खिलजी आणि तुघलक |
मुख्य ठिकाणे: | चांद मिनार, बारादरी, चीनी महल, भद्रा मूर्ती मंदिर आणि मेंढा तोफ |
दौलताबाद किल्ला प्रस्तावना
“दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका”
असे दुर्गाचे सभासदाने वर्णन केले आहे. उंचीने थोडका असला तरी देवगिरी दुर्ग अजोड आहे. येथील प्रचंड तटबंदी, भुयारी मार्ग, खंड असलेले कडे सर्व काही विलक्षण आहे. देवगिरी म्हणजे देवांचा डोंगर. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून दौलताबाद देवगिरी किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना ७५० पायऱ्या चढून जावे लागते.
दौलताबाद किल्ला नकाशा
देवगिरी किल्ला नाव कसे पडले ?
या किल्ल्याचे पहिले नाव देवगिरी असे होते. इसवी सन १३२७ मध्ये महमद बिन तूघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीवर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नामांतर “दौलताबाद किल्ला” असे केले.
औरंगाबाद दौलताबाद किल्ला इतिहास – History of Daulatabad Fort in Marathi
या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी आहे. काही इतिहासकारांच्या मते, वेरूळ येथील विश्वविख्यात कैलास लेणीचे निर्माते राष्ट्रकूट राजे या किल्ल्याचे ही निर्माते होते. यादवांच्या काळापासून या किल्ल्याची इतिहासात नोंद सापडते. सन ११८७ पासून १३१८ पर्यंत यादवांचे येथे राज्य होते. सन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ल्यावर स्वारी केली.
दिल्लीत स्थापन झालेल्या मुसलमानी सत्तेची दक्षिणेकडील ही पहिलीच मोहीम होती. यात रामदेवरायचा पराभव झाला. तहानुसार हे राज्य रामदेवराय कडेच राहिले. त्यानंतर १३१८ पासून देवगिरीवर दिल्लीच्या सुलतानांचे राज्य सुरू झाले. सन १३२७ मध्ये मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानीच दिल्लीहून देवगिरीवर स्थलांतरित केली व देवगिरीचे नामांतर दौलताबाद झाले.
हे पण वाचा👉 आठवण शिवजन्माची – किल्ले शिवनेरी
थोड्या काळासाठी दौलताबादेस भारताची राजधानी होण्याचा मान मिळाला .सन १३४७ साली सत्ताधारी मुस्लिम सरदार सत्ता संघर्ष आरंभ होऊन हसन गंगू बहामनी याने येथे बहामनी राज्याची स्थापना केली. सुमारे दीडशे वर्ष येथे बहामनी राज्य होते. १४९९ साली बहामनी सत्तेचे पाच शाह्यांमध्ये विभाजन झाले. त्यातील अहमदनगरच्या निजामशाहीचे दौलताबादेस राज्य सुरू झाले. हे राज्य १३५ वर्षे टिकले.
निजामशाहीनंतर हा किल्ला १६३३ साली दिल्लीचा मोगल बादशहा शहाजहानच्या ताब्यात आला. त्यानंतर १७२४ मध्ये हा किल्ला आसबजाही वंशाचे संस्थापक हैदराबादचे निजाम यांच्या ताब्यात आला.
उदगीरच्या लढाईत सदाशिव भाऊ यांनी निजामाचा पराभव करून तहाद्वारे या किल्ल्यावर ताबा मिळवला. १७६० ते १७६२ ही दोन वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर १७६२ पासून १९४८ पर्यंत हा किल्ला हैदराबाद संस्थांच्या अधिपत्त्याखाली होता.१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचा पराभव होऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
किल्ल्याचा इतिहास
राष्ट्रकुट : या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी, काही इतिहासकारांच्या मते वेरूळ येथील विश्वविख्यात कैलास लेणीचे निर्माते राष्ट्रकुट राजे या किल्ल्याचेही निर्माते होते.
यादव : यादवांच्या काळापासून या किल्ल्याची इतिहासात नोंद सापडते. इ.स. ११८७ पासून १३१८ पर्यंत यादवांचे येथे राज्य होते. नाशिकजवळील सेऊण देशचा राजा पाचवा भिल्लम याने १९८७ साली हा दुर्ग निर्माण करून येथे यादव कुळाच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. या वंशात भिल्लम, जैत्रपाळ, सिंघणदेव, कृष्णदेवराय, महादेवराय, रामदेवराय, शंकरदेव व हरपाळदेव हे प्रमुख राजे होऊन गेले. महाराष्टाचा आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक वैभवाचा हा काळ होता. या काळात ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, गोरा कुंभार, सावता माळी आदी संतांची मांदियाळी नांदत होती. खगोलशास्त्रात भास्कराचार्यांची कीर्ती पसरलेली होती. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचाही हाच काल होता. यादवांच्या समृद्धीची व ऐश्वर्याची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहचली होती.
खिलजी : इ.स. १२९४ मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. दिल्लीत स्थापन झालेल्या मुसलमानी सत्तेची दक्षिणेकडील ही पहिलीच मोहीम होय. यात रामदेवरायचा पराभव झाला. तहानुसार हे राज्य रामदेवरायकडेच राहिले. यानंतर मलिक काफूरने १३०७ साली व कुतबुद्दीन मुबारक खिलजी याने १३१८ साली या किल्ल्यावर आक्रमण केले. शेवटच्या लढाईत हरपाळदेवचा पराभव झाला. त्याला जिवंत सोलून ठार मारण्यात आले. यानंतर यादवांचे राज्य संपून १३१८ पासून देवगिरीवर दिल्लीच्या सुलतानांचे राज्य सुरू झाले.
तुघलक : इ.स. १३२७ मध्ये महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानीच दिल्लीहून देवगिरीवर स्थलांतरित केली व देवगिरीचे नामांतर दौलताबाद झाले. थोड्या काळासाठी दौलताबादेस भारताची राजधानी होण्याचा मान मिळाला. तुघलकाने लवकरच पुन्हा राजधानी दिल्लीस नेली. दिल्लीहून येताना व दिल्लीस परतताना अनेकांना आपले जीव गमवावे लागले.
बहामनी : १३४७ साली सत्ताधारी मुस्लिम सरदारांत सत्तासंघर्ष आरंभ होऊन हसन गंगू बहामनी याने येथे बहामनी राज्याची स्थापना केली. सुमारे दीडशे वर्षे येथे बहामनी राज्य होते.
निजामशाही : १४९९ साली बहामनी सत्तेचे पाच शाह्यांत विभाजन झाले. त्यातील अहमदनगरच्या निजामशाहीचे दौलताबादेस राज्य सुरू झाले. हे राज्य १३५ वर्षे टिकले. याच निजामशाहीतील मुख्य प्रधान मलिक अंबर याने खडकी शहर वसविले. पुढे औरंगजेबने खडकीचे नाव बदलून औरंगाबाद ठेवले.
मोगल : १६३३ साली हा किल्ला दिल्लीचा मोगल बादशहा शहाजहानच्या ताब्यात आला. १६३५ ला औरंगजेबने आपले मुख्यालय येथे केले.
आसफजाही : १७२४ मध्ये हा किल्ला आसफजाही वंशाचे संस्थापक, हैदराबादचे निजाम यांच्या ताब्यात आला. १७६० ते १७६२ ही दोन वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता.
मराठे : उदगीरच्या लढाईत सदाशिवराव भाऊ यांनी निजामाचा पराभव करून तहाद्वारे या किल्ल्यावर ताबा मिळविला होता. त्यानंतर १७६२ पासून १९४८ पर्यंत हा किल्ला हैदराबाद संस्थानच्या अधीन होता. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचा पराभव होऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
अशा प्रकारे ७६१ वर्षांत या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, मोगल, आसफजाही व मराठे या आठ राजवटींची सत्ता होती.
दौलताबाद किल्ल्याचा भूगोल
किल्ल्याचे नाव – | दौलताबाद किल्ला |
किल्ल्याचे दुसरे नाव – | देवगिरी किल्ला |
राज्य – | महाराष्ट्र |
जिल्हा – | औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर |
निर्मिती – | राष्ट्रकूट वंश |
निर्मिती काळ – | ११८७ – १३१८ आणि १७६२ |
किल्ल्याचे वंश – | यादव, खिलजी, तुघलक |
क्षेत्रफळ – | ९४ एकर |
किल्ल्याचे मुख्य स्मारक – | चांदमिनार, चिनी महल आणि बरादारी |
देवगिरी किल्ल्याची वास्तुकला – Construction of Daulatabad Fort in Marathi
दौलताबाद देवगिरी किल्ला हा औरंगाबाद संभाजीनगर पासून सुमारे २०० मीटर उंच अरुंद टेकड्यांवर बांधलेला सुरक्षित आणि शक्तिशाली किल्ला आहे. पौराणिक दौलताबाद किल्ला त्याच्या विचित्र बांधकामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला महाकोट दरवाजा म्हणतात. याचा वापर सध्या पर्यटक किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी करतात. या किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक लोकांचे दर्शन घडते.
पौराणिक काळात या दोघांचा वापर युद्धात होत असे. यासोबतच हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्माशी संबंधित स्मारके ही या किल्ल्यावर पाहायला मिळतात.या किल्ल्यात प्रवेश केल्यावर एक मोठा बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाबद्दल असे म्हटले जाते की, कुतुब मिनार नंतर चा हा दुसरा सर्वात उंच बुरुज आहे. जो १४४५ मध्ये अल्लाउद्दीन बहमनी यांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर बांधला होता.
तीन मजली इमारत असलेल्या या टॉवरमध्ये २३० पायऱ्या आहेत. हा पुरुष चारमिनार म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याच्या एका भागात भारत माता मंदिर देखील पाहायला मिळते. दौलताबाद देवगिरी किल्ल्याच्या संकुलात पाण्याचा मोठा तलावही पहायला मिळतो. हिरव्यागार वातावरणाने भरलेल्या या दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्याची वास्तू आणि तेथील कोरीव काम अतिशय सुंदर दिसते. त्यामुळे येथे आल्यावर पर्यटकांना येथून निघून जावेसे वाटत नाही.
नक्की वाचा👉 वीर तानाजींच्या बलिदानाची कथा – किल्ले सिंहगड
दौलताबाद किल्ला माहिती – बांधकाम रचना आणि संरक्षण
दौलताबाद किल्ल्याचे धोरणात्मक आणि शक्तिशाली बांधकाम हे देशातील सर्वात संरक्षित किल्ल्यांपैकी एक असे मानले जाते . देवगिरीच्या सभोवताली असणारे तट, उघडे खंड व पायथ्याशी असणाऱ्या अभेद्य भुईकोटा मुळे देवगिरी दुर्गम बनला. येथील तटांची लांबी सुमारे दोन किलोमीटर असून अनेक भक्कम बुरुज व दरवाजांनी युक्त आहे .सर्वात बाहेरील तटबंदीला अंबरकोट म्हणतात. या अंबरकोटाला एकूण सात प्रचंड दरवाजे आहेत.
अंबरकोटाचा विस्तार फार मोठा आहे. अंबरकोटाच्या आत महाकोट आणि महाकोटाच्या आत मध्ये आहे कालाकोट. आणि खंड ओलांडल्यावर बालेकिल्ल्याच्या चढाईला सुरुवात होते. महाकोटाच्या दरवाजाला लाकडी महाद्वार आहे. या मधून आत प्रवेश केल्यावर बंदिस्त चौकात आपण प्रवेश करतो. या ठिकाणी पहारेकरांसाठी देवडे आहेत.
या चौकामध्ये गाड्या, गाड्यावरील तोफा व पंचधातूंच्या अनेक तोफा मांडून ठेवले आहेत. इथल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस बुरुज आहे. तोफेमधून सुटलेले दगडी गोळे या बुरुजात जाऊन ऋतून बसलेले आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी चार मिनार आहे. या किल्ल्यावर अनेक पाण्याच्या टाक्या आणि जलाशय आहेत. ज्याचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात असे.
हा किल्ला २०० मीटर उंच टेकडीवर बांधला गेला आहे. त्याच्याभोवती भिंती आणि खंदक असल्यामुळे तसेच किल्ल्याचे प्रवेशद्वार ३० मीटर उंच आणि ५ मीटर रुंदीच्या भव्य दरवाजाने संरक्षित केलेले आहे.
दौलताबाद – देवगिरी किल्ला आणि ट्रेक
हे असे एक पर्यटन स्थळ जे इतिहास प्रेमी, पर्यटक आणि ट्रेकर्स ना सारखेच आकर्षित करत असते. ते म्हणजे संभाजीनगर.. या किल्ल्यावर जाण्यासाठी काही कठीण गिर्यारोहण करावी लागते. या किल्ल्याला भेट देण्याच्या सर्वात कठीण पैलूंपैकी एक म्हणजे किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या अंदाजे ७५० पायऱ्या चढणे. ज्याला दोन ते तीन तास लागू शकतात.
देवगिरी किल्ल्याची माहिती आणि वैशिष्ट्ये – Devgiri Fort Information In Marathi
या किल्ल्याचे भुईकोट व डोंगरी हे प्रकार एकत्रित केवळ येथेच आहेत. किल्ल्याभोवती कोरडा खंदक व बालेकिल्ल्याभोवती पाण्याचा खंदक असे दोन खंदक आहेत. येथे तीन भव्य व मजबूत तटबंदी आहेत. तटबंदी यांना येथे कोट म्हणतात. संपूर्ण गावाभोवती दिसतो तो अंबरकोट. डोंगरी दुर्गावर जाण्यासाठी दोन भव्य तटबंद याठिकाणी ओलांडावे लागतात.
किल्ल्यात प्रवेश करताच महाकोटाची तटबंदी लागते. दुसरी आतील कालाकोटची तटबंदी आहे. महाकोटात आठ दरवाजे आहेत. यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. त्या काळातील युद्धनीतीनुसार हत्तीला दारू पाजवून पळवीत नेऊन दरवाजे तोडावयास लावीत. पण दरवाजे सरळ रेषेत नसल्यामुळे हत्तीला पळता येत नसे.
किल्ल्याचा भुईकोट भाग संपून बालेकिल्लास आरंभ होताना खोलखंदकाची केलेली योजना अभूतपूर्व अशी आहे. खंदकात पाणी असून त्यात मगरी असत त्यामुळे खाली पडलेला शत्रू जिवंत राहू शकत नसे. खंदक ओलांडल्यानंतर भुलभुलय्या असलेला अंधारी मार्ग येथे आढळतो. या मार्गास लोक आंधारी म्हणतात.
अंधारीत शिरताच शत्रूला संभ्रमित करण्यासाठी करण्यात आलेले उपाय हे त्यावेळच्या स्थापत्य कौशल्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. किल्ल्याच्या सर्व बूरुजांवर तोफा ठेवलेल्या आहेत. एकंदरीत या किल्ल्याची रचनाच अशी करण्यात आली आहे की, हा किल्ला सदैव अभेद्य व अजिंक्य रहावा. हा किल्ला वेळोवेळी शत्रुंनी जिंकला, तो केवळ फंदफितुरीमुळे.
किल्ल्याच्या पश्चिम दिशेस डोंगरात कोरलेले रासाई मातेचे मंदिर व तेथून दिसणारा किल्ल्याचा देखावा मती गुंग करणारा आहे. किल्ल्याच्या बाहेर अंबर कोट पर्यंत प्राचीन समृद्ध नगर वसलेले होते. नगराभोवतीचा तट व काही दरवाजे आजही अस्तित्व टिकवून आहेत. महाद्वारातून आत प्रवेश करताच संपूर्ण किल्ला आपल्या दृष्टीपथास येतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी सरळ मार्ग आहे.
या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी (देवांचा पर्वत). सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूट या महान राजवटीनंतर निर्माण झालेले भारताच्या दक्षिण भागातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र. इ.स. १३२७ साली दिल्लीचा सुलतान महंमद तुघलक याने या किल्ल्यास भारताच्या राजधानीचा दर्जा देऊन या किल्ल्याचे नाव दौलताबाद (ऐश्वर्य नगर) ठेवले.
हा किल्ला एका अजस्र, दुर्गम, उत्तुंग व भव्य अशा एकाकी निसर्गनिर्मित डोंगरमाथ्यावर आहे. याचा आकार शंकूसारखा आहे. याची उंची २०० मीटर आहे. किल्ल्याच्या खडकाचा तळापासून मध्यापर्यंतचा भाग इतक्या कौशल्याने तासून गुळगुळीत केलेला आहे की या कातीव भागातून किल्ल्यावर चढणे केवळ असंभव आहे.
किल्ल्याचे भुईकोट व डोंगरी हे प्रकार एकत्रित केवळ येथेच आहेत. किल्ल्याभोवती कोरडा खंदक व बालेकिल्ल्याभोवती पाण्याचा खंदक असे दोन खंदक येथे आहेत.
येथे तीन भव्य व मजबूत तटबंद्या आहेत. तटबंदीस येथे कोट म्हणतात. संपूर्ण गावाभोवती दिसतो तो अंबरकोट. डोंगरी दुर्गावर जाण्यासाठी दोन भव्य तटबंद्या ओलांडाव्या लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच महाकोटाची तटबंदी लागते. दुसरी आतील कालाकोटची तटबंदी आहे.
महाकोटास आठ दरवाजे आहेत. यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. त्या काळातील युद्धनीतीनुसार हत्तीला दारू पाजवून पळवीत नेऊन दरवाजे तोडावयास लावीत. पण दरवाजे सरळ रेषेत नसल्यामुळे हत्तीला पळता येत नसे.
किल्ल्याचा भुईकोट भाग संपून बालेकिल्ल्यास आरंभ होताना खोल खंदकाची केलेली योजना अभूतपूर्व अशी आहे. खंदकात पाणी असून त्यात मगरी असत. त्यामुळे खाली पडलेला शत्रू जिवंत राहू शकत नसे.
खंदक ओलांडताच भुलभुलैया असलेला आंधारी मार्ग फक्त येथेच आढळतो. या मार्गास येथील लोक आंधारी म्हणतात. आंधारीत शिरताच शत्रूला संभ्रमित करण्यासाठी करण्यात आलेले उपाय हे त्यावेळच्या स्थापत्य कौशल्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे.
किल्ल्याच्या सर्व बुरुजांवर तोफा ठेवलेल्या आहेत.
एकंदरीत या किल्ल्याची रचनाच अशी करण्यात आली आहे की हा किल्ला सदैव अभेद्य व अजिंक्य राहावा. हा किल्ला वेळोवळी शत्रूनी जिंकला तो केवळ फंदफितुरीमुळे. किल्ल्याच्या पश्चिम दिशेस डोंगरात कोरलेले रासाईमातेचे मंदिर व तेथून दिसणारा किल्ल्याचा देखावा मती गुंग करणारा आहे.
किल्ल्याच्या बाहेर अंबरकोटपर्यंत प्राचीन समृद्ध नगर वसलेले होते. नगराभोवतीचा तट व काही दरवाजे आजही अस्तित्व टिकवून आहेत.
महाकोटातून आत प्रवेश करताच संपूर्ण किल्ला आपल्या दृष्टिपथात येतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी सरळ मार्ग आहे.
या किल्ल्यात प्रवेश करून अनेक राजांनी इतिहास निर्माण केला. तसेच अनेक संत, महात्म्यांच्या वास्तव्याने हा किल्ला पावन झाला आहे. संत ज्ञानेश्वरांचा या किल्ल्यास पदस्पर्श झाला आहे. ग्रंथकारांपैकी हेमाद्री, बोपदेव व कवी नरेंद्र यांचे वास्तव्य येथे होते. हेमाद्रीने हेमाडपंती मंदिर स्थापत्याचा पाया येथेच रोवला. अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. संत जनार्दनस्वामींना याच किल्ल्यात श्री दत्तात्रेयांनी दर्शन दिले. हे एकनाथ महाराज यांचे गुरू. एकनाथ महाराजांचे येथे प्रदीर्घ वास्तव्य होते.
काही विदेशी प्रवाशांनी या किल्ल्यास भेट देऊन या किल्ल्याचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्यापैकी इब्न बतुता, फरिश्ता, थेवेनॉट व टॅव्हरनियर हे प्रमुख होत.
दौलताबाद – देवगिरी किल्ल्याचा नकाशा
दौलताबाद – देवगिरी किल्ल्याचे प्रवेश शुल्क किती आहे ?
संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क म्हणून काही शुल्क द्यावे लागते. या किल्ल्याला भेट देण्यासाठी भारतीय पर्यटकांसाठी पन्नास रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये शुल्क भरावे लागते.
किल्ल्यात जाताना घेतली जाणारी दक्षता
एक छान उपक्रम पुरातत्व विभागाने दौलताबाद देवगिरी किल्ल्यावर केला आहे. आपण जेव्हा किल्ला परिसरात प्रवेश करतो, त्या वेळेस प्रवेशद्वाराजवळ तुमची तपासणी केली जाते. जर तुमच्या जवळ पाणी बॉटल असेल, तर जाताना तुमच्या बॉटलवर एक स्टिकर लावला जातो आणि सोबत ₹२० जमा करायला सांगतात.
तुम्ही किल्ला परिसर पाहून आल्यावर बाहेर निघताना ती स्टिकर लावलेली बॉटल दाखवायची आणि तुम्ही दिलेले पैसे परत घ्यायचे. या उपक्रमामुळे पर्यटक आपली पाणी बॉटल सांभाळून ठेवतात, किल्ला परिसरात इतरत्र कुठेही फेकून देत नाहीत. यामुळे किल्ला परिसर प्लास्टिक मुक्त व स्वच्छ राहण्यास मदत होत आहे.
जरूर वाचा👉 अभेद्य जलदुर्ग -मुरुड जंजिरा
देवगिरी किल्ल्यात जाताना घ्यावयाची काळजी
- तुम्हाला या किल्ल्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुमच्यासोबत मार्गदर्शक घ्या.
- किल्ल्यावर जाताना मोबाईल किंवा चांगल्या प्रकारचा कॅमेरा जवळ ठेवावा. जेणेकरून तेथील रम्य असा परिसर आणि रोमहर्षक दृश्य आपल्याला कॅमेरा मध्ये टिपता येतात.
- किल्ल्यावर जाताना मोबाईल टॉर्च आणि एखादी बॅटरी जरूर आपल्या हातात ठेवावी.
- जर तुम्हाला दौलताबाद किल्ला पायी चढायचा असेल तर आरामदायक कपडे आणि योग्य पादत्राणे (हिल्स नको) घालण्याची खात्री करा.
- किल्ल्यावर चढताना मध्ये थोडी विश्रांती घेणे महत्वाचे आहे.
- गडाच्या माथ्यावर पाणी किंवा खाद्यपदार्थ विक्रेते नसल्यामुळे, तुमच्यासाठी पाण्याची बाटली आणि काही हलके स्नॅक्स सोबत आणा.
- गडावर चढताना शक्यतो सकाळी जावे जेणेकरून खूप उन पडायच्या आधी आपण गड उतरून आलेलो असणार.
- दौलताबाद किल्ल्याला संध्याकाळी ४ च्या दरम्याने भेट दिल्यास ६ वाजेपर्यंत परतावे, हे लक्षात ठेवा.
देवगिरी किल्ला फिरण्यासाठी योग्य वेळ
दौलताबाद किल्ला पहायचा असल्यास औरंगाबादला म्हणजेच संभाजीनगर ला भेट देण्याचा उत्तम वेळ, कालावधी म्हणजे हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी. हिवाळ्यात तापमान तुलनेने कमी असते आणि आकाश निरभ्र असते. उन्ह्याळ्यात याठिकाणी जबरदस्त उष्णता असते आणि आपण पावसाळ्यात भेट देणे टाळावे, कारण येथील बांधकाम अतीपावसामुळे कोसळण्याची शक्यता असते. तसेच हा किल्ला उंच असल्यामुळे वाऱ्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच आजूबाजूची बहुतेक पर्यटन आकर्षणे लांब लांब आहेत.
तसेच हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाची वेळ देण्यात आलेली आहे.
नक्की माहिती घ्या 👉 सिंधुदुर्गातील २३ किल्ले
देवगिरी किल्ल्यातील आकर्षणे
१. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार
हे महाकोटाचे पहिले प्रवेशद्वार आहे. याचे महाकाय व प्रचंड लाकडी दार व त्यावरील टोकदार खिळे अजूनही शिल्लक आहेत.
२. महाकोटाचा दुसरा दरवाजा
या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दगडात कोरलेले हत्ती स्पष्ट दिसतात. या भागात सापडलेल्या तोफा प्रांगणात मांडून ठेवलेल्या दिसतात.
३. महाकोटावरील टेहळणी बुरुज
या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचे मनोहरी दृश्य दिसते. या बुरुजाचा टेहळणीसाठी उपयोग होत असे. वरच्या भागातील कमानी असलेला एक सज्जा आहे. किल्ल्यात व परिसरात पडलेली अनेक कोरीव शिल्पे तटाजवळ मांडून ठेवलेली आहेत. महाकोटातून बाहेर पडताच किल्ल्याचा सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.
४. विहिरी
किल्ल्यात व परिसरात अनेक विहिरी आहेत. पायऱ्या असलेल्या विहिरींना १२ किंवा बावडी म्हणतात. सरस्वती विहीर कचेरी जवळ, अंबरकोठच्या जवळ शक्कर बावडी व बाहेर कडा बावडी आहे. सर्व विहिरींमध्ये वर्षभर भरपूर पाणी असते. या विहिरींच्या पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत.
५. हत्ती हौद
अतिभव्य असल्यामुळे या हौदाला हत्ती हौद असे नाव पडले. या हौदाची लांबी ४७.७५ मीटर तर रुंदी ४६.७५ मीटर आणि खोली ६.६१ मीटर अशी आहे. या हौदाच्या काठावर टाळी वाजवल्यास त्याचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येतो.
६. भारत माता मंदिर
हत्ती हौदाच्या बाजूला घुमट असलेले एक प्रचंड प्रवेशद्वार आहे. यातून आत प्रवेश करताच आपण एका भव्य विशाल प्रांगणात येतो. समोरच अनेक स्तंभ असलेले मंदिर स्पष्ट दिसते. मंदिरात स्तंभाच्या मधोमध विराजमान झालेली भारत मातेची सुंदर मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिरात सरळ रांगेत उभारलेले स्तंभ व त्यावरील शिल्पकला वाखणण्याजोगे आहे.
प्रांगणात अनेक स्तंभाचे अवशेष दिसतात. त्यावरून या मंदिराच्या भव्यतेची कल्पना करता येऊ शकते. हे मंदिर यादवांच्या काळातील होते. मुळात हे जैन मंदिर होते. दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन मुबारक हिंदी याने १३१८ च्या आसपास या मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. १९४८ साली निजामाचा पराभव होऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर येथे भारत मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
७. चांद मिनार
महाकोट ओलांडताच आपणास चांदमिनार हा उंच मनोरा दिसू लागतो. किल्ल्याच्या बहुतेक सर्वच भागातून आता हा मनोरा दिसत राहतो. भारत माता मंदिराच्या उजवीकडील दरवाज्यातून बाहेर पडताच आपण चांदमिनारच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. हा मनोरा तीन मजली आहे. याची उंची ७० मीटर आहे व पायाजवळील घेरा २१ मीटर आहे. उंची मध्ये दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर चांदमिनारचा क्रमांक लागतो. मिनारवर सर्वत्र सुंदर नक्षीकाम होते.
या काही ठिकाणी त्याची झलक आजही पहावयास मिळते. या मीनारात वरपर्यंत जाण्यासाठी मीनाराच्या आठ पायऱ्या आहेत. सध्या वर जाण्याची परवानगी नाही. हा मनोरा सुलतान अहमदशहा बहामनीच्या काळात बांधण्यात आला असावा. १४४७ मध्ये याचे काम पूर्ण झाले असावे. या मीनाराच्या उजव्या बाजूस संग्रहालयाचे काम चालू आहे.
८. कालाकोट
इथून पुढे गेल्यावर कालाकोटाचा प्रवेशद्वार लागतो. या ठिकाणी एकामागे एक असे तीन दरवाजे आहेत.
९. चिनी महाल
या महालाच्या सजावटीत व नक्षीकामात चिनीमातीच्या टाईल्स चा उपयोग करण्यात आला होता. म्हणून या महालाचे नाव चिनी महाल पडले. या महालाचा वेळोवेळी कारागृहासारखा उपयोग करण्यात आला. गोवळकोंडा चा शेवटचा कुतूबशाही बादशाह अबुल हसन, तानाशहा व विजापूरच्या आदिलशहाचा शेवटचा बादशाह सिकंदर आणि वरंगलचा शेवटचा काकतीय राजा गणपती यांना या महालात बंदीवासात ठेवले होते. या शिवाय छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईसाहेब व पुत्र शाहूराजे यांनाही याच महालात बरीच वर्ष ठेवण्यात आले होते, असे सांगितले जाते.
१०. मेंढा तोफ
चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेच्या मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्याच्या तोंडा सारखा आहे. म्हणून या तोफेचे नाव मेंढा तोफ पडले. या तोफेवर ‘तोफ किला शकन’ म्हणजे किल्ला तोडणारी तोफ असे लिहिलेले आहे. या तोफेची लांबी ७ मीटर असून ती सर्व दिशेस वळविता येते. या तोफेवर औरंगजेबाचे व तोफ घडवणारा कारागीर महंमद अरब यांची नावे कोरलेली आहेत. तोफेच्या तोंडावर पवित्र कुराणातील एक वचन कोरण्यात आले आहे.
११. निजामशाही राजवाडा
मेंढा तोफेच्या बुरुजापासून डावीकडे एका राजवाड्याचे अवशेष दिसतात. हा निजामशाही राजवाडा आहे. यास दोन दरवाजे आहेत. या महालाचे सध्या जे अवशेष शिल्लक आहेत, त्यावरून महालाच्या स्थापत्याची व सौंदर्याची कल्पना करता येऊ शकते. विविध कमानी व बहिरपातून केलेले सुंदर रंगीत नक्षीकाम दिसून येते.
१२. खंदक
मेंढा तोफेच्या बुरुजावरून बालेकिल्ला स्पष्ट दिसतो. तेथे जाण्याच्या मार्गावर सर्व बाजूंनी डोंगरात खोदलेला कंदक आहेत. खंदकाची रुंदी १६ मीटर व खोली २० मीटर आहे. हा खंदक म्हणजे त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कारच होईल. या खंदकात पाण्याची पातळी कमी जास्त करण्यासाठी दोन बंधारे बांधले होते. शत्रूची चाहूल लागताच पाण्याची पातळी वाढवून ती पुलाच्या वर नेण्यात येई. सध्या येथे दोन पूल दिसतात.
खालचा पूल जुना असून नवीन लोखंडी पूल १९५२ मध्ये बांधण्यात आला. सुरुवातीला येथे कातडीचा एक पूल होता. शत्रु दिसताच कातडी चाकावर गुंडाळून ठेवण्याची त्यात सोय होती. खंदकाच्या कडा इतक्या गुळगुळीत करण्यात आल्या आहेत की शिडी लावूनही शत्रूला वर चढणे शक्य होणार नाही. कोणी चढण्याचा प्रयत्न केलाच तर तो सरळ पाण्यात पडत असे. व पाण्यात त्याचा फडशा पाडण्यासाठी भरपूर मगरी, सर्प इत्यादी प्राणी तयार असत.
१३. अंधारी व भुलभुलैय्या
खंदकावरील लोखंडी पूल ओलांडल्यावर आपण यादवकालीन मूळ देवगिरी दुर्गावर प्रवेश करतो. सुरुवातीचा मार्ग डोंगर करून तयार केलेला आहे. हाच अंधारीचा मार्ग आहे. याचे प्रवेशद्वार लेणी सारखे कोरीव आहे. येथून तीन टप्प्यांच्या पायऱ्या असणारा व वळणा वळणाचा मार्ग सुरू होतो. ५० मीटर लांबीची ही एक चढण आहे.
आत प्रवेश करताच काळोख कसा असतो. याचा अनुभव येऊ लागतो. पूर्वीपासून आजपर्यंत या मार्गातून जाताना टेंभी किंवा मशालींचा उपयोग करावा लागत असे. यात शिरल्यावर या मार्गाचे अंधारी हे अगदी सार्थ नाव आहे. याची प्रचिती येते.
अंधारी सोबतच या भागात भूल भुलैयाची केलेली योजना स्तंभित करणारी आहे. हवा येण्यासाठी म्हणून कोरलेल्या मोठ्या झरोख्यात शत्रू शिरलाच तर तो सरळ खंदकात जाऊन पडावा. रस्ता शोधण्याच्या विवंचनेत उभा राहिलाच तर वरच्या बाजूस ठेवलेला प्रचंड तवा गरम करून अंधारी मार्ग धुराने कोंडला जाई. अशा अनेक युक्त्या यात वापरण्यात आल्या आहेत.
१४. पेशवेकालीन गणेश मंदिर
भुयारी मार्ग पार करून पायऱ्या चढून वर गेल्यावर डाव्या हातास गणेश मंदिर दिसते.
१५. बारादरी
संपूर्ण किल्ल्यात चांगल्या अवस्थेत असलेली ही एकमेव इमारत आहे. मुघल सम्राट शहाजहान यांच्या काळात ही बांधण्यात आली. हा अष्टकोनी महाल असून यास बारा कमानी आहेत. परंतु म्हणून यास बारादरी म्हणतात. येथून किल्ल्याचे व डोंगराने वेढलेल्या परिसरातील सुंदर दृश्य दिसते. जवळच्या मोती टाकीतील थंडगार पाणी येथे पिण्यास मिळते व इतक्या उंचीवर चढून आल्यामुळे आलेला थकवा एकदम दूर होतो.
१६. श्री जनार्दन स्वामींची ध्यानगुंफा
संत जनार्दन स्वामी हे चाळीसगावचे देशपांडे. निजामशाहीच्या काळातील दौलताबादचे किल्लेदार तसेच एक महान संत म्हणून विख्यात आहेत. त्यांचे अनेक अभंग आहेत. यामुळे श्री दत्ताने जनार्दन स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिले. ज्या स्थळी दत्त प्रकट झाले तेथे दत्ताच्या पादुका आहेत. दत्तपादुका शेजारी जनार्दन स्वामींच्या चरण पादुका आहेत. मार्गशीर्ष वैद्य एकादशी ला येथे मुख्य यात्रा असते. पैठणचे महान संत श्री एकनाथ महाराज यांचे हे गुरु. एकनाथ महाराज येथे गुरूंच्या सहवासात सहा वर्ष होते.
१७. काला पहाड तोफ व दुर्गा तोफ
काला पहाड व दुर्गा या तोफा पाहिल्यावर या अजस्त्र तोफा इतक्या वर पर्यंत कशा आणल्या असतील याचे आश्चर्य वाटते. दुर्गा तोफेवर एक ध्वज स्तंभही आहे. यावर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज लावण्यात येतो.
१८. शाही हमाम (राजेशाही स्नानगृह)
हे शाही हमाम किल्ल्याच्या बाहेर आहे . रोड ओलांडल्यावर समोरील गल्लीत प्रवेश करताच हमाम खाण्याची जुनी इमारत नजरेस पडते. या इमारतीस कोठेही खिडक्या नाहीत. प्रकाश आत येण्यासाठी छतावर झरोख्यांची योजना केली आहे. त्या काळातील हौद थंड व गरम पाण्याची व्यवस्था येथे पहावयास मिळते. या प्रकारची किल्ल्यातील सर्व स्नानगृहे आता नष्ट झालेली आहेत.
१९. कचेरी
किल्ल्यातील कचेरीचे एक दृश्य. या इमारतीची निर्मिती पाषाणात करण्यात आली असून ती अजूनही चांगल्या स्थितीत आहे. इमारती जवळ पाण्याचा हौद आहे. कचेरी जवळ एक मोठी बारव आहे जी कचेरी बावडी म्हणून ओळखली जाते.
२०. रासाई मातेचे मंदिर
किल्ल्याच्या पश्चिमेस जेथून अंबरकोटी तटबंदी आरंभ होते तेथे किल्ला बांधतानाच रासाई मातेचे मंदिर व मूर्ती मुख्य किल्ल्याभोवती असलेल्या खडकात करण्यात आली असावी. देवीची मूर्ती पाहून असे वाटते की, रासाई मातेने संपूर्ण किल्लाच आपल्या बोटावर उचलून धरला आहे. या मंदिरात खंदक ओलांडून जावे लागते. त्यासाठी खंदकावर एक मजबूत पूल बांधलेला आहे. येथून किल्ल्याच्या विराट स्वरूपाचे खरे दर्शन घडते. येथून थोडे पुढे रंगमहालाची जुनी मोडकळीस आलेली इमारत आहे, ज्यात आता पाहण्यासारखे काही शिल्लक राहिलेले नाही.
२१. दत्त मंदिर
या मंदिरात श्री जनार्दन स्वामी व संत एकनाथ महाराज यांच्या मूर्ती आहेत.
२२. हनुमान मंदिर
घाटाच्या पायथ्याशी दिल्ली गेट जवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे.
दौलताबाद किल्ला येथे कसे जायचे ?
औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर आणि तेथून दौलताबाद देवगिरी किल्ला या ठिकाणी जाण्यासाठी आपण बस, ट्रेन किंवा विमानाने जाऊ शकतो.
विमान –
जर तुम्हाला विमानाने यायचे असेल तर औरंगाबाद म्हणजेच आता ते संभाजीनगर विमानतळावरून यावे लागते आणि तेथून किल्ल्यापर्यंत येण्यासाठी ऑटो किंवा टॅक्सी घ्यावी लागते. विमानतळापासून किल्ल्यापर्यंतचे अंतर साधारण २२ किलोमीटर इतके आहे.
रोड –
जर तुम्हाला बाय रोडने यायचे असेल तर तुम्ही बसने किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने ६ तासात सुद्धा येऊ शकता.पुणे ते संभाजीनगर – ४२१ किलोमीटर
ट्रेन –
जर तुम्हाला औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला रेल्वेने जायचे असल्यास औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावरून किल्ला खूपच जवळ आहे. साधारण २८ मिनिटांचे अंतर आहे. आणि तेथून आपण रिक्षा किंवा टॅक्सीने किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो.
दौलताबाद किल्ल्याच्या आसपास फिरण्याची ठिकाणे
वेरूळ लेणी
संभाजीनगर शहरापासून जवळपास ३० किलोमीटरच्या अंतरावर वेरूळ गावातील ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत. १९५१ साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. १९८३ मध्ये वेरूळ लेणींचा समावेश जागतिक वारसा स्थळांची यादीत देखील केला आहे.
अजिंठा लेणी
संभाजीनगर शहरापासून जवळपास १०० ते ११० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन १९८३ मध्ये घोषित केले आहे. जून२०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अजिंठा लेणी हे प्रमुख आकर्षण ठरले. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या नोटेवर देखील आहे.
कैलास मंदिर
स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे वेरूळ या ठिकाणचे कैलास मंदिर हे अद्वितीय अशी कलाकृती आहे. जगातील एकमेव असे हे मंदिर आहे. ज्याची निर्मिती वरून खाली म्हणजे आधी कळस मग पाया अशा प्रकारे केली आहे. हे मंदिर द्रविड शैलीचे असून ३०८ फूट लांब १८८ फूट रुंद आणि ९५ फूट उंच असा याचा आकार आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास २० वर्षांचा कालावधी लागला असून पन्नास हजार पेक्षा अधिक कामगारांना या ठिकाणी आपली कलाकुसर करावी लागली.
पाणचक्की
पाण्याच्या दाब निर्माण करून दगडी जाते फिरवण्याची किमया साध्य करण्याची ही कल्पना जवळपास ४०० वर्षांपूर्वी अमलात आणलेली आहे. ही पाणचक्की उभी करण्यामध्ये मलिक अंबरचे मोठे योगदान दिसून येते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला आणि उत्तरार्धामध्ये पाणचक्कीचे बांधकाम सुरू झाले.
बीबी का मकबरा
बीबी का मकबरा हा मुगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. ताजमहालची प्रतिकृती म्हणून या बीबी का मकबराला ओळखले जाते. हा मकबरा लाल काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे. हा मकबरा एका भव्य ओट्यावर असा बांधलेला असून यामध्ये मधोमध बेगम राबिया दुरानीची कबर आहे. या कबरीच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत.
गवताळा अभयारण्य
जवळपास कन्नड गावापासून १५ किलोमीटर आणि चाळीस गावापासून २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. त्या ठिकाणी चौकीमध्ये गेल्यावर नोंद केल्यानंतर आपल्याला आत मध्ये प्रवेश मिळतो. या अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. याच्या आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसून येतात. तसेच चंदनाच्या वनातून वाहणारा एक नाला देखील दिसतो. त्याला चंदन नाला असे म्हणतात. याच्या काठाला मोर पोपट यासारखे रंगबिरंगी पक्षी, त्याचप्रमाणे सातभाई, सुब्रह्मण, बुलबुल, कोतवाल, चंडोल, दयाळ यासारखे पक्षी दिसून येतात.
घृष्णेश्वर मंदिर
भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर मंदिर होय. हे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, दौलताबाद पासून जवळपास ११ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमी बाईंनी हे मंदिर बांधले असून त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. २७ सप्टेंबर१९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराला घोषित करण्यात आले.
वॉटर पार्क
एलोरा रोड या राष्ट्रीय महामार्गावर हे वॉटर पार्क आहे. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी डिझाईन केलेल्या स्लाइड तसेच स्वतंत्र स्विमिंग पूल देखील आहेत. या ठिकाणी स्वादिष्ट स्नॅक्स आणि शीतपेय देणारे आणि फूड स्टॉल आणि काउंटर देखील आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत हे वॉटर पार्क चालू असते. ४५० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत याचे प्रवेश शुल्क आकारले जाते.
जायकवाडी धरण
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्रमुख धरण गोदावरी नदीवर आहे. ६० किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद इतका मोठा पसारा या जायकवाडी धरणाचा आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्यासाठी आणि चार वर्षाच्या पिण्याच्या पाण्यासाठीची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र देखील समजलं जातं.
दौलताबाद येथील प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ
ऐतिहासिक शहराच्या वास्तूंच्या निर्मितीमागे जसा इतिहास असतो, तसा प्रत्येक शहराच्या लोकप्रिय खाद्य पदार्थाचाही इतिहास असतो. इथल्या परंपरांमध्ये या खाद्यपदार्थाना वेगळं स्थान मिळवलेलं असतं. औरंगाबादचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ नान खलियाला ही असाच एक इतिहास आहे.नान खलिया हा पदार्थ पूर्ण मांसाहारी आहे. नान म्हणजे रोटीचा प्रकार व खलिया म्हणजे मटण. या ठिकाणच्या मुख्य जेवणामध्ये पुलाव, बिर्याणी, ताहरी यांचा देखील समावेश होतो. त्याचप्रमाणे गावरान चिकन, थालीपीठ आणि पोळी हे काही या भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत.
दौलताबाद येथील प्रसिद्ध हॉटेल्स
- हॉटेल कैलास
- एलोरा हेरिटेज रिसॉर्ट
- हिरण्य रिसॉर्ट
- हॉटेल ग्रीन ऑलिव्ह
- द मिडोज रिसॉर्ट अँड स्पा
प्रश्न
दौलताबाद किल्ला कुठल्या राज्यामध्ये आहे?
दौलताबाद किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये आहे.
दौलताबादचे जुने नाव काय?
दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे आहे.
दौलताबाद कोणाची राजधानी होती?
दौलताबाद भारताची राजधानी होती.
भारतामध्ये दुसरा सगळ्यात उंच मिनार कोणता आहे?
भारतामध्ये दुसरा सगळ्यात उंच चांदमिनार आहे. जो या दौलताबाद किल्ल्यामध्ये आहे.
मोहम्मद बिन तुघलकने देवगिरीचे दुसरे कोणते नाव ठेवले?
मोहम्मद बिन तुघलकने देवगिरीचे दुसरे नाव दौलताबाद असे ठेवले.
दौलताबाद किल्ला किती उंचीवर बांधला गेला आहे?
दौलताबाद किल्ला हा समुद्रसपाटीपासून ९०१ मीटर उंचीवर आहे.
दौलताबाद किल्ल्यामध्ये असणाऱ्या चांदमिनारची निर्मिती का केली गेली?
दौलताबाद किल्ल्यामध्ये असणाऱ्या चांदमिनारची निर्मिती अल्लाउद्दीन बहमनी शहाने केली होती. इसवी सन १४३५ मध्ये दौलताबाद किल्ल्याच्या विजयाच्या आनंदामध्ये चारमिनारची निर्मिती केली गेली.
चांदमिनारची उंची किती आहे?
चांदमिनारची उंची ६३ मीटर इतकी आहे.
मोहम्मद तुघलक ने दिल्ली मधून दौलताबाद राजधानी कधी परिवर्तित केली ?
मोहम्मद तुघलक दिल्ली मधून दौलताबाद राजधानी इसवी सन १३२७ मध्ये परिवर्तित केली.
देवगिरी किल्ल्यावर कोणी कोणी शासन केले?
देवगिरी किल्ल्यावर यादव, खिलजी आणि तुघलक तसेच निजाम यांनी शासन केले.
दौलताबाद किल्ल्याचे मुख्य स्मारक कोणते आहे?
चांदमिनार, चिनी महल
दौलताबाद किल्ल्यावर चढून जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत?
दौलताबाद किल्ल्यावर चढून जाण्यासाठी साधारणपणे ७५० पायऱ्या आहे
निष्कर्ष
मित्रांनो,
आम्हाला आशा आहे की, दौलताबाद किल्ल्याबद्दल म्हणजेच देवगिरी किल्ल्याची माहिती – देवगिरी दौलताबाद किल्ला माहिती मराठी हा लेख तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. या Devgiri Daulatabad Fort Information In Marathi Language लेखाद्वारे आम्ही दौलताबाद किल्ल्याच्या इतिहासाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अशी इतर ऐतिहासिक ठिकाणे आणि पुरातन वास्तू जाणून घ्यायची असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
धन्यवाद.🙏🙏