आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सर्वनाम म्हणजे काय या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत वाचा.
सर्वनाम म्हणजे काय What Is Pronoun In Marathi
सर्वनामाची उदाहरणे
हे वाचा –
- बहुगुणी कोरफडीचे फायदे
- इतिहास म्हणजे काय ?
- प्रदूषण म्हणजे काय
- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
- डोळे जड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
सर्वनाम म्हणजे काय –
१) अनन्याच्या शाळेचे नाव गांधी विद्यामंदिर आहे. अनन्याला पिवळा रंग आवडतो अनन्याला खेळायला खूप आवडतं. अनन्याला रंगीत कपडे सुद्धा आवडतात. अनन्याला फिरायला आवडतं. अनन्याला खूप मोठ्या घरात राहते.
याउलट, अनन्या माझी छान मैत्रीण आहे. ती अमरावतीला राहते. तिची आई सोलापूरला गेली. तिचे बाबा फुटबॉलपटू आहेत. तिला पिवळा रंग खूप आवडतो. तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आल का लक्षात. आता आपण याच्यात काय बदल केला. अनन्या ऐवजी तिचा, तिची,तिला अशा प्रकारची सर्वनाम वापरली. हेच तर आहे सर्वनाम.
२) मुख्यमंत्री विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. मुलांनी त्यांना फुल दिले.
वरील वाक्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख पुन्हा पुन्हा न करता, मुख्यमंत्री या नामा ऐवजी ते, त्यांनी, त्यांना, अशा शब्दांचा वापर करून, नामाचा पुनरुच्चार टाळला. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला “सर्वनाम” असे म्हणतात.
सर्वनामांना स्वतःचा असा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात, त्यांच्याच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात जर एखाद नाम येऊन, गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही.
सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण त्याच्या ऐवजी सर्वनाम वापरतो. म्हणजे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, अशी अनेक प्रकारची सर्वनाम आहेत.
या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, तर ती ज्या नामांबद्दल येतात, त्याचा अर्थ ती व्यक्त करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की, आपण कोणाबद्दल बोलतोय, जसं कि अनन्याच उदाहरण बघा, आपण मघाशी बघितल अनन्या माझी मैत्रीण आहे, अनन्या अमरावतीला राहते, यात आपल्याला समजल कि आपण कोणा बद्दल बोलतोय.
पण आपण जर असं म्हटलं की, ती माझी मैत्रीण आहे. ती अमरावतीला राहते. तर आपल्याला कळणारच नाही की, आपण कोणाबद्दल बोलतोय. त्यामुळे एकदा सुरुवातीला नाम येणं आवश्यक आहे आणि नंतर त्या नामाबद्दल आपण सर्वनाम वापरू शकतो.
पण अर्थात हा सगळा नियम, सर्वसाधारण गद्यासाठी आहे. पद्यासाठी मात्र कोणतेच नियम नाही आहेत. तू, तेव्हा, तशी, वगैरे. अशा प्रकारच्या काव्यरचना सहजपणे कवी करू शकतो.
सर्वनाम म्हणजे काय
सर्वनाम म्हणजे काय – “पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात”.
सर्वनामाचे प्रकार
सर्वनाम म्हणजे काय – सर्वसामान्य पुढील प्रमाणे, सहा मुख्य प्रकार आहेत.
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
सर्वनाम म्हणजे काय – सर्वनामांच्या प्रकारांची टप्प्याटप्प्याने माहिती आता आपण घेऊया.
पुरुषवाचक सर्वनाम
बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने, जगातल्या सर्व वस्तूंचे किंवा व्यक्तींचे असे तीन वर्ग पडतात. एक म्हणजे बोलणाऱ्यांचा, म्हणजे मी. मी जेव्हा तुमच्याशी बोलत असेल तेव्हा मी अशा प्रकारे वाक्यरचना करते की, मी उद्या येईल. मी उशिरा आले. मी शाळेत जाते. अशा प्रकारची वाक्यरचना होते. हा झाला पहिला वर्ग.
अजून एक दुसरा प्रकार म्हणजे, मी ज्यांच्याशी बोलते म्हणजे समोरच्या व्यक्तीशी मी बोलत असताना असं म्हणते की, तू उशिरा आलास. तू कधी येणार आहेस. अशा प्रकारची वाक्यरचना होते तेव्हा तो दुसरा वर्ग जिथे “तू” हा शब्द वापरला जातो.
तिसरा वर्ग म्हणजे, इथे उपस्थित नसलेल्या व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख “ते” अशा अर्थाने करतो. या तीन वर्गांना व्याकरणांमध्ये तीन प्रकारचे “पुरुषवाचक सर्वनाम” असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुष वाचक असे तीन प्रकारचे सर्वनाम यामध्ये येतात आता.
पुरुषवाचक सर्वनाम
आपण पुरुषवाचक सर्वनाम उदाहरणांमधून समजून घेऊया.
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
“मी” आणि “आम्ही” ही सर्वनाम प्रथम पुरुषवाचक आहेत.
१) मी स्वयंपाक करते.
इथे “मी” हे एकवचन आहे. मी माझ्याबद्दल म्हटले.
२) “आम्ही” स्वयंपाक करतो.
असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एकतर अनेक वचन असतं, म्हणजे माझ्याबरोबर अजून खूप जण स्वयंपाक करतात किंवा अजून एक म्हणजे, मी माझा स्वतःचा उल्लेख हा “आदरार्थी” केला. म्हणजे आम्ही स्वयंपाक करतो, असं म्हटलं तरीसुद्धा ते प्रथम पुरुषवाचक सर्वनामच होतं. पण ते एकवचनी होते. त्यामुळे “मी” आणि “आम्ही” हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणं आहेत.
द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
“तू” आणि “तुम्ही” ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाची उदाहरणे आहे.
“तू” उशिरा आलास. “तुम्ही” उशिरा आलात. असा जेव्हा आम्ही वाक्यप्रयोग करतो, तेव्हा “तू” हे एकवचनात आपण वापरतो. तर, “तुम्ही” हे अनेक वचनात पण असू शकतो किंवा “आदरार्थी” एकवचन पण असू शकतं. म्हणजे खूप लोक असतील तर, आपण म्हणू की “तुम्ही” उशिरा आलात. पण कधीतरी आपण आदरार्थी सुद्धा, त्याचा उपयोग करतो. म्हणजे एकच व्यक्ती असेल तर, तिला आधार देण्यासाठी, आपण “तुम्ही” हे वापरतो. तर हे आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम.
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण म्हणजे, “तो, तिथे आणि ते, त्या,ती”, हे सगळे उदाहरण तृतीय पुरुषवाचक आहेत. आपण सुरुवातीलाच बघितलं की, समोर उपस्थित नसलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल, आपण जेव्हा उल्लेख करतो. तेव्हा आपण “तृतीय पुरुषवाचक सर्वनाम” वापरतो.
समजा आपण म्हटलं की, “तो” जहाजाने सफरीला गेला. “ती” प्रदेशात गेली. तर यामध्ये आपण ती व्यक्तीसमोर नाहीये, पण तिच्याबद्दल काहीतरी सांगते वेळी आपण “तो” “ति” ”ते” अशा प्रकारचे सर्वनाम वापरतो.
आता “तो” “ति” “ते” आणि “ते” “त्या” “ति” यामध्ये ते हा शब्द दोनदा आलेला आहे. याचं कारण म्हणजे एकदा “ते” आहे, ते नपुसकलिंगी उल्लेख आहे आणि नंतरच “ते” आहे हा, अनेकवचन उल्लेख आहे. याचा तुम्हाला प्रत्यक्ष वाक्यात उपयोग करताना, त्यातला फरक नक्की लक्षात येईल.
दर्शक सर्वनाम
“जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी, जे सर्वनाम येतं त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो”. तुम्हाला या नावावरून पण लक्षात येईल की दर्शक म्हणजे दाखवणार, याची उदाहरणे आहेत- “हा” “ही” “हे” “ह्या” “ही” किंवा “तो” “ती” “ते” “त्या” “ती” म्हणजेच त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आणि नाम हे दोन्ही उपस्थित असत, त्याच वेळेस त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात, हे तुमच्या लक्षात येईल. नाम आणि सर्वनाम हे जेव्हा एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करत असतात, त्यावेळेस सर्वनामाला “दर्शक सर्वनाम” असे म्हणतात.
१) “तो” मोर उडतो आहे.
असा पण म्हटलं तर, आपण तो मोर असा पण दाखवलं, हे दर्शक सर्वनाम आहे. हे दर्शक झालं आणि पुरुषवाचक नाहीये.
२) तो उडतो आहे.
असा आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा इथे, तो मोर असा पण वाक्यरचना केलेली नाहीये, तर तो उडतो आहे. म्हणजे इथे आपल्याला त्याच्याबद्दल फक्त माहिती दिली. कुठल्यातरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल किंवा प्राण्याबद्दल माहिती दिली.
“मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे”.
इथे आपण “हा” हा शब्द वापरलाय. “हा” सुद्धा दर्शक आहे. कारण इथे मोर, पक्षी, ही सगळी नाम उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वनाम वापरलेला आहे. त्यामुळे हे सर्वनाम आहे, हे दर्शक सर्वनाम आहे.
संबंधी सर्वनाम
“वाक्यात पुढे किंवा नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या, सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात” या व्याखेवरून तुमच्या अस लक्षात आल असेल, संबंध दाखवणार जे सर्वनाम आहे, ते संबंधित सर्वनाम आहे. पण हे कोणाशी संबंध दाखवतो, तर पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. म्हणजे संबंधित सर्वनाम जेव्हा वाक्यात असतं, तेव्हा त्या वाक्यात एक दर्शक सर्वनाम सुद्धा असतं. आता हे सगळं आपण एका उदाहरणातून समजून घेऊया.
उदाहरण. १) जो तळे राखतो, तो पाणी चाखतो.
आता अशा प्रकारच्या वाक्यामध्ये “जो” आणि “तो” ही दोन्ही सर्वनाम आहेत. त्यातलं “जो” आहे, हे संबंधी सर्वनाम आहे. कारण त्याचा संबंध “तो पाणी चाखतो” याच्याशी आहे. तिथे “तो” हे दर्शक सर्वनाम झालं. त्यामुळे या वाक्यात आपल्या लक्षात येईल की, दोन सर्वनामा आलेली आहेत. “संबंधी आणि दर्शक”
२) जी आधी पोहचेल ती जिंकेल
या उदाहरणात तुमच्या लक्षात येईल की, “जी” आणि “ती” दोन सर्वनाम आहेत. “ती” हे दर्शक आहे, आणि “जी” हे संबंध आहे. कारण “जी” आणि “ती” यांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला या वाक्यातून कळला. त्यामुळे संबंधित सर्वनाम ओळखताना, अजिबात चुकू नका. एक दर्शक सर्वनाम असत, एक संबंधी सर्वनाम असतं आणि यांचा एकमेकांचा संबंध त्या सर्वनामातून आपल्याला स्पष्ट होतो.
प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनामाचे उदाहरण आहेत, “कोण” आणि “काय” आता हे शब्द ऐकून तुम्हाला वाटेल की, हे सर्वनाम आहेत का ? आपण प्रश्न विचारण्यासाठी हे शब्द वापरतो, पण ही सुद्धा सर्वनामच आहेत. कारण, ती कुठल्या ना कुठल्या, नामाबद्दल किंवा कुठल्या व्यक्तीच किंवा वस्तूचं वर्णन करण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे एक प्रकारे सर्वनामाच्या व्याख्येप्रमाणे हीसुद्धा सर्वनाम ठरतात.
प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या
“ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात”.
१) घरी कोण आहे ?
असा प्रश्न असेल, यात तुम्हाला आहे, नंतर प्रश्नचिन्ह आहे. हेही दिसते. त्यामुळे कोण हा शब्द प्रश्नासाठी वापरला गेलाय. आता घरी कोण आहे ? याचे उत्तर काहीतरी नाम असणार आणि त्या नामाबद्दल कोण हा शब्द वापरला गेलाय. त्यामुळे कोण हे इथे सर्वनाम आहे.
२) तुला काय हवे ?
याच्यामध्ये सुद्धा “काय” हा जो शब्द आहे, तो सर्वनाम आहे. कारण प्रश्न विचारण्यासाठी तो वापरला गेलेला आहे आणि याचं काहीतरी उत्तर आहे. त्याच्याबद्दल आता इथे आपण “काय” हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे “कोण” आणि “काय” ही सुद्धा प्रश्नार्थक सर्वनाम म्हणूनच ओळखली जातात.
आता “कोण” या सर्व नामाला विभक्ती, प्रत्यय लागून त्याचे वेगवेगळे रूप होतात. “कोणी” “कोणास” “कोणाचा” “कोणास” “कोणी” अशा प्रकारची जी रूप आहेत, ही सुद्धा सर्वनामच मानली जातात. म्हणजे मूळ सर्वनाम “कोण” आहे, पण त्याला विभक्ती प्रत्यय लागून, त्याची वेगवेगळी रुपे होतात, ही सगळी जी आहेत, ती प्रश्नार्थक सर्वनाम म्हणूनच ओळखली जातात.
अनिश्चित सर्वनाम \सामान्य सर्वनाम
अनिश्चित सर्वनाम याची उदाहरणे आहेत, “कोण” आणि “काय” तुम्ही म्हणाल, मगाशीच तर आपण बघितलं की ही, प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, तर बरोबर आहे. ही प्रश्नार्थक सर्वनाम पण आहेत, पण त्याचबरोबर ही अनिश्चित सर्वनाम सुध्दा आहेत. यातला फरक काय आहे ? ते आपण व्याख्याने समजावून घेऊया.
“कोण” आणि “काय” सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्याला “अनिश्चित सर्वनाम” असं म्हणतात. म्हणजे त्याच सर्वनामांचा जेव्हा वाक्यात काही वेगळा उपयोग होतो, क ते कुणाबद्दल आलेत, हे स्पष्ट होत नाही आणि प्रश्नही नसतो, तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. अनिश्चित सर्वनामास सामान्य सर्वनाम असं सुद्धा एक नाव आहे.
१) कोणी कोणास हसू नये.
या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय का ? तर नाही. प्रश्नचिन्ह ही नाही आहे किंवा त्या वाक्याचा उच्चार सुद्धा प्रश्नासारखा नाही आहे, तर कोणी कोणाच असू नये. असं सर्वसाधारण विधान केलेलं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की, इथे हे अनिश्चित सर्वनाम आहे. कारण हे कोणाबद्दल वापरले हे, ही सांगता येत नाही.
२) मी काय सांगतो आहे, ते नीट ऐका.
आता इथे सुद्धा काय हे सांगितलेलं नाहीये, तर सर्वसाधारण विधानांमध्ये ते, तो, शब्द आलेला आहे. म्हणजे इथे काय आणि कोणी कोणास ही सगळी सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहेत.
आत्मवाचक सर्वनाम
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा, स्वतः असा होतो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं, याला स्वतःवाचक सर्वनाम म्हणतात. आता आपण एक उदाहरण लक्षात घेऊन, हे जास्त समजून घेऊया.
आपण आणि स्वतः हि ह्याची उदाहरणे आहेत.
१) मी स्वतः त्याला पाहिले.
असं वाक्य असेल, आता इथे “मी” हे ही सर्वनाम आहे. “स्वतः” हे पण “मी” माझ्याबद्दलच म्हटलेलं आहे. म्हणजे हे स्वतः वाचक आहे आणि “त्याला पाहिले” तर या संपूर्ण वाक्यात, स्वतः हा शब्द माझ्यासाठीच वापरलेला आहे. स्वतः दर्शक आहे. त्यामुळे तो आत्मवाचक आहे.
२) तो आपणहून माझ्याकडे आला.
आता इथे आपण हा शब्द वापरलेला आहे इथे तो आपण होल म्हणजे तो स्वतःहून त्याच्या स्वतःसाठीच हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे इथे पण हे आत्मवाचक सर्वनाम आहे.
तुमच्या लक्षात आलं की, व्याख्या आणि सर्वनामाचे सगळे प्रकार. अगदी सविस्तरपणे अभ्यासले. पण त्याचवेळी तुमच्या लक्षात असेल की, सर्वनामांचे काही काही बारकावे शिकून घेणं जास्त आवश्यक आहे. म्हणजे अनिश्चित सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम यातला फरक काय आहे ?
तसेच आत्मवाचक सर्वनाम हे कधीकधी पुरुषवाचक सुद्धा असतं तर, ते कसं ओळखायचं ? अशा काही छोट्या छोट्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत.
प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित/सामान्य सर्वनाम यातला फरक
प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित/सामान्य सर्वनाम यातला फरक उदाहरणाद्वारे जाणून घेऊयात.
१) कोण आहेस रे तू ?
या वाक्यात आपल्या लक्षात येईल की, प्रश्नच विचारलेला आहे. प्रश्नचिन्ह हि दिलेलं आहे. इथे हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, हे आपल्याला अगदी स्पष्ट आहे.
२) तुला काय विचारलं ?
आता “काय” इथे सुद्धा प्रश्न विचारलाय, कारण प्रश्नचिन्ह पण दिसतंय आणि तुला काय विचारलं, असं आपण प्रश्न विचारला त्याच्यामुळे या दोन्ही मधली जी सर्वनाम आहेत, ही प्रश्नार्थक आहेत, हे आपल्यासमोर स्पष्ट झालं.
४) कोण आहेस तू माहीत नाही.
असं वाक्य आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की, हे वाक्य विधानासारखा आहे, की कोण आहेस तू माहीत नाही. कोण आहेस तू माहीत नाही असं विचारलं नाहीये, म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य नाही आहे किंवा तुमच्यासमोर लिखित मजकूर असेल तरी तुम्हाला कळेल की, विधानार्थी वाक्याच्या शेवटी जो पूर्णविराम असतो, तो दिलेला आहे, कि प्रश्नचिन्ह दिलेला आहे.
तुमच्या लक्षात येईल की विधान आहे. विधानार्थी वाक्यासारखा पूर्णविराम दिलेला आहे. आपोआपच त्या वाक्यात आलेल जे सर्वनाम आहे, हे निश्चितपणे अनिश्चित हे सर्वनाम आहे. कारण इथे प्रश्न विचारलेला नाही आहे.
५) तुला काय विचारणार आम्ही.
या ही वाक्यात तुमच्या लक्षात आलं की, हा प्रश्न नाही आहे. तर तुला मी काय विचारणार, असं सर्वसाधारण विधान केलंय. म्हणजे खरंतर तुला आम्ही काही विचारू शकत नाही. असंच आपल्याला सांगायचंय. त्यामुळे या वाक्यात सुद्धा “काय” हे अनिश्चित सर्वनाम म्हणून आलेल आहे.
आता जेव्हा तुम्ही या दोन्ही प्रकारच्या वाक्यांची तुलना कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, सर्वसाधारणपणे प्रश्न विचारला गेला तर ते “प्रश्नार्थक सर्वनाम” आणि प्रश्न विचारला नाही, फक्त उल्लेख केलेला असेल तर ते “अनिश्चित सर्वनाम”.
आत्मवाचक सर्वनाम हे कधीकधी पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा असत तर ते कस ?
आत्मवाचक सर्वनाम हे कधीकधी पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा असत, तर ते कसं ते आपण उदाहरणातून समजून घेऊया.
१) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.
मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली या वाक्यामध्ये आपण हे काय आहे, तर आपण पाहिलेलं आहे आपण आणि स्वतः आत्मवाचक आहेत. त्यामुळे आपण म्हणून हे आत्मवाचक आहे. पण आपण खात्री करून घेऊया की, हे नक्की आत्मवाचक आहे का ? कि पुरुषवाचक आहे.
समजा या वाक्यामध्ये आपण या शब्दाऐवजी आपण स्वतः हे टाकून पाहिलं तर, मी स्वतःहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. हे वाक्य योग्य वाटते का? तर वाटतंय. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली आणि मी स्वतःहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली, त्या वाक्याचा अर्थ एकच येतोय.
याचा अर्थ ते आत्मवाचक आहे, कारण स्वतः हा शब्द “आत्मवाचक” आहे किंवा “स्वतःवाचक” आहे त्यामुळे जेव्हा आपण या शब्दाच्या जागी स्वतः हा शब्द अगदी योग्यरीत्या बसतो. तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं.
मग ते पुरुषवाचक कधी असतं तर, त्याच्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया.
२) तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही.
असं वाक्य आपल्यासमोर आहे. आता इथे “आपण” हे आत्मवाचक आहे का ? की पुरुषवाचक आहे, आपण मगाशीच कसोटी वापरून, आपण या शब्दाच्या जागी आपण स्वतः शब्द टाकू. मग आता हे वाक्य कसं होईल, “तुझ्या सांगण्यावरून स्वतः त्याच्याशी भांडणार नाही” हे तुम्हाला ठीक वाटतंय का?
मी स्वतः असं म्हणायला हवं होतं. जसं तुझ्या सांगण्यावरून मी स्वतः त्याच्याशी भांडणार नाही, हे जास्त योग्य वाटते. म्हणजेच या वाक्यामध्ये फक्त स्वतः हा शब्द टाकला तर, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तर त्याच्या बरोबरीने अजून एक सर्वनाम वापरण्याची आवश्यकता भासते, याचाच अर्थ हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजे या वाक्यातलं “आपण” हे पुरुषवाचक आहे.
थोडक्यात सर्वनामांचे प्रकार
सर्वनाम म्हणजे काय – मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत. मी, तू , तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः.
पुरुषवाचक सर्वनामे | मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती, |
दर्शक सर्वनामे | हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या, ती, |
संबंधी सर्वनामे | जो, जी, जे, जे, ज्या, जी, |
सामान्य / अनिश्चित सर्वनामे | कोण, काय, |
आत्मवाचक सर्वनामे | आपण, स्वतः, |
सर्वनामा संबंधित काही उदाहरणे
सर्वनाम म्हणजे काय –
- सचिन क्रिकेट खेळतो त्याला लिटल मास्टर म्हणतात.
- ज्याने करावे त्याने भरावे.
- कोण ही गर्दी
- हा मुलगा हुशार आहे
- त्याने आपण होऊन चूक कबूल केली
- कोणी यावे कोणी जावे
FAQ
१. सर्वनामाची व्याख्या काय आहे?
सर्वनाम म्हणजे काय – नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला “सर्वनाम” असे म्हणतात.
२. सर्वनामांचे मुख्य 6 प्रकार कोणते आहेत?
पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
३. दर्शक सर्वनाम म्हणजे काय ?
“जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी, जे सर्वनाम येतं त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो”. तुम्हाला या नावावरून पण लक्षात येईल की दर्शक म्हणजे दाखवणार, याची उदाहरणे आहेत- “हा” “ही” “हे” “ह्या” “ही” किंवा “तो” “ती” “ते” “त्या” “ती” म्हणजेच त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आणि नाम हे दोन्ही उपस्थित असत, त्याच वेळेस त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात, हे तुमच्या लक्षात येईल. नाम आणि सर्वनाम हे जेव्हा एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करत असतात, त्यावेळेस सर्वनामाला “दर्शक सर्वनाम” असे म्हणतात.
४. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय ?
“ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात”.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सर्वनाम म्हणजे काय ? त्याचे प्रकार इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.