OMKARESHWAR JYOTIRLINGA | ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी – हे मध्यप्रदेश राज्यातील, खंडवा जिल्ह्यामध्ये, नर्मदा नदीच्या काठी आणि ओंकार बेटावर वसलेले भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे चौथे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा इतिहास आजूबाजूचा परिसर आणि पौराणिक कथा काय आहे? याची माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपणास देत आहोत.

Table of Contents

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील इंदूर शहरापासून सुमारे ७८ किमी अंतरावर नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. नर्मदा नदीच्या उत्तरेस वसलेले हे एकमेव मंदिर आहे. येथे नदीच्या दोन्ही तीरावर भगवान शिव वसलेले आहेत. महादेवाची येथे ममलेश्वर आणि अमलेश्वर म्हणून पूजा केली जाते.

मंदिराचे नाव – ओंकारेश्वर
स्थान – भगवान शंकर
ज्योतिर्लिंग चौथे
नदी – नर्मदा
बेट –ओंकार/ मांधाता/ शिवपुरी
स्थापना – दुसरे बाजीराव पेशवे
जिर्णोद्धार – अहिल्यादेवी होळकर
जिल्हा – खंडवा
राज्य – मध्य प्रदेश

ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास

मध्ययुगीन काळात मांधाता, ओंकार नगरावर तत्कालीन धारचे परमार, माळव्याचा सुलतान, सिंधिया यांसारख्या राज्यकर्त्यांनी राज्य केले. असे म्हणतात की ओंकारेश्वर बेटावर पूर्वी आदिवासी राहत होते. हे स्थान कालिका देवीचे होते. देवीचे भक्त भैरवगण या नावाने ओळखले जातात. ते यात्रेकरूंना फार त्रास देत असत. तसेच यात्रेकरूंचा बळीही दिला जाई. पुढे कालांतराने दरीयाईनाथ नावाच्या एका सिद्ध पुरुषांनी या ठिकाणी आपला आश्रम स्थापन केला व त्या भैरव गणांचा त्रास कमी करून त्यांना पाबंद घातला होता. तेव्हापासून पुन्हा या ठिकाणी यात्रेकरूंचे जाणे येणे सुरू झाले.

पुढे काही काळ येथे भिल्लांचेही राज्य होते. सन ११९५ मध्ये राजा भारत सिंग चौहान यांनी भिल्ल राज्य जिंकून ओंकार मांधाताच्या वैभवात भर घातली. या भारत सिंह चौहान राजाचा राजमहल आजही पडक्या अवस्थेत तेथे उभा आहे आणि त्याचे वंशज आजही स्वतःला राजा समजून या बेटावर ठाण मांडून आपला हक्क गाजवत आहेत. दुसरे बाजीराव पेशवे यांनी देखील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पेशव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देखील या पुरातन तीर्थक्षेत्री अनेक सुधारणा केल्या. अतिशय सुंदर व मोठे घाट बांधले व विशेष म्हणजे काटी लिंगार्चनाची पद्धत सुरू केली. यानंतर शेवटी १८९४ मध्ये हे मंदिर ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतले.

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

ओंकारेश्वर मंदिराचे स्थान

ओंकारेश्वर मंदिर माहिती

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

विंध्याचल पर्वतांच्या परिसरामध्ये मध्यप्रदेश राज्यात खांडवा नावाच्या जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठी मांधाता किंवा शिवपुरी नामक बेटावर भगवान शंकराचे भारतातील बारा ज्योतिर्लिंग पैकी चौथे असणारे असे हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वसलेले आहे. हे एक हिंदू मंदिर असून इंदूर पासून ७७ किलोमीटर आणि मोरटक्का गावापासून जवळपास १३ किलोमीटर अंतरावर हे ज्योतिर्लिंग पहावयास मिळते.या ठिकाणी नर्मदा नदीचे दोन भाग होऊन मांधाता किंवा शिवपुरी नावाचे बेट तयार होते. हे बेट जवळपास ४ किलोमीटर लांब आणि २ किलोमीटर रुंद आहे. या बेटाचा आकार हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेले “ॐ” च्या आकारामध्ये बनलेले आहे.

पुराणानुसार विंध्य पर्वताने पार्थिव लिंगाच्या रूपात भगवान शंकरांची पूजा केली होती आणि तपस्या ही केली होती. यामुळे भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर ते लिंगाच्या रूपात अवतरीत झाले. पुढे त्याचे विभाजन झाले आणि एका भागाला “ओंकारेश्वर”आणि दुसऱ्या भागाला “ममलेश्वर” असे नाव मिळाले. असे म्हटले जाते की, ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर येथे आहे आणि पार्थिवलिंग हे ममलेश्वर या ठिकाणी आहे.

ओंकारेश्वर नावाचा अर्थ

नर्मदा नदी काठी असलेल्या विशाल अशा मांधाता किंवा शिवपुरी किंवा ओंकार या बेटावर भगवान शंकराचे हे मंदिर स्थित आहे. या ठिकाणी असलेले हे बेट आणि नदीचा आकार हा “ओम” आकाराचा आहे. या ठिकाणी स्थिर असलेला ईश्वर म्हणजेच ओंकार + ईश्वर “ओंकारेश्वर” असे हे नाव पडले आहे.

ओंकारेश्वर नगर

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ ब्रह्मदेव आणि विष्णू यांनीही निवास केला होता असे सांगितले जाते. त्यामुळे नर्मदेचा हा किनारा ब्रह्मपुरी विष्णुपुरी आणि रुद्रपुरी म्हणून त्रिपुरी भाग बनला आहे. ब्रह्मपुरी मध्ये दक्षिणेला ब्रह्माचे मंदिर आहे. विष्णुपुरी येथे भगवान विष्णूचे मंदिर आहे. आणि रुद्र पुरी या ठिकाणी ओंकारेश्वर मंदिर आहे.

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

ओंकार मांधाता

माता नर्मदा नदी ही दोन प्रवाहात विभागली गेली आहे त्यामुळे या ठिकाणी जी बेटासारखी जागा तयार होते त्या बेटाला मांधाता पर्वत किंवा शिवपुरी असे म्हटले जाते. नर्मदेच्या तीरावर असलेल्या या बेटावर राजा माधांता ने प्रचंड तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. भगवान शंकर या ठिकाणी प्रकट झाल्यावर राजाने भगवान शंकरांनी याठिकाणी निवास करण्याचे वरदान मागितले होते, अशी पुराणा मध्ये कथा सांगितली आहे. आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राला “ओंकार मांधाता” म्हणून ओळखले जाऊ लागले.

या मंदिराची निर्मिती कोणी केली याबाबत काही अंदाज बांधता येत नाही परंतु आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार या मंदिराच्या बांधकामासाठी १०६३ मध्ये राजा उद्यादित्य यांनी चार दगड बसवले होते. यावर संस्कृत भाषेत स्तोत्र लिहिले आहेत. त्यानंतर ११९५ मध्ये राजा भारत सिंह चौहान यांनीही जागा पुन्हा बांधली दुसरे बाजीराव पेशवे यांनी जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या तीर्थ क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा केल्या असे सांगितले जाते. यानंतर मांधातावर सिंधी, माळवा, परमार यांचे राज्य होते. सन १८२४ मध्ये हा परिसर ब्रिटिश सरकारच्या ताब्यात देण्यात आला.

ओंकारेश्वर शिवलिंग

ओंकारेश्वर मंदिरात भगवान शंकराचे गोलाकार अंडाकृती शिवलिंग आहे. यावर सतत पाण्याचा प्रवाह असतो. येथील पुजारी या शिवलिंगाचा दिवसातून तीन वेळा दूध, दही आणि नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेक करतात. या शिवलिंगाच्या मागे माता-पार्वतीची प्रतिमा चांदीमध्ये बनवली आहे.

ओंकारेश्वर मंदिरातील अभिषेक

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी बंदी आहे. परंतु येथे येणाऱ्या भाविकांना अभिषेक करण्यासाठी मंदिरामध्ये अभिषेक हॉल बांधलेला आहे. मंदिरातील पुजारी अभिषेक व पूजा या ठिकाणी करतात. या अभिषेकासाठी आपण ऑनलाइन बुकिंग देखील करू शकतो.

ओंकारेश्वर मंदिराचा परिसर

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची इमारत ही पाच मजली असून पहिल्या मजल्यावर महाकालेश्वर, तिसऱ्या मजल्यावर सिद्धनाथ महादेव, चौथ्या मजल्यावर मुक्तेश्वर महादेव आणि पाचव्या मजल्यावर राजेश्वर महादेवांचे मंदिर आहे.या मंदिराच्या सभा मंडपामध्ये १५ फूट उंचीचे ६० मोठे खांब आहेत. याच आवारात यात्रेकरूंसाठी नाममात्र शुल्का मध्ये भोजन उपलब्ध केले जाते. या आवारात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ट्रस्टचे कार्यालय असून ते सर्व व्यवस्था करते.

ओंकारेश्वर मंदिराचे महत्व

ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या सर्वात पवित्र आणि शक्तिशाली ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे भगवान शंकराचे प्रतिकात्मक रूप म्हणजेच ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगांची पूजा केल्याने सगळी पापे घेऊन जातात आणि भगवान शंकराचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असेही म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाचा अर्धा भाग ओंकारेश्वर मंदिरात आणि अर्धा भाग ममलेश्वर मंदिरात आहे.

ओंकारेश्वर मधील नर्मदा नदी

विंध्याचल पर्वतांच्या परिसरात मध्य प्रदेशातून लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन जाते तिची विपुल जलराशी धीर गंभीरपणे वाहत भूतलाचे पापांचे हरण करते. डोंगरदर्‍यातून खळाळत वाहणाऱ्या नर्मदेला “रेवा” देखील म्हणतात. धारेतील गोल गुळगुळीत दगडांना “बाणलिंग” म्हणतात. नर्मदेतील प्रत्येक दगड हा प्रत्यक्ष शंकरच आहे अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नर्मदा नदीला “शांकरी नदी” असेही म्हटले जाते.

नर्मदेच्या किनाऱ्याचे हिरवे मजबूत खडक, त्यांची उतरंड व त्या उतरंडीवरची घरे, तेथील मंदिरे, वाहत्या जलधारेतील कोटी तीर्थ व चौतीर्थ हे दोन डोह पाहण्यासारखे आहेत. या दोन्ही डोहांमध्ये मोठे मासे तर दिसतातच पण भयानक मगरींचेही तिथे वास्तव्य आहे.नर्मदा नदी ही भारतातील सर्वात पवित्र समजली जाणारी अशी नदी आहे. या ठिकाणी ६८ तीर्थे आहेत याशिवाय दोन ज्योती स्वरूप लिंगासह १०८ प्रभावशाली लिंगे आहेत. मध्य प्रदेशांमध्ये एकूण दोन ज्योतिर्लिंगे आहेत एक महाकालेश्वर नावाचे उज्जैन मध्ये आहे तर दुसरे ओंकारेश्वर असे आहे.

ओंकारेश्वर मधील बंद केलेल्या धर्माबाबत कुप्रथा

फार पूर्वी ओंकारेश्वर मंदिरामध्ये एक भयंकर अशी परंपरा होती ती आता संपुष्टात आलेली आहे. या मांधाता डोंगरावर एक उंच टेकडी आहे याच्या संदर्भात एक अशी कूप्रथा होती की, जो कोणी या टेकडीवरून उडी मारून नर्मदेत आपले प्राण घालवतो त्याला मोक्ष प्राप्ती होते या कुप्रथेमुळे अनेक लोक या टेकडीवरून नर्मदा नदीत उडी मारून मरत असत. ही प्रथा मृगुपतन म्हणून ओळखली जात असे. सती प्रथेप्रमाणे या प्रथेवरही ब्रिटिश सरकारने सन १८२४ मध्ये बंदी घातली.

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR

ओंकारेश्वर मंदिराची वास्तूकला

मांधाता, शिवपुरी किंवा ओंकार बेटावर भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे असे हे ओंकारेश्वर मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. येथील परिसर हा वृक्षवेलींनी नटलेला आहे. या ठिकाणच्या झाडांवर माकडांचे मर्कट चाळे चालू असतात. तसेच पक्षांची कोलाहल देखील ऐकू येत असते. या ठिकाणी मंदिरांची शिखरे झळाळत असताना दिसून येतात. या मंदिरा बाबत निश्चित माहिती देता येत नसली तरी जुन्या बांधकाम शैली मध्ये बनवलेल्या लहान मंदिरासारखे याचे गर्भगृह दिसून येते. या मंदिराचा घुमट दगडांचा थर रचून बांधण्यात आला आहे.

दुसरे बाजीराव पेशवे यांनी जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक सुधारणा केल्या. या मंदिराच्या उत्तरेकडील काही भाग हा नवीन बांधकाम शैलीत बांधला गेल्याचे दिसून येते. त्यामुळे गर्भगृह आणि मुख्य देवता हे मुख्य दरवाजासमोर येत नाहीत. तसेच नवीन बांधकामाच्या शिखराच्या अगदी खाली देखील दिसून येत नाहीत.या मंदिराची इमारत ही पाच मजली असून प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या देवता आहेत.

या मंदिरामध्ये एक विशाल असा सभामंडप आहे. जवळपास १४ फूट उंच आणि ६० विशाल खांबांवर आधारित असा आहे.

ओंकारेश्वर मंदिरातील महाशिवरात्र

महाशिवरात्रीच्या दिवशी देवाला २५१ किलोग्रॅम पेढे अर्पण केले जातात. या दिवशी संपूर्ण भारतभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिरात आणि प्रशासना व्यतिरिक्त इतर संस्था देखील या ठिकाणी मदत कार्य करतात. येणारे भाविक महाशिवरात्रीला नर्मदा नदीमध्ये स्नान करतात त्यानंतर भगवान ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ओंकार पर्वताची म्हणजेच शिवपुरी किंवा मांधाता बेटाची प्रदक्षिणा घालतात.या दिवशी ओंकारेश्वर आणि मंगलेश्वर ही ज्योतिर्लिंगे येणाऱ्या भाविकांसाठी पहाटे चार वाजता उघडली जातात.

या दिवशी येणाऱ्या भाविकांना २४ तास देवाचे दर्शन आणि मूळ लिंगावर अभिषेक करण्याची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर दिवसभर पूजा अर्चेचा कार्यक्रमही चालू असतो. महाशिवरात्रीच्या आधी दोन ते तीन दिवस अगोदर भाविकांची रेलचेल चालू होते. येथे येणाऱ्या भाविकांना साबुदाण्याची खिचडी तसेच शिंगाड्याच्या पिठाचा हलवा करून प्रसादाचे वाटप करण्यात येते. या दिवशी या मंदिरामध्ये पूजा आराधना, रुद्राभिषेक केल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात असे देखील येथील भाविकांचा समज आहे.

ओंकारेश्वर मंदिरातील नियम

  • ज्या भाविकांनी कोणत्याही सेवेसाठी ऑनलाइन बुकिंग केले आहे त्यांनी तिकिटाची छापील प्रत आणि फोटो ओळखपत्रासहित मंदिराच्या काउंटरवर जमा करून त्यांना तशी कल्पना द्यावी लागते.
  • मंदिरातील कोणत्याही सेवेसाठी तुम्ही बुकिंग केले असल्यास त्या सेवेमध्ये जास्तीत जास्त दोन लोक सहभागी होऊ शकतात.
  • या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्याला शोभेल असे कपडे परिधान करून येणे आवश्यक आहे यासाठी ठराविक ड्रेस कोड लागू नाही.
  • कोरोनाच्या आपत्तीमुळे या ठिकाणी गर्भगृहामध्ये दर्शनासाठी तसेच पूजेसाठी परवानगी मिळत नाही.
  • मंदिर उघडण्याच्या तसेच बंद होण्याच्या आणि दर्शनाच्या वेळेनुसार आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा.या मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ५.०० पासून रात्री ८ पर्यंत असून भाविकांनी बुक केलेले तिकीट हे त्या संपूर्ण दिवसासाठी असते. त्यामुळे त्या संपूर्ण दिवसभरात कधीही एकदा दर्शनासाठी त्या तिकिटाचा वापर करू शकता.
  • बारा वर्षाखालील मुलांना मंदिरामध्ये एकट्याने प्रवेश दिला जात नाही.

ओंकारेश्वर मंदिरातील रहस्य

ज्याप्रमाणे मध्य प्रदेश उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भस्म आरती प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ओंकारेश्वर मंदिराची शयन आरती देखील प्रसिद्ध आहे. परंतु ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भगवान शंकराची आरती पहाटे, मध्यरात्री आणि सायंकाळी तीन वाजता केली जाते. असे मानले जाते की, भगवान शंकर दररोज झोपण्यासाठी या ठिकाणी येतात. तसेच असेही मानले जाते की या मंदिरामध्ये भगवान शंकर माता पार्वती सोबत चौसर खेळतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी चौसर पसरलेले दिसून येतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये सकाळी चौसर आणि त्याचे फासे अशा पद्धतीने विखुरलेले आढळतात की जणू कोणीतरी खेळला असावा.

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR

ओंकारेश्वर मंदिराबाबत काही गोष्टी

  • भारतामधील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग मधील ओंकारेश्वर हे चौथे ज्योतिर्लिंग आहे.
  • हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या काठावर मांधाता किंवा शिवपुरी किंवा ओंकार बेटावर वसलेले आहे.
  • हे ज्योतिर्लिंग ममलेश्वर किंवा अमलेश्वर या नावाने देखील ओळखले जाते.
  • धार्मिक ग्रंथानुसार या ठिकाणी ६८ तीर्थक्षेत्रे आहेत तसेच ३३ कोटी देवता आपल्या कुटुंबासह या ठिकाणी राहतात.
  • ज्या बेटावर हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे, त्याचा आकार हा हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या ओम सारखा आहे म्हणून या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर हे नाव पडले.
  • येथे येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की देशातील संपूर्ण यात्रा केल्या परंतु ओंकारेश्वर मध्ये येऊन या ठिकाणी आपण जर जल अर्पण करत नाही तोपर्यंत आपण केलेली तीर्थयात्रा ही अपूर्ण समजली जाते.
  • यमुना आणि गंगा नदीमध्ये स्नान केल्यामुळे जे पुण्य मिळते तेच पुण्य फक्त नर्मदा नदीच्या दर्शनाने मिळते अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.

ओंकारेश्वर मंदिरामधिल पूजा

या मंदिरामध्ये साधारणपणे दररोज नियमितपणे तीन वेळा पूजा केली जाते. सकाळची पूजा ही त्या मंदिराच्या ट्रस्ट द्वारे केली जाते. तसेच दुपारची पूजा सिंधिया घराण्याचे पुजारी करतात. आणि संध्याकाळची पूजा होळकर संस्थांचे पुजारी करतात. हे मंदिरे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे या मंदिरामध्ये नेहमी भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी येणारे भावीक नर्मदेमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर नर्मदेचे पाणी, फुले, नारळ आणि इतर साहित्याने भरलेले पात्र घेऊन देवाची पूजा करायला येतात. या ठिकाणी साजरा होणाऱ्या जत्रांमध्ये मोठी गर्दी जमलेली असते.

भगवान ओंकारेश्वराची तीन तोंडी सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती एका सुंदर पालखी विराजमान केली जाते. आणि तेथील पुजारी आणि भाविक ढोल वाजवत यांची दर सोमवारी मिरवणूक काढतात. ज्याला आपण पालखी असे म्हणतो. म्हणूनच ही मिरवणूक पालखी सोमवार सावरी म्हणून ओळखली जाते.

ओंकारेश्वर मंदिरातील दर्शनाची वेळ

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे अशा या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये नित्यनेमाने पूजा पाठ केला जातो.

  • सकाळी- ४.३० – ५.०० मंगल आरती आणि नैवेद्य भोग
  • सकाळी – ५.०० – दुपारी १२.२० देवाचे शुभ दर्शन
  • दुपारी – १२.२० – दुपारी १.१५ मध्यान्ह भोग
  • दुपारी- १.१५ – ४.१५ देवाचे चे मध्यान्ह दर्शन
  • संध्याकाळी- ४.०० – ४.१५ देवाला सजवणे
  • संध्याकाळी- ४.१५ – रात्री ८.०० शृंगार दर्शन
  • रात्री – ८.३० – ९.०० आरती
  • रात्री- ९.०० – ९.३० शयन शृंगार आणि पलंगाचे दर्शन
  • मंदिर परिसरामध्ये एक विशेष दर्शनासाठी दरवाजा बनवला गेला आहे तेथील काउंटरवर जाऊन पावती घेऊन या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.
  • या ठिकाणी होणाऱ्या विशेष उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या पूजा विधी आणि दर्शनाच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतो.
  • बेलपत्र, फुल, नारळ यासारखे पूजेचे साहित्य गर्भगृहामध्ये घेऊन जाता येत नाही.

ओंकारेश्वर मंदिरातील पूजा व सेवा

  • महारुद्राभिषेक – ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदाचे पठण करून हा अभिषेक लिंगासमोर केला जातो.
  • नर्मदा आरती – नर्मदा नदीच्या काठावर दररोज संध्याकाळी जी महाआरती होते तिला नर्मदा आरती असे म्हणतात. ती पाहण्यासारखे आणि ऐकण्यासारखी असते.
  • लघु रुद्राभिषेक – आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी हा लघु रुद्राभिषेक केला जातो असा भाविकांचा विश्वास आहे.
  • मुंडन – या ठिकाणी मंदिराच्या आवारात किंवा नदीकाठी ही येणारे भाविक मुंडन करतात.

ओंकारेश्वर मंदिरातील नर्मदाआरती

नर्मदा नदीच्या कोटीतीर्थ घाटावर माता नर्मदेची दररोज संध्याकाळी आरती केली जाते. या आरतीमध्ये तेथील भक्तगण आणि संपूर्ण भारतभरातील येणारे भाविक सुद्धा सहभागी होऊन त्याचा लाभ घेऊ शकता. आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी ही आरती केली जाते. भाविकांना यासाठी अशी आरती स्वतःच्या वतीने करून घ्यायची असेल तर त्याची काही ठराविक रक्कम मंदिराच्या कार्यालयात जमा करावी लागते.

नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर घाट

नर्मदा नदीच्या काठावर अनेक घाट बांधले गेले आहेत. या नदीचा प्रवाह हा स्थिर असून या ठिकाणी पाणी अतिशय शुद्ध असे आहे. या घाटांवर नदीची खोली फारशी नसल्यामुळे येणारे भावीक या ठिकाणी सहज स्नान करू शकतात.भाविकांनी खोल पाण्यामध्ये जाऊ नये यासाठी या ठिकाणी लोखंडी जाळ्या तसेच कॅच चेन लावण्यात आलेले आहेत. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बोटची देखील व्यवस्था केली गेली आहे. मुख्य मंदिराच्या समोर असलेला कोटी तीर्थघाट हा सर्व घाटांपैकी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी स्नान केल्यामुळे करोडो तीर्थक्षेत्रांचे पुण्य लाभते असे समजले जाते.

ओंकारेश्वर मधील इतर महत्त्वाचे घाट

  • ब्रह्मपुरी घाट
  • केवल राम घाट
  • संगम घाट
  • अभय घाट
  • गायमुख घाट
  • चकार तीर्थ घाट
  • भैरोंचा घाट
OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR

ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क

ओंकारेश्वर मंदिराला वर्षांमध्ये तुम्ही कोणत्याही वेळी भेट देऊ शकता. या ठिकाणी पावसाचे हे सरासरी प्रमाण असते तसेच उन्हाळ्यामध्ये सुद्धा फार उष्णता नसल्यामुळे या ठिकाणी तुम्ही वर्षभरामध्ये केव्हाही येऊ शकता. परंतु ऑक्टोबर ते मार्च हा ओंकारेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे असे समजले जाते.या मंदिराला भेट देण्यासाठी दर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो परंतु आपल्याला विशेष दर्शन घ्यायचे असेल तर त्या मंदिराच्या काउंटरवर आपल्याला विशेष पास दिला जातो या पास ची २५० ते ५०० पर्यंतची रक्कम आकारली जाते.

ओंकारेश्वर मंदिर कोठे आहे? आणि कसे जायचे?

मध्यप्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठी शिवपुरी, ओंकार बेटावर भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे ओंकारेश्वर मंदिर आहे.मध्यप्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठावर वसलेले हे ओंकारेश्वर मंदिरामध्ये येण्यासाठी आपल्या बजेटनुसार विमान, ट्रेन किंवा बस द्वारे येऊ शकता.

विमान – मध्यप्रदेश राज्यामध्ये इंदोर या ठिकाणी देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे जे ओंकारेश्वर मंदिरापासून ८५ किलोमीटरच्या अंतरावर आहे तेथून ओंकारेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे २ तास ३० मिनिटांचा वेळ लागतो. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बस किंवा कॅबने येऊ शकता. दुसरे सर्वात जवळचे विमानतळ हे भोपाळ मधील राजा भोज विमानतळ आहे जे या मंदिरापासून जवळपास २६४ किलोमीटर अंतरावर आहे.

ट्रेन – सर्वात जवळचे असणारे ओंकारेश्वर रेल्वे स्टेशन हे जवळपास १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्ही कॅब ने येऊ शकता.

बस – ओंकारेश्वर मंदिरापासून सर्वात जवळचे मोरटक्का हे बस स्टॅन्ड जवळपास १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणाहून मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्ही ऑटो, बस किंवा कॅब ने येऊ शकता.

  • मुंबई ते ओंकारेश्वर मंदिर ५८० किलोमीटर
  • नागपूर ते ओंकारेश्वर मंदिर ४१७ किलोमीटर
  • पुणे ते ओंकारेश्वर मंदिर ५८६ किलोमीटर
  • खंडवा ते ओंकारेश्वर मंदिर ७० किलोमीटर
  • उज्जैन ते ओंकारेश्वर मंदिर १३९ किलोमीटर
  • इंदूर ते ओंकारेश्वर मंदिर ८१ किलोमीटर

ओंकारेश्वर मंदिराजवळील इतर मंदिरे आणि पर्यटन स्थळे

  • १. अन्नपूर्णा मंदिर – या मंदिरामध्ये माता पार्वती, माता सरस्वती आणि माता लक्ष्मीची तिन्ही रूपे विराजमान आहेत. यामध्ये भगवान विष्णूंची देखील ३५ फूट उंचीची मूर्ती स्थापित आहे. हे येथील आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.
  • २. विष्णू मंदिर – ओंकारेश्वरच्या प्राचीन मंदिरांपैकी हे एक महत्त्वपूर्ण मंदिर आहे. या ठिकाणी भगवान विष्णूंची विशाल अशी मूर्ती स्थापन केलेली आहे.
  • ३. गजानन महाराज मंदिर – हे मंदिर संगमरवरी दगडांनी बांधले गेले आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे मंदिर आहे.
  • ४. गोविंदेश्वर मंदिर आणि गुहा – हे मंदिर ओंकारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्या ठिकाणाला श्रीगोविंदेश्वर मंदिर असे म्हणतात आणि ज्या ठिकाणी त्यांचे गुरु गोविंद भगवदपाद यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती त्या स्थानाला गोविंदेश्वर गुफा असे म्हणतात.
  • ५. महाकालेश्वर मंदिर – ओंकारेश्वर मंदिराच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे महाकालेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरातही येणारे भाविक भक्तिभावाने प्रार्थना करतात आणि दर्शन घेतात.
  • ६. बृहदेश्वर मंदिर – अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या या मंदिरामध्ये २४ अवतारांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. हे मंदिर ममलेश्वर मंदिराजवळ आहे.
  • ७. ममलेश्वर मंदिर – नर्मदेच्या दक्षिण तीरावर वसलेले ममलेश्वराचे मंदिर अमलेश्वर या नावाने देखील प्रसिद्ध आहे. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे.
  • ८. पंचमुखी गणेश मंदिर – ओंकारेश्वराच्या मुख्य मंदिरासमोर हे पंचमुखी गणेशाचे मंदिर आहे. या मूर्तीला उजवीकडे दोन, डावीकडे दोन आणि पुढच्या बाजूला एक अशी पाच मुखे आहेत.
  • ९. ममलेश्वर सेतू – ओंकारेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी झुलता फुल हे खास आकर्षण आहे. हा पूल २३५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. तो थेट मुख्य मंदिराच्या दरवाजापर्यंत पोहोचतो. या पुलावरून नर्मदा नदीचे ओंकारेश्वर धरण आणि मंदिराचे विहंगम दृश्य दिसते.
  • १०. ओंकारेश्वर धरण- नर्मदा घाटात बांधल्या गेलेल्या ३० घाटांपैकी हे एक मुख्य धरण आहे. नदीच्या किनारी भागात आहे. या धरणातून मध्य प्रदेशात वीज पुरवली जाते. या धरणातून जवळपास ५३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्यावर अन्नधान्य आणि इतर पिके ही घेतली गेल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे ९५० मीटर ला पाणी आणि ३० मीटर उंच असे हे काँक्रीटचे धरण असून त्याची वीज निर्मिती क्षमता ५२० मेगा वॅट आहे.
  • ११. इंदिरा सागर धरण – मध्यप्रदेश राज्यातील नर्मदा नदीवर असलेला हा एक महत्त्वाचा धरणाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
  • १२. काजल राणी गुफा –ओंकारेश्वर मंदिरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेले काजल राणी गुहा फोटोग्राफर आणि निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे.
  • १३. सिद्धनाथ मंदिर – स्थापत्य कलेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे सिद्धनाथ मंदिर ओंकार मांधाता मंदिराशेजारी आहे मंदिराच्या खांबांवरील आणि भिंतीवरील नक्षीकाम अद्वितीय अशी वास्तू कला दर्शवते.
  • १४. केदारेश्वर मंदिर- ओंकारेश्वर मंदिरापासून अवघ्या ४ किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असणारे केदारेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेमुळे या मंदिराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे

ओंकारेश्वर मंदिराची प्रदक्षिणा

या मंदिरामध्ये येणारे भावी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच पापा पासून मुक्ती करून घेण्यासाठी नर्मदेचे पाणी घेऊन ओंकारेश्वर आणि मांधाता पर्वताची पूर्ण प्रदक्षिणा करतात. ही प्रदक्षिणा सुमारे ७ किलोमीटर आहे ही प्रदक्षिणा करताना या मार्गांमध्ये अनेक मंदिरे आणि पुरातन स्मारके दिसून येतात ती खालील प्रमाणे-

  • १. गौरी सोमनाथ मंदिर – अतिशय सुंदर अशा वास्तु शिल्पामध्ये कोरलेल्या या मंदिरामध्ये जवळपास ६ फूट उंचीचे मोठे शिवलिंग आहे. हे शिवलिंग खूप जुने असून या मंदिराच्या बाहेर काळा पाषाणाची नंदीची मूर्ती देखील दिसून येते.
  • २. सिद्धनाथ मंदिर – स्थापत्य कलेच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते.
  • ३. कर्जमुक्तेश्वर मंदिर – नर्मदेच्या काठावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. या मंदिरामध्ये येणारा जो भावीक हरभरा डाळ भक्तीभावाने अर्पण करतो तो पापासून मुक्त होतो असे समजले जाते.
  • ४. चंद्र सूर्य आणि भीम अर्जुन द्वार – नर्मदा आणि मांधाता पर्वताला प्रदक्षिणा घालताना या मार्गामध्ये येणारे प्राचीन वास्तूचे अवशेष आहेत असे वाटते.
  • ५. आशापुरी देवी मंदिर – या मंदिरातील देवीची मूर्ती ही अतिशय सुंदर अशी कोरली गेलेली आहे. या ठिकाणी या देवीची नियमितपणे पूजा केली जाते.
OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR
OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR

ओंकारेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स

ओंकारेश्वर मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे भावीक भारतभरातून ओंकारेश्वराच्या दर्शनाला अनेक भाविक येत असतात. या मंदिराच्या ट्रस्टमार्फत ओंकार विश्रामगृह या ठिकाणी कमी शुल्क मध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी अनेक मोठी हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. ती खालीलप्रमाणे –

  • हॉटेल ओंकार रेस्टॉरंट
  • श्री बालाजी हॉटेल
  • हॉटेल धर्मपुरी
  • विजयालक्ष्मी फॅमिली गेस्ट हाऊस
  • हॉटेल एलजी
  • रामसिल्वर स्काय लक्झरी रूम्स अँड सुट्स
  • हॉटेल शिवसाई रेसिडेन्सी
  • आर के लॉज

ऑनलाइन हॉटेल बूकिंग

ओंकारेश्वर मंदिर जवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ मधील जेवण अतिशय प्रसिद्ध आहे या ठिकाणी स्ट्रीट फूड ला ही अधिक पसंती दिली जाते. ही महाराजांची राजांची भूमी असल्यामुळे या ठिकाणी प्रसिद्ध भारतीय मसाले आणि भरपूर तेल वापरून खाद्यपदार्थ तयार केले जातात. मध्य प्रदेशातील काही प्रसिद्ध पदार्थ खालील प्रमाणे –

  • जिलेबी
  • डाळ बाफला
  • पालक पुरी
  • कॉर्न किस
  • मालपुवा
  • सीख कबाब
  • मावा बाटी
  • वाटाणा पुलाव
  • भोपाली गोश्त कोरमा
  • इंदूरी पोहे

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कथा

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.

पहिली कथा

या कथेनुसार विंध्य पर्वताला आपल्या रूपाचा ताकतीचा फार गर्व झाला होता. तेव्हा नारदांना आपल्या रूपाच्या, ताकतीच्या गोष्टी अभिमानाने सांगू लागला त्याच्या या गोष्टीं नारद मुनींना आवडल्या नाही. तेव्हा नारद यांनी पर्वताला सांगितले की तुझ्याकडे सर्व काही आहे पण मेरू पर्वत तुझ्यापेक्षा खूप उंच आहे.

हे ऐकून त्या पर्वताला वाईट वाटले. विंध्य पर्वत भगवान शंकराच्या आश्रयाला गेला आणि त्या ठिकाणी पोचल्यावर त्यांनी मातीच्या शिवलिंगाची स्थापना करून सहा महिने पूजा केली यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पर्वताला स्वतःचे दिव्य रूप दाखवले ज्याचे दर्शन मोठ्या योगीना ही होत नाही. विंध्य पर्वताला त्याचे इच्छित काम पूर्ण करण्यासाठी वर दिला परंतु याचा कोणालाही त्रास होणार नाही असे वचनही भगवान शंकराने त्यांच्याकडून घेतले परंतु विंध्य पर्वताने भगवान शंकरांनी दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग केला आणि आपली उंची वाढवण्यासाठी सुरुवात केली त्यामुळे सूर्य चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास अडथळे येऊ लागले. या त्रासाने कंटाळून सर्व देवीदेवता अगस्त ऋषींकडे मदतीसाठी गेले अगस्त ऋषी हे विंध्य पर्वताचे गुरु होते.

देवी देवतांचे म्हणणे एकूण अगस्त्य ऋषी आपल्या पत्नीसह विंद्य पर्वतावर गेले आणि त्यांनी पर्वताला सांगितले की त्याला तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे जायचे आहे म्हणून त्यांनी आपली उंची कमी करावी तसेच आपण परत येईपर्यंत त्यांनी उंची वाढ होऊ नये असेही सांगितले. परंतु अगस्ती ऋषी कधीही परतलेच नाही त्यामुळे विंध्य बरोबर अजूनही तसाच आहे.

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR INFORMATION IN MARATHI : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी

दुसरी कथा

ही राजा माधांता याच्याशी संबंधित आहे इश्वाकू वंशात युवनाश्‍व नावाचा राजा होता तो बराच काळ निपुत्रिक असल्याने त्यांनी आपले राज्य मंत्र्यांच्या हाती दिले आणि तो तपश्चर्येसाठी वनात गेला. तपश्चर्या करत असताना एके रात्री त्याला खूप तहान लागली. पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकायला लागला भटकत असताना ते ऋषी चवन यांच्या आश्रमाकडे पोहोचले तेथे त्यांनी कुपात ठेवलेले पाणी पाहिले आणि ते पाणी तो प्याला.

हे पाणी कृषी चवन यांनी राजा युवनाश्र्व ला पुत्रप्राप्तीसाठी ठेवले होते. ऋषी चवन यांनी राजाला सांगितले की हे पाणी तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठीच मागवले होते. हे पाणी प्यायल्यामुळे पराकोटीचा आणि तपश्चर्येचा देव पुत्र जन्माला येईल असा संकल्प करून जलविधी करण्यात आला यामुळे तुला इंद्रासारखे तेजस्वी बालक तुझ्या पोटी जन्माला येईल. शंभर वर्षानंतर राजा युवनश्र्व च्या पोटाचा डावा भाग फाडून तेजस्वी बालकाचा जन्म झाला देवराज इंद्र त्या तेजस्वी बालकाला भेटायला गेले हाच तो पुढे जाऊन राजा माधांता नावाने प्रसिद्ध झाला.

एकदा बारा वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे राजा मांधाताने इंद्राच्या दर्शनाने त्याच्या राज्याच्या शेती वाढण्यासाठी जबरदस्तीने पाऊस पाडला. मांधाताने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अमरकंटक येथे शंभर यज्ञविधी केले आणि भगवान शंकराची स्तुती करू लागला तू जगाचा उत्पत्ती करता आहेस, काळाच्या गरज गतीचा प्रवर्तक आहेस, जगाचे रूप आहेस, आणि जगाचा संहार करणारा आहेस. आपल्या दृष्टीद्वारे कृतज्ञता करावी ओंकाराच्या रूपात महादेव मांधाता ची स्तुती ऐकून भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले हे राजा, मी तुला प्रसन्न झालो आहे तेव्हा राजा मांधाता भगवान शिवाला म्हणाले, हे भगवान हे स्थान मांधाताचे नाव घेऊ दे आणि तुमच्या प्रसादाने ते पूजास्थान बनवू दे. येथे दान,तपस्या, उपासना इत्यादी करणाऱ्या व्यक्ती निवासी होतात तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र ओंकार मांधाता म्हणून ओळखले जाऊ लागले.

तिसरी कथा

या कथेनुसार प्राचीन काळी दानवांनी देवांना युद्धात हरवले होते. त्यामुळे इंद्राधिदेव चिंतित होते. जिंकल्यामुळे दानव उन्नत झाले व त्यांनी तिन्ही लोकांत गोंधळ घातला होता. देवतांना पुन्हा बल प्राप्त व्हावे म्हणून महादेवाने दिव्य ज्योतिर्लिंग ओंकार रूप धारण केले. समस्त देवांनी दर्शवलिंगाची स्थापना केली व त्याचे पूजन केली. त्याच्या प्रभावाने देवांना पुन्हा बल प्राप्त झाले. त्यांनी युद्धामध्ये दानवांचा पुन्हा नाश केला व आपले गेलेले स्वर्गाचे राज्य पुन्हा प्राप्त केले.

ओंकारेश्वर मंत्र

कावेरिका नार्मद्यो: पवित्र समागमे सज्जन तारणाय |
सदैव मंधातत्रपुरे वसंतम,ओमकारमीशम् शिवयेकमीडे ||

अर्थ –

नर्मदा आणि कावेरी नदीच्या पवित्र संगमावर माधांता बेटावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा सदैव वास आहे. आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी कल्याणासाठी आपण या मंत्राचा जप करू शकतो.

ओंकारेश्वर मंदिरामध्ये राबवले जाणारे उत्सव

सर्व धार्मिक स्थळाप्रमाणे ओंकारेश्वर या ठिकाणीही वेगवेगळे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. यापैकी दोन विशेष सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

  • १. कार्तिक उत्सव – कार्तिक महिन्यामध्ये हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो.यादरम्याने पंचक्रोशी मध्ये यात्रा देखील आयोजित केली जाते. शुक्ल पक्षाच्या एकादशीला गोमू घाटापासून ही यात्रा सुरू होते सनवाद आणि बडवाह या मार्गे जाऊन पौर्णिमेच्या दिवशी ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन समाप्त होते.संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने भावी या ठिकाणी येऊन मुक्काम करतात.
  • २. सोमवती अमावस्या – सोमवती अमावास्येच्या दिवशी नर्मदेमध्ये स्नान करून पूजा करणे हे अतिशय शुभ असे समजले जाते. त्यामुळे या दिवशी भाविकांची संख्या अधिक दिसून येते. या ठिकाणी या दिवशी विशेष पूजा आणि सेवा भक्ती भावाने केली जाते.
  • ३. महाशिवरात्र – फाल्गुन महिन्यात शिवाची महान रात्र समजली जाणारी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जाते. पुराण कथेनुसार भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा या ठिकाणी या दिवशी विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान शंकराच्या प्रत्येक मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाण्याला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. या दिवशी या मंदिरामध्ये विशेष पूजा करून प्रसादाचे वाटप केले जाते.
  • ४. नर्मदा जयंती – ही जयंती माघ महिन्यांमध्ये साजरी केली जाते. हे मंदिर नर्मदा नदीच्या काठी वसलेले असल्यामुळे हा उत्सव नर्मदा नदीला समर्पित केला जातो. दुपारी १२ वाजता ही जयंती साजरी केली जाते. त्यानंतर संपूर्ण बेट दिव्यांनी सजवला जातो. त्यानंतर नर्मदा मातेची आरती करून फटाक्यांची आतशबाजी केली जाते. या दिवशी मोठा असा भंडारा आयोजित करण्यात येतो. येणाऱ्या हजारो भावीकांना या भंडार्याचा आस्वाद घेता येतो.
  • ५. भूतनी अमावास्या – ही अमावस्या वर्षातून दोनदा येते. एकदा अश्विन महिन्यात आणि दुसऱ्यांदा चैत्र महिन्यात येते. या निमित्ताने या दिवशी नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी संपूर्ण भारतभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.

ओंकारेश्वर मंदिरातर्फे राबवले जाणारे उपक्रम

या मंदिराच्या ट्रस्ट मार्फत आणि सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येते. यासाठी कर्मचाऱ्यांचा एक गट सतत कार्यरत असतो. मंदिरा तर्फे करण्यात येणाऱ्या काही प्रमुख कामांचा आढावा खालील प्रमाणे-

अन्नछत्र

या मंदिरातील ट्रस्ट मार्फत अन्नछत्र चालवले जाते. यामध्ये संपूर्ण भारतभरातून येणाऱ्या भाविकांना कमी शुल्का मध्ये भोजन दिले जाते. या मंदिराच्या ट्रस्ट ने “श्री ओंकार प्रसादालय” या नावाने नवीन रेस्टॉरंट बांधले आहे हे झुलत्या पुलापासून अगदी काही अंतरावर आहे एकावेळी ५०० लोक जेवतील असा हॉल आहे. भाविकांसाठी या ठिकाणी टेबल, खुर्ची, पंखा, शुद्ध पाण्याचे पाणी याची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी दररोज दुपारी १२ ते 2 या वेळेमध्ये जेवण आणि संध्याकाळी ७ पासून १० पर्यंत खिचडी दिले जाते.प्रसादालयामध्ये आपण सुद्धा आपल्या इच्छेनुसार भोजन दान करण्यासाठी आपल्याला जमेल तेवढी रक्कम जमा करू शकतो.

सुरक्षा बोट

नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या या मंदिराच्या दर्शनाबरोबरच येणारे भावीक नर्मदा नदीवर स्नानही करतात. काही उत्सवांच्या वेळी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे स्नान करणारे खोल पाण्यामध्ये जाऊ नयेत आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी या ठिकाणी सेफ्टी बोटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बोटीमध्ये प्रशिक्षित गार्ड, लाईफ जॅकेट आधी उपकरणांची उपलब्धता करण्यात आलेली आहे.

लाडू प्रसाद सेवा

या मंदिरातर्फे लाडू प्रसादाची सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. चांगल्या प्रकारच्या साहित्यामधून हा लाडू प्रसाद म्हणून पॅक केला जातो आणि मंदिराच्या काउंटरवर कमी दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून येणाऱ्या भाविकांना छान प्रसाद घेऊन जाण्यासाठी उपलब्ध करून देणे हा उद्देश असतो.*सामाजिक कार्य*या मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने तेथील विविध शाळांमधील मुलांना बक्षिसाचे वितरण केले जाते. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील केली जाते. त्याचप्रमाणे परिस्थितीने गरीब असलेल्या लोकांना मदत देखील केली जाते.

विश्रामगृह

या मंदिराच्या ट्रस्टने येणाऱ्या भाविकांसाठी त्यांच्या राहण्याची आरामदायी सोय व्हावी यासाठी “श्रीजी विश्रामालय” सुरू केले आहे. हे मंदिरापासून साधारणपणे १ किलोमीटरच्या अंतरावर असून ओंकार प्रसादलयाच्या जवळ आहे.या ठिकाणी स्वच्छ आणि हवेशीर असा हॉल बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शौचालय व स्नानगृह देखील बांधण्यात आले आहे पलंगाची व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची तसेच चादर, रजई ची देखील व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. साधारणपणे एका वेळी ७० ते ८० लोक राहू शकतात असा मोठा हॉल बांधण्यात आलेला आहे या विश्रामगृहाची स्वच्छता करण्यासाठी त्याचप्रमाणे देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. कमी शुल्कामध्ये येणाऱ्या भाविकांची सोय केली जाते.

वैद्यकीय कार्य

गंभीर आजार झालेल्या रुग्णांना तातडीने मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी या मंदिराच्या ट्रस्टमार्फत रुग्णवाहिका दिली जाते. या मंदिर परिसरामध्ये ट्रस्टमार्फत प्रथमोपचार देखील केले जातात. विविध ठिकाणच्या सण उत्सवांमध्ये तसेच जत्रांमध्ये वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात

OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR
OMKARESHWAR JYOTIRLINGA MANDIR

FAQ

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे?

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठी ओंकार बेटावर हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंग पैकी कितवे ज्योतिर्लिंग आहे?

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग आहे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदी काठी वसलेले आहे.

इंदोर पासून ओंकारेश्वर मंदिरा मध्ये जाण्यासाठी किती किलोमीटर अंतर आहे?

इंदोर पासून ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी ८० किलोमीटरचे अंतर आहे.

ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचे मंदिर एकच आहे का?

ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचे मंदिर दोन्ही वेगवेगळी आहेत.

ओंकारेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी किती किलोमीटर अंतर आहे?

ओंकारेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी ७ किलोमीटरचे अंतर आहे.

निष्कर्ष

ही होती आमच्या आजच्या लेखाची ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती. सर्वप्रथम आपण हा लेख वाचल्याबद्दल आपले आभार. आजचा आमचा हा लेख- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर माहिती मराठी आपल्याला कसा वाटला? आणि काही चुका असतील तर त्या आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार.🙏🙏

Leave a comment