रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती : Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती : Raigad Fort Information In Marathi भारत विविधतेने नटलेला, बहुभाषिक, बहुपरंपरा, अनेक राज्ये असलेला देश. त्यातील एकमेव राज्य ज्याला राष्ट्र संबोधले जाते ते म्हणजे महाराष्ट्र. अशा महान राष्ट्राचे एकमेव निर्माते, छत्रपती श्री शिवाजी महाराज होय. पुण्याच्या जहागिरीपासून झालेली सुरुवात ते रायगडावर झालेला अद्वितीय असा राज्याभिषेक असा हा रायगड किल्ला महाराजांची अविभक्त, अविभाज्य आणि अद्भुत अशी राजधानी होती.

विधात्याने मानवाला भूतलावरील इतर प्राणिमात्रांपेक्षा बुद्धी, भाषा आणि मानसिक क्षमता आदी गुणांचे मोठे वरदान दिले आहे. या देणगीमुळे, आपल्या वैचारिक सामर्थ्याने, भूतकाळात घडलेल्या घटनांची मालिका स्वतःच्या मनात अचूकपणे तो भरू शकतो, त्यास स्मृती असे म्हणतात. स्मृती ही चालना देणारी शक्ती आहे. मृत्यू हा जरी शरीराचा होत असला तरी त्या व्यक्तीची स्मृती आपल्या मनात साठवण्यासाठी त्या व्यक्तींनी घडवलेल्या, अनुभवलेल्या वास्तूंचे दर्शन घेणे आवश्यक असते. कोकण, घाटमाथा, पठार व मैदाने हे महाराष्ट्राचे मुख्य विभाग असले तरी त्या सर्वांचे अंतर्यामी एकच आहे ते म्हणजे सह्याद्री.

महाराष्ट्रातील अनेक राजांनी चोर चिलटांचा उपद्रव होऊ नये, या हेतूने सह्याद्रीच्या घाटांच्या वाटा घाट माथ्यावर तसेच तळाशी दुर्गम किल्ले बांधून सुरक्षित केल्या. तिथेच घडले ते रामायण, इथून घेतली गरुडभरारी, या सह्याद्रीच्या काळ्या निर्भीड कड्यांनीच स्वातंत्र्याचे पाठबळ दिले. तब्बल साडेतीनशे वर्ष या भास्कराचार्यांच्या भूमीवर कोरलेला अंधार संपला. गुलामगिरी संपली.

Table of Contents

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती : Raigad Fort Information In Marathi

श्री शिवरायांचे सामर्थ्य, पराक्रम, ज्ञान, पावित्र्य, सदैव आठवावे. कारण या स्मरणात स्फूर्ती आहे. आणि ज्या महापुरुषाचे स्मरण सतत होत असते, ते देह रूपाने जरी सभोवती नसली तरी ते चिरंजीवच आहेत. अश्याच एका वास्तूबद्दल आम्ही आजच्या लेखातून माहिती देणार आहोत. चला तर मग, बघुया रायगड किल्ला माहिती मराठी.

प्रजादक्ष राजाची राजधानी रायगड किल्ला. दख्खन दौलती रायगडासारखा दुसरा गड नाही, असे म्हणतात ते खोटे नाही. रायगड म्हणजे महाराजांचा गड, आणि रायगड म्हणजे गडांचा महाराज. रायगड हा बुलंद असून अद्भुत आणि अजिंक्य आहे. रायगड या नावातच एक विलक्षण चैतन्य आहे. पूर्वीचे वैभव ओसरले असले तरी त्याचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. रायगडावर सर्वत्र हिम्मतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, बुद्धीच्या, कर्तबगारीच्या, विचारीपणाच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात. रायगड किल्ला हा शिवरायांच्या राजधानीचा किल्ला, सह्याद्रीच्या मुख्यरांगेपासून काहीसा दूर असलेला, ठासून केलेल्या कड्यांनी बंदिस्त केलेला, उत्तुंग आणि माथ्यावर विस्तृत पठार धारण करणारा असा आहे.

6 जून 1674 या अमृताच्या दिवशी मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला आणि तेव्हापासून ही जागा पुण्यशील व विश्ववंदनीय झाली. प्रत्येक मराठी माणूस या किल्ल्याला तीर्थस्थान मानू लागला. साहजिकच रायगडाला जावे अशी तीव्र इच्छा प्रत्येक मराठ्याच्या अंतरंगात ज्योतीप्रमाणे तेवत असते. रायगड किल्ला दुर्गदुर्गेश्वर गडांचा महाराजा. महाराजांचा गड. राजधानी स्वराज्याची, छत्रपती शिवरायांची. एका जाणत्या राजाची. एका श्रीमंत योगीची.

Raigad Fort Information In Marathi
Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याचा अल्प परिचय – Information About Raigad Fort

किल्ल्याचे नाव रायगड किल्ला
किल्ल्याचे जुने नाव रायरी
स्थानरायगड, महाराष्ट्र
बांधकाम1657 ते 1670
क्षेत्रफळ13.6 एकर
किल्ल्यातील मंदिरेजगदीश्वर मंदिर, सतीची समाधी आणि राणी महालाचे अवशेष
किल्ल्याची वैशिष्ट्येअनेक प्रवेशद्वार, मंदिरे, पाण्याची टाकी, राजवाडे आणि हिरकणी बुरुज
किल्ल्याचे प्रवेशद्वारमहा दरवाजा, पालखी दरवाजा, नगारखाना दरवाजा आणि मेणा दरवाजा
किल्ल्यातील पाण्याच्या टाक्यागंगा सागर, टकमक, हत्ती तलाव आणि खुबलाधा बुरुज
किल्ल्यातील बुरुजाचे नाव हिरकणी
किल्ला चढताना लागणाऱ्या पायऱ्या १४५० पायऱ्या
किल्याची उंची जवळपास समुद्रासपाटीपासून ८२० मी / २९०० फूट 
किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग
बांधकामाचे प्रमुखहिरोजी इंदुलकर

रायगड किल्ल्याचा इतिहास

डिसेंबर १६५५ मध्ये जावळीच्या चंद्रराव यशवंतराव मोरेकडून महाराजांनी जावळी जिंकली. त्यावेळी चंद्रराव मोरे निसटला आणि दौलतराव मोरे मदत मागण्यासाठी विजापूर दरबारी दाखल झाला. रायरी क्रमप्राप्त असल्याने शिवाजी महाराज रायरीच्या पायथ्याशी दाखल झाले. दिवस होता दिनांक ६ एप्रिल १६५६ रायरी खाली तळ पडला. रायरीच्या सर्व बाजूंनी नाकेबंदी झाली. १६५६ मध्ये किल्ला ताब्यात आला. महाराजांनी किल्ल्यावर पाय ठेवला.

महाराजांनी बारकाईने किल्ल्याची पाहणी केली. या आधी सुमारे पाच, सहाशे वर्षांपूर्वी येथे एखादी सैनिकी ठाणे असावीत, एकंदर भव्य आणि उंचीच्या आकारामुळे  त्याचा नंदादीप असाही उल्लेख आढळतो. तेराव्या शतकात हा किल्ला देवगिरीकर यादवांच्या ताब्यात होता, यानंतर दक्षिणेत मुस्लिम आक्रमणे झाली, त्यांनी जवळपास दख्खनचा सर्वच भाग ताब्यात आणला. 1436 मध्ये बहमनी सत्तेचा सत्ताधीश दुसरा आला होता, 1479 मध्ये सत्तेच्या पाच भागांमध्ये विभाजन झाले.

1618 मध्ये जावळी प्रांत कोणाकडे असावा, यावरून निजामशाह आणि आदिलशाह यांच्यात वाद झाला, नंतर आदिलशाहीतील मातब्बर सरदाराने तो जिंकून घेतला. पण नंतर १६२६ मध्ये इब्राहीम खान नावाच्या सरदाराने पुन्हा जावळी जिंकली. दिल्लीच्या शहाजहानने निजामशाही बुडवली, एवढ्या दुरून कोकणावर ताबा ठेवणे कठीण वाटल्याने त्यांनी आदिलशाहीशी तह करून ८० लक्ष रुपयांमध्ये कोकण आदिलशाहीकडे दिला. त्यावेळी मोरे यांनी कारभार पाहिला. गड रायरीला राजांचा वेढा पडला.

 Raigad Fort Information In Marathi
रायगड किल्ला मेघडंबरी

रायगड नाव कसे पडले ?

रायगड किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी. गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते, अनेक वेळा गडाचे दुरून दर्शन होत होते, पण प्रत्यक्ष गड पाहताच राजे चकित झाले होते. तसं पाहिलं तर रायरी हमरस्त्यावरती होता. रत्नागिरी अगर दख्खन कोठेही जायला जागा सोयीस्कर, समुद्राजवळ सत्ता म्हणजे अनेक घाटाची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती.

राजांची ती दृष्टी स्थापत्य विचारधारेची नव्हती, तर स्वराज्य निर्मात्याची होती. महाराष्ट्राचा मनोदय घडवणाऱ्या शिल्पकाराची होती. पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही, आणि धोंडा तासिव एकच आहे, यामुळे राजे आनंदित झाले आणि नकळत बोलून गेले “तक्तास जागा हाच गड करावा”. राजांनी रायरीचे नाव रायगड किल्ला असे ठेवले.

अबाजी महादेव, हिरोजी इंदलकर यासारखे बांधकामाचे तज्ञ, अनेक पाथरवट, अनेक लोहार, सुतार लोक कामाला लागले. महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर यांनी रायगडला महाराष्ट्राची राजधानी केली.

पाचाड हे पुरातन गाव आहे पाच विहिरी अशी या गावाची माहिती देता येते. पाचाड ही मुख्य जागा असून रायगडाची उतारपेट होती. शिवाजी महाराजांनी १६७२ मध्ये आपला राजगडावरील मुक्काम रायगडावर कायमचा हलवला. सोबत आईसाहेब आल्या. शिवछत्रपतींची माता ज्येष्ठ वद्य नवमी शके १५९६ म्हणजेच दिनांक 17 जून 1674 रोजी थोड्याच दिवसांच्या आजाराने मृत्यू पावली.

Raigad-Fort-Maharashtra-
रायगड किल्ला

रायगड किल्ल्याचा भुगोल

रायगड किल्ला उत्तर अक्षांश 18. 14 व पूर्ण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या पूर्वभागेत आहे. रायगडाची समुद्रसपाटीपासून उंची 2851 फूट आहे.

रायगड किल्ला नकाशा

राजमाता जिजाऊ आणि रायगड किल्ला

रायगडाला जाताना रस्त्यात पायथ्याच्या गावी राजमाता जिजाऊंची समाधी आहे. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तुत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत शहाजीराजांच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी या दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली.

हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची फुंकर घालत, त्याला राज सिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या, रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला.

रायगड किल्ला
रायगड किल्ला

रायगड किल्ल्याचे बांधकाम

बारा हजार कोट छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात या कोटची निर्मिती केली. जिजामातांना रायगडावरील हवा मानवत नसल्याने त्यांचं वास्तव्य या पाचड कोटामध्ये होतं. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूंना पहारेकरांसाठी देवडे आहेत. किल्ल्यात अनेक घरांची ज्योती आहेत, त्यात सदरेचे देखील दर्शन होते आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जिजामातांच्या वाड्याचे दर्शन होते. सदरेचे आकाराने मोठे आहेत तसेच कोटात दोन विहिरी असून त्यातील एका विहिरीवर असणारा दगड हा टक्क्याच्या किंवा लोढाच्या आकाराचा आहे. म्हणून त्या विहिरीला टक्क्याची विहीर असे म्हणतात.

या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, या विहिरीच्या मागच्या बाजूला अजून एक विहीर असून त्यालाही प्रवेशद्वार आणि आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. कोट हा चौकोनी आकाराचा असून त्याला एकूण 16 बुरुज आहेत. कांजीवर जाण्यासाठी तटबंदीत पायऱ्या व शौचकूप देखील आहेत.

रायगड किल्ला चढण्यासाठी असलेल्या तीन वाटा

रोपवेचा मार्ग

रायगडचा पायथा म्हणजे हिरकणी वाडी पासून ते बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजापर्यंत ही वाट जाते. जवळपास 800 मीटर लांबीचा हा रोपवे आठच मिनिटांमध्ये आपल्याला रायगडावर पोहोचवतो.

चित्त दरवाजाचा मार्ग

 या वाटेने जवळपास पंधराशे पायऱ्या चढल्यानंतर आपण गडावर पोहोचतो.

 नाणे दरवाजाचा

तिसरा मार्ग हा थोडासा अपरिचित मानावा लागेल. हा मार्ग म्हणजे यात आरण्यातून जाणारा पायरी मार्ग पुढे मूळ वाटेला मिळतो, थोड्याच पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला प्रथमदर्शी एक बुरुज लागतो, त्यालाच खूबलढा बुरूज असे म्हणतात. हा बुरुज म्हणजे रायगडाच्या या वाटेवरचा रखवालदारच जणू. गनिमास रोखून धरणे, आणि तेथेच त्याच मारणे हे या बुरुजाचे काम. पुढे रायगडाची वाट 90° मध्ये वळते, आणि याच ठिकाणी वाळूसारखे खिंड आहे. रायगडावर येण्यासाठी या वाटेचा देखील वापर सध्या होताना दिसतो. पण ही वाट दमछाक करणारी आहे.

या वाटेत पुढे येतो तो रायगडाचा महादरवाजा. महादरवाजातून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूंना दोन सुंदर कमळाकृती कोरलेले आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ किल्ल्याच्या आत श्री लक्ष्मी, सरस्वती नांदत आहेत.  श्री लक्ष्मी, आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे, तटबंदीत जी काही भोके असतात त्याला जांग्या म्हणतात.

शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बहुजन मधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. दरवाजा अस्सल सागवानी लाकडातून बनवण्यात आलेला आहे. ती आपल्याला भारतीयासाठी महादरवाजातून टकमकीकडे जी भक्कम तटबंदी केली आहे, ती आपल्याला फिरंगी टोपीकरांच्या तोफेचे आणि इतरदेशीय तोफा दाखवत चिलखती बुरुजाकडे घेऊन जाते.

तिथूनच वर निसनीची गुहा दिसते. गुहा म्हणजे शंभर सव्वाशे लोकांना पावसापासून मिळणारा आसरा. तिथे आतापर्यंत एक धनगर कुटुंब राहत होते, शिवतीर्थावर एक अज्ञात आणि अनभिज्ञ स्थळ म्हणून निसनीची गुहा ओळखली जाते. आजही एक हजारांपैकी पाच सहा जणच या ठिकाणी जातात. इथून पुढे चक्क कातळात कोरलेल्या 21 पायऱ्या आहेत.

हीच वाट म्हणजे जगदीश्वराकडे जायचा तो एक सर्वसामान्य रयतेचा मार्ग होता. याच मार्गावरून कवी भूषण जगदीश्वराच्या प्रसादाकडे गेले होते. राजमाता जिजाऊ पाचाड कोटात राहायला गेल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी राजमातांचे दर्शन या ठिकाणी येऊन घेत असत. मुळात शिवकाळात गुन्हेगारांचा कडेलोट करण्यासाठी हे टकमक टोक तयार करण्यात आले होते.

पण महाराजांनी कधीच कुणाला इथे शिक्षा दिली नाही. टकमक टोकापासून हिरकणी बुरुजापर्यंत चंद्रकोरीच्या आकाराची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीच्या मध्यावर महाद्वार आहे. रायगडावर हल्ला करण्यासाठी केवळ हीच एक बाजू म्हणून तिचा पुरता बंदोबस्त राजांनी केलेला होता. या तटबंदीचे बांधकाम घडीव दगडात इतके सुभक केले होते की साडेतीनशे वर्षे होऊन गेले तरीही अद्याप एकही दगड निघालेला नाही. टकमक टोकाच्या वाटेत दारू कोठारांची अवशेष दिसतात, पुढच्या वाटेमध्ये अनेक वस्तूंचे अवशेष दिसतात.

सिंहगड किल्ला माहिती मराठी

रायगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे – Places To Visit In Raigad Fort

  • जगदीश्वर मंदिर
  • शिरकाई देऊळ
  • मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
  • महादरवाजा
  • हत्ती तलाव
  • पालखी दरवाजा
  • गंगासागर तलाव
  • नगारखाना
  • महाराजांची समाधी
  • हिरकणी टोक 
  • अश्‍मयुगीन गुहा
  • नाना दरवाजा
  • चोरदिंडी
  • स्तंभ
  • राजभवन
  • रत्‍नशाळा
  • बाजारपेठ
  • खुबलढा बुरूज
  • पाचाडचा जिजाबाईंचा वाडा
  • महाराजांची समाधी
  • कुशावर्त तलाव
  • वाघदरवाजा
  • टकमक टोक
  • वाघ्या कुत्र्याची समाधी

रायगड किल्ल्यावरील जगदीश्वराचे मंदिर

कोळिंब तलावाच्या उजवीकडे येते ते रायगडावरील प्रसिद्ध जगदीश्वराचे मंदिर. हे मंदिर दीडशे बाय दीडशे फूट आकाराचे आहे. त्याच्या चहुबाजूनी तटबंदीच्या आतमध्ये ओव्या बांधलेले आहेत. मुख्यमंदीर 40 बाय 24 फूट आकाराचे असून, त्याची उंची अंदाजे वीस फूट आहे. मंदिराचे बांधकाम अत्यंत सुबक व देखणे आहे. मंदिरासमोरच नंदीची भव्य आणि सुबक अशी मूर्ती आहे. ही मूर्ती भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की, भव्य सभा मंडप लागतं.

मंडपाच्या मध्यभागी एक मोठा कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या आत शिवलिंग आहे. छत्रपतींचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन जगदीश्वराच्या मंदिरासमोर झाले. त्या स्थळी एक चिरेबंदी अष्टकोनी समाधी बांधली गेली. महाराजांच्या समाधीच्या उजवीकडे दारूगोळा कोठार आणि बारा टाके आहेत.

रायगड किल्ल्यावरील शिरकाई देवी मंदिर

होळीच्या माळावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीष्टीत भव्य पुतळा 1974 साली बसविण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला अजून एक छोटे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शिरकाई देवीचे देऊळ. शिरकाई देवी ही रायगडावरील मुख्य देवता. शिर्के हे पाचव्या शतकापासून रायगड किल्ल्यावर राज्य करत होते आणि त्यांची स्वामिनी म्हणजेच शिरकाई देवी.

लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर या अभियंत्याने या मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख आहे. जरी शिरकाई देवीचे मंदिर हे मूळ मंदिर नसले तरीही त्यातील मूर्ती मात्र प्राचीन आहे. पूर्वीच्या काळी जुने मंदिर राजवाडाच्या डावीकडील पठारावर होते. त्या ठिकाणी जुन्या देवळाचा चौथरा आजही शिल्लक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या जागी शिरकाईचा घरटा असा नामा फलक होता.

मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा

खूबलढा बुरुजाकडून , चित दरवाजाने आल्यास पुढे वळणदार रस्त्याने जावे लागते. त्यानंतर आपल्याला एक सपाट पठारी जागेवर दोन मोडक्या इमारती दिसतात. या इमारतींपैकी एक इमारत ही गडावर पहारा देणाऱ्यांची विश्रांतीची जागा असून, त्याच्या बाजूला असलेली इमारत हे धान्य कोठार आहे. याच दोन इमारतींच्या बाजूला मदनशहा नावाचे साधूचे थडगे आहे. येथून थोडेसे अंतर गेल्यावर कातळ खडकात तयार केलेल्या तीन गुहा सुद्धा आहेत. मदनशहा थडग्याजवळ अजूनही एक मोठी तोफ ठेवलेली दिसते

महादरवाजा

रायगड किल्ल्याचा महादरवाजा प्रचंड आणि सुंदर आहे. या महादरवाजाला दोन भव्य दिव्य असे बुरुज असून, यापैकी एक 65 फूट तर दुसरा बुरूज जवळपास 75 फूट उंच आहे. महादरवाजाने आत शिरताना दोन्ही बाजूला सुंदर अशा कमळाकृती दगडावर कोरलेल्या आहेत. जाणकारांच्या मते या कमल चिन्हांचा अर्थ म्हणजे किल्ल्यामध्ये विद्या आणि लक्ष्मी यांचे निवासस्थान आहे.

किल्ल्याच्या तटबंदी मध्ये जी छिद्रे ठेवतात त्यांना जंग्या असे म्हटले जाते. या जंग्यांमधून शत्रूवर बंदुकीने मारा करता येतो. दोन भव्य बुरुजांमध्ये असलेला हा दरवाजा वायव्य दिशाभिमुख आहे त्याचप्रमाणे दरवाज्याच्या आत मध्ये पहारेकरी आणि रक्षकांसाठी रक्षकांसाठी देवड्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छोट्या राहण्याच्या खोल्या सुद्धा आहेत. महादरवाज्यापासून बांधलेली तटबंदी ही उजवीकडे टकमक टोकापर्यंत जाते, तर डावीकडे हिरकणी बुरुजापर्यंत ही तटबंदी गेलेली आहे.

चोरदिंडी

महादरवाजाकडून उजवीकडे असलेल्या टकमक टोकापर्यंत जाताना तटबंदी लागते. या तटबंदीवरून चालत जाताना, जिथे तटबंदी संपते, त्याच ठिकाणी जरा अलीकडे असलेल्या बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून चोरदिंडीच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या तयार केल्या गेल्या आहेत.

हत्ती तलाव

आपण महादरवाजा पासून थोडेसे पुढे चालत गेल्यावर जो तलाव दिसतो, त्याला हत्ती तलाव म्हणतात. शिवरायांच्या काळी गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी या तलावाचा उपयोग केला जात असे. हत्ती तलावाच्या जवळ काही इमारती दिसतात या इमारती म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळा होय.

गंगासागर तलाव

धर्मशाळांपासून जवळपास दहा ते पंधरा मीटर अंतरावर आणखी एक तलाव बांधलेला दिसतो. हा तलाव म्हणजे गंगासागर तलाव. शिवराज्याभिषेकाच्या वेळी सप्तसागर तसेच नद्यांची आणलेली तीर्थे या तलावामध्ये विसर्जित केली गेली. त्यामुळे ह्या तलावाचे नाव गंगासागर असे पडले. शिवकाळामध्ये या तलावाचे पाणी पिण्यासाठी तसेच अन्न तयार करण्यासाठी वापरले जात असे.

स्तंभ

तलावाच्या दक्षिण बाजूला दोन उंच मनोरे बांधलेले आहेत. यांना स्तंभ असे म्हटले जाते. जगदीश्वराच्या शिलालेखात स्तंभांचा उल्लेख आढळतो, ते हेच स्तंभ असावेत असे मानतात. पूर्वी या स्तंभांना पाच मजले होते, या स्तंभांचे बांधकाम बारा कोनात असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे.

पालखी दरवाजा

दोन स्तंभांच्या पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीच्या जागी 31 पायऱ्या बांधलेल्या आहेत. या 31 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला पालखी दरवाजा दिसतो. या पालखी दरवाजा मधूनच आपल्याला बालेकिल्ल्यात जाता येते.

मेणा दरवाजा

पालखी दरवाजाने वाले किल्ल्यात प्रवेश केला की, चढाव आणि उतार असलेला जो रस्ता आहे, तो आणखी एका दरवाजापर्यंत जातो. या दरवाज्याला मेणा दरवाजा म्हणतात. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यात जाताना उजव्या बाजूला सात बांधकामांचे अवशेष शिल्लक दिसतात. हे अवशेष म्हणजे पूर्वी असलेल्या राण्यांचे महाल होय. राणीमालांच्या उजव्या बाजूला आणखी काही बांधकाम केलेले आढळते. या खोल्या म्हणजे गडावर राहणाऱ्या दास दासी यांच्या खोल्यांचे अवशेष होय.

राजभवन

या घरांच्या अवशेषांच्या मागे आणखी एक समांतर भिंत जाते. या भिंतीच्या मध्ये जो दरवाजा दिसतो. त्या दरवाजातून आपण जर बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला, तर आपल्याला एक प्रशस्त चौथरा दिसतो. हा प्रशस्त चौथरा म्हणजेच छत्रपतींचे राजभवन. राजभवनाच्या चौथर्‍याची लांबी 86 फूट असून रुंदी 33 फूट आहे.

रत्‍नशाळा

राजभवनात जवळ असलेल्या स्तंभाच्या पूर्व दिशेला असलेल्या जागेत एक तळघर आहे. या तळघराला रत्नशाळा असे म्हणतात. पूर्वीच्या काळी रत्नशाळेला खलबत खाना असेही म्हटले जात असे. गुप्त बोलणी करणे, त्याचबरोबर जडजवाहीर आणि मौल्यवान वस्तू साठवून ठेवण्याची जागा म्हणजेच खलबतखाना किंवा रत्नशाळा होय.

राजसभा

रायगड किल्ल्यामध्ये असणारी राजसभा म्हणजे 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद अशी जागा आहे. या ठिकाणी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. या राजसभेमध्ये पूर्वभिमुख अशी सिंहासनाची जागा आहे याच जागेवर शिवाजी महाराजांचे 32 मण वजनाचे सोन्याचे सिंहासन होते.

नगारखाना

छत्रपतींच्या सिंहासनाच्या समोर एक भव्य प्रवेशद्वार आहे. हे भव्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगरखाना. नगारखान्यातून वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यास आपण किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाणी जाऊन पोहोचतो. नगारखान्याच्या डाव्या बाजूला एक मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेला होळीचा माळ असे म्हणतात. या मोकळ्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा मेघडंबरी मध्ये बसवलेला आहे.

बाजारपेठ

पुतळ्याच्या समोरच बांधकामाच्या दोन रांगा असून, त्यामध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात. हे बांधकाम म्हणजे त्या काळी किल्ल्यावरील बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दोन रांगा असून प्रत्येक रांगेत 22 दुकानांची सोय आहे. दोन रांगांच्या मधील अंतर जवळपास 40 फूट रुंद आहे. बाजारपेठेची रचना आजही व्यवस्थित पाहता येते.

हिरकणी टोक 

गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूस हिरकणी टोकाकडे चिंचोळी वाट जाते. या टोकाशी या ठिकाणाची हिरकणी गवळणी संबंधित एक कथा प्रसिद्ध आहे. हे कधी टोकाच्या बुरुजावर काही तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. बुरुजावर चढून पाहिल्यास डाव्या बाजूला गांधारीचे खोरे आणि उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. याच बुरुजावरून पाचाड, खूबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे सुद्धा तोफेच्या माऱ्यामध्ये येतात. त्यामुळेच युद्धाच्या दृष्टीने हिरकणी टोकावरील बुरुज अतिशय महत्त्वाचा आणि मोक्याचा मानला जातो.

नाना दरवाजा

हा लहान दरवाजा आहे. या दरवाजाला नाना दरवाजा किंवा नाणे दरवाजा असे संबोधले जात असे. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी, इंग्रजांचे वकील हेन्री ऑक्सेंडन याने दरवाजाने गडामध्ये प्रवेश केला होता. हा दोन कमानी असलेला दरवाजा आहे. त्याचबरोबर पहारेकऱ्यांसाठी दरवाजाच्या अंतर्गत बाजूस दोन खोल्या केलेला आहेत, त्याला देवडा असे म्हटले जाते. दरवाजाला कोयंडा घालण्यासाठी खोबणी केलेल्या दिसतात.

खुबलढा बुरूज

गडावर जाताना आपल्याला हा बुरुज दिसतो. या बुरुजावरून गडाच्या खालील भागावर लक्ष ठेवता येत असे. बुरुजाच्या बाजूलाच आता मोडकळीस आलेला दरवाजा सुद्धा आहे. या दरवाजाला चीत दरवाजा असे म्हटले जाई. आता या दरवाजाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.

महाराजांची समाधी

मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीमहाराजांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680)या दिवशी रायगड येथे राज्याभिषेक झ़ाला.

तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी बांधकाम बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी असून त्यामध्ये महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने आहे असे मानतात.

दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. महाराजांचा समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.

पाचाडचा जिजाबाईंचा वाडा

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना रायगड किल्ल्याच्या जवळ पाचाड येथे एक सुंदर वाडा बांधून दिला. म्हातारपणामुळे जिजाबाईंना गडावर थंडीचा त्रास होत असे. या वाड्याची निगा राखण्याची सोय छत्रपतींनी केली होती. या वाड्यामध्ये एक पाण्याची विहीर असून याला तक्क्याची विहीर असे म्हणतात. दगडांमध्ये कोरलेले जिजाबाईंचे बसायचे आसनही सुंदर आहे.

वाघदरवाजा

वाघ दरवाजा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला, असे मानले जाते. या दरवाजाने वर येणे जवळपास अशक्य आहे. तरी संकटाच्या समयी या दरवाजाने दोर लावून खाली उतरून जाता येते. इतिहासात राजाराम महाराज यांनी झुल्फिरखानाचा वेढा पडला त्यावेळी या किल्ल्यातून पलायन केले

वाघ्या कुत्र्याची समाधी

इतिहासात असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा याने महाराजांच्या चितेमध्ये उडी घालून प्राणत्याग केला. त्यामुळेच येथे वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आलेली आहे.

कुशावर्त तलाव

होळीच्या माळाच्या उजव्या बाजूला कुशावर्त तलाव आहे. या कुशावर्त तलावाजवळ महादेवाचे छोटेखानी देऊळ आहे. या देवळासमोर भग्न अवस्थेतील नंदीचे शिल्प आहे. कुशावर्त तलावा त्या बाजूला असलेल्या घडीने खाली उतरल्यास आपण वाघ दरवाजाकडे पोहोचतो.

टकमक टोक

बाजारपेठेच्या समोर असलेल्या जागेवरून खाली उतरून गेल्यास आपण टकमक टोकापर्यंत पोहोचतो. येथे पूर्वी असलेल्या दारूगोळ्याच्या कोठाराचे अवशेष शिल्लक आहेत. जसे पुढे जावे तसा रस्ता निमुळता झालेला आहे. येथे उजव्या बाजूला जवळपास २६०० फूट खोल असलेला कडा आहे. या ठिकाणी प्रचंड वारा असतो. त्याशिवाय जागा कमी असल्याने येथे गर्दी करून जाऊ नये. पूर्वीच्या काळी या जागेवरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे.

अश्‍मयुगीन गुहा

पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा.’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

 रायगडचे किल्ला उत्खनन आणि संवर्धन

रायगड विकास प्राधिकरण व भारतीय पुरातत्व विभाग येथे उत्खनन आणि संवर्धनाचे काम करत आहे. यात कित्येक वर्ष दडल्या गेलेल्या या वास्तू आणि त्यांचे अवशेष समोर येत आहेत. त्यांच्या मते, अशा जवळपास 300 वास्तू रायगडावर उपलब्ध आहेत.

गडावर किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची सोय

दुर्ग संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलस्रोत. त्यात सह्याद्री व एकंदर पूर्ण भारतामध्ये चार महिने पाऊस पडतो, त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची साठवणूक शिवराय काटेकोरपणे करत. शिवनिर्मित प्रत्येक किल्ल्यावर वर्षभर पुरेल व प्रसंगी गडावर हल्ला झालाच तर आणीबाणीच्या काळातही आवश्यक तो पाणीसाठा कसा राहील याची योग्य काळजी शिवरायांनी घेतलेली होती.

त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याकाळी जलाभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या साह्याने पाणीसाठा होऊ शकतो हे तत्कालीन पाथरवटांच्या लक्षात आले होते, त्यामुळे अशा हरहुन्नरी लोकांकडून शिवरायांनी किल्ल्यांमध्येच ठाणे आणि हौद किंवा दगडाच्या उतरणीवर खोल खड्डे निर्माण करून घेतले, जेणेकरून पाणी सतत पाजरत राहील आणि त्यांची सोय होईल.

रायगडावर हत्ती तलाव, कोळिंब तलाव, गंगासागर तलाव, भवानी तलाव, कुशावर्त तलाव असे एकंदरीत दहा पाण्याचे तलाव आहेत.

रायगड किल्ला प्रवेशद्वार
रायगड किल्ला प्रवेशद्वार

रायगडाचे बांधकाम कोणी केले ?

हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या पायरीच्या खाली एक लहानसा शिलालेख आढळतो. “सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर” हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. रायगडाचे बांधकाम त्यांनी केले. आताच्या कोणत्याही सिविल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम, कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदुरकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.

शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द शिवाजी महाराजांनी हिरोजी यांना रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे यांचे बांधकाम हाती दिले. आणि त्याची जबाबदारी सोपवली होती. गड बांधण्याचे काम हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या देखरेखी खाली पूर्ण करून घेतले. त्यात त्यांनी वापी, कूप दाग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, नरेंद्र सदन, बारा महाल अशा अनेक इमारती रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज खुश झाले. आणि महाराजांनी हिरोजींना विचारले, “हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधलात, त्यामुळे हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ.

तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले, महाराज म्हणाले, हिरोजी बोला, त्यावेळी हिरोजी म्हणाले, राजे आम्हाला काय बी नग. फक्त राजांनी अनुमती द्यावी आणि महाराज म्हणाले बोला हिरोजी बोला, तेव्हा हिरोजी म्हणाले, राजे या गडावरील जगदीश्वर मंदिराचा एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना अनुमती दिली. जेव्हा महाराज आपण जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा या पायरीला महाराजांच्या पायाची माती स्पर्श व्हावी, ही स्वामीनिष्ठ हिरोजी इंदुलकरांनी आपली इच्छा व्यक्त करून दाखवली.

रायगड किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षण

समाधी पासून भवानी टोकापर्यंतचा भाग मुख्यत्वे करून सैन्यासाठी होता. तेथे तसे पुरावे सापडले आहेत. या भागात सैन्यासाठी खास बांधलेल्या बाराखड्यांचे अवशेष आहेत. 35 ते 40 फूट रुंदीच्या या वास्तूमध्ये पंधरा ते वीस फुटांवर पार्टिशर्स घालून वीस सैनिक एका खोलीत राहत असत. याप्रमाणे सुमारे 2000 ते 3000 सैनिकांची राहण्याची चोख व्यवस्था गडावर होती. हा सारा परिसर सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी सोयीचा होता. मुख्य वस्तीपासून बाजूला असलेल्या या भागात भरपूर चढ-उतार व कडे आहेत. तसेच सपाट भूभागही आहेत.

सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अशाच जागेची गरज असते. महाराज नवीन भरती झालेल्या सैन्याला योजनाबद्ध प्रशिक्षण देत असत, घोडदळाला तीन महिने तर पायदळाला त्याहून अधिक काळ सक्तीचे प्रशिक्षण देण्यात येत असे. घोडदळाचे प्रशिक्षण अर्थातच रायगडावर नसे, ते बौद्ध पाचारला असावे, कारण तेथे पाच हजार घोड्याची तुकडी कायम तैनात असे. पायदळाचे प्रशिक्षण मात्र रायगडावर व्हायचे, यामुळेच अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया राजे जिंकू शकले.

रायगड किल्ल्यावरील भवानी बुरुज

जगदीश्वराच्या मंदिरापासून पूर्वेकडे साधारण दीड किलोमीटर चालत गेल्यानंतर एक सरळ तुटलेला भाग आहे, तो म्हणजेच भवानी कडा किंवा भवानी टोक. तेथे बुरुज बांधलेला आहे, तो म्हणजे भवानी बुरुज. भवानी टोकापासून थोडे अंतरावर भवानी गुहा आहे. तेथे काही दगडांना शेंदूर लावलेला दिसून येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या कड्याला भवानीकडा असे का नाव दिलं ?

याचं कारण असं सांगतात की तुळजापूर या दिशेला आहे आणि तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे भवानी माता या दिशेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ या गड्याला भवानीकडा नाव देण्यात आले.

रायगड किल्ल्यावरील नगरपेठी

नगरपेठीमध्ये एका ठिकाणी शिळेवर शेषनाग कोरलेला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी नाईक हे शिवरायांच्या पदरी सन्मानाने आश्रित होते. बाबाजी नाईक पुंडे यांनी आपले आजोबा नाईक यांचे ऋण लक्षात ठेवून सातव्या ते आठव्या खोलीच्या मधल्या शिळेवर शेषबाची स्मृति म्हणून शेषनाग करून घेतला. बाबाजी नाईक पुंडे यांचे अस्तित्व दर्शविणारा तो शेषनाग हुजूर बाजारपेठेचे वैभव दर्शविता झाला आणि अजूनही आहे.

शिळेवरील शेषनाग ही भोसले घराण्याची प्रामाणिकता दर्शविणाऱ्या, शेषनायकांची ती स्मृती आहे, या नगरपेठीच्या मागे असणारी इमारत म्हणजे हत्तीखाना होय. इथे सध्या गडावर खोदकामात सापडलेल्या वस्तू ठेवण्यात येतात.

रायगडावरील उत्सव

राजधानी कशी असावी? याचा आदर्श नमुना, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर साकारला. राजवाडा, शिरकाई माता मंदिर, आणि नगरपेठ यांच्या दरम्यान मोठे पटांगण केलं, आणि त्याचं नाव ठेवलं होळीचा माळ. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक स्वराज्याची कल्पना वास्तव्यात आणताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप बारकाईने विचार केला होता, की राज्य बलशाली व्हावे, लोककल्याणकारी व्हावे, नीतिमत्तेचे व्हावे, धर्म संस्कृतीचे व्हावे, असा ठाम विचार त्यांच्या मनी बसे, सर्वधर्माचा आदर केला तर महाराष्ट्र धर्मही मोठा होणार आहे, यावर त्यांचा विश्वास होता.

म्हणूनच रायगडावरील शिरकाई माता ही प्रमुख देवता, तिचे साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. चैत्र पौर्णिमेचा उत्सव म्हणजे वसंतोत्सव आणि होळीच्या पौर्णिमेचाही उत्सव सुरू केला. स्वराज्यकार्यात सततच्या लढाईच्या धामधुमीत मग्न असलेल्या महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा.

राजांचा राज्याभिषेक सोहळा

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek
राजे राज्याभिषेक सोहळा

“बहुत जनांसी आधारू निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारु अखंड स्थितीचा निर्धारू” असा हा श्रीमंत योगी. सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मिने झुकली, जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला.

मराठी रयतेला स्वतःचे स्वराज्य सुपूर्त करण्याची आणि आपल्या प्राण्यांचे बलिदान केलेल्या हजारो मावळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची, आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे, ही सर्वसामान्य जनमाणसाची भावना होती, आणि याच जनभावनेस धरून गागाभट्टासारख्या धर्मपंडिताने राजांना सवाल केला, “राजे लक्ष लक्ष पायदळ, घोडदळ अवघे आपण उभे केले, गडकोट बांधले, आरमार उभारले, तरी आपणास तक्त नाही येत”. असा मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे.

महाराजांनी सोच विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला. आणि बघता बघता अवघा मराठी मुलुख राज्यभिषेकाच्या तयारीला सज्ज झाला आणि अखेर तो क्षण आला. हिंदवी स्वराज्य स्थापून माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला. झुकल्या वाकल्या त्या गर्विष्ठ माना. जेव्हा क्षत्रिय कुलावतं, राजाधिराज, शिवरायांचा राज्याभिषेक झाला.

राज्याभिषेकाच्या तयारीसाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला, देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आली. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाली. चार महिन्यांसाठी त्यांची उत्तम राहण्याची सोय करण्यात आली. सरदार, राज्यातील श्रीमंत, जनमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले. प्रत्येक दिवशी एका नवीन धार्मिक विधी आणि संस्कारात शिवाजी महाराज घडून गेले.

राजांनी सर्वप्रथम माता जिजाबाईंना नमस्कार केला. आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन केले. पूजा केल्या. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते, म्हणून प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना केलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री त्यांनी भवानी मातेस अर्पण केली. 21 मे रोजी ते रायगडावर परतले आणि इतर धार्मिक विधी उरकून घेतले. रायगड आता चारही दिशेने सजला.

कोणी तोरण बांधत होतं, तर कोणी पताका सजवत होतं, कुणी पाहुण्यांचे स्वागत करत होतं, तर कोणी त्यांची व्यवस्था लावत होतं, सर्वत्र उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. राजधानी रायगडास आता आतुरता होती, ती फक्त राजांच्या प्रत्यक्ष राज्यभिषेकाची, आणि अखेर तो दिवस उजाडला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सर तारीख ६ जून १६७४ महाराजांनी या मंगल व पवित्र प्रभाती सुचिर भूत होऊन श्री महादेव व कुलस्वामिनी, आई भवानी यांचे दर्शन घेतले.

राज्याभिषेक सुरू झाला. राज्यभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे असे दोन वेगवेगळे प्रमुख विधी होणार होते. त्यापैकी अभिषेक या विधीसाठी राजे सर्वप्रथम सोन्याने मडविलेल्या मंचावर बसले, शेजारील मंचावर उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या होत्या. तर बाळ संभाजी राजे थोडेसे मागे बसले होते.

अष्टप्रधानांमधील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते, याच जल कुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक धरला असं म्हणतात, मंत्र उच्चारण आणि सूर वाद्य निनादू लागली, 16 सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते, जड जवाहिर अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले, एक राज मुकुट घातला, आपली तलवार ढाल आणि धनुष्यबाणाची पूजा केली, आणि अगदी मुहूर्ताच्या समयी त्यांनी अतिथींनी भरगच्च भरलेल्या राज सिंहासनाच्या दालनात हातात विष्णू मूर्ती घेऊन प्रवेश केला.

राजे सभागृहात येतात त्या हजारो जणांनी राजांना मानवंदना दिली. समोर 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन महाराजांची आतुरतेने वाट बघत होते. राजे पुढे सरसावले आणि सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच, राजांचे हृदय हे भरून डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, राजे आपल्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते, की या सिंहासनाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांमध्ये त्यांना वीर गतीला गेलेला त्यांचा हर एक मावळा दिसत होता.

क्षणार्धात राजांनी अश्रू आवरले आणि ते सिंहासनावर विराजित झाले. सिंहासनानजीकच्या आठ खांबाजवळ आठ प्रधान उभे राहिले. आणि मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण सुरू झाले. मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी पुढे येऊन रत्नजडित झालेली छत्रीचे भव्यछत्र महाराजांच्या डोक्यावर धरले, आणि मोठ्याने उद्घोष केला, क्षत्रिय कुलावतं, राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज निनादून गेला.

ढोल, नगाडे वाजू लागले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा दागल्या गेल्या. आणि त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे शस्त्रे दान केली. दालनातील हा समारंभ उरकल्यानंतर शिवाजी महाराज एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले आणि तेथून हत्तीवर स्वार होऊन त्यांची भव्य मिरवणूक रायगडावर निघाली.

इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान मंडळ आणि इतर सैन्यही होते. आसमंत आनंदोत्सवाद नाहून निघाला होता. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्यजणांनी फुले उधळली, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज शेवटी महालात परतले, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण होता.

रायगडवरील बुरुजाला हिरकणी नाव का पडले ?

Hirkani Buruj
Hirkani Buruj

कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान फार फार मोठा होता. परस्त्री मातेसमान हे तत्व अमलात आणले जायचं. स्त्रीचा अपमान मुळीच खपवून घेतला जात नव्हता. स्त्रियांच्या सन्मानासाठी संरक्षणासाठी शिवराय नेहमी दक्ष असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला होता.

त्याच रायगडावर इसवी सन १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. रायगड किल्ला हा सुरक्षेच्यादृष्टीने उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला चार हजार चारशे फूट उंच होता. गडावर दरवाजांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता, असं म्हटलं जायचं की, रायगडाचे दरवाजे बंद झाले की, वरून खाली जाईल ते म्हणजे फक्त पाणी आणि खालून वर येईल ती फक्त हवा. मात्र या गोष्टीला अपवाद एक स्त्री ठरली जिचं नाव होतं हिरकणी.

एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील काही गवळणी रायगडावर दूध विकण्यासाठी आल्या, त्यामध्ये हिरकणी नावाची गवळण होती, या हिरकणीचे बाळ खूप लहान होते, दूध विकल्यानंतर हिरकणीला गडावरून निघायला उशीर झाला.

ती गडाच्या दरवाजा जवळ आली, पण पहाते तर काय दरवाजे बंद झालेले होते, गडकर्‍यांना तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला, कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत, छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे, पण हिराला आपल्या बाळाची चिंता लागली होती.

तिचे लहान बाळ पाळण्यात घरी एकटेच होते, बाळाच्या काळजीने हिरकणी कासावीस झाली, पहारेकऱ्यांना घरी जाऊ देण्यासाठी सतत विनवू लागली. त्या पहारेकऱ्यांना देखील तिची फार दया येत होती, पण ते तरी काय करणार, स्वराज्याचा नियम कसा मोडणार. इकडे आई वाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील? या विचाराने त्या आईची चिंता वाढत चालली होती, आणि एकाएकी हिरकणीस काय झाले कुणास ठाऊक. मागचा पुढचा काही एक विचार न करता हिरकणी रात्रीच्या त्या भीषण अंधारात रायगडाच्या एका भीषण कडापाशी येऊन दाखल झाली.

हा कडा भयंकर होता. सरळ ताठ उंचीचा होता, खाली खोल खोल दरी होती, जणु मृत्यूचीच दरी होती, कमरेचा पदर खोचला आणि त्या जीवघेण्या कड्यावरून तिने उतरण्याचा निर्णय घेतल. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे, झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी या मातेने  हा निर्णय घेतला. गडाच्या कडांचे निरीक्षण केले, एका कडावर येऊन पोहोचली. आणि त्याच कड्यावरून उतरायला तिने प्रारंभ केला.

हिरकणीच अंग खरचटून निघत होत, जोराचा वारा अंगाला झोंबत होता, त्या पहाडाच्या कपारीत एखादा विषारी साप असला तर, मोहाचे पोळ असलं तर, चुकून हातपाय निसटला तर, मात्र हिराला कशाकशाची चिंता नव्हती. तिला काळजी होती ती फक्त एकच आणि ती तो भयंकर कडा उतरून गेली, खाली पोहोचेपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडाझुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते.

गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले, बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला, तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. बाळाला हृदयाला कवटाळून होती, आईने जवळ घेतल्यावर  बाळ खुदकन हसायला लागलं. रायगडाचा हा भीषण कडा म्हणजे जणू यमराजाची पाठच होती. मात्र हिरकणीने आपल्या बाळासाठी हे असामान्य धाडस केलं.

शिवरायांनाही वार्ता कळताच त्यांना हिरकणीचे मोठे कौतुक वाटले.. महाराज अत्यंत आश्चर्यचकित झाले, कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाज्यातून येण्या-जाण्याशिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली? महाराजांनी हिरकणीला गडावर बोलावण्यास सांगितले, हिरकणी गडावर आली.

ती आल्यानंतर महाराजांनी तिला या सर्व घटनेविषयी विचारले. असता हिरकणीने महाराजांना घडलेल्या सर्व घटनाक्रम सांगितला. आपल्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता, असे तिने सांगितले. शिवरायांनी मोठ्या कौतुकाने साडीचोळी देऊन हिरकणीचा गौरव केला. व हिरकणीच्या नावावरून त्या कडाला हिरकणी बुरुज नाव पडले.

रायगडावरील अनोखी सत्ये

1)शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज ज्यावेळी सत्येत आले,    त्यावेळी एका कडेलोटाची नोंद आपल्याला सापडते.

2) महाकवी भूषण हे शिवरायांची कीर्ती ऐकून दक्षिणेत आले, त्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या काव्याचा नायक बनवून काव्यशास्त्रावर आधारित शिवराज भूषण या ग्रंथाची रचना रायगडावर केली. त्यांच्या या ग्रंथात रायगडाचे अत्यंत सुंदर वर्णन आलेले आहे.

3) रायगडाची प्रतिकृती दक्षिण काबीज करायला आल्यानंतर औरंगजेब हा रायगड मिळवण्याकरता अत्यंत उत्सुक आणि त्याचे अनेक सहकारी प्रयत्न करत होते, त्याच्या फौजतील एक समकालीन इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी त्याच्या कारकिर्दीवर फुतुहा ते आलमगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात बरेच बारीक-सारीक तपशील आहे.

त्यातील एक प्रसंग आहे, तो रायगडच्या प्रतिकृतीचा संभाजी राजांच्या मृत्यूनंतर रायगड घेण्यासाठी औरंगजेब आला, ज्यावेळी बादशहाला कळवण्यात आले की, सय्यद अब्दुला खान हा रायगडला पोहोचला आहे, आणि तो आता किल्ल्याला वेढा देणार आहे, तेव्हा बादशहाने आज्ञा केली की, संभाजीचा नातलग महाजन यांनी रायगडची प्रतिकृती तयार करावी, पुढे ही प्रतिकृती तयार झाली.

4) समकालीन वर्णन शिवाजी महाराजांच्या काळातील उपलब्ध पुराव्यात एखाद्या गडाचे कौतुक खुद्द त्यांनीच करावे अशी उदाहरणे अगदी मोजकी आहेत. राजधानीचा रायगड हा त्यातलाच एक. महाराजांना प्रथमदर्शनी रायगड अत्यंत आवडला असावा आणि म्हणून बखरकार कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांची वाक्य नमूद कर. त्यांनी लिहिले आहे, गड बहुत सखोल, उंच पर्जन्यकालीही कड्यावर गवत उगवत नाही, तोंडात एकच आहे असे देखून बहुत संतोष जाहले”. आणि बोलले सत्ता जागा हाच गड करावा.

रायगडावर कसे जाल ?

1) बससेवा

माणगाव बसस्थानकावरून पाचाडला जाण्यासाठी बसेस सहज मिळतील. पाचाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पाचाड येथून ट्रेक करू शकता किंवा रोपवेने जाऊ शकता.

2) रेल्वेसेवा

तुम्हाला माणगावची ट्रेन पकडावी लागेल. माणगाव रेल्वे स्थानकावरून तुम्ही कॅबने पाचाडला जाऊ शकता. अन्यथा, तुम्ही बस घेऊ शकता. माणगाव बसस्थानकावरून पाचाडला जाण्यासाठी बसेस सहज मिळतील.

3) विमानसेवा

लोहेगाव विमानतळ रायगडपासून १४० किमी अंतरावर आहे. आणि विमानतळाजवळ उपलब्ध बसेस आणि टॅक्सींनी ३ तास ​​४४ मिनिटांच्या अंतरावर पोहोचता येते. मुंबईचे छत्रपती शिवाजी विमानतळ रायगडापासून १८० किमी अंतरावर आहे, जे रस्त्याने ४ तासांचा प्रवास आहे.

raigad fort from pune distence – 132 km 3 तास 30 मिनिटे

raigad fort from mumbai distence – 168 km 4 तास 15 मिनिटे

रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम महिना

रायगडला भेट देण्याचा उत्तम ऋतू म्हणजे हिवाळा. तापमान आरामदायक राहते आणि पर्यटनासाठी योग्य आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आहेत.

रायगड किल्ला पाहण्यासाठी किती वेळ लागतो?

किल्ले रायगड हा भारतातील महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची राजधानी किल्ला आहे. रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात वसलेला सर्वात कठीण किल्ला आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे 3 तास किंवा त्याहून अधिक वेळ चढून जावे लागते.

रायगड किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क

रोप – वे तिकीटजीएसटी दरांव्यतिरिक्तदर जीएसटीसह
प्रौढरु. 295/- प्रत्येकी.रु. 310/- प्रत्येकी.
मुले (उंची 3 ते 4 फूट)रु. 190/- प्रत्येकी.रु. 200/- प्रत्येकी.
ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे पूर्ण)रु. 190/- प्रत्येकी. रु. 200/- प्रत्येकी.

रायगड किल्ल्याचे प्रवेश शुल्क अभ्यागतांचे वय आणि राष्ट्रीयत्व यावर अवलंबून असते. भारतीय नागरिकांसाठी, प्रवेश शुल्क रु. 25 प्रति व्यक्ती, तर परदेशी नागरिकांसाठी, शुल्क रु. 300 प्रति व्यक्ती. १५ वर्षांखालील मुलांना किल्ल्यावर मोफत प्रवेश दिला जातो.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रवेश शुल्क आणि रोपवे शुल्क बदलू शकतात, त्यामुळे रायगड किल्ल्याला भेट देण्याचे नियोजन करण्यापूर्वी सध्याचे शुल्क तपासणे उचित आहे.

रायगड किल्ला पाहण्यासाठीचा वेळ

 सकाळी १० ते संध्याकाळी ६ (दररोज)

रायगड किल्ला बघायला येताना घ्यावयाची काळजी

  • 1)किल्ल्यावरील कोणत्याही वास्तुस हानी होता कामा नये याची काळजी घ्यावी.
  • 2)किल्ला स्वच्छ ठेवावा .
  • 3)किल्ल्यावर कचरा,कागद,बॉटल टाकू नये.

रायगड किल्ला फिरताना काही महत्वाच्या टिप्स

  1. किल्ल्यावर फिरतेवेळी गरज भासल्यास मार्गदर्शक घ्यावा.
  2. किल्ला बघण्यास अंदाजे 2 ते 3 लागतात,म्हणून पाण्याचा मुबलक साठा सोबत ठेवावा.
  3. योग्य कपडे परिधान करावे.
  4. जास्त उन असल्यास सनग्ल्यासेस आणि सनलोशनचा वापर करावा.

रायगड किल्ल्याला भेट देतेवेळी राहण्याची सोय

  1. हॉटेल झोस्टेल कोलाड
  2. हॉटेल सीबर्ड
  3. रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट आणि स्पा
  4. एन्कोर ए बुटीक रिसॉर्ट
  5. हॉटेल मुरुड मरिना 

FAQ

रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता का?

रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या. आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते.

रायगड किल्ला कोणी बांधला?

रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजींनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते.

रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे.

रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे.

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे.

रायगडाचे जुने नाव काय आहे?

रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे.

रायगडाची निर्मिती कशी झाली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये किल्ला ताब्यात घेतला, त्यावेळी तो किल्ला रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता. शिवाजी महाराजांनी नंतर या किल्ल्याचे नूतनीकरण केले आणि त्याचे नाव रायगड किल्ला असे ठेवले. हा किल्ला नंतर छत्रपती शिवाजींच्या मराठा साम्राज्याची राजधानी देखील बनला.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोणती गावे आहेत?

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड व रायगडवाडी ही गावे वसलेली आहेत.

रायगड किल्ल्याची ऊंची किती आहे?

रायगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची २९०० फूट  आहे.

रायगड चढण्यासाठी किती पायऱ्या आहेत?

रायगड चढण्यासाठी एकूण १४५० पायऱ्या आहेत.

निष्कर्ष

आम्ही आमच्या Raigad Fort Information In Marathi लेखाद्वारे रायगड किल्ल्याची माहिती दिली आहे. तुम्ही हा लेख नक्की वाचा. आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment