संत सावता माळी माहिती मराठी Sant Savta Mali Informtion In Marathi

संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वराच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना जेष्ठ असलेले, भक्ती परंपरेतले एक महान संत होते.

परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या, देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेला, सर्व चौकटी मोडत घराघरात पोहोचवले.

त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातीमध्ये, अनेक जण भक्ती पंथाला लागले आणि त्यांनी संत पद गाठले. आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातून इतरांना भक्तीचा मूल्यवान संदेश दिला.

सावता माळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्त होते. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सावता माळी अभंग रचना ही करीत असत.

काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज त्यांचे फक्त ३७ अभंगच ज्ञात आहे. पण तेवढेही पुरेसे आहेत. भक्ती शिकायला त्या अभंगाचा सार हेच की, प्रचंड उत्कट चिंतन केले की, भगवंत भेटतो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान संत सावता माळी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

संत सावता माळी माहिती मराठी Sant Savta Mali Informtion In Marathi

नाव संत सावता माळी
ओळख संत
जन्म तारीख  इ. स. १२५० 
जन्म स्थळ अरण भेंडी
आईचे नाव नांगीताबाई
वडिलांचे नाव परसोबा
पत्नीचे नाव जनाई
अपत्य विठ्ठल , नागताई
आराध्य विठ्ठल
प्रसिद्ध अभंग कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माजी | , लसून मिर्ची कोथांबिरी | अवघा झाला माझा हरी |
मृत्यू इ. स. १२९५

संत सावता माळी जन्म व प्रारंभिक जीवन

संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन १२५० मध्ये झाला. आजच्या सोलापूर जिल्ह्यातले अरण हे त्यांचे गाव. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होते.

हे वाचा –

त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही विठ्ठलाचे भक्त होते. घरची शेती सांभाळून ते विठ्ठलाचे भजन नामस्मरण करत असत. सावता माळी हे आपल्या कामातच देव पाहत असत. आपल्या शेतमळ्यात फळे, फुले, आणि भाज्या पिकवणे, हा त्यांचा दिनक्रम  होता.

Sant Savta Mali Informtion In Marathi

हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायचे, काम करता करता सतत विठ्ठलाचे स्मरण करायचे आणि आपल्या मळ्यात आपल्या झाडांमध्ये पिकांमध्ये विठोबाला बघायचे.

खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळी ही सावता माळी यांच्या आहे.

आमची माळी याची जात असेल | तर लावू बागायत |

कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी |

लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा माझा हरी |

आपल्या अभंगांमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायातल्या आणि नित्य वापरातल्या अनेक शब्दांचा आणि वस्तूंचा अशा प्रकारे उपमा देत सुंदर वापर केला. देव अशा रोजच्या वस्तू मध्ये ही पाहता येतो, हे दाखवून दिलं.

सावता माळी विठ्ठलाचे नामस्मरण, भजन कीर्तन करू लागले. रात्रंदिवस ते विठ्ठलाचे चिंतन करत असत. आपल्या आई-वडिलांची ही सेवा त्यांनी केली.

समाजातील लोकांकडून त्यांना छळ सोसावा लागला. पण त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी सगळं काही सहन केलं. त्यांना चिंता कसलीच नव्हती, कारण तारणारा विठ्ठल हा त्यांच्या पाठीशी उभा होता.

सावता माळी यांनी भक्ती मार्ग अखंड चालू ठेवला. त्यांच्या ध्यानीमनी मुखात विठ्ठलाचे नाम होतं. त्या नामाच्या प्रतापाने विठ्ठल त्यांचा अंकित झाला होता. पंढरीचा विठोबा या संताने प्रत्यक्ष पाहिलेला होता. विठोबा त्यांच्या हृदयात वास करून राहिला.

माळी समाजातील हे एक श्रेष्ठ संत होते. त्यांना भक्ती ज्ञानाची बीज फिरून, भाव भक्तीचा मळा त्यांनी फुलवला आणि कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा श्रीहरी.

सावता माळी यांच्या बद्दल आख्यायिका

सावता महाराजांनी पांडुरंगाला लपवण्यासाठी आपली छाती फोडून, बालमूर्ती ईश्वराला हृदयात ठेवून, वर उपरणं बांधून ते भजन करत राहिले.

Sant Savta Mali

पुढे संत ज्ञानेश्वर नामदेव पांडुरंगाच्या शोधात सावता महाराजांकडे आले, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावताबांच्या छातीतून निघाले. ज्ञानेश्वर नामदेव पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झाले.

विकसिले नयनस पूर्ण आले बाही, दाटले हृदयी करुणा विरसे, जाता मार्गी फक्त सावता तो माळी, आला तया जवळील पांडुरंग नामा, ज्ञानदेव राहिले बोहरी मढी, या भितर गेला देव चरणी, ठेवून माथा विनवितो सावता, बैसता पंढरीनाथा करीत पूजा.

सावता महाराज म्हणतात की, भक्तीमध्येच खरं सुख आणि आनंद आहे. आणि तीच विश्रांती सुद्धा आहे. म्हणून ते नेहमी म्हणतात, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, जेणेकरून मुक्ती द्वारा ओळखते लोकमत भक्तीचे.

संत सावता माळी वैयक्तिक जीवन

सावता माळी यांचे जवळच्याच गावातील जनाई हिच्याशी  त्यांचे लग्न झाले. त्यांना विठ्ठल व नागाताई असे एक मुलगा व एक मुलगी होते. त्यांनी आपली शेती आणि संसार करतच, विठ्ठलाची भक्ती केली.

Sant Savta Mali

ते कधीही आपले गाव आणि शेत सोडून पंढरपूरला गेले नाहीत. पण आपल्या ह्या भक्ताला भेटायला स्वतः विठ्ठल त्यांच्या घरी आला. याची आठवण म्हणून आषाढी एकादशीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात पण एकादशीनंतर, स्वतः विठ्ठलाची पालखी संत सावता माळी यांच्या गावी येते.

सावता माळी यास झाला विठ्ठलाचा साक्षात्कार

कांदा मुळा भाजी |  अवघी विठाबाई माझी | असं म्हणणारे संत सावता माळी यांची ही कथा. अरण गावात परसोबा व नांगीताबाई हे दांपत्य राहत होतं, ते भगवत भक्त होते. विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

या मुलाला लहानपणापासून ईश्वर भक्तीची ओढी लागली होती. पांडुरंगाचे पूजन, भजन तो अतिशय रंगून करत असे. त्याला लिहिता वाचता येऊ लागल्यावर, त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केलं. पोथ्या पुराण वाचून, त्याला परमेश्वर भेटीची तळमळ लागली.

संत सावता माळी

एकदा पहाटेच्या समयी एका वृक्षाखाली तो विठ्ठलाचे नामस्मरण करत बसला होता, तो अत्यंत एकाग्र झाला. हृदयात ध्यान धरून, पांडुरंगाला म्हणाला, माझे चित्त तुझ्या मंगल चरणी राहू दे.

माझ्या प्रत्येक कृतीत तुझाच अंतर्भाव होऊ दे. दश दिशांना तूच भरून राहिलेला आहेस. म्हणून मी तुझाच नाव मुखात घेत असतो. मला तुला पाहण्याचा ध्यास लागला आहे. तू माझं सर्वस्व आहेस. तुझ्यापासून मी दूर राहू शकणार नाही.

तुलाही माझ्यापासून दूर राहताच येणार नाही. सावता माळ्याचा तो उत्कट प्रेमभाव पाहून, विठ्ठल त्याच्या समोर येऊन साक्षात उभा राहिला. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवलं.

आनंदाने सावता माळी याचा कंठ भरून आला. भक्ती मार्गामुळे, मला तुझं दर्शन झालं. असं त्याने विठ्ठलाला सांगितलं आणि विठ्ठलाने सुद्धा त्याला भक्ती मार्गाचा उपदेश केला.

संत सावता माळी यांची प्रसिद्ध लोक कथा

सावता माळी त्याच्या शेतात, गव्हाचे पीक घेत असे. एके वर्षी भरपूर पीक आलं होतं, त्याच सुमारास पंढरपूर कडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना, त्यांनी थांबवून त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खुश झाले.

पण मनोमन दुखी होते, कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पीक नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की, आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना, घरी न्यायला.

सावता माळ्याने बायकोला विचारलं, तेव्हा बायको म्हणाली की, यांना धान्य वाटून सगळं संपेल. मग आपण वर्षभर काय खायचं, तेव्हा सावता माळी तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणी साचले.

तो म्हणाला हे बघ, जर निर्जीव जमिनीत एकदा दाण पेरल, तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर, तो आपल्याला उपाशी ठेवेल का ? माऊली, हे वाक्य साध्या संसारी नाही बोलू शकत, त्यांनी सर्व धान्य वाटून दिली.

धान्य वाटणाऱ्या दांपत्याला पाहायला हसायला सारा गावाला होता. नको नको ते बोलत होते. कुटाळक्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते. सारे धान्य वाटून संपलं.

दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली, पण त्याच्याकडे पेरणी करायला धान्य शिल्लक नव्हते. गावात उष्ण मागायला गेला, तरी कुणी दिलं नाही.

एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या, पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून ,वर्षभर रोज खायला. तुला पुरतील.

सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली. सारा गाव हसत होता. कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत, त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस बसेल, एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले.

साऱ्यांना आश्चर्य वाटले की, असं कधी होतं का ? पण मग त्यावरूनही ते सावत्याची मस्करी करीत, कडू भोपळ्याची राखण करण्याची जरूरच नव्हती, कारण कोण चोरणार ते, पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन, राखण करत. भजन करीत असे.

दुसऱ्याच्या शेतावर थोडी कुठे मोल मजुरी करून, मग घरी येत असे, भोपळे मोठे होता होता, लोक विचारू लागले की, तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार ? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला.

सावत्याच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता. व ते सगळे गहू सारवलेल्या जमिनीवर सांडले, सावताचे डोळे पाणावले, किती रे देवा तुला काळजी माझी.

मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागली. कोणी भोपळा चोरून नेऊन चिरला, तर त्यात गहू निघत नसे.

ही बातमी त्यावेळेस जवळच्या मूलखावर असलेल्या राजाच्या कानावर गेली व त्याने सावत्याला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून, तो राजा ही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. आपल सर्वस्व देवाला दिलं की, देवावरचे भक्तीच कर्ज चढत. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी, देवाचाही देव करतो, भक्तांची चाकरी.

आपण सगळे कडू भोपळेच असतो, कुणा सावताचे भजन व ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा विठ्ठल नामाचा महिमा आहे. सावता शब्दाचा अर्थ म्हणजे साव म्हणजे खरे. तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा, सावता हा भाववाचक शब्द होय.

संत सावता माळी समाधी

संत सावता माळी यांनी संपूर्ण आयुष्यभर विठ्ठल भक्तीचा नाम जप केला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाला समर्पित केले होते. ईश्वर प्राप्तीसाठी त्यांना संन्यास घेण्याची गरज नव्हती. संसार सुखात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्त होऊ शकतो, असे त्यांचे मत होते.

सावता महाराज त्यांच्या मळ्यामध्येच पांडुरंगाचे भजन कीर्तन करीत, पांडुरंगाचे नाम जप करीत. त्यांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंगाचे दर्शन झाले. संत सावता माळी यांना अवघ्या ४५ वर्षाचे आयुष्य लाभले होते. धार्मिक प्रबोधनाचे, भक्ती प्रसाराचे कार्य, त्यांनी निष्ठेने पूर्ण केले.

संत सावता माळी यांचे साधारणतः ३७ अभंग उपलब्ध आहेत. आषाढ्य चतुर्दशी शके १२१७ दिनांक १२  जुलै १२९५ या दिवशी संत सावता माळी यांनी समाधी घेतली. पंढरपूर जवळील अरण या ठिकाणी सर्वश्रेष्ठ संत सावता माळी यांची समाधी आहे.

आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. सावता महाराज यांनी आपले शेत व मळा सोडून, कधीच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले नव्हते, असे सांगण्यात येते. पंढरपुरातील विठ्ठल स्वतः सावता माळी यांना भेटण्यासाठी, त्यांच्या मूळ गावी अरण या ठिकाणी गेले होते.

आजही संत सावता महाराजांची पालखी, आषाढी वारीला पंढरपूर मध्ये येत नाही, तर आषाढी वारी पूर्ण झाल्यावर, पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण या ठिकाणी येते.

संत सावता माळी अभंग

१. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥

२. समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥


कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥

३. जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ॥१॥
चला जाऊ तया गावा। पाहू देवा विठ्ठला ॥२॥
वंदु संत चरण रज । तेणे काज आमुचे ॥३॥
सांवता म्हणे विटेवरी उभा सम चरणी हरी ॥४॥

४. उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥


शके बाराशें सत्रा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥

५. पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥


सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥

६. आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥
आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥
सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥

७. कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥

८. भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥
सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥

९. विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥
जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥
माथा ठेऊनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥

१० .शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥
अद्वैत वासना संतांचि संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३॥
हरि मुकुंद मुरारी…. । हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥

संत सावता माळी यांच्या बद्दल दहा ओळी

  • सावता माळी हे एक मराठी संत कवी होते.
  • सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये अरण हे सावतोबांचे गाव.
  • दैव माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते.
  • ते पंढरीचे वारकरी होते, त्यांना दोन मुले होती पुरसोबा आणि डोंगरोबा.
  • पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत.
  • पुरसोबा यांचा विवाह त्यांच्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्यांच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला.
  • या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय.
  • संत सावता माळी यांनी भेंडगावचे भानवसे रूप माळी हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी विवाह केला.
  • त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली.
  • सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्ती मध्ये रमले.
  • फुले, फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता.
  • धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचिरले.
  • संत सावता माळी हे कर्मयोगी संत होते.

चित्रपट

राजकमल कलामंदिरने प्रकाशित केलेला पहिला मराठी चित्रपट “भक्तीचा मळा” या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका मास्टर कृष्णराव, बेबी नलिनी व त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केशवराव दाते यांनी इसवी सन १९४४मध्ये केले होते.

हा चित्रपट संत सावता माळी यांच्या जीवन चरित्रावर आधारित गाजलेला संतपट आहे. याच मराठी चित्रपटाची माली ही हिंदी आवृत्ती देखील, राजकमल यांनी प्रकाशित करून, भारतभर प्रदर्शित केली होती.

या मराठी व हिंदी दोन्ही भाषेतील प्रदर्शित झालेल्या, चित्रपटांमध्ये संत सावता महाराजांची प्रमुख भूमिका संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांनी साकारली होती.

याशिवाय मास्टर कृष्णराव यांनीच या दोन्ही चित्रपटांना संगीत सुद्धा प्रदान केले होते, संत सावतामाळी भूमिकेत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे गायन देखील, स्वतःच्या आवाजामध्ये केले आहे.

भक्तीचा मळा चित्रपटातील प्रसिद्ध गाणी

  • सोड सोड ना कान्हा
  • हरी वाजवि मंजुळ मुरली
  • जाऊ चला पंढरीला
  • कुणीतरी सांगा हो सांगा,
  • राजा पंढरीचा हरी माझा आला

FAQ

१. संत सावता माळी यांचा जन्म कधी झाला?

संत सावता माळी यांचा जन्म इसवी सन १२५० मध्ये झाला. आजच्या सोलापूर जिल्ह्यातले अरण हे त्यांचे गाव.

२. कोण होते सावता माळी ?

सावता माळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्त होते. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सावता माळी अभंग रचना ही करीत असत. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज त्यांचे फक्त ३७ अभंगच ज्ञात आहे. पण तेवढेही पुरेसे आहेत. भक्ती शिकायला त्या अभंगाचा सार हेच की, प्रचंड उत्कट चिंतन केले की, भगवंत भेटतो.

३. सावता माळी यांनी केव्हा समाधी घेतली ?

इ. स. १२९५ साली आषाढी वाद्य चतुर्दशीला त्यांनी समाधी घेतली.

४. सावता माळी यांचे लग्न कोणाशी झाले होते ?

संत सावता माळी यांनी भेंडगावचे भानवसे रूप माळी हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी विवाह केला

५. सावता माळी यांचे आराध्य कोण ?

सावता माळी विठ्ठलाचे नामस्मरण, भजन कीर्तन करत . रात्रंदिवस ते विठ्ठलाचे चिंतन करत असत. आपल्या आई-वडिलांची ही सेवा त्यांनी केली.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत सावता माळी यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment