सोमनाथ मंदिर माहिती मराठी : SOMNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI
सोमनाथ मंदिर माहिती मराठी : SOMNATH TEMPLE INFORMATION IN MARATHI – गुजरात मधील, सौराष्ट्राच्या वेरावळ बंदरातील आणि प्रभासपट्टण या ठिकाणचे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग. या परिसरामध्ये वसलेल्या या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा महिमा स्कंदपुराणात तसेच महाभारतात आणि श्रीमद भागवत यामध्ये सविस्तरपणे मांडला गेला आहे. या मंदिराबाबतची माहिती (SOMNATH TEMPLE Information) आणि इतिहास (somnath temple history) आपण या लेखाद्वारे आज जाणून घेणार आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया सोमनाथ ज्योतिर्लिंग.
नाव – | श्री सोमनाथ |
दुसरे नाव – | श्री सोरटी सोमनाथ |
स्थान – | भगवान शंकर |
ज्योतिर्लिंग – | पहिले |
कुठे आहे – | गुजरात मधील सौराष्ट्र मध्ये |
समुद्र – | अरबी समुद्र |
बंदर – | वेरावळ |
जीर्णोद्धार – | इ. स. १९५५ |
कोणी केला – | सरदार वल्लभभाई पटेल |
मंदिराची उंची – | १५५ फूट |
शिखरावरील कलशाचे वजन – | १० टन |
ध्वज – | २७ फूट उंच आणि परीघ १ फूट |
सोमनाथ मंदिर इतिहास (SOMNATH TEMPLE HISTORY IN MARATHI)
भारतातील प्रसिद्ध बारा पवित्र अश्या शिवमंदिरांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराला ओळखले जाते. साधारणपणे अकराव्या शतकाच्या दरम्यानच्या काळामध्ये हे मंदिर इतके श्रीमंत होते की, या मंदिरात जवळपास ३०० संगीतकार, ५०० नर्तकी आणि ३०० सवंगडी होते. या मंदिरातील विशाल अशी २०० मण सोन्याची घंटा होती. या मंदिराचे खांब हीरे, माणिक, पाचू यांनी मढवलेले होते. मंदिराच्या गर्भगृहात रत्नदीपांची आरास रात्रंदिवस तेवत असायची. या मंदिराच्या भंडारगृहात अमाप संपत्ति ठेवलेली होती.
अफगाणिस्तानातून आलेल्या मोहम्मद गजनीने जवळपास दोन दिवसाच्या युद्धानंतर हे मंदिर आणि हे शहर ताब्यात घेतले. ज्यामध्ये असे म्हटले गेले की, ७०००० लोक मरण पावले. अद्भुत संपत्तीचे असे हे मंदिर मोहम्मद गजनीने उध्वस्त केले. त्यानंतर १२९७ तसेच १३९४ मध्ये आणि नंतर १७०६ मध्ये औरंगजेब याने मंदिराचा नाश केला. त्यानंतर १९५० पर्यंत मंदिर पुन्हा बांधले गेले नाही.
इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिर १७ वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधले गेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी सध्याच्या या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि एक डिसेंबर १९५५ रोजी भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्राला समर्पित केले.
🙏बारावे ज्योतिर्लिंग – श्री घृष्णेश्वर 🙏
सोमनाथ मंदिर स्थान नकाशा
श्री सोमनाथ मंदिर भूगोल
श्री सोमनाथ मंदिर हे गुजरातच्या सौराष्ट्रमधील, वेरावळ जवळ, प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले आहे. हे अहमदाबाद शहराच्या नैऋत्येस सुमारे ४०० किलोमीटर असून, जुनागढच्या दक्षिणेस ८२ किलोमीटर आहे. हे मंदिर गुजरातमधील दुसरे प्रमुख पुरातत्त्व क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे. हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे ०७ किलोमीटर असून, पोरबंदर विमानतळाच्या आग्नेयेस सुमारे १३० किलोमीटर आणि दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे ८५ किलोमीटर आहे.
सोमनाथ नावाचा अर्थ
सोमनाथ म्हणजे सोमचा देव, नाथ. सोम म्हणजे चंद्र आणि भगवान शंकराला आपला नाथ स्वामी मानून चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या केली. म्हणून या ज्योतिर्लिंगाला “सोमनाथ” असे नाव पडले.
सोमनाथ मंदिर माहिती
गुजरात राज्याच्या, वेरावल या ठिकाणी, समुद्रकिनारी वसलेले सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. दोन हजार वर्षापासूनचे या मंदिराचे अस्तित्व आपल्याला दिसून येते. परकीय आक्रमकांकडून सतरा वेळा मंदिर नष्ट करण्यात आले. त्या प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधले गेले.
जवळपास १५५ फुट उंच आणि मंदिराच्या शिखरावरील कलशाचे वजन सुमारे दहा टन असून ध्वज २७ फूट उंच आणि परीघ एक फूट आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार कलात्मक पद्धतीने बांधण्यात आले आहे. हे मंदिर सभा मंडप, गर्भगृह आणि नाट्यमंडप अशा तीन भागात बांधले गेले आहे.
सध्याची या मंदिराची रचना ही १९५१ ते १९५५ या पाच वर्षांमध्ये पूर्ण झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकरांचे शिवलिंग असून या मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे सोन्याचा आहे. या ठिकाणी भगवान शंकराची नित्यनेमाने पूजा केली जाते.
🙏दहावे ज्योतिर्लिंग – श्री त्र्यंबकेश्वर 🙏
सोमनाथ मंदिराचा सोन्याचा कलश
मंदिरातील जवळपास चौदाशेहून अधिक कलशांवर सोने अर्पण करण्याचे काम सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टने केले आहे. यासाठी जवळपास ५०० लोकांनी देणगी दिली. या मंदिराची व्यवस्था आणि संचालनाचे काम या मंदिराच्या ट्रस्टच्या अखत्यारीत येते. सरकारने या ट्रस्टला जमीन, बाग बगीचा, देऊन उत्पन्नाची व्यवस्था देखील केली आहे.
सोमनाथ मंदिराच्या बाणस्तंभाचे रहस्य
मंदिराच्या दक्षिणेला समुद्रकिनारी अतिशय प्राचीन असा बाणस्तंभ आहे. याचा उल्लेख सहाव्या शतकापासून आढळून येतो. पण हा बाणस्तंभ कोणी बांधला? कधी बांधला? का बांधला? हे कोणालाच माहीत नाही. तज्ञांच्या मतानुसार, हे बांधकाम दिशात्मक आहे. या बाणाच्या वरच्या टोकाला एक बाण बनवला गेला आहे. याचे तोंड समुद्राकडे आहे.
समुद्राचा दक्षिण ध्रुव म्हणजे शेवटपर्यंत अबाधित असा मार्ग, असे या बाणस्तंभावर लिहिलेले आहे. म्हणजे महासागरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोणताही अडथळा नाही, तसेच डोंगर किंवा जमीन या ठिकाणी नाही, असा याचा अर्थ होतो. त्या काळातील लोकांना दक्षिण ध्रुव कुठे आहे? किंवा पृथ्वी गोल आहे का? याची माहिती होती का? तसेच बाणस्तंभाच्या सरळ रेषेत कोणताही अडथळा नाही, हे त्यांना कसे समजले असेल? असे प्रश्न आजपर्यंत पडले आहेत आणि याबाबतची कोणालाही माहिती नाही.
🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏
सोमनाथ मंदिर परिसर
सोमनाथ मंदिराच्या कार्यासाठी आणि या मंदिराला वाचवण्यासाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिले होते, त्यांचे पुतळे या मंदिर परिसरात दिसून येतात. मंदिराच्या समोरच सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा आपल्याला पहावयास मिळतो. कारण त्यांचे योगदान खूप मोठे आहे. मंदिराच्या बाहेरील भागात अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले पारडी विनायक, नवदुर्गा, अहिल्येश्वर, अन्नपूर्णा, गणपती, काशी विश्वनाथ, हनुमानजी यांची छोटी छोटी मंदिरे आहेत.
या परिसरामध्ये एक अतिशय सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे आणि उत्तरेकडे अघोरलिंगाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मंदिरात गौरीकुंड नावाचा तलाव आहे आणि या तलावाजवळ शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. या मंदिराच्या आवारात माता अहिल्याबाई आणि महाकाली यांचे अतिशय सुंदर आणि विशाल असे मंदिर देखील पहावयास मिळते.
जवळपास दहा किलोमीटरच्या विशाल क्षेत्रामध्ये हे मंदिर पसरलेले आहे. ज्यामध्ये जवळपास ४२ मंदिरे दिसून येतात. इथे असणाऱ्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला यांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम देखील आपल्यास पहावयास मिळतो. मंदिरामध्ये पार्वती, लक्ष्मी, गंगा, सरस्वती, नंदी यांच्या मूर्ती देखील विराजमान आहेत.
सोमनाथ मंदिराची वैशिष्ट्ये
या ठिकाणी जमिनीखाली सोमनाथ लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाशाचा अभाव जाणवतो. या मंदिरामध्ये पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, गंगा आणि नंदीच्या मूर्ती ही स्थापित करण्यात आलेले आहे. जमिनीच्या वरच्या भागात अहिल्येश्वरवरची मूर्ती सुद्धा आहे. मंदिराच्या परिसरामध्ये गणेशाचे मंदिर असून उत्तरेकडच्या दरवाजाबाहेर अघोरलिंगाची मूर्ती बसविण्यात आलेली आहे. अहिल्याबाई मंदिराजवळ महाकालीचे मंदिर देखील आहे. तसेच भद्रकाली, भगवान विष्णू, गणेशजी यांची देखील मंदिरे आहेत. मंदिर परिसराजवळ गौरीकुंड नावाचा तलाव आहे. या तलावाजवळ प्राचीन शिवलिंग आहे.
समुद्र अग्निकुंड
सोमनाथ मंदिराजवळ भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी अनेक पवित्र अशी आणि निसर्गरम्य अशी ठिकाणे आहेत. पाटण या शहराबाहेर समुद्रका नावाचा अग्निकुंड देखील आहे. दर्शनासाठी येणारे भाविक या ठिकाणी कुंडामध्ये स्नान करतात आणि त्यानंतर प्राची त्रिवेणी संगम या ठिकाणी स्नान करण्यासाठी जातात.
प्राची त्रिवेणी संगम
शहराच्या वेशीपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर प्राची त्रिवेणी संगम दिसून येतो. वाटेत ब्रह्मकुंड नावाची पायरी विहीर लागते. ब्रह्मकुंड नावाचे तीर्थक्षेत्र आणि ब्रह्मेश्वराचे शिवमंदिर देखील या ठिकाणी आहे. पुढे गेल्यानंतर आदिप्रभा आणि जलप्रभा नावाची दोन कुंडे दिसून येतात. शहराच्या पूर्व दिशेला हिरण्य, सरस्वती आणि कपिला नावाच्या तीन नद्या समुद्राला मिळतात. या तिन्ही नद्यांच्या संगमामुळे या नदीला “प्राची त्रिवेणी संगम ” असे म्हटले जाते. आधी कपिला ही सरस्वतीशी सामील होते. नंतर सरस्वती हिरण्यशी जोडली जाते. त्यानंतर हिरण्य सागरात विलीन होते. या संगमापासून थोड्या अंतरावर सूर्यदेवाचे देखील मंदिर आहे. चालत गेल्यावर एका गुहेत हिंगलाज भवानी आणि महादेव सिद्धनाथाचे मंदिर दिसते.
बाणतीर्थ
वेरावळ रेल्वे स्थानकापासून सोमनाथ मंदिराकडे जाताना समुद्राच्या किनारी बाणतीर्थ आहे. या तीर्थक्षेत्रात शशीभूषण नावाच्या महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या बाणतीर्थाच्या पश्चिम दिशेला चंद्रभागा तीर्थ आहे. या तीर्थक्षेत्रात कालिकेश्वराचे महादेवाचे स्थान आहे. बाणतीर्थपासून जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावर भालूपुर गावाजवळ भालक तीर्थ आहे.
याच्या जवळच भालकुंड आणि पद्मकुंड असे दोन तलाव दिसून येतात. पिंपळाच्या झाडाखाली हे भालेश्वराचे भगवान शंकरांचे स्थान आहे. म्हणून या झाडाला मोक्षपिंपळ असे देखील म्हटले जाते. या पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्णाच्या पायावर जरा नावाच्या शिकाऱ्याने बाण मारला. त्याच्या पायातील बाण काढून या भालकुंडमध्ये टाकण्यात आल्याचे देखील सांगितले जाते.
सोमनाथ मंदिर वास्तुकला (ACHITECTURE OF SOMNATH MANDIR)
हे मंदिर प्राचीन हिंदू स्थापत्य कलेचे उत्तम असे उदाहरण आहे. येथील गुंतागुंतीच्या कामांनी झाकलेला उंच असा एक मनोरा आहे. या ठिकाणी मंदिरामध्ये प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह देखील आहे. या गर्भगृहामध्ये भगवान शंकराची मूर्ती स्थापन केलेली आहे. मंदिरामध्ये इतर देवतांना समर्पित अशी छोटी छोटी मंदिरे देखील दिसून येतात. कैलास पर्वत मेरूप्रसाद शैलीमध्ये हे मंदिर बांधले गेले आहे. सध्याचे मंदिर हे एका भारतीय कलेचे प्रतिनिधित्व करते. ज्याच्या बाहेरील भाग उत्कृष्ट कोरीव कलेने सुशोभित केलेला आहे. या मंदिराचा गाभारा हा संपूर्णपणे सोन्याचा आहे. ब्रह्मशिलावर उभारलेले हे ज्योतिर्लिंग जवळपास चार फूट उंच असून ते चंदनाने सजवलेले दिसून येते.
सोमनाथ मंदिराबाबत तथ्य
- भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे सोमनाथ मंदिर वास्तुकलेचे एक उत्तम असे उदाहरण मानले जाते. याला अनंत तीर्थ असेही म्हटले जाते.
- भगवान कृष्णाने आपले कार्य संपवून या ठिकाणाहून स्वर्गातील निवासस्थानी गेले असे देखील मानले जाते.
- सतरा वेळा परकीय आक्रमकांनी आक्रमण करून या मंदिराला उध्वस्त केले होते. तरीही प्रत्येक वेळी हिंदू राजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली होती.
- या मंदिराचा उल्लेख श्रीमद् भागवत, शिवपुराण, ऋग्वेद तसेच स्कंद पुराण या ग्रंथांमध्ये देखील या मंदिराचा उल्लेख आढळून येतो.
- कपिला, हिरण्य आणि सरस्वती यातील नद्यांचा संगम समुद्रामध्ये होतो. याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते.
- सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मांडला, त्यावेळी नेहरूंनी या प्रस्तावाला विरोध केला होता, असे मुंशी यांनी स्वातंत्र्याची तिर्थे या पुस्तकात लिहिले आहे.
सोमनाथ मंदिर दर्शन
येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन, पूजा आणि स्मरण केल्याने भगवान शंकराच्या भक्तांची सर्व पापे दूर होतात. त्याचप्रमाणे संकटे देखील दूर होतात. भगवान सोमनाथाची पूजा केल्याने भगवान शंकर त्यांना आशीर्वाद देतात, आणि जीवनातील सर्व सुख प्राप्त होते, असे समजले जाते.
सोमनाथ मंदिरातील आरती दर्शनाची वेळ आणि प्रवेश शुल्क
- सोमनाथ मंदिर सकाळी सात वाजता भाविकांना दर्शनासाठी उघडते आणि रात्री दहा वाजता बंद केले जाते.
- या मंदिरामध्ये दिवसभरातून तीन वेळा म्हणजे सकाळी सात वाजता, दुपारी बारा वाजता, संध्याकाळी सात वाजता महादेवाची आरती केली जाते.
- या मंदिरामध्ये रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये लाईट शोचा एक उत्कृष्ट अनुभव या ठिकाणी आपल्यास पहावयास मिळतो.
- दर्शन – सकाळी ०६.०० ते रात्री ०९.००
- सकाळची आरती – सकाळी ०७.०० ते ०७.३०
- दुपारची आरती – १२.०० ते १२.३०
- संध्याकाळची आरती – ०७.०० ते ०७.३०
- लाईट साऊंड शो – संध्याकाळी ०७.३० ते ०८.३० रात्री
- रात्री – ०९.०० मंदिर बंद होते.
सोमनाथ मंदिरातील लाईट अँड साऊंड शो
हा शो सोमनाथ आणि भालका तीर्थाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी सांगतो. तेथील वातावरणावर हा शो करायचा की नाही ते ठरवले जाते. भरपूर पावसामुळे हा शो रद्द सुद्धा केला जाऊ शकतो. या शोच्या तिकिटाची किंमत ही प्रतिव्यक्ती २५ रुपये आणि लहान मुलांसाठी प्रति व्यक्ती १५ रुपये अशी आहे. “जय सोमनाथ” या नावाने हा शो असून साधारणपणे एक तासाचा असतो.
या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
सोमनाथ मंदिरातील पूजा पाठ
या सोमनाथ मंदिरामध्ये खालील प्रमाणे पूजा विधी केले जातात.
१. होमात्मक अतिरुद्र
हा यज्ञ संपूर्ण महायज्ञांमध्ये सगळ्यात शक्तिशाली आणि पवित्र असा यज्ञ समजला जातो. हा यज्ञ केल्यामुळे आपली सगळी पापे धुऊन जातात. आणि शांती आणि समृद्धी प्राप्त होते. या अतिरुद्रामध्ये महारुद्राचे ११ पाठ असतात.
२. होमात्मक महारुद्र
या महारुद्र मध्ये ५६ वैदिक पंडित एका जागी रूद्राचे पाठ करतात. या मंदिराचे पुजारी मंदिरातील देवतेच्या समोर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदाचे पठण करतात.
३. होमात्मक लघुरुद्र
हा लघुरुद्र अभिषेक आपल्याला स्वास्थ्य आणि पैशांसंदर्भात संकटे दूर करण्यासाठी केला जातो. ज्याच्या पत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती ही वाईट असते, त्यांच्यासाठी हा लघुरुद्र अतिशय योग्य समजला जातो.
४. सावलक्ष संपूर्ण महामृत्युंजय जप
व्यक्तीला दीर्घायुष्य आणि चांगले आयु-आरोग्य मिळावे, यासाठी हा महामृत्युंजय अभिषेक केला जातो.
५. अन्य पूजा आणि अभिषेक
यामध्ये सवालक्ष बिल्व पूजा, कालसर्पयोग निवारणविधी, शिवपुराण पथ, महादुग्ध अभिषेक, गंगाजल अभिषेक आणि नवग्रह जप केले जातात.
सोमनाथ मंदिरातील नियम
- हे मंदिर सकाळी सहा पासून रात्री नऊ पर्यंत दर्शनासाठी उघडे असते. या कालावधीतच आपण दर्शन घेणे गरजेचे आहे.
- या मंदिर परिसरामध्ये चप्पल, शूज तसेच चामड्याच्या वस्तू नेण्यासाठी परवानगी नाही. मंदिराच्या बाहेर या वस्तू ठेवाव्या लागतात.
- या मंदिरामध्ये मोबाईल फोन, कॅमेरा या गोष्टींना सुद्धा आत नेण्यासाठी परवानगी नाही.
- मंदिरामध्ये शांतता राखणे आणि अनादर होऊ नये, याची येणाऱ्या भाविकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
सोमनाथ मंदिराला भेट देण्याचा योग्य वेळ
गुजरात राज्यातील, सौराष्ट्र मधील, वेरावल या बंदरावर समुद्रकिनाऱ्याजवळ हे सोमनाथ मंदिर आहे. पावसाळ्यामध्ये या भागामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण असते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अति उष्णता असते. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना या हंगामात त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी येण्यासाठी साधारणपणे ऑक्टोबर पासून मार्च पर्यंतचा कालावधी योग्य समजला जातो.
सोमनाथ मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे?
गुजरात मधील सौराष्ट्र या ठिकाणचे वेरावळ या बंदरावर समुद्राकिनाऱ्याजवळ हे सोमनाथ मंदिर आहे.
गुजरात राज्य हे पर्यटनच्या दृष्टीने अतिशय विकसित असल्यामुळे हे राज्य अनेक राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही विमान, बस किंवा ट्रेनने येऊ शकता.
विमान
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ हे दीव विमानतळ आहे. साधारणपणे ८० किलोमीटरच्या अंतरावर हे विमानतळ असून आजूबाजूच्या अनेक शहरांशी जोडले गेले आहे. विमानतळावरून या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही कॅब किंवा बसने येऊ शकता.
ट्रेन
या मंदिराजवळच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे वेरावळ रेल्वे स्टेशन आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रेल्वे स्टेशन वरून साधारणपणे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही कॅब किंवा ऑटोने येऊ शकता.
बस
पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले असल्यामुळे या ठिकाणचे महामार्ग अतिशय चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही खाजगी किंवा सरकारी एसी, नॉन एसी बसेस तसेच खाजगी वाहने यांनी या ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करू शकता, जो तुमच्यासाठी सुलभ असेल.
मुख्य शहरे ते सोमनाथ मंदिर अंतर
- मुंबई ते गुजरात अंतर – ६२० किलोमीटर
- पुणे ते गुजरात अंतर – ७६० किलोमीटर
- वेरावळ ते मंदिर अंतर – ८ किलोमीटर
- अहमदाबाद ते मंदिर अंतर – ४३० किलोमीटर
- पोरबंदर ते मंदिर अंतर – १३० किलोमीटर
- भावनगर ते मंदिर अंतर – २६० किलोमीटर
- जुनागड ते मंदिर अंतर – ९५ किलोमीटर
सोमनाथ मंदिर जवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
गुजरात हे पर्यटनाच्या दृष्टीने जसे विकसित आहे, त्याचप्रमाणे इथल्या खाद्य संस्कृतीसाठी म्हणून सुद्धा गुजरात राज्याला ओळखले जाते. या ठिकाणी थोडाफार राजस्थानी पदार्थांचा देखील प्रभाव दिसून येतो. गुजराती पदार्थांमध्ये गोडाचे प्रमाण जास्त असते. काठीयावाडी क्षेत्रामध्ये झणझणीत पदार्थ सुद्धा दिसून येतात. या ठिकाणच्या पदार्थांमध्ये कांदा, लसणाचा, शेव, फरसाण आणि लाल मिरचीचा वापर भरपूर असतो. तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात मिळतात.
कुठल्याही रस्सा भाजी मध्ये शेव किंवा फरसाण टाकला जातो. फापडा, खाकरा, ठेपला, खमान ढोकळा यासारखे कोरडे पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पोळ्यांना रोटला असे म्हटले जाते.
येथील उंधियु, लोचा यासारखे पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच ढोकळा, जलेबी, कचोरी, दाबेली, मुठिया यासारखे पदार्थ देखील खूप प्रसिद्ध आहेत.
सोमनाथ मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव
सोमनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रि सारखे सण मोठ्या उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा केले जातात. या दिवशी मंदिरामध्ये फुलांची आरास, दिव्यांची रोषणाई करून मंदिर सुशोभीत करण्यात येते. संपूर्ण जगभरातील लोक भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरामध्ये येत असतात.
१. श्रावण महिना
साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा मराठी महिना श्रावण महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यांमध्ये मंदिरामध्ये फुलांची आणि दिव्यांची रोषणाई करून रुद्रमंत्राचा जप केला जातो.
२. गोलोकधाम उत्सव
याला जन्माष्टमी देखील म्हटले जाते. या ठिकाणी भगवान कृष्णाच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
३. महाशिवरात्र
फेब्रुवारीच्या शेवटची आणि मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्याने महाशिवरात्री सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान शंकरांनी देवी पार्वती बरोबर विवाह केला होता. म्हणून या दिवशी कठोर पूजा, कडक उपवास, भजन तसेच अभिषेक देखील या मंदिरामध्ये केला जातो. येथील शिवलिंग हे फुलांद्वारे सजवले जाते. आणि दुधाचा अभिषेक केला जातो. या उत्सवासाठी संपूर्ण भारतभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
४. सोमनाथ स्थापना दिवस
सोमनाथ मंदिराचा स्थापन दिवस म्हणून ११ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो.
५. कार्तिक पौर्णिमा
कार्तिक पौर्णिमेच्या वेळी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा असते.
सोरटी सोमनाथ मंदिराजवळील पर्यटन स्थळे
सोमनाथ मंदिराखेरीज अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे –
१. सूरज मंदिर
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सात घोडे असलेली अशी सूर्याची प्रतिमा आहे. मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणामार्गामध्ये उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांना प्रत्येकी एक याप्रमाणे तीन कोनाडे आहेत. यामध्ये विष्णू आणि लक्ष्मी तसेच ब्रह्मासोबत सरस्वती आणि भगवान शंकरांसोबत पार्वतीच्या मूर्ती आहेत.
२. लक्ष्मीनारायण मंदिर
त्रिवेणी संगम काठावर वसलेले हे लक्ष्मीनारायण मंदिर सोमनाथ गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असे आहे. राजा साहिल वर्मा यांनीही मंदिर बांधले होते. या मंदिराच्या १८ खांबांवरील कोरीव कामांसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.
सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत या मंदिरांमध्ये आपण दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
३. देहोत्सर्ग तीर्थ
सोमनाथ मंदिरापासून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर हिरण्य नदीच्या काठावर हे मंदिर वसलेले आहे.
या पवित्र भूमीतून निजधाम पर्यंतचे दिव्य यात्रा भगवान श्रीकृष्णांनी केली होती. महाभारत, श्रीमद भागवत, विष्णुपुराण यामध्ये त्याचे संदर्भ आढळून येतात.
४. पंचपांडव गुहा
सोमनाथ मंदिराजवळील लाल घाटी या ठिकाणी असलेले हे पंचपांडव गुहा हिंदू धर्मातील लोकांकडून पुजले जाणारे गुहा मंदिर आहे. असे म्हटले जाते की, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये या मंदिरामध्ये वेळ घालवला होता. या गुहेमध्ये भगवान शंकर, भगवान राम, भगवान लक्ष्मण, माता सीता, देवी दुर्गा तसेच भगवान हनुमान यांना हे मंदिर समर्पित आहे.
५. भालका तीर्थ
सोमनाथ मंदिरातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असणारे हे प्रभास वेरावळ महामार्गावर स्थित भालकातीर्थ म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. त्यावेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाच्या पायाला हरण समजून बाण मारला होता. त्याचे संदर्भ या ठिकाणी आढळून येतात.
६. जुनागड गेट
सोमनाथ मधील सगळ्यात महत्त्वाचे असे ऐतिहासिक आकर्षणांमधील हे एक मानले जाते. प्रभास मधील मंदिरांच्या जवळील असे जवळचे स्थान आहे. जेथून वेरावळ मधून सोमनाथ शहरांमध्ये प्रवेश करण्याचा हा एकमेव रस्ता आहे.
त्यावेळी मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिराबरोबरच हे ठिकाण देखील उध्वस्त केले होते. परंतु या प्रवेशद्वाराचा एक भाग अजूनही उभा आहे. सकाळी सातपासून, संध्याकाळी सातपर्यंत आपण या ठिकाणी कधीही जाऊ शकता.
७. गीता मंदिर
या मंदिराला बिर्ला मंदिर सुद्धा म्हटले जाते. देहोत्सर्ग तीर्थ परिसरातील बिर्लांनी १९७० मध्ये हे मंदिर बांधले होते. या मंदिराला अठरा संगमरवरी खांब आहेत. हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. कारण या मंदिराच्या भिंतीवर भगवान कृष्णाच्या अनेक चित्राकृती दिसून येतात. गर्भगृहामध्ये भगवान कृष्णाच्या दोन्ही बाजूला भगवान लक्ष्मीनारायण आणि भगवान सिता – राम यांच्या मूर्ती आहेत.
८. श्री परशुराम मंदिर
परशुराम मंदिराला सोमनाथ परशुराम मंदिर सुद्धा म्हटले जाते. सोमनाथ जवळील हे सर्वात प्रसिद्ध आकर्षण आहे. ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी, भगवान परशुरामाला आशीर्वाद दिला होता त्यात त्रिवेणी संगमच्या काठावर हे मंदिर स्थापित केले आहे.
या मंदिरामध्ये भगवान हनुमान आणि भगवान गणेश यांना समर्पित असलेली छोटी मंदिरे देखील आहेत. हे मंदिर तीन मुख्य रचनांमध्ये विभागले गेले आहे सभामंडप, केंद्रीय मंडप आणि गर्भगृह.
९. भीड भंजन महादेव मंदिर
त्रिवेणी तीर्थावर स्थित असलेले हे मंदिर लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. भारतीय स्थापत्य शैली बांधले गेलेले हे मंदिर गीतामंदिराच्या अगदी जवळ आहे. भगवान विष्णूला समर्पित असणारे हे मंदिर आहे. सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत आपण या ठिकाणी दर्शनासाठी जाऊ शकतो.
१०. सोमनाथ तट
समुद्र प्रेमींसाठी तसेच आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत फिरण्यासाठी हा तट एकदम साफ आणि सुंदर असा आहे.
परंतु या ठिकाणी अतिवृष्टी होत असल्यामुळे येथील पाण्यामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही.
११. कामनाथ महादेव मंदिर
या मंदिराची वास्तुकला ही अतिशय सुंदर अशी केली गेली आहे. शांततेचा आनंद घेण्यासाठी हे एक सुंदर असे स्थान आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये स्नानकुंड आणि तलाव सुद्धा आहेत. सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत दर्शनासाठी कधीही जाऊ शकता. त्यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो.
१२. वेणेश्वर महादेव मंदिर
सोमनाथ ट्रस्ट धर्मशाळेच्या गेट जवळ हे मंदिर स्थापित केलेले आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.
या नावाच्या मागे एक महत्त्वपूर्ण असा इतिहास आहे. महंमद गजनीने सोमनाथ मंदिरावर जेव्हा आक्रमण केले त्यावेळी वेणी नावाच्या राजकुमारीला अपहरण करण्याची योजना आखली होती. स्वतःला वाचवण्यासाठी या राजकुमारीने भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकर यांनी या राजकुमारीला वाचवले होते. त्यावेळी तिच्या केसांचा एक पुंजका ज्याला आपण वेणी म्हणतो तो तिथेच राहिला होता. म्हणून या मंदिराला वेणेश्वरच्या रूपामध्ये पुजले जाते. हे मंदिर सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत दर्शनासाठी उघडे असते.
१४. गीर राष्ट्रीय उद्यान
हे एक आशियामधील सिंहाचे निवास स्थान असे समजले जाते. याला गिर असेही म्हटले जाते. हे अभयारण्य १९६५ मध्ये स्थापन झाले. जवळपास चौदाशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले हे ठिकाण, जुनागड पासून ६५ किलोमीटरच्या अंतरावर आणि सोमनाथ पासून दोन तासांच्या अंतरावर आहे.
१३. सना गुहा
ही एक बौद्ध गुहा असून जवळपास सोमनाथ वेरावळ पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीवर पसरलेल्या ६२ दगडी गुहांची अनोखी रचना आणि प्रत्येकावरची नक्षीकाम हे अद्वितीय आहे. यामध्ये स्तूप, चैत्यगृह यांचा समावेश आहे. या लेण्या इतिहासपूर्व पहिल्या शतकाच्या आसपास बांधल्या गेल्या असाव्यात असे सांगितले जाते.
१५. त्रिवेणी घाट
या घाटाला त्रिवेणी संगम किंवा त्रिवेणी संगम स्नान घाट असे देखील म्हटले जाते. सोमनाथ मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे एक मानले जाते. सरस्वती, हिरण्य आणि कपिला यांच्या संगमाच्या ठिकाणी वसलेले हे एक सर्वोत्तम असे ठिकाण आहे. असे म्हटले जाते की, या संगमाच्या स्नान घाटाच्या पवित्र पाण्यामध्ये डुबकी मारली तर आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो, तसेच परमात्म्यात विलीन होऊन मोक्ष प्राप्त होतो, असे देखील समजले जाते.
१६. प्रभास पाटन संग्रहालय
प्राचीन मूर्ती, मंदिरांचे अवशेष तसेच जुने दगड यांच्या माध्यमातून या शहराच्या इतिहासाच्या बाबतीत या ठिकाणी खूप काही बघायला मिळते.
सोमनाथ मंदिराचे प्राचीन तुकडे देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे जतन करून ठेवल्याचे दिसून येते. इतिहास प्रेमी आणि पुरातत्त्व प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण समजले जाते. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपण या ठिकाणी भेट देऊ शकता. याचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती पाच रुपये आणि आपल्याला कॅमेरा घेऊन जायचं असेल तर प्रति व्यक्ती शंभर रुपये असे शुल्क आकारले जाते.
१६. हरिहर वन
त्रिवेणी संगमावर वसलेले हे एक सुंदर असे उद्यान सोमनाथ मधील भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी असे मानले जाते. उंच झाडांच्या छतांनी तसेच हिरवाईने वेढलेले असे आहे.
सोमनाथ मंदिराजवळील प्रसिद्ध हॉटेल्स
भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग होय. या ठिकाणी संपूर्ण जगभरातून हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी सोरटी सोमनाथ विश्रामगृह देखील बांधलेले आहे. तसेच आपल्या बजेटनुसार या ठिकाणी एसी, नॉन एसी हॉटेल्स देखील बांधली गेली आहेत. त्यातील काही प्रमुख हॉटेल्स खालील प्रमाणे
- हॉटेल मधुराम
- हॉटेल श्री राधे
- हॉटेल सितारा
- हॉटेल सोमनाथ अतिथी गृह
- हॉटेल राजधानी
- सागर दर्शन गेस्ट हाऊस
- द्वारकेश फार्म अँड रिसॉर्ट
- हॉटेल सोमनाथ सागर
- हॉटेल तुलसी
सोमनाथ मंदिर कथा (SOMNATH TEMPLE STORY IN MARATHI)
पौराणिक कथेनुसार सोम म्हणजे चंद्र याने राजा दक्ष प्रजापतीच्या २७ मुलींशी विवाह केला होता. परंतु त्यातील रोहिणी नावाच्या पत्नी वर त्याचे अधिक प्रेम होते. बाकीच्या मुलींवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाला शाप दिला की, आजपासून तुझे तेज कमी होईल. त्यामुळे चंद्राची चमक दर दिवशी कमी होऊ लागली. शापाने दुःखी झालेल्या चंद्राने भगवान शंकराची आराधना सुरू केली. शेवटी भगवान शंकर प्रसन्न होऊन चंद्राचा शाप दूर केला. त्याच वेळी चंद्राचे दुःख दूर करणाऱ्या भगवान शंकरांची या ठिकाणी स्थापना झाली. म्हणून त्याचे नाव “सोमनाथ” असे ठेवण्यात आले.
FAQ
सोमनाथ मंदिर कुठे आहे?
श्री सोमनाथ मंदिर हे गुजरातच्या सौराष्ट्रमधील, वेरावळ जवळ, प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले आहे. हे अहमदाबाद शहराच्या नैऋत्येस सुमारे ४०० किलोमीटर असून, जुनागढच्या दक्षिणेस ८२ किलोमीटर आहे. हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे ०७ किलोमीटर असून, पोरबंदर विमानतळाच्या आग्नेयेस सुमारे १३० किलोमीटर आणि दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे ८५ किलोमीटर आहे.
सोमनाथ मंदिराचे दुसरे नाव काय?
सोमनाथ मंदिराचे दुसरे नाव “सोरटी सोमनाथ” असे आहे.
सध्याचे सोमनाथ मंदिर कोणी बांधले?
सोमनाथ मंदिर १७ वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधले गेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी सध्याच्या या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि एक डिसेंबर १९५५ रोजी भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्राला समर्पित केले.
सोमनाथ हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?
सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे.
सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत?
सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
सोमनाथ मंदिराचे प्रवेश शुल्क किती आहे?
सोमनाथ मंदिरामध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो.
निष्कर्ष
सोमनाथ मंदिर आणि त्याबाबतची माहिती (सोरटी सोमनाथ मंदिर माहिती मराठी) आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार 🙏🙏
अत्यंत चांगली व सविस्तर माहिती मिळाली. आभारी आहे. आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रुप सहलीचे भेट देणार आहोत.