MAHASHIVRATRI INFORMATION IN MARATHI LANGUAGE : महाशिवरात्र संपूर्ण माहिती मराठी

MAHASHIVRATRI INFORMATION IN MARATHI LANGUAGE : महाशिवरात्र संपूर्ण माहिती : फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षाचे चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. २०२४ या वर्षामध्ये महाशिवरात्री ८ मार्च २०२४ शुक्रवारी या दिवशी साजरी होईल.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये अनेक सण आपण साजरे करत असतो. त्या दिवसाची विविध कारणे, तसेच ऐतिहासिक घटना जीवनाच्या काही टप्प्यांशी संबंधित असा तो दिवस, उत्सव म्हणून आपण साजरा करतो. परंतु महाशिवरात्र हा उत्सव पुराण काळात घडलेल्या घटनानुसार आपण साजरा करतो. या महाशिवरात्रीचा इतिहास, याचे महत्त्व, महाशिवरात्र कशी साजरी केली जाते याबाबतची महाशिवरात्र संपूर्ण माहिती मराठी , आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेबपेज द्वारे आपणासाठी घेऊन आलो आहोत.

Table of Contents

MAHASHIVRATRI INFORMATION IN MARATHI LANGUAGE महाशिवरात्र संपूर्ण माहिती मराठी

महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते या दिवसाची शिवभक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये तरीही रात्र भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करावे जी एक वेगळ्या प्रकारची शक्ती प्रदान करते म्हणून ही रात्र भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ अशी मानली जाते.

MAHASHIVRATRI INFORMATION IN MARATHI

महाशिवरात्रीचा इतिहास (HISTORY OF MAHASHIVRATRI)

  • या दिवशी भगवान शंकराचा आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो.
  • काही पुराणातील कथेनुसार या दिवशी भगवान शंकर तांडव नृत्य करतात.
  • आपल्या हातून घडून गेलेल्या पापांना धुण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी, तसेच आपल्यावरील संकटे दूर लोटण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असा काही लोकांचा समज आहे.
  • या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती, म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. असेही म्हटले जाते.
  • काही पुराणातील कथाानुसार, या दिवशी भगवान शिवाने दुधाच्या सागरात निर्माण झालेले विष घेऊन, इतर देवी देवतांचे संरक्षण केले होते. म्हणूनच त्याला निळकंठ असे नाव पडले.
  • काहींच्या मते खूप वर्षाच्या ध्यानानंतर भगवान शंकर एका ठिकाणी स्थिर झाले, हा दिवस महाशिवरात्र म्हणजेच, शांततेची रात्र म्हणून साजरी करतात.

महाशिवरात्र

सण महाशिवरात्र
देव – भगवान शंकर
पूजा – शिवलिंग
उत्सव शिवउपासना, व्रत उपवास
कुठे साजरा केला जातो संपूर्ण भारत
महिनाफाल्गुन कृष्ण चतुर्दशी

शिवरात्र आणि महाशिवरात्र यांच्यातील फरक

  • शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येते तर महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते.
  • प्रत्येक चंद्र महिन्याच्या चौदाव्या दिवशी शिवरात्री येते, म्हणजेच ती अमावस्येच्या आदल्या दिवशी देखील असू शकते, जी वर्षातून बारा वेळा येते.
  • साधारणपणे बारा शिवरात्रीपैकी फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान येणारी महाशिवरात्र म्हणजेच सर्वात महत्त्वाची शिवरात्र समजली जाते.

महाशिवरात्र अर्थ आणि इतिहास (MEANING OF MAHASHIVRATRI)

संस्कृत शब्द “महा” म्हणजे महान आणि “शिवरात्र” म्हणजे शिवाची रात्र म्हणून त्यांना एकत्रितपणे “महाशिवरात्र” ही संज्ञा तयार होते. आणि त्याचा अर्थ “शिवाची महान रात्र” असा होतो. हिंदू धर्मातील सर्व आदरणीय देवांपैकी एक म्हणजे देवांचे देव महादेव भगवान शंकर, यांच्या पूजनार्थ हा वार्षिक हिंदू उत्सव संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो

महाशिवरात्रीचे महत्व (IMPORTANCE OF MAHASHIVRATRI)

या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. त्यामुळे हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. शिवपुराणात असेही सांगितले जाते की, या दिवशी भगवान शंकर आणि माता-पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी आपण शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना करतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही केला जातो. शिवलीलामृत सारखी शंकराची महिमा सांगणारे ग्रंथ सुद्धा वाचले जातात. महाशिवरात्रीचा उपास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होऊन, सकारात्मक चांगले विचार निर्माण होतात, अशी शिवभक्तांची धारण आहे. या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या धारणेमुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, असेही सांगितले जाते.

महाशिवरात्रीचे व्रत (VRAT OF MAHASHIVRATRI)

  • या व्रताच्या दिवशी कडक उपवास केला जातो. हिंदू धर्मातील बहुतांशी व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करतात. या दिवशी अल्पोपहार, म्हणजे पाणी, दूध, फलाहार याचे सेवन केले जाते. या उपवासामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात.
  • या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पर्यंत म्हणजेच २४ तास उपवास करण्याची पद्धत आहे.
  • वैज्ञानिक दृष्टीने 24 तासांचा हा उपवास शरीराला डिटॉक्स करण्यास आणि शरीराचे संतुलन रखण्यास मदत करतो
  • हा उपवास प्रत्येक घराघरांमध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये केला जातो. यामुळे एकमेकांना प्रोत्साहन देऊन देवाचे नामस्मरण केल्यामुळे थकल्याची किंवा भूक लागल्याची जाणीव होत नाही

महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व

हिंदू संस्कृतीमध्ये आध्यात्मिक मार्गाचे अनेक लोक आहेत. या सगळ्यांसाठी महाशिवरात्र एक महत्त्वाचा उत्सव आहे. आध्यात्मिक दृष्ट्या महाशिवरात्र हा असा एक दिवस आहे, जेव्हा ग्रहाचा उत्तर गोलार्ध एका अद्वितीय स्थानावर असतो यामुळे सर्व सजीवांना ऊर्जेच्या मुबलक स्त्रोतापर्यंत प्रवेश मिळतो.
अध्यात्मदृष्टीने या दिवशी लोकांना अनेक अनोखे आणि वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव मिळू शकतात. म्हणूनच रात्रीच्या नाम-जप-मंत्र उच्चार यामुळे लोकांना आध्यात्मिक प्रवृत्तीची जाणीव होते.

महाशिवरात्रीचे व्रत कधी सुरू आणि बंद करावे

महाशिवरात्रीचा उपवास आणि व्रत महाशिवरात्रीच्या सकाळी सुरू करावे. ते संपूर्ण २४ तास दिवस रात्र चालू असते. २४ तासानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास करणाऱ्या लोकांनी उपवास सोडण्यास हरकत नाही.

महाशिवरात्री

महाशिवरात्रीची पूजा (POOJA OF MAHASHIVRATRI)

रात्री करावयाची यमपूजा

महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी, चार पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितलेले आहे. याच पूजेला यमपूजा असे म्हणतात.
चार प्रहरी केल्या जाणाऱ्या चार पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभ्यंग स्नान घालावे. त्यानंतर धोत्रा, बेलपत्र वहावी. तांदळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान करावे. नृत्य, गाणी, कथाकथन इत्यादी गोष्टींनी ही रात्र जागवावी. पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावे आणि आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. १२ किंवा २४ वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

भगवान शंकराच्या पूजेची वैशिष्ट्ये

  • भगवान शंकराचे निराकार प्रतीक म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते. ही पूजा करताना पाणी दूध किंवा पंचामृत याचा अभिषेक केला जातो.
  • शिवपिंडीवर हळद-कुंकू तसेच सिंदूर, तुळशीची पाने अर्पण करू नयेत.
  • भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढरा अक्षतांचा वापर करावा.
  • भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढरी फुले, बेलपत्र, भस्म याचा वापर करावा.
  • भगवान शंकराच्या शिवलिंगाला अर्धवट चंद्राकार प्रदक्षिणा घालावी.

पूजा साहित्य

बेलपत्रभस्मगाईचे दूधशमीअक्षताभांग
फुलांचा हारगूळदानवस्तुसाखरचंदनदही
पांढरी फुलेविडाधोतराजानवेप्रसादसाडी
निरंजनफळे सुपारी सुटे पैसे कपूर समई
कपडेतूप नारळ वस्त्र वाती दूध
काडेपेटी धान्य समई अगरबत्ती अबीर दही
पंचामृत धूप हळद कुंकू मधपाने

महाशिवरात्री पूजा विधी

  • महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करणे.
  • वर दिलेले पूजा साहित्य व्यवस्थित मांडून घेणे.
  • पूजा करताना पाट किंवा कापडी आसन घेऊन बसावे.
  • सर्वप्रथम शिवलिंगावर दही, तूप, मध, साखर आणि पाण्याने अभिषेक करावा.
  • नंतर शिवाला वस्त्रे घालावी.
  • त्यानंतर शिवाला जानवे घालावे.
  • यानंतर चंदन आणि भस्म लावून फुलांचा हार घालावा.
  • त्यानंतर अक्षता बेलपत्र आणि धोतरा पांढरी फुले अर्पण करावीत.
  • फळांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर निरंजन, अगरबत्तीने ओवाळून घ्यावे
  • आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करावे.
  • शिवलीलामृत किंवा शिवकथा, शिवस्तुती वाचून घ्यावे.
  • “ओम नमः शिवाय” चा जप करावा.
  • भगवान शंकराची आरती करावी.
  • माता पार्वती, गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकराची क्षमा मागावी.
  • साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी.

अशाप्रकारे महाशिवरात्रीला या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तसेच तुमच्या वरील संकटे दूर करतील.

महाशिवरात्री जागरणाचे फायदे

महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते या दिवसाची शिवभक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये तरीही रात्र भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करावे जी एक वेगळ्या प्रकारची शक्ती प्रदान करते म्हणून ही रात्र भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ अशी मानली जाते.
या रात्री ध्यानस्थ मुद्रेत बसून मंत्रोच्चार करावा. यामुळे केवळ धार्मिक मार्गावर चालणाऱ्यांनाच नाही तर इतर लोकांना याचा फायदा होतो. असे समजले जाते की शिवरात्रीच्या रात्री जागरण करून भगवान शंकराची पूजा आणि ध्यान केल्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे?

  • भगवान शंकराला बेलपत्र आवडते आहे. त्यामुळे तीन पानांचे बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे
  • भगवान शंकराला भांग खूप प्रिय आहे. म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशा चार प्रहरी रुद्राष्टकाचे पठण करावे. तसेच ओम नमः शिवाय याचाही जप करावा. त्यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • या दिवशी सहा मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे भक्ताच्या धन आणि आरोग्य संबंधीच्या समस्या दूर होतात.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सगळे रोग दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी मिठापासून अकरा शिवलिंगे व बनवून ११ वेळा अभिषेक करावा यामुळे मुलांसंदर्भातल्या सगळ्या समस्या दूर होतात.
  • दूध पाणी मध, दही याचा अभिषेक भगवान शंकराला करावा.
  • भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला असल्यामुळे त्यांच्या लग्नाचे चित्र पूजा ग्रह ठेवून त्याची रोज पूजा केल्याने वैवाहिक नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

शिवाला बेल कसा वहावा?

बेलाचे पान भगवान शंकराला अतिशय आवडीचे आहे. बेलपत्र वाहताना पानाचा देठ पिंडीकडे आणि बेलाचा पुढचा भाग आपल्याकडे तसेच तो पूर्णपणे उपडी करून वहावा. भगवान शंकराला बेल वाहताना ताजा मिळाला नाही तर शिळा सुद्धा वाहू शकतो. भगवान शंकराला वाहिला जाणारा बेल हा सोमवार या दिवशी काढू नये.

mahashivratri

बेलपत्र अर्पण करताना काय करावे?

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे. बेलाचे पान हे तीन पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त असू नये. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये.

शिव पिंडीचे दर्शन घेताना काय करावे?

शिवपिंडीतून बाहेर पडणारे तेज, हे पूजा करणाऱ्याला तसेच दर्शन करणाऱ्याला सहन होणारे नसते. म्हणून शिव पिंडीचे दर्शन घेताना नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे, असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीच्या दोन्ही शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यावर ठेवलेली आपली दोन बोटे, यांच्यामधील पोकळीतून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे.

शिवलिंगाला प्रदक्षिणा घालताना काय करावे?

महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे शिवलिंगाची प्रदर्शना ही नेहमी अर्धवटच केली जाते. शिवलिंगावर अभिषेक करताना चे पाणी दूध तसेच त्यावर वाहिले गेलेली फुले आणि बिल्वपत्र हे ज्या नालीने बाहेर सोडले जाते, तिथपर्यंत प्रदक्षिणा करावी. ती नाली ओलांडून जाऊ नये म्हणूनच शंकराला चंद्रकोर आकाराची प्रदक्षिणा घालावी.

शिवलिंगावर अभिषेक करताना काय करावे?

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शंखाने अभिषेक करू नये. पुराण कथेनुसार भगवान शंकराने शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला जात नाही. भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंख ठेवणे हे निषिद्ध समजले जाते.

रुद्राभिषेक का करावा ?

महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते. तसेच सुख-समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळी संकटे दूर होतात.

रुद्राभिषेक करण्याचे फायदे

इच्छित फळ प्राप्त होते – महाशिवरात्रीच्या दिवशी विधिपूर्वक रुद्राभिषेक केल्यामुळे रुद्राभिषेक करणाऱ्यासाठी ते शुभ समजले जाते. नोकरी धंद्यामध्ये अडीअडचणी किंवा पैशाची समस्या असेल किंवा एखादी मनातील इच्छा पूर्ण होत नसेल, तर त्यांनी रुद्राभिषेक अवश्य करावा. ज्यामुळे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

मनः शांती – शिवलिंगा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. ज्याचा परिणाम मनावर होऊन आपले मन शांत होते. तसेच मानसिक आजारापासूनही मुक्तता मिळते.

नकारात्मकता – तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल, तर या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा. त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व समस्या संकटे सुद्धा दूर होतात.

ग्रहदोष – महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्यामुळे ग्रहदोष दूर होतात. कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असेल, तर त्यापासून मुक्ती मिळवून आपल्याला शांतता लाभते.

शिवलिंगावर कोणत्या गोष्टी वाहू नयेत?

भगवान शंकराचे निराकारी प्रतीक म्हणून शिवलिंग पुजले जाते.. तसेच हे शिवलिंग पुरुष असल्यामुळे हळद, कुंकू, सिंदूर. रंगोळी यासारख्या वस्तू शिवलिंगाला अर्पण करू नयेत. कारण या वस्तू स्त्रीशी संबंधित आहेत.

महाशिवरात्र संपूर्ण माहिती

शिवलिंगावर ही फुले अर्पण करू नयेत?

महाशिवरात्रीला शिवलिंगाला फार महत्त्व आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीची पाने, केतकी, कणेर, कमळाची फुले अर्पण केली जात नाहीत. शिवपुराणानुसार या फुलांना निशिद्ध सांगितले गेले आहे. म्हणूनच पूजा करताना या गोष्टी ठेवू नयेत. बेलपत्र, पांढरी फुले, तसेच धोतरा यासारखी फुले शंकराला अर्पण करू शकतो.

महाशिवरात्र व्रताचे फायदे

भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि आराधना केल्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. विवाह झालेल्या महिला किंवा पुरुष यांनी केलेल्या व्रतामुळे त्यांना संसारामध्ये सुख, सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद भगवान शंकराकडून मिळतो. तसेच अविवाहित लोकांनी व्रत उपवास केल्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळतो. असे देखील सांगितले जाते.

महाशिवरात्र का साजरी केली जाते ?

  • महाशिवरात्रीच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. त्यामुळे हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. शिवपुराणात असेही सांगितले जाते की, या दिवशी भगवान शंकर आणि माता-पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी आपण शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना करतो. “ओम नमःशिवाय” या मंत्राचा जपही केला जातो. शिवलीलामृत सारखी शंकराची महिमा सांगणारी पोथी ही वाचली जाते . महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होऊन सकारात्मक, चांगले विचार निर्माण होतात अशी शिवभक्तांची धारणा आहे. या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या धारणेमुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असेही सांगितले जाते.
  • महाशिवरात्रीच्या विविध आस्था वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये विचारात घेतल्या आहेत. असे म्हणतात की प्रारंभी भगवान शंकराचे केवळ निराकार रूप होते. भारतीय ग्रंथांनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मध्यरात्री भगवान शिव निराकारातून प्राकृत रूपात आले.
  • या श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिव आपल्या लिंग रूपात प्रकट झाले होते. काही हिंदू मान्यतेनुसार, या दिवसापासून विश्वाची निर्मिती झाली. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव करोडो सूर्यासारखे तेज असलेल्या लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते.
  • भारतीय मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला सूर्य आणि चंद्र जवळ राहतात. हा दिवस शीतल चंद्र आणि रौद्र शिवाच्या सूर्याची भेट मानला जातो. त्यामुळे ही चतुर्दशी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.

महाशिवरात्र व्रत करताना घ्यावयाची काळजी

  • महाशिवरात्रीचे हे व्रत तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर दिवसभर तुम्ही आपल्या आरोग्याची आपल्या तब्येतीची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  • उपवासामुळे थकवा येऊ नये म्हणून दिवसभर नारळाचे पाणी पिणे आवश्यक आहे.
  • उपवास करताना चक्कर येण्याची शक्यता असल्यास फळांचा रस किंवा दूध पिणे आवश्यक आहे.
  • दिवसभराच्या कडक उपवासामुळे आपल्याला चक्कर येण्याची तसेच अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ आणि साखर मिसळलेले पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे अशक्तपणा येणार नाही.
  • या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी यासारखे पदार्थ खाण्यास हरकत नाही.
  • आपल्या तब्येतीनुसार हा उपवास आपल्याला करायचा असल्यास त्या संदर्भात डॉक्टरांशी बोलणे आणि त्यांची परवानगी घेणे आवश्यक असते.

महाशिवरात्रीच्या 2024 चा शुभमुहूर्त (MAHASHIVRATRI 2024)

फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षाचे चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. २०२४ या वर्षांमध्ये महाशिवरात्री ८ मार्च २०२४ शुक्रवारी या दिवशी साजरी होईल.

फाल्गुन महिना महाशिवरात्र २०२४
तिथी आरंभ ८ मार्च रात्री ९.५७
तिथी समाप्ती ९ मार्च संध्याकाळी ६.१७

२०२४ महाशिवरात्री ८ मार्च ला आहे.

महाशिवरात्र उपवासाचे नियम

  • महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम आपले घर स्वच्छ करून स्नान करावे.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी काही भाविक फळ फळावळ खातात तर काही भावीक निर्जळी उपवास करतात. आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या प्रकृतीनुसार हा उपवास आपण करू शकतो
  • फलाहार करून उपवास करणारे लोक दिवसभर फळे आणि दूध यांचा आहारात समावेश करतात
  • महाशिवरात्रीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, गव्हाच्या पिठाची पुरी, बटाट्याचा कीस, हलवा, भगर यासारखे पदार्थ खाऊ शकतात
  • उपवासाच्या दिवशी काही जण नारळ दूध, मसाला दूध, खजूर, फळे, शिंगाड्याचे पीठ यासारखे पदार्थ खाऊ शकतात

महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा

  • औंढा नागनाथ
  • घृष्णेश्वर संभाजीनगर
  • परळी वैजनाथ बीड
  • भीमाशंकर पुणे
  • कवठेमहाकाळ सांगली
  • धूतपापेश्वर राजापूर
  • कुणकेश्वर देवगड
  • कलेश्वर नेरूर
  • श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर लातूर
  • कोटेश्वर सातारा
  • नागनाथ मंदिर पालघर
  • खडकेश्वर संभाजीनगर

यासारख्या काही प्रमुख ठिकाणी महाराष्ट्र मध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये यात्रा भरवल्या जातात

mahashivratri

महाशिवरात्र भारतामध्ये कुठे कुठे साजरी केली जाते ?

भगवान शंकराच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण उत्सव म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराची पूजा करून तसेच कडक उपवास केला जातो. भगवान शंकराचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता यामुळे हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.

  • सोमनाथ गुजरात
  • मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश
  • महाकालेश्वर मध्य प्रदेश
  • ओंकारेश्वर मध्य प्रदेश
  • रामेश्वर तामिळनाडू
  • विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश
  • केदारनाथ उत्तराखंड

यासारख्या प्रमुख ठिकाणी संपूर्ण भारतभरात महाशिवरात्री साजरी केली जाते.

भारतातील बारा ज्योतिर्लिंगे

देवांचे देव महादेव आणि भोलेनाथ असणाऱ्या या भगवान शंकराची भारतामध्ये असणारी बारा ज्योतिर्लिंगे आहेत. हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या स्थानांवर ही ज्योतिर्लिंगे स्थापन करण्यात आली. शिवपुराणांमध्ये यांच्या कथाही सांगितल्या आहेत.

  • १. श्री क्षेत्र सोमनाथ, गुजरात
  • २. श्री शैलम मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश
  • ३. श्री महाकालेश्वर, मध्य प्रदेश
  • ४. श्री ओंकारेश्वर, उज्जैन मध्य प्रदेश
  • ५. श्री परळी वैजनाथ बीड, महाराष्ट्र
  • ६. श्री भीमाशंकर पुणे, महाराष्ट्र
  • ७. श्री रामेश्वर, तामिळनाडू
  • ८. श्री नागेश्वर, गुजरात
  • ९. श्री विश्वेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश
  • १०. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र
  • ११. केदारनाथ, उत्तराखंड
  • १२. श्री घृष्णेश्वर, संभाजीनगर, महाराष्ट्र

महाशिवरात्रीची सांगता

  • महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करावे .
  • पुन्हा पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन यथासांग पूजा करून आराधना करावी.
  • पुजेमध्ये काही राहून गेल्यास तशी क्षमा मागून सगळे छान करावे अशी प्रार्थना करणे.
  • त्यानंतर उत्तरपुजेची अक्षता वाहून निर्माल्याचे विसर्जन करावे.
  • सगळ्यांना प्रसाद वाटून उपवास सोडावा.

आमचे हे लेख सुद्धा नक्की वाचा :👇

महाशिवरात्र कथा (STORY OF MAHASHIVRATRI)

महाशिवरात्र कथा पहिली

ज्यावेळी समुद्रमंथन झाले, त्यावेळी सृष्टीशी निगडित सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती झाली. त्याच वेळी या समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले . या विषामध्ये ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची ताकद फक्त भगवान शंकरांमध्येच होती. त्यामुळे भगवान शंकरांनी हलाहल विष स्वतः प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा झाला. म्हणूनच त्यांना “निळकंठ” असेही म्हणतात. या मिश्रणामुळे त्यांच्या संपूर्ण देहाचा दाह दाह होत होता.

वैद्यांनी त्यांना संपूर्ण रात्र जागविण्याचा उपाय सांगितला. तसेच सर्व देवांनी भगवान शंकरांना बरे वाटायला हवे म्हणून त्या रात्री गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. संपूर्ण अंगाच्या होणाऱ्या दाहा मुळे भगवान शंकरांनी सुद्धा या दिवशी नृत्य केले होते. यामुळे त्यांना बरे वाटले व त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या सगळ्या गोष्टींमुळे सृष्टी वाचली होती. म्हणून हा दिवस महाशिवरात्रीचा म्हणजेच “शिवाची महान रात्र” म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच महाशिवरात्रीच्या रात्री भजन, महारुद्र, गायन, शिव महात्म्य वाचून रात्र जागविली जाते.

महाशिवरात्र कथा दुसरी

शिवपुराणांमध्ये दुसरी एक कथा अशी ही सांगितली जाते की, एक शिकारी जंगलामध्ये शिकार शोधण्याकरता झाडावर जाऊन बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला काही शिकार मिळाली नाही. संध्याकाळी हरणांचा एक कळप तिथे एका तलावामध्ये पाणी पिण्याकरता आला होता हे बघून त्या शिकाऱ्याला खूप आनंद झाला. तो शिकारी बाण सोडणार, तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन त्या शिकाऱ्याला म्हणाली की, हे शिकाऱ्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो की मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे.

हरणाने त्याला तसे वचनही दिले. त्यामुळे शिकाऱ्याने त्याची ही विनंती मान्य केली. तेथूनच दूरवर मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जयघोष कानावर येत होता. शिकारी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. रिकामा वेळ म्हणून एकेक पान तो त्या झाडाखाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती. नकळत का होईना, परंतु त्या शिकाऱ्याच्या हातून शिवलिंगाची पूजा घडत होती.

हरणाने दिलेल्या वचनानुसार ते पुन्हा आले आणि शिकाऱ्याला म्हणू लागले की, आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य पार पाडून आलो आहे. तेव्हा पाठोपाठ आलेल्या हरणी ने म्हटले की, हे शिकाऱ्या त्यांना नको मारू, मला मार जेणेकरून माझे पतिधर्माचे कर्तव्य मला पार पाडायचे आहे. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या हरणाच्या पिल्लांनी पुढे येऊन त्या शिकाऱ्याला विनंती केली की, आईला आणि बाबांना मारू नकोस, आम्हाला मार. जेणेकरून आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. हे सगळे ऐकून शिकार्‍याच्या मनात विचार आला की, हे प्राणी सुद्धा आपापल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म का सोडून देऊ? त्याने सर्वांना जीवनदान दिले.

भगवान शंकर हे सर्व पाहत होते. यामुळे हरणावर आणि शिकाऱ्यावर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. हरिणाला “मृग नक्षत्र” व शिकाऱ्याला “व्याघ्र नक्षत्र” म्हणून आकाशामध्ये नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला, तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस होता.

एकदा पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? त्यावर उत्तर देताना भगवान शंकर माता पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगू लागले.ती अशी –

एका गावामध्ये एक शिकारी राहत होता. मुक्या प्राण्यांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होता. तसेच तो सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा कर्जदाराही होता. वेळेवर कर्ज न फेडल्यामुळे संताप होऊन शेवटी सावकाराने त्या शिकार्‍याला कैदी बनवले. तो दिवस होता महाशिवरात्र. शिकारी ध्यानमग्न होऊन भगवान शंकराच्या धार्मिक गोष्टी ऐकत होता. त्याने शिवरात्रीची कथा ऐकली होती. संध्याकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडतो असं वचन देऊन कैदेतून सुटला.

दररोज प्रमाणे तो शिकारीसाठी जंगलात निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे उपाशी राहून तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो एका तलावाकाठच्या झाडावर मचाण बांधू लागला. ते झाड होते बेलाचे. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनवताना त्यांनी ज्या फांद्या तोडल्या, त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. अशा प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रत आणि पूजा पूर्ण झाली.

रात्रीच्या प्रहरी एक गर्भिण हरीण तलावावर पाणी पिण्यासाठी आली होती. हे बघून शिकारी खूप आनंदी झाला. त्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरीण म्हणाली, मी गर्भिण आहे. तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करू नकोस. हे योग्य नाही. मी माझ्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन, तेव्हा तू मला मार. असे तिने वचन दिले. तिच्या या विनंतीने शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरीण तेथून निघून गेली.

थोड्या वेळाने आणखी एक हरणी तिथून पाणी पिण्यासाठी आली होती यावेळीही शिकाऱ्याला आनंद झाला. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरीणी ने त्याला सांगितले की, हे शिकाऱ्या, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या शोधात आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन. तिच्या या विनंतीने शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. दोन वेळा शिकार हातातून गेल्यामुळे तो दुःखी होता. तेवढ्यात तिसरी हरीण आपल्या पिलासोबत तेथून निघाली.

शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी म्हणाली, हे शिकाऱ्या, मी माझ्या पिलांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तु मला मारू नकोस. यावेळी शिकारी हसला. आणि म्हणाला आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाहीये. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यावर हरीनी म्हणाली, जशी तुला तुझ्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही माझ्या मुलांची काळजी वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन. हरणीच्या त्या व्याकुळ विनंतीने शिकाऱ्याला त्याची दया आली. त्याने तिला जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता.

थोड्या वेळाने एक धष्टपुष्ट हरीण त्या रस्त्यावरून त्या तलावाजवळून जात होते. आता या हरणाची शिकार करावी असा विचार करून त्याने त्याच्यावर नेम धरला. ते हरिण दिनवाण्या स्वरात म्हणाले, हे शिकाऱ्या जर तू माझ्या आधी तीन हरीणी मारल्या असशील तर मला मारण्यातही वेळ घालवू नकोस. त्यांच्या वियोगात मला दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे. आणि जर तू त्यांना जीवदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन.

हरणाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीच्या घटना समोर आल्या. त्यांनी ही सर्व घटना हरणाला ऐकवली. तेव्हा हरीण म्हणाले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत या ठिकाणी हजर होईन.

संपूर्ण दिवसाचा उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर नकळतपणे बेलपत्र टाकत राहिल्यामुळे शिकाऱ्याच्या मनामध्ये परिवर्तन होऊ लागले. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. हा बदल भगवान शंकरांनी घडवून आणला होता. थोड्याच वेळात हरीण आपल्या संपूर्ण परिवारासोबत शिकाऱ्यासमोर येऊन उभा राहिला. या प्राण्यांमधील एकमेकांवरील असलेले प्रेम बघून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्याच वेळी त्याने मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले व त्यांना जीवदान दिले.

देव लोकातून सगळे देवी – देवता ही घटना पाहत होते. त्यांनी वरून फूलांचा वर्षाव करून शिकारी आणि हरणाच्या परिवाराला मोक्ष प्राप्ती दिली. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्यामुळे मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ही कथा सुद्धा नक्की ऐका

महाशिवरात्र कथा

FAQ

महाशिवरात्री म्हणजे काय?

भगवान शंकराची महान रात्र म्हणून त्यांच्या आठवणीने उत्सव म्हणून साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच महाशिवरात्र होय.

२०२४ मध्ये महाशिवरात्रि कधी आहे?

२०२४ मध्ये महाशिवरात्री ८ मार्च ला साजरी केली जाणार आहे.

महाशिवरात्रीचे महत्व काय आहे?

भगवान शंकराने सर्व शत्रूंवर मात केली म्हणून, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. तसेच भगवान शंकर कैलास पर्वताशी एकरूप झाले होते. म्हणून हा दिवस महत्त्वाचा असून तो साजरा केला जातो.

महाशिवरात्रीला शिवलिंगाचे महत्त्व काय?

सर्वप्रथम भगवान शंकर हे लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते. त्यामुळे महाशिवरात्रीला शंकराच्या निराकार रूपाचे प्रतीक म्हणून लिंगाचे महत्त्व आहे.

महाशिवरात्री फक्त भारतातच साजरी होते का?

महाशिवरात्री हा प्रामुख्याने हिंदूंचा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण भारतामध्ये जसा साजरा केला जातो तसाच भारताबाहेर देखील आपले हिंदू लोक असल्यामुळे भारताच्या बाहेरही हा उत्सव साजरा केला जातो

महाशिवरात्री हा कोणत्या देवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो?

महाशिवरात्री हा भगवान शंकराचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

आपण महाशिवरात्रि का साजरी करतो?

साधारणपणे फाल्गुन महिन्यामध्ये ही महाशिवरात्री भगवान शंकराच्या आणि देवी पार्वतीच्या विवाह निमित्ताने साजरी केली जाते.

निष्कर्ष

मित्रांनो,
महाशिवरात्र उत्सवाची माहिती, इतिहास आणि याबाबतच्या काही कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम हा लेख वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार. आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? आणि यामध्ये काही चुका आवश्यक असल्यास आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयांना घेऊन तोपर्यंत

नमस्कार.

Leave a comment