अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी | Anant Chaturdashi Information In Marathi

अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी | Anant Chaturdashi Information In Marathi – भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे हा दिवस आपल्याला विसर्जनाचा दिवस म्हणूनच लक्षात राहतो. पण हा दिवस फक्त विसर्जनासाठी नसून या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत चौदा वर्षे, चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत केले जाते.

Table of Contents

अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी | Anant Chaturdashi Information In Marathi

अनंत चतुर्दशीचे हे व्रत सर्वांनी करावे असे नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुटुंबानुसार अखंड चालू राहते. असे सांगितले जाते की, पांडवांना द्युतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या संकटातून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला होता. याबाबतची सगळी माहिती आणि कथा आज आम्ही मराठी झटका. कॉम या वेब पेजद्वारे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग, पाहुयात अनंत चतुर्दशी.

 Anant Chaturdashi Information In Marathi

अनंत चतुर्दशी चा अर्थ

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही असा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. म्हणून या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णु देवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन करण्याला महत्व आहे.

श्री अनंत व्रत

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. यावर्षी २८ सप्टेंबर २०२३ रोजी साजरे केले जाणार आहे. या दिवशी हे व्रत आचरावे, असे म्हटलं जाते. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा केली जाते व अनंताचे व्रत साजरे केले जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत चौदा वर्षे, चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत चतुर्दशीचे व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला, अशी कथा आहे. श्रावण महिना सुरू झाला की, आपल्या सणावारांना प्रारंभ होतो. दरवर्षी नागपंचमीपासून सणांना सुरवात होऊन त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे एका महानागाचे नाव असले तरी अनंत हे विष्णुचे देखील नाव आहे, हे नजरेआड करता कामा नये.

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत फार थोड्या घरातून पाळले जाते. ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्याकथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुस-या कोणी तरी अनंताचे हे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले.

पुढे तो हे व्रत करण्यास विसरला आणि त्याच्यावर मोठे संकट आले अशा स्वरुपाच्या या व्रताच्या कथा आहेत. ह्या व्रताचे वैशिष्ठ्य असे आहे की, ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची पद्धत आहे. हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितले गेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळतात.

अनंत चतुर्दशी पूजा पद्धत

अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्रीविष्णू असून, शेषनाग आणि यमुना या इतर देवता आहेत. या व्रतात त्यांची पूजा करण्याला महत्व आहे. या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे, परंतु आपण ते पिढीनुसार चालू ठेवले तरी चालते. या व्रताची सुरुवात अनंताचा दोरा सापडल्यास अथवा कोणी सांगितले असल्यास केले जाते. आणि मग ते त्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालू राहते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. याला अनंत डोर म्हणतात. पूजेनंतर हा दोरा यजमानाच्या हातात बांधतात.

अनंत चतुर्दशी माहिती स्वरुप

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढले जाते. त्यावरती तांब्याचा कलश ठेवून अष्टदल काढतात. त्यावरती सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात. तांब्याच्या कलशाला वस्त्राने वेष्टन करतात. तांब्याच्या कलशातील पाण्याला यमुना मानले जाते. शेष व यमुना यांची पूजा केल्यावर विष्णूची सोळा प्रकारांनी पूजा करतात.

अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो. पुष्पांजली झाल्यानंतर लगेच अर्घ्य दिले जाते. प्रार्थना करून झाल्यावर चौदा गाठींचा दोरा हातावर किंवा गळ्यात बांधला जातो. वडे आणि घारगे, तसेच १४ प्रकारच्या भाज्या अश्या प्रकारच्या पंच पक्वान्न यांचे नैवेद्य दाखवून व्रत देवतांचे विसर्जन केले जाते.

गौरी आवाहन पूजा माहिती मराठी

अनंत चतुर्दशीचे महत्व

अनंत व्रत करण्याचा दिवस म्हणजे विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस मानला जातो. त्यादिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यरत होत असून शेषदेवता विष्णुशी संबंधित असलेली पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचा उत्तम वाहक मानली जाते. त्यामुळे शेषाला या पूजेत महत्वाचे स्थान दिले जाते.

अनंत चतुर्दशी व्रताचे नियम

  • अनंताची पूजा करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेचा संकल्प केला पाहिजे.
  • अनंताची पूजा करताना भगवान विष्णून बरोबर कलशाच्या रूपामध्ये माता यमुना आणि दुर्वा दुर्वाच्या रूपामध्ये शेषनाग यांची स्थापना केली पाहिजे.
  • या दिवशी आनंदाचा धागा बांधण्याला फार महत्त्व आहे आनंदाचा धागा बांधण्यापूर्वी भगवान विष्णूंना समर्पित करून त्यानंतर हा धागा बांधावा.
  • या दिवशी अनंत चतुर्दशी ची कथा वाचली आणि ऐकली पाहिजे.
  • या व्रताच्या दिवशी कोणाचीही निंदानालस्ती करू नये तसेच खोटे बोलू नये.
  • या दिवशी उपवास असल्यामुळे एक वेळेस जेवण करावे.
  • या दिवशी ब्राह्मण भोजन घालून आपल्या ऐपतीनुसार दक्षिणा द्यावी.

अनंत चतुर्दशी २०२३ मुहूर्त

गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३
चतुर्दशी तिथि प्रारंभ : २७सप्टेंबर२०२३ रात्री १०.१८ वाजता
चतुर्दशी तिथि समाप्त: २८ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ०६.४९ वाजता
अनंत चतुर्दशी पूजा मुहूर्त: ०६.१२ ते ०६.४९ पर्यन्त

अनंत चतुर्दशी पूजा साहित्य

अगरबत्तीधूप कापुर माचिस
फुले चंदन हळद कुंकू
दूर्वा पत्री निरांजने समई
सुपारी विड्याची पाने सुटे पैसे नारळ
अक्षता फळे तूप तेल
रोवळी तांब्या ताम्हण पंचपात्र
पळी अनंताचा दोरा आंब्याचा टाळ तांदूळ
मध दूध साखर गूळ
पंचामृत दही जानवे

अनंत चतुर्दशी पूजा पद्धत

अनंत चतुर्दशी पूजा पद्धत
  • सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजेची तयारी करावी.
  • त्यानंतर सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करावी.
  • अनंताची पूजा करताना सर्वप्रथम कलश स्थापन करावा.
  • त्याच्या बाजूला समई पेटवून घ्यावी.
  • कलशावर अनंतची स्थापना केली जाते.
  • त्याच्यापुढे, कुमकुम, केशर किंवा हळदीच्या रंगाने बनवलेल्या कच्च्या तारांच्या चौदा गाठी असलेले ‘अनंत’ देखील ठेवले आहे.
  • अनंताची पूजा करून, त्यात भगवान विष्णूचे आवाहन आणि ध्यान करून, फुले, कापसाची वस्त्रे, अक्षता, हळद, कुंकू, वहावे.
  • त्यानंतर अगरबत्ती आणि निरंजणाने ओवाळावे.
  • धुपारती करावी.
  • अनंत देव यांचे ध्यान केल्यानंतर अनंताचा दोरा आपल्या उजव्या हाताला बांधून ठेवावा.
  • हा धागा भगवान विष्णूला प्रसन्न करतो. हे व्रत संपत्ती आणि पुत्राच्या इच्छेने देखील केले जाते.
  • यानंतर अनंत कथा वाचली,ऐकली जाते.
  • वडे आणि घारगे तसेच चौदा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
  • मंत्रोच्चार करून, ध्यानधारणा करून, आरती केली जाते.
  • या दिवशी ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे.

अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन का करतात ?

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन ११ व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की, ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पाना महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले.

१० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना अतिशय वाढले होते. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी त्यांना थंड पाण्यात डुबकी घेण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांना आराम वाटला होता.

जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, त्याठिकाणी अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होतो. ज्या दिवशी श्री गणेशांनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणूनच चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.

१४ गाठींचा अनंत धागा

१४ गाठींचा अनंत धागा

यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला येत आहे. असे म्हटले जाते की, परमेश्वराने भौतिक जगामध्ये १४ लोक बनवले होते. ज्यामध्ये भूलोक, वितल, ब्रम्हलोक, स्वर्लोक, सतल, जनलोक, भुवर्लोक, तपोलोक, महर्लोक, अतल,महात, रसातल, तलातल, आणि पाताल यांचा समावेश होतो. मानवी शरीरात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून अनंताच्या दोर्‍याला १४ गाठी असतात.

मान्यतेनुसार अनंतसूत्रामध्ये १४ गाठी १४ लोकाचे प्रतीक म्हणून बांधल्या जातात. अशी मान्यता आहे की, जो १४ वर्षांपर्यंत सतत अनंत चतुर्दशीचं व्रत करतो, त्याला विष्णू देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. महत्वाचे म्हणजे अनंताचा दोरा हा पुरूषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या हातात बांधले जाते.

हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी

अनंतव्रतातील १४ गाठींच्या दोर्‍याचे महत्त्व

  • १४ गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून श्री विष्णुरूपाची दोर्‍यात स्थापना करून असा हा दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.
  • ‘मानवी शरीरात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून अनंताच्या दोर्‍याला १४ गाठी असतात.
  • प्रत्येक ग्रंथीची एक विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.
  • भगवान विष्णूंना आरंभ किंवा अंत नाही, ते अनंत आहेत. १४ जणांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूनी या दिवशी चौदा रूपं धारण केली होती, त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी अख्यायिका आहे.
  • पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून मंत्रोच्चाराने प्रभावीत नवीन दोरे बांधले जातात.
  • भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर, दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी चौदा गाठी असणारा हा धागा म्हणजेच अनंत रक्षासूत्र आपल्या हातात बांधा.
  • दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या प्रवाहाचे प्रतीक समजले जाते.
  • अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

अनंतव्रतात यमुनेचे पूजन करण्याचे महत्त्व

  • ‘यमुनेच्या डोहात श्रीकृष्णाने कालियारूपी नागाचा म्हणजे असुरी शक्तीचा नाश होता.
  • कृष्णाचे बालपण यमुनेच्या पाण्यात खेळून गेले असल्यामुळे श्रीकृष्णतत्त्वाचे प्रमाण यमुनेमध्ये अधिक आहे.
  • या व्रतात कलशातील पाण्यात यमुनेचे आवाहन करून पाण्यातील श्रीकृष्ण रूपाला जागृत केले जाते.

अनंत दोरक बांधण्याचा मंत्र

अनंत संसार महासमुद्रे
मग्नं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व
ह्यनंतसूत्राय नमो नमस्ते।।

यानंतर ब्राम्हणांना जेवू घालावं आणि स्वतः प्रसाद ग्रहण करावा.

अनंताची आरती

जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू। भक्तां संकट पडतां धावे अनंत नवाळू ।। धृ ।।

भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ।। १ ।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती । षोडशपूजा करूनी द्वाह्मण संतर्पण करिती ॥ २॥

अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशी करिती । अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपत्ती ।। ३।।

रामा धर्मे आचरीतां व्रत क्लेशांतुनि सुटला । कौडिण्याने पुजितां तुजला उद्धरिले त्याला ।। ४।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी । संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५॥

अनंताची कथा – Anant Story

फार पूर्वी सुमंत नावाचा एक तपस्वी ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते. त्यांना धर्मपरायण ज्योतिरमय अशी कन्या होती. तिचे नाव सुशीला असे होते. परंतु दुर्दैवाने सुशीलाची आई म्हणजेच दीक्षा हिचा मृत्यू झाला. त्यानंतर सुमंतने कर्कश्या नावाच्या स्त्रीबरोबर दुसरे लग्न केले. त्यानंतर सुशीलाचा विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषी सोबत लावून दिले, आणि लग्नाच्या वेळी मुलीला काहीतरी द्यायचे असते, म्हणून सावत्र आईने कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडांचे तुकडे बांधून दिले.

ऋषी दुःखी मनाने आपल्या पत्नीसह आपल्या आश्रमाकडे निघून गेले. जात असताना रस्त्यामध्ये रात्र झाली आणि ते एका नदीकाठी संध्या करू लागले. सुशीलाने बघितले की, या ठिकाणी स्त्रिया सुंदर वस्त्र धारण करून कोणत्यातरी देवाची पूजा करीत होत्या. सुशीलाने त्यांना विचारले त्यावेळी त्या स्त्रियांनी तिला विधीपूर्वक अनंतव्रताची माहिती सांगितली. सुशीलाने तिथेच त्या व्रताचे अनुष्ठान केले आणि १४ गाठी असलेला दोरा हातात बांधून कौंडिन्य ऋषीजवळ आली.

त्यांनी या दोऱ्याबद्दल विचारले असता, तिने संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली. त्यांनी तो दोरा तोडून अग्नीत टाकून दिला. त्यामुळे भगवान अनंताचा अपमान झाला. याचा परिणाम म्हणून ऋषि कौंडिन्य दुखी राहू लागले. त्यांची सर्व संपत्ती नष्ट होऊ लागली. आणि त्यांनी आपल्या पत्नीला दारिद्र्याचे कारण विचारल्यावर सुशीलाने त्यांना दोरा जाळून राख केल्याच्या गोष्टीची आठवण करून दिली. या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होऊन कौंडण्य ऋषी या अनंत दोऱ्याच्या प्राप्तीसाठी रानात निघून गेले. अनेक दिवस रानात भटकत असताना निराश होऊन ते जमिनीवर पडून गेले.

त्याचवेळी अनंत भगवान प्रकट होऊन म्हणाले की, हे कौंडण्य ऋषी तू माझा तिरस्कार केला होतास, त्यामुळे तुला कष्ट भोगावे लागले. तुझ्यावर दुःख कोसळले. या गोष्टीचा तुला आता पश्चाताप झाला असल्यामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंताचे व्रत कर. १४ वर्षापर्यंत व्रत केलेस, तर तुझी सगळी दुःखी दूर होतील. तुला धनधान्य सुख संपत्ती लाभेल. हे ऐकताच कौंडण्य ऋषी घरी गेले आणि त्यांनी तसे व्रत केले. त्यामुळे त्यांची या सर्व क्लेशापासून दुःखापासून मुक्ती झाली.

प्रश्न

अनंत चतुर्दशी का म्हणतात?

हा शुभ दिवस भगवान विष्णूला देखील समर्पित आहे. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही असा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. म्हणून या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात.

अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते?

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते.

अनंत चतुर्दशी कशी साजरी केली जाते

सतत चौदा वर्षे, चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत केले साजरे केले जाते.

अनंत चतुर्दशी यावर्षी कधी आहे?

अनंत चतुर्दशी यावर्षी २८ सप्टेंबर गुरुवार यादिवशी आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे अनंत चतुर्दशी या सणाबद्दल कथा, पूजा विधि, अनंताची कथा याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment