हरतालिका तीज 2023 : Hartalika Teej Puja Vrat Katha Marathi

Hartalika Teej Puja Vrat Katha Marathi । हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी 2023 – आपल्या भारत देशाला धार्मिक परंपरा आहे प्रत्येक सण आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा असाच एक सण म्हणजे हरितालिका व्रत. हे व्रत कसे करावे, याबाबतची कथा, या सणाचे महत्त्व काय आहे, याची सगळी माहिती आज आम्ही या लेखाद्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया हरतालिका पूजन 2023.

Table of Contents

हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी 2023 | Hartalika Teej Puja Vrat Katha Marathi

हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत पाळले जाते

सणाचे नाव –हरतालिका – hartalika Tritiya
समर्पित –भगवान शंकर
दुसरे नाव हरितालिका व्रत
धर्म –हिंदू
कधी असते –गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी
मराठी महिना –भाद्रपद
इंग्रजी महिना –ऑगस्ट/सप्टेंबर

हरतालिका पूजन इतिहास (Hartalika Katha Marathi History)

एका पौराणिक कथेनुसार, देवी सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शंकरांनी संन्यास घेतला आणि अध्यात्मात पडले. सतीने माता-पार्वतीच्या रूपात हिमालयाच्या राजाची कन्या म्हणून जन्म घेतला. कालांतराने जेव्हा ती विवाहयोग्य झाली, तेव्हा नारद यांच्या सांगण्यावरून, हिमालय राजांनी पार्वतीचा विवाह भगवान विष्णू यांच्याबरोबर करण्याचा निर्णय घेतला. परंतु पार्वतीचे भगवान शंकर यांच्यावर प्रेम होते. तिला पती म्हणून भगवान शंकर हवे होते. मग तिच्या सखीनी तिला पळवून नेले आणि हिमालयात लपवले.

भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने शांतता सोडून, गृहस्थाच्या जीवनात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, आणि माता-पार्वतीला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. हा शुभ योगायोग भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील तृतीयेला घडला, म्हणून या तिथीला हरितालिका साजरी केली जाते.

Hartalika Teej Puja Vrat Katha Marathi

२०२३ मध्ये हरतालिका पूजा मुहूर्त कधी आहे?

  • हरतालिका यावर्षी १८ सप्टेंबर २०२३ ला सोमवार या दिवशी आहे.
  • शुभ मुहूर्त – सकाळी ०६.०७ मिनिटे ते ०८.३४ मिनिटांपर्यंत

हरतालिका अर्थ (Hartalika Tritiya In Marathi)

हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिच्या सखी तपश्चर्येला घेऊन गेल्या, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. आणि पार्वतीने केलेल्या या तपश्चर्येला हरितालिका व्रत असे म्हणतात.

हरतालिका भारतात कुठे कुठे साजरी केली जाते ?

  • हे व्रत संपूर्ण भारतभर साजरे केले जाते. पार्वतीप्रमाणेच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा, म्हणून भारतातील कुमारिका हे व्रत करतात. तसेच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी सुवासिनी स्त्रिया हरितालिकेचे व्रत मोठ्या भक्ती भावाने करतात.
  • भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतामध्ये ही हे व्रत केले जाते.
  • तामिळनाडूमध्ये भाद्रपद शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात.
  • महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातही हे व्रत केले जाते.

हरतालिका पूजन 2023 महत्व (Importance Of Hartalika InMarathi)

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच त्याच्याप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी, तसेच कुमारीका आपल्याला इच्छित पती मिळावा यासाठी या हरतालिका व्रताचे पालन केरतात. हे व्रत करण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, हरतालिका पूजन व्रत केल्यामुळे सर्व पापे तसेच कौटुंबिक चिंता दूर होतात.

भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्यवृत्त फक्त महिलांसाठी आहे. हरतालिकेचा उपवास हिंदू धर्मातील सर्वात मोठा उपवास मानला जातो. निर्जला एकादशी प्रमाणे या हरितालिका व्रताच्या दिवशी सुद्धा कठोर उपवास करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो.

नक्की वाचा नारळी पौर्णिमा संपूर्ण माहिती २०२३

हरितालिकेचे व्रत सर्वप्रथम देवी पार्वतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी केले होते. त्यामुळे हे व्रत खास मानले जाते. तिच्यावर भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते, असे देखील सांगितले जाते. हे व्रत करत असताना, देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता, म्हणून सर्व स्त्रिया देखील निर्जळी उपवास करतात.

हरतालिका व्रताचे वैशिष्ट्य (Hartalika Teej 2023 Marathi)

हे व्रत माता-पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी केले होते. हे व्रत तीने घनदाट अरण्यात केले होते त्यामुळे या अरण्यामध्ये, निसर्गामधील जी काही फळे, फुले, पाने असतील त्या सर्वांचा उपयोग या पूजेसाठी केला होता. तसेच खाण्यासाठी या अरण्यातील फळांचा वापर केला होता. म्हणून हे व्रत करताना निसर्गातील फुले फळे पानांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्याचप्रमाणे हा उपवास फलाहार खाऊन केला जातो.

हरतालिका का साजरी करतात?

माता पार्वतीने भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले. माता-पार्वतीप्रमाणे आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी भारतातील कुमारिका करतात, त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्यावरती असलेली सद्भावना प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतातील सुहासिनी हे व्रत कडक उपवास करून करतात. केल्यामुळे माता पार्वती आणि भगवान शंकर यांची कृपादृष्टी लाभते असे समजले जाते. तसेच घरात सुख, शांती, समाधान लाभते असेही सांगितले जाते. म्हणून हे व्रत दरवर्षी भारतातील कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया मोठ्या भक्ती भावाने कडक उपवास करून करतात.

हरतालिका पूजा मराठी व्हिडिओ

हरतालिकेच्या दिवशी दान करावयाच्या वस्तू

या दिवशी खालील गोष्टी दान केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समाधान लाभते. तसेच भगवान शंकर आणि माता पार्वतीची कृपादृष्टी आपल्यावर राहते.

तांदूळ – तांदूळ दान करणे हे अतिशय शुभ समजले जाते. यामुळे शुक्र ग्रहाशी संबंधित असलेले सगळे दोष दूर होऊन कुटुंबात सुख शांती नांदते.

गहू – गहूचे दान करणे सोन्याचे दान करण्यासारखे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गव्हाचे दान केल्यामुळे पुण्य मिळते. आपल्याकडे गहू उपलब्ध नसतील, तर तुम्ही गव्हाचे पीठही दान करू शकता.

नक्की वाचा 👉गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

गुळ – या दिवशी गुळाचे दान केल्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते. तसेच यामुळे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या देखील दूर होतात.

वस्त्र – या दिवशी गरीब लोकांना वस्त्रदान केल्यामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचे वरदान देतात.

फळे – विवाहित स्त्रियांनी या दिवशी फळांचे दान केले तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते.

हरतालिका व्रताच्या दिवशी काय करावे?

  • सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
  • पूजेची संपूर्ण तयारी करावी.
  • उपवास करणाऱ्या स्त्रियांनी, निर्जळी उपवास करावा.
  • उपवास करणाऱ्या स्त्रियांनी, या रात्री भगवान शंकराच्या मंत्रांचा जप करत, भजन कीर्तन करत, रात्र जागवावी, त्यामुळे लवकर इच्छित फळ मिळते.
  • या दिवशी घरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न ठेवावे.

हरतालिका व्रताच्या दिवशी काय करू नये?

  • कडक उपवास असल्यामुळे, या दिवशी इतर उपवासाप्रमाणे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.
  • आंघोळ केल्या शिवाय पूजन करू नये.
  • या दिवशी घरात कोणताही कलह करू नये.
  • हे व्रत गर्भवती महिला करत असतील तर. त्यांनी निर्जळी उपवास करू नये.
  • हरितालिका व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात. त्यामुळे या दिवशी घरामध्ये कोणताही मांसाहारी पदार्थ तसेच मद्यपान करू नये.
  • घरातील इतर लोकांनी शाकाहारी भोजनाचा स्वाद घ्यावा. मांसाहार करू नये.

हरतालिका पूजन कधी आहे? शुभ मुहूर्त

  • हे व्रत दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. यावर्षी 18 सप्टेंबर 2023 सोमवार या दिवशी आहे.
  • शुभ मुहूर्त – सकाळी ०६.०७ पासून ते सकाळी ०८.३४ मिनिटापर्यंत आहे.

हरतालिका पूजा माहिती (Hartalika Puja In Marathi)

Hartalika Puja InMarathi

हरतालिका पूजा साहित्य मराठी

पांढरी फुले, केळीचे पान, आपल्या आजूबाजूला असलेली सर्व प्रकारची पाने, फळे आणि फुले, बेल पत्र, लाल वस्त्र, पांढरी वस्त्रे, विडा, शमी पत्र, आंब्याची पानं, श्रीफळ, धोतरा, तुळशी, नाडापुडी, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, बिंदी, कुंकु, सिंदूर, इत्यादी. हळदकुंकू, ताम्हण, पळी, पंचपात्र, अष्टगंध, समई, गुलाल, तूप, निरांजन, तेल, हरतालिकेची मूर्ती, शिवलिंग, दिवा, कापूर, अक्षता, अबीर, गणेशपूजन, चंदन, शहाळी, केळी, कलश. पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध.

हरतालिका तीज व्रत कथा पूजाविधी मराठी

  • प्रथम घरातील देवाची पूजा करून घ्यावी.
  • नंतर पूजेची सगळी तयारी करून घ्यावी आणि पूजा साहित्य मांडून घ्यावे.
  • सर्वप्रथम एक पाट घ्यावा.
  • पाटाच्या बाजूने रांगोळी काढावी. त्यानंतर पाटावर अक्षता ठेवून हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना करावी. तसेच समोर शिवलिंग ठेवावे.
  • बाजूला समय पेटवून घ्यावी. पाटावर विडा ठेवावा.
  • त्यानंतर आधी गणेश पूजन करून घ्यावे.
  • सुरुवातीला हरितालिकेच्या मूर्तींना हळद-कुंकू आणि अक्षता वाहून घ्यावी.
  • त्यानंतर फुले अर्पण करावीत.
  • शिवलिंगाला पांढरे वस्त्र वहावे तसेच हरितालिकेच्या मूर्तींना लाल वस्त्र वहावीत.
  • शिवलिंगला अष्टगंध, चंदन लावून घ्यावे.
  • यानंतर हरितालिकेच्या मूर्तींना फुलांचा गजरा माळावा आणि नाडापुडी अर्पण करावी.
  • शिवलिंगाला सगळ्या प्रकारच्या झाडांची पत्री वहावी, तसेच हरितालिकेला फुले वाहावी.
  • यानंतर निरंजन आणि अगरबत्तीने हरितालिकेला आणि शिवलिंगाला ओवाळावे.
  • शहाळे आणि केळी यांचा नैवेद्य दाखवून हरितालिकेची कथा वाचावी.
  • हरतालिकेची आरती करावी.

हरतालिका पूजेची सांगता

  • दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
  • पूजा साहित्य जमवून, मांडून घ्यावे.
  • पुन्हा हरितालिका आणि शिवलिंगाची पूजा करून घ्यावी.
  • त्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.
  • त्यानंतर हरितालिकेचा खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
  • देवीला प्रार्थना करून, पूजेमध्ये काही चूक झाल्यास, तशी क्षमा मागावी.
  • त्यानंतर पुन्हा उत्तर पूजेची अक्षता वाहून, हरितालिका आणि शिवलिंग वरील निर्माल्य बाजूला करून घ्यावे.
  • यानंतर हरितालिकेचे आणि शिवलिंगाचे पाण्यामध्ये विसर्जन करावे.
  • पूजेच्या निर्मल्याचे देखील विसर्जन करावे.
  • यानंतर सगळ्यांना खिचडीचा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा.

हरतालिका पूजेचे नियम

  • स्वच्छ आंघोळ करून पूजा करून घ्यावी.
  • पूजा झाल्यानंतर फलाहार करावा. त्या आधी करू नये.
  • इतर उपवासाप्रमाणे कोणतेही पदार्थ या उपवासाला खाऊ नयेत.
  • हा उपवास रात्री सोडू नये. दुसऱ्या दिवशी, उत्तर पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा.
  • हा उपवास शक्यतो निर्जळी करावा.
  • हा उपवास एकदा सुरू केल्यानंतर सोडता येत नाही. तसेच हा उपवास काही कारणास्तव सुटला तर पुन्हा धरू शकत नाही.

हरतालिका आरती

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ।
ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी।
आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने ।
धुम्रपाने अघोवदने ।
केली बहु उपोषणे ॥
शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण ।
चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

हरतालिका तीज व्रत कथा मराठी (Hartalika Puja Vrat Katha Marathi)

भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारले, देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असे एखादे व्रत असेल, तर मलाही सांगा आणि कोणत्या पुण्याईने ते आपल्या पदरी पडले ? हेही सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ आहे.

हे व्रत करून तू मला प्राप्त केले होते. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून हे 64 वर्ष झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी पाऊस ऊन सहन करून केले होतेस. तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले, आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली. त्याचवेळी त्याठिकाणी नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे.

वाचा 👉 नागपंचमी सण संपूर्ण माहिती मराठी  2023

हिमालय राजाला फार मोठा आनंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट मान्य देखील केली. त्यानंतर नारद मुनी विष्णूकडे निघून आले, आणि त्यांनाही बातमी दिली. नारद मुनी त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी तुला ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट तुला आवडली नाही, आणि तू रागावलीस. तुझ्या रागावण्याचे कारण ज्यावेळी तुझ्या सखीने तुला विचारले, त्यावेळी भगवान शंकरा वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे, असे तू तिला सांगितले. आता यासाठी काय उपाय करावा ?

म्हणून मग तू एका घोर अरण्यात गेलीस. त्या ठिकाणी गेल्यावर, तिथे एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा देखील होती. या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग स्थापन केलेस आणि दिवस रात्र त्याची पूजा केलीस. जागरण केलेस. या तुझ्या व्रताने मी तुला प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि वर मागण्या सांगितले. त्यावेळी तू म्हणालीस की, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी माझी कोणतीही इच्छा नाही. नंतर मी ही गोष्ट मान्य केली व त्या ठिकाणाहून निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी तू ही व्रत पूजा विसर्जन केलीस. तुझ्या सखीसह पूजेची सांगता केलीस. त्याचवेळी तुझे वडील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. त्यानंतर झालेली सर्व हकीकत तू आपल्या वडिलांना सांगितलीस. त्यामुळे वडिलांनी तुझे माझ्याबरोबर लग्न लावून देण्याचे वचन घेऊन, तुला घरी घेऊन गेले. त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी आपले लग्न लावून दिले. ज्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली त्या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात.

हरतालिका मंत्र

या व्रताचे महत्त्व फार मोठे आहे. हे व्रत केल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पतीला दीर्घायुष्य, कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. हा आहे शुभ मंत्र…

भगवान शिवाला प्रसन्न करणारे मंत्र

ओम नमः शिवाय:|
ओम हराय नमः ।
ॐ महेश्वराय नमः ।
ओम शांभवे नमः ।
ॐ शुल्पणये नमः ।
ॐ पिनकवृषे नमः ।
ॐ पशुपतये नमः ।

माता पार्वतीला प्रसन्न करणारे मंत्र

ओम शिवाय नमः ।
ओम उमाये नमः ।
ॐ पार्वत्याय नमः ।
ओम जगद्धात्राय नमः ।
ॐ जगत्प्रतिष्ठायै नमः ।
ओम शांतीरुपण्य नमः ।

आमचे हे लेख सुद्धा नक्की वाचा 👇

FAQ

हरितालिका कधी आहे?

18 सप्टेंबर 2023 सोमवार या दिवशी हरितालिका आहे.

हरितालिका म्हणजे काय?

हरिता म्हणजे हरण करणारी आणि लिका म्हणजे सखी. हरितालिका हे पार्वतीचे नाव आहे जिने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी हे व्रत केले होते.

हरितालिकेचे व्रत का करतात?

कुमारीका आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी आणि सुवासिनी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

हरितालिकेचा उपवास कसा करावा?

हरितालिकेचा उपवास हा निर्जळी करावा आणि फक्त फलाहार करावा कोणताही पदार्थ खाऊ नये.

हरितालिकेचे व्रत कोणी करावे?

हरितालिकेचे व्रत कुमारिका आणि सुवासिनी स्त्रियांनी करावे.

निष्कर्ष : Conclusion

मित्रांनो, आज मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आम्ही हरतालिका व्रत, व्रताचा इतिहास, महत्त्व तसेच हे व्रत कसे करावे? याबाबतची माहिती आपल्यापर्यंत पोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment