डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जिवनचरित्र : APJ Abdul Kalam Information In Marathi – जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तापावे लागेल. भारताचे मिसाईल मॅन पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न, “डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळवून दिले. ते विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे प्रेरणास्थान आहेत. ज्यांनी आपल्याला स्वप्न झोपेत नाही, तर झोप न लागू देणारे स्वप्न पाहायला शिकवले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती दिली आहे हा लेख तुम्ही सविस्तर वाचा .
डॉ. एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी : APJ Abdul Kalam Information In Marathi
पूर्ण नाव | अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम |
जन्मतारीख | १५ ऑक्टोबर १९३१ |
जन्मठिकाण | रामेश्वरम, तामिळनाडू |
आई | असिन्मा |
वडील | जैनुलब्दीन |
राष्ट्रपती पद | २००२ |
छंद | पुस्तके वाचणे, लेखन करणे, वीणा वाजवणे |
मृत्यू | २७ जुलै २०१५ |
एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे.
एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोंबर १९३१ साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन होते. त्यांचा नाव चालवण्याचा व्यवसाय होता. तर त्यांच्या आईचे नाव असिन्मा होते. त्या कलाम यांच्या आदर्श होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होती.

एपीजे अब्दुल कलाम यांचे सुरुवातीचे आयुष्य
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथे पूर्ण झाले. तर पुढील शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये पूर्ण केले. याच काळात इंग्रजीत साहित्य, तत्त्वज्ञान, आणि पदार्थ विज्ञान, शास्त्र यांची त्यांना गोडी लागली. कलामांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय होडी चालवणे हा होता.
मुलांच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते, त्यामुळे बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून, त्यांना पैसे दिले होते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. चौथीमध्ये असताना डॉक्टर कलाम यांचे गणिताचे शिक्षक रामकृष्ण अय्यर दुसऱ्या वर्गात शिकवत होते, तेव्हा डॉक्टर कलाम चुकून त्यांच्या वर्गात शिरले. त्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांना छडीने शिक्षा केली. त्यानंतर काही महिन्यांनी डॉक्टर कलाम यांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले, आणि त्याच गणिताच्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांचे कौतुक केले.
एपीजे अब्दुल कलाम यांची शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द
हिंदुस्थान एरोनॉटिक्स मधून प्रशिक्षण संपून, apj abdul kalam एरोनॉटिक इंजिनियर म्हणून बाहेर पडले. १९५८ साली हवाई निर्देशालयात नागरी उड्डाण शाखे अंतर्गत, त्यांची तंत्रज्ञ विभागात नेमणूक झाली. तेथे त्यांनी हॉवर क्राफ्ट मशीन बनवले.
१९६२ साली केरळ मधील त्रिवेंद्रम जवळील तुंबा येथे अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली. तेथे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र सुरू झाले, यापूर्वी डॉक्टर कलाम यांनी अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रात अवकाश तंत्रज्ञान संशोधनाचे प्रशिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर १९६३ साली रोहिणी हा अग्निबाण विकसित झाला. तेथे डॉक्टर विक्रम साराभाई या श्रेष्ठ शास्त्रज्ञाचा फार मोठा प्रभाव डॉक्टर कलाम यांच्यावर पडला.
१९६२ व १९६५ साली चीन व पाकिस्तान युद्धामध्ये भारताने शस्त्रास्त्र मध्ये स्वयंपूर्ण बनण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कार्यात कलामांचा मोठा वाटा होता. १९६९ साली हे इंडियन स्पेस ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. एस.एल.व्ही.थ्री. या उपग्रहाची जबाबदारी डॉक्टर कलामांनी अतिशय कुशलतेने पार पाडली. ते एस.एल.व्ही.थ्री प्रकल्पाचे प्रमुख बनले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी १९८० साली पहिल्या भारतीय उपग्रहाचे उड्डाण झाले.
१९८२ साली डी.आर.डी.ओ.च्या प्रमुख संचालकासाठी डॉक्टर कलाम यांची नेमणूक झाली. येथे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची आखणी केली. या अनुषंगाने पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी, ही आधुनिक क्षेपणास्त्रे निर्माण केली. यातच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतात विकसित झाले. एकात्मिक लक्षवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशानंतर, सुरक्षा खात्याचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख म्हणून डॉक्टर कलाम कार्यरत राहिले.
१९८८ मध्ये अणुऊर्जा विभागाच्या सहाय्याने केलेल्या पोखरण अनुष चाचणी या शक्ती कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता. अणुचाचणीच्या यशानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. डॉक्टर कलाम यांनी १९९९ ते २००१ पर्यंत भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले.

एपीजे अब्दुल कलाम यांची राष्ट्रपती म्हणून कारकीर्द
2002 मध्ये, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. एपीजे अब्दुल कलाम यांची २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रायोजित केलेल्या NDA सदस्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यांनी १८ जुलै २००२ रोजी पदाची शपथ घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले.
युवा विकास, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्व स्तरातील नागरिकांना संबोधित केले. कोणतेही राजकीय संबंध नसतानाही, कलाम जी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती म्हणून काम करत राहिले. पीपल्स प्रेसिडेंट” (लोकांचे राष्ट्रपती) या नात्याने ते सर्वांपर्यंत पोहोचण्याजोगे आणि लोकांमध्ये आशा आणि उत्साहाची भावना निर्माण करणारे होते. त्यांची भाषणे, अनेकदा प्रेरणादायी किस्सेने भरलेली, सर्व वयोगटातील श्रोत्यांना गुंजत होती.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांबद्द्ल महत्वाची तथ्ये
- एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक बारावी मधील एक मुलगी स्नेहल ठक्कर यांना समर्पित आहे.
- तसेच २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम यांनी राष्ट्रपती भवनावर शपथविधीसाठी त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते, लहानपणापासूनच पायलट बनायचे होते, परंतु त्यांनी भारतीय हवाई दलासाठी बनण्याची संधी गमावली. सिलेक्शन लिस्ट मध्ये ते नवव्या स्थानावर होते. आणि सिलेक्शन आठ उमेदवारांचे झाले.
- डॉक्टर कलाम यांना चाळीस विद्यापीठांमधून डॉक्टरेट देऊन, गौरविण्यात आलेले आहे.
- डॉक्टर कलाम यांची दोन वेळा झडती घेण्यात आली होती. त्या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता.
- डॉक्टर कलाम हे सर्व तरुणांचे प्रेरणास्थान होते. आणि आताही आहेत. त्यांना ०२ वेळा २००३ आणि २००६ मध्ये युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- डॉक्टर कलाम यांनी याहू वर प्रश्न विचारला होता, आपण जगाला आतंकवादापासून मुक्त करण्यासाठी काय करायला हवे ? तर याचे उत्तरांमध्ये त्यांना तीस हजार रिस्पॉन्सेस आले होते.
- डॉक्टर कलाम हे पहिले राष्ट्रपती होते, जे अविवाहित होते. ते आधी मांसहार करत,परंतु नंतर ते पूर्णपणे शाकाहारी बनले.
- डॉक्टर कलाम यांना विचारले होते की, लोकांनी त्यांना कसे आठवणी ठेवायला हवे ? वैज्ञानिक, राष्ट्रपती, की शिक्षक. आणि त्यांनी उत्तर दिले की, मला आधी एक शिक्षक म्हणून आणि नंतर कोणत्याही माणसाप्रमाणे लक्षात ठेवायला हवे.
- मी कलाम या बॉलीवूड चित्रपटाची निर्मिती डॉक्टर कलाम यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे.
- भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले डॉक्टर कलाम, हे तीन राष्ट्रपतींपैकी एक आहेत. भारतरत्न मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती पदावर नियुक्त झाले.
- कलाम यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहे. राष्ट्रपतीची काळजी घेते याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपली राष्ट्रपती पदासाठी मिळणारी सॅलरी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थान देत होते.
- १९६९ मध्ये डॉक्टर कलाम इस्रो मध्ये गेले आणि त्यांना सॅटेलाईट लॉन्च सायकलचा प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले. आणि भारताने पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी हा उपग्रह स्थापित केला.
- डॉक्टर कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते. कारण त्यांनी भारतासाठी अग्नी आणि पृथ्वी यांसारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
- आपल्या अकाउंटवर डॉक्टर कलाम एकूण ३८ जणांना फॉलो करत होते, ज्यामध्ये फक्त एकच क्रिकेटर होता.
- डॉक्टर विक्रम साराभाई यांना डॉक्टर कलाम आपले आदरणीय मानायचे.
- डॉक्टर कलाम कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या विशेष खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचे, ते सर्वांसोबत सायकल खुर्चीवर बसायचे, कारण ते अगदी नम्र होते.
- त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पंधरा पुस्तके लिहिलेली आहेत. ते म्हणायचे की लिखाण माझे प्रेम आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता. तर तुम्ही त्यासाठी खूप वेळ काढता. मी रोज दोन तास लिहितो, साधारणता मी मध्यरात्री लिहायला सुरुवात करतो, म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच लोकांचे राष्ट्रपती म्हटले जायचे.
- एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हे स्मारक बनवण्यासाठी, पंधरा करोड रुपये लागले होते. येथे त्यांची नऊशे पेंटिंग आणि दुर्मिळ फोटोज आहेत.
- त्यांच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर कलाम शिलॉंग येथे व्याख्यान देत होते, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा ते विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते, त्यांना नेहमी शिकवण्याची आवड होती, आणि शेवटच्या क्षणी सुद्धा ते त्यांच्या आवडीचे काम करत होते.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार
- भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्न बघायला आणि त्यांना पूर्ण करायला शिकवले. तर आपण आपल्या मिसाईल मॅनचे प्रेरणादायी विचार बघूया जे तुमच्या आयुष्य नक्कीच बदलून टाकतील.
- स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता, स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाही.
- वाट बघणार्यांना तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात. ज्या दिवशी तुमची सिग्नेचर, फोटोग्राफ मध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झाले.
- तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता. आणि तुमच्या सवयी तुमचे उद्याचे भविष्य बदलतील. तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल.
- खऱ्या मनाने केलेला प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही.
- एखाद्याला हरवणे सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.
- काळ्या रंगाला अशुभ मानले जाते. परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांचे भविष्य उज्वल बनवते.
- यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका, त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशी लोकांचे चरित्र वाचा, त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील.
- कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की, तुम्ही देखील खूप कठीण आहात. मी हँडसम व्यक्ती नाही आहे, पण मी माझे हँड गरजू व्यक्तीला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता ही मनात असते. तोंडावर नव्हे.
- जुने मित्र सोन्यासारखे असतात. आणि नवीन मित्र हिऱ्या सारखे असतात. हिरा भेटला म्हणून सोन्याला विसरु नका, कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून ठेवू शकते.
- प्रेम आंधळे असते, हे खरं आहे. कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करण्यास सुरू केले होते.
- पहिल्या विजयानंतर थांबू नका. कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरला तर तुमचा पहिला यश नशिबाने मिळालं होतं अस म्हणण्यासाठी अनेकजण तयार होतात. माणसाला समस्या, अपयशाची, आवश्यकता असते. कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते.
- तुमचे नेहमी मन मोठे असले पाहिजे. तोपर्यंत लढणे थांबू नका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत. तुम्ही एकमेव आहात, जीवनात एक ध्येय ठेवा. सतत ध्येय प्राप्त करत रहा. कठोर मेहनत करा आणि महान जीवन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत राहा.
- जर आपण स्वातंत्र्य नसणार, तर कोणीच आपला आदर करणार नाही.
- तरुणांना माझा संदेश आहे की, वेगळ्या पद्धतीने विचार करा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा. आणि जे अशक्य आहे, ते मिळवा. तुमच्या कामांमध्ये यशस्वी होण्यासाठी, तुम्ही एकाग्र होऊन त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे.
- ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल, तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्वकांक्षा ठेवू शकत नाही.
- टॅलेंट निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात. त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुमच्या विश्वास आहे. जर तुम्ही हे करत नसाल तर, तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हाती देत आहात.
- नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत.
- देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो.
- यशाचे रहस्य काय ? योग्य निर्णय घेणे. योग्य निर्णय कसे घ्यावे तर ते अनुभवाने. आणि अनुभव कसे घ्यावेत, तर चुकीचे निर्णय घेऊन.
डॉक्टर अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी कथा | apj abdul kalam biography
यशस्वी व्यक्ती समाधानी असतो अस नाही, पण समाधानी असणारा माणूस मात्र शंभर टक्के यशस्वी असतो. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन आणि आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात घडलेला छोटासा प्रसंग पण खूप प्रेरणादायी असा आहे,
डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असतात. गप्पांच्या ओघांमध्ये त्यांचा मित्र त्यांना विचारतो की, डॉक्टर कलाम आपल्या आयुष्यामधला सर्वात समाधानाचा क्षण कोणता ? मित्राला वाटलं की डॉक्टर कलाम आपल्या आयुष्यातला क्षेपणास्त्र संबंधिचा कुठलातरी क्षण सांगतील, किंवा अवकाशामध्ये केलेलं जे काही खूप मोठं संशोधन आहे, त्याच्याबद्दलचा काहीतरी क्षण सांगतील. पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
डॉक्टर कलाम म्हणाले की, माझ्या गावातील एक स्त्री हृदयरोगाच्या आजाराने ग्रस्त होते. तिला त्यावर उपचार घेणे गरजेचे होते. परंतु उपचाराची जास्त किंमत असल्यामुळे त्या स्त्रीला योग्य वेळेमध्ये उपचार घेणे जमले नाही. आणि त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराने तिचा मृत्यू झाला. आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप वाईट वाटली, आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं किंवा अशा लोकांसाठी काहीतरी करायला हव, असं माझ्या मनामध्ये आलं, आणि त्यानंतर मी माझ्या संशोधनाच्या कामातून किंवा अवकाश संशोधनाच्या कामातून काही दिवसांची रजा घेतली.
आणि हृदयासाठी लागणारे वस्तूंचे संशोधन मी माझ्या मित्रांच्या मदतीने करू लागलो. बरेच दिवसांच्या प्रयत्नानंतर आम्ही भारतीय बनावटीची आणि कमी खर्चामध्ये तयार होणारी स्ट्रिंग तयार केली. आणि ती स्ट्रिंग आणि त्याचे सर्व हक्क भारत सरकारला दिले. आणि त्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो. ते नेहमीप्रमाणे सुरू झालं.
काही दिवसानंतर एक प्रसंग घडला – एका विमानतळावर मी उतरल्यानंतर एक स्त्री माझ्याकडे गडबडीने पळत आली, आणि तिने माझा हात हातामध्ये घेतला आणि मला म्हणाली की, डॉक्टर कलाम तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता, हे ऐकून मला थोडासे आश्चर्य वाटलं आणि मी विचारलं असं का ? तर त्यावर स्त्रीने दिलेले उत्तर माझ्यासाठी खूप समाधानच होतं. ती स्त्री म्हणाली की, तुमच्या द्वारे किंवा तुम्ही बनवलेली स्ट्रिंग माझ्या हृदयामध्ये आहे. आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहतात.
डॉक्टर कलाम सांगतात की, माझ्या आयुष्यातला हा सर्वात समाधानचा क्षण होता. की एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मी केलेले एक छोटसं कार्य उपयोगाला आलं. डॉक्टर कलामांच ते उत्तर ऐकून त्यांचा मित्र आणि त्यांच्या आसपास असणारे लोकांना एक आनंदाचा आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कारण जगातला इतका मोठा शास्त्रज्ञ की, त्यांनी अवकाश संशोधनामध्ये इतकं मोठं नाव केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये एक छोटासा उपकरण बनवलेलं. ते उपकरणाची जी संशोधन होतं ते किती समाधानकारक ठरलेला आहे.
डॉ. कलाम यांच्या जीवनातील महत्वाचे किस्से
मिसाईल मॅन बरोबरच एक साधा आणि नम्र व्यक्ती हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची ओळख. याबद्दलचे काही किस्से प्रसिद्ध आहेत त्यातलेच काही किस्से आपण बघणार आहोत
नातेवाईकांचा खर्च स्वतःच्या खिशातून केला
डॉक्टर कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला राष्ट्रपती भवनात आले होते. जवळपास ५०-६० माणसं होती. कलाम साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की, या पाहुण्यांना स्टेशनपासून राष्ट्रपती भवनापर्यंत आणण्यासाठी सरकारी गाड्यांचा वापर करू नये. त्याचबरोबर या सगळ्यांचा राष्ट्रपती भवनात राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळा लिहीला जावा. आपल्याला आश्चर्य वाटेल की, हा सगळा खर्च साडेतीन लाखाच्या पुढे गेला. आणि सगळा खर्च डॉक्टर कलाम यांनी सरकारी तिजोरीतून न करता स्वतःच्या खिशातून केला होता.
चहाविक्रेत्याचे कौतुक
डॉक्टर अब्दुल कलाम जेव्हा उत्तर प्रदेश मध्ये जायचे, तेव्हा ते त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर थांबवायचे. तिथे प्लास्टिकच्या कप मधून, ते चहा घ्यायचे. आणि तिथल्याच लोकांबरोबर प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून, तो प्यायचे. रस्त्याच्या कडेला असलेला ढाबा अतिशय साधा असायचा. एवढी मोठी व्यक्ती असताना, भारताचे मिसाईल मॅन म्हणून जगभर ख्याती असतानाही, रस्त्याच्या एका छोट्याशा ढाब्यावर बसून ते चहा घ्यायचे.
हे असं करण्यामागचं कारण, तो चहा नसून तो चहा विकणारा चहावाला होता. त्याबाबत डॉक्टर अब्दुल कलाम यांचा म्हणणं असं होतं की, कसा चहा बनवणारा एक माणूस एका दिवसात शंभर पेक्षाही जास्त जणांना तो चहा पाजतो, त्याचबरोबर सगळी भांडी स्वच्छ करतो, त्याचे पैसे गोळा करतो, आणि हे सगळं तो आनंदाने सगळ्यांचा हसतमुखाने स्वागत करत रोज करत असतो.
मोची आणि ढाबा वाल्याचा सन्मान
२००२ साली भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर, डॉक्टर अब्दुल कलाम पहिल्यांदाच केरळला गेले होते. त्यावेळी केरळच्या राजभवनात उतरलेल्या डॉक्टर कलाम यांनी राजभवनात पाहुणे म्हणून दोघांना निमंत्रित केलं. तुम्ही कल्पना करू शकाल का कोण असतील हे दोन खास पाहुणे ? एक होता मोची आणि दुसरा एका छोट्याशा ढाब्याचा मालक.
राष्ट्रपती होण्याच्या खूप आधी डॉक्टर कलाम यांचे केरळ मधल्या तिरुवनंतपुरम मध्ये काही काळ वास्तव्य होते, त्या काळात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या त्या मोच्याशी त्यांची ओळख झाली होती. आणि त्याच काळात ते नेहमी त्या मालकाच्या छोट्याशा ढाब्यावर जेवायला जात असत. राष्ट्रपती झाल्यानंतरही कलाम साहेब त्यांना विसरले नाही, आणि राजभवनात पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी त्या दोघांची निवड केली.
समारंभासाठी साधी खुर्ची निवडली
आयआयटी वाराणसीच्या पदवीदान समारोहासाठी, अध्यक्ष म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम गेले असताना, त्यांनी स्टेजवर अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसायला नकार दिला. कारण एवढंच की अध्यक्ष्यांसाठी असलेली ती खास खुर्ची इतर खुर्च्यांपेक्षा मोठी होती. डॉक्टर कलाम यांनी बसायला नकार दिल्यानंतर, ताबडतोब ती मोठी खुर्ची उचलून त्या जागी एक साधी खुर्ची त्यांना बसायला देण्यात आली.
सर्वसामान्यांची काळजी घेणारे डॉक्टर कलाम
२००३ साली राष्ट्रपती असताना, एकदा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या गाड्या राष्ट्रपती भवनाकडे जात होत्या, ते दिवस हिवाळ्यातल्या कडक थंडीचे होते. त्यांनी अचानक आपली गाडी थांबवली, आणि ते गाडीतून बाहेर आले. त्यांचे सुरक्षा रक्षक ही त्यावेळी तणावात आले. त्यावेळी एवढ्या कडाक्याच्या थंडीतही साध्या कपड्यात गेटवर आपली ड्युटी करत असलेल्या गार्ड्सला बघून त्यांना आश्चर्य वाटले, ते त्यांना भेटले सुद्धा थंडीपासून बचाव करणारे चांगले गरम कपडे त्या गार्ड्सला पुरवण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले.
डॉक्टर कलाम यांचा साधेपणा
२००७ साली रामनाथ गोयंका अवार्ड फंक्शनसाठी चीफ गेस्ट म्हणून त्यांना बोलवले असताना आपले स्पीच देऊन झाल्यानंतरही तेथे थांबले. नुसते थांबलेच नाहीत तर, त्यानंतरच्या चर्चेमध्ये त्यांनी भाग घेतला.चर्चेमध्ये बोलता बोलता ते खुर्चीवर न बसता, खाली स्टेजवर बसले. म्हणजे चर्चेत भाग घेणारे इतर लोक स्टेजवर खुर्चीत आणि हे एवढे मोठे व्यक्तिमत्व आणि त्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट खाली स्टेजवर बसलेले, बघून स्टेजवरच्या त्या लोकांनाही अवघडल्यासारखं होणं साहजिकच होतं.
डॉक्टर कलाम यांची भूतदया
१९८२ साली डॉक्टर कलाम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये डिरेक्टर झाल्यानंतर, सुरक्षा आणखी कडक करण्यासाठी त्या भोवतीच्या संरक्षण भिंतीवर काचेचे तुकडे लावण्यात येणार होते, जेणेकरून कोणीच भिंतीवर चढून आत येऊ शकणार नाही, पण कलाम साहेबांनी त्याला अनुमती दिली नाही. त्याबद्दल त्यांचे म्हणणं असं होतं की, भिंतीवर असे काचांचे तुकडे लावले गेले, त्यावर पक्षी बसू शकणार नाहीत. त्यांना इजा होऊ शकते. त्याचाच परिणाम म्हणून डीआरडीओच्या संरक्षक भिंतीवर काचांचे तुकडे लागले नाहीत.
डॉक्टर कलाम आणि सुरक्षा सैनिकाचा किस्सा
डॉक्टर कलाम यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. २७ जुलै २०१५ रोजी शिलॉंग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यासाठी ते निघाले. दिल्लीहून विमानाने अडीच तासांचा प्रवास करून ते गुवाहाटी विमानतळावर आले, आणि तिथून पुढे शिलॉंग साठी पुन्हा अडीच तासांचा प्रवास गाडीने करायचा होता. गुवाहाटी विमानतळावरून त्यांच्या सोबत गाड्यांचा ताफा निघाला. सिक्युरिटी एकदम टाईट होती.
डॉक्टर कलाम यांच्या गाडीत त्यांचे सहकारी सृजनपाल सिंग हेही होते. कलाम साहेबांच्या गाडी पुढे एक वरून उघडे असणारी जिप्सी गाडी त्यात त्यांच्या सुरक्षेसाठी तीन जवान होते. दोन जवान बसलेले, आणि एक जवान हातात बंदुक घेऊन उभा होता. एक तासाच्या प्रवासानंतर, कलाम साहेबांनी सृजन यांना प्रश्न केला की तो उभा काय आहे ? तो थकून जाईल, हि तर एक प्रकारची शिक्षा आहे. तू त्याला वायरलेस मेसेज पाठवून बसायला सांगू शकतोस. सृजन यांनी मेसेज देण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही.
पुढचा दीड तास डॉक्टर कलाम सुजन यांना त्या जवानाला बसायला सांगायला सांगत होते. पण खूप प्रयत्न करून नाही तर मेसेज देऊ शकले नाही. तेव्हा डॉक्टर कलाम यांनी त्या जवानाला स्वतः भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्यासाठी अडीच तास उभे असलेल्या त्या जवानाला डॉक्टर कलाम भेटले. त्याचा हात हातात घेऊन, त्याचे आभार मानले. त्यांनी त्याला विचारलं की, तू थकला आहेस का ? तुला काही खायला हवे का ? एवढेच नाही तर त्यांनी त्या जवानाची माफी मागितली की, माझ्यामुळे तुला अडीच तास उभे राहायला लागले.
तो जवान हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाला. आणि भावूक होऊन तो कलाम साहेबांना म्हणाला की, साहेब तुमच्यासाठी तर आम्ही सहा तासही सहज उभे राहू शकतो.
सर्वकाही दानाला दिले
डॉक्टर कलाम यांनी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काहीच राखून ठेवले नाही. राष्ट्रपती झाल्यावर लगेच त्यांनी साठवलेले पैसे आणि राष्ट्रपती पदाचा मिळणारा पगार एका ट्रस्टला दान केला. ते ट्रस्ट देशातल्या दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत होते. त्याबद्दल विचारलं असताना ते म्हणाले, मी आता देशाचा राष्ट्रपती झालोय, मी जिवंत असेपर्यंत पुढे भारत सरकार माझी काळजी घेईलच, मग मला आता माझा पगार आणि साठवलेली जमापुंजी काय कामाची. त्यापेक्षा ते कोणाच्यातरी भल्यासाठी कामे आलेले, चांगलं. असे होते आपले कलाम साहेब.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन कसे बनले ?
८० चा दशकामधील गोष्ट आहे. अग्नि मिसाईलची टेस्टिंग ही वारंवार फेल होत होती. पूर्ण देशाला या गोष्टीची आतुरतेने आस लागली होती. परंतु त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी, शास्त्रज्ञांना अजून थोड्या कालावधीची आवश्यकता होती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सर्व वैज्ञानिकांना व शास्त्रज्ञांना एकत्रित केले. जमलेल्या दोन हजार व्यक्तींमध्ये अब्दुल कलामांनी बोलायला सुरुवात केली की, आम्ही एका महान संधीच्या जवळ उभे आहोत.
एखादी मोठं काम करायचं आहे, तर मोठा संघर्ष तर करावाच लागेल. परंतु आपण असे हिम्मत गमावू शकत नाही. असे बोलून एपीजे अब्दुल कलाम दोन हजार व्यक्तींमध्ये म्हणाले, उद्या अग्नीची लॉन्चिंग यशस्वीरित्या पूर्ण होईल. आपण सगळे मिळून या गोष्टीचा आनंद व्यक्त करू. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या शानदार भाषणामुळे वैज्ञानिक व शास्त्रज्ञानाच्या आत्मबलांमध्ये वाढ झाली. व त्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने काम करायला सुरुवात केले.
२२ मे १९८९ चा तो दिवस भारतामध्ये इतिहास घडवून आणणारा होता. ६०० सेकंडच्या अग्नी मिसाईलच्या हळुवार उड्डाणाने यशस्वीरित्या पूर्ण केली. अशा रीतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन बनले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची कारकीर्द
- जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
- शिक्षण : श्वार्ट्झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
- १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
- १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
- १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
- १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
- १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
- १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
- १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
- १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
- १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
- १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
- १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
- १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
- १९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
- २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त.
- २००१ : सेवेतून निवृत्त.
- २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
डॉ. कलामांनी लिहिलेली पुस्तके
- अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
- इग्नायटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
- ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
- इंडिया – माय-ड्रीम
- उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
- एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :
- फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
- विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
- सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
- टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
- टार्गेट ३ मिलियन (सहलेखक – सृजनपालसिंग)
- ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)
- दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
- परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक – व्ही. पोतराज, मराठी अनुवाद – अशोक पाध्ये)
- ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
- बियॉंण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
- महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन)
- स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताचे परिवर्तन सुरू असून ते कोणत्या दिशेने करणे श्रेयस्कर होईल याचे मार्मिक विश्लेषण यात आहे.
अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
- १९८१ : पद्मभूषण
- १९९० : पद्मविभूषण
- १९९७ : भारतरत्न
- १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
- १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
- २००० : रामानुजन पुरस्कार
- २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
- २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
- २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
- २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
- २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
- २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
- २०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.
- २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- डॉ. अब्दुल कलाम (डॉ. वर्षा जोशी)
- असे घडले डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (प्रणव कुलकर्णी)
- इटर्नल क्वेस्ट : लाइफ अँड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
- ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
- ए.पी.जे. अब्दुल कलाम – संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, )
- ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
- ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
- प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)
- ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)
- रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)
- कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)
- कलामांचे आदर्श (डॉ. सुधीर मोंडकर)
- भारतरत्न कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
- वियार्थ्यांचे कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
- स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम (डॉ. वर्षा जोशी)
- रामेश्वरम् ते राष्ट्रपती भवन डॉ. अब्दुल कलाम, लेखक : डॉ. शां. ग. महाजन
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल दहा ओळी
- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो हा उपक्रम 2015 मध्ये यु. एनने सुरु केला होता.
- डॉक्टर कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे. ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या नावाने प्रसिद्ध आहेत.
- डॉक्टर कलाम यांचे वडील जैनुलाबदिन यांच्याकडे एक नाव होती. ती नाव समुद्रातील वादळामुळे नष्ट झाली होती. डॉक्टर कलाम हे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावण्यासाठी वर्तमानपत्र वाटायचे. आणि पैसे मिळवायचे.
- डॉक्टर कलाम त्यांच्या आत्मचरित्र मध्ये सांगतात की, त्यांनी फक्त वर्तमानपत्र वाटण्याचे काम नाही केले, तर ते चिंचोके गोळा करून एका दुकानात देऊन एक आणा कमावत होते.
- डॉक्टर कलाम पाचवी मध्ये असतानाचा एक प्रसंग, ते आणि त्यांचा ब्राह्मण मित्र रामनाथा शास्त्री पहिला बेंचवर सोबत बसायचे, नवीन शिक्षकाला ब्राह्मणाच्या मुलाने मुस्लिम मुलांच्या शेजारी बसणे आवडले नाही. आणि त्या शिक्षकांनी डॉक्टर कलाम यांना उठून शेवटच्या बेंचवर बसायला लावले होते.
- डॉक्टर कलाम यांची इच्छा पायलट बनण्याची होती, आणि त्यांच्या वडिलांची इच्छा ते कलेक्टर बनावे अशी होती. पण ते रॉकेट इंजिनिअर बनले. कलेक्टर नाही बनू शकले, पण देशाचे राष्ट्रपती बनले. महान वैज्ञानिक आणि शिक्षकही बनले. कॉलेजमध्ये असताना डॉक्टर कलाम यांनी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये पैशांचा अभाव हेही एक कारण होते.
- डॉक्टर कलाम यांना लिखाणा सह कविता लिहिण्याची देखील आवड होती. त्यांनी तमिळ भाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत.
- डॉक्टर कलाम यांना वाजवण्याची देखील आवड होती. त्यांचे विना वाजवताना एक स्मारक आहे. ज्याचे उद्घाटन त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी वर करण्यात आले होते. डॉक्टर कलाम सकाळी चार वाजता उठायचे, आंघोळ करायचे, आणि गणित शिकायला जायचे, कारण त्यांच्या शिक्षकांची अट होती की, ते फक्त त्याच विद्यार्थ्यांना गणित शिकवतील, जे चार वाजता उठून आंघोळ करून, क्लासला येतील.
- डॉक्टर कलाम यांचे आत्मचरित्र “विंग्स ऑफ फायर”, “अग्निपंख”, यादी इंग्लिश भाषेत प्रकाशित झाले होते. नंतर ते फ्रेंच आणि चायनीज अश्या तेरा भाषेत प्रकाशित झाले.
एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन
इसवी सन २००२ मध्ये भारतीय प्रजासत्ताकाचे ते अकरावे राष्ट्रपती बनले. एपीजे अब्दुल कलाम हे शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये व्याख्यान देतानाच, त्यांची प्रकृती बिघडली यातच या महान व्यक्तीचे २७ जुलै २०१५ रोजी ज्ञान देता देता निधन झाले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल व्हिडिओ
FAQ
१. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का म्हणतात?
८० चा दशकामधील गोष्ट आहे. अग्नि मिसाईलची टेस्टिंग ही वारंवार फेल होत होती. पूर्ण देशाला या गोष्टीची आतुरतेने आस लागली होती. परंतु त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी, शास्त्रज्ञांना अजून थोड्या कालावधीची आवश्यकता होती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सर्व वैज्ञानिकांना व शास्त्रज्ञांना एकत्रित केले. जमलेल्या दोन हजार व्यक्तींमध्ये अब्दुल कलामांनी बोलायला सुरुवात केली की, आम्ही एका महान संधीच्या जवळ उभे आहोत.
एखादी मोठं काम करायचं आहे, तर मोठा संघर्ष तर करावाच लागेल. परंतु आपण असे हिम्मत गमावू शकत नाही. असे बोलून एपीजे अब्दुल कलाम दोन हजार व्यक्तींमध्ये म्हणाले, उद्या अग्नीची लॉन्चिंग यशस्वीरित्या पूर्ण होईल. आपण सगळे मिळून या गोष्टीचा आनंद व्यक्त करू. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या शानदार भाषणामुळे वैज्ञानिक व शास्त्रज्ञानाच्या आत्मबलांमध्ये वाढ झाली. व त्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने काम करायला सुरुवात केले. २२ मे १९८९ चा तो दिवस भारतामध्ये इतिहास घडवून आणणारा होता. ६०० सेकंडच्या अग्नी मिसाईलच्या हळुवार उड्डाणाने यशस्वीरित्या पूर्ण केली. अशा रीतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन बनले.
२. एपीजे अब्दुल कलाम यांचे दुसरे नाव काय होते?
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोंबर १९३१ साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला.
डॉ एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा देशाचे पंतप्रधान कोण होते?
18 जुलै 2002 रोजी त्यांना राष्ट्रपती बनवण्यात आले आणि 25 जुलै 2002 रोजी राष्ट्रपती भवनात त्यांनी शपथ घेतली. या समारंभात त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मंत्रिमंडळाचे सदस्यही उपस्थित होते.
एपीजे अब्दुल कलाम यांनी किती क्षेपणास्त्रे बनवली?
DRDO मधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी पृथ्वी, अग्नि, त्रिशूल, आकाश, नाग या पाच वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे बनवली
अब्दुल कलाम यांचे पहिले क्षेपणास्त्र कोणते?
अब्दुल कलाम यांचे पहिले क्षेपणास्त्र अग्नि आणि पृथ्वी हे होते.
अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या गावात झाला?
15 ऑक्टोबर 1931 रोजी धनुषकोडी, रामेश्वरम, तामिळनाडू या गावात झाला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.