छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती | Sambhaji Maharaj Information In Marathi

इतिहासाच्या पटलावर, बदनामीचे सर्वाधिक वार झेलूनही, ज्यांचा इतिहास कोणालाही मिटविणे शक्य झाले नाही, असे आपले छत्रपती शंभुराजे होय. छत्रपती संभाजी महाराज एक अद्भुत व्यक्तिमत्व. छत्रपती शिवरायांचा आणि जिजाऊ मा साहेबांचा काळजाचा तुकडा असलेल्या शंभूराजांच्या नशिबी मात्र उभे आयुष्य संघर्ष आला.

अचाट धैर्य, अविश्वसनीय पराक्रम, असामान्य शौर्य, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले.

राजकारण, समाजकारण, धर्मकारण, यांच्यात मुरलेले संभाजी राजे हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. नियतीचे डोळे पाणावले, आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून, स्वराज्याला जीवनदान दिले.

त्यांच्या या बलिदानामुळे, मराठी मातीत उगवलेल्या गवताला ही भाले फुटले. घराघरांचे किल्ले झाले आणि अवघा मराठी मुलुख आपल्या राजाच्या हत्तीचा सूड घेण्यासाठी, पेटून उठला. त्वेषाने शत्रूवर तुटून पडलेल्या या मराठ्यांनी, पुढे अल्पावधीतच अटकेपार झेंडे रोवून, समस्त देशभरात आपले भव्य साम्राज्य निर्माण केले.

छत्रपती संभाजी महाराज अगदी लहान असल्यापासूनच अनेक संकटांचा सामना करत होते. संस्कृत पंडित, अचाट धैर्य, अजोड पराक्रम, प्रयत्नांची पराकाष्ठा, धर्माभिमानी, व्यसंगी, असामान्य शौर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत सविस्तर वाचा.

Table of Contents

छत्रपती संभाजी महाराज इतिहास माहिती | Sambhaji Maharaj Information In Marathi

पूर्ण नाव छत्रपती संभाजी महाराज
जन्म तारीख १४ मे १६५७
जन्मस्थळ पुरंदर किल्ला
राजघराणेभोसले
लोकांनी दिलेली पदवीछत्रपती, छांवा
वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज
आईचे नाव सईबाई
दूध आईधाराऊ पाटील गाडे
पत्नीचे नाव येसूबाई
आजोबा शहाजीराजे भोसले
आजी जिजाबाई
ओळख संस्कृत तज्ञ, कलाप्रेमी आणि शूर योद्धा
राज्याभिषेक20 जुलै 1680
मृत्यू दि. ११ मार्च १६८९

संभाजीराजे यांचा जन्म

संभाजी राजांचा जन्म हा १४ मे १६५७ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर झाला. सईबाई या त्यांच्या मातोश्री, तर शिवाजी महाराज हे त्यांचे पिताश्री होते. शिवरायांनी आपले वडील बंधू संभाजीराजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले.

संभाजी राजे यांचे बालपण व प्रारंभिक जीवन

संभाजी राजे यांना वय वर्ष दोन झाल्यानंतर, त्यांच्या आई सईबाई यांचे दुःखद निधन झाले आणि यामुळे आईविना पोरके झालेल्या बाल शंभूराजांचा सांभाळ आणि पालन पोषण हे मासाहेब जिजाऊंच्या देखरेखितखाली पार पडले. यावेळी मासाहेब जिजाऊने कापूरहोळ गावचे धाराऊ गाडे पाटील यांची शंभूराजांची दूधआई म्हणून नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे संभाजी राजेंवर अपार प्रेम होते. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली.

Sambhaji Maharaj Information In Marathi

आणि याच काळामध्ये मासाहेब जिजाऊंनी बाल शंभूराजांना राजकीय पुस्तके आणि इतर संपूर्ण शिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि एक आदर्श राजा कसा असतो ? याची संपूर्ण जडणघडण शंभुराजांची त्यांनी या काळामध्ये केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. त्यामुळे येणाऱ्या संपूर्ण संकटांचा सामना कसा करावा ? याचीही शिकवण त्यांनी शंभूराजांना दिली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन

  • छत्रपती संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय, पराक्रमी आणि अजिंक्य योद्धा. शंभूराजांचे शौर्य, पराक्रम आणि बुद्धिमत्ता अवघ्या जगाला माहीत झाली.
  • परंतु शंभूराजे कसे दिसायचे ? त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं ? त्यांची शरीरयष्टी, वजन आणि उंची किती होती ? असे असंख्य प्रश्न शिवप्रेमीच्या मनामध्ये आजही निर्माण होतात.
  • ऐतिहासिक आणि समकालीन साधनातून, कथा, कादंबऱ्या, आणि शिलालेखातून या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजपणे मिळून जातात. त्याच ऐतिहासिक नोंदीच्या आधारे जाणून घेऊयात, छत्रपती संभाजी महाराज कसे दिसायचे ? मित्रांनो बॉम्बे रेकॉर्ड्स, मद्रास रेकॉर्ड आणि पोर्तुगीज रेकॉर्ड संभाजी महाराजांच्या स्तुतीने अगदी भरून गेली आहेत. पण दुर्दैवानं मराठी माणसांचे मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले, तब्बल साडेतीनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनामीच्या आगीत जळत राहिला.
Sambhaji Maharaj
  • खरे तर, शंभूराजे आजपर्यंत आम्हाला कळालेच नाही, मित्रांनो इटालियन इतिहासकार त्याच्या ग्रंथामध्ये असं लिहितो, त्याने शंभूराजांना लहानपणी आणि मोठेपणी सुद्धा दोन्ही वेळेस पाहिलं होतं. त्याने पोर्तुगीजांच्या वतीने १६८५-८६ साली  संभाजी महाराजांशी बोलणी देखील केली होती. तो संभाजी महाराजांबद्दल असं लिहून ठेवतो, “त्यांच्यासारखा विनम्र, हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिला नाही. शंभूराजे संस्कृतचे महापंडित होते, त्यांनी कमी वयामध्ये “बुधभूषण” या सह तीन ग्रंथांची रचना केली होती.
  • त्यांचे मित्र असणारे कवी कलश, यांनी देखील त्यांना एका काव्यचंद मध्ये, अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य यांचा संगम यांच्या ठाई आहे, अशा हनुमंताची उपमा दिली होती. मित्रांनो, दुर्दैवाने आपल्याला फक्त शंभूराजांच्या लढायांबद्दलच माहिती आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं ? याविषयी अनेकांना माहित नाही. शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, १२० पेक्षा जास्त लढाईमध्ये स्वतः नेतृत्व केलं होतं आणि आश्चर्य म्हणजे यातील एकाही लढाईमध्ये शंभूराजे पराभूत झाले नाही.
  • प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी आणि इतिहास तज्ञ यांनी १६७२ साली बागलाण, रामनगरच्या मोहिमेवर असणाऱ्या पंधरा वर्षांच्या शंभूराजांना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिलं होतं. केवळ पंधरा वर्षांच्या शंभूराजांचे व्यक्तिमत्व, नेतृत्व, आणि युद्ध कौशल्य पाहून तो अगदी भारावून गेला होता. त्या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व पंधरा वर्षांचे शंभूराजे करत होते, या गोष्टीचा भयंकर आश्चर्य वाटलं होतं. तोच लिहितो, “हा युवराज लहान आहे, पण धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्तीला साजेल असाच शूरवीर आहे.
  • शिवाजी राजांसारखे युद्ध कौशल्य, पित्याच्या बरोबर राहून तो युद्ध कलेमध्ये तरबेज झालेला आहे. त्यामुळेच चांगल्या सेनापतीची ही बरोबरी करेल, इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून, अतिशय रूपवान आणि त्याचं सौंदर्य आणि सैनिकांचा त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. त्याचं व्यक्तिमत्व असे आहे की, त्याच्या सैनिकाचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. राजा शिवाजी सारखाच मान ते संभाजींना देखील देतात.
  • १६६६ साली आग्र्याच्या नजर कैदेत असताना, संपूर्ण आग्रा शहरांमध्ये दख्खनचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे तेजस्वी पुत्र संभाजी राजे यांच्याबद्दलच चर्चा होती. त्यावेळी अनेक दंतकथा, आख्यायिका आणि सत्यप्रसंग शिवाजी महाराजांबद्दल आग्र्यांमध्ये प्रसिद्ध होते. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, सुरत लुटली, धर्मांध औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून ही नवीन स्वराज्याची स्थापना केली आणि आता तर आग्र्यामध्ये येऊन जात दरबारामध्ये मोठ्या मोठ्या हत्तींचे ही भेदरलेले उंदीर झाले. महाराजांचे सौदर्य, त्यांचं तेजस्वी रूप पाहायला, लोक अक्षरशः गोळा व्हायचे.
  • केवळ नऊ वर्षांचे वय होतं शंभूराजांचे, पण शरीर भरभक्कम असल्यामुळे, ते बारा-तेरा वर्षाचे वाटायचे. नितळ गोरापान वर्ण, लांब सडक गरुडाच्या चोचीसारखं बहारदार नाक, टपोरे पाणीदार डोळे, भव्य कपाळ, चेहऱ्यावर बिनधास्त पणा, भयंकर आत्मविश्वास आणि बोलण्यात पाणीदारपणा, स्वर्गीय सौंदर्य आणि रुबाबदार शरीर, डोक्यावर मोगली कमान, त्यावर रत्नजडित मोत्याचे पिंपळपान, भव्य कपाळावर रुपेरी शिवगंध, कानातले मोत्याचे कुंडल, अंगावर सुंदर नक्षीकाम केलेला झगा, गळ्यामध्ये आई भवानीची कवड्यांची माळ, अंगावर उंची दागिने, रत्नजडित हार, कमरेला छोटीशी तलवार, हा संभाजी महाराजांचा साज मनाला मोहिनी घालणार होता.
  • शिवरायांसारखंच एक प्रसन्न स्मित हास्य, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर होतं. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता. पण इतर मुगली शहजाद्यांसारखी मगरूरी आणि माजुरडेपणा नव्हता. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लोकांना प्रचंड भुरळ पडायची.
  • शंभूराजांचे रुबाबदार व्यक्तिमत्व पाहून, खुद्द औरंगजेब देखील सुरुवातीला थक्क झाला होता. शंभूराजांचे बोलणं अतिशय मधाळ आणि वागणं रुबाबदार होतं. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, आग्र्यावरून सुटकेच्या वेळी, शिवरायांना संभाजी महाराजांनी फार मोठी मदत केली होती. एक युवराज म्हणून शंभूराजे स्वराज्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पार पाडत होते. कवी मनाचे शंभूराजे शिवरायांसारखेच शूर आणि कार्यकुशल होते.
छत्रपती संभाजी महाराज

पुरंदरचा तह आणि मुघलांची मनसबदारी

जेव्हा १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो पुरंदरचा तह झाला, त्या तहाच्या पालनाकरिता अवघ्या नऊ वर्षाचे शंभुराजे हे मोघलांना जामीन म्हणून राहिले.

तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगले नाही, एवढेच नाही तर या नऊ वर्षाच्या शंभूराजांना मोगलांची पंचहजारी मनसबदारी सुद्धा स्वीकार करावी लागली आणि याच काळात काही काळ संभाजी राजांना औरंगाबाद या मोगलांच्या ठिकाणी वास्तव्य करावे लागले.

आग्रा भेट आणि सुटका

या पुरंदर तहाचं पालन म्हणून १६६६ मध्ये शिवरायांना मोगल बादशाह औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावे लागले. याप्रसंगी दहा वर्षाचे बाल शंभूराजे हे राजगड ते आग्रा असा मोठा प्रवास करून आपल्या वडिलांच्या सोबत आग्र्याला गेले. या आग्र्यामध्ये शिवरायांची जशी बादहशासोबत प्रत्यक्ष भेट झाली, त्याचप्रमाणे शंभूराजे यांचीही प्रत्यक्षपणे औरंगजेबासोबत भेट झाली.

मात्र तेव्हा औरंगजेबाला हे ठाऊक नव्हतं की, हेच शंभूराजे पुढील काळामध्ये त्यांना अनेक यातना देणार आहेत. या आग्र्याच्या सुटकेच्या समयी सुद्धा शिवरायांनी आपल्या या बाल शंभूराजांना मथुरा येथे मुक्कामाला ठेवले आणि जवळपास पुढील दोन महिने शंभुराजे हे स्वराज्याच्या बाहेर होते. मात्र याही परिस्थितीमध्ये स्वराज्याचे धाकले धनी डगमगले नाही. त्यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली.

संस्कृत ग्रंथ निर्माते संभाजी महाराज

शंभुराजे थोर सेनापती, थोर राज्यकर्ते होते. त्याचप्रमाणे ते संस्कृतचे गाढे अभ्यासक सुद्धा होते आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी, प्रशासन कसे चालवावे ? यावर आधारित “बुधभूषण” नावाचा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहून काढला.

या संस्कृत वरील प्रगट अशा पकडीमुळेच, ज्ञानामुळेच, गागाभट्ट या संस्कृत पंडिता द्वारे लिखित समनय नावाचा ग्रंथ त्यांनी संभाजी महाराजांना अर्पण केला. म्हणजेच यातून संभाजी महाराज हे संस्कृतीचे किती गाढे अभ्यासक होते, हे आपल्याला समजून येते.

संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील मैत्री

बालपणी, संभाजी राजे हे मुघल शासक औरंगजेबाच्या बंदिवासातून निसटले असताना, त्यांच्या वनवासात, ते शिवाजी महाराज यांचे दूरचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या दूरच्या नातेवाईकाच्या घरी काही काळ राहिले. संभाजी राजे तेथे सुमारे एक ते दीड वर्ष राहिले, नंतर संभाजी राजे काही काळ ब्राह्मण यांचे मूल म्हणून राहिले. त्यासाठी मथुरेत त्यांचे उपनयन संस्कारही झाले आणि त्यांना संस्कृतही शिकविण्यात आले. यावेळी कवी कलश यांच्याशी संभाजींची ओळख झाली. संभाजी राजे यांचा उग्र आणि बंडखोर स्वभाव फक्त कवी कलशच हाताळू शकले.

स्वराज्यभिषेक आणि स्वराज्याचे पहिले युवराज

दि. ०६ जून १६७४ रोजी राजधानी रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधी संपन्न झाला. आणि या विधीप्रसंगी शंभूराजे हे स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून घोषित करण्यात आले. म्हणजे खऱ्या अर्थाने शंभुराजे हे पुढील छत्रपती पदाचे वारसदार बनले.

शृंगारपूरचे सुभेदार

शिवराज्याभिषेकानंतर, १६७६ ते १६७८ शिवरायांनी दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली. यावेळी त्यांनी शंभूराजांना राजधानी रायगडावर न ठेवता, त्यांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली. या काळामध्ये त्यांनी शृंगारपूरमध्ये अतिशय उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली.

शिवनिधनानंतरच्या संभाजी महाराजांच्या हालचाली

दि. ०३  एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी रायगडावर निधन झाले. यावेळी शंभुराजे आपल्या पत्नी येसूबाई सोबत पन्हाळगडावर आले. गडावरील मंत्री आणि सोयराबाई यांनी शंभूराजांचे थोरले बंधू राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि शंभूराजांना कैद करण्याचे कारस्थान  रचले.

मात्र यावेळी सेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्यांची साथ न देता संभाजी महाराजांना मदत केली. संभाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने या संपूर्ण कट कारस्थानाचा बिमोड करून स्वराज्याचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.

रायगडावर आगमन आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

जून १६८० शंभुराजे पन्हाळगडावरून राजधानी रायगडावर आले आणि स्वराज्याचा कारभार पाहायला सुरवात केली. त्यानंतरच दि. १६ जानेवारी १६८१ शिवयोगी पंडित यांच्याद्वारे, स्वतःचा राज्याभिषेक विधी करून घेतला.

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शंभुराजे हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. यानंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांच्या कारकीर्दला सुरवात झाली. मात्र ही कारकीर्द अनेक शत्रूंच्या आक्रमणामुळे व्यापलेली आपल्याला दिसून येते.

संभाजीराजे यांचे प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

  • सरसेनापती – हंबीरराव मोहिते
  • कुलमुखत्‍यार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश (कलुषा)
  • पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे
  • मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी
  • दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव
  • चिटणीस – बाळाजी आवजी
  • सुरनीस – आबाजी सोनदेव
  • डबीर – जनार्दनपंत
  • मुजुमदार – अण्णाजी दत्तो
  • वाकेनवीस – दत्ताजीपंत

संभाजी महाराज आणि अकबर

संभाजी महाराजांनी जेव्हा त्यांचा स्वराज्याचा कारभार पाहायला सुरुवात केली, त्याच दरम्यान औरंगजेबाचा पुत्र अकबर हा दुर्गा राठोड सोबत स्वराज्यात दाखल झाला आणि मोघलांची सत्ता हस्तगत करण्यासाठी संभाजी महाराजांची मदत मागितली.

स्वराज्यावरील सततच्या आक्रमणामुळे संभाजी महाराजांना अकबरला मदत करणे जमले नाही आणि यामुळे निराश होऊन, अकबर पुढे इराणला गेला आणि तेथेच त्याचे निधन झाले.

संभाजी महाराज आणि मोघल

संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर १६८१ मध्ये मोघलांचे अतिशय प्रसिद्ध अशा बुरानपुर शहरावर मोठी स्वारी केली आणि प्रचंड अशी लुटीची प्राप्ती त्यांनी या बुरानपुर मधून केली. यानंतर मात्र मोगल बादशाह औरंगजेब हा स्वतः जातीने आपली चार लाखाची फौज घेऊन, स्वराज्यावर चालून आला आणि त्याचा मानस होता की, अवघ्या एक ते दोन वर्षांमध्ये स्वराज जिंकून घेऊन, आपण परत दिल्लीला जाऊ.

मात्र या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज सह्याद्री सारखे निडरपणे औरंगजेबच्या समोर उभे होते. आणि त्यांनी शेवटपर्यंत हे स्वराज्य औरंगजेबाला जिंकू दिले नाही. स्वराज्यातील केवळ एक रामसेज किल्ला जिंकून, घेण्यासाठी मोगलाना तब्बल सहा वर्ष झुंज द्यावी लागली आणि त्यामुळे स्वराज्याचे तीनशे किल्ले जिंकून घेणे ही फार दूरची गोष्ट होती.

संभाजी महाराज आणि पोर्तुगीज

संघर्ष करत असतानाच, संभाजी महाराजांनी पोर्तुगीज सोबत मोठा लढा दिला. १६८२ मध्ये गोव्याजवळील अंजदिव बेट जिंकून घेतल्याने, पोर्तुगीजासोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. १९८३ जुवे बेटावर पोर्तुगीजावर मराठ्यांनी मोठा हल्ला केला.

यावेळी गोव्याचा व्हाईसरॉय त्या ठिकाणी पळून जात असताना शंभू राजांनी खाडीत आपला घोडा घातला, मात्र प्रसंग आवरून खंडोजी बल्लाळ यांनी तो घोडा सावरला आणि महाराजांचे प्राण वाचवले.

पुढे गोव्यावर आक्रमण करून, गोवा जिंकून घेण्याचा त्यांचा मानस होता. मात्र मुघलांच्या स्वारीमुळे, त्यांनाही मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र पोर्तुगीजांना चांगली अद्दल घडवण्याचं काम मात्र शंभूराजांनी या ठिकाणी केलेले होते.

संभाजी महाराज आणि जंजिऱ्याचा सिद्धी

पोर्तुगीजाप्रमाणे संभाजी महाराजांना जंजिरीच्या सिद्धीसोबत सुद्धा मोठा संघर्ष करावा लागला. कारण जंजिराचा सिद्धी स्वराज्यातील जनतेला मोठा त्रास देत होता. डिसेंबर १६८१ जंजिरा किल्ल्याला वेढा देऊन किल्ल्यापर्यंतची खाडी बुजवण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. म्हणजे एक प्रकारे सेतू बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढील काळात कोंडाजी फर्जंद मार्फत जंजिरा किल्ला घेण्याचा त्यांनी परत प्रयत्न केला, मात्र त्या त्यांना परत अपयश आलं आणि यामुळे कोंडाजी फर्जंद यांचा मृत्यू झाला.

संभाजी महाराज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय

संभाजी महाराज ह्या संपूर्ण  सत्तेसोबत लढत असताना, म्हैसूरच्या चिक्कदेवराय या राजासोबत सुद्धा संघर्ष झाला. मुघलांसोबत मोठा संघर्ष चालू असताना अन्नधान्याची गरज होती आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी संभाजी महाराजांनी जिंजीच्या किल्लेदाराला अन्न पाठवण्याची विनंती केली, परंतु अन्नाचा पुरवठा रोखण्याची जबाबदारी म्हैसूरच्या चिक्कदेवरायवर सोपवली होती आणि त्यांनी अडवलं, ही बातमी महाराजांना समजली, तेव्हा महाराजांनी चिक्कदेवराय वर आक्रमण केले.

यावेळी केलेल्या विषारी बाणापासून स्वतःचा आणि आपल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी महाराजांनी बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले. म्हणजेच या म्हैसूरच्या राजा सोबत लढताना जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी शंभूराजांनी या ठिकाणी केली.

संभाजी महाराजांबरोबर दगाफटका

इ.स. १६८९ च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर याठिकाणी बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंचा भाऊ व शिवाजी महाराजांचे जावई म्हणजेच गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी पूर्णपणे गुप्तता बाळगली गेली.

आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली गेली. त्यानंतर मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. परंतु मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. त्यामुळे प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शेवटी शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

संभाजी महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न

छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर याठिकाणी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले. मावळ्यांनी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात जोत्याजी केसरकर यांनी सर्वात पहिला प्रयत्न केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले

संभाजी महाराजांना मुघलांद्वारे अटक

१ फेब्रुवारी १९८९ मध्ये संभाजी महाराजांना मुघली अधिकाऱ्याद्वारे संगमेश्वर येथे कैद करण्यात आले. आणि इकडे कैद झाल्यानंतर संगमेश्वर येथून शंभूराजांना औरंगजेबाकडे म्हणजेच आजच्या नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे आणण्यात आले. आणि याच बहादूरगडावर जवळपास एक महिना शंभुराजे हे वास्तव्याला होते. संभाजी महाराज कैद मध्ये असताना संभाजी महाराजांकडे औरंगजेबाने तीन मागण्या केलेल्या होत्या. त्या तीन मागण्या होत्या,

  • स्वराज्यातील सर्व गड किल्ले आमच्या हाती द्यावे.
  • स्वराज्यातील सर्व संपत्ती आम्हाला द्यावी.
  • मुगलांना आमचे कोण सरदार फितूर झाले आहे, याची नावे सांगावी?

मित्रहो या तीनही मागण्या मान्य करणे म्हणजेच संपूर्ण स्वराज्य आणि स्वराज्यातील संपूर्ण जनता ही मुघलांच्या हवाली करणे, असाच होता.

संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी बलिदान

स्वराज्याच्या रक्षणासाठी, येथील जनतेच्या रक्षणासाठी, या आपल्या राजाने स्वराज्य तर जाऊ दिलं नाही, मात्र उलट या मागण्या मान्य न झाल्याने दि. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची अतिशय निर्गुण अशी हत्या केली गेली. वढू, बुद्रुक येथे संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचा बलिदान दिले.

स्वराज्य रक्षक, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांना यांना त्यांच्या महान कार्यासाठी कोटी कोटी वंदन आणि विनम्र अभिवादन.

छत्रपती संभाजी महाराज

संभाजी महाराजांचे शेवटचे शब्द

छत्रपती संभाजी महाराजांची शेवटचे काही शब्द – आबासाहेब तुम्ही आभाळाच्या डोळ्यातून पाहत असाल मला, पण मला तुमचं आभाळा एवढं रूप पाहायला डोळेच राहिले नाही, तो आग्र्याहून येत असताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो, आमची फिकीर करू नका आबासाहेब, आम्ही सुखरूप गडावरती पोहोचू. तसा तुम्ही माझा हात विश्वासाने हातात घ्याल का ? आबासाहेब पण ते हातही उरले नाहीत आता. आबासाहेब तुम्हाला आबासाहेब अशी साथ घालायला जीभही उरली नाही.

आबासाहेब पण एक सांगतो, “आबासाहेब रक्ताचा अभिषेक घालून जर स्वराज्याचे मंदिर पवित्र होणार असेल तर, आणि शिवपुत्र म्हणून मृत्यूची माझी अशी ओळख होणार असेल, तर मी रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणे मागेन, हजारो वेळा जन्म दे, पण शिवपुत्र म्हणूनच दे. “जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलं आणि मरायचं कसं हे मी जगाला शिकवेन”.

संभाजी महाराजांवरील साहित्य आणि सन्मान

संभाजी महाराजांवरील नाटके

  • चैतन्यगाथा तेजपुत्राची
  • राजसंन्यास (लेखक : राम गणेश गडकरी)
  • शिवपुत्र शंभुराजे (महानाट्य) (दिग्दर्शन/संवादः महेंद्र महाडीक)
  • नरशार्दुल राजा संभाजी (लेखक – इंद्रजित सावंत)
  • मृत्युंजय अमावस्या (महा-नाट्य : लेखक/दिग्दर्शक : नीलेश भिसे)
  • इथे ओशाळला मृत्यू (लेखक : वसंत कानेटकर)
  • रायगडाला जेव्हा जाग येते (लेखक : वसंत कानेटकर)
  • शंभुराजे (महानाट्य) : (लेखक : नितीन बानुगडे पाटील)
  • संगीत छत्रपती संभाजी (लेखक : आत्माराम मोरेश्वर पाठारे)
  • बेबंदशाही (लेखक : वि.ह. औंधकर)
  • मृत्युंजय
  • शूर संभाजी

संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या

  • मराठी साहित्यातील संभाजी – प्रबंध – डॉ. शालिनी मोहोड
  • अश्रू ढळले रायगडाचे – अर्जुनराव झेंडे, नाटक.
  • राजा शंभू छत्रपती – विजय देशमुख
  • अर्घ्य – नयनतारा देसाई (१९७३)
  • धर्मवीर संभाजी- ग.कृ. गोडसे, नाटक
  • वज्‍रदेही संभाजी – ना.ल. मोरे
  • शिवपुत्र संभाजी – डॉ. कमल गोखले
  • आम्ही यातनांचे स्वामी – वा.ना. देशपांडे
  • छत्रपती संभाजी राजे – नाटक, वासुदेवशास्त्री खरे
  • मराठ्यांची धारातीर्थे – प्रवीण व. भोसले
  • शंभूराजे – गावंडे
  • इथे ओशाळला मृत्यू – वसंत कानेटकर, नाटक
  • शंभूराजे – दशरथ यादव (काव्य)
  • खरा संभाजी – प्रा. नामदेवराव जाधव
  • मानी मराठा – नाना कोचरेकर
  • शिवपुत्र – राजकुंवर बोबडे
  • शिवस्नुषा येसूबाई, – सुशीला खेडकर
  • संभवामि युगे युगे – मनमोहन नातू
  • स्वराज्यावरील संकट – नाथ माधव
  • छत्रपती संभाजी – मनमोहन नातू
  • स्वधर्मसूर्य संभाजी – स्वामी धर्मव्रत
  • शिवतेज संभाजी – संतोष रासकर
  • छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजाला भोवतेव प्रजेलाही भोवते – ना.वि. बापट
  • मी मृत्युंजय संभाजी – संजय सोनवणी
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज – अरुण जाखडे
  • शंभूराजे – प्रा. सु.ग. शेवडे
  • छावा – शिवाजी सावंत
  • रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानेटकर
  • बेबंदशाही – वि.ह. औंधकर
  • राजसंन्यास – राम गणेश गडकरी
  • शापित राजहंस – अनंत तिबिले
  • संभाजी – विश्वास पाटील
  • शहेनशाह – ना.सं. इनामदार
  • सह्याद्री सांगे कथा शंभुची – आबासाहेब आचरेकर

संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या गोष्टींची यादी

  • शंभूमहाराज पुरस्कार
  • राजे छत्रपती संभाजी विद्यालय (धुळे)
  • संभाजी पथ, निगडी
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा
  • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
  • संभाजी साहित्य संमेलन
  • स्वराज्यरक्षक संभाजी, दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका
  • छत्रपती संभाजी महाराज उद्यान, धुळे
  • छत्रपती संभाजीराजे भोसले मैदान, गोरेगाव पूर्व (मुंबई)
  • धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळे सौदागर, पुणे
  • संभाजी चौक, निगडी, पुणे
  • छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, संभाजीनगर
  • धर्मवीर संभाजी तलाव, सोलापूर
  • छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना (आसवनी प्रकल्प-कोल्हापूर)
  • संभाजी महाराजांचे साहित्य
  • संभाजी (पुस्तक), मराठीतील एक पुस्तक

FAQ

१. संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे कोण होते?

संभाजी राजांचा जन्म हा १४ मे १६५७ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर झाला. सईबाई या त्यांच्या मातोश्री, तर शिवाजी महाराज हे त्यांचे पिताश्री होते.

२. छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली?

शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, १२० पेक्षा जास्त लढाईमध्ये स्वतः नेतृत्व केलं होतं आणि आश्चर्य म्हणजे यातील एकाही लढाईमध्ये शंभूराजे पराभूत झाले नाही.

३. संभाजी महाराजांचा मृत्यू शिवाजी महाराजांच्या आधी झाला होता का?

नाही. दि. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची अतिशय निर्गुण अशी हत्या केली गेली. वढू, बुद्रुक येथे संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचा बलिदान दिले.

४. संभाजी महाराज का प्रसिद्ध आहेत?

स्वराज्य रक्षक, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय, पराक्रमी आणि अजिंक्य योद्धा. शंभूराजांचे शौर्य, पराक्रम आणि बुद्धिमत्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान राजा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment