छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती | Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi – भारतीय उपखंडाचा भाग व्यापणाऱ्या मराठा समाजाचे संस्थापक भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशहा विरुद्ध आणि मुगल साम्राज्यविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून, मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड हा किल्ला राजा शिवाजी महाराजांनी जिंकून आपली राजधानी उभी केली. आणि १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी राजा, शिवाजी राजे, शिवबा, शिवबा राजे, शिवराय अश्या अनेक नावाने ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला शिवकाळ असे म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुसंगठीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्राकृतिक राज्य उभे केले.

भौगोलिक दृष्ट्या वेगवान हालचाली आणि बलाढ्य दुश्मनांचे मनोधेर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडी पासून, एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले आणि अंतर्गत प्रदेशात अनेक किल्लेही त्यांनी उभारले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महिती दिली आहे. हा लेख तुम्ही पूर्ण वाचवा.

Table of Contents

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

मूळ नाव शिवाजी शहाजी राजे भोसले
जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३०
जन्मस्थळ शिवनेरी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
आईचे नाव जिजाबाई
वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले
धर्महिंदू धर्म
पत्नीचे नाव सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई
मुले संभाजी राजे, राजाराम राजे, सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, राजकुमारबाई शिर्के.
राजवट1674-1680
जनतेने दिलेली पदवी छत्रपती
गोत्र कश्यप
मृत्यू ३ एप्रिल १६८०
उत्तराधिकारीसंभाजी राजे

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०)

आज आपण समस्त हिंदुस्तानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युगप्रवर्तक जीवन कार्याचा परिचय पाहणार आहोत. मध्ययुगातील पारतंत्र्याचा, गुलामगिरीचा काळोख दूर करण्यासाठी, या दख्खन देशामध्ये, महाराष्ट्राच्या मातीत, एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. आणि तो तेजस्वी सूर्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय.

Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

१९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर, जिजाऊ मातेच्या पोटी या शिवतेजाचा, स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला. शिवनेरी या किल्ल्याच्या नावावरूनच या शिवतेजाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ या त्यांच्या माता, तर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे हे त्यांचे पिता होय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण व संस्कार (१६३० – १६३६)

शिवबा राजांच्या जन्मानंतर त्यांच्या डोळस जडणघडणीकडे व त्यांच्या संस्कार व शिक्षणाकडे माता जिजाऊ व पिता शहाजी राजांनी विशेष लक्ष दिले. आपल्या माता पित्याकडून शिवबा राजांना राज्यकारभार, युद्ध, तंत्र, प्रजापाला तसेच नैतिकतेचे संस्कार प्राप्त झाले. याशिवाय पुस्तके शिक्षणासोबतच, राजकीय, लष्करी, भौगोलिक शिक्षणाची ही प्राप्ती त्यांना झाली.

शिवनेरीच्या अंगा खांद्यावर खेळताना सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्भयपणे वावरायला मातापित्याने त्यांना शिकवले. त्या दख्खन देशामध्ये स्वतंत्र आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणीच, त्यांच्या ठिकाणी करण्यात आली. जेणेकरून या मध्ययुगीन अंधार युगामध्ये, येथे स्वतंत्र रयतेचे राज्य स्थापन व्हावं, यासाठीच सर्व शिक्षण त्यांना आपल्या मातापित्याकडून मिळालं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 

छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी 14 मे 1640 रोजी लाल महाल पुणे याठिकाणी झाला. व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण आठ विवाह केले. मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराजांना यश आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी

महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांनी नंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांचा विवाहही गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता. सईबाईंनी एक मुलगा संभाजी 1657 ते 1689 आणि सोयराबाई यांनी राजाराम 1670 ते 1700 यांना जन्म दिला. याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या.

  • सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणातच 16 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे विवाह झाला.
  • तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्षाचे होते आणि सईबाई निंबाळकर या 7 वर्षाच्या होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांना चार मुले झालीत.
  • त्यातील पहिल्या तीन मुली होत्या. आणि चौथे मुलगा होता.
  • सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज अशी त्यांच्या मुलांची नावे होती.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते हे होते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सोयराबाई मोहिते सोबत 1641 मध्ये झाले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव पुतळाबाई भोसले हे होते.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न पुतळाबाई सोबत 1650 मध्ये झाले.
  • पुतळाबाई पालकरया नेताजी पालकर यांच्या बहिण होत्या. पुतळाबाई यांना कोणतेही मूल झाले नाही.
  • सकवारबाई गायकवाड या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि सकवारबाई गायकवाड यांचे लग्न 15 एप्रिल 1653 रोजी झाले.
  • राणी सगुनाबाई शिर्के या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सगुनाबाई शिर्के यांच्यासोबत 1656 च्या आधी झाले.
  • राणी काशीबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न काशीबाई जाधव यांच्यासोबत जानेवारी 1657 मध्ये झाले.
  • लक्ष्मीबाई विचारे ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी होत्या.
  • लक्ष्मीबाई विचारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 8 एप्रिल 1657 रोजी झाला.
  • गुणवंताबाई इंगळे ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी होत्या.
  • गुणवंताबाई इंगळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुणे जहागिरीत आगमन (१६३६)

१६३६ नंतर शहाजीराजांना आदिलशाहीच्या वतीने कर्नाटक जहागिर सांभाळण्यासाठी बेंगलोरला जावे लागले. अशावेळी शहाजीराजांनी आपली वडिलोपार्जित पुणे जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी जिजामाता व बाल शिवबा राजावर सोपवली. त्यामुळे १६३६ नंतर शिवबा राजांना व मासाहेब जिजाऊंना, या पुणे जहागिरीला यावं लागलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रशासन पाहायला सुरुवात केली.

मात्र या काळामध्ये पुण्याची संपूर्ण जमीन ही अपवित्र करून टाकण्यात आलेली होती. निजामशाही सरदार मुदार जगदेव याने या पुणे जहागिरीची संपूर्ण जमीन जाळून बेचिराख केलेली होती. येथे गाढवाचा नांगर फिरवून ही जमीन अपवित्र झाली अशी ग्वाही पुरवलेली होती.

त्यामुळे मासाहेब जिजाऊंनी सर्वप्रथम जहागिरीमध्ये आल्यानंतर बाल शिवबांच्या हस्ते सोन्याच्या नांगराने ही संपूर्ण जमीन नांगरून काढली. आणि कौल देऊन, त्यांनी येथे गाव बसवायला सुरुवात केली. तसेच शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यात आलं. आणि शेती करण्यासाठी शेती साहित्य, बियाणे याची भरीव मदत मासाहेब जिजाऊने व बाल शिवबाने केली.

त्यामुळे पुणे सोडून गेलेले रयत पुन्हा या पुणे जहागिरीमध्ये येऊन, स्थायिक होऊ लागली. आणि या पुण्याला आता गावाचं वसाहतीचं स्वरूप प्राप्त झालं. म्हणजेच खऱ्या अर्थाने आधुनिक पुण्याचा पाया घालण्याचं कार्य हे मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा यांनी या काळामध्ये केले.

छत्रपती शिवाजी महाराज याचे मावळ प्रांतात कार्य (१६४०)

शिवबा राजे आता हळूहळू मोठे होऊ लागले होते, त्यामुळे त्यांना आता राज्यकारभाराचा अनुभव यावा म्हणून, शहाजीराजांनी पुणे जहागिरी मधील कार्यात मावळचा प्रांत त्यांच्या नावे करून दिला. या कार्यात मावळमध्ये एकूण ३६ गावांचा समावेश होता. म्हणजेच खऱ्या अर्थाने पुणे जहागिरीमधील कार्यात मावळ मधील ही छत्तीस गावे हीच खऱ्या अर्थाने बाल शिवबाची मूळ जहागीर होती.

या कार्यात मावळ मधील छत्तीस गावाचा कारभार पाहणे, ही स्वराज्य स्थापनेची पूर्व अवस्था होती असे आपल्याला म्हणता येते, म्हणजेच शिवबा राजांना पुढे चालून, स्वतंत्र राज्य स्थापन करून तेथे कारभार पाहायचा होता. त्याचीच ही रंगीत तालीम होती असे आपल्याला म्हणता येते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळ भागात संघटन (१६४२ – ४५)

१६४२ नंतर शिवबाराजांनी खऱ्या अर्थाने पुण्याच्या मावळ भागामध्ये स्वराज्य कार्याच्या हालचाली सुरू केल्या, हा जो पुणे जिल्ह्यामध्ये मावळ भाग वसलेला आहे, तो पुण्याच्या पश्चिम दिशेला म्हणजे सूर्याच्या दिशेला मावळतो. म्हणजेच मावळ तिकडे वसलेले असल्याने, त्याला मावळ भाग म्हटले गेले. आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांना मावळे म्हटले गेले. शिवबा राजांनी अशा एकूण बारा मावळ खोऱ्यामध्ये, आपल्या स्वराज्याच्या हालचाली सुरुवातीच्या काळात केल्या.

या मावळ खोऱ्यामध्ये सर्वप्रथम शिवबा राजांनी स्वतंत्र्याचे महत्त्व पटवून दिलं, आणि येथील मावळ्यामध्ये मोठे संघटन घडून आणले. मावळ्यांनाही या गुलामगिरीच्या वातावरणामध्ये स्वतंत्र राज्याचे महत्त्व पटलं, आणि शिवबा राजांना अनेक मावळ्यांचे सहकार्य याच मावळ भागातून मिळालं, त्यामुळे कानोजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी सूर्याची मालुसरे, येसाजी कंक, सूर्यराव काकडे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरस प्रभू अशा असंख्य मावळ्यांची साथ शिवबा राजांना याच मावळकोऱ्यातून मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराजांची रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज कार्याला सुरुवात (१६४५)

 पुणे स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणी केल्यानंतर, आणि त्यांचे संघटन घडून आल्यानंतर, याच मावळ भागामध्ये मध्यवर्ती असलेल्या जागृत व स्वयंभू देवस्थान असलेल्या “श्री रायरेश्वर महादेवाचे आशीर्वाद” हे शिवबा राजांनी घेतले.

Chhatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

मावळ भागातील जनतेचा व समाजाचा स्वराज्य कार्याला पाठिंबा मिळावा, यासाठी या शिवभक्त शिवबा राजांनी रायरेश्वर महादेवाची निवड केली. आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत १६४५ मध्ये याच रायरेश्वर महादेवाचे आशीर्वाद घेऊन, रायरेश्वर महादेवाची शपथ घेऊन, त्यांनी आपल्या स्वराज्य कार्याला सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमुद्रा प्राप्ती (१६४६) Chhatrapati Shivaji Maharaj Rajmudra

स्वतंत्र राज्यासाठी आवश्यक असणारी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे, त्या राज्याची स्वतंत्र राजमुद्रा होय. आणि अशीच स्वतंत्र राजमुद्राची प्राप्ती शिवबा राजांना १६४६ च्या सुमारास झाली. ही राजमुद्रा प्रामुख्याने शहाजीराजांनी शिवबा राजांना सुपूर्द केलेली होती.

राजमुद्रा

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता |
शाहसुनोःशिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि सर्व विश्वाला वंदनीय असणारी, शहाजीपुत्र शिवाजी राजांची ही राजमुद्रा लोक कल्याणार्थ विराजत आहे. अशी लोककल्याणाची हमी देणारी ही राजमुद्रा शहाजीराजांनी शिवबा राजांना दिलेली होती.

छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रा

या राजमुद्रेचा सर्वप्रथम वापर हा २८ जानेवारी १६४६ च्या अस्सल पत्रावर करण्यात आलेला आहे. आता हे राज्य हे रयतेच्या कल्याणात, आणि रयतेच्या सुखासाठीच यापुढे कार्य करेल ही ग्वाहीच शिवबा राजांनी जिजाऊ मातेच्या नेतृत्वाखाली सर्व रयतेला दिली.

महाराजांनी रोवली स्वराजाची मुहूर्तमेढ (१६४६ – १६४८)

तत्कालामध्ये एखादं स्वतंत्र राज्य स्थापन करायचे असेल तर, ते राज्य गड किल्ले शिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं. त्यामुळे स्वराज्यही या गडकिल्ले शिवाय अजूनही अपूर्ण होतं. कारण गड किल्ले हे स्वराज्याचे मूळ तसेच स्वराज्याचे सार होते. आत्मरक्षण आणि पराक्रम करण्याला ते सहाय्यभूत होते. त्यामुळे महाराजांनी मावळ भागातील आदिलशाही मालकीचे असलेले राजगड, तोरणा, कोंडाणा, पुरंदर, हे गड किल्ले १६४६ ते १६४८ या कालखंडामध्ये जिंकून घेतले.

आणि आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केले. तेवढेच नव्हे, तर या सह्याद्रीतील गड किल्ल्यांचे महत्त्व जाणून पूर्वीचा मुरूमदेव चा डोंगर व नंतर त्याचे नामकरण झालेल्या राजगड, या किल्ल्याला महाराजांनी स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान दिला. हे संपूर्ण गड किल्ले जिंकून घेऊन, आणि किल्ल्यावर आपले राजधानी स्थापन करून खऱ्या अर्थाने महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

स्वराजाची पहिली लढाई (१६४८)

शिवनिर्मित स्वराज्य हे आदिलशाही मुलखातूनच निर्माण झालेले होते. आणि त्यामुळे आता आदिलशाहीवतीने या स्वराज्याला विरोध सुरू झाला. त्याचीच परिणीती ही १६४८ मध्ये पहिल्या लढाईमध्ये झाली. आदिलशाहीच्या वतीने १६४८ ला सरदार फत्तेखानाने या नवनिर्मित स्वराज्यावर पहिले आक्रमण केले, ही लढाई पुरंदर किल्ला तसेच बेलसर या गावाच्या परिसरामध्ये झाली.

शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमी मावळ्यांनी गनिमी काव्याने युद्ध करून, या आदिलशाहीचा आधार फत्तेखानचा दणदणीत पराभव केला. मात्र दुर्दैवाने या पहिल्या पुरंदरच्या लढाईमध्ये आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर हे मात्र या रणसंग्रामामध्ये धारातीर्थी पडले. मात्र असे असले तरी अगदी तरुण तडफदार म्हणजे अठरा वयाच्या शिवबा राजांनी, आपल्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्याच लढाईमध्ये आदिलशाही सत्तेला मोठा दणका दिला. नवनिर्मित स्वराज्याची अशी गोडधोड सुरू असतानाच, शिवरायांच्या या स्वराज्य कार्यामुळे शहाजीराजांना अटक होण्याची वेळ आली.

शहाजीराजांची मुसिद्दतपणे सुटका (१६४९)

शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार म्हणून कर्नाटक मध्ये बंगलोरची जहागिरी पाहत होते. आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा शिवाजीराजे हे आदिलशाहीचाच मुलुख घेऊन, स्वतंत्र राज्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळेच याचा राग धरून शहाजीराजांना, आदिलशाहीने २५ जुलै १६४८ रोजी अटक करण्यात आली. म्हणजेच आता एकीकडे नवनिर्मित स्वराज्य वाचवायचं तर, दुसरीकडे आपल्या पित्याची सुटका करायची, असे दुहेरी आव्हानच अठरा वर्षाच्या शिवबा राजासमोर निर्माण झाले.

मात्र अशाही परिस्थितीमध्ये शिवबा राजे खसले नाहीत, तर अतिशय मुसिद्दतपणे ते या ठिकाणी वागले, त्यांनी त्या काळातला मोगल बादशहा शहाजान यांच्याशी संपर्क साधला, आणि त्याच्यामार्फत आदिलशहाला १६४९ मध्ये शहाजीराजांची सुटका करायला भाग पाडलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळीचे खोरे काबीज केले (१६५६)

१६५० ते १६५५ या काळात शिवबा राजेंनी कोणतीही नवीन मोहीम हाती घेतली नाही, तर आहे तो भूप्रदेश स्थिरस्थावर करण्याला, त्यांनी प्राधान्य दिले. मात्र १६५६ पासून आता शिवबा राजांनी आपल्या या नवनिर्मित स्वराज्याचा विस्तार कार्याला सुरुवात केली.

स्वराज्याचा पहिला विस्तार हा देश व कोकण यांना जोडणारा व ५६४ गावांचा भूप्रदेश असलेला जावळीच्या खोऱ्यामध्ये करण्यात आला. या जावळीच्या खोऱ्यावर, तत्कारामध्ये चंद्रराव मोरे यांचा अंमल होता. ते तसे आदिलशाही सत्तेला जबाबदार होते. मात्र या खोऱ्यामध्ये स्वतंत्र राज्य प्रमाणेच ते राहत होते. महाराजांनी सर्वप्रथम या चंद्रावर यांना निरोप पाठवून, हा भाग स्वराज्यमध्ये समाविष्ट करण्यात करण्याची विनंती केली.

मात्र मुजोर चंद्र मोरेंनी महाराजांचा प्रस्ताव स्वीकारला नाही. आणि त्यामुळे महाराजांना १५ जानेवारी १६५६ रोजी या जावळीच्या खोऱ्यावर, चंद्र मौर्यावर स्वारी करावी लागली. त्यानंतर एकाच दिवसांमध्ये म्हणजेच १५ जानेवारी १६५६ रोजी जावळीचे खोरे महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट केले. यासोबतच या जावळीच्या खोऱ्यामुळे हा भूप्रदेश स्वराज्य समाविष्ट झाल्यामुळे, आता स्वराज्याला कोकणामध्ये प्रवेश करता आला.

कारण हे जावळीची खोरे म्हणजेच कोकणाचे प्रवेशद्वारात होते. याशिवाय यात जावळीच्या खोऱ्यात असलेला जवळपास ५६४ गावांचा समावेश स्वराज्यामध्ये झाला. स्वराज्यसाठी अत्यंत महत्त्वाचे गड किल्ले म्हणजेच रायरी नंतरचा झालेला रायगड, तसेच भोरपड डोंगर नंतर त्यावर महाराजांनी बांधलेला प्रतापगड याची महाराजांना प्राप्ती झाली. म्हणजेच हे जावळीची खोरे पुढील काळामध्ये स्वराज्याचा संरक्षक भूप्रदेश म्हणून मिळालेले आपल्याला दिसते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाचा वध (१६५९)

आदिलशाही मालकीचे बरेचसे गडकिल्ले महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केले. त्यासोबत जावळीचे खोरे आता महाराजांनी ताब्यात घेतले, त्यामुळे आदिलशाही दरबार आता प्रचंड मार्गावर चिडला. आणि त्यामुळे आता महाराजांचा कायमचा बंदोबस्त व्हावा, त्यांचे वाढते स्वराज्य कार्य थांबवावे, म्हणून विजापूरच्या आदिलशाहीचा सर्वात मातब्बर सरदार अफजल खान याची स्वराज्यावर नेमणूक करण्यात आली.

आणि हा अफजलखान स्वराज्यावर मोठा फौज फाटा घेऊन चालून आला, मात्र अशाही संकट काळात महाराज हे डगमगले नाही, स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट होतं मात्र महाराज या संकटाला सामोरे गेले, महाराजांनी अफजलखानचा सामना केला, आणि शेवटी १० नोव्हेंबर १६५९ रोजी जावळीच्या घनदाट खोऱ्यामध्ये, प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानचे पारिपत्य केलं.

म्हणजे जो खान महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यावर चालून आलेला होता, त्याच खानाची कबर महाराजांनी गनिमी कावा युद्ध पद्धतीचा अवलंब करून, प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली. आणि हा शिव पराक्रम करून त्यांनी स्वराज्यावर आलेले हे सर्वात मोठे संकट परतावून लावलं.

अफजलखानाच्या पाडावानंतर महाराजांनी आपलं स्वराज्य पार कोल्हापूरपर्यंत, पन्हाळगड, विशाळगडापर्यंत, विस्तारलं. मात्र यानंतर आदिलशाहीची स्वराज्यावर अनेक आक्रमणे सुरूच होती. आणि त्याचाच भाग म्हणून, परत सिद्धी जोहरच्या आक्रमण स्वराज्यावर या काळामध्ये झाले. आणि सिद्धी जोहरच्या आक्रमणामुळे महाराज हे पन्हाळगडावर त्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडले आणि हा वेढा साधासुधा नव्हता तर जवळपास मार्च १६६० पासून ते जुलै १६६० म्हणजे जवळपास पाच महिने महाराज हे सिद्धी जोहर या आदिलशाही सरदाराच्या वेढ्यामध्ये पन्हाळगडावर अडकून पडले होते.

या पाच महिन्याचे कालखंडामध्ये आता गडावरच संपूर्ण धनधान्य हे संपत आलेलं होतं, त्यामुळे हा वेढा उठून कसेही आता सुखरूपपणे विशाळगडावर जाणे आवश्यक होतं. पण म्हणूनच शिवबांनी म्हणजेच शिवा काशिद याला प्रति शिवाजी बनून, महाराजांचा वेश धारण करून सिद्धी जोहरकडे पाठवण्यात आलं. आणि त्याचवेळी १३ जुलै १६६० रोजी ६०० मावळ्यांसह महाराज हे पन्हाळगडावरून सुखरूपाने निसटले. मात्र शिवानावी म्हणजे शिवा काशिद याला मात्र आपलं बलिदान त्या ठिकाणी द्यावं लागलं.

त्यानंतर आदिलशाही सैन्याने महाराजांचे केलेल्या पाठलागामुळे, पावनखिंडीमध्ये मोठी घनघोर लढाई झाली. आणि ३०० मावळ्यामध्ये सहभागी बाजीप्रभु देशपांडे या पावनखिंडीच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. त्यांना वीरमरण आलं. ह्या जगाच्या पोशिंदाला स्वराज्याच्या संस्थापकला मात्र त्यांनी वाचवलं. आणि महाराज हे सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचले.

उंबरखिंडीत कारतलबखानची अद्भुत कोंडी केली (१६६१)

महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले खरे, मात्र त्यांच्यावरील आणि स्वराज्यावरील संकटाची मालिका मात्र काही थांबत नव्हती. फक्त आता आदिलशाही सत्तेची जागा मोगल सत्तेने घेतली आणि हे स्वराज्य संपवण्यासाठी मोगल सत्तेच्यावतीने, औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान्याचे स्वराज्यावर मोठे आक्रमण झाले. आणि हा शाहिस्तेखान स्वराज्याचे मध्यवर्ती स्थान असलेल्या पुणे येथे येऊन स्थायिक झाला.

पुणे येथून त्यांनी राहिलेला संपूर्ण स्वराज्य आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली, आणि त्याचाच भाग म्हणून स्वराज्याचा उत्तर कोकणचा भाग जिंकून घेण्यासाठी त्याने कारतलबखानची नियुक्ती केली, महाराजांना याची चाहूल लागली.

कारतलबखान आपली फौज घेऊन, जेव्हा लोणावळ्यामार्गे कोकणात उतरत होता, तेव्हा उंबरखिंडीच्या घनदाट अरण्यामध्ये महाराजांनी व त्यांच्या सहकारी मावळ्यांनी या कारतलबखानची अद्भुत कोंडी केली, आणि गनिमी कावा युद्धनीतीच्या आधारे २ फेब्रुवारी १६६१ रोजी कारतलबखान आणि त्याच्या हजारो फौजेचा दणदणीत पराभव केला. आणि याच विजयाचे प्रत्युत्तर हे सुंदर स्मारक या आंबा नदीच्या पात्रामध्ये आणि उंबरखिंडी परिसरामध्ये उभारण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखान बोटे छाटली (१६६३)

शायिस्तेखान काही केल्या पुणे सोडायला तयार नव्हता, तो स्वराज्यामध्ये जवळपास तीन वर्ष आपले ठाण मांडून होता. मात्र त्यामुळे येथील रयतेचे आणि स्वराज्याचा संरक्षणाचाच प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही करून आता खानाला स्वराज्यातून हाकलून देणे आवश्यक होते. म्हणून, महाराजांनी अतिशय धाडसी योजना आखली, आणि ५ एप्रिल १६६३ रोजी अतिशय कडक बंदोबस्तामध्ये पुण्याच्या लाल महाली म्हणजे, ज्या ठिकाणी खान थांबलेला होता, त्या ठिकाणी महाराजांनी खानावर हल्ला केला.

आणि त्याच्या जीवावर न बेतता मात्र हा हल्ला खानाच्या बोटावर बेतला, आणि त्याची तीन बोटे छाटली गेली. मात्र या हल्ल्याने खान एवढा घाबरला की, तीन वर्षे स्वराज्यात ठाण मांडून बसलेला हा खान, अवघ्या तीनच दिवसात पुणे सोडून औरंगाबादला निघून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुरतेवर पहिले आक्रमण (१६६४)

त्याकाळातील सर्वात संपन्न आणि श्रीमंत शहर म्हणजे सुरत. १६६४ मध्ये स्वराज्याची झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या सर्वात संपन्न आणि श्रीमंत शहरावर म्हणजेच सुरतेवर १६६४ मध्ये मोठे आक्रमण केले, आणि ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ अशी चार दिवस महाराज या सुरतेमध्ये ठाण मांडून होते. त्यांनी या स्वारीतून जवळपास एक कोटी होनाची प्राप्ती केली.

मिर्झाराजांचे आक्रमण (१६६५)

महाराजांनी शाहिस्तेखानाला दिलेली शिकस्त आणि त्यांनी सुरतेवर केलेल्या आक्रमण यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला, आणि आता हे स्वराज्य संपुष्टात आणण्यासाठी आणि महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपल्या मोगल दरबारातील सर्वात बलाढ्य आणि अनुभवी सरदार मिर्झाराजे जयसिंग, यांची स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी नेमणूक केली. आणि स्वराज्याचा प्राण असलेले गडकिल्ले जिंकून घेण्याचे धोरण सुरु केले.

त्यांनी पहिले आक्रमण हे पुरंदर या किल्ल्यावर केले, दिलेरखान हा मोगलांच्यावतीने या लढाईचे नेतृत्व करत होता, तर मराठ्यांच्यावतीने मुरारबाजी देशपांडे हे या किल्ल्याचे संरक्षण करण्याचे काम करत होते, मात्र दुर्दैवाने मुरारबाजी या पुरंदरच्या लढ्यामध्ये धारतीर्थ पडले, आणि हा पुरंदर किल्ला मोघलांच्या स्वाधीन झाला.

अशावेळी या किल्ल्यावरील जनतेचा प्रश्न निर्माण झाला तसेच स्वराज्याच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला, म्हणून महाराजांनी रयतेच्या हितासाठी आणि या स्वराज्याच्या अस्तित्वासाठी, आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची माघार घेतली. आणि १३ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह संपन्न झाला.

पुरंदरचा तह (१६६५)

स्वराज्यातील २३ गडकिल्ले आणि चार लाख होन उत्पन्नाचा मुलुख महाराजांना द्यावा लागला, तर बारा गड किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा मुलुख स्वराज्यमध्ये कायम राहिला, महाराज ही पुरंदर लढत हरले असले तरी, या पुरंदरच्या तहामध्ये मात्र ते जिंकले होते, कारण आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर महाराजांनी अत्यंत कमी महत्त्वाचे किल्ले मोघलांच्या स्वाधीन केले, तर राजगड, रायगड, प्रतापगड, असे अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ले हे स्वराज्यामध्ये कायम ठेवण्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी पुढील काळामध्ये स्वराज्याचा मोठा विस्तार केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट (१६६६)

पुरंदर तहाने महाराज आता मोगलांचे मांडलिक राजे झाले होते, त्यामुळे मिर्झाराजाच्या सांगण्यावरून महाराजांना बाद्शाहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाणं भाग होतं, त्यामुळे महाराज शंभूराजांसोबत आणि आपल्या निवडक मावळ्यांसोबत गेले.

१२ मे १६६६ रोजी महाराज व औरंगजेब यांची आग्र्याचा लाल किल्ल्यात दरबारामध्ये पहिली आणि शेवटची भेट झाली. मात्र या भेटीत मोगल बादशाह औरंगजेबाने मुद्दामून महाराजांचा अपमान केला, त्यामुळे हा अपमान सहन न झाल्याने महाराजांनी औरंगजेबांने दिलेली खिल्लत नाकारली, आणि “चाहे तो मेरा सर काट कर ले जाओ, लेकिन मे बाद्शाहाकी हुजूरी नही करुंगा” अशी सिंहगर्जना करत ते दरबाराला पाठ दाखवून त्या दरबारातून निघून गेले, मित्रहो, मराठी स्वाभिमान काय असतो हे संपूर्ण जगाला महाराजांनी त्या ठिकाणी दाखवून दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून ऐतिहासिक सुटका (१६६६)

दरबारातील स्वाभिमानी वागणुकीनंतर महाराज शंभूराजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत राहावे लागले, मे १६६६ ते ऑगस्ट १६६६ अशे चार महिने आग्रा येथे पोलाद खानाच्या कडक पहाऱ्यामध्ये महाराज कैदी मध्ये होते, या कडक पहाऱ्यामध्ये महाराजांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला होता, त्यातूनच स्वराज्याच्या अस्तित्वाचा हे प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे कसेही करून येथून सुटका होणे आवश्यक होतं.

म्हणून, महाराजांनी अतिशय शांतपणे अगोदर आपल्या सोबतच्या सर्व मावळ्यांना स्वराज्यात पाठवून दिले, आणि नंतर १२ ऑगस्ट १६६६ रोजी महाराज शंभूराजांचे वेषांतर करून आग्र्याहून निसटले, शंभुराजांना मथुरेला ठेवले, आणि ते स्वतः २० नोव्हेंबर १६६६ रोजी सुखरूपपणे राजगडावर पोहोचले, मित्रहो महाराजांची आग्र्याहून सुटका ही द ग्रेट एस्केप ठरते. याचा पुढे औरंगजेबाला खूप मोठा पश्चाताप झाला.

स्वराजाची पुनर्स्थापना (१६६७ – १६७३ )

सुटकेनंतर पुरंदर तहाची सर्व बंधने महाराजांनी आता जुगारून दिली, आणि मोघलांना सडेतोड उत्तर दिले. मुघलांना दिलेले २३ गडकिल्ले महाराजांनी परत जिंकून, स्वराज्यात समाविष्ट केले. त्यासोबतच आता महाराजांनी मुघलांच्याही प्रांतामध्ये जाऊन तेथे धडका मारायला सुरुवात केली, मुघलांचा बागलान प्रांत महाराजांनी संपूर्णपणे जिंकून घेऊन, स्वराज्यामध्ये समाविष्ट केला.

त्यासोबतच सुरतेवर दुसरी स्वारी करून जवळपास ६० लक्ष रुपयाची सुद्धा प्राप्त केली. याबरोबरच आपली राजधानी किल्ले राजगडावरून, कोकणामधील रायगडावर स्थलांतरित केली. म्हणजेच महाराजांनी १६६७ ते १६७३ या काळामध्ये जिंकून घेतलेला स्वराज्य परत घेतलं आणि स्वराज्याची पुण्याला स्थापना केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका साता समुद्रापार (१६७१)

मित्रहो महाराजांनी या काळात एवढा पराक्रम गाजवला की, त्यांच्या परक्रमाचा डंका हा सातासमुद्रापार गाजला, कारण महाराजांच्या पराक्रमाची बातमी लंडन इथून प्रकाशित होणाऱ्या “द लंडन गॅजेट” या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापून आली. महाराजांनी सुरतेवर केलेल्या दुसऱ्या आक्रमणाची नोंद या वर्तमानपत्राने घेतली.

१७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी १६७१ च्या अंकात मोघलांना हरवणारे, शिवाजी राजे सर्व भारत देशाचे शासनकर्ते झाले आहेत. असे वर्णन छापून आले. म्हणजेच महाराज हे या काळात लोकल राज्यकर्ते न राहता ते आता ग्लोबल राज्यकर्ते झाले होते. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक (१६७४) Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक

मित्रहो १६४६ पासून ते १६७४ पर्यंत महाराजांनी अतिशय शून्यातून, रयतेचं स्वराज्य उभा केलं, मात्र अजूनही मोगल, आदिलशाही, इंग्रज, पोर्तुगीज महाराजांना राजा मानायला तयार नव्हते. त्यामुळे आता महाराजांचा राज्याभिषेक होणे ही काळाची गरज बनली होती आणि मासाहेब जिजाऊचे सुद्धा हे स्वप्न होतं.

६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर काशीचे गागाभट्ट यांच्या हस्ते, महाराजांचा विधिवत राज्याभिषेक संपन्न झाला. महाराज ३२ मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले आणि रायगडाच्या राज सदरेवरून स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्याचे छत्रपती म्हणून महाराजांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मध्ययुगीन गुलामगिरीच्या काळोखामध्ये रयतेवर सुखाचा छत्र धरणारा, रयतेचा राजा आता स्वतंत्र आणि सर्व स्वराज्याचा छत्रपती झाला होता. त्यामुळे शिवराज्याभिषेक हा दिन भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण ठरतो.

महाराजांचा दुसरा राज्याभिषेक

१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजामाता यांचे निधन झाले. त्यानंतर मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावुन घेतले त्या पूजाऱ्याने घोषित केले की, मूळ राज्याभिषेक जो झाला होता तो अशुभ ताऱ्यांखाली झाला होता.

त्यामुळे दुसरा राज्याभिषेक करणे आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला. ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की, शिवाजी महाराज त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी दुसऱ्या वेळी अभिषेक सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. 

गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला, अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये आपल्याला आढळून येते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात मांडण्यात आलेला आहे.

त्यात असेदेखील म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे इत्यादी घटनांचा उल्लेख असल्याचे दिसून येते.

कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम (१६७७ – ७८ )

आपल्या राज्याभिषेकानंतर कर्नाटक प्रांतामध्ये दोन वर्ष दक्षिण दिग्विजय मोहीम संपन्न केली. या मोहिमेअंतर्गत, या संरक्षण किल्ल्यासह, अत्यंत महत्त्वपूर्ण असा २० लाख होनाचा भूप्रदेश स्वराज्यमध्ये समाविष्ट केला. याशिवाय आपले सावत्र बंधू व्यंकोजी राजांकडून त्यांनी आपली वडीलोपार्जित जहागिरीची सुद्धा प्राप्त केली. म्हणजेच महाराष्ट्र प्रमाणे या कर्नाटक प्रांतामध्ये त्यांनी दुसऱ्या स्वराज्याचीच निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन (१६८०) / छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

३ एप्रिल १६८० रोजी राजधानी रायगडावर या युगप्रवर्तक राजाचं निधन झालं. मित्रहो, १९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० अशी महाराजांची एकूण १८३०६ दिवसांची कारकीर्द आहे. या पन्नास वर्षाच्या काळामध्ये, महाराजांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, अशा विविध क्षेत्रांमध्ये युवक प्रवर्तक कार्य केले.

महाराजांचे हे कार्य, विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवी ऊर्जा देतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ

शिवाजी महाराज वंशावळ

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

  • “आत्म-शक्ती शक्ती देते, आणि शक्ती शिक्षण देते. ज्ञान स्थिरता प्रदान करते, आणि स्थिरता विजयाकडे नेतो.
  • “आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये, कारण दिवस आणि रात्र प्रमाणेच चांगले दिवस देखील बदलावे लागतात.”
  • “स्वातंत्र्य हे एक वरदान आहे ज्याला प्रत्येकजण पात्र आहे.”
  • “शत्रूला कमकुवत समजू नका, मग ते खूप बलवान आहे असे समजून घाबरू नका.”
  • “संकटाला सामोरे जाणे आवश्यक नाही, शत्रूला तोंड देणे टाळणे आवश्यक आहे. विजय हा विजयात असतो.”
  • “एक यशस्वी माणूस आपल्या कर्तव्याच्या पराकाष्ठेसाठी योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.”
  • “स्त्रीच्या सर्व अधिकारांपैकी, सर्वात मोठा अधिकार म्हणजे आई असणे.”
  • “जेव्हा आत्मे उच्च असतात, तेव्हा एक डोंगर देखील धुळीच्या ढिगासारखा दिसतो.”
  • “प्रयत्न करणारा सुद्धा हुशार विद्वानांपुढे नतमस्तक होतो, कारण प्रयत्न देखील शिकण्याने होतात.”
  • “प्रथम राष्ट्र, मग शिक्षक, मग आई-वडील, मग परमात्मा. म्हणून राष्ट्राकडे पहिले पाहिजे, स्वतःकडे नाही.”
  • “कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांच्या परिणामाचा विचार करणे फायदेशीर ठरते, कारण आपली भावी पिढीही तेच अनुसरत असते.”
  • “सूड माणसाला जळत राहतो, संयम हाच सूडावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.”
  • “तुम्ही द्राक्ष खाल्ल्याशिवाय ते गोड वाइनमध्ये बदलत नाही, त्याचप्रमाणे माणूस संकटात चिरडल्याशिवाय त्यांच्या उत्कृष्ट प्रतिभेतून बाहेर पडत नाही.”
  • “छोट्या ध्येयावर एक लहान पाऊल, नंतर मोठे ध्येय साध्य करते.”
  • जो कोणी नीतिमत्ता, सत्य, श्रेष्ठता आणि ईश्वरापुढे नतमस्तक होतो, त्यांना संपूर्ण जग आदर देते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर १० ओळी (10 lines on Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराज भाषण

  1. छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव होते.
  2. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
  3. राजमाता जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या आई होत्या आणि शहाजीराजे भोसले त्यांचे वडील होते.
  4. शिवराय गनिमी कावा, घोडेबाजी, तलवारबाजी, राजनिती तसेच युद्धनितीत पारंगत होते.
  5. शिवाजी महाराजांचे पहिले लग्न १४ मे १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्याबरोबर झाले होते.
  6. पुरंदरचा तह, आग्रा येथून सुटका अशा बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने राजांनी मुकाबला केला.
  7. शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशात आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला.
  8. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेव, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धूळीत पाडले.
  9.  शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या
  10. भारतातील रायगड येथे १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  11. स्वतंत्र मराठा साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नाटके

  • बेबंदशाही – विष्णू हरी औंधकर
  • रायगडाला जेव्हा जाग येते – वसंत कानिटकर
  • लाल महालातील थरारक शिवतांडव – प्रमुख भूमिका अमोल कोल्हे
  • आग्र्याहून सुटका – विष्णू हरी औंधकर
  • जाहले छत्रपती शिवराय – लेखक दिग्दर्शक सुदाम तरस
  • शिवगर्जना – लेखक व इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत
  • छत्रपती शिवाजी आणि 21 वे शतक – व्याख्याते डॉक्टर गिरीश जखोटिया
  • राजे आणि छत्रपती – लेखक शिवा बागुल
  • शिवरायांचे आठवावे रूप – लेखक ऋषिकेश परांजपे
  • तीर्थ शिवराय – रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम
  • शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला – लेखक राजकुमार तांगडे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ग्रंथ

  • शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ – श्रीपाद दामोदर सातवळेकर
  • शिवाजीची कर्नाटक मोहीम – एम एस नरवणे
  • क्षत्रिय कुलावंतस छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चरित्र – लेखक कृष्णराव अर्जुन केळुसकर
  • शिवाजी महाराजांची पत्रे – नामदेवराव जाधव
  • शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु – नामदेवराव जाधव
  • शिवाजी महाराज आणि एमबीए – नामदेवराव जाधव
  • शिवाजी महाराजांची डायरी – नामदेवराव जाधव
  • शिवाजी जीवन आणि काळ – गजानन भास्कर मेहेंदळे
  • शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र – नामदेवराव जाधव
  • शिवाजी महाराज – नामदेवराव जाधव
  • शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट – हेमंतराजे गायकवाड

शिवाजी महाराजांवरील ललित साहित्य

  • राजा शिवछत्रपती – लेखक बाबासाहेब पुरंदरे
  • शिवभूषण – निनाद बेडेकर
  • रणसंग्राम – मराठी अनुवादक नंदिनी उपाध्ये
  • थोरलं राजं सांगून गेलं – निनाद बेडेकर
  • कुळवाडीभूषण शिवराय – लेखक श्रीकांत देशमुख
  • उषःकाल – ह. ना. आपटे
  • श्रीमानयोगी – रणजीत देसाई
  • राजा शिवाजी – म. म. कुंटे
  • सभासदाची बखर – कृष्णाजी अनंत सभासद
  • आग्र्याहून सुटका – पु.बा. गोवईकर
  • आज्ञापत्र – रामचंद्रपंत अमात्य
  • गड आला पण सिंह गेला – ह. ना. आपटे
  • कुलरक्षिता जीऊ – वैशाली फडणीस
  • छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे – दत्ता नलावडे
  • शिवनामा – मुबारक शेख
  • पॅटर्न शिवरायांचा – सतीश कुमदाळे
  • छत्रपती शिवाजी आणि सुराज्य – भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल दवे
  • शिवछत्रपती – शिरीष गोपाळ देशपांडे
  • एक्याण्णव कलमी बखर – वी. स. वाकसकर

शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :

  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (इ.स. २००९) (चित्रपट – कथा/पटकथा महेश मांजरेकर)
  • फर्जंद (मराठी चित्रपट – शिवाजी महाराजांच्या भूमिकेत – चिन्मय मांडलेकर, दिक्पाल लांजेकर)
  • भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट – ’गनिमी कावा’, “छत्रपती शिवाजी’, “थोरातांची कमळा’, ’नेताजी पालकर’, ’बहिर्जी नाईक’, “बालशिवाजी’, “मराठा तितुका मेळवावा’, “महाराणी येसूबाई’, “मोहित्यांची मंजुळा’, “स्वराज्याचा शिलेदार’ इत्यादी.
  • फत्तेशिकस्त शिवाजी महाराजांच्या भूमिकेत – चिन्मय मांडलेकर
  • राजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)
  • नेताजी पालकर
  • सुभेदार
  • गनिमी कावा
  • बहिर्जी नाईक
  • मराठी तितुका मेळवावा
  • शेर शिवराज है
  • छत्रपती शिवाजी
  • भारत की खोज (हिंदी)
  • शेर शिवराय
  • तान्हाजी द अनसंग हीरो
  • राजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)
  • बाळ शिवाजी
  • सरसेनापती हंबीरराव
  • वीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)
  • जय शिवाजी जय भवानी ( दूरचित्रवाणी मालिका)

शिवजयंती बद्दल संपूर्ण माहिती (Information about Shiv Jayanti in Marathi)

भारतातील सर्वात शूर राजांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. १९ फेब्रुवारी १६३० रोजी  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. स्वतंत्र मराठा साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते.

मराठा साम्राज्याचा आधार निर्माण केल्यामूळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आठवणीत होते, आहेत, आणि राहतील. शिवजयंती आणि शिवाजी महाराज जयंती ही छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसाची इतर नावे आहेत.

आपण संपूर्ण महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करतो. या दिवशी महाराष्ट्र राज्याला सार्वजनिक सुट्टी असते. मुघलांचा पराभव करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले शौर्य आणि डावपेच सर्वांना माहीत आहेत. स्वराज्य आणि मराठा वारसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध झाले. या दिवशी त्यांच्या प्रतिमेस तसेच पुतळ्याला हार घालून त्यांना मानवंदना दिली जाते.

शिवाजी महाराजांविषयी पुस्तके

  • शिवाजी आणि रामदास – सुनील चिंचोळकर
  • शिवरायांची युद्धनीती – डॉक्टर सच्चिदानंद शेवडे
  • शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र – लाला लजपत राय
  • शिवाजी निबंधावली भाग एक आणि दोन
  • शिवाजी द ग्रँड रिबेल
  • शिवजयंती – नामदेवराव जाधव
  • शिवाजी – सर यदुनाथ सरकार
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी – श्रीकांत गोवंडे
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड एक आणि दोन
  • शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती – डॉक्टर राम फाटक
  • शिवकालीन स्त्रियांचे अधिकार – नीलिमा भावे
  • शिवछत्रपतींचे चरित्र रघुनाथ – विनायक हेरवाडकर
  • शिवाजी दि ग्रेट गोरिला – आर डी पालसकर
  • शिवजयंती – नामदेवराव जाधव
  • छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अष्टयोग – प्राध्यापक डॉक्टर सतीश सुखदेव कदम
  • असे होते शिवराय – सौरभ कर्डे
  • डच ईस्ट इंडिया कंपनी
  • छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि शिकवण – शिवप्रसाद मंत्री
  • उद्योजक शिवाजी महाराज – नामदेवराव जाधव
  • झुंज नियतीशी – इंद्रायणी चव्हाण
  • डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
  • श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष – इंद्रजीत सावंत
  • महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी – प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील
  • पराक्रमापलीकडे शिवराय – प्रशांत लवटे
  • मराठा स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराज – लेखक चिंतामण विनायक वैद्य
  • राजा शिवछत्रपती – लेखक ब. मो. पुरंदरे
  • शिवकालीन दंतकथा – सुरेंद्र साळोखे

प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षे जगले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु 3 एप्रिल 1680 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी किती होत्या?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8 पत्नी होत्या. त्यांच्या पत्नींचे नावे सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई ही आहेत.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरीवांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment