गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

माटोळी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटोळी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची माटोळी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.

तळकोकणात गणपतीच्या आसनाच्या वर माटोळी सजवण्याची खूप जूनी परंपरा आहे. वरच्या कोकणात मंडपी, तळकोकणात माटी किंवा माटवी तर गोव्यात माटोळी अश्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.

गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

Table of Contents

माटवी – माटी – माटोळी म्हणजे काय ?

माटोळी म्हणजे लाकडाची आयताकृती चौकट असते व त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या रचलेल्या असून चार बाजूंना चार खूर असतात. माटोळी किंवा माटी ही सागवानी किंवा फणसाच्या लाकडापासून बनवलेली असते. या माटोळीवर परिसरात आढळणाऱ्या औषधी व आकर्षक वनस्पती बांधल्या जातात. अश्याप्रकारे माटोळी ही गणपती सजावटीची एक पर्यावरणपूरक पद्धत आहे.

कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे. आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहराने ते अजून नटून जाते. माटोळी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटोळीमध्ये केला जातो.

माटोळी म्हणजे काय
माटोळी

माटोळी कशी तयार करतात ?

पूर्वीच्या काळी माटोळीची चौकट ही तयार नसायची. दरवर्षी नवीन चौकट तयार करावी लागायची. त्यावेळी भेडल्या माडाच्या खोडांच्या पट्ट्यापासून माटोळी तयार केली जाई. भेडला माड उपलब्ध नसल्यास बांबूपासून सुद्धा बांधली जायची. माटोळीसारखीच कोकणातल्या चुलीच्या वर एक बांबूंची रचना असायची त्याला उतव असे म्हटले जाई. उतवाचा उपयोग पावसाळ्यात फटकूर-कांबळी, सुपाऱ्या, कपडे किंवा इतर गोष्टी सुकवण्यासाठी केला जाई.

माटोळी बांधण्याचा मूळ उद्देश काय ?

गणपती मंडपाची पर्यावरणपूरक सजावट हा माटोळीचा सरळ उद्देश दिसून येतोच. पण माटोळी बांधण्याचे नक्की कारण काय हे पाहायला गेले, तर काही आख्यायिका अश्या आहेत. की पूर्वीच्या काळात कोकणातील घरे कौलारू, तर त्यावर सगळ्यात जास्त त्रास असतो तो माकडांचा.

माकडे कौलावर नाचून कौले फुटल्याचे कितीतरी प्रसंग व्हायचे. पुजलेल्या गणपतीला याचा त्रास होऊ नये, म्हणून कदाचित ही लाकडी चौकट आसनाच्या वर बांधली गेली असावी. याच चौकटीचा वापर करून त्यात सजावट केली गेली. गणपतीचे रूप हत्ती. हत्तीला आवडणारे नैसर्गिक वातावरण घरात निर्माण करता यावे, म्हणून रानबहर माटोळीत बांधला गेला असावा.

माटोळी म्हणजे काय
माटोळी बाजार

माटोळीच्या वर डाळी टाकण्याची सुद्धा प्रथा असायची. डाळी हा बांबूच्या वेतांपासून विणून तयार केलेला चटईसारखा भाग असायचा. डाळीचा उपयोग म्हणजे कौलातून झिरपणारे पाणी, कचरा किंवा पाल, उंदीर, विंचू सारख्या प्राण्यांचा शिरकाव थांबवणे. गणपतीच्या काही दिवस आधी कुळाचा गावकर (महार) #डाळी व नारळ ठेवण्यासाठी परडी देऊन जायचा. तसेच महार, न्हावी, सुतार व इतर बलुतेदार कुडवाळ्याकडून आपल्या मानाचा सणाचा नारळ घेऊन जात.

माटोळी बांधण्याची पारंपारिक पद्धत

गणपतीच्या आसनाखाली परडी मध्ये गणेशाचे प्रतीक म्हणून नारळ ठेवण्याची पद्धत आहे. हा नारळ उतरवलेला, म्हणजे झाडावरून न पाडता, अलगद खाली उतरवलेला नारळ असावा लागतो. गणपतीच्या बाजुलाच गौरी व महादेव पुजले जातात. महादेवाच्या रुपात ठेवलेला नारळ सुद्धा उतरवलेलाच असावा लागतो. गौरी मध्ये आंब्याचा टाळ, हरण, हळद, कणकीचा (बांबूची मोठी जात) पाला, तेरडा, अळू, सरवड अश्या एकूण पाच किंवा सात वनस्पतीच्या फांद्या असतात.

माटोळीची सुरवात होते ती आंब्याचा टाळ मध्यभागी बांधून. कोकणात परंपरा आहेच, जिथे शुभकार्य करायचे असते, त्या जागेवर आंब्याचा टाळ म्हणजे आंब्याची पाच ते सात पाने असणारी फांदी बांधली जाते. माटोळीत सर्वप्रथम सोललेला नारळ बांधला जातो. शिप्टा, कातरो, बेडे (म्हणजेच सुपारीच्या फळांचे घोस) देखील माटोळीत बांधले जातात.

यावेळी उपलब्ध असलेली फळे माटोळीला बांधण्याची प्रथा आहे. प्रामुख्याने यात तवसा-काकडी, चिबुड व केळ्याचा घड यांचा समावेश असतो. बेल व शमी या पत्रींच्या फांद्यासुद्धा माटोळीत बांधल्या जातात. सावंतवाडीची लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. तर यातलीच लाकडी फळे सुद्धा काही ठिकाणी माटोळीत बांधतात.

पावसाळ्यात कोकणी घराभोवती परसबाग लावली जाते. यात तवसा म्हणजे काकडीची मोठी जात, दोडकी, भेंडी, वाली, अळू, करांदा, लाल भाजी यांचा समावेश असतो. काही घरांमध्ये परसबागेतील या सर्व भाज्या सुद्धा माटीला बांधण्याची प्रथा आहे.

माटोळी म्हणजे काय
माटोळी सजावट

माटोळीसाठी लागणारे साहित्य कोणते ?

माटोळीला सजावटीसाठी कितीतरी रान वनस्पती बांधल्या जातात. या वनस्पती दिसायला सुंदर असतातच, पण त्यांना औषधी गुणधर्म देखील आहेत.

हरणीची (हरळी) पिवळीधम्मक फुले, कवंडळाची चेंडूसारखी लाल-पिवळी फळे, कांगुणीच्या (कांगल्या) पिवळ्या लाल फळांचे घोस, सरवाडीचे (शेरवड) शुभ्र पानांसारखे असणारे संदल, तेरड्याची गुलाबी फुले, आयनांची चित्रविचित्र आकाराची फुले, कळलावीची आगीसारखी दिसणारी पिवळी-केसरी-लाल फुले आणि नागकुड्याची वाघनखांसारखी दिसणारी पिवळी-लाल फळे, माटोळीला एक वेगळेच सौंदर्य प्रधान करतात. या सर्व रानवनस्पतींची विस्तृत माहिती खाली दिली आहे.

रानबहार माटोळीला बांधण्यामागचे शास्त्र शोधायचे म्हटले तर या सर्व वनस्पती खुप औषधी असतात. माटोळीच्या माध्यमातून यांची जनमानसात ओळख होते आणि माटोळीच्या उपयोगी म्हणून संवर्धनही केले जाते. अजून एक मला वाटणारी गोष्ट म्हणजे या रानबहाराचा गंध दरवळ देखील आरोग्यदायक असतो. त्यामुळेच माटोळी बांधल्यानंतर घर प्रसन्न होऊन जाते.

कोकणातील माटोळीची परंपरा

माटोळीला न्हेवर्‍यांचा (करंज्या) नवस बोलण्याचीही पद्धत असायची. एखादे कार्य पूर्ण व्हावे म्हणून माटोळीला नवस बोलला जाई आणि पूर्ण झाले की माटोळी बांधताना करंज्या (न्हेवरे) दोर्‍यात ओवून माटोळीला बांधल्या जायच्या. पहिल्या दिवशी रात्री भजन झाल्यावर करंज्यांचा नैवेद्य ठेवला जाई. गाऱ्हाणे घालून कार्य पुर्ण झाल्याबद्दल आभार मानले जात आणि त्यानंतर माटोळीला बांधलेल्या करंज्या काढून भजनी मंडळींना प्रसाद म्हणून वाटल्या जात.

बाप्पाला निरोप देताना पाटावर शिदोरी ठेवली जाते. या शिदोरीत दोन हळदीच्या पानात एकामध्ये करांदा व पंचखाद्य तर दुसर्‍यात पानाचा विडा बांधलेला असतो. गणेश विसर्जनाच्या वेळी माटोळीला बांधलेला नारळ फोडून त्याच्या पाण्याने गणपतीचा अभिषेक केला जातो, आणि गणपती विसर्जनानंतर या नारळापासून तयार केलेली शिरणी (शिरवणी) म्हणजे नारळाच्या कातळीचे तुकडे प्रसाद म्हणून वाटली जाते. माटीला बांधलेली इतर फळेही प्रसाद म्हणून वाटली जातात.

कोकणात अश्या कितीतरी परंपरा आहेत. कोकणी लोकांचे जीवन हे कायम पर्यावरणपूरकच राहिले आहे. परंपरांच्या मागे कित्येक शास्त्रीय कारणे असतात. ती आपल्याला कळत नसल्याने आपण त्या परंपरा स्वीकारत नाही, किंवा चुकीच्या ठरवतो. पण अश्या परंपरांचा सखोल अभ्यास व्हावा व तसेच त्या जपल्या पण जाव्यात.

माटोळी देखावा
माटोळी देखावा

माटोळीमधील सर्वात आवश्यक गोष्टी

माटोळीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर(कुमयाचे दोर), उतरवलेला नारळ, शिप्टा (सुपारी) आणि तवसा (काकडी). याशिवाय माटोळी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटोळीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.

1) आंब्याचे टाळ – Mangifera indica (Anacardiaceae)

माटोळीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळ म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळ फक्त आमलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (हापूस किंवा इतर कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

2) केवणीचे दोर (किवनीचे दोर/कुमयाचे दोर) केवण / मुरडशेंग – Helicteris isora (Malvaceae)

आंब्याचे टाळ किंवा इतर गोष्टी माटोळीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे किंवा कुमयाचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी साणशीतील एक आहे.

3) उतरवलेला नारळ- नारळ / माड – Cocos nucifera (Arecaceae)

माटोळीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

4) शिप्टा (कातरो) – सुपारी / पोफळ – Areca catechu (Arecaceae)

शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटोळीत प्रामुख्याने होतो.

5) तवसा (काकडी) – काकडी – Cucumis sativus (Cucurbitaceae)

काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटोळीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटोळीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

6) हरण (हरळी) – सोनकी – Senecio bombayensis (Asteraceae)

सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षक पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे- डोंगर हरणी ने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

7) कवंडळ (कौंडाळ) :- कवंडळ – Trichosanthes tricuspidata (Cucurbitaceae)

कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले व हिरवी गोलाकार फळे येतात. पिकताना ही फळे पिवळी, नारिंगी आणि लालभडक होतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते.

8) कांगणे (कांगले) – कांगुणी – Celastrus paniculatus (Celastraceae)

कांगुणी ही एक झुडूप वर्गीय वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात.

9) सरवड (शेरवड) – सरवड – Mussaenda glabrata (Rubiaceae)

सरवड ही एक आधाराने वाढणारे झुडूप आहे. याला भगवी फुले येतात तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात.

10) आयना – ऐन / असन – Terminalia elliptica (Combretaceae)

ऐन हे इमारती लाकडाचे झाड. ऐनाची फळे (आयना) पाच पदराची जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात.

11) तेरडा (तिरडा) – तेरडा – Impatiens balsamina (Balsaminaceae)

पावसाळ्यात बहरणाऱ्या फुलांपैकी एक लहान झाड तेरडा. याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात.

12) वाघनखी – कळलावी / वाघनखी – Gloriosa superba (Colchicaceae)

वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजुन रंग भरतात.

13) नरमाची फळे – नरम / बोंडारा – Lagerstroemia parviflora (Lythraceae)

नरम हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात.

14) नागकुड्याची फळे – नागकुडा – Tabernaemontana alternifolia (Apocynaceae)

नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनख असे म्हटले जाते.

बाजार गणेशोत्सव

यंदाच्या बाजारात काय आहे नेमकं चित्र ?

चतुर्थीला लागणाऱ्या माटोळीच्या साहित्य विक्रीला कोकण आणि गोव्यात आज दिनांक 16 सप्टेंबेर पासून हळूहळू सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी माटोळीला लागणारे साहित्य तसेच अन्य आवश्यक वस्तु शेतकरी बाजारपेठेत घेऊन दाखल झाले आहे. आता फक्त दोन तीन दिवसच शिल्लक असल्याने राज्यातील बाजारात या दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे.

माटोळीद्वारे बाजारांमध्ये मोठी उलाढाल

कोकणातील स्थानिक बाजारांमध्येही माटोळीसाठीचे सर्व साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते ज्याचा वापर गणेश उत्सवात केला जातो. या माटोळीमध्ये आंब्याचे टाळ, कुमयाचे दोर, उतरवलेला नारळ, सुपारी आणि तवसा-काकडी,आंबाडे यासोबतच ईडलिंबू, कांगली, कवंडळ, हरणी, शेरवड, ऐन, नागकुडा अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश होतो.

गावागावातील शेतकरी आणि जाणकार, यातील विविध साहित्य विक्रीसाठी प्रतिवर्षी बाजारात आणतात. त्याप्रमाणे यंदाही हे साहित्य गणरायाचं आगमन जल्लोषात व्हावे यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हळूहळू पुन्हा एकदा बाजारपेठा फुलू लागलेल्या असून आपल्या लाडक्या बाप्पासाठी सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

माटोळी सजावट स्पर्धा – गणेशोत्सव 2023

गोवा राज्यात आणि तळकोकणच्या काही भागात मोठमोठ्या माटोळी सजावट स्पर्धा भरवल्या जातात. या स्पर्धांमध्ये हौशी कलाकार माटोळी सोबतच गणपती बैठकीच्या आजूबाजूचा भाग आणि हॉल मधील सजावट ही माटोळी साहित्य वापरुन करतात. या देखाव्यामध्ये माटोळीत शिवलिंग, गणेश, मंदिर आकार पारंपारिक साहित्य वापरून केलेले पाहावयास मिळतात.

माटोळी साहित्याचे दर अंदाजे काय असतात ?

माटोळी साहित्याचे दर बाजारपेठेप्रमाणे थोडेसे वरखाली होत असले तरी माटोळी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी दरात थोडीशी तफावत दिसून येत आहे. उतरवलेल्या नारळाची पेंडी 500 ते 800 रुपये, सुपारीचे कात्रे 300 रुपयांपासून सुरुवात केळीच्या फणे पन्नास नग 200 रुपये आहेत.

त्याचप्रमाणे हरणी – 10 ते 30 रुपये जुडी, कांगली – 20 ते 40 रुपये, कवंडळ – 10 रु. प्रती नग, शेरवड – 10 ते 30 रुपये जुडी, ऐन – 20 ते 40 रुपये जुडी, नागकुडा -50 रुपये, अंबाडे पन्नास – 100 रुपये, चिबूड – 50 ते 100 रुपये, केवनीचा दोर – 50 ते 100 रुपये, हळदीची – 25 पाने 50 रुपये असे अंदाजे दर आहेत.

आमचे गणेश चतुर्थी 2023 स्पेशल लेख नक्की वाचा 👇

आधुनिक काळातील माटोळीची गरज

माटोळी किंवा माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती वापरून माटी सुंदर सजवली जाते. यासंबंधात आळस न करता, आपण ही संस्कृती जपली पाहिजे. आता तर या वनस्पती बाजारात सहज उपलब्ध असतात.

प्लास्टिक किंवा थर्माकाॅलच्या पर्यावरण घातक गोष्टींऐवजी माटोळी किंवा माटी सारख्या पर्यावरणपूरक गोष्टींचा उपयोग करून गणपती सजावट केली जावी. मात्र हे ही लक्षात ठेवावं कि निसर्गाचा ओरबाडा होणार नाही. माटीत वापरली जाणारी फळे ही परिपक्व असावी म्हणजे त्यातून बीजप्रसारही होईल. या झाडांचे प्रमाण कमी होत चाललय त्यामुळे अश्या झाडांचे संर्वधन करणेही फार गरजेचे होत आहे.

🙏गणेश चतुर्थी 2023 सर्वांना आनंदाची जावो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना 🙏

Leave a comment