गणेश विसर्जन संपूर्ण माहिती | Ganesh Visarjan Information In Marathi

गणेश विसर्जन संपूर्ण माहिती | Ganesh Visarjan Information In Marathi – गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात. काही जणांकडे दीड दिवसाचा,काही जणांकडे ५ दिवसांचा,काही जणांकडे ७ तर काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती असतो. हे दिवस आनंदात-उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. आणि नियमानुसार, प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्याला शुभ मुहूर्तावर निरोप देण्याची तयारी सुरू होते.

Table of Contents

गणेश विसर्जन संपूर्ण माहिती | Ganesh Visarjan Information In Marathi

गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….असा जयघोष विसर्जनाच्या दिवशी सगळीकडे ऐकायला मिळतो. यावर्षी १९ सप्टेंबर या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं यावर्षी १९ सप्टेंबर या दिवशी घरोघरी आगमन होणार आहे.

घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा काहींच्या घरी दीड, पाच, सात, दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जात असतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येते.

Ganesh Visarjan Information In Marathi

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. विसर्जनाच्या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. गणपतीच्या विसर्जनाचा पूजा विधी कसा करावा ? याची विधिवत पद्धत आपल्याकडील पुरोहित, पंचांग यांच्या मार्फत माहिती करून घेतली जाते.

वाचा सविस्तर👉 गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. या गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर प्रथेनुसार आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करतो. गणपती बाप्पाचे विसर्जन का करतो? याचे महत्त्व, त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीची विसर्जन पूजा कशाप्रकारे केली जाते? याबाबतची सगळी माहिती आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात गणेश विसर्जनची माहिती.

गणेश विसर्जन का करावे – गणेश विसर्जन माहिती

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, गणेशजींनी सलग १० दिवस महाभारत लिहिले होते. एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते. हे ज्यावेळी व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेद व्यासजींनी त्यांना एका जलस्त्रोतावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले. त्यामुळे गणेशजींना मोठा आराम मिळाला. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. त्या दिवसापासून या तिथीला गणेशजींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

धार्मिक श्रद्धेनुसार, जेव्हा आपण देवी-देवतांची मूर्तीच्या रूपात पूजा करतो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या जगातून बोलावतो आणि पूजा संपल्यावर आपण त्यांचे विसर्जन करतो, त्यांना निरोप देतो जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या लोकांकडे परत जातील. विसर्जन का करावे याची काही कारणे खालीलप्रमाणे –

विसर्जन आणि पंचतत्व

ज्ञान, बुद्धीची देवता, आणि पाणी, हे देखील ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित असल्याचे मानले जाते, याचे कारण स्वतः गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात. पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेले असल्यामुळे, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली गणेशाची मूर्ती मूळ स्वरूपात पाच तत्वांमध्ये विरघळते आणि विलीन होते.

महाभारताचा संबंध व्यासांशी आहे

असे मानले जाते की, श्री गणेशाने महाभारत लिहिले होते. महर्षी वेद व्यास यांनी सलग १० दिवस गणेशाला महाभारताची कथा सांगितली आणि गणेशाने ही कथा अगदी १० दिवसात लिहून काढली. १० दिवसानंतर वेद व्यासजींनी गणेशजींना स्पर्श केला, त्यावेळी त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले असल्याचे त्यांना दिसले. वेदव्यासजींनी त्यांना ताबडतोब जलकुंभावर नेले आणि तेथे पाण्यात स्नान केले आणि शरीराचे तापमान शांत केले. त्यावेळी श्री गणेशजींना आराम मिळाला. तेव्हापासून असे मानले जाते की, गणेशाचे विसर्जन त्यांना थंड करण्यासाठी आराम मिळण्यासाठी केले जाते.

विसर्जन आणि जीवन चक्र

जीवन हे मृत्यूचे एक चक्र आहे. विसर्जनाचा नियम असे सांगतो की, जग एका चक्राच्या रूपाने फिरत असते, हे माणसाला समजले पाहिजे. या पृथ्वीतलावर जी काही जीवसृष्टी आलेली आहे, ती जीवसृष्टी परत आपल्या जागी जाते. आणि मग जेव्हा वेळ येते त्यावेळी ती पृथ्वीवर परत येते. असे कालचक्र सुरू असते. आपण मोठ्या प्रेमाने बाप्पाची मुर्ती घरी आणतो, नंतर आपण त्याच्या मूर्ती स्वरुपाने मंत्रमुग्ध होतो, पण त्याला जायचे आहे, म्हणजेच गणपती विसर्जन म्हणून त्याचा मोह सोडावा लागतो. गणपती बाप्पा पुन्हा येवो अशी प्रार्थना आपण करतो. म्हणूनच आपण म्हणतो ना, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”.

लो. टिळक आणि गणेश चतुर्थी संबंध

लो. बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केल्याची नोंद भारतीय इतिहासाच्या दिसून येते. ब्रिटीश राजवटीविरुद्ध देशाला संघटित करण्यासाठी, लोकांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी ही परंपरा सुरू केली. श्रद्धेच्या नावावर भारतीय लोकएकत्र येऊ शकतात. हे त्यांना चांगलेच माहीत होते. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातून गणेशोत्सव सुरू केला आणि त्यानंतर गणेश विसर्जनही करण्यात आले.

 Ganesh Visarjan Information In Marathi

देव त्याच्या मूळ रूपात सापडतो. सर्व देवी-देवता पाण्यात विसर्जित होतात. पाण्याला नारायण रूप मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, जगातील सर्व मूर्ती, देव-देवता, प्राणी, त्या सर्वांमध्ये मीच आहे आणि शेवटी सर्वांना माझ्यामध्येच शोधावे लागेल. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, पाण्यात विरघळल्यानंतर परमात्मा मूळ स्वरुपात विलीन झाल्याची श्रद्धा आहे. हे परमात्म्याच्या एकतेचे प्रतीक देखील आहे.

विसर्जनाचा पर्यावरणीय प्रभाव

गणेश चतुर्थी या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या पदार्थांचा वापर करून गणपतीच्या मूर्ती केल्या जातात. यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम घडून येत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने २००४ मध्ये असा निर्णय दिला की गणेश मूर्तींचे विसर्जन बेकायदेशीर आहे, कारण त्यात समुद्राचे पाणी प्रदूषित करणारी रसायने समाविष्ट आहेत.

याला आळा घालण्यासाठी, पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच पर्यावरण पूरक उत्सवांना चालना देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साहित्यापासून म्हणजेच माती, कागद यापासून बनवलेल्या गणेशाच्या मूर्ती उदयास येत आहे. यामुळे या मूर्तींचे पाण्यामध्ये विघटन होऊन पर्यावरणातील कुठल्याही जीवांना हानी होत नाही.

पर्यावरणाच्या चिंतेमुळेच गुजरातमध्ये नवीन नियम लागू करण्यात आला. गुजरातमधील लोकांना शेण आणि चिकणमातीच्या मिश्रणाने बनवलेल्या गणेश मूर्तींची निवड करण्यास भाग पाडले जात आहे. आता या मूर्ती बनवणाऱ्या संस्थेकडून “वैदिक गणेश मूर्ती” म्हणून विकल्या जातात. गोव्यात प्लॅस्टर-ऑफ-पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

आणि उत्सव साजरा करणाऱ्यांना लोकांना पारंपरिक, कारागिरांनी बनवलेल्या मातीच्या मूर्ती विकत घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. हैदराबादमध्ये देखील पारंपारिक मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयोजन केल्याचे दिसून येते.

गणपती पूजा विधी

 • सर्वप्रथम सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
 • त्यानंतर पूजेची सर्व तयारी करावी.
 • त्यानंतर सोवळे नेसावे.
 • घरातील देवाची पूजा करावी.
 • त्यानंतर दूर्वा पाण्यात बुडवून गणपतीच्या मूर्तीचे दर्शन करून तसेच गणपतीच्या पूजेच्या साहित्यावर शिंपडून घ्यावे.
 • गणपतीच्या मूर्तीला फुलांची माळ घालावी.
 • नंतर गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळद, कुंकू, गुलाल लावून घ्यावा.
 • गणपतीसमोर दोन पाने, खारीक, खोबरे, सुपारी, सुटे पैसे असा वीडा मांडावा. आणि त्यावर थेंबभर पाणी सोडावे.
 • गणपतीच्या मूर्तीला फुले वाहावीत.
 • गौरी आणि गणपतीच्या मूर्तीला लाल वस्त्रे वाहवित.
 • एक फूल गंधामध्ये टेकवून गणपतीच्या पायावर वाहावे.
 • गणपतीच्या मूर्तीला मिठाई, मोदकांचा तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
 • त्यानंतर मूर्ती समोर अगरबत्ती लावावी.
 • त्यानंतर गौरीच्या मूर्तीला देखील निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर गणपतीला देखील निरांजनाने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.
 • गणपतीच्या मंत्रोच्चाराने यथासांग पूजा करावी.
 • गणपतीला धूप दाखवून संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.
 • त्यानंतर गणपतीची कापूर लावून आरती करावी.
 • गणपतीच्या आवडीचे मोदक यांचा तसेच पंचपकवांनांचा नैवेद्य दाखवावा.

श्रीगणेश उत्तर पूजन साहित्य

पांढरी आणि लाल वस्त्र, लाल रंगाची फुले, केळीचे पान,फळे आणि फुले, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पाने, रांगोळी, अत्तर, श्रीफळ, तुळशी, फुलांचा हार, हळदकुंकू, ताम्हण,पळी, पंचपात्र, विड्याची पाने, सुटेपैसे, अगरबत्ती, सुपारी, घंटा,चौरंग, अष्टगंध, शेंदूर, दूर्वा, जानवे, अक्षता, पुष्पहार,माचिस, समई, गुलाल, तूप, निरांजन, तेल, मिठाई, कापूस, हरतालिकेची मूर्ती, शिवलिंग, दिवा, कापूर,अक्षता, अबीर, चंदन, धूप, शहाळी, केळी, कलश. पंचामृत – (तूप, दही, साखर, दूध, मध.)

गणेश विसर्जन पूजा विधी २०२३ (Ganesh Visarjan 2023)

ज्याप्रमाणे आपण गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाची स्थापना करून पूजा करतो, त्याच पद्धतीने गणपतीची विसर्जन पूजा देखील केली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची पूजाअर्चा करून विसर्जन केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभते असे सांगितले जाते. ही विसर्जन पूजा कशी करावी ते खालील प्रमाणे –

Ganesh Visarjan Information In Marathi
 • सर्वप्रथम गणपतीला फुलांचा हार घालावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्याव्यात.
 • त्यानंतर लाल वस्त्र वहावीत. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदीची फुले व्हावीत.
 • यानंतर अगरबत्ती लावावी. आणि घंटा वाजवून अगरबत्तीने ओवाळावे.
 • त्याचप्रमाणे तुपाचे निरांजन लावून, घंटा वाजवून, तुपाचे निरांजनाने ओवाळावे. गणपतीसाठी तयार केलेला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर विडा, सुपारी सुटे, पैसे यावर पाणी वहावे.
 • गणपतीची मनोभावे आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावे.
 • मंत्रपुष्पांजली नंतर पूजेच्या अक्षता आणि फुले गणपतीला वहावीत.
 • विसर्जनापर्यंतच्या पूजेमध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी.
 • उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला फुले, अक्षता वाहून नमस्कार करून घ्यावा.
 • गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.
 • पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करावी.
 • त्यानंतर गणपतीवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहून गणपती जागेवरून थोडासा हलवायचा आहे.
 • गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य, त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे.
 • गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.

गणेश विसर्जनाची पद्धत

विसर्जनाच्या दिवशी सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करावी. दुपारी आरती ,नैवेद्य दाखवून त्यानंतर संध्याकाळी पुनः पूजा करून शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्यावा. विसर्जनास न्यायच्यावेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर ठेवावी. पाटावर ठेवताना आधी रंगोली काढावी. त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर स्वस्तिक काढावे. त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात आनंदाने नदीच्या काठावर,समुद्रावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा.

तेथे बाप्पाची पुन्हा आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. आणि बाप्पाला सांगावे, की या वर्षी येऊन तुम्ही ज्या प्रकारे आमच्या आयुष्यात आनंद दिलात, तशाच प्रकारे पुढच्या वर्षीही आमच्या घरी या आणि आमच्याकडून आपली सेवा घडवून आणा. पूजा अर्चा करताना झालेल्या चुकांबद्दल माफी मागावी. नंतर गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात मूर्ती पाण्यात विसर्जित करावी.

गणेशमूर्ती पाण्यात का विसर्जित केली जाते?

भगवान गणेशाच्या जन्मचक्राला सूचित करण्यासाठी हा विधी केला जातो. तो मातीपासून/पृथ्वीपासून निर्माण झालेला त्याचा प्रतीकात्मक पुतळाही आहे. त्यामुळे मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. जेणेकरून गणेश भक्तांच्या घरी किंवा मंदिरात ज्या ठिकाणी गणेश चतुर्थीचा विधी आयोजित केला जातो त्या ठिकाणी ‘मुक्काम’ केल्यानंतर गणेश आपल्या घरी परत जाईल.

गणेश विसर्जन चांगले की वाईट?

हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे.म्हणूनच संकटनाशक देव म्हणून ओळखला जाणारा गणेश, अडथळे दूर करणारा म्हणूनही पूजला जातो . गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्यावर घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबतच हे विघ्नही नष्ट होतात, असा समज आहे. म्हणून गणपती विसर्जन करणे चांगले समजले जाते.

गणेश विसर्जनाची धार्मिक मान्यता

सलग १० दिवस महाभारताचे लिखाण करताना श्री गणेशाच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. त्यांना आराम वाटू लागला. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते.

गणेश विसर्जनाची परंपरा

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आपल्याकडे गणेश विसर्जनाची परंपरा आहे. १० दिवसांच्या उत्सवाचा समारोपाचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशी ला ओळखले जाते. ‘विसर्जन’ या शब्दाचा अर्थ, या दिवशी गणपतीच्या मूर्तीला विसर्जित करणे होय. (‘विसर्जन’ म्हणजे विसर्जित ) नदी, समुद्र किंवा जलकुंभात केलेले विसर्जन. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, भक्त गणेश चतुर्थीची सुरुवात त्यांच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून करतात. शेवटच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या देवाच्या मूर्ती घेऊन मिरवणुकीत येतात आणि विसर्जन करतात.

अशाप्रकारे करा बाप्पाचे विसर्जन

 • गणपती बाप्पाच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर त्याचे पाणी इकडे-तिकडे टाकू नका, त्यावर कोणाचा पायही पडू देऊ नका. तुम्ही ते एका भांड्यात किंवा कोणत्याही पवित्र झाडाखाली किंवा शमी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता.
 • गणपती विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन मूर्तीसमोर उभे राहून फुले, दिवे, अगरबत्ती, मोदक, लाडू व इतर अन्नदान करून शेवटची पूजा करावी. आरती आणि मंत्रोच्चार केल्यानंतर प्रार्थना करून पूर्ण विधीपूर्वक गणपतीचे विसर्जन केले जाते.
 • बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी त्याची पूजा करा. त्याला त्याच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. आरती आणि हवनानंतर पूजेसाठी वापरलेल्या वस्तू एका पिशवीत काढून त्या निर्माल्यामध्ये टाकावे आणि गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करावे.
 • गणपती बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ व मोठ्या भांड्यात पाणी भरावे. या पाण्यात थोडे गंगेचे पाणी घाला. भांड्यात इतकं पाणी टाका की, त्यात बाप्पाची मूर्ती पूर्णपणे बुडेल.
 • यानंतर गणेशाची मूर्ती जयजयकार करत उचला आणि ज्या भांड्यात तुम्ही पाणी भरले आहे. त्यात हळूहळू त्यांची मूर्ती ठेवत जा. मूर्ती एकाच वेळी सोडू नका अन्यथा ती तुटू शकते.
 • घरातील ज्येष्ठ व्यक्ती गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने बाप्पाच्या मूर्ती मध्ये केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते.
 • दरम्यान घरच्या घरी मोठा टब, बादली, घंघाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये आवश्यक आणि स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळद-कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचे पाणी मिसळून ठेवा. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा.
 • गणेश विसर्जनानंतर पाटाची पुन्हा आरती करून नैवेद्य, प्रसादाचे वाटप करून श्रीगणेशाला अखेरचा निरोप द्या. बाप्पाला निरोप देताना दही-भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सोबत देण्याची प्रथा आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत लिहिण्याचे काम पूर्ण झाले तेव्हा गणेशाचे शरीर जड झाले होते. अजिबात हालचाल न केल्यामुळे त्याच्या अंगावर धूळ आणि माती साचली होती. त्यानंतर गणेशाने सरस्वती नदीत स्नान करून शरीर स्वच्छ केले. म्हणूनच 10 दिवस गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.असेही सांगितले जाते.

गणपतीच्या शरीरावर जमा झाली होती धूळ-माती

असे म्हटले जाते की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. सोबतच पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख आढळून येतो की, भाद्रपद चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले होते. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना करण्यासाठी गणपतीला लिहिण्याची विनंती केली होती.आणि गणपतीला सांगितले होते की, लिहिण्यास सुरूवात केल्यानंतर लेखन थांबले जाणार नाही. जर लेखन थांबले तर लिहिणे बंद करावे लागेल.

तसेच महर्षी वेदव्यास यांनी श्री गणेशाला सांगितले की, देवा तुम्ही सगळ्यात विद्वानांपेक्षा थोर आहात आणि मी एक सामान्य ऋषी आहे.जर श्लोकांमध्ये काही चूक झाली तर लिपिबद्ध करताना ती चूक सुधारुन घ्यावी. याच पद्धतीने पुढे महाभारताचे लिखाण सुरू झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महााभारताचे लेखन पूर्ण झाले, तेव्हा गणपतीचे शरीर जड झाले होते. अजिबात न हलल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती जमली होती. तेव्हा गणपतीने सरस्वती नदीमध्ये स्थान करत आपले शरीर साफ केले होते. म्हणूनच गणपतीची स्थापना १० दिवस केली जाते आणि त्यानंतर गणपतीचे विसर्जन होते.

गणेश विसर्जन कथा – Ganesh Visarjan Story In Marathi

पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. याशिवाय गणेश चतुर्थीच्या दिवशीच महाभारताचे लेखन कार्य सुरू झाल्याचेही सांगितले जाते. महर्षी वेद व्यास यांनी गणेशाला महाभारताच्या निर्मितीसाठी लिपी लिहिण्याची विनंती केली होती आणि गणेशाने ती विनंती स्वीकारून सांगितले होते की जर तो लिहू लागला तर तो लेखणी थांबवणार नाही.

लेखणी थांबली तर त्याचवेळी लिहिणे बंद होईल. तेव्हा महर्षी वेद व्यास म्हणाले की देवा तू विद्वानांमध्ये अग्रगण्य आहेस आणि मी एक सामान्य ऋषी आहे, माझ्या श्लोकात काही चूक झाली असेल तर तू ती सुधारून त्याप्रमाणे पुढे लिहून ठेव. अशाप्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि दहा दिवस अखंड चालले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महााभारताचे लेखन पूर्ण झाले, तेव्हा गणपतीचे शरीर जड झाले होते. अजिबात न हलल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती जमली होती. तेव्हा गणपतीने सरस्वती नदीमध्ये स्थान करत आपले शरीर साफ केले होते.

गणेशोत्सवाकडे आपण अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे १० दिवस आपल्याला शांत राहण्याची आणि मनातील द्वेष, अहंकार दूर करून आपले मन आणि आत्मा स्वच्छ करण्याची वेळ आहे. या दरम्यान, स्वतःचे निरीक्षण करताना, व्यक्तीने गणेशाच्या भक्तीकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे.

गणेश विसर्जन पूजा कशी करावी?

घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी २ दिवस काही ठिकाणी ५ दिवस तर काही ठिकाणी ७ दिवस गणपती पूजन केले जाते. रितीनुसार आणि प्रथेनुसार घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. त्यानुसारच गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशी या दिवशी केले जाते. या दिवशी विधीवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती, समाधान आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटांचा कालावधी लागतो. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणजेच त्यांचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे. पूजा करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळाला गंध लावून घ्यावे. आसनावर बसून पूर्व दिशेला तोंड करून पूजा सुरू करावी.

गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. एका कापडात सुपारी, दूर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्ती जवळ ठेवाव्यात आणि गणपतीची मनोभावे आरती करावी आणि मंत्रोच्चार करावा. गणेशोत्सव काळात आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल गणपती बाप्पा कडे क्षमायाचना करावी, आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करावी. पूजासाहित्य अन्य वस्तूही विसर्जित कराव्यात.

मनात गणपतीचे ध्यान करावे. या प्रकारे गणपतीची प्रार्थना झाल्यावर मूर्तीला उत्तरपूजेच्या अक्षता अर्पण कराव्यात. सिंहासनावरून मूर्ती थोडी हलवावी. आणि उचलून समुद्रात किंवा ज्या ठिकाणी जलाशय असेल त्या ठिकाणी त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी. गणपती विसर्जन तुम्ही घरी सुद्धा करू शकतात.

गणेश विसर्जन मंत्र – Ganesh Visarjan Mantra

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।

इष्टकामसमृद्धयर्थं पुनरपि पुनरागमनाय च॥

या मंत्राचा मनोभाव जप केल्यास गणपती बाप्पा सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील. त्यामुळे घरात सुख, शांती समाधान टिकून राहील.

गणपती बाप्पाची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ||
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ||
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ||
चंदनाची उटी कुमकुम केशरा ||
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ||
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ||
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना ||
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

आमचे हे लेख सुद्धा नक्की वाचा 👇

प्रश्न

गणेश विसर्जन २०२३ मध्ये कधी आहे?

गणेश विसर्जन २०२३ मध्ये पाचव्या दिवसांचे २३ सप्टेंबर शनिवार यादिवशी आणि दहाव्या दिवसांचे अनंत चतुर्दशी म्हणजेच २८ सप्टेंबर गुरुवार यादिवशी आहे.

गणेश विसर्जन करणे चांगले असते का?

गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्यावर घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबतच हे विघ्नही नष्ट होतात, असा समज आहे. म्हणून गणपती विसर्जन करणे चांगले समजले जाते.

गणेश विसर्जन मंत्र कोणता आहे?

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
या मंत्राचा मनोभाव जप केल्यास गणपती बाप्पा सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील. त्यामुळे घरात सुख,शांती समाधान टिकून राहील.

गणेश विसर्जन का केले जाते?

गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्यावर घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबतच हे अडथळे नष्ट होतात, असा समज आहे. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीचा उत्सव जन्म, जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे महत्त्व देखील दर्शवतो .

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे गणेश विसर्जन या सणाबद्दल कथा, पूजा विधि, गणेश विसर्जन का केले जाते? याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

Leave a comment