गणपतीच्या पूजेतील 21 पत्री | 21 Leaves for Ganesh Puja

गणपतीच्या पूजेतील 21 पत्री – हिंदू धर्मात, हिंदू देवी-देवतांची पूजा करताना पूजेमध्ये फुलांना आणि पानांना अत्यंत महत्त्व दिले जाते. सर्व देवी-देवतांची स्वतःची आवडती फुले आणि पानांची यादी आहे. भक्तगण देवी-देवतांची पूजा करताना देवतेला आवडणारी फुले व पानेच निवडतात. काही देवतांसाठी काही फुले आणि पाने निषिद्ध असल्यामुळे अशी पाने – फुले त्यांना अर्पण करू नये.

गणेशोत्सवात गणेशपूजेच्या वेळी गणपतीला २१ पत्री (पाने) अर्पण करण्याचा विधी आहे . भारतात हा पावसाळी ऋतु असतो त्यामुळे सर्वत्र हिरवळ असते. गणेश पत्री मध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक वनस्पती आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या आहेत आणि त्यापैकी काही दुर्मिळ आहेत. पूर्वी कुटुंबातील सर्व स्त्रिया अंगणातील बागा, आजूबाजूचा परिसर, शेतजमिनी, नदीकाठची झाडे इत्यादींमधून ही पाने गोळा करत असत.

गणपतीच्या पूजेतील 21 पत्री 21 Leaves for Ganesh Puja

Table of Contents

गणपतीच्या पूजेतील 21 पत्री | 21 Leaves for Ganesh Puja

तुळस काटे रिंगणीगोकर्ण
धोत्राबेलडाळिंब
आघाडाकणेरीअर्जुन वृक्ष
बोरमारवाकांचन
केवडादेवदारदूर्वा
जाईमाकाशमी
रुईपिंपळहादगा
मधुमालतीघेवडातमालपत्र

हिंदू धर्मग्रंथांमध्ये भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवातील प्रथम पूजेमध्ये विविध प्रकारची फुले आणि 21 प्रकारची पाने (पत्री) वापरुन गणेश पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या पूजेसाठी वापरली जणारी पत्री ही आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी असून अश्या प्रकारच्या पूजेला पत्री-पूजा असे म्हटले जाते.

आजच्या या लेखातून आपण ही 21 प्रकारची पत्री कोणती आहे आणि त्यांचे धर्मशास्त्र तसेच आयुर्वेदिक महत्व काय आहे, ते जाणून घेऊ.

1. तुळशी, तुळस – Tulasi Patra

तुळस
तुळस

शास्त्रीय नाव – Ocimum tenuiflorum
इंग्रजी नाव – Basil, Holy Basil
हिन्दी नाव – तुलसी
संस्कृत नाव – तुलसी
तेलगू नाव – Tulasi
मराठी नाव – तुळशी, तुळस

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. आयुर्वेदातही तुळशीला, तुळशीच्या पानांना आणि तुळशीच्या बियांना महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तुळशीमध्ये दाहक-विरोधी आणि कफ पाडणारे गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते.

गणेश पुराणातील एका आख्यायिकेनुसार तुळशी आणि भगवान गणेश एकमेकांना शाप देतात या कथेप्रमाणे, गणपतीला तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. तथापि, गणेश चतुर्थी पूजेदरम्यान तुळशीची पाने भगवान गणेशाला अर्पण केली जातात, ज्याला विनायक चतुर्थी पूजा देखील म्हणतात.

2. धोत्रा – Datura Patra, Dhatura Patra

धोत्रा
धोत्रा

शास्त्रीय नाव – Datura metel
इंग्रजी नाव – Thorn Apple, Downy Thorn Apple
हिन्दी नाव – धतूरा
संस्कृत नाव – धत्तूर
तेलगू नाव – Ummetta
मराठी नाव – धोत्रा

धोत्रा ही एक रानटी वनस्पती आहे. गणेश चतुर्थीला गणपतीला अनेकविध पत्री वाहून स्थापना करण्याचा प्रघात आहे. त्या २१ पत्रीत धोत्र्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलाला मोठाच मान आहे. धोत्रा ही वनस्पती विष वर्गातील आहे. या वनस्पतीमुळे प्रारंभी मद उत्पन्न होतो, त्यानंतर कैफ येतो. धोतऱ्याच्या फळाचा रस केसांसाठी उपयोगी असतो. या रसातील विशेष गुणांचा फायदा झाल्याने टक्कल पडण्याची समस्या बऱ्याच अंशी दूर होते. कानाचं दुखणं, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.

आमचे गणेश चतुर्थी 2023 स्पेशल लेख नक्की वाचा 👇

3. आघाडा – Apamarga Patra

अघाडा
अघाडा

शास्त्रीय नाव – Achyranthes aspera
इंग्रजी नाव – Prickly Chaff Flower
हिन्दी नाव – अपामार्ग
संस्कृत नाव – अपामार्ग, अपामार्गसस्यम्, खरमञ्जरी
तेलगू नाव – Uttareni
मराठी नाव – आघाडा

हरतालिका, गणेशचतुर्थी, ऋषिपंचमी आणि ज्येष्ठागौरीच्या पूजेत आघाड्याचा आवर्जून समावेश केलेला आहे. आषाढ-श्रावणात आघाडा वाढायला सुरुवात होते. श्रावणात जिवतीला आघाडा-दूर्वांची माळ वाहतात. भाद्रपदात आघाड्याची वाढ पूर्ण होते. आयुर्वेदानुसार – दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.

4. डोरली (काटे रिंगणी) – Bhatakataiya Patra

डोरली
डोरली

शास्त्रीय नाव – Solanum virginianum
इंग्रजी नाव – Yellow Berried Nightshade
हिन्दी नाव – भटकटैया, कण्टकारी
संस्कृत नाव – अग्निदमनी, अनाक्रान्ता
तेलगू नाव – Gurrapu Gattaku
मराठी नाव – डोरली

काटे रिंगणी नैसर्गिक अवस्थेत भारतभर आढळते. ही वनस्पती जमिनीबरोबर पसरते. हिच्या सर्व अंगास काटे असतात.छोटी गोल फळे येतात.यामध्ये निळ्या फुलांची, पिवळ्या फुलांची व पांढरी फुलांची अशी तीन प्रकारची रिंगणी आढळते. रिंगणी कटु, तिखट, उष्ण, ज्वरघ्न, कफघ्न, स्वेदजनन, पीनसरोग नाशक, आहे. काटे रिंगणी दशमूळांतील एक महत्वाची वनस्पती मानली जाते.

दाढ किडल्यास, ज्वरावर, मुत्राघातावर, खोकल्यावर, दम्यामध्ये, श्वासनलिकेची सूज, फुफ्फूसाची सूज, श्वसनाचे विकार सर्दी, पडसे, खोकला, दमा, स्वरभंग, जीर्णज्वर अशा विकारांवर काटे रिंगणी फार उपयोगी ठरते.

5. शमी – Shami Patra

शमी
शमी

शास्त्रीय नाव – Prosopis cineraria
इंग्रजी नाव – Shami, Khejri Tree
हिन्दी नाव – खेजड़ी, शमी
संस्कृत नाव – केशदमनी, शङ्कुफला, पापशमनी
तेलगू नाव – Jammi
मराठी नाव – शमी

शमी हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळणरा एक महत्त्वपूर्ण धार्मीक आणी औषधी महत्व असलेला वृक्ष आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतो. भारतामध्ये शमीची एक वेगळी ओळख आहे. घरात शमी वनस्पती लावणे खूप शुभ मानले जाते. शमीच्या कोवळया शेंगाची भाजी करतात, शमीच्या झाडावर वाळलेल्या शेंगा या बिस्कीटाप्रमाणे चविच्या गोड असतात. औषधी म्हणून दमा,कोड,व मनोविकारा मध्ये सालीची पूड,काढा गुणकारी असल्याचे ऐकण्यात आहे .वैद्य ह्या बाबतीत योग्य ती माहिती देऊ शकतील.

6. माका – Bhringraj Patra

माका
माका

शास्त्रीय नाव – Eclipta prostrata
इंग्रजी नाव – False Daisy, Bhringraj
हिन्दी नाव – भंगौरिया, भृंगराज, भंगरैया
संस्कृत नाव – भृङ्गराज
तेलगू नाव – Guntakalagara
मराठी नाव – माका

दिवसकार्य, हरतालिका, गणेशचतुर्थी, ऋषिपंचमी आणि ज्येष्ठागौरीच्या पूजेत माक्याचा आवर्जून समावेश केलेला आहे. माक्यास रसायन मानतात. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते.

मूळव्याधीवर माक्याचा रस देतात. तिळेलात व खोबरेलात माक्याचा पाला (किंवा रस) उकळून केसांच्या वाढीकरिता व त्यांना काळेपणा आणण्यास वापरतात. माका उष्ण, कडू, रुक्ष व वेदनाशामक असून दातदुखीवर हिरड्यांना चोळतात व डोकेदुखीवर डोक्यास चोळतात. भाजल्यावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लावल्यास आग कमी होते व डाग राहत नाही.

7. गोकर्ण – Asian pigeonwings

गोकर्णी
गोकर्णी

शास्त्रीय नाव – Clitoria ternitea
इंग्रजी नाव – Butterfly pea, Blue pea, Asian pigeonwings
हिन्दी नाव – कृष्णकांता
संस्कृत नाव – अपराजिता
तेलगू नाव – Shankupushpam
मराठी नाव – गोकर्णी

धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख-शांतीचे वातावरण राहते. हे वनस्पती शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते, भाजलेल्या बियांचे चूर्ण खवखवणारा घसा आणि त्वचेच्या रोगांवर उपयुक्त असते. फुले पूजेसाठी वापरतात.

8. डाळिंब – Pomegranate Tree

डाळिंब
डाळिंब

शास्त्रीय नाव – Punica granatum
इंग्रजी नाव – Pomegranate Tree
हिन्दी नाव – अनार
संस्कृत नाव – दाडिम्बः दालिम
तेलगू नाव – Danimma
मराठी नाव – डाळिंब

डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते

डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात येतो . हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात.

9. जाई – Spanish jasmin

जाई
जाई

शास्त्रीय नाव – Jasminum grandiflorum L
इंग्रजी नाव – Spanish jasmin
हिन्दी नाव – चंबाली
संस्कृत नाव – जातिका, चंबेली
तेलगू नाव – Gandharaj
मराठी नाव – जाई

जाई हे संयुक्तपर्णी वनस्पती असून पाच ते सात कर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान तयार होते. जाईची फुले पांढरी शुभ्र रंगाचे असून,नाजूक असतात. जाईच्या फुलाच्या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात व खालच्या बाजूस निळसर फिकट रंगाच्या असतात. अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे. जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.

10. पिंपळ – sacred fig

पिंपळ
पिंपळ

शास्त्रीय नाव – Ficus religiosa
इंग्रजी नाव – sacred fig
हिन्दी नाव – पिपल
संस्कृत नाव – अश्वत्थ वृक्ष
तेलगू नाव – Raavi chettu
मराठी नाव – पिंपळ बोधिवृक्ष

पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. याला ‘बोधीवृक्ष’ सुद्धा म्हणतात. या झाडामध्ये देवी-देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. तसेच शनि दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे.
पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या झाडाचा उपयोग विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. या झाडाची पाने, साल, देठ, बिया, फळे यांचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो. पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.

11. मधुमालती – Rangoon Creeper

मधुमालती
मधुमालती

शास्त्रीय नाव – Combretum indicum
इंग्रजी नाव – Rangoon Creeper
हिन्दी नाव – मधुमालती
संस्कृत नाव – अतिमुत्तलता 
तेलगू नाव – माधव
मराठी नाव – मधुमालती

मधुमालती भाद्रपदातील श्री गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेतील पत्रीपूजनात या वनस्पतीची पाने गणपती बाप्पाला वाहिली जातात. ही पाने हगवणीवरही औषधी आहेत. फुले एकदा उमलली की साधारण २ ते ३ दिवस राहतात. मधुमालतीला वर्षभर फुले येत असली तरी उन्हाळ्यात हिला विशेष बहर येतो.

भारतामध्ये ओलसर जागेवर सर्वत्र आढळणार्‍या या वनस्पतीचा उल्लेख अष्टांगसंग्रह, सुभूतसंहिता, राजनिघंटु, तसेच संस्कृत साहित्यातील शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, विक्तोमोर्वशीय इ. ग्रंथसंपदेमध्ये आढळतो. हिंदीमध्ये “माधवीलता”, संस्कृतमध्ये “माधवी” किंवा”अतिमुत्तलता” या नावाने ओळखली जाणारी ही हळदवेल “मालपीगीएसी” या कुळातील आहे.

12. रुई – Arka Patra

रुई
रुई

शास्त्रीय नाव – Calotropis procera
इंग्रजी नाव – Sodom Apple, Dead Sea Apple
हिन्दी नाव – आक, मुदर
संस्कृत नाव – अर्क
तेलगू नाव – Jilledu
मराठी नाव – रुई, अर्की

तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे. ज्या घरामध्ये रुईचे झाड असते तेथे कायम सुख-समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुईच्या पानांची पत्रावळ गाईचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला / पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात. रुईचे औषधी महात्म्य हे भरपूर आहे. आम्ही यांचा खूप वापर करतो. परंतु रुईचे पान, फुले, मुळे यांचा वापर हा वैद्याने करावा. कोणीही तो स्वतःहून करू नये कारण रुई ही उष्ण, तीक्ष्ण अशी आहे, याची एलर्जी होण्याची शक्यता असते

13. हादगा – Agastya Patra

अगस्ती
अगस्ती

शास्त्रीय नाव – Sesbania grandiflora
इंग्रजी नाव – Hummingbird Tree, Agati
हिन्दी नाव – अगस्त्य, हतिया, अगस्ता
संस्कृत नाव – अगस्त्य
तेलगू नाव – Avisa
मराठी नाव – हादगा, अगस्ती, अगस्ता

ही झाडे देवळांजवळ लावली जातात. तसेच शेताच्या बांधावर यांची लागवड केली जाते. या झाडाला पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची फुले येतात. ही फुले देवाला वाहतात. फुलांची भाजी करतात. या झाडाच्या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो. झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून, तर झाडाचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी उपयोगास येते. आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठीही यांचा उपयोग होतो. हादग्याच्या पानाची व फुलाची भाजी करतात. हादग्याची फुले पांढऱ्या रंगाची असतात.ही वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते. हे झाड मध्यम उंचीचे असते.

14. कणेरी – Kaner Patra

कणेरी
कणेरी

शास्त्रीय नाव – Nerium indicum
इंग्रजी नाव – Indian Oleander, Oleander
हिन्दी नाव – कनेर
संस्कृत नाव – करवीर
तेलगू नाव – Ganneru
मराठी नाव – कणेर, कणेरी

सुवासिक व लाल, गुलाबी किंवा पांढऱ्या आकर्षक फुलांमुळे शोभेकरिता हे बागेमध्ये किंवा कुंपणाच्या कडेने सामान्यपणे लावतात. याच्या सर्व भागांत दुधी चीक असतो.
कण्हेरीचे सर्व भाग विषारी असून मुळे, साल व बियांमध्ये अनेक ग्लायकोसाइडे असतात; त्यांची क्रिया हृदयावर डिजिटॅलिनासारखी होते. सालीत थोडे टॅनीन व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. पानांमध्ये ओलिअँड्रिन हे हृदय-बलवर्धक द्रव्य असते.

15. बेल – Bael Patra, Bilva, Bel Patra

बेलपत्र
बेलपत्र

शास्त्रीय नाव – Aegle marmelos
इंग्रजी नाव – Bengal Quince, Stone Apple
हिन्दी नाव – बेल
संस्कृत नाव – बिल्व
तेलगू नाव – Vilvam
मराठी नाव – बेलपत्र

बेल हे वृक्ष हिंदू धर्मीय भारतीयांच्या मनात उमटलेले आहे. बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले. हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे.
बेलाचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात. भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिलेली आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्रशर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे.

16. दूर्वा – Durva Patra

दूर्वा
दूर्वा

शास्त्रीय नाव – Cynodon dactylon
इंग्रजी नाव – Bahama Grass, Couch Grass
हिन्दी नाव – दूर्वा, दूब
संस्कृत नाव – दूर्वा
तेलगू नाव – Arugampul, Garika
मराठी नाव – दूर्वा

हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात, कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते. दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.
दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे. उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो. त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो. मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो. रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.

17. अर्जुन वृक्ष – Arjuna Patra

अर्जुन वृक्ष
अर्जुन वृक्ष

शास्त्रीय नाव – Terminalia arjuna
इंग्रजी नाव – White Marudah
हिन्दी नाव – अर्जुन वृक्ष, कौहा, कोह
संस्कृत नाव – अर्जुनवृक्षः, अर्जुन
तेलगू नाव – Tella Maddi, Yerra Maddi
मराठी नाव – अर्जुन वृक्ष

अर्जुनाचे झाड हे भारतात मोठ्या प्रमाणावर दिसणारे झाड आहे. यात अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल सारखे विविध औषधी गुणधर्म आहेत. या झाडाची साल म्हणजे त्वचेचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याला अर्जुन झाडाची साल म्हणतात.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रचंड मोठया अर्जुन वृक्षाखाली आहे. म्हणून ते नागार्जुन, तामिळनाडू येथील देवराईत एक भव्य अर्जुन वृक्ष असून त्याच्या खोडाचा घेर ३० फुट आहे. हा वृक्ष सुरुवातीच्या काळात फार हळू वाढतो. सुरुवातीला त्याला पाण्याचे दुर्भिक्ष चालत नाही.

18. देवदार – Devdar Patra

देवदार
देवदार

शास्त्रीय नाव – Cedrus deodara
इंग्रजी नाव – Deodar Cedar, Himalayan Cedar
हिन्दी नाव – देवदार
संस्कृत नाव – देवदारु
तेलगू नाव – Devadaru
मराठी नाव – देवदार

देवदार ज्याला देवाचे लाकूड म्हणून सुद्धा ओळखले जाते, त्याच्या भरपूर औषधी, धार्मिक आणि व्यावसायिक उपयोगांसाठी बहुमोल आहे.प्राचीन काळी, देवदार जंगले हिंदू भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी ऋषीमुनींनी ध्यान साधना करण्यासाठी पवित्र मानले जात होते. वैदिक काळात, देवदार जंगलातील सुगंधी लाकूड विविध मंदिरे बांधण्यासाठी आणि धूप बनवण्यासाठी वापरला जात असे. प्राचीन काळी, असेही मानले जात होते की देवदाराच्या सावलीत बसल्याने दमा आणि इतर अनेक रोग बरे होण्यास मदत होते.

19. मारवा – Marua Patra

 मरवा
मारवा

शास्त्रीय नाव – Origanum majorana
इंग्रजी नाव – Marjoram
हिन्दी नाव – मरुआ
संस्कृत नाव – सुरभिपत्त्र
तेलगू नाव – Maruvam
मराठी नाव – मारवा

मारवा ही एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. बी पासून किंवा कटिंग पासून तिची अभिवृद्धी करता येते. मरव्याच्या पानांपासून, फुलोऱ्यापासून सुगंधी तेल मिळते.
मरवा वनस्पतीची लागवड तिच्यापासून मिळणाऱ्या सुगंधी तेलासाठी केली जाते. पानांच्या आणि फुलांच्या ऊर्ध्वपातनाने तेल मिळवितात. तेल रंगहीन किंवा पिवळसर रंगाचे असते. तेलात अनेक रासायनिक संयुगे असून त्यांपैकी बोर्निऑल, पाइनीन व कापूर ही महत्त्वाची संयुगे असतात. या सुगंधी तेलाचा उपयोग साबण, अत्तर व मद्य यांमध्ये करतात. तसेच मसाल्याचे पदार्थ, भाजी व शिर्का यांमध्ये तिची पाने सुगंधाकरिता वापरतात. मरवा वनस्पती वायुनाशी असून कफ घालविणारी आहे.

20. कांचन – Gandari Patra

कांचन
कांचन

शास्त्रीय नाव – Phanera variegata
इंग्रजी नाव – Kachnar, Orchid Tree
हिन्दी नाव – गण्डारि पत्र, कचनार
संस्कृत नाव – आस्फोत, देवकाञ्चन
तेलगू नाव – Devakanchanamu
मराठी नाव – कांचन

आयुर्वेदात पुरातन औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाणारे कांचन मुख्यत: भारतात आसाम, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. उंच आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीमध्ये कांचन वृक्ष सहज रुजतात आणि वर्षभरात बहरतात. कांचनाच्या फुलांचा देठ अतिशय लहान असतो. फुलातील चार पाकळ्या फिकट तर पाचवी पाकळी गडद रंगाची असते.

आयुर्वेदात याच्यापासून गुग्गुळ बनवले जाते .याचा उपयोग वमन क्रियेसाठी होतो.पचनासंदर्भात औषधे बनवताना याचा उपयोग केला जातो. आतड्याच्या वर्धक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो . काविळीसाठीच्या औषधात याच्या सालीचा वापर केला जातो . कोकणात आणि गोव्याकडे याच्या कोवळ्या फ़ांद्या, पानं, फ़ुलं नी चक्क शेंगांचीपण भाजी करतात जी चवीला मस्त लागते. या झाडाच्या वाळलेया फ़ांद्यांचा उपयोग उत्तम सरपण म्हणुन होतो. आणि लाकूड तर उत्तम कठिण नी टिकावु म्हणुनच प्रसिद्ध आहे.

21. केवडा – Ketaki Patra

केवडा
केवडा

शास्त्रीय नाव – Pandanus utilis
इंग्रजी नाव – Pandanus, Pandan, Screw Pine
हिन्दी नाव – केतकी
संस्कृत नाव – हनील, जम्बुल
तेलगू नाव – Gedaga
मराठी नाव – केगद, केवडा

केवड्याच्या पानांचा उपयोग झोपड्यांची छपरे, चटया, दोर, मॅनिला हॅट, टोपल्या व पिशव्यांसाठी करतात. पाने स्तंभक (आंकुचन करणारी), उग्र व सुवासिक असून अर्बुद, कुष्ठरोग, देवी, उपदंश, खरूज, कोड इत्यादींवर गुणकारी असतात. तेल स्तंभक, उत्तेजक व जंतुनाशक असून डोकेदुखीवर व संधिवातावर उपयुक्त असते. याचा उपयोग अत्तर, लोशन, तंबाखू, अगरबत्ती इत्यादी वस्तूंमध्ये सुगंधासाठी करण्यात येतो. तसंच केवड्यापासून पत्त्यांची चटई, टोप, पातेली इत्यादी गोष्टीही बनवण्यात येतात. केवडा प्रत्येक स्वरूपात उपयुक्त असतो. केवडा हा अनेक आजारांवरही फायदेशीर आहे.

गणेश चतुर्थी 2023 साठी या पत्रीच वापरतात का ?

यातील सर्वच पत्री कधीकधी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे, भारतातील काही भागांत खाली दिलेल्या पत्री सुद्धा वापरल्या जातात.

22. बोर – Ber Patra, Ber Patra

बोर
बोर

शास्त्रीय नाव – Ziziphus mauritiana, Ziziphus jujuba
इंग्रजी नाव – Indian Date, Jujube
हिन्दी नाव – बेर
संस्कृत नाव – बदर
तेलगू नाव – Regu
मराठी नाव – बोर

बोर वंशातील सुमारे १७ जाती जंगली अवस्थेत भारतात आढळून येतात व काही नव्या जातींची आयात केली गेली आहे. यापैकी पुष्कळ जातींची मांसल आठळीयुक्त फळे खाद्य आहेत व ती बोर या सर्वसामान्य नावाने ओळखली जातात. बोर हे चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्‍तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.

23. घेवडा – Dolichos Bean

घेवडा
घेवडा

शास्त्रीय नाव – Phaseolus vulgaris
इंग्रजी नाव – Bonavista Bean, Dolichos Bean
हिन्दी नाव – सेम
संस्कृत नाव – शिम्बी, अङ्गुलिफला, शिम्बा
तेलगू नाव – Chikkudu
मराठी नाव – घेवडा

ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास ‘श्रावणघेवडा’ म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिन्स, इंग्रजीत फ्रेंच बीन्स म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात.या बियांमध्ये तंतुमय पदार्थ आणि मेदमुक्त उच्च दर्जाची प्रथिने असतात. मूळची न्यू गिनीतील ही वनस्पती फिलिपीन्स, इंडोनेशिया, भारत, म्यानमार, थायलंड, श्रीलंका इत्यादी देशांत लागवडीखाली आहे.

24. तमालपत्र – Tej Patra

तमालपत्र
तमालपत्र

शास्त्रीय नाव – Cinnamomum tamala
इंग्रजी नाव – Indian Bay Leaf, Tejpatta
हिन्दी नाव – तेज पात, तेजपत्ता
संस्कृत नाव – तमालक
तेलगू नाव – Talisapatri
मराठी नाव – तमालपत्र

प्रचंड आणि असंख्य गुणधर्मांनी भरलेली अशीच एक वनस्पती म्हणजे तमालपत्र. ही हलकी हिरवी पाने स्वयंपाकासाठी वापरली जातात. ही पाने जेवणाची चव तर वाढवतातच पण त्यातील पोषक तत्त्वे वाढवण्याचेही काम करतात. सालीची पूड मज्जाविकार व हृदयविकार यांवर उपयुक्त असते. पाने उत्तेजक व कृमिनाशक म्हणून ओळखली जातात. काश्मीरमध्ये तमालची हिरवी पाने नागवेलीच्या पानांप्रमाणे खाल्ली जातात. पुलाव, बिर्याणी यांसारख्या अन्नपदार्थांना चव आणि गंध येण्यासाठी तमालपत्रे वापरतात.

गणेश चतुर्थी बद्दल विचारले जाणारे प्रश्न

गणपतीला कोणते पान अर्पण केले जाते?

गणेशोत्सवाच्या दिवसात देवाला शमीची पाने आणि दूर्वा अर्पण केल्या जातात. ही पत्री अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, सर्व त्रास नष्ट होतात आणि मानसिक शांती मिळते, असे मानले जाते. 
महाभारत काळात पांडव वनवासात होते. तेव्हा पांडवांनी शमीच्या झाडातच शस्त्रे लपवून ठेवली होती. त्यामुळे या झाडाला धार्मिक महत्त्व आहे

गणपतीला तुळशीची पाने का अर्पण केली जात नाहीत?

तुलसीने लग्नाच्या इच्छेने श्री गणेशाचे लक्ष विचलित केले. तेव्हा भगवान श्री गणेशाने तुळशीची तपश्चर्या मोडणे अशुभ मानले आणि तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर त्याने स्वतःला ब्रह्मचारी म्हणवून तुळशीचा विवाह प्रस्ताव नाकारला. 
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यावर तुलसी रागावली आणि त्यांनी गणेशजींना एक नाही तर दोन लग्न करणार असा शाप दिला.
परंतु गणेश चतुर्थी पूजेदरम्यान तुळशीची पाने भगवान गणेशाला अर्पण केली जातात, ज्याला विनायक चतुर्थी पूजा देखील म्हणतात.

पत्री म्हणजे काय?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवातील प्रथम पूजेमध्ये विविध प्रकारची फुले आणि 21 प्रकारची पाने (पत्री) वापरुन गणेश पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या पूजेसाठी वापरली जणारी पत्री ही आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी असून अश्या प्रकारच्या पूजेला पत्री-पूजा असे म्हटले जाते.

21 पत्री न मिळाल्यास काय करावे ?

भाद्रपदातील गणेश चतुर्थी पूजेसाठी जर शास्त्रातील 21 पत्रीपैकी काही पत्री उपलब्ध झाल्या नसतील तर आपण गणेश पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांची पणे वापरू शकतो.

गणेश पत्री (गणेश पूजा) निष्कर्ष

मित्रहो, आम्ही या लेखद्वारे भाद्रपदातील गणेश चतुर्थी पूजेसाठी गणपतीच्या पूजेतील 21 पत्री कोणत्या आहेत आणि त्यांचे महत्व काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ही माहिती आवडली असल्यास हा लेख नक्की शेयर करा. धन्यवाद.

2 thoughts on “गणपतीच्या पूजेतील 21 पत्री | 21 Leaves for Ganesh Puja”

    • नमस्कार,
      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद.
      आपण यातील कोणत्या वनस्पतीची माहिती अथवा चित्र चुकीचे अथवा misguiding आहे ते आमच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यात दुरुस्ती करता येईल.
      आम्ही माहिती देताना आमच्या परीने चुकरहीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही आपण योग्य मार्ग दर्शन केल्यास चांगलेच. धन्यवाद

      Reply

Leave a comment