आंबोली घाट माहिती मराठी : AMBOLI GHAT INFORMATION IN MARATHI – amboli hill station is the crown of heavenly konkan. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत, समुद्रसपाटी पासून अंदाजे ६९० मीटर उंचीवर असलेला आंबोली घाट निसर्गसृष्टीने व तिकडच्या थंड हवामानामुळे पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. इथले दाट जंगल, अप्रतिम सृष्टीसौंदर्य, दुर्मिळ वन्यजीवन, जैवविविधता, डोंगर, दऱ्या इत्यादीमुळे या गावाला पर्यटन दृष्ट्या ओळख मिळाली आहे.
आंबोली घाट माहिती मराठी : AMBOLI GHAT INFORMATION IN MARATHI
लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे जशी पुणे आणि मुंबईतील पर्यटकांसाठी लोकप्रिय आहेत तसेच आंबोली हे देखील ठिकाण गोवा आणि बेळगाव मधील पर्यटकांसाठी पावसाळ्यातील पर्यटनासाठी आवडते ठिकाण आहे. हा घाट पुणे शहरा पासून ३४० किलोमीटर तर मुंबईपासून ४८० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
कोकणचे प्रती चेरापुंजी – आंबोली घाट
महाराष्ट्रातले प्रत्येक पर्यटनस्थळ हे त्याच्या भौगोलिक सौंदर्यामुळे नेहमीच खुलून दिसते. पण या पर्यटनस्थळांच्या यादीत ज्या वेळी आंबोलीचे नाव उच्चारलं जाते आणि देहाची अवस्था ही शब्दातीत होते. इथल्या धबधब्यासमोर स्वतःला सावरायचे की हिरण्यकेशीच्या डोहात स्वतःला उमलायचे हा फक्त शब्दांचा खेळ नाहीय, तो जगण्याचा कस्तुरीमोह.. प्रत्येक वेळी पावसात, थंड गार गारव्यात, किंवा तळपत्या उन्हाला थंड वाऱ्यात लपेटून ही तुम्हाला हसवत राहते!
आंबोली घाट म्हटलं की समोर येतं ते दाट धुकं, उंचच उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे आणि धो धो कोसळणारा पाऊस. या तिन्हीचं मिलन बघायचं असेल, तर या सारखं ठिकाण नाही. आंबोलीला प्रतीचेरापुंजी म्हणूनही ओळखलं जातं. बघा चेरापुंजीला वर्षाकाठी पाचशे इंच पाऊस पडतो तर इथे केवळ चार महिन्यात ४०० इंच पाऊस कोसळतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला इथला पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पडत असतो, आणि त्यामुळेच बाराही महिने, इथला निसर्ग हिरवा शालू नेसलेला असतो.
इकडचे धबधबे, हिरण्यकेशी नदी व त्या नदीच्या बाजूला असणारे हिरण्यकेशी मातीचे मंदिर, नांगरतास धबधबा, महादेव गड, मनोहर गड इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. चला तर मग, आपण जाणून घेऊया आंबोली घाट माहिती.
आंबोली घाट भौगोलिक माहिती
गाव – | आंबोली घाट |
तालुका – | सावंतवाडी |
जिल्हा – | सिंधुदुर्ग |
राज्य – | महाराष्ट्र |
पर्यटन स्थळ – | हिल स्टेशन |
डोंगर रांग – | सह्याद्री |
आंबोली घाट नकाशा (AMBOLI HILL STATION MAP)
आंबोली मधील पाहवायची १४ मुख्य आकर्षणे – 14 PLACES TO VISIT IN AMBOLI GHAT
१. आंबोली धबधबा (MAIN WATERFALL OF AMBOLI GHAT)
आंबोली धबधबा – वर्षा पर्यटनाचा श्वास असलेल्या मुख्य धबधब्याने आंबोलीला खऱ्या अर्थाने पर्यटन दृष्ट्या जगात नावारूपाला आणलं, या धबधब्याला आंबोली धबधबा असेही म्हणतात. या धबधब्यामधून ओढ्यांचे पाणी उंच कड्यावरून कोसळते आणि मग त्याचे रूपांतर होतं त्या एका विलोभनीय, अविश्वसनीय आणि डोळ्याला सुखद अनुभव देणाऱ्या या धबधब्यांमध्ये. या धबधब्यावर पावसाळ्याचे चारही महिने पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या धबधब्याकडे पर्यटकांचा नेहमीच ओढा राहिलेला असतो.
असे आणखीनही धबधबे आपल्याला संपूर्ण घाट रस्त्यावर बघायला मिळतात आणि त्याही धबधब्यांवरती पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
२. नांगरतास धबधबा (NANGARTAS WATERFALL)
घाटाच्या मध्यभागी असलेला नांगरतास धबधबा – दुसरा आंबोली धबधबा हे इथले आकर्षणाचे आणखी एक कारण आहे. शांत आणि निर्जन ठिकाणी शहरी जीवनाच्या गजबजाटातून दूर येऊन जर तुम्हाला निसर्गाची साद ऐकायची असेल तर तुम्ही या धबधब्याला नक्की भेट द्या. तुमचा थकवा दूर करून तुम्हाला पुनः ताजेतवाने बनविण्याची ताकद खरोखरच इथे आहे.
पाण्याचा घनगंभीर आवाज आणि हवेतील थंड वाऱ्याची झुळूक तुमच्या मनाला शांत करेल आणि तुम्ही जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर या जागेच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तासनतास घालवू शकता.
३. बाबा धबधबा आंबोली धबधबा २ (BABA WATERFALL OF AMBOLI GHAT)
आंबोली धबधबा माहिती मराठी – चौकुळ गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभवडे गावातील बाबा धबधबा एका गुहेच्या प्रवेशद्वारावरती कोसळतो आणि या गुहेत उभे राहिल्यानंतर आपल्याला समोर दिसतं ते तळकोकण. धबधब्याच्या जलधारांमधून आपण हे तळकोकण आनंदाने न्याहाळू शकतो. या धबधब्याच्या आजूबाजूलाही काही छोटे मोठे धबधबे आहेत आणि त्या धबधब्यांवरती सुद्धा आपण मनसोक्त फिरण्याचा आनंद घेऊ शकतो.
४. कावळेशेत पॉइंट (KAWALESHET POINT)
इथल्या मुख्य धबधब्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेला कावळेशेत पॉइंट म्हणजे अतिशय खोल दरी असलेलं आणि रिव्हर्स वॉटरफॉल असलेलं एक पर्यटन स्थळ. या ठिकाणी तुम्ही मोठ्याने ओरडला की तुमचा प्रतिध्वनी ऐकू येतो. या दरीच्या कठड्यावरून कोसळणारे धबधबे दरीतल्या वाऱ्याच्या वेगामुळे पुन्हा कठड्याच्या दिशेने उलटे फेकले जातात. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने येणारे हे पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची झुंबड उडालेली असते. सिंधुदुर्गातील स्वर्ग जर तुम्हाला पाहायचा असेल, तर या या ठिकाणाला नक्की भेट द्या.
५. हिरण्यकेशी नदी आणि हिरण्यकेशी मंदिर (HIRANYAKESHI TEMPLE OF AMBOLI GHAT)
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात देवी पार्वतीचे एक रूप म्हणजे, सोनेरी केस असलेले स्वयंप्रकट लाल रंगाची शिवलिंग हिरण्यकेश्वर नावाची मूर्ती आहे. तसेच गणपती बाप्पा, शिवलिंग आणि पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे. या मंदिराच्या समोर असलेल्या कुंडामध्ये वर्षाचे बाराही महिने पाणी असते, असं सांगितलं जातं. ह्या मंदिराच्या इथेच हिरण्यकेशी नदी आहे. आंबोली गावाची जीवनदायीनी म्हणून ही नदी ओळखली जाते.
हिरण्य म्हणजे सोनं आणि केशी म्हणजे केस. या नदीकडे बघितल्यानंतर एखादा सोन्याचा केस वाढल्याप्रमाणे आपल्याला भास होतो म्हणूनच या नदीला हिरण्यकेशी नदी असे म्हटले जाते. या नदीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही नदी पूर्वेला उगम पाहून त्यांनी पूर्वेलाच वाहत जाणारी ही महाराष्ट्रातील एकमेव नदी आहे.
आंबोली मधील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणिक ठिकाणांपैकी हिरण्यकेशी हे एक. हिरण्यकेशी नदीचा इथे उगम झाला झाला आहे. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते. मुख्य रस्त्यापासून साधारण तीन किलोमीटर अंतर आतमध्ये जावे लागते. वाटेत छोटी दोन गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता. उंचसखल आणि वळणावळणाचा. रस्ता संपला की पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेल्या पायवाटा.
तिथे गाडी थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढं जायचं. लोखंडी साकव पार केला की एकदम पेव्हिंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. चार पायऱ्या चढून गेल्यावर हिरण्यकेशी देवीचं मंदिर दिसू लागतं. मंदिर गुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते.
मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्यानं सदोदित भरलेलं असतं. शेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्रीदिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्त्रोत पूर्वाभीमुख आहे. पुढे ही नदी इथून पुढे आजरा तालुक्यात प्रवेशते. रामतीर्थाजवळून गाव-गाव ओलांडून गडहिंग्लज शहर ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.
६. महादेवगड पॉइंट (MAHADEVGAD POINT OF AMBOLI GHAT)
महादेवगड पासून थोड्याच अंतरावर नयनरम्य असा हा पॉइंट असून घाटाच्या विहंगम वनराईचे इथून दर्शन होते. आंबोली घाटातील हे सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.
७. महादेवगड किल्ला (MAHADEVGAD FORT OF AMBOLI GHAT)
गावापासून साधारणतः ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर आता तसे कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा बोटीवरील माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात इथून जात असे.
८. शिरगावकर पॉइंट (SHIRGAONKAR POINT OF AMBOLI GHAT)
बाजारपेठेपासून अगदी पासून थोड्याच अंतरावर नयनरम्य असा हा पॉइंट असून वेस्टर्न घाटाच्या विहंगम वनराईचे इथून दर्शन होते. हे एक विलोभनीय प्रेक्षणीय स्थळ आहे. तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता.
९. सनसेट पॉईंट (SUNSET POINT AMBOLI GHAT)
आंबोलीच्या सर्वोच्च आकर्षणापैकी एक म्हणजे हा सनसेट पॉइंट आहे. आजूबाजूच्या डोंगर आणि दऱ्यांचे विस्मयकारक विहंगम दृश्य आपले मन मोहून घेते. इथून तुम्हाला हिरवाईने नटलेली सह्याद्री पर्वतरांग आणि हिरवागार तळकोकण पाहता येतो.
निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे निवडक ठिकाण आहे. त्यामुळे जर तुम्ही आंबोली घाटाला भेट देत असाल, तर शिरगावकर पॉइंटच्या विलोभनीय सौंदर्याचे साक्षीदार होण्याची तसेच या मोहक हिल स्टेशनचे सार टिपण्याची संधी गमावू नका!
१०. रामतीर्थ – आंबोली घाट माहिती (RAMTIRTH IN AMBOLI GHAT)
आंबोली घाट आणि बेळगावच्या सीमारेषेवर असणारा हा अप्रतिम धबधबा आहे. हा धबधबा रुंद असून ऊंचीने कमी आहे. पावसाचा आवेग ओसरल्यानंतर येथील पाणी स्वच्छ आणि शांत होते. अशा वेळी इथे भेट देणे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.
११. कावळेशेत व्हॅली (KAWALESHET VALLEY IN AMBOLI GHAT)
कावळेशेत पॉइंट वरुन खाली दिसणारी दरी काळजाचा ठाव घेते. या दरीतुन उसळणारे पावसाचे तुषार आपल्याला चिंब भिजवून टाकतात. भर पावसात हिरवा शालू पांघरलेला घाट जार मनसोक्त पाहायचा असेल तर इथे नक्की भेट द्यावी.
१२. परीक्षित पॉइंट (PARIKSHIT POINT IN AMBOLI GHAT)
समोर पसरलेला अप्रतिम सह्याद्री आणि त्याचे सौन्दर्य पहायचे असल्यास या पॉईंटला नक्की भेट द्यावी. आंबोली पासूनजवळच असलेल्या या ठिकाणी तेवढीशी गर्दी नसली तरीही निसर्गप्रेमी इथे आवर्जून भेट देतात.
१३. फॉरेस्ट पार्क (FOREST PARK AMBOLI)
हे एक राखीव जंगल असून इथे फुलपाखरू उद्यान सुद्धा आहे. आपण एखादा गाईड घेऊन हे उद्यान निवांत फिरू शकता. इथे सापडणाऱ्या वेगवेगळ्या प्राणी, पक्षी, कीटक यांची महिती आम्ही या लेखात दिलेली आहे.
१४. दुर्ग ढाकोबा ट्रेक (DHAKOBA TREK IN AMBOLI GHAT)
ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांनी दुर्ग ढाकोबा ट्रेक नक्की करावा. निसर्गाच्या सान्निध्यात राहून काहीतरी वेगळे अनुभवायचे असल्यास आपण हा ट्रेक नक्की करा.
आंबोली धबधबा माहिती मराठी (AMBOLI WATERFALL INFORMATION IN MARATHI)
आंबोलीचा इतिहास (HISTORY OF AMBOLI)
हे गाव हे ऐतिहासिक दृष्ट्या वेंगुर्ला बंदर ते बेळगाव शहरापर्यंतच्या रस्त्यालगतच्या स्टेजिंग पोस्ट पैकी एक म्हणून अस्तित्वात आले होते. ज्याचा उपयोग ब्रिटिशांनी दक्षिण आणि मध्य भारतामध्ये त्यांच्या चौक्याना पुरवण्यासाठी केला होता
आंबोली घाट भूगोल (GEOGRAPHY OF AMBOLI GHAT)
हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये वसलेले आहे. या गावाचे एकूण क्षेत्रफळ हे अंदाजे ५६.१९ चौरस किलोमीटर असून या गावाच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी आहे सावंतवाडी शहर हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रामधील जास्त पर्जन्याच्या ठिकाणांपैकी हे एक आहे. येथे वर्षभरामध्ये सरासरी ७५० सेंटिमीटर एवढा पाऊस पडतो. आंबोलीच्या एका बाजूला कोकण किनारा असून इतर तीनही बाजूला सुंदर दऱ्या आहेत. आंबोली हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून हे पश्चिम भारतातील सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे.
आंबोलीची लोकसंख्या (POPULATION OF AMBOLI GHAT)
आंबोली मध्ये २०२३ च्या अंदाजे ८३०० एवढी लोकसंख्या आहे.
आंबोलीची शिक्षण संस्था (EDUCATION SYSTEM OF AMBOLI)
- ०१. या गावामध्ये अनुक्रमे ०५ पूर्व प्राथमिक व ०८ प्राथमिक शाळा आहेत.
- ०२. त्याचप्रमाणे एक सरकारी कनिष्ठ माध्यमिक शाळा असून एक प्रायव्हेट कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे.
- ०३. एक प्रायव्हेट माध्यमिक शाळा असून दोन सरकारी माध्यमिक शाळा आहेत.
- ०४. त्याचप्रमाणे अनुक्रमे एक खाजगी व एक सरकारी उच्च माध्यमिक शाळा आहे.
आंबोलीची नागरी सुविधा (CIVIL FACILITIS IN AMBOLI)
०१. वैद्यकीय सुविधा (MEDICAL FACILITIS IN AMBOLI)
गावामध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय शासकीय व अशासकीय सुविधा उपलब्ध आहेत. आंबोली वरून दहा किलोमीटर अंतरावर सामूहिक आरोग्य केंद्र आहे. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. ऍलोपॅथी रुग्णालय सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
०२. पाणीपुरवठा (WATER SUPPLY OF AMBOLI)
गावामध्ये विहिरींचे पाणी हे पिण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे नळ योजनेद्वारे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा देखील पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. आंबोली गावामध्ये शुद्ध पाण्याचे धबधबे, नद्या, झरे असल्यामुळे त्या ठिकाणी लोक या पाण्याचा देखील पिण्याचे पाणी म्हणून वापर करतात.
०३. पर्यावरण संवर्धन (NATURE CONSERVATION)
हे गाव हे पर्यटन दृष्ट्या अतिशय प्रसिद्ध व निसर्गरम्य असल्यामुळे या ठिकाणी पर्यावरणाची देखील तेवढीच काळजी घेतली जाते. गावामध्ये मोठी गटारे आहे. पर्यावरणाची या ठिकाणी पुरेपूर काळजी घेतली जाते.
०४. संपर्क व वाहतूक (TRANSPORTATION AND COMMUNICATION IN AMBOLI)
गावामध्ये संपर्कासाठी इंटरनेटची, पोस्ट ऑफिसची, दूरध्वनीची, मोबाईल फोनची सार्वजनिक दूरध्वनी केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच गावामध्ये वेगवेगळ्या गावांना जोडण्यासाठी बसेस तसेच ऑटो रिक्षा, टॅक्सी, व्हॅन इत्यादी उपलब्ध आहेत व या द्वारे तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावांमध्ये दळणवळण सोयीस्कर व सुलाभरीत्या करू शकता.
प्रमुख व्यवसाय (MAIN BUSINESS IN AMBOLI)
पावसाळी पर्यटन हा गाव वासियांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. शेती हा इकडचा प्रमुख व्यवसाय असून इथे उसाचीसुद्धा लागवड केली जाते. त्याचबरोबर शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय देखील येथे केला जातो. इथे मधाचे देखील उत्पन्न घेतले जाते. तसेच नारळाच्या, काजू आणि काही जणांच्या आंबा बागा देखील असल्यामुळे इथे बागायती उत्पन्न देखील बऱ्यापैकी घेतले जाते.
बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा (LANGUAGES IN AMBOLI)
गावांमध्ये मालवणी, मराठी भाषांचा बोलण्यासाठी वापर केला जातो.
आंबोली इथे कसे पोहोचावे (HOW TO REACH AMBOLI )
आंबोलीला येण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता, ते खालीलप्रमाणे
०१. बस
आजूबाजूच्या शहरांना जोडण्यासाठी उत्तम प्रकारची रस्ते वाहतूक उपलब्ध आहे. कोल्हापूर हे आंबोली पासून साधारणतः १२८ किलोमीटर, बेळगावपासून ७० किलोमीटर, तर पणजी हे ९० किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वैयक्तिक टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा व प्रायव्हेट टॅक्सीने सुद्धा येऊ शकता.
रस्ते मार्गाने जर तुम्ही येत असाल तर कुडाळ वरून तुम्हाला ५० किलोमीटर, सावंतवाडी वरून ३० किलोमीटर एवढं अंतर पार करावे लागेल.
०२. रेल्वे
इथे येण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक सावंतवाडी असून हे अवघ्या ३० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तुम्ही सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून बस किंवा टॅक्सीने, ऑटोने येऊ शकता.
०३. विमान
या पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी तुम्ही विमानाद्वारे सुद्धा येऊ शकता. गोव्यातील मोपा विमानतळ हे साधारणतः ४0 किलोमीटर असून सिंधुदुर्गातील चीपी विमानतळ ७५ किलोमीटर आहे.
आंबोलीतील हवामान (AMBOLI GHAT WEATHER INFORMATION)
- हे हिल स्टेशन हे थंड हवेचे ठिकाण एक आहे. त्यामुळे आंबोलीला हिवाळ्यामध्ये हवामान हे थंड असते व सकाळच्या वेळी दाट धुके असते.
- उन्हाळ्याच्या वेळी या ठिकाणी हवामान हे मध्यम उष्ण असते.
- आंबोलीला प्रतिचेरापुंजी असे देखील म्हणतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व पावसाळ्यात या ठिकाणी भात शेती केली जाते.
आंबोली फिरण्यासाठी साठी उत्तम कालावधी (BEST TIME TO VISIT AMBOLI GHAT)
घाटात पहिल्या पावसात धबधबे प्रवाहित होतात. साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात इथे वर्षापर्यटनाला सुरुवात होते. सुंदर छोटे धबधबे प्रवाहित झाल्यावर आणि सर्वदूर हिरवाईची चादर पसरल्यावर हे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
जुलै ते नोव्हेंबर पर्यंत इथे भेट देणे सर्वोत्तम असते.
आमचे हे लेख नक्की वाचा :-
- मालवणचा अभिमान, सिंधुदुर्ग किल्ला
- 30 पावसाळ्यात फिरण्याची ठिकाणे
- सिंधुदुर्ग मधील १० प्रेक्षणीय स्थळे
आंबोलीमधील जैव विविधता (BIODIVERSITY IN AMBOLI GHAT)
घाटामधील सस्तन प्राण्यांच्या ३५ पेक्षा जास्त प्रजाती आहेत, तसेच पक्ष्यांच्या २०० हून अधिक प्रजातींची वाढती यादी, फुलपाखरांच्या अंदाजे १५० प्रजाती आणि सरपटणारे प्राणी आणि उभयचरांच्या जवळपास ४५ हून अधिक प्रजातीआढळून आल्या आहेत आणि ही यादी सदैव वाढत आहे. आंबोळी घाट हा जगातील एक सर्वोत्कृष्ट “बायो-डायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स” आहे. हे उभयचर, कीटक आणि सरपटणारे प्राणी प्रेमीसाठी नंदनवन आहे. या दाट जंगलात अनेक प्रकारचे साप, सरपटणारे प्राणी आणि इतर कुठेही न दिसणारे प्राणी सहजतेने आढळतात. आंबोलीत नाईट ट्रेल्ससाठी गेले तर ही विविधता आपणास पाहायला मिळू शकते.
Schistura hiranyakeshi – श्री तेजस ठाकरे यांना हिरण्यकेशी कुंडामध्ये सापडलेल्या माशाला नदीचेच नाव देण्यात आले आहे. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने याला स्चीस्टुरा हिरण्यकेशी (Schistura hiranyakeshi) असे नामकरण करण्यात आले आहे. आंबोलीच्या नावामध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आंबोली घाटात उभयचरांच्या डझनभर प्रजाती विज्ञानाला माहीत नसल्याचा शोध लागला. आज, आंबोली हर्पेटोफौना (सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी) यांच्या सुरक्षित अधिवासासाठी ओळखले जाते. पावसाळ्याच्या रात्री बेडूक आणि टोड्स यांच्या कर्कश ध्वनि आणि शिट्ट्यांनी गजबजून गेलेल्या असतात, त्यापैकी गंभीरपणे धोक्यात असलेला आंबोली टायगर टोड आणि स्थानिक आंबोली बुश फ्रॉग.
आंबोलीतील वन्यजीवन (WILDLIFE IN AMBOLI GHAT)
०१. घाटातील साप – काका भिसे (गॅलरी पाहण्यासाठी दिलेल्या फोटोवर क्लिक करा.)
०२ . घाटातील बेडूक -काका भिसे (गॅलरी पाहण्यासाठी दिलेल्या फोटोवर क्लिक करा.)
०३. घाटातील पक्षी – काका भिसे (गॅलरी पाहण्यासाठी दिलेल्या फोटोवर क्लिक करा.)
०४. घाटातील सोबती -अनिश परदेशी (गॅलरी पाहण्यासाठी दिलेल्या फोटोवर क्लिक करा.)
आंबोली घाट फिरताना घ्यावयाची काळजी (PRECAUTIONS TO BE TAKEN WHILE VISITING AMBOLI GHAT)
- आंबोली घाटामध्ये वाहन चालवताना रस्त्यांवरील वन्यजीवांकडे कडे लक्ष ठेवा. दुर्दैवाने, पावसाळ्यामध्ये बरेच साप आणि बेडूक रोडकिल म्हणून संपतात.
- इथे पर्जन्यमान जास्त असल्याने, अतिवृष्टीसाठी पर्यटकांनी तयार राहणे आवश्यक आहे.
- हे भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे. जर तुमचा इथल्या जंगलात फिरायला जायचे असेल तर तिथे जळू आणि टिक्स असतील याची माहिती घ्यावी.
- इथे जंगलात पावलोपावली साप, घोण असण्याची शक्यता असते. त्यापासून सांभाळून राहावे.
- इथे धबधब्यावर स्नानाची मजा लुटायला जाताना दगड निसरडे झालेले असल्याने घसारण्याची शक्यता असते, म्हणून आंघोळ करताना जीव सांभाळावा.
- सनसेट पॉइंट, आणि इतर पॉइंटवर फिरायला जाताना रेलिंगवर मस्ती करू नये तसेच सुरक्षा कठड्याच्या पलीकडे जाऊ नये. अश्याने दरीत कोसळून जीवही जाऊ शकतो.
- तुम्हाला आढळणाऱ्या कोणत्याही वन्य जीवांना हाताळणे टाळावे.
- साप, बेडूक दिसल्यास त्याच्या जास्त जवळ जाऊ नये.
- निसर्ग स्वच्छ राखण्यासाठी इथे खाऊ, प्लॅस्टिक, बाटल्या फेकू नका.
- इथे फिरणाऱ्या माकडांना खाऊ घालू नका. ते तुम्हाला त्रास देऊ शकतात.
- हिरण्यकेशी येथील कुंडा मध्ये दुर्मिळ मासे असल्याने या कुंडात स्नान करू नये.
- इथे जाताना छत्री, रेनकोट घेऊन जावे.
- ट्रेकिंगला जायचे असल्यास काठी, गमबूट, विजेरी, मोबाइल आणि पाणी घेऊन जावे.
- नाइट ट्रेक साठी जायचे असल्यास चांगली टॉर्च घेऊन जाणे योग्य.
- ट्रेकिंगला जाताना प्रथमोपचार साहित्य सोबत घेऊन जावे.
हॉटेल्स आणि रिसोर्ट (HOTELS AND RESORTS)
- ०१. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रिसॉर्ट
- ०२. व्हिसलिंग वूड्स
- ०३. मृगया नेचर रिट्रीट रिसोर्ट
- ०४. निसर्ग रिसॉर्ट
- ०५. हॉटेल रिव्हर व्यू
FAQ
आंबोली का प्रसिद्ध आहे?
हा घाट वेस्टर्न घाटामधील सर्वाधिक जैव विविधता असलेला भाग आहे. तसेच इथे महाराष्ट्रातील जवळपास सर्वात जास्त पाऊस पडतो. याशिवाय इथले धबधबे हे पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. नजीकच्या भागात अनेक प्रकारचे दुर्मिळ वन्यजीवन पाहावयास मिळते.
ऑगस्टमध्ये आपण आंबोलीला भेट देऊ शकतो का?
इथे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्वत्र हिरवेगार असते. जुलै ते सप्टेंबेर हा पावसाळा सीझन इथे भेट देण्यासाठी उत्तम आहे. येथील डोंगररांगांलगतचे घनदाट जंगल आणि हिरवीगार झाडे या महिन्यांत अतिशय सुंदर दिसतात.
आंबोली धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जुलै ते फेब्रुवारी या दरम्यानचा काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. वर्षाच्या या काळातच ही जागा अतिशय विलोभनीय दिसते.
आंबोली घाटापासून सर्वात जवळ कोणते शहर आहे?
सावंतवाडी हे शहर सर्वात जवळचे शहर आहे.
आंबोली घाटाला काय म्हणतात?
महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात.
निष्कर्ष
आम्ही आमच्या लेखाद्वारे आंबोली घाटाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि या लेखात काही मुद्दे वाढवायचे असतील तर ते देखील नक्की कमेंट करून कळवा .
धन्यवाद.
3 thoughts on “आंबोली घाट माहिती मराठी : AMBOLI GHAT INFORMATION IN MARATHI”