दसरा सणाची संपूर्ण माहिती मराठी | Dasara Information In Marathi

Dasara Information In Marathi | दसरा सणाची माहिती मराठी – आपल्या देशात येणारे प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. यामध्ये आपल्याला देशाची सभ्यता आणि संस्कृतीची झलक दिसून येते. हे सण जीवनात नवीनता, उत्साह, जोश आणि चैतन्य आणतात. दसरा हा याच महत्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी श्रीरामांनी अहंकारी रावणाचा पराभव केला होता. या आठवणीत दशहरा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला विजया दशमी असेही म्हणतात. हा सण अश्विन मासाच्या दशमीला साजरा केला जातो. या सणाचा इतिहास, महत्व, कथा याबाबतची सगळी माहिती घेऊन आलो आहोत.

Table of Contents

दसरा संपूर्ण माहिती मराठी – Dasara Information In Marathi

“दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा” असा हा सण विजयादशमी म्हणजेच दशहरा हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजेच दहाव्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय. त्यामुळे हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण रामायणातील कथेशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान राम यांनी अहंकारी लंकापती रावणाचा वध केला होता. तेव्हापासून हा सण साजरा केला जाऊ लागला.

151+ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Dasara Wishes In Marathi

दशहरा किंवा दसरा म्हणजे काय ?

Dussehra/ Dasara Information In Marathi

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभु श्रीरामाने लंकाधिपती रावणाचा वध केला होता. हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

या दिवशी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर काही ठिकाणी विजयादशमीच्या निमित्ताने रावणाच्या पुतळ्याचं दहनही केलं जातं आणि सोबतचं रामलीलेचंही आयोजन आवर्जून केलं जातं. त्याचबरोबर रामाची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे मानले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण हा शौर्य आणि विजयाचे प्रतीक आहे.

या दिवशी शस्त्र, वाद्य पुजन तसेच व्यापारी आपल्या हिशोबच्या वह्या यांचे पूजन केले जाते.

हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात.  याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सवातील दशमीला विजयादशमी या नावाने  सण साजरा केला जातो.

हा सण भारत सरकारने राजपत्रित सुट्टी म्हणून घोषित केला आहे, जेणेकरून लोकांना या सणाचा पूर्णपणे आनंद घेता येईल. तसेच हिंदू सणाला महत्त्व दिले जाईल. हा सण नवरात्रीचा दहावा आणि अंतिम दिवसही असतो. या दिवशी देवीची पूजा करून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. याच दिवशी दुर्गा देवीने नऊ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता आणि श्रीरामानेही दुष्ट लंकाधीश रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या तावडीतून सोडवले होते. म्हणूनच हा दिवस आपल्याला असत्यावरील सत्याच्या आणि अन्यायावरील न्यायाच्या विजयाचा संदेश देतो.

दसरा माहिती मराठी – दशहरा संपूर्ण माहिती मराठी

हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. बंगालमध्ये या दिवशी दुर्गापूजा केली जाते, लोक महिषासुरमर्दिनी दुर्गामातेची आराधना करतात, तर उत्तर भारतात या दिवशी रामलीलेचा उत्साह असतो, लोक रामायणाचा अभिनय करून लोकांना चांगला संदेश देतात, मिरवणुका काढल्या जातात तसेच रावण दहनही केले जाते, तर महाराष्ट्रातही या दिवशी रावण दहन केले जाते, रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते, चारही बाजूंना उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते.

या दिवशी घरे, गाड्या व दुकाने स्वच्छ करून फुलांनी सजवली जातात. घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. घरात उत्साहपूर्ण वातावरण असते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते, म्हणूनच लोक या दिवशी नवीन कपडे, सोने तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तू खरेदी करतात. संध्याकाळी लोक नवीन कपडे घालून एकमेकांना भेटायला जातात आणि आपट्याची पाने देऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. लोक मिठाई वाटून आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात. लहान मुलांच्या उत्साहाला तर या दिवशी सीमाच नसते.

या सणाला योद्ध्यांचा सण असेही म्हणतात. या दिवशी लोक शस्त्रस्त्रांना स्वच्छ करतात, त्यांची पूजा करतात. तर काही लोक आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी असलेल्या यंत्रांना स्वच्छ करून त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. विद्यार्थ्यांना या सणाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमधून अनेक दिवस सुटीही मिळते. हा केवळ सण नाही, या दिवशी संपूर्ण कुटुंबातील लोक एकमेकांना भेटायला येतात, ज्यामुळे या सणाचे महत्त्व आणखी वाढते

देशातील विविध भागात विविध प्रकारे जरी साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचे जीवन आनंद आणि उत्साहाने भरणे, त्यांना चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करणे आहे. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे असे मानले जाते.

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजया दशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करताना, शेतातील धान्याचा तुला आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत ही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात.

दसरा 2023 महत्व

दसऱ्याचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो, या दिवशी लोक आपल्यातील वाईट गोष्टी दूर करून नवीन जीवनाची सुरुवात करतात. विजयादशमी हा हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतभरात वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याच्या सणाशी अनेक कथा निगडित असल्याने देशभरात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दसरा या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात, त्या वृक्षाला अस्मंतक असे म्हणतात.

या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. हा सण उत्सव म्हणून साजरा केला जाणारा सण आहे. हा सण अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश नक्कीच मिळते. दसऱ्याला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते; तथापि, त्याचे महत्त्व समान आहे.

नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा नऊ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासुर राक्षसाचा यादिवशी वध केला असे म्हटले जाते. तर रामाने ही याच दिवशी रावणाचा वध केल्याचे आपल्याला कळते. म्हणून रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. नेपाळ आणि बांगलादेशसह इतर देशांमध्येही हा सण अनोख्या विधी, परंपरा आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

प्रत्येकाचा उत्सव साजरा करण्याचा वेगळा अर्थ आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी घरी कापणी आणण्याचा उत्सव, मुलांसाठी रामाकडून रावणाच्या वधाचा उत्सव, मोठ्यांकडून वाईटावर चांगल्याचा उत्सव इ. हा सण आपल्यातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दूर करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचे संकेत देतो. 

विजयादशमी – दसरा तारीख, वेळ माहिती – Vijayadashami Information In Marathi

हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. याला विजयादशमी असेही म्हणतात. २०२३ ह्या वर्षी म्हणजेच हिंदू कॅलेंडरनुसार दसरा म्हणजेच विजयादशमी २४ ऑक्टोबर, वार मंगळवार, २०२३  ह्या दिवशी आहे. तसेच पूजन करण्याची योग्य वेळ किंवा विजय मुहूर्त हा दुपारी ०२ वाजून २१ मिनिटं पासून सुरु होत आहे. आणि तसेच ०३ वाजून ४१ मिनिटांनी संपत आहे.

दसरा मुहूर्त 2023 माहिती – Dasara Festival Information In Marathi

 • मंगळवार,२४ ऑक्टोबर २०२३
 • दशमी तिथि सुरू : २३ ऑक्टोबर २०२३ संध्याकाळी ०५.४४ वाजता
 • दशमी तिथि समाप्त: २४ ऑक्टोबर २०२३ दुपारी ०३.४१ वाजता
 • श्रवण नक्षत्र प्रारंभ: २२ ऑक्टोबर २०२३ सायं ०६.४३ वाजता
 • श्रवण नक्षत्र समाप्त: २३ ऑक्टोबर २०२३ संध्याकाळी ०५.१४ वाजता
 • विजय मुहूर्त: दुपारी ०१.५८ पासून ते दुपारी ०२.४३ पर्यन्त

दशहरा सण कसा साजरा करतात याची माहिती | Dashahara Information In Marathi

हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी असे म्हणतात कि, “दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.” या दिवशी घरोघरी पूजाअर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. दसरा सणाच्या दिवशी घराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावल्या जातो.

संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. आपट्याची पाने देण्यासाठी एकमेकांच्या घरी सुद्धा काही लोक जातात व त्यांना शुभेच्छा देतात. ही एक जुनी प्रथा आहे आणि आजही ती कायम आहे. या दिवशी विविध पदार्थ सुद्धा घरी केले जातात. व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या’ आणि ‘सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

Dussehra Information In Marathi

आणखी एक महत्त्व म्हणजे साडेतीन मुहूर्तातील एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव केला जातो, प्रारंभ केला जातो. विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी स्त्रिया सोने खरेदी करतात. तसेच घरी असलेले वाहने, शस्त्रे इत्यादींची झेंडूच्या फुलांनी पूजा करतात. तसेच सर्व कुटुंबातील मंडळी एकत्र येतात व देवीच्या दर्शनाला जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा देत असते, असे म्हटले जाते.

संध्याकाळी रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचा कार्यक्रमही आयोजित करतात. अशाप्रकारे हा सण साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो. शत्रूवर पराक्रमाने तसेच वैऱ्यावर प्रेमाने विजय केला जातो. तसेच कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रितपणे देवीला आपल्या विजयाची कामना करतात व जीवनात सतत कायम राहण्यासाठी आशीर्वाद मागतात.

या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा, शक्ती , ज्ञानसंपदा या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते.

दसरा 2023 पूजा साहित्य

ताम्हण पळी पंचपात्र तांब्या
घंटा समई निरंजन तेल
तूप माचिस कापूस आंब्याचे टाळ
विडयाची पाने सुपारी तांदूळ सुटे पैसे
झेंडूची फुले फुले दूर्वा तुळशी
पंचामृत दूध साखर मध
कापूर धूप अगरबत्ती झेंडूचे हार

दसरा पूजाविधी – दसरा पूजा कशी करावी?

 • सर्वप्रथम सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
 • घरातील सगळ्या शस्त्रास्त्रांची धुवून पुसून ज्या ठिकाणी पुजणार त्या ठिकाणी मांडणी करून घ्यावी.
 • सर्वप्रथम पूजेची साहित्याची जमवाजमा करावी.
 • त्यानंतर घरातील देवाची सर्वप्रथम पूजा करून घ्यावी.
 • त्यानंतर शस्त्रासाच्या इथे समई पेटवून ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणे शस्त्राची पूजा करून घ्यावी.
 • यानंतर आपल्या घरी असलेल्या वाहनांची तसेच घरातील दरवाजे आणि इतर मशीन यांची पूजा करून त्यांना झेंडूच्या फुलांचे हार घालावेत.
 • शस्त्रांना घरातील नैवेद्य दाखवून त्यानंतर घरातील सदस्यांनी तो प्रसाद म्हणून वाटप करावा.
 • दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाची पूजा करून यानंतर शस्त्रास्त्रांवरील निर्माल्यचे विसर्जन करून शस्त्रे जागच्या जागी लावावी.

आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा

दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना,शेजारी, मित्रमंडळी यांना ही पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या – नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर मावळे किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी, आई किंवा बहीण त्यांना ओवाळून घेत असे. घरात गेल्यानंतर लुटून आणलेली संपत्ती ते आधी देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असत. या घटनेची आठवण म्हणून सध्याच्या काळात आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो.

आपट्याच्या पानांचे महत्त्व

आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो, मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.वास्तुशास्त्रानुसार रोज शमीच्या झाडाखाली दिवा लावल्यास शनिदेवाचा कोप टाळता येतो.

आपट्याच्या पानात श्रीरामतत्त्व १० टक्के प्रमाणात असते. आपट्याच्या पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. याच्या पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. म्हणजेच आपट्याचे हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. सामाजिक प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.

आपट्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

अश्मंतक म्हणजे आपटा. याचा अर्थ असा की, हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे विकल्पाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

या तीन गोष्टींचे करा दान (विजयादशमी संपूर्ण माहिती मराठी)

विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी झाडू, अन्न आणि वस्त्र या तीन गोष्टींचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते. तसेच घरात सुख संपत्तीची कमतरता भासत नाही असे मानले जाते.

गुप्त दानालाही अतिशय महत्त्व आहे

दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम यांनी दशानन रावणाचा वध केला होता अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता अशी देखील धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय तसेच वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो. याशिवाय हा दिवस आनंद आणि समृद्धी घेऊन येणारा मानला जातो. या दिवशी गुप्त दान करण्याचे खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी गुप्त दान केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते.

दसरा सीमोल्लंघन म्हणजे काय? (Dussehra Festival Information In Marathi)

पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करायचे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच महत्त्वाच्या लढाईसाठी निघण्याची त्याकाळी प्रथा होती. याशिवाय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक व्यापारी विदेशात जाऊन व्यापार करायचे. दसऱ्याच्या मुहूर्तावरच शेतकरी वर्ग नवे पीक घरात घेऊन येतात. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

विजयादशमी आणि दसरा २०२३ यामध्ये फरक आहे का?

नवरात्रीनंतर चाहूल लागते ती दसऱ्याची. अश्विन महिन्यात विजयादशमी हा सण साजरा केला जातो. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही झाली आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं आणि थाटामाटात साजरा केला जातो. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते.

विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. या दिवशी रावणाचे दहन केले जाते आणि लोक देविच्या मूर्तीचे विसर्जन करतात, तसेच महाराष्ट्रात सोन लूटून देखील हा सण साजरा केला जातो. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते.

तसेच पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन, आपट्याच्या पानांचे सोने म्हणून वाटप आणि शस्त्रपूजा ही कृत्ये करायची असतात. म्हणून तुम्हाला हे दोन्ही एकच वाटत असले तरी देखील ते वेगवेगळे आहेत.

दसरा सण कथा – Dussehra Story In Marathi

प्राचीन काळापासून विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या दहाव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी दशानन रावणाचा वध केला, तसेच दुर्गा देवीने असुरचा वध केला होता. तेव्हा या दिवसाला दसरा असेही म्हणतात. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

१. असुराचा वध

रंभासुराचा पुत्र महिषासुर हा अत्यंत शक्तिशाली होता. त्याने ब्रह्म देवाची कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी  ब्रह्म देव प्रकट होऊन म्हणाले- ‘वत्स! एक मृत्यू सोडून तु बाकी काहीही माग.’ यावर महिषासुराने खूप विचार केला आणि मग म्हणाला- ‘ठीक आहे प्रभु. मला कोणताही देव, दानव आणि मानवापासून मृत्यू देऊ नका. फक्त कोणत्याही महिलेच्या हातून मला मृत्यू मिळू दे. ब्रह्म देवांनी तथास्तु म्हटले.  महिषासुराने हे वरदान मिळाल्यानंतर तिन्ही लोकांवर आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली. आणि तो त्रिलोकाधिपती झाला. त्यानंतर सर्व देवतांनी महाशक्तीची पूजा केली.

कारण त्यांना माहित होते की आता देवीच यातून सर्वांची  सुटका करु शकते.देवतांकडून महाशक्तीची पूजा झाल्यानंतर त्यांच्या शरीरांतून एक दिव्य तेज उत्पन्न झाले आणि परम सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाले. यानंतर हिमवनाने भगवतीच्या स्वारीसाठी सिंह दिला आणि सर्व देवांनी आपआपली शस्त्रे महादेवीच्या सेवेत सादर केली. ९ दिवस संघर्ष केल्यानंतर १० व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला, म्हणून विजयादशमी हा सण साजरा केला जातो.

२. रावणाचा वध

असे म्हटले जाते की भगवान श्री राम आणि रावणाचे युद्ध बरेच दिवस चालले होते, शेवटी दशमीच्या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला. रावण हा राक्षस होता, तो असुर नव्हता. त्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो.

3. धर्माचा विजय

या दिवशी अर्जुनाने कौरव सैन्यातील लाखो सैनिकांचा वध करून कौरवांचा पराभव केला, असेही म्हटले जाते. हा धर्माचा अधर्मावरील विजय होता.

दसरा हा सण दहा दिवस मानवाला जातो, त्यापैके नऊ दिवस दुर्गा माता पूजा केली जाते आणि दहावा दिवस या  स्वरूपात साजरा केला जातो, दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीने क्रूर राक्षस महिषासुर या चा वध केला होता, आणि याच दिवशी भगवान श्री राम यांनी रावणाला पराजित करून त्याच्यावर विजय मिळवला होता, या विजय कथेला विजया दशमी असे सुद्धा म्हटले जाते.

दसऱ्याला ‘या’ गोष्टींना विशेष महत्त्व असते – Vijayadashami In Marathi

शमी

दसऱ्याला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे. याची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात याच्या समिधा असतात. याची पाने गणपती बाप्पाला वाहतात. महाभरतातील कथेनुसार दुर्योधनाने पांडवांना जुगारात पराभूत केले आणि त्यांना १२ वर्षे वनवास अन् एक वर्षाच्या अज्ञातवासात पाठवले. वनवासात असताना अर्जुनाने शमीच्या झाडावर धनुष्य ठेवले आणि नंतर झाडावरून शस्त्रे उचलून शत्रूंवर विजय मिळवला. याच विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला या झाडाची पूजा केली जाते.

शमी झाड

आपटा पाने

या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने एकमेकांना दिली जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात. `दसरा’ हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत असत.

दसरा शस्त्रपूजन माहिती – Dussehra Shastra Pujan

विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्याविषयी वेगवेगळे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी या दिवसाची निवड करत होते. दसऱ्याच्या  दिवशी केलेल्या युद्धात निश्चितच विजय मिळतो, असे ते समजत होते. क्षत्रियांप्रमाणे ब्राह्मण लोकही दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमीच्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.

या दिवशी घरातील आणि व्यवसायातील शस्त्र आणि अस्त्र यांची तसेच शाळेतील मुले आपल्या वह्या, पुस्तके आणि सरस्वती पूजन करतात. प्रभु श्री रामाने रावणाच्या लंकेत जावून मोठ्या शौर्याने रावणाचा वध केला. त्यानंतर लंकेत स्वतः राजा न होता, रावणाचा भाऊ असणाऱ्या बिभीषणाला लंकेचा राजा केले. यातून प्रभु श्री रामांच्या सामर्थ्य आणि सद्भाभावनेचे दर्शन होते. याच शौर्याचे प्रतीक म्हणून शस्त्र पुजन केले जाते.

narendra modi in dussehra

दसरा 2023 दिवशीच्या काही परंपरा

 • दसऱ्याच्या दिवशी काही नवीन काम करण्याची, खरेदी करण्याची, नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे. या दिवशी गोरगरीबांना भेटवस्तू, उपयुक्त सामान, अन्नधान्य तसेच मिठाई दान केली जाते.
 • आजही ग्रामीण भागात गुरांच्या गोठ्यात शेणा मातीचा दसरा करून त्यात दही दूध लोणी टाकून गुरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
 • दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.
 • दसऱ्याच्या दिवशी घरांना, गाड्यांना झेंडूची फुले आणि आंब्यांच्या पानापासून तयार केलेले तोरण बांधले जाते.
 • यादिवशी शस्त्र पूजन केले जाते.
 • आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात.
 • या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता केली जाते.
 • अनेकजण हे नऊ दिवस कडक उपवास करत असतात.दसऱ्याच्या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने आणि रावणाला श्री रामाने मारले होते, म्हणून त्या दोघांचे पूजन या दिवशी केले जाते.

गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

दसरा सरस्वती पूजन

नवरात्रीचे नऊ दिवस देवी दुर्गाला समर्पित केले जातात, तर दहाव्या दिवशी ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी शाळेत जाणारी मुले अभ्यासात आशीर्वाद मिळवण्यासाठी मां सरस्वतीच्या तांत्रिक प्रतीकांची पूजा करतात. कोणताही दिवस सुरू करण्यासाठी, विशेषत: शिकण्यास सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

भारतात साजरा केला जाणाऱ्या दसरा सणाची माहिती मराठी

म्हैसूर 

सुशोभित केलेली चामुंडेश्वरी देवीची मूर्ती हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात. संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

म्हैसूरमध्ये दसऱ्याच्या वेळी, संपूर्ण शहरातील रस्ते दिवे लावतात आणि संपूर्ण शहरात हत्तींनी सजवलेली भव्य मिरवणूक काढली जाते. यावेळी प्रसिद्ध म्हैसूर राजवाडा वधूसारखा दिवा लावलेला आहे. यासह, शहरातील लोक टॉर्च लाइटसह नृत्य आणि संगीताच्या मिरवणुकीचा आनंद घेतात. या द्रविड प्रदेशांमध्ये रावण-दहन आयोजित केले जात नाही.

 उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. याला कुल्लूचा दसरा असे म्हणतात. या उत्सवाची तयारी दहा दिवस किंवा एक आठवडा आधी सुरू होते. सुंदर वस्त्रे परिधान केलेले स्त्री -पुरुष, कर्णे, बगळे, ढोल, ढोल, बासरी इत्यादी घेऊन बाहेर जातात. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. डोंगरी लोक मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून आपल्या ग्रामदेवतेची पूजा करतात. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतीलनाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. 

देवतांच्या मूर्ती अतिशय आकर्षक पालखीत सुशोभित केल्या आहेत. कुलू शहरात दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते. प्रशिक्षित नर्तक या मिरवणुकीत नाट्य नृत्य करतात. अशाप्रकारे मिरवणूक काढणे, शहराच्या मुख्य भागातून शहराची प्रदक्षिणा घालणे आणि कुल्लू शहरात दसऱ्याच्या उत्सवाची सुरुवात रघुनाथजी देवतेच्या पूजनाने करणे. दशमीच्या दिवशी या उत्सवाचे वैभव अद्वितीय आहे.

आंध्रप्रदेश

आंध्र प्रदेश मध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तीन देवींची पूजा केली जाते. येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याच बरोबर दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते, याला ‘थेपोत्सवम’ असे म्हटले जाते. तसेच, मंदिरात आयुध पूजाही होते. लोक एकमेकांना मिठाई आणि कपडे देतात. 

गुजरात

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगड

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीज महिने हा सण साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. दंतेश्वरी माता ही बस्तर प्रदेशातील रहिवाशांची आराध्य देवी आहे, जी दुर्गाचे रूप आहे. देवी काट्यांच्या सेटवर विराजमान आहे, ज्याला काचिन गडी म्हणतात. पहिल्या दिवशी, ज्याला काचिन गडी म्हणतात, समारंभ सुरू करण्यासाठी देवीकडून परवानगी घेतली जाते. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्व दिले जाते.

महाराष्ट्र

महाराष्ट्राचे लोक हा दिवस लग्न, घरात प्रवेश आणि नवीन घर खरेदीसाठी शुभ वेळ मानतात. घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र,वाहने,यांना फुलांच्या माळा घालतात.

पंजाब

पंजाबमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून हा सण साजरा केला जातो. पंजाबमध्ये दस-याच्या दिवशी रावणदहन केले जाते. अभ्यागतांचे पारंपारिक मिठाई आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. येथे रावण-दहन कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. आणि जत्रा मैदानावर आयोजित केली जातात.

दक्षिण भारत 

म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. धन , धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू,कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रुपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते.लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात.

राज्यस्थान 

भारतीय संस्कृतीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या सणांचा माध्यम म्हणून उपयोग करून घेतला आहे. आपल्याकडे बैलपोळ्याला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तशीच राजस्थानात विशेषत: जयपूरमध्ये आजही निष्ठा, आत्मसन्मान आणि शक्ती यांचे प्रतीक म्हणून अश्वांची पूजा केली जाते. राजस्थान हा लढवैय्या राजपूतांचा प्रदेश. मोगल सम्राटांशी निकराचा लढा देणारे लढवय्ये याच भूमीत निपजले. महाराणा प्रताप आणि त्यांचा घोडा चेतक यांची कथा आपणास माहिती आहे. राजस्थानात आजही नवरात्रीतल्या नवमीला अश्वपूजन करण्याची प्रथा आहे.

दसरा कथा – Dasara Story

फार पूर्वी वरतंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्या शिकण्यासाठी खूप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होऊन बाहेर पडत होते. त्यावेळी मानधन देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा देत असत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्यांनी ऋषींना विचारले की, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावर त्या ऋषींनी या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले.

परंतु ऋषींनी कौत्सला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे १४ विषयांबद्दल ज्ञान दिल्यामुळे १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितले. ते ऐकून तो गोंधळून गेला. तो रघु राजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्यांचा खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कौत्सकडे तीन दिवसाची मुदत मागून घेतली. आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघु राजाचा पराक्रम माहीत होता. त्यांनी कुबेराला संपूर्ण हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांच्या आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी रघु राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू या ऋषींकडे गेला. आणि त्या ऋषींना गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी ती गुरुदक्षिणा घेण्यासाठी नकार दिला आणि १४ कोटी सुवर्णमुद्रा परत नेण्यास राजाने देखील नकार दिल्यामुळे कौत्सने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा त्यावेळी पासून सुरू झाल्याचे म्हटले जाते.

दसरा 2023 माहिती प्रश्न

दसऱ्याचा अर्थ काय?

दसरा, ज्याला हिंदू धर्मात दसरा किंवा विजयादशमी,दशहरा असे देखील म्हणतात. दशा (“दस”) आणि हरा (“पराभव”) या संस्कृत शब्दांवरून या उत्सवाचे नाव पडले आहे. दशमी म्हणजे दहावी तिथी.

यावर्षी २०२३ मध्ये दसरा कधी आहे?

यावर्षी मंगळवार,२४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी आहे.

विजयादशमीला काय झाले होते?

राम आणि रावण यांच्यात एक युद्ध होते, ज्यात रामाचा रावणावर विजय झाल्यामुळे हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे स्मरण करतो.

दसऱ्याला कोणत्या गोष्टींना विशेष महत्त्व असते?

दसऱ्याला शमी, आपट्याची पाने आणि शस्त्रपूजन या गोष्टींना विशेष महत्त्व असते.

सीमोल्लंघन म्हणजे काय?

पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करायचे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच महत्त्वाच्या लढाईसाठी निघण्याची त्याकाळी प्रथा होती. याशिवाय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक व्यापारी विदेशात जाऊन व्यापार करायचे. दसऱ्याच्या मुहूर्तावरच शेतकरी वर्ग नवे पीक घरात घेऊन येतात. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

दसरा का साजरा केला जातो?

विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. तसेच दुर्गा देविणे ९ दिवस महिषासुरबरोबर चाललेल्या युद्धात दहाव्या दिवशी वध केला होता. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, असेही सांगितले जाते. म्हणूनच चांगल्या गोष्टीचा वाईटवर विजय म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो.

दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात

छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर मावळे किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी, आई किंवा बहीण त्यांना ओवाळून घेत असे. घरात गेल्यानंतर लुटून आणलेली संपत्ती ते आधी देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असत. या घटनेची आठवण म्हणून सध्याच्या काळात आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे दसरा या सणाबद्दल माहिती, महत्व आणि पूजा  विधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment