कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर संपूर्ण माहिती | KOLHAPUR MAHALAXMI MANDIR INFORMATION IN MARATHI – महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून ज्याला ओळखले जाते तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व तर आहेच, परंतु पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पिठांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर संपूर्ण माहिती | KOLHAPUR MAHALAXMI MANDIR INFORMATION IN MARATHI
नाव | श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर |
निर्माता | चालुक्य राजा कर्ण देव |
जीर्णोद्धारक | चालुक्य राजा कर्ण देव |
देवता | श्री महालक्ष्मी |
वास्तुकला | हेमाडपंथी |
स्थान | करवीर कोल्हापूर महाराष्ट्र |
मूर्तीचे वजन | चाळीस किलोग्रॅम |
मूर्तीची उंची | तीन फूट |
बांधकामातील धातू | हिरक |
मंदिरातील उत्सव | त्र्यंबोली उत्सव, अष्टमी, जागर, रथोत्सव, किरणोत्सव इत्यादी |
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर प्रस्तावना
अंबाबाईची आख्यायिका ही संपूर्ण पुराणात आढळून येते. मोठ्या किमतीच्या दगडा पासून चाळीस किलोग्रॅम वजनाची देवीची मूर्ती बनवली आहे. त्याच्यामध्ये हिरक नावाचा धातू मिसळला आहे. त्याच्यापासून मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो. याची रचना बाहेरच्या बाजूला असलेल्या शिवलिंगासारखी आहे. हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर उभारले आहे. याचे बांधकाम करताना हीरक आणि वाळू यामध्ये मिसळली आहे.
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर नकाशा
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर इतिहास (HISTORY OF KOLHAPUR MAHALAXMI TEMPLE)
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. प्रत्येक इतिहासकारांनी आपली आपली मते मांडलेली आहेत. महालक्ष्मी मंदिर हे साधारणपणे १८०० वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरून लक्षात येते की, हे मंदिर फार पुरातन आहे. शालिवाहन काळात, राजा कर्णदेवाने याची उभारणी केली.. कालांतराने येथे अजून ३० ते ३५ मंदिरे बांधण्यात आली.
सत्तावीस हजार क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे आणि आदी शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मूर्तीची त्यावेळी प्राणप्रतिष्ठापना केली होती असे म्हटले जाते. काही विद्वानांच्या मते, देवळाचा जो जुना भाग आहे, त्याचे बांधकाम उत्तर चालुक्यांच्या काळातील आहे. इतिहासकार मेजर ग्रहण यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त केली होती, त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका व्यक्तीने आपल्या घरात ठेवली होती. नंतर सतराशे बावीस मध्ये दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वैशिष्ट्ये
या मूर्तीच्या एका हातात तलवार, तर दुसऱ्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट आहे. ज्याच्यावर शेषनागाची मूर्ती आहे. पुराण काळानुसार हे मंदिर पाच-सहा हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळी लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली होती. हेमाडपंथी पद्धतीच्या बांधणीनंतर बांधलेल्या या देवळाची पाच शिखरे आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब असे म्हणतात. साखर मिसळलेले दूध नैवेद्य म्हणून दाखवून दहा वाजता शेष आरती केली जाते. रात्रीची आरती देवीच्या गाभाऱ्यात केली जाते आणि त्या नंतर दररोजच्या नियमानुसार मुख्य द्वार व इतर द्वार बंद केली जातात. अशा प्रकारे दिवसातून पाच वेळा या ठिकाणी आरती केली जाते.
महाकाली मातुलिंग, श्रीयंत्र महागणपती आणि महासरस्वती यांची देखील आरती व नैवेद्य दाखवला जातो. दररोज चार वाजता मंदिर उघडते. त्यावेळी मूर्तीला वेगवेगळे कपडे परिधान करून काकड आरती केली जाते. आठ वाजता महापूजा होते. त्यावेळी मंगल आरती गायली जाते. अकरा वाजता भक्तांनी वाहिलेली फुले व हार परिधान केले जातात. यानंतर कापूर जाळून देवीला नैवेद्य दाखवला जातो.
समजा एक दिवस महापूजा झाली नाही, तर पंचामृत ऐवजी दुधाची आंघोळ घातली जाते व त्यानंतर देवीला कपडे परिधान करून आरती गायली जाते. ही प्रक्रिया साधारणपणे दुपारी दोन वाजेपर्यंत चालते. त्यानंतर वेगवेगळे दागिने परिधान करून पूजा केली जाते. संध्याकाळी साडेसात नंतर घंटा वाजवली जाते व आरती केली जाते. या आरतीला भोग आरती असे म्हणतात.
प्रत्येक शुक्रवारी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर दागिने काढले जातात व कोषागरात ठेवले जातात. काही सणांच्या वेळी हे मंदिर वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशमय केले जाते. उदाहरणार्थ – त्र्यंबोली उत्सव, अष्टमी, जागर, रथोत्सव, किरणोत्सव इत्यादी.
कोल्हापूर महालक्ष्मी मुर्तीचे वर्णन (KEY FEATURES OF KOLHAPUR MAHALAXMI STATUE)
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात विराजमान असलेली मूर्ती ही काळ्या पाषाणाची असून, ती उभी असलेल्या स्थितीत आहे. ही मूर्ती साधारणपणे एक मीटर असून, चतुर्भुज अशी असून देवीच्या डावीकडे सिंह आहे. या मंदिराच्या कोरीव कामांमध्ये वेगवेगळे वेद मंत्र कोरले आहेत. या देवीची मूर्ती 40 किलोग्राम वजनाची आहे. मूर्ती घडवताना हिरक नावाचा धातू यामध्ये मिसळला गेला आहे. हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यांवर उभारले गेले आहे. या मूर्तीला चार हात असून, एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल आहे.
उजव्या हातात खालील बाजूस म्हाळुंग, म्हणजेच फळाचा एक प्रकार आहे आणि डाव्या हातात पानाचे ताट असून, डोक्यावर मुकुट आहे. त्यावर शेषनागाची मूर्ती आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर शिलालेख (STONE INSCRIPTION AT KOLHAPUR MAHALAXMI)
मंदिराच्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वरच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून, तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोट्या देवळातील एका खांबावर आहे आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजातून प्रवेश करताना दिसतो.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसर (TEMPLE AREA OF KOLHAPUR MAHALAXMI)
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात असलेल्या शेषशायी व नवग्रहाचे देऊळ, शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शेषशायी मंदिरात विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली दिसते. या देवळामध्ये एक लिंग असून, देवळाच्या समोर सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे, त्यावरील शिल्प आणि कोरीव इतके सुरेख आहे की, त्याची तुलना करता येऊ शकत नाही.
या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकारांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून, त्याच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुदा एखाद्या भाविक जैन राजाने केलेली असावी असे वाटते.
नवग्रह देवळाच्या समोरच्या बाजूला एक सुंदर मंडप असून, या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप असे म्हटले जाते. या मंडपाला हंसाच्या प्रतिकृती, तसेच अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती करण्यात आलेल्या आहेत. एका छोट्या देवळामध्ये महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्य देवाला वाहून येणाऱ्या सात घोड्यांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे.
डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे.
आमचे हे लेख नक्की वाचा :-
- कोल्हापुरातील प्रसिद्ध कणेरी मठ
- परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग
- अप्रतिम अलौकिक मार्लेश्वर
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वैशिष्ट्ये
हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे, नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई, हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. महालक्ष्मी मंदिराच्या भिंतीवर नर्तकी वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, टाळकरी, आरसादेवी, यक्ष, अप्सरा, योद्धे, मृदुंग व किन्नर कोरलेले आहेत.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या आवारात शेषशायी, दत्तात्रय, विष्णू, गणपती यांची अनेक देवळे आणि काशी, मनकर्णिका कुंडे आहेत. या मंदिरात होणारा किरणोत्सव विशेष समजला जातो. वर्षातून एकदा महालक्ष्मीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. काहीजण असेही सांगतात, की तिरुपती म्हणजे भगवान विष्णूचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी, कोल्हापूरला आली. असेही ऐकले जाते की काही वर्षांपूर्वी तिरुपती देवस्थानहुन आलेली शाल दिवाळीच्या दिवशी अंबाबाईला घालण्यात यायची. तसेच दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते, असा तेथील भाविकांचा समज आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या चारही दिशांना एक एक दरवाजा आहे. या मंदिरातील खांब हे न मोजता येणारे आहेत. या मंदिराबाबत असे सांगण्यात येते की मंदिरातील खांब मोजण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तींसोबत वाईट घटना घडल्या आहेत. विज्ञानही या पाठीमागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाहीत.
महालक्ष्मी मंदिरातील व्यवस्था आणि पालखी
अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक भाविक येत असतात. त्यात पुण्या मुंबईवरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेची व्यवस्था ठेवण्यासाठी साधारणपणे २० ते २२ पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा हा उत्सव करण्यात येतो.
त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो. या दिवशी अंबाबाईची पितळेची प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे अश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूर पासून पाच किलोमीटरवर असलेल्या टेंबलाई देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो, त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाई देवीला कोहळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.
महालक्ष्मी मंदिरातील दैनंदिन पूजा पाठ
- सकाळी ०४:०० वाजता -पाद्यपूजा आणि मुखमार्जन
- सकाळी ०५:०० – काकड आरती नैवेद्य:- लोणी आणि साखर
- सकाळी मंदिर उघडल्यानंतर पहाटे ०५:०० वाजता मुखमार्जन आणि पादुकांची पूजा करून, लोणी आणि साखर अर्पण करून देवीची काकडआरती सुरू होते.
- (सकाळी ०५:०० ते सकाळी ०६:०० पर्यंत)
- सकाळची महापूजा
- सकाळी ०८:३० वाजता घंटा वाजवून देवीला पंचामृत अभिषेक, षोडशोपचार पूजा आणि खिरीचा नैवैद्य अर्पण केला जातो.
- पवित्र अन्न (नैवेद्य) सकाळी ९:३०
- दुपारी महापूजा
- पंचामृत अभिषेक षोडशोपचार पूजा सकाळी ११:३० वाजता आणि
- महानैवेद्य पुरणपोळी
- शुक्रवारी रात्री ०८;१५ वाजता मंगलआरती सुरू होते.
- सकाळी ११:३० वाजता
- अलंकार पूजादेवीला महावस्त्र अर्पण करून आणि देवीच्या अंगावर पारंपरिक सोन्याचे दागिने घालून अलंकार पूजा केली जाते.
- दुपारी ०१:३० धुपारती
- रात्री ०८:०० वाजता घंटा वाजते
- ०८:०० वाजता लाडूकरंजाच्या नैवैद्यला अर्पण केल्यानंतर, शंखतीर्थ केले जाते.
- ०८:१५ शेजारती रात्री १०:१५ वाजता शेजारी दूध-साखर द्यायचे.
- रात्री १०:३० वाजता मंदिर बंद होते.
मंदिरात जाण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क
अंबाबाई मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी पाच पासून अकरा पर्यंत आणि दुपारी चार पासून ते रात्री आठ पर्यंतचा वेळ दिलेला आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क कोणत्याही भाविकाला आकारले जात नाही.
कोल्हापूर शहरामध्ये वसलेल्या मंदिरचा पत्ता – महाद्वार रोड, बी वॉर्ड – सी वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६०१२
मंदिरास भेट देण्याची सर्वोत्तम कालावधी
कोल्हापूर या ठिकाणी वसलेल्या महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी वर्षभरात कधीही जाऊ शकता.
अंबाबाई मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे?
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे महालक्ष्मी मंदिर आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही ट्रेन, विमान किंवा बस तसेच खाजगी गाड्यांनी सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकता.
- विमान – कोल्हापूर विमानतळ ते महालक्ष्मी मंदिर यामधील अंतर साधारणता पंचवीस मिनिटांचे म्हणजेच ११ किलोमीटर आहे. विमानतळावरून तुम्ही ऑटो ने किंवा कॅब किंवा बस ने येऊ शकतात.
- ट्रेन – कोल्हापूर रेल्वे स्टेशन पासून अंबाबाई मंदिर १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. म्हणजेच साधारण चार किलोमीटरचे अंतर आहे. तेथून तुम्ही ऑटो कॅब ने पोहचू शकता.
- बस – कोल्हापूर बस स्थानकापासून महालक्ष्मी मंदिर साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथून तुम्ही ऑटो ने मंदिरापर्यंत येऊ शकता.
- खाजगी वाहने – अंबाबाई मंदिरात येणारे भावीक हे संपूर्ण देशभरातून येणारे असतात आणि कोल्हापूरला जोडला जाणारा रोड हा आजूबाजूच्या शहरांनाही जोडला गेल्यामुळे भाविकांना स्वतःच्या खाजगी गाडीने येणे सोयीस्कर होते.
- मुंबई ते कोल्हापूर – मुंबई ते कोल्हापूर पुणे मार्गे साधारणता सात तासाचे म्हणजेच जवळपास ३८० किलोमीटरचे अंतर आहे.
- पुणे ते कोल्हापूर – पुणे ते कोल्हापूर साधारण साडेचार तासाचे म्हणजेच जवळपास दोनशे तीस किलोमीटरचे अंतर आहे.
अंबाबाई मंदिरातील धर्मशाळा
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या जगभरातील लाखो भाविकांसाठी महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टमार्फत जसे भोजन प्रसाद मोफत देण्यात येतो. त्याचप्रमाणे या ट्रस्टने आणखी एका सामाजिक उपक्रमात एक पाऊल पुढे टाकून येणाऱ्या भाविकांसाठी अल्प दरात राहण्याची सोय व्हावी म्हणून सर्व सोयींनी युक्त अशी धर्मशाळा उभारली. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय पाहून ही धर्मशाळा बांधण्यात आली ही धर्मशाळा मंदिरापासून अगदी जवळ आहे.
या धर्मशाळेत २४ सुसज्ज आणि सर्व सोयी नियुक्त खोल्या आहेत. या धर्मशाळेची आतली सजावट अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पार्किंग व्यवस्था, लिफ्टची सोय, जनरेटर, पाण्याची सोय, स्वच्छता ही अधर्म शाळेची वैशिष्ट्य आहेत. ही धर्मशाळा येणाऱ्या भाविकांसाठी २४ तास खुली आहे तसेच येथे काम करणारे कर्मचारी सुद्धा नम्र आणि प्रामाणिक आहेत. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकार प्रकारचा त्रास होत नाही.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर जवळील पर्यटन स्थळे
कोल्हापूर हे जसे ऐतिहासिक शहर आहे, तसेच निसर्ग सौंदर्य याचा अमोल ठेवा असलेले हे शहर आहे. विविधतेने नटलेले इथले पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावत असते. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि प्रत्येक शहरातून कोल्हापूरला हायवे जोडला गेला असल्यामुळे, येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर हे शहर पर्यटनासाठी सोयीस्कर वाटते.
मंदिराखेरीज कोल्हापूर मधील आणखीन काही पर्यटन स्थळे
- दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर
- प्राचीन खिद्रापूर मंदिर
- रंकाळा तलाव
- भवानी मंडप
- न्यू पॅलेस
- पंचगंगा नदी घाट
- विशाळगड
- पन्हाळगड
- दाजीपूर अभयारण्य
- राधानगरी धरण
- श्री क्षेत्र नृसिंहवाडी
ही कोल्हापुरातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर तिथून तुम्हाला जावेसे वाटणार नाही याची खात्री आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराजवळील हॉटेल्स
कोल्हापूर शहर हे पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. या शहरातील या मंदिराजवळील काही राहण्याची चांगली हॉटेल्स –
- यशदा विश्राम धाम
- हॉटेल हॅपी होम्स
- हॉटेल रॉयल कोल्हापूर
- हॉटेल ओशो
- सोळंकी गेस्ट हाऊस
- हॉटेल रामकृष्ण
- हॉटेल बकुळ
- हॉटेल तुलसी
कोल्हापूर मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो तांबडा पांढरा रस्सा आणि नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. हे दोन पदार्थ फारच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर कोल्हापुरी चटणी, दावणगिरी लोणी डोसा याची सुद्धा खासियत आहे. सुके मटण, खिमा हे प्रकार संपूर्ण कोल्हापुरात आहेत.
त्याचबरोबर तिथल्या पोळ्या म्हणजेच चपात्यांची एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली गरम चपाती अप्रतिम लागते. या ठिकाणची पोकळा नावाची पालेभाजी सुद्धा अप्रतिम लागते. येथे मिळणारी भाकरी आणि खर्डा सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी कथा
कथा १)
राक्षस केशीचा पुत्र कोल्हासुर यांने अत्याचार माजवला होता. या अत्याचाराला कंटाळून सगळ्या देवतांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली. त्यामुळे महालक्ष्मी मी दुर्गेचे रूप धारण करून आपल्या हत्याराने त्याचा शिरच्छेद केला. कोल्हासूराच्या मुखातून निघणारा दिव्य प्रकाश थेट श्री महालक्ष्मीच्या मुखात शिरला. अश्विन पंचमीला त्याची हत्या झाली त्यामुळे मरणापूर्वी त्यांने या परिसराचे नाव कोल्हापूर किंवा करवीर राहावे असे वरदान मागितले होते. मात्र कालांतराने कोल्हापूर झाले पण करवीर मात्र तसेच राहिले.
कथा २)
राजा दक्षाच्या यज्ञात सतीने स्वतःचा त्याग केला होता आणि भगवान शंकर तिचे शरीर स्वतःच्या खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वात फिरत होते. त्यानंतर विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे विभाग कापले ते पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. असे म्हणतात की सतीची नजर जिकडे पडली तिथे लक्ष्मी प्रकट झाली.
करवीर म्हणजेच कोल्हापूर हे देवीचे असे पवित्र स्थान आहे ज्याला दक्षिणेची काशी मानले जाते. साधारणपणे कोणतेही तीर्थक्षेत्र देवी किंवा देवता या नावाने ओळखले जाते. पण कोल्हापूर म्हणजेच करवीर हे ठिकाण एका राक्षसाच्या नावाने ओळखले जाते.
कथा ३)
गरुडाचल नावाचे एक मुनी आपल्या माधवी नावाच्या कन्येसह विष्णूंच्या भेटीस आले. त्यावेळी विष्णूंनी त्यांचा आदर सत्कार केला. माधवी ही वयाने लहान असल्यामुळे नकळतपणे विष्णू जवळ जाऊन बसली. हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला तू घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला. हे एकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी कोल्हापुरात आली व तीने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी असे ठेवले.
कथा ४)
एकदा भ्रुगु ऋषी भगवान विष्णूकडे आले होते त्यावेळी विष्णू निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी विष्णूंचे पायाचे जवळ बसली होती. आपले स्वागत केले नाही याचा राग म्हणून महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला. शांत करण्यासाठी भगवान विष्णूने त्यांची क्षमा मागितली आणि भृगुणचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूचे वागणे पाहून देवी लक्ष्मी ना क्रोध अनावर झाला. त्या रागाने त्यांनी वैकुंठ सोडला आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली.
देवी लक्ष्मी वैकुंठा मध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूर मध्ये भव्य देवस्थान मध्ये तिचा वास आहे अशी आख्यायिका आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंत्र (MAHALAXMI MANTRA)
देवी महालक्ष्मीची पूजा आणि मंत्र श्रद्धेने केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते व आपल्याला चांगले फळ देते. शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीचा मानला जातो. ज्या घरा देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्या घरावरील सर्व संकटे दूर होतात आणि ऐश्वर्य सुख समाधान लागते.
ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम: ।
ऊँ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा ।
या मंत्राचा उच्चार केल्याने पैशांसंबंधी सगळी संकटे दूर होतात. तसेच कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।
श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:|
या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यावर व्यक्तीला लाभ प्राप्त होतो. लक्ष्मी नारायण नम: या मंत्राचे नामस्मरण केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा सहवास राहतो आणि घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर उत्सव
१) श्री महालक्ष्मी किरणोत्सव
महालक्ष्मी मंदिरात केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे किरणोत्सव. हा दरवर्षी वर्षातून दोनदा साजरा केला जातो. साधारणपणे मार्च आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये हा सोहळा साजरा करण्यात येतो. ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हजारो भावीक कोल्हापूरमध्ये येत असतात.
०२) श्री महालक्ष्मी रथोत्सव
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजेच आई अंबाबाईचे प्रामुख्याने मंदिरामध्ये जे उत्सव साजरे केले जातात त्या उत्सवांपैकी मुख्य उत्सव म्हणजे रथोत्सव आहे. या रथोत्सवाच्या दिवशी श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. ज्योतिबा डोंगरावरील भावीक गावी जाताना आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. संध्याकाळी साधारणतः सात ते साडेसातच्या सुमारास
नवकोट नारायणी
भक्तजन प्रतिपालिनीदिनोद्धारिणी
जगदोद्धारिणीचतूर्धारिणी
प्रतिपालिनी राजराजेश्वरी
सर्वेश्वरी श्री करवीर निवासिनी
श्री महालक्ष्मी |
अशा प्रकारच्या ललकारीने देवीची उत्सव मूर्ती सनई ताशांच्या धामधुमीत, श्री पूजक रथामध्ये घेऊन येतात. त्यानंतर उत्सव मूर्तीची पूजा बांधण्यात येते.
०३) नवरात्र
या ठिकाणी अश्विन महिन्यात म्हणजेच साधारण ऑक्टोबरच्या आसपास नवरात्रोत्सव दहा दिवस साजरा केला जातो. या काळात मंदिराच्या रोजच्या पूजापाठा मध्ये बदल केला जातो. सकाळी साडेआठ पासून साडेअकरा वाजेपर्यंत अभिषेक आणि त्यानंतर महानैवेद्य आणि आरती केली जाते. त्यानंतर दुपारी दोन वाजता महालक्ष्मी देवी सर्व दागिन्यांनी सजवली जाते.
नवरात्रीतील या दहा दिवसात रात्री साडेनऊ वाजता देवीची मूर्ती फुलांनी आणि दिव्यांनी सजवली जाते आणि त्या मंदिर परिसरात मिरवणूक काढली जाते. रात्री साडेदहाच्या दरम्यान कार्यक्रमाची सांगता होते. या दहा दिवसात महालक्ष्मी मंदिराच्या सेवा ट्रस्ट तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोल्हापूरमध्ये हा नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये येतात. नऊ दिवसांचा हा उत्सव सोहळा असतो.
या काळात देवीचे दर्शन घेतल्यानंतर येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. नवरात्रात नऊ दिवस महालक्ष्मी देवीची वाहन पूजा बांधली जाते. पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची या ठिकाणी प्रथा आहे. या काळात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळद कुंकू वाहून, तांब्या पितळीच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर दूध घालून उडवायच्या व देवी समोर हे धरून फुंकायच्या असतात. या घागरी ठोकणाऱ्या स्त्रियांच्या अंगात महालक्ष्मीचा संचार होतो आणि त्या स्त्रिया भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. त्या इच्छा पूर्ण होण्याचे उपाय देखील सांगतात, असा तेथील लोकांचा समज आहे
नवरात्रीच्या काळात देवीच्या मूर्तीला दररोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात पुजले जाते.
- करवीर निवासिनी अंबाबाईची पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपात पुजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची दुसऱ्या दिवशी दशभुजा महाकाली पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची तिसर्या दिवशी श्री अष्टदशभुजा महालक्ष्मी रूपात पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची चौथ्या दिवशी अष्टभुजा महासरस्वती रूपात पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची पाचव्या दिवशी गजारूढ़ अंबाबाई रूपात पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची सहाव्या दिवशी श्रृंगेरी शारदांबा रुपात पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची सातव्या दिवशी श्री भुवनेश्वरी रुपात पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची आठव्या दिवशी महिषासुर मर्दिनी पूजा
- करवीर निवासिनी अंबाबाईची नवव्या दिवशी आदीमाया अंबाबाई रुपात पूजा
अशा प्रकारे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातील संस्थेचे उपक्रम
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर अन्नछत्र
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असणाऱ्या आपल्या कोल्हापूर या तीर्थक्षेत्राचा महिमा आपण सर्व जाणताच. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या आपल्या करवीर नगरीमध्ये साक्षात श्री दत्तगुरू माध्यान्ह भोजनासाठी येतात याहून भाग्य कोणते असेल. अशा या पवित्र ठिकाणी जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. करवीर निवसिनीच्या दरबारात भाविकांना मोफत भोजनप्रसाद देण्याच्या हेतूने आणि अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊन सन २००८ साली श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेचा शुभारंभ केला गेला .
सेवाभावी वृत्तीने सुरु केलेल्या या कार्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. परगावाहून आलेले सुमारे तीन ते पाच हजार भाविक रोज आपल्या अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत. उत्सवकाळात हा आकडा दहा हजारांहून अधिक होतो.
महालक्ष्मी नेत्रोपचार केंद्र
ट्रस्टने श्री महालक्ष्मी नेत्रोपचार केंद्राची स्थापना केली. प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. कीर्ती ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरु आहे.
महालक्ष्मी दंतोपचार केंद्र
या ट्रस्ट तर्फे श्री महालक्ष्मी दंतोपचार केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात होणाऱ्या उपचारात ५० ते ६० % सवलत दिली जाते.
महाकुंकूमार्चन सोहळा
दरवर्षी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सकल सौभाग्यदायी कुंकुमार्चन उपासनेचे आयोजन केले जाते.
त्र्यंबोली यात्रा
ट्रस्टतर्फे त्र्यंबोली यात्रेला मोफत बससेवा देण्यात येते. या उपक्रमामुळे भाविकांची त्र्यंबोली यात्रेला जाण्याची उत्तम सोय होते.
शिवभोजन थाळी योजना
न्नछत्र सेवा ट्रस्ट, ताराबाई रोड येथे श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये हे शिवभोजन केंद्र सुरु आहे.
FAQ
महालक्ष्मी मंदिरासाठी पास आवश्यक आहे का?
कोरोना काळामध्ये भाविकांना दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास अनिवार्य करण्यात आला होता. परंतु कोरोना काळानंतर आता कोणताही पास अनिवार्य नसून भाविकांना कोणत्याही नियमांशिवाय देवीचे दर्शन घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे
कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर का प्रसिद्ध आहे?
आदिपुराणांमध्ये या मंदिराचा उल्लेख केलेला आढळून येतो. कोकणचा राजा कामदेव यादवांनी या शहराला भेट दिल्याचे पुरावे आहेत आदीशंकराचार्यांनीही या मंदिराला भेट दिली आहे म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे
कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी किती वेळ लागतो?
महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांवर आणि तेथे होणाऱ्या गर्दीवर हा वेळ अवलंबून असतो. परंतु साधारणता एक तास ते दीड तासापर्यंत चा वेळ लागू शकतो.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले?
कोल्हापूर महालक्ष्मीचे मंदिर राजा कर्णदेवाने चालुक्य राजवटीत बांधल
महालक्ष्मी मंदिर कोठे आहे?
महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे.
महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती किती वजनाची आहे?
महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती साधारणपणे ४० किलो वजनाची आहे.
महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती किती उंचीची आहे?
महालक्ष्मी मंदिरातील देवीची उंची साधारणपणे तीन फूट उंचीची आहे.
फोटो गॅलरी (KOLHAPUR MAHALAXMI PHOTO)
निष्कर्ष
मित्रांनो,
या मंदिरा बाबतचा इतिहास आणि याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील तर त्याही आम्हाला कळवा, आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती द्वारे.
नवीन विषय, नवीन लेख
नमस्कार.