पितृ पक्ष संपूर्ण माहिती मराठी | Pitru Paksha Information In Marathi – हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो १५ दिवस चालतो. असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धी देतात. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
म्हणूनच हिंदू धर्मात पितृ पक्षाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरला सुरू होऊन १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. पितृपक्षात काय करावे? काय करू नये? श्राद्धविधी कसे केले जातात? या बाबतची माहिती आज आम्ही या लेखाद्वारे घेऊन आलो आहोत.चला तर मग,पाहुयात पितृपक्ष.
पितृ पक्ष संपूर्ण माहिती मराठी | Pitru Paksha Information In Marathi
आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या तिथीला ते कुटुंब त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करतात. या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे आपण स्मरण करतो. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ किंवा कनिष्ठ मुलगा स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे किंवा पांढरे धोतर परिधान करतात.
श्राद्ध करणार त्या ठिकाणी पूर्वजांचे छायाचित्र ठेवले जाते. या विधीत काळे तीळ आणि जवसच्या बियांचा उपयोग केला जातो. पिंडदान करताना पूर्वजांना भाताच्या गोळ्यांच्या रूपात पिंड अर्पण केले जातात. यानंतर जल, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते.यानंतर पूर्वजांना नैवेद्य दाखवून त्यांच्या आठवणीने ब्राम्हणाना आणि सवाशिण स्त्रीला जेउ घातले जाते.
अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठी
यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर, शनिवारी १४ ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. गणपती, गौरी यानिमित्ताने ज्याप्रमाणे सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. त्यानिमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंब यांसाठीचे त्यांचे योगदान याबद्दल माहिती संबंधितांना मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने त्यांच्या वंशजांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्याला प्रेरणा मिळत राहते.
पितृपक्ष म्हणजे काय ?
पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा होय. पितृपक्ष आपण पूर्वजांचे पिंडदान करतो त्याला काही ठिकाणी म्हाळ किंवा महालय असे म्हणतात. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे पूर्वज- पितर या काळात पितृलोकातून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते.
पितृपक्ष २०२३ कधी आहे ?
हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा २९ सप्टेंबर२०२३ पासून सुरू होत आहे, तसेच १४ ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध विधी केले जातात. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध कर्म करू शकतो. या दिवसाला सर्वपित्री श्राद्ध योग किंवा सर्वपित्री अमावस्या देखील म्हणतात.
पौर्णिमा श्राद्ध – | २९ सप्टेंबर २०२३ |
प्रतिपदा श्राद्ध – | ३० सप्टेंबर २०२३ |
द्वितीया श्राद्ध – | १ ऑक्टोबर २०२३ |
तृतीया श्राद्ध – | २ ऑक्टोबर २०२३ |
चतुर्थी श्राद्ध – | ३ ऑक्टोबर २०२३ |
पंचमी श्राद्ध – | ४ ऑक्टोबर २०२३ |
षष्ठी श्राद्ध – | ५ ऑक्टोबर २०२३ |
सप्तमी श्राद्ध – | ६ ऑक्टोबर २०२३ |
अष्टमी श्राद्ध – | ७ ऑक्टोबर २०२३ |
नवमी श्राद्ध – | ८ ऑक्टोबर २०२३ |
दशमी श्राद्ध – | ९ ऑक्टोबर २०२३ |
एकादशी श्राद्ध – | १० ऑक्टोबर २०२३ |
द्वादशी श्राद्ध – | ११ ऑक्टोबर २०२३ |
त्रयोदशी श्राद्ध – | १२ ऑक्टोबर २०२३ |
चतुर्दशी श्राद्ध – | १३ ऑक्टोबर २०२३ |
अमावस्या श्राद्ध – | १४ ऑक्टोबर २०२३ |
पितृपक्ष पंधरवडयाचे महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम आहे, जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो. पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध तर्पण म्हणजेच पिंडदान केले जाते. असे समजले जाते की, पितरांशी संबंधित काम केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समाधान प्राप्त होते. पिंडदान करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर पितर प्रसन्न होतात, त्यांना आशीर्वाद देतात, तसेच पितृदोषाची भीती नाहीशी होते.
श्राद्धशी संबंधित आख्यायिका
महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी मृत्यू झाला, त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गात गेला. ट्याठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती म्हणून त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले, त्यावेळी इंद्राने कर्णाला सांगितले की, त्याने आयुष्यभर सोने दान केले,परंतु आपल्या पूर्वजांना श्राद्धात कधीही अन्न दिले नाही.
त्यावेळी कर्ण म्हणाला की, तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी, कर्णाला १५ दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली जेणेकरून तो हे श्राद्ध करू शकेल आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल.त्यावेळपासून हा काळ पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो.
पूर्वजांचा फोटो कसा लावावा ?
बहुतेक घरांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात. असे फोटो लावणे चुकीचे नाही, फोटो घरात चुकीच्या दिशेने लावले तर त्याचा नकारात्मक परिणाम घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर होतो. वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते. याशिवाय,ज्याठिकाणी आपली किंवा घरात येणाऱ्या व्यक्तीची नजर जाईल अश्या ठिकाणी फोटो लावू नयेत. त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात कलह निर्माण होतो आणि सुख-समृद्धी राहत नाही.
पूर्वजांचे फोटो या दिशेला ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीमध्ये ठेवावा. शास्त्रात दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली आहे.
पूर्वजांचे फोटो लटकवू नका.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे चित्र किंवा फोटो टांगू नये. ते नेहमी लाकडी स्टँडवर बसवून घ्यावेत.
या ठिकाणी फोटो लावू नका.
पूर्वजांचे फोटो घरच्या बेडरूममध्ये, पूज्यघरात, घराच्या मध्यभागी आणि स्वयंपाकघरात लावू नये. असे केल्याने कौटुंबिक शांतता बिघडते असे मानले जाते.
पूर्वजांचे आणि देवांचे स्थान वेगळे.
सामान्यतः लोक पूजेच्या ठिकाणी पूर्वजांची चित्रे, फोटो ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. परंतु शास्त्रात पितरांचे स्थान उच्च मानले गेले असले तरी पितरांचे आणि देवांचे स्थान खूप वेगळे आहे. पूर्वजांचे आणि देवांचे फोटो एकत्र लावल्याने त्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.
जास्त फोटो लावू नका.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे अनेक फोटो ठेवू नयेत. तसेच ज्याठिकाणी आपली किंवा घरात येणाऱ्या व्यक्तीची नजर जाईल अश्या ठिकाणी फोटो लावू नयेत. असे समजले जाते की, अश्या फोटोंमुळे घरात नकारात्मकता निर्माण होते.
जिवंत लोकांसोबत चित्र लावू नका.
वास्तुशास्त्रानुसार, जिवंत व्यक्तीच्या चांगल्या आठवणींचे फोटो,पेंटिंग्स आपण आपल्या घरामध्ये लावत असतो. त्या फोटोंबरोबर पितरांचे फोटो कधीही लावू नये. असे केल्याने घरातील जिवंत लोकांचे आयुष्य कमी होते असे समजले जाते.
असे केल्याने पितरांना आनंद होतो
पितृ पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच भोजन दिले पाहिजे. पितृ पक्षात पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी दिल्याने विशेष लाभ होतो. त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात.
पितृपक्षातील नियम
- प्रत्येक जीवाचा आदर करावा. या दरम्यान पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात म्हणून दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये.
- पितृपक्षात आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये.
- शास्त्रानुसार पिंडदान करून आणि ब्राह्मणभोजन घालून पितरांचे श्राद्ध करावे.
- ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे.
- पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व आहे.
- पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, दर्भ, अक्षता, फुले आणि काळे तीळ घेऊन त्यांना आमंत्रित करा.
- कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. पितृपक्षात कावळ्यांना खायला द्यावे.
- पितृपक्षात तसेच कधीही गायीचा अपमान करू नये. पशू-पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे.
- पितृपक्षात श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्यांच्या घरी श्राद्ध करू नये.
- पितृपक्षात ज्याने श्राद्धाचे कर्म केले आहे त्याने श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर रात्री भोजन करू नये.
- यादिवशी खोटे बोलणे,भांडण करणे ,वाद घालणे टाळावे.
- या दरम्यान नवीन वस्त्र धारण करू नये. नवीन वस्त्र किंवा वस्तू खरेदी करू नये.
हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी
पितृ पक्षामध्ये काय करावे?
- पितृ पक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे.
- पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. दर्भ वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात असे म्हटले जाते.
- पितृ पक्षात दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर जल अर्पण करावे. त्याचबरोबर संध्याकाळी दिवा दक्षिण दिशेला लावावा.
- पितृ पक्षात दररोज आंघोळ करताना पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात.
- धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी बाहेर अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा यांना खायला घातले म्हणजे त्यांच्याद्वारे आपले अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते.
- जर आपण पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना पिंडदान केले तर या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते.
- वास्तुशास्त्रानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि रोज सकाळी मुख्य दरवाजात पाणी टाकावे.
- पितृ पक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे.
- पूर्वजांचे श्राद्ध सकाळी ११.३० ते ०२.३० या वेळेतच करावे.
पितृ पक्षात काय करू नये?
- पितृ पक्षात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृ पक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते.
- पितृ पक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानले जाते.
- पितृपक्षात आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये.
- पितृपक्षात केस कापू नयेत, असे करणे वर्ज्य मानले जाते. घरात कोणतेही नवीन काम किंवा शुभ कार्य आयोजित करू नये, असे केल्याने पितरांना राग येतो.
- पितृपक्षात श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्यांच्या घरी श्राद्ध करू नये.
- पितृ पक्षात श्राद्ध करताना स्वत: न करता श्राद्धकर्म करणाऱ्या पुरोहितांकडून करून घेणे.
- पितृ पक्षात पूर्वजांचे श्राद्ध दुपारनंतर करू नये.
पितृपक्ष माहिती पिंडदान साहित्य (Pitrupaksh Information)
तांदूळ | बुका | काळे तीळ | नारळ |
विडयाची पाने | सुपारी | सुटे पैसे | समई |
निरांजने | तेल | तूप | गोमूत्र |
ताम्हण | पळी | तांब्या | पंचपात्र |
फुले | पांढरी फुले | पाट | पत्रावळी |
द्रोण | दर्भ | तुळशी | जानवे |
माचिस | वस्त्रे | भस्म | अगरबत्ती |
पितृपक्षातील शिधा साहित्य
तांदूळ |
तुरडाळ |
कोणतीही भाजी किंवा बटाटा |
रवा |
गूळ |
पितृपक्षातील जेवण कसे असावे ?
भात | वरण |
भाजी पाच प्रकार | अळू |
कोशिंबीर | वडे |
लिंबू | खीर |
आल्याचा तुकडा | पापड |
पिंडदान विधी कसा करावा ?
- सकाळी उठून, संपूर्ण घर स्वच्छ करून, स्नान करून, पूजेची आणि श्राद्धाची तयारी करावी.
- घराच्या अंगणात रांगोळी काढावी.
- सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यावी.
- पिंडदानाचे सर्व साहित्य एक ठिकाणी ठेवावे.
- महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे.
- घरातील महिलेने पिंडसाठी भात करून घ्यावा.
- भटजीना आमंत्रण देऊन पितरांची पूजा, तर्पण करून घ्यावे.
- पितरांसाठी केलेले जेवण पितरांना दाखवून घ्यावे.
- घरातील सर्वांनी पिंडाला नमस्कार करून घ्यावा.
- पिंडाचे कार्य झाल्यानंतर पितरांसाठी वाढलेले जेवण, पिंड आणि साहित्य विसर्जित करावे.
- गाय, कुत्रा, कावळा यांना जेवणातील पाने वाढून त्यांना ठेवावीत.
- ब्राह्मणाला आणि सवशिनीला आदरपूर्वक जेवू घालावे.
- ब्राह्मणाला आणि सवाशिणीला दक्षिणा देऊन तृप्त करावे.
- ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत.
- सवाशिणीची ओटी भरावी.
- त्यानंतर घरातील सदस्यांनी जेवून घ्यावे.
पितृपक्ष श्राद्ध विधी कोणी करावे?
पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि अन्त्य विधीसाठी मोठ्या किंवा सर्वात लहान मुलग्याचे स्थान प्रथम येते. श्राद्ध कर्म, पिंड दान आणि तर्पण विधी करण्यासाठी फक्त मोठ्या किंवा सर्वात लहान मुलग्याला पात्र मानले जाते. पण मुलगाच नसेल तर श्राद्ध करण्याचा अधिकार शास्त्रात कन्या किंवा पत्नीला दिलेला आहे.
रामायणात याचा संदर्भ आढळून येतो. ज्यावेळी वनवासात भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण हे राजा दशरथाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते त्यावेळी राम आणि लक्ष्मण यांना श्राद्धचे साहित्य आणण्यासाठी बराच वेळ लागला होता. त्यावेळी आकाशवाणी झाली की पिंडदानाची वेळ निघून चालली आहे. यानंतर माता सीतेला दशरथ राजाच्या आत्म्याचे दर्शन झाले आणि त्यांनी माता सीतेला वेळेवर पिंडदान करण्यास सांगितले. म्हणूनच माता सीतेने केतकीचे फूल, फाल्गु नदी आणि गाय यांच्या साक्षीने पिंडदान केले होते. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली.
मोठा किंवा लहान मुलगा नसेल तर सून किंवा पत्नी यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकुलती एक मुलगी यांचा समावेश होतो. जर पत्नी नसेल तर भाऊ, पुतणे, नातू, किंवा पुतण्या यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. जर ते नसतील तर केवळ शिष्य, मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबाचे पुरोहित सुद्धा श्राद्ध करू शकतात. म्हणजेच पुरुषांव्यतिरिक्त महिलांना देखील पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याचा अधिकार आहे.
पितृपक्ष चांगला की वाईट ?
आपल्या समाजात पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत. जो जन्माला आला आहे, त्याचा कधी ना कधी मृत्यू हा आहेच. पृथ्वीवरील हे एक शाश्वत सत्य आहे.आत्म्याला आपण चैतन्य म्हणू शकतो. प्रत्येक जिवंत माणूस म्हणजे त्याचे शरीर आणि आत्मा. गणिती सूत्रात सांगायचे म्हटले तर जिवंत माणूस वजा मृत माणूस म्हणजे त्याचा आत्माहोय. एखादा माणूस मरण पावला की त्याचे पार्थिव शरीर नष्ट होते, परंतु आत्मा कधीही नष्ट होत नसतो. आत्मा अनंतात विलीन झाला, की माणसाच्या आत्म्याला शांती मिळते, असे आपण समजतो.
पितरांना संतुष्ट करण्यासाठी जो विधी केला जातो, त्याला ‘श्राद्ध’ म्हणतात. शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की,आपल्या पूर्वजांचे मृत आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या वंशजांच्या घरी राहायला येतात त्यांच्याविषयी प्रेम, आठवण व आदर व्यक्त करण्यासाठी भाद्रपद कृष्ण पक्षात दर दिवशी महालय-श्राद्ध करावे, परंतु हे शक्य झाले नाही, तर ज्या तिथीला आपले पूर्वज मरण पावले असतील त्या तिथीला आपल्या सर्व पितरांच्या आठवणीने महालय-श्राद्ध करण्यास सांगण्यात आले आहे.
हे श्राद्ध करताना माहेर, सासरकडील पूर्वजांचा म्हणजेच पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील, त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख यावेळी केला जातो. कावळ्याला आत्मा दिसतो अशी आपली सगळ्यांचीच एक समजूत आहे. म्हणूनच माणूस मरण पावल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळाली की नाही, ते कावळ्याने पिंडाला केलेल्या स्पर्शावरून तपासले जाते.
पिंडाजवळ आत्मा असेल, तर कावळा पिंडाला स्पर्श करीत नाही. जर आत्म्याला शांती मिळाली असेल, तर कावळा पिंडाला स्पर्श करतो, अशी श्रद्धा आहे. हल्लीच्या पुढारलेल्या काळात श्रद्धापूर्वक रक्तदान, अन्नदान, अर्थदान, ज्ञानदान, वस्त्रदान, श्रमदान, जलदान करूनही पूर्वजांप्रति कृतज्ञता,प्रेम व्यक्त करून श्राद्ध करण्याची पद्धतही हळूहळू आपल्याला पाहायला मिळते. श्राद्ध घालणे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.त्यामुळे पितृपक्ष चांगला की, वाईट हा देखील ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.
पितृपक्षाबाबत समज-गैरसमज
पितृपक्षाविषयी आपल्या समाजात अनेक समज-गैरसमज आढळून येतात. काहींच्या मते, ‘पितृपक्ष हा वाईट / अशुभ आहे. त्यामुळे या काळात विवाह,मुंज साखरपुडा,बारसा यासारख्या शुभकार्यांची बोलणी करू नयेत, तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी, विक्री करायची नसते. समजा खरेदी केली, तरी त्याचे पैसे द्यायचे नाहीत, पैशांची देवघेव करायची नसते,’ असे देखील म्हटले जाते. परंतु त्यात काहीही तथ्य नाही. पितृपक्ष हा वाईट किंवा अशुभही नसतो.
आपण विचार केला, की आपल्या लक्षात येईल की, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, लाहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले, घरदार, जमीन, धन-संपत्ती ठेवली अश्या पूर्वजांचे आत्मे पंधरा दिवसांसाठी आपल्या घरात राहायला येणार असतील, तर ते अशुभ कसे असू शकते? आपल्यात झालेले चांगले बदल, चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्यांना आनंद – समाधान वाटून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतील. पण आपले पूर्वज जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील, त्यांना त्रास दिला असेल तर मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु शक्यतो असे कोणीही करत नाही.
आपण ते जीवंत असताना त्यांचा नीट सांभाळ करतो. त्यामुळे या गोष्टीचा आपल्याला आनंदच वाटला पाहिजे. महालय श्राध्द यात ज्या तिथीला आपल्या कुटुंबातील मृत्यू झाला त्या तिथिला श्राध्द करावे. पंधरा दिवसात ज्या तिथीला स्वर्गवास झाला असेल त्या तिथीला श्राध्द करावे याला महालय श्राध्द असे म्हणतात. ज्याला तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला श्राध्द करतात. विज्ञानाच्या आधुनिक जगामध्ये समज जरूर असावेत, परंतु अंधश्रद्धा आणि गैरसमज असता कामा नये. पितृपक्षातील पंधरा दिवस आर्थिक व्यवहार ठप्प होऊन चालणार नाही. हे देखील आपण समजून घेतले पाहिजेत.
श्राध्दविधीत पिंडदान, तर्पण विधी, ब्राम्हण भोजन सांगण्यात आले आहे. काकवास म्हणजेच कावळ्याला घास द्यावा असे सांगण्यात आले आहे. श्राध्दविधीला विशेष महत्व आहे. ज्यावेळी काकवास दिला जातो. त्यावेळी कावळा त्याला स्पर्श करेपर्यंत थांबण्याची गरज नाही. दहाव्या दिवशी जेव्हा पिंडदान केले जाते तेव्हा कावळा घास घेईपर्यंत थांबावे लागते. श्राध्दविधीत काकवास घेईपर्यंत थांबण्याची गरज नाही.
कावळ्यांना का मानलं जातं पितर?
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. समुद्र मंथनावेळी सर्व देवतांसोबत कावळ्यांनी देखील अमृत प्राशन केले होते. या कथेनुसार असे मानले जाते की, कावळ्यांचा मृत्यू कधीही नैसर्गिक रित्या होत नाही. तसेच कावळा हा पक्षी कितीही प्रवास केला तरी थकत नाही. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा आत्मा कावळ्याच्या शरीरामध्ये वास करू शकतो. आणि एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतो.
यामुळेच पितृपक्षामध्ये कावळ्यांना जेवण दिले जाते. तसेच, धार्मिक मान्यतेनुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याचा जन्म कावळ्याच्या योनीमध्ये होतो. याच कारणामुळे कावळ्यांच्या माध्यमातून पितरांना जेवण दिले जाते. तसेच पितृपक्षामध्ये केवळ कावळ्यालाच नाही तर गाय आणि कुत्रा यांना सुद्धा जेवण दिले जाते. एका पौराणिक कथेनुसार, एके दिवशी इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायावर चोच मारली होती.
चोच मारताना प्रभू श्रीरामांनी पाहिलं. त्याचवेळी प्रभू श्रीरामांनी एका निशाण्यावर कावळ्याचा एक डोळा फोडला. या गोष्टीचा पश्यताप होऊन कावळ्याने श्रीरामांची माफी मागितली. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी त्याला वरदान दिले की, पितृपक्षामध्ये तुझ्या रूपाने दिलेले जेवण पितृलोकामध्ये निवास करणाऱ्या पितरांना प्राप्त होईल. यामुळेच कावळ्यांना पितर मानले जाते.
पितृपक्ष कथा
एका आख्यायिकेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते. दोघेही वेगळे राहत होते. त्यातील जोगे हा श्रीमंत होता आणि भोगे हा अतिशय गरीब होता. परंतु दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते. जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता, परंतु भोगेची पत्नी मात्र अत्यंत साध्या मनाची होती. एके दिवशी जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले. परंतु हे कार्य व्यर्थ आहे, असे समजून जोगेने ते टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पत्नीला समजले की, त्यांनी हे कार्य केले नाही तर लोक अनेक गोष्टी घडवून आणतील. मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना देखील मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची ही एक संधी असल्याचे वाटले.
त्यावेळी ती आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको, म्हणून हे कार्य करण्याचे नाही म्हणत असाल, तर हे करून मला काहीही त्रास होणार नाही. माझ्या मदतीला मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन. दोघी मिळून सर्व कामे करू आणि असे म्हणून तिने जोगेला आपल्या माहेरी भोजनाचे निमंत्रण घेऊन पाठवले. दुसऱ्या दिवशी तिने भोगेच्या पत्नीला बोलावले. भोगेची पत्नी पहाटे आली आणि कामाला लागली. तिने सर्व स्वयंपाक केला. अनेक पदार्थ केले. आणि सर्व कामे उरकून ती तिच्या घरी गेली. अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध करायचे होते.
यावेळी जोगेच्या पत्नीने तिला कार्यासाठी थांबवले नाही, आणि ती थांबली देखील नाही. दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. जोगे आणि भोगेचे पूर्वज आधीच्या जोगेच्या घरी गेले. बघितले की, त्या ठिकाणी सासरचे लोक जेवणात व्यस्त आहेत. निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले. त्या ठिकाणी पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली जात होती. पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी निघून गेले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र येऊन आपापल्या श्राद्धाबद्दल बोलत होते. जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले, आणि विचार करू लागले की, भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते. पण भोगेच्या घरी भाकरी सुद्धा खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली.
अचानकपणे ते नाचू लागले. “भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे”. संध्याकाळ झाली तसे भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही. त्यांनी आईला मला भूक लागली आहे, असे सांगितले. या गोष्टी टाळण्यासाठी भोगेची बायको त्यांना म्हणाली, जा मडके अंगणात उलटे ठेवले आहे, उघडून जे काही मिळेल ते वाटून खा. मुले अंगणात पोचल्यावर त्यांनी बघितले की, तेथील मडके धनाने भरलेले आहे. ते लगेचच आईकडे धावत आले आणि त्यांनी सर्व काही सांगितले.
अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला आणि तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला. परंतु पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्षाला श्रद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने पंचपक्वान्न तयार करून, ब्राह्मणांना बोलावून, श्राद्ध घातले, भोजन केले. आणि ब्राह्मणांना दक्षिणा देखील दिली. सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले. यामुळे पूर्वज अत्यंत समाधानी व आनंदी होऊन, आशीर्वाद देऊन निघून गेले.
पितृपक्ष मराठी माहिती प्रश्न
पितृ पक्षात काय करावे?
शास्त्रानुसार पिंडदान करून आणि ब्राह्मणभोजन घालून पितरांचे श्राद्ध करावे. पितृ पक्षात दररोज आंघोळ करताना पूर्वजांना जल अर्पण करावे. तसेच पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध,दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी बाहेर अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा यांना खायला घातले म्हणजे त्यांच्याद्वारे आपले अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते.
पितृपक्ष म्हणजे काय?
पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा होय. पितृपक्ष आपण पूर्वजांचे पिंडदान करतो त्याला काही ठिकाणी म्हाळ किंवा महालय असे म्हणतात. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे पूर्वज- पितर या काळात पितृलोकातून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते.
पितृपक्षामध्ये काय करू नये?
पितृ पक्षात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृ पक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. पितृ पक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानले जाते. पितृपक्षात आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये.
पितृपक्षात श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्यांच्या घरी श्राद्ध करू नये.
पितृ पक्षात श्राद्ध करताना स्वत: न करता श्राद्धकर्म करणाऱ्या पुरोहितांकडून करून घेणे. पितृ पक्षात पूर्वजांचे श्राद्ध दुपारनंतर करू नये.
यावर्षी २०२३ मध्ये पितृपक्ष कधी आहे?
यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू होत असून शनिवारी १४ ऑक्टोबरला पितृपक्षाची समाप्ती होईल.
निष्कर्ष
मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे पितृपक्ष या पिंडदानाबद्दल कथा, पिंडदान विधि, आणि माहिती याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.