उमाजी नाईक यांची माहिती मराठी | Umaji Naik Information In Marathi

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पवित्र यज्ञात अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यातील काही स्मरणात राहतात तर अनेक विसरले जातात. असाच एक अज्ञात नायक म्हणजे उमाजी नाईक.

भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे ‘उमाजी नाईक’.

19व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. बर्‍याच लोकांनी ब्रिटीश राजवटीची स्तुती केली. कारण त्यांचा असा विश्वास होता की ही इंग्रजी राजवट त्यांच्यासाठी वरदान आहे. तथापि, काही देशभक्तांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा सुरू केला, उमाजी नाईक हे महाराष्ट्रात सर्वात प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर अल्पकाळ का होईना राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि कंपनी राजवटीविरुद्ध लढा दिला आणि त्यांना आदराने विश्व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हटले जाते.

Table of Contents

उमाजी नाईक यांची माहिती मराठी | Umaji Naik Information In Marathi

पूर्ण नाव उमाजी नाईक
जन्म तारीख ७ सप्टेबर १७९१
जन्म स्थळ पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर)
आईचे नाव लक्ष्मीबाई
वडिलांचे नाव दादोजी खोमणे
भाऊ अमृता व कृष्णा
बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती
मृत्यू ३ फेब्रुवारी १८३४
मृत्यूस्थळ पुणे
उमाजी नाईक यांची माहिती मराठी Umaji Naik Information In Marathi

ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध, पहिला सशस्त्र बंड पुकारणारे भारताचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक. भारताच्या मातीमध्ये स्वाभिमानी महापुरुष जन्माला आले. साडेसातशे वर्ष मोघलांनी या मातीवर राज्य केलं, पण साडेसातशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजीची, गर्जना उठली आणि जाणता राजा, शिवछत्रपतींच्या छत्रखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. पण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर, इंग्रजांनी या मातीमध्ये पाय ठेवला आणि हिंदुस्तानच्या मातीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य सुरू झाले. अशावेळी या मातीत स्वराज्याची कास नव्हती, स्वातंत्र्याची आस नव्हती, स्वाभिमानाचा ताठ कणा नव्हता, गोऱ्यांच्या विरुद्ध लढायला एकही शूर योद्धा नव्हता.

अशावेळी या मातीत उमाजी नाईक नावाची स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, रयतेमध्ये वंदे मातरम, भारत माता की जयची ललकारी गुंजली आणि दीडशे वर्षानंतर इंग्रजांची सावली हिंदुस्थानातून बाहेर पडली.

मराठी सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक, स्वातंत्र भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर, पुरंदरचा वीर वाघ, गरिबांचा वाली, जनतेला ज्यांनी छळलं लुबाडलं त्यांचा कर्दनकाळ, इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो कि पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम इंग्रज सरकारविरुद्ध स्वराज्यासाठी बंड करून, क्रांती घडवणारा, महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर वाघ, आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक, यांना मानाचा मुजरा.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

उमाजी नाईक यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड करून, स्वतःच स्वराज्य निर्माण करणारे आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक. नरवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म, रामोशी समाजातील लक्ष्मीबाई आणि दादूजी खोमणे यांच्या पोटी दि. ०७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. नरवीर राजे उमाजी नाईक यांच कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते, त्यामुळे त्यांना नाईक हि पदवी मिळाली होती. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले.

उमाजी नाईक यांचे शिक्षण

नरवीर राजे उमाजी नाईक जन्मापासून हुशार चंचल, शरीराने काटक. त्यामुळे त्यांनी पारंपारिक रामोशी कला लवकर आत्मसात केली होती. जसंजसे उमाजी राजे मोठे होत गेले, तर तसं त्यांना दादूजी म्हणजेच त्यांचे वडील यांच्या कडून दांडपट्टा, तलवार, भाले, कुऱ्हाडे, तीरकामठ, गोफण चालवण्याची कला त्यांनी अवगत करून घेतली.

उमाजी नाईक यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव

याच काळामध्ये, इंग्रजांनी हिंदुस्थानामध्ये सत्ता स्थापन करायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्यांनी इतर सर्व किल्ल्याप्रमाणे, पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेऊन, आपल्या मर्जीतील लोकांना दिली होती. त्यामुळे रामोशी समाजातील लोक नाराज होते. त्याचबरोबर इंग्रजांचा जनतेवरील अत्याचार वाढू लागला होता.

आपल्या समाज बांधवांवरील अत्याचार पाहून उमाजी नाईक हा तरुण पेटून उठला होता. छत्रपती शिवरायांना स्फूर्तीस्थान देत, त्यांचा आदर्श घेऊन, स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. माझ्या देशावर परक्यांना राज्य करू देणार नाही, असा उमाजी नाईक यांनी नारा लावत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, रामोशी बाबू सोळंके यांना बरोबर घेऊन त्यांनी आपले कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडेरायाला भंडारा उधळून शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांशी झुंज दिली आणि इंग्रजा विरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना केली. जंगल, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींना त्यांनी एकत्र केले आणि प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचे तानाजी, बाजी होते त्याचप्रमाणे यांचे भुजबळ, पांडे हे साथीदार होते.

Umaji Naik Information In Marathi

उमाजी नाईक यांना अटक

इंग्रज अधिकाऱ्याना त्रास दिल्यामुळे, उमाजींना सरकारने १८१८ मध्ये एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा केली होती. परंतु तो काळ त्यांनी सत्कारणी लावला. त्या काळामध्ये त्यांनी लिहिणे, वाचणे यामध्ये वेळ घालवला. आणि सुटल्यानंतर, इंग्रजाविरुद्धचे बंड होते ते आणखी वाढवले.

उमाजी नाईक आणि पुरंदर किल्ल्याचे नेतृत्व

भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी, अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यातील एक वीर आद्य क्रांतिकारी म्हणजे उमाजी नाईक. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर, मराठ्यांच्या माघारनंतर इंग्रजांनी सर्व मुलुख आपल्या ताब्यामध्ये घेतला. मराठा साम्राज्या मधील सर्व कर्मचाऱ्यांना, त्यांनी नोकरीवरून काढून टाकले. मराठा साम्राज्य वाचवण्याच्या, शेवटच्या प्रयत्नामध्ये रामोशीनी दुसऱ्या बाजीरावाला साथ दिली. त्यावेळी रामोशींची एकूण लोकसंख्या सुमारे १८००० होती. त्यापैकी दोन हजार लोकसंख्या पुणे व सातारा या भागामधील होती.

इंग्रजांनी जसे, मराठा साम्राज्यामधील कर्मचाऱ्यांना नोकऱ्यावरून काढून टाकले. त्याचप्रमाणे रामोशांच्या ही नोकऱ्या त्यांच्या हातातून गेल्या, त्यामुळे शेती आणि वनसंपदेवर त्यांना अवलंबून राहून, उपजीविका करावी लागली. परंतु इंग्रजांनी रामोशांवर विविध निर्बंध लादले, त्यामुळे ते इंग्रजांवर नाराज झाले व इंग्रजांना भारतामधून पळवून लावण्यासाठी, त्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळाला साताऱ्यामधील चित्तूर सिंग हा रामोशांचा नेता झाला. त्याच्या नेतृत्वाखाली रामोशांनी काही किल्ले हे इंग्रजांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पुरंदरचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी अतिशय उत्तमरित्या निभवले.

उमाजी नाईक व इंग्रजांमध्ये युद्ध

उमाजी राजे हे देशासाठी लढत असल्यामुळे, जनतेमधून त्यांना खूप साथ मिळू लागली. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी याने सासवड पुरंदरच्या मामलेदारास प्रमाण सोडले, तर इंग्रज सैन्य घेऊन, पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यामध्ये गेले असता, त्यांच्यामध्ये आणि उमाजी नाईक यांच्या सैनिकांमध्ये अत्यंत प्रचंड युद्ध झालं. या युद्धामध्ये इंग्रजांना पराभव सहन करावा लागला.

उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची मुंडकी उडवून इंग्रजांकडे पाठवली. त्यावेळी इंग्रज चांगले धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरदऱ्यामध्ये राहत होते, एका टोळीमध्ये जवळजवळ ५००० सैनिक असायचे. १८२४ मध्ये उमाजी नाईक यांनी भांबुर्डे येथील इंग्रज खजाना लुटून, तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेमध्ये वाटला होता.

त्याचबरोबर ३० नोव्हेंबर १८२७ मध्ये इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले. आज हे एक बंड असले, तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो, करून सोडलं होतं. २१ डिसेंबर १८३० ला उमाजी नाईक यांनी आपला पाठलाग करणारा इंग्रज अधिकारी आणि त्याच्या सैनिकांना गडावरून बंदूक आणि तोफा, गोफणी चालवून घायाळ करून सोडले होते आणि त्यामध्ये त्यांचे प्राणही घेतले होते.

नरवीर उमाजी नाईक यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात, इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा व करपट्टी देऊ नये, इंग्रजांची राजवट आता लवकर संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणी मदत करू नये, तसे केल्यास, नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे उमाजी नाईक यांनी सांगून, एक प्रकारे स्वराज्याची घोषणा केली होती.

या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले. त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार, यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. उमाजींच्या सैन्यातील काहींना फितूर करण्यात आले. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यांना दहा हजार रुपये बक्षीस, त्याचबरोबर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती.

उमजींच्या सैन्यातील फितूरांनी उमाजींची सर्व गोपनीय माहिती इंग्रजांना देण्यास सुरुवात केली. इंग्रजाधिकारी रॉबर्ट यांनी १८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे, उमाजीचा रामोशी समाज, इंग्रज अधिकाऱ्या विरुद्ध पेटला असून, तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मदत करत असून, हा उमाजी राजा होऊन, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नवीन राज्य निर्माण करेल.

छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे राजे उमाजी नाईक हे शूरवीर योद्धा होते आणि विशेष म्हणजे ते निर्व्यसनी होते.

Umaji Naik Information In Marathi

ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे

 • ब्रिटिश परकीय संस्कृतीचे प्रतिनिधी होते. त्यांचे भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यामुळे, या नव्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले आहे, अशी लोकांची भावना निर्माण झाली. त्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली.
 • ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण, आर्थिक शोषणाच्या तत्त्वावर आधारित होते. परिणामी कर जास्त प्रमाणात आकारले जाऊ लागले, त्यामुळे भारतात असंतोष निर्माण झाला. ब्रिटीशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, श्रद्धा, मूर्तीपूजा, इत्यादीबाबत टीकास्त्र सुरू केले. परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली.
 • रामोशी, भिल्ल, कोळी, इत्यादी स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये, ब्रिटिश सरकारने धोरण स्वीकारल्याने, या लोकांनी ब्रिटिशांना विरोध करण्यास सुरुवात केली.
 • निसर्गाची अवकृपा, रोगराई, दुष्काळ, सरकारचे महसूल धोरण, कर्जबाजारीपणा, इत्यादी. कारणास्तव शेतकरी वर्ग हा अत्यंत दुखी होता. ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे सरकार विरोध उठाव करण्याशिवाय या जमातिकडे कोणताही पर्याय राहिला नाही.

उमाजी नाईक यांचा उठाव

 • रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये आढळते. रामोशी हे स्वतःला रामवंशी म्हणून समजतात. रामोशी हे लोकशाहीर आणि बळकट उंचपुरे बांधेसूद व राकट होते. निजामांच्या प्रदेशातील, सोलापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत.
 • रामोशी लोक धाडसी व स्वतंत्र प्रवृत्तीचे होते. ते लोक पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त, मोठ्या वाड्यावर पहारेकरी इत्यादी कामे करत. ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार असे. इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांची इनाम ही जप्त करण्यात आली त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले त्यामुळे ब्रिटिश कायदेव्यवस्था धोक्यात आली.
 • उमाजी नाईक हे रामोशांचे नेतृत्व करत होते. ते त्यांचे प्रमुख नेते होते. त्यांचा जन्म पुरंदर मधील भिवरी गावामध्ये इसवी सन १७९१ मध्ये झाला. उमाजींचे वडील दादाजी अन्यायाच्या विरोधात कार्य करत असत. प्राध्यापक सदाशिव आठवले, यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करत करताना म्हणतात, उमाजी १६२ सेमी उंचीचा मोठ्या डोळ्यांचा, वर्णाने लालसर होता. तो क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे. उमाजी अकरा वर्षाचा असताना, दादाजींचा म्हणजेच उमाजींच्या वडिलांचा मृत्यू झाला.
 • वडिलांच्या काळापासून, उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. रामोशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत. भोरजवळील विंग गावात इसवी सन १८१८ साली दरोडे टाकत असताना, उमाजी हे पकडले गेले. तुरुंगात शिक्षा भोगत असताना, उमाजींनी अक्षर ओळख करून घेतली.
 • उमाजींच्या अगोदर संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकटवला होता. संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्यांचा भाऊ अमृता याने, भांबुडाचा लष्करी खजिना इसवी सन १८२४ ते १८२५ च्या दरम्यान लुटला. संतू नाईकांच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारीपण उमाजी नाईकांकडे आले.
 • पुढारीपणा हाती येता, उमाजी नाईक यांनी सात दरोडे, आठ वाटण्या घडवून आणल्या, अनेक धनिकांना लुटले. अखेर इंग्रजांनी उमाजीविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला. त्यामुळे उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना धरून देणाऱ्यास, शंभर रुपयांचे बक्षीस इंग्रजांनी जाहीर केले.
 • परंतु इंग्रजांना या जाहीरनामाचा फायदा दिसून आला नाही, यातून इंग्रज अधिकाऱ्यांनी एक निष्कर्ष काढला की, लोक उमाजींच्या बाजूने आहेत. इंग्रजांच्या बाजूने बोलत नाहीत, म्हणून दुसरा जाहीरनामा काढून, जे कोण दरोडेखोरांना साथ देतील, त्यांना ठार करण्यात येईल असे जाहीर केले.
 • परंतु, या ही घोषणेचा उपयोग झाला नाही. जेजुरी, सासवड, पिरींचे, भिवरी, या भागात प्रचंड लुटालूट करून सरकारला लुटले. रामोशांचा नेता, उमाजीला पकडल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याची जाणीव झाल्यावर, सरकारने मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसवल्या, घोडदळ तयार केले, याचाही उपयोग झाला नाही. कारण उमाजीला सरकारच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळत असे.
 • गावातील रयतेचा तसेच प्रतिष्ठित लोकांचा ही उमाजींना पाठिंबा होत होता, उमाजींचा उठाव हळूहळू गंभीर वळण घेऊ लागला. म्हणून इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा काढून, बक्षिसाची रक्कम बाराशे रुपये केली आणि जाहीर केले की, जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्यांचा मिलाफी समजले जाईल.
 • उमाजीने स्वतःला राजे म्हणून घ्यावयास सुरुवात केली. कुठल्याही डोंगर कपारीमध्ये लोक जमत, तोच त्यांचा दरबार असे. गोरगरिबांना दक्षिणा देणे, दान देणे, अशी तो मदत करत असे. उमाजींसोबत सर्व जातीमधील लोक हजर असत. थोडक्यात इंग्रजांच्या विरोधातील कारस्थाने उमाजीने वाढवली होती. इंग्रजांना आवाहन देण्यासाठी, उमाजीने पुण्याचा कलेक्टर एचडी रॉबर्ट सन यांच्याकडे इसवी सन १८२७ मध्ये खालील मागण्या केल्या
 • इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. रामोशांची परंपरागत वतने परत करावी. पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये.
 • वरील प्रमाणे इंग्रज न वागल्यास, रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. कलेक्टर रॉबर्ट्सने १५ डिसेंबर १८२७ रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून, उमाजींना उत्तर दिले. या जाहीरनामांच्या द्वारे असे जाहीर केले की, जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये.
 • उमाजी, भुजाजी, पांडूजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास, प्रत्येकी रुपये पाच हजार बक्षीस दिले जाईल, रामोशी चार परंगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहे, त्यामुळे त्याचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल.
 • कलेक्टर रॉबर्ट यांच्या जाहीरनामामुळे, उमाजी संतापले. त्याने पाच दिवसात पाच इंग्रजांना पकडले व त्यांची मुंडकी कापून सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना पाठवली आणि त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच २५ डिसेंबर १८२७ मध्ये दुसरा जाहीरनामा काढला तो पुढील प्रमाणे
 • ठाणे, रत्नागिरी मधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीला द्यावा.
 • उमाजींची माणसे येतील, तेव्हा पैसा तयार ठेवा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक अधिकारी जबाबदार राहतील.
 • या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानांमधील तेरा गावांनी उमाजीला महसूल दिला. दरम्यानच्या काळात उमाजीने कोल्हापूरकर छत्रपती व आंग्रे यांच्याशी सखोल यांचे संबंध निर्माण केले. याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिशांना धक्का बसला.

उमाजींची कैद व सरकारी नोकरी

उमाजीला पकडण्यासाठी, सरकारने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. परंतु उपयोग होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी माहिती काढून, उमाजींची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. परिणामी उमाजीने आपल्या कुटुंबासाठी इंग्रजांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला.

इंग्रजांनी उमाजींचे सर्व गुन्हे माफ केले. त्याने इंग्रजांची नोकरी स्वीकारली. पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी, त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याने या भागात शांतता टिकवली. परंतु भोर संस्थानातील १३ गावांच्या महसुलावर, उमाजींचा इंग्रजांशी संघर्ष वाढत गेला. त्यातच खटाव नातेपुते या भागात उमाजीने माणसे जमवल्याची, खबर इंग्रजांना लागली. म्हणून त्याला पकडण्यात आले. परंतु उमाजी इंग्रजांच्या तावडीतून निसटला.

उमाजी नाईक यांना पुन्हा अटक

राजे उमाजी नाईक हे पत्नी आणि स्त्रियांचा आदर करणारे होते, राजे उमाजी नाईक हे रुबाबदार, निरोगी आणि उदार व्यक्तिमत्व होते. दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील, उतरवली या गावी रात्री बेस सावध असताना, उमाजींना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून, फाशीची शिक्षा सुनावली.

उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा

फाशी देण्यापूर्वी अखेरची इच्छा विचारली जाते, त्याप्रमाणे उमाजींनाही इंग्रजांनी विचारली. तेव्हा उमाजी म्हणाले, इंग्रजांनो तुम्ही माझ्या देशातून चालते व्हा आणि दि. ०३ फेब्रुवारी १८३४ रोजी पुण्याच्या खडक माळी येथे मामलेदार कचेरीत, उमाजींना फाशी देण्यात आली. उमाजी नाईक यांच्याबरोबर त्यांचे साथीदार, खुशाबा नाईक, बापू सोनकर यांनाही फाशी देण्यात आली होती. उमाजींना पकडणारा इंग्रज अधिकारी मेकिंग टॉस म्हणतो, राजे उमाजी नाईकांना आम्ही वेळेत आवरलं नसतं, तर ते भारतातील दुसरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रतिशिवाजी ठरले असते.

मंडळी हे एक उदगार नसून, सत्य आहे. जर इंग्रजांनी कूटनीतीचा उपयोग करून, उमाजींना पकडलं नसतं, तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य केव्हाच मिळालं असतं. देशासाठी फाशीवर जाणाऱ्या या सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा.

उमाजी-नाईक-यांचे-स्मारक

उमाजी नाईक यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

 • सन १७५७ बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा पराभव करून, इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतावर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. त्यानंतर सन १७६४ ला बिहार मधील बक्सरमध्ये विजय मिळवत, भारताचा बिहार, बंगाल, ओरिसा हा प्रांत आपल्या अधिपत्याखाली घेतला. कोलकत्ता नंतर त्यांनी या राजवटीमधून भारताच्या इतर भागात आपला विस्तार सुरू केला.
 • वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता. सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता. कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवाजमव केली. इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले.
 • इंग्रजांची देशात सर्वदूर यशस्वी घोडदौड सुरू असताना, लढवय्या रामोशी समाजातील एका तरुणाने त्यांना पायबंद घालण्यासाठी हातात शस्त्र घेतले. इंग्रज आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे लक्षात येतात श्रीक्षेत्र जेजुरी जवळ, पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबाची आन आणि शिवछत्रपतींची शान शीरसवंद्य मानून त्यांनी बंदूक उचलली.
 • छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, गनिमी कावा, त्यांची शासन पद्धती डोळ्यासमोर ठेवून उमाजींनी रयतेच्या कल्याणाचे राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला.
 • १५ डिसेंबर १८३१ मध्ये उमाजी इंग्रजांच्या हाती लागून, ०३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यात भर चौकात त्यांना फासावर चढवण्यात आले. त्यांची युद्धनीती, आत्मविश्वास या बाबी विषयी कॅप्टन प्रभावित झाले. संघर्षाच्या काळात त्यांचा संयम, चिकाटी आणि अविचलित मनोधैर्यपणा ही गुणवैशिष्ट्ये अतिशय महत्वपूर्ण आहे.

उमाजी नाईक यांच्याबद्दल मराठी सिनेमा – १९३८

Umaji Naik cinema movie marathi

उमाजी नाईक यांच्यावर एक सिनेमा ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा आणि त्याची चित्रफीत आता उपलब्ध नाही.

या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध झालेले समीक्षण खालीलप्रमाणे

“उमाजी नाईक” मॅजेस्टिकमध्ये लोकप्रिय
हा मराठी चित्रपट ऐतिहासिक घटनांचे पुनरुज्जीवन करतो. रॉयल फिल्म सर्किट्सचा “उमाजी नाईक” हा मराठी चित्रपट आहे. तो आता मॅजेस्टिकवर दाखवला जात आहे.
या चित्रपटात महाराष्ट्राच्या इतिहासातील एका सुप्रसिद्ध ऐतिहासिक पात्राचे जीवन रेखाटण्यात आले आहे. रॉबिनहूडची भारतीय आवृत्ती, जसा इंग्रजी दंतकथेचा परोपकारी महापुरुष. उमाजी नाईक हे त्या देशभक्त सेवकांपैकी एक होते ज्यांनी शिवरायांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले.
शीर्षक भूमिकेत केशवराव दाते आहेत ज्यांनी “दुनिया ना माने” मध्ये शांता आपटे सोबत चरित्र अभिनेता म्हणून काम केले. इतर कलाकारांमध्ये कमलाबल बडोदेकर, मधुकर गुप्ते, रजनी आणि भोंसले यांचा समावेश आहे.
आम्ही समजतो, या चित्रपटाला मॅजेस्टिकवर मराठी-जाणत्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि तो लोकप्रिय होईल अशी अपेक्षा आहे.

FAQ

१. भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर कोण होते?

मराठी सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक, स्वातंत्र भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर, पुरंदरचा वीर, वाघ, गरिबांचा वाली, जनतेला ज्यांनी छळलं लुबाडलं त्यांचा कर्जकार, इंग्रजांना सलग चौदा वर्ष. सळो कि पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम, इंग्रज सरकारविरुद्ध स्वराज्यासाठी बंड करून, क्रांती घडवणारा, महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर वाघ, आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक.

२. उमाजी नाईक यांचा जन्म कधी झाला ?

नरवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म, रामोशी समाजातील लक्ष्मीबाई आणि दादूजी खोमणे यांच्या पोटी दि. ०७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.

३. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान कोण होते ?

आपल्या समाज बांधवांवरील अत्याचार विरुद्ध उमाजी नाईक हा तरुण पेटून उठला होता. छत्रपती शिवरायांना स्फूर्ती स्थान देत, त्यांचा आदर्श घेऊन, स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. माझ्या देशावर परक्यांना राज्य करू देणार नाही, असा उमाजी नाईक यांनी नारा लावत विटोजी नाईक, कृष्ण नाईक, रामोशी बाबू सोळंके, यांना बरोबर घेऊन त्यांनी आपले कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडेरायाला भंडारा उधळून शपथ घेतली.

४. उमाजी नाईक यांचा मृत्यू कधी झाला ?

दि. ०३ फेब्रुवारी १८३४ रोजी पुण्याच्या खडक माळी येथे मामलेदार कचेरीत, उमाजींना फाशी देण्यात आली. उमाजी नाईक यांच्याबरोबर त्यांचे साथीदार, खुशाबा नाईक, बापू सोनकर, यांनाही फाशी देण्यात आली होती.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास उमाजी नाईक यांच्या बद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो. लढवय्ये क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment