कुसुमाग्रज माहिती मराठी | Kusumagraj Information In Marathi

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच, तात्यासाहेब शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. कुसुमाग्रज मराठी भाषेमधील अग्रगण्य लेखक, नाटककार, कवी, कथाकार व समीक्षक होते.

संपूर्ण जगात विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लेखन केले. कुसुमाग्रजांना आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठी भाषेमधील महत्त्वाचे लेखक संबोधले जाते.

कुसुमाग्रजांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील लखलखत्या रत्नासारखे आहे. वि.स.खांडेकर यांच्यानंतर १९८७ मराठी भाषेतील व मराठी साहित्यातील “ज्ञानपीठ” पुरस्कार मिळवणारे, दुसरे साहित्यिक म्हणजे वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” किंवा “मराठी राजभाषा दिन” म्हणून साजरा केला जातो.

वि. वा. शिरवाडकर यांनी चार दशकांपेक्षा अधिक काळ स्वतःचे वर्चस्व गाजवणारे, श्रेष्ठ, प्रतिभावंत, कवी, नाटककार, कथाकार कादंबरीकार, लघु निबंधकार, आस्वादक समीक्षक म्हणून प्रचिती प्राप्त केली. क्रांतिकारकृती, प्रामाणिक सामाजिक आस्था व शब्द रचनेवर प्रभुत्व ही कुसुमाग्रजांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहे.

कुसुमाग्रजांनी शोधक आणि चिकित्सक स्वभावाने प्रत्यक्ष ईश्वरा संबंधित प्रश्न उपस्थित करायला, आणि माणसांच्या बुद्धीचे आकलन करायला प्रवृत्त केले. वि. वा. शिरवाडकर यांचे समृद्ध आणि किर्तीवंत व्यक्तिमत्व त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान वि. वा. शिरवाडकर यांच्याबद्दल माहिती दिली आहे, हा लेख तुम्ही शेवट पर्यंत सविस्तर वाचा.

Table of Contents

कुसुमाग्रज माहिती मराठी | Kusumagraj Information In Marathi

मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर
टोपणनाव कुसुमाग्रज, तात्या शिरवाडकर
जन्मतारीख २७ फेब्रुवारी १९१२
जन्मस्थळ नाशिक
शिक्षणबी. ए.
कार्यकवी, लेखक, नाटककार, कथाकार,
साहित्यकृतीकवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, नाटिका आणि एकांकिका, लेखसंग्रह, नाटके
प्रसिद्ध साहित्य (नाटक)नटसम्राट
भाषामराठी
मृत्यू१० मार्च १९९९
मृत्यू ठिकाण  नाशिक

कुसुमाग्रज यांचा परिचय

विष्णू वामन शिरवाडकर यांना एक प्रसिद्ध नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कविताकार म्हणून संबोधले जातात. त्यांना कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्धी प्राप्त आहे. वि. वा. शिरवाडकर यांनी एच.पी.टी कला महाविद्यालयामध्ये असताना, त्यांच्या कविता रत्नाकर मासिका प्रकाशित झाल्या.

१९३२ म्हणजे कुसुमाग्रजांच्या वयाच्या विसाव्या वर्षी वि. वा. शिरवाडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी, सुद्धा सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.

१९३३ मध्ये वि. वा. शिरवाडकर यांनी “ध्रुव मंडळ” स्थापन केले. व “नवमनु” नावाच्या वृत्तमान पत्रात वि. वा. शिरवाडकर यांनी लेखन करायला सुरुवात केली. त्याच वर्षी कुसुमाग्रजांचा “जीवनलहरी” हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

वि. वा. शिरवाडकर यांनी १९३४ मध्ये एच.पी.टी. महाविद्यालयांमधून मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये कला शाखे डिग्री प्राप्त केली. १९३६ च्या दरम्याने यांनी गोदावरी सिनेटोन लिमिटेड प्रवेश घेतला व
“सती सुलोचना” चित्रपटाची पटकथा त्यांनी उत्तमरीत्या लिहिली. या चित्रपटांमध्ये वि. वा. शिरवाडकर यांनी लक्ष्मणची भूमिका केली होती.

Kusumagraj Information In Marathi

कुसुमाग्रजांचा जन्म आणि कौटुंबिक माहिती

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना आपण सगळेजण परिचित आहोत. कुसुमाग्रजांचे खरे नाव हे गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. वि. वा. शिरवाडकरच्या काकांनी म्हणजेच वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रजांना दत्तक घेतल्यामुळे, कुसुमाग्रजांचे नाव बदलून त्यांनी विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवले.

कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये नाशिक येथे झाला. त्यांचे बालपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्त रमलेले होते. त्यांचा जन्म नाशिकचा. त्यांचे शिक्षण सुद्धा त्यांनी नाशिक मध्येच पूर्ण केले. त्यांचे वडील अर्थात वामन शिरवाडकर हे पेशाने वकील होते.

कामानिमित्त त्यांना पिंपळगाव मधील बसवंत या गावी स्थायिक व्हावे लागले, त्यांचे बालपण हे पिंपळगाव मधील बसवंत या ठिकाणीच गेले. कुसुमाग्रज यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक बहीण होती.

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज यांचे प्रारंभिक जीवन व शिक्षण

त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण नाशिक मधील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी झाले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक या ठिकाणी ऍडमिशन घेतले. यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबई महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षात त्यांनी नाशिक मध्ये दलितांना मंदिरामध्ये प्रवेश प्राप्त व्हावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.

याशिवाय त्यांनी स्वतःचे जीवन अनेक सामाजिक आंदोलनामध्ये झोकून दिले. वीस वर्षाच्या वयामध्ये त्यांनी त्यांचा पहिला मराठी काव्यसंग्रह प्रकाशित केला. स्वतःचे शिक्षण पूर्ण करून चित्रपट व्यवसायामध्ये त्यांनी पटकथा लिहिण्याचे काम केले. कुसुमाग्रज यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकामध्ये वृत्तसंपादनाचे सुद्धा काम केले.

ज्यामध्ये त्यांनी स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, ही काही वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे लेखन केले. मराठीवर आणि लिखाणावर त्यांचे भयंकर प्रेम होते.कविता, कथा, या कुसुमाग्रजांच्या अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यांची ओळख एक नाटककार पेक्षा एक कवी म्हणून अधिक जास्त प्रसिद्ध आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आधुनिकतेचे एक वलय सुरू केले. बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून त्यांने साहित्यामध्ये नवक्रांती घडून आणली. म्हणून त्यांना आधुनिक युगाचे कमी म्हणून सुद्धा संबोधले जाते.

कुसुमाग्रज नाव का धारण केले?

कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले.

कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, त्यांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.

तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. कुसुमाग्रज यांना त्यांच्या नटसम्राट या साहित्यकृतीबद्दल मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Kusumagraj Information In Marathi

कुसुमाग्रजांची कारकीर्द

त्यांच्या कविता रत्नाकर जनरल मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्यांनी नाशिकच्या एच.पी.टी. कला महाविद्यालयामध्ये शिकत असताना काळाराम मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश देण्याच्या मागणीला मोठा पाठिंबा दर्शविला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवून सामाजिक गोष्टीची जाणीव करून देत, लोकांना अस्पृश्यता मिळवण्यास पाठिंबा दिला.

विष्णू वामन शिरवाडकर यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली.नवयुग, साप्ताहिक, प्रभात, दैनिक प्रभात, सारथी, यांसारख्या मासिकांमध्ये यांनी लेख प्रकाशित केले. मराठी साहित्याचे जनक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा “विशाखा” हा काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित करून, यांना मानवतेचा कवी ही पदवी बहाल केली.

तेव्हापासून त्यांच्या कारकर्दीला एक नवीन कलाटणी प्राप्त झाले. त्यांनी त्यांबद्दल लिहिले, “त्यांचे शब्द सामाजिक असंतोष प्रकट करतात परंतु जुने जग नवीन जगाला मार्ग देत असल्याचे, आशावादी खात्री कायम ठेवते.”हे भारत छोडो आंदोलनाच्या वेळी प्रकाशित झाले.

गुलामगिरी विरुद्ध हा संदेश जनसामान्यांमध्ये पेरून लोकांमध्ये त्यांना लोकप्रियता प्राप्त झाली. कालांतराने भारतीय साहित्यामध्ये कुसुमाग्रजांचे स्थान बनले. १९४३ च्या नंतर ऑस्कर वाईल्ड, मोलियर मॉरिस,  शेक्सपियर यांसारख्या महान नाटककारांच्या नाटकांचे रूपांतर यांनी करण्यास सुरुवात केली. विशेषतः यांच्या शोकांतिका ज्याच्या मराठी रंगभूमीच्या विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला.

त्यांना उत्कृष्ट सामाजिक जाण होती. त्यांनी दैनंदिन घडामोडी मध्ये लोकांसाठी लेख लिहिण्यास सुरुवात केले. १९५० मध्ये नाशिक मध्ये सक्रिय “लोकहितवादी मंडळाची” स्थापना यांनी केली.

कुसुमाग्रज यांनी केलेले समाजकार्य

यांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग दर्शवला. यांनी आदिवासी समुदाय सुधारण्यासाठी, अतोनात प्रयत्न केले. समाजामधील प्रत्येकाला विकासाची समान संधी प्राप्त व्हायला हवी असे यांचे ठाम मत होते. त्यांनी “कुसुमाग्रज प्रतिष्ठान” ह स्थापन केली.

त्या प्रतिष्ठान मध्ये मुलांसाठी अनुकूल ग्रंथालय तयार करण्यात आले. आदिवासी लोकसंख्येला मदत करण्यासाठी, विविध प्रकल्पांमध्ये स्वतःला यांनी झोकून दिले. याशिवाय त्यांनी आदिवासी गटाला निधी दिला. अधून मधून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पाठ्यपुस्तके, कुसुमाग्रज यांनी सुधारित केली.

त्यांनी आदिवासी लोकांसाठी आदिवासी कार्य समितीची स्थापना केली. ज्यामध्ये प्रौढ शिक्षण आणि वैद्यकीय सहाय्यक यावर जास्त भर दिला जात होता. हे क्रीडा आणि संस्कृत या दोन्हीसाठी वारंवार शिबिरे आयोजित करत असत.

चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, क्रीडा, सामाजिक कार्य, साहित्य, व्यतिरिक्त इतर विविध लोकांच्या गटांना कलांमध्ये व्यासपीठ देण्याचा यांनी मनोमन प्रयत्न केला. या शाखांमध्ये काम करणारे असंख्य लोकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी यांनी १९९२ मध्ये “गोदावरी गौरव” या संस्थेची स्थापना केली.

कुसुमाग्रज यांचे साहित्य

यांच्या साहित्य लेखनाविषयी बोलायचे गेल्यास, यासाठी शब्द सुद्धा कमी पडतील. कुसुमाग्रजांच्या कविता, कथा, नाटकांविषयी विविध गोष्टी सांगण्यासारखे आहेत. आजही यांच्या कविता अनेकांच्या ओठी असतात व त्यांच्या कविता जगण्याची नवीन प्रेरणा प्रदान करतात. त्यांच्या साहित्याचा विचार करता, त्या साहित्यांचे वर्गीकरण करून त्याची माहिती जाणून घेणे अधिक सोपे पडेल.

कविता

यांच्या विविध कविता फार लोकप्रिय आहेत. आज सुद्धा कुसुमाग्रजांचे कविता संग्रह अभ्यासले जातात. अक्षरबाग, किनारा, चाफा, अशा विविध कविता यांनी लिहिल्या आहेत.

कथासंग्रह

यांचे कथासंग्रह सुद्धा फार गाजलेले आहेत. एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, यांसारख्या विविध कथा यांनी अप्रतिमपणे सादर केलेल्या आहेत.

नाटक

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची अनेक नाटके सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहे. कुसुमाग्रजांचा स्वतंत्र नाटकातला दुसरा पेशवा, आमचं नाव बाबुराव, ययाती आणि देवयानी, नटसम्राट इत्यादी गाजलेली नाटके अजूनही लोकांच्या मनात बसलेली आहे.

कुसुमाग्रज यांची कवी आणि लेखक म्हणून ख्याती

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची ख्याती कवी आणि लेखक म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. 1954 मध्ये विष्णू वामन शिरवाडक यांनी शेक्सपियरच्या मेकबेथचे मराठीत “राजमुकुट- द रॉयल ग्राउंड” असे रूपांतर केले. त्यामध्ये नानासाहेब फाटक आणि दुर्गा खोटे यांनी अभिनय केला होता. त्यानंतर १९६० च्या दरम्याने त्याने ऑथेलोचे रूपांतरही केले. यांनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये गीतकार म्हणून काम केले.

कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध कविता

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त


चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना
नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे
परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा


मला वाटते विश्व अंधारले
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण
निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ
परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर


शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर
गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील”
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २॥


वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५॥


आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा

अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८॥

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!


कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

 स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची  उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥


जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

कोलम्बसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे !
विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !
ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !
की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी
नाविका ना कुठली भिती


सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी
जपावे पराभुत प्राणा?
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा !
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येया  सक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला”

बर्फाचे तट पेटुनी उठले

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते  I I धृ I I
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमालय  राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे


समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिऱ्यांची  झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..


दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा


पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

निरोप

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान
लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात
बाजार येथे जमला बळींचा


तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी
चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?


एकाच शापातून सर्व जाती
निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे
“जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे”
ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

कणा 

“ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.


खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

कुसुमाग्रज यांचे लेखन

कविता संग्रह

 • हिमरेशा (१९६४)
 • अक्षरबाग (१९९०)
 • थांब सहेली (२००२)
 • छंदोमयी (१९८२)
 • किनारा (१९५२)
 • वादळ वेल (१९६९)
 • जैचा कुंज (१९३६)
 • जीवन लहरी (१९३३)
 • चाफा(१९९८) c
 • पणत्या (१९८९)
 • स्थलांतरित पक्षी (१९८९)
 • समिधा ( १९४७)
 • मराठी माती (१९६०)
 • माधवी (१९९४)
 • मारवा (१९९९)
 • महावृक्ष (१९९७)
 • मुक्तायन (१९८४)
 • मेघदूत (१९५६)
 • रसयात्रा (१९६९)
 • विशाखा (१९४२)
 • श्रावण (१९८५)
 • स्वगत(१९६२)

संपादित कविता संग्रह

 • रसायन, शंकर वैद्य आणि कवी बोरकर यांनी निवडलेल्या कविता आणि वैद्य यांच्या दीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह
 • काव्यवाहिनी
 • पिंपळपान
 • चंदनवेल
 • साहित्यसुवर्णा

कथा संग्रह

 • सतारीचे बोल (कथासंग्रह)
 • अंतराळ (कथासंग्रह)
 • एकाकी तारा
 • बारा निवडक कथा (कथासंग्रह)
 • काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
 • जादूची होडी (बालकथा)
 • अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
 • प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
 • फुलवाली (कथासंग्रह)

कादंबऱ्या

 • वैष्णव (कादंबरी)
 • कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
 • जान्हवी (कादंबरी)

एकांकिका

 • हाऊस ऑफ गॉड १९५५, दुसरी आवृत्ती १९७३.
 • आमिष , दिवाळी, १९७०.
 • संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.
 • प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
 • दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.

लघुनिबंध आणि इतर लेखन

 • एकाकी तारा
 • विरामचिन्हे
 • प्रतिसाद
 • आहे आणि नाही
 • हे देवा, बरे झाले
 • एखादं पण, एखादं फूल

कुसुमाग्रजांसंबंधी पुस्तके

 • सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक – डॉ. नागेश कांबळे)
 • कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित ‘समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
 • कुसुमाग्रज शैलीचे अंतरंग (डॉ. सुरेश भृगुवार)
 • भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक, निशिकांत मिरजकर; मराठी अनुवाद – अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
 • कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
 • कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास (डॉ. द.दि. पुंडे)

नाटके

 • आनंद
 • ययाति अनी देवयानी
 • दुसरा पेशवा
 • राजमुकुट
 • दूरचे दिवे
 • नटसम्राट
 • वैजयंती
 • विदुषक
 • आमचे नव बाबुराव
 • एक होती वाघीण
 • कैकेयी
 • वीज म्हणाली धरतीला
 • बकेट (द ऑनर ऑफ गॉडचे जीन अनौइल्ह यांचे भाषांतर)
 • मुख्यमंत्री
 • चंद्र जिते उगवत नाही
 • महंत

कुसुमाग्रज यांचे पुरस्कार

 • १९६० मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वार्षिक सोहळ्याचे अध्यक्ष
 • १९६० राज्य सरकार मराठी मातीसाठी ‘मराठी माती’ (काव्यसंग्रह)
 • १९६२ राज्य सरकार स्वागत ‘स्वागत’ (काव्यसंग्रह) साठी
 • १९६४ राज्य सरकार हिमरेषा ‘हिमरेषा’ (काव्यसंग्रह) साठी
 • १९६४ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मडगाव, गोवा
 • १९६५ अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार १९६५
 • १९६६ राज्य सरकार ययाती आणि देवयानी ‘ययाति आणि देवयानी’ नाटकासाठी
 • १९६७ राज्य सरकार विज म्हणाली धरतीला ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकासाठी
 • १९७० मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूरचे अध्यक्ष
 • १९७१ राज्य सरकार नटसम्राट ‘नटसम्राट’ नाटकासाठी
 • १९७४ किंग लिअरच्या नटसम्राट नाटकाच्या लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७४
 • १९८५ अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार
 • १९८६ डी.लिटची मानद पदवी. पुणे विद्यापीठातर्फे
 • १९८७ ज्ञानपीठ पुरस्कार – त्यांच्या साहित्यिक कामगिरीची दखल घेऊन भारतातील प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार
 • १९८८ संगीत नाट्यलेखन पुरस्कार
 • १९८९ अध्यक्ष – जागतीक मराठी परिषद, मुंबई
 • १९९१ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्कार.
 • १९९६ आकाशगंगेत “कुसुमाग्रज” नावाचा तारा
 • साहित्य अकादमी पुरस्कार (1974) – भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मानांपैकी एक, त्यांना त्यांच्या “नटसम्राट” या महाकाव्य आणि मुख्य नाटकासाठी हा पुरस्कार मिळाला. मानवी भावभावनांचा आणि जीवनातील चाचण्यांचा सखोल शोध घेऊन हे नाटक मराठी साहित्याचा आधारस्तंभ राहिले आहे.
 • ज्ञानेश्वर पुरस्कार (1990) – मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, त्यांना महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वर पुरस्काराने सन्मानित केले.
 • पद्मभूषण (1991) – भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक म्हणून, यांना त्यांच्या बाबतीत, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उच्च दर्जाच्या सेवेची दखल घेऊन पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
 • ज्ञानपीठ पुरस्कार (1987) – हे प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्काराचे प्राप्तकर्ता होते, जो भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कारांपैकी एक मानला जातो. भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे मराठी लेखक होते.

कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार

 • नशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराती कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे काॅन्टिनेन्टल प्रकाशनपुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या ‘संदर्भासहित’ कवितासंग्रहाला प्रदान झाला. (२८ फेब्रुवारी २०१९)
 • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
 • नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी, १० मार्चला एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ देण्यात येतात. अभिनेते नाना पाटेकर, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे, रॅम सायकल शर्यत विजेते डॉ. महाजन बंधू, प्रसिद्ध वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे व महिला सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांना हा पुरस्कार मिळाला आहे, (२०१६)
 • नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता.
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता.
 • कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

कुसुमाग्रज यांचे निधन

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी नाशिक या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.

FAQ

१. कुसुमाग्रज यांचा मृत्यू कधी झाला?

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी नाशिक या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.

२. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार कधी मिळाला?

वि.स.खांडेकर यांच्यानंतर १९८७ मराठी भाषेतील व मराठी साहित्यातील “ज्ञानपीठ” पुरस्कार मिळवणारे, दुसरे साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज.

३. विष्णू वामन शिरवाडकर यांचे दत्तक विधी पूर्वीचे नाव काय?

कुसुमाग्रजांचे खरे नाव हे गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. कुसुमाग्रजांच्या काकांनी म्हणजेच वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रजांना दत्तक घेतल्यामुळे, कुसुमाग्रजांचे नाव बदलून त्यांनी विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवले.

४. कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे?

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना आपण सगळेजण परिचित आहोत.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वाचे लाडके कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हला नक्की कळवा.व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment