कोकणातील गणेशोत्सव 2023 : एक अद्भुत आनंद सोहळा

कोकणातील गणेशोत्सव 2023 – आत फ़क्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे दिवस राहिलेत बाप्पाच्या आगमनाला . बाजार गजबजू लागलेत, रस्ते माणसांनी फुलून गेलेत, ट्रेन बसेस चाकरमान्यांनी खचाखच भरून यायला लागल्यात, गावागावात रेलचेल वाढलीय ….खरंच माझा बाप्पा येतोय ना …..

‘गणेशोत्सव’ हा सोन्यापेक्षा मौल्यवान शब्द कोकणी माणसाच्या वर्षभराच्या आनंदाची आणि समाधानाची कुपी आहे. निसर्गपूरक, ‘इको-फ्रेंडली’ आणि सुबक गणेशमूर्ती आणि घरगुती सजावट, आजही कटाक्षानं पाळल्या जाणाऱ्या गावोगावच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण परंपरा, भक्तिरसानं ओथंबून केली जाणारी गणपतीची सेवा, घरोघरी ऐकू येणारे आरत्या-भजनांचे मधुर सूर आणि अस्सल कोंकणी ( शाकाहारी😊) पक्वानांची चव यांचा साज आणि गावातील तसेच घरातील सर्वांना एकत्र आणणारा प्रचंड आनंद सोहळा म्हणजे कोकणातला गणेशोत्सव…!

कोकणातील गणेशोत्सव 2023 : एक अद्भुत आनंद सोहळा

कोकणातील गणेशोत्सव 2023

कोकणातल्या गणपतीची मजाच न्यारी. इथे प्रत्येक घरात गणपती पूजन केले जाते. अगदी दिड दिवसांपासुन चक्क एकवीस दिवसांपर्यंतही. नागपंचमीच्या आधी गावातल्या मूर्तिशाळेत आपला खास गणपतीसाठी असलेला पाट नेऊन पोच केला जातो. चित्रशाळेत पाट देऊन मूर्तिकाराला सुबक मुर्ती सांगितली जाते. तेही यजमान्याच्या मनाप्रमाणे मुर्ती बनवून देतात.

इथं प्रत्येक घरावर नवा नवलाईचा साज चढलेला असतो. आधीच श्रावणातील निसर्ग हिरवा शालू पांघरून, सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण करीत गणरायाच्या स्वागताला आसुसलेला असतो .

कोकणातला माणूस कितीही गरीब असला तरी गणेशाच्या सेवेत कुठलीच कसूर शिल्लक ठेवत नाही.

कोकणातील गणेशोत्सव 2023
घरचा गणपती

गोकुळाष्टमी नंतर संपूर्ण घराची झाडलोट, रंगरंगोटी, छत, पडदे, साफसफाई इत्यादी कामे पूर्ण केली जातात. चतुर्थीच्या आधी एक दोन दिवस मूर्तीचे साग्रसंगीत घरी आगमन होते. सुवासिनींच्या हस्ते औक्षण करुन मुर्ती तात्पुरती देवघरात ठेवली जाते.

एरवी सुनसान असणारं घर, चाकरमान्यांनी गजबजून जातं, आणि अशातच गणपतींची आरास सुरु होते. वडीलधाऱ्यांच्या देखरेखीखाली माटोळी पानफुलाफळांनी सज्ज होते. बाकड्याच्या दोनही बाजूला सुंदर पडदे लावले जातात. चौरंग ठेवला जातो. रंगीबेरंगी तोरणे, दीपमाळा, फुले लावून मंडपाची रात्रभर जागून सजावट होते. घराच्या चौकात (हॉल) रोषणाई केली जाते, एखाद्या हौशी चाकरमान्याच्या घरी हलता देखावा उभारला जातो.

कोकणात गणपतीच्या आसनाखाली परडीमध्ये गणेशाचे प्रतीक म्हणून नारळ ठेवण्याची पद्धत आहे. हा नारळ उतरलेला म्हणजे झाडावरून न पाडता अलगद खाली उतरवलेला नारळ असावा लागतो. गणपतीच्या बाजुलाच गौरी व महादेव पुजले जातात. माटोळीला सजावटीसाठी कितीतरी रान वनस्पती बांधल्या जातात. या वनस्पती दिसायला सुंदर असतातच पण त्यांना औषधी गुणधर्म देखील आहेत.

माटोळी साहित्य
माटोळी साहित्य

हरणाची पिवळीधम्मक फुले, कवंडाळाची चेंडूसारखी लाल-पिवळी फळे, कांगुणीच्या पिवळ्या लाल फळांचे घोस, सरवाडीचे शुभ्र पानांसारखे असणारे संदल, तेरड्याची गुलाबी फुले, आयनांचा चित्रविचित्र आकार, कळलावीची आगीसारखी दिसणारी पिवळी-केसरी-लाल फुले आणि नागकुड्याची वाघनखांसारखी दिसणारी पिवळी-लाल फळे माटीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतात.

कोकणात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा अजूनही आवर्जून पाळल्या जातात. जर गावात कोणी नवं घर बांधलं, आणि नवीन बिऱ्हाड केलं तर तो स्वतःहून गणपती आणायला सुरुवात करू शकत नाही. मग गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच्या नकळत गावातल्या हौशी मुलांकरवी आदल्या दिवशी रात्री यजमान्यांच्या अंगणात गुपचूप गणपतीची मूर्ती, आरास, माटोळी साहित्य, पूजासामान ठेवून त्यांना पूजनासाठी प्रोत्सहीत केले जाते.

श्री गणपति यायचा दिवस उद्यावर आलेला असतो .

गणपतीची माटोळी
गणपतीची माटोळी

गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

स्वच्छ सोनेरी किरणे पसरवीत गणेश चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. कितिही उशीर झाला तरी भटजींच्या (कोकणात – भटाच्या) साक्षीने पहिली पूजा झाल्यावर उत्सव सुरु होतो. आत पुढचे पाच-सात दिवस घराला झोप हा प्रकार माहित नसतो.

दिवस शेजारी पाजारी आलेल्या गेलेल्या आणि पाहुण्यांच्या गोतावळ्यात जातो, आणि रात्रि बाप्पाच्या आरती भजनात जागवल्या जातात. बायकांची करंज्या लाटायची आमंत्रणं तर संपता संपत नाहीत.

कोंकणातल्या आरत्या पण गमतीदार. इथल्या बाप्पाला सुखकर्ता पासून येई ओ विठ्ठले पर्यंत कोणतीही आरती चालते. त्यातच समारोपाला ” कायेन वाचा. मजेन देवा | पुंजा करावा. पतितपावा ” असं बेंबीच्या देठापासून म्हटलं जातं. घराघरात फ़क्त स्वतःपुरती आरती न करता गावाच्या या वेशीपासून त्या वेशीपर्यंत एकोप्याने आरती होते, आणि अशा वेळी तात्याच्या घरामागची तवशी (काकड्या) चोरण्याची मौजसुद्धा भारीच.

खरंतर कोकणाच्या मातीत एक अशी जादू आहे की, इथे प्रत्येक घरात एक कलाकार दिसतो. कोणी गातो, अभिनय करतो, वाद्य वाजवतो, मुर्ती घडवतो अशा नाना प्रकारच्या कला कोकणात प्रत्येक घरात पहायला मिळतात.

गणेश चतुर्थी 2023
गणेश चतुर्थी 2023

गणपतीला आवडणारे मोदक तयार करण्यासाठी लागणारं तांदळाचं पीठ आणि खोबरं या दोन्ही गोष्टी कोकणात अमाप. त्यामुळे मोदक खवय्यांची आणि गणपतीची चंगळच.या साहित्यापासून बनवल्या जाणाऱ्या नेवऱ्या (म्हणजे उकडलेल्या करंज्या) हे कोकणातले आणखी एक वैशिष्ट्य. हे पदार्थ उकडतान यात हळदीची पाने टाकली जातात त्यामुळे त्याला एक खमंग स्वाद येतो. कोकणात कोणाच्याही घरी गेलात, तर प्रसादाचं पंचखाद्य हमखास मिळणारच. या पंचखाद्यात भाताच्या लाह्या, गूळ, खोबरं, काजूगर आणि शेंगदाणे या पाच पदार्थांपासून बनवलेल्या या पंचखाद्याचा प्रसाद एक वेगळीच प्रसन्नता देतो.

गणपती घरात आला, की तो त्या घरातला सदस्यच होऊन जातो. त्यामुळे त्याला निरोप देणं सगळ्यांनाच अवघड होतं. म्हणूनच विसर्जन ज्या दिवशी होतं, त्या दिवशी रात्रीही गणपतीच्या आठवणीसाठी आरत्या करण्याची निराळी पद्धत कोकणात आहे. 

शेजाऱ्यांच्या, पाहुण्यांच्या घरी जाणं, नैवेद्य एकमेकांना पोहचवणं, देखावे बघायला जाणं, लहान होऊन फटाके वाजवणं, राञभर जगून भजनं करणं, करंज्या, कडक बुंदी लाडू संपवणं, अगदी विसर्जनाच्या दिवसापर्यंत तोरणं लावणं आणि शेवटच्या दिवशीही देखाव्यावर शेवटचा हात फिरवणं, यात दिवस कसे भुर्रकन उडून जातात, खरंच कळत नाही .

गणेश विसर्जनाचा दिवस ऊजाडतो आणि महाभोजनाची तयारी सुरु होते. संध्याकाळ होताहोता आवराआवरी पण संपते. विसर्जनासाठी बाप्पाची मुर्ती टाळ मृदूंगाच्या गजरात नदी, ओहोळ किंवा समुद्र किनाऱ्यावर नेली जाते. सगळ्या मुर्त्या एका रांगेत ठेऊन महाआरती आणि फटाक्यांची आतषबाजी होते. भरलेल्या डोळ्यांनी , दाटलेल्या कंठाने… “गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या “असं म्हणुन बाप्पाला निरोप दिला जातो.

गणेश चतुर्थी 2023
गणेश विसर्जन

रिकामी पाट डोक्यावर घेऊन, परतीची वाट चालताना, मन कासावीस होतं. या आठवड्याच्या गोड आठवणींनी मन बेभान होत आणि वेध लागतात ते पुढच्या वर्षीचा गणेशोत्सवाचे……
तर मग मंडळींनू येतात मा………..
कोकणातलो गणेशोत्सव अनुभवूक ?
या आनंदात सहभागी होवंक ?
कारण

कोकणातील गणेशोत्सव ही सांगण्या ऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

आमचे हे लेख सुद्धा नक्की वाचा 👇

Leave a comment