कोंडुरा बीच संपूर्ण माहिती मराठी kondura Beach Information In Marathi

kondura Beach Information In Marathi | कोंडुरा बीच संपूर्ण माहिती मराठी – नमस्कार मित्रहो, कोकण म्हणजे स्वर्ग, एवढेच म्हणता येईल कारण यापेक्षा वेगळी उपमा आपण दुसरी कोणती देऊच शकत नाही. आपल्याला जर स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा असेल, तर वर्षातून एकदा तरी आपणाला कोकणात भेट द्यायलाच हवी. कारण या कोकणाच्या एका बाजूला ७२० किलोमीटर पर्यंतचा दूरपर्यंत पसरलेला असा अथांग समुद्र किनारा आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा. यामुळेच तर कोकणाला दिमाखदार सौंदर्य लाभलेले आहे. म्हणूनच कोकणाला संस्कृतमध्ये अपरांत असे म्हणतात.

याच कोकणामध्ये एक असा जिल्हा आहे, ज्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक दृष्ट्या वारसा तर लाभलेला आहेच, परंतु हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत सुंदर आणि विकसित असा जिल्हा म्हणता येईल. तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्याला अनेक बीचेस लाभलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोंडुरा बीच. ज्याची आज आपण भटकंती करणार आहोत. चला तर मग, पाहूया हा कोंडुरा बीच नेमका आहे तरी कसा?

Table of Contents

कोंडुरा बीच संपूर्ण माहिती मराठी | kondura Beach Information In Marathi

निळेशार पाणी अन मोकळे आकाश,
सोबत शांत किनारी लाट,
सुंदर आहे असे कोकणचे स्वरूप,
स्वर्ग ही यापुढे फिका पडेल असे सौंदर्य आहे याचे खास.

सिंधुदुर्गमध्ये बरेच असे समुद्रकिनारे आहेत जे बऱ्याच लोकांना अजून माहित पण नाहीत. त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा गावचा कोंडुरा बीच. पांढरीशुभ्र वाळू, मोठे मोठे खडक हे तुम्हाला या कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळतील.

बीचकोंडुरा
जिल्हासिंधुदुर्ग
तालुकावेंगुर्ला
पिनकोड४१६५१६
पर्यटन सोयी वॉटर स्पोर्ट्स, हॉटेल्स, रिसॉर्ट

कोंडुरा बीच कुठे आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील, सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यापैकी एक म्हणजे कोंडुरा बीच होय. हा समुद्रकिनारा तालुक्यापासून साधारणतः बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे. या बीचवर पांढरी वाळू आणि काळे मोठाले खडक आहेत. नारळाची उंच झाडे असलेला स्वच्छ किनारा तसेच भगवान शिवाचे सुंदर मंदिर असणारा आणि बाजूला वाहणारा नाला, असेही निसर्गाचे शांत नेत्र सुखद सौंदर्य कोंडुरा बीचवर अनुभवता येते.

kondura Beach Information In Marathi

कोंडुरावाडीहून कोंडुर्‍याच्या समुद्राकडे जायला एक पाणंद आहे. आजूबाजूला रणरणतं ऊन संपूर्ण माळावर पसरलेलं असतं. आजूबाजूला आंब्याच्या कलमांची बाग. पाणंदीतून खाली उतरत गेलं की, कोंडुर्‍याचा समुद्र नजर जाईपर्यंत तुमच्या अस्तित्वाचा ठाव घेतो. संपूर्ण पाणी, आजूबाजूला किनार्‍यावर माडाची झाडं अस्ताव्यस्त उभी आहेत.

या किनार्‍यावर पुरातन शंकर मंदिर आहे, तिथे भयाण शांतता आहे. किनार्‍याच्या लगत असणार्‍या माडांच्या झाडातून पुढे गेले की, कोंडुर्‍याची प्रसिद्ध गुहा दिसते. अशा लहानमोठ्या अनेक गुहा तेथे आहेत. मुख्य कोंडुर्‍याचे तोंड विस्ताराने मोठे आहे. इथले जुने लोक सांगतात की, पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी वेगाने या कोंडुर्‍यात घुसायचे, पुढे हे पाणी डोंगराच्या माथ्यावर बाहेर पडायचे. हे पाणी घुसताना मोठा आवाज यायचा, तो दूरवर ऐकायला यायचा. याला ‘कोंडुर्‍याची गाज’ म्हणतात.

वेंगुर्ला मालवण या सागरी महामार्गापासून ३/४ किलोमीटर आत ‘कोंडुरा’ आहे. वेंगुर्ल्यापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेले हे एक अत्यंत रमणीय ठिकाण. किना-यावरून खाली खोल खोल उतरण. नारळी-पोफळीच्या बागेतून तुम्ही एकदम किना-यावरच जाता. समोर विस्तीर्ण समुद्र. पाठीमागे नारळी-पोफळीच्या बागा- त्या बागेतून नेहमी वाहणारा गोडया पाण्याचा झरा- झाडीमध्ये लपलेले लिंगेश्वराचे देऊळ!

कोंडुरा बीच भूगोल – नकाशा – Kondura Beach Location

कोंडुरा बीचचा इतिहास – Kondura Beach History

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील हे एक अत्यंत रमणीय असे ठिकाण म्हणजे कोंडुरा बीच. या किनाऱ्यावरून खाली खोल खोल उतरण आहे. नारळी फोकळीच्या बागेतून तुम्ही एकदम किनार्‍यावरच जाता. समोर विस्तीर्ण समुद्र आहे. आणि त्याच्या पाठीमागे नारळी पोफळीच्या बागा. त्या बागेतून नेहमी वाहणाऱ्या गोड पाण्याचा झरा आणि झाडीमध्ये लपलेले लिंगेश्वराचे देऊळ आहे. अत्यंत रमणीय आणि आरती प्रभू यांनी आपल्या कादंबरीमध्ये म्हटल्याप्रमाणे गुढ असा हा किनारा आहे.

ज्याला प्रचंड दगडांमध्ये समुद्राने केलेले कोरीव काम पाहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी जमेल त्या ठिकाणी दगड फोडून आत विवर बनवले आहे. ज्यावर लाटा आढळल्यावर प्रचंड असा आवाज येतो. मात्र या दगडांवरून खडकांवरून चालताना सांभाळून चालावे लागते. कारण हे दगड लाटांच्या माऱ्याने इतके धारदार आणि अणूकुचीदार बनले आहेत की, आपला पाय कापूनच निघेल.

तळाशील तोंडवली बीच संपूर्ण माहिती

कोंडुरा बीचवर कसे पोहोचायचे?– How To Reach Kondura Beach Vengurla

कोंडुरा समुद्रकिनारा अत्यंत कमी आणि सौम्य लाटा असणारा असा हा शांत समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा अनेक रस्ते आणि मार्गाने जोडलेला असल्याने या ठिकाणी सहज आणि सुरक्षितपणे भेट देता येते. या समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे स्टेशन म्हणजे वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कुडाळ असे आहे.
वेंगुर्ला हे महाराष्ट्र राज्यात स्थित आहे. आणि हे गोव्याच्या अगदी जवळ आहे. आणि तुमच्या मुंबई ते गोवा प्रवासासाठी हे एक उत्तम स्टेशन आहे. मुंबई आणि गोव्यातून वेंगुर्ला रस्त्याने सहज जाता येते. ही दोन्ही ठिकाणे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने सहज उपलब्ध आहेत.

Kondura Beach Vengurla

गोवा ते वेंगुर्ला – विमानाने – गोव्यातील मोपा विमानतळ हे वेंगुर्ल्यापासून ६० किमी अंतरावर असलेले सर्वात जवळचे विमानतळ आहे. तेथून येण्यासाठी टॅक्सी आणि बसेस उपलब्ध आहेत.

गोवा ते वेंगुर्ला – ट्रेन ने – थिविम रेल्वे स्टेशन हे वेंगुर्ल्याला सर्वात जवळचे स्टेशन आहे.

गोवा ते वेंगुर्ला – रस्त्याने – वेंगुर्ला गोव्यापासून फक्त ११० किमी अंतरावर आहे. आणि मुंबई-गोवा मार्गावर आहे. हे मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांना रस्त्यांनी जोडलेले आहे.

मुंबई वरून वेंगुर्ला – मुंबई गोवा हायवे ने आंबोली मार्गे कुडाळ वेंगुर्ला जाता येते.

मुंबई वरून वेंगुर्ला ट्रेन ने – मुंबईवरून वेंगुर्लेला जाण्यासाठी ट्रेन ने कुडाळ पर्यंत यावे लागते. आणि कुडाळ वरून वेंगुर्ला बस किंवा खाजगी वाहनाने सुद्धा जाता येते.

पुणे सातारा मार्गे – सावंतवाडी आणि तिथून वेंगुर्ला आणि वेंगुर्ल्यावरून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर कोंडुरा बीच आहे.

वाहतुकीची साधने – कोंडुरा बीचवर जाण्यासाठी वेंगुर्ला मधून बस, कॅब किंवा ऑटो रिक्षा उपलब्ध असतात.

मुख्य शहर ते कोंडूरा बीच अंतर

 • कोल्हापूर ते वेंगुर्ला अंतर १७२ किलोमीटर
 • मुंबई ते वेंगुर्ला अंतर ५४० किलोमीटर
 • पुणे ते वेंगुर्ला अंतर ३९५ किलोमीटर
 • बेळगाव ते वेंगुर्ला अंतर १२५ किलोमीटर
 • गोवा ते वेंगुर्ला अंतर ११२ किलोमीटर
 • सावंतवाडी ते वेंगुर्ला अंतर २६ किलोमीटर
 • कुडाळ ते वेंगुर्ला अंतर २० किलोमीटर

कोंडुरा बीचवररील पर्यटन आणि पक्षी निरीक्षण

कोंडुरा बीचवर फेसळणाऱ्या लाटा, खारट आणि शांत असे पाणी त्यामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांच्या आगमनासाठी एकच सुखदायक अनुभव प्रदान करतो. या बीचवर कौटुंबिक सहलीचे नियोजन सुद्धा अगदी व्यवस्थितपणे करता येते. आणि या समुद्रकिनाऱ्यावर सगळ्या प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज, पोहणे यासारख्या मनोरंजक खेळांचा आनंद घेऊ शकता. तसेच बोटिंग आणि मासेमारीचा आनंद सुद्धा पर्यटकांना घेता येतो. या समुद्रकिनाऱ्यावर जलचर प्रजाती देखील आढळता.

ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित समुद्र पक्षी देखील असतात. तसेच जुन्या नारळाच्या झाडांवर ढोली करून राहणारे सुतार पक्षी, छोटे-छोटे सरडे आणि टीटवी, खंड्या, करढोक, बगळे, लाल बॅक्ड सीगल असे पक्षी या समुद्रकिनाऱ्यावर आपणास पहावयास मिळतात. म्हणूनच हा समुद्रकिनारा पक्षी निरीक्षणासाठी एक आदर्श असे ठिकाण आहे.

आंबोली घाट माहिती मराठी : AMBOLI GHAT INFORMATION IN MARATHI

कोंडूरा पर्यटन व्हिडिओ

कोंडुरा बीचजवळील प्रसिद्ध ठिकाणे – Kondura Tourist Places

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला बीच हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा बीच असून या ठिकाणी तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक बोटी या ठिकाणी समुद्रामध्ये तुम्हाला दिसून येतील. संध्याकाळच्या वेळी समुद्र च्या काठी बसून मच्छीमारांची मासे पकडण्यासाठीची लगबग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या बीच वर रात्री कॅम्प फायर तसेच टेंट मध्ये राहून देखील तुम्हाला एन्जॉय करता येते. फेसाळणारा समुद्र, येथील शांतता तसेच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो.

वेंगुर्ला लाईट हाऊस

या ठिकाणी लाईट हाऊस ची व्यवस्था अप्रतिम आहे. या ठिकाणी चढून जाण्यासाठी लाल रंगाच्या पायऱ्या आणि आजूबाजूला डेकोरेशन तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी गेल्यास आल्हाददायक वातावरणाचा अनुभव आपल्या येतो.

तारकर्ली – देवबाग संपूर्ण माहिती

वेंगुर्ला बंदर

वेंगुर्लाचे बंदर हे लाईट हाऊसच्या जवळ आहे. पूर्वी या बंदरावर मोठमोठ्या होड्या थांबत असत. तसेच व्यापार धंदा सुद्धा बोटीने होत असे.

वेंगुर्ला बंदर

वेंगुर्ला म्युझियम

वेंगुर्लाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये हे म्युझियम आहे. या म्युझियमला “श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” असे नाव देण्यात आलेले आहे. या म्युझियम मध्ये वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, स्वातंत्रवीर सावरकर कलादालन त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ठिकाणांची प्रतिकृती आणि माहिती या म्युझियम मध्ये देण्यात आलेली आहे.

मानसीश्वर मंदिर

वेंगुर्ला बस स्थानकापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असून सागरेश्वरच्या बीच जवळ आहे. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. या मंदिराशेजारी खाडी असल्यामुळे समुद्राच्या भरती ओहोटीचे पाणी या ठिकाणी येत जात राहते. तसेच या मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि रमणीय असा आहे.

सातेरी मंदिर

वेंगुर्ला शहरापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे सातेरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय छान असे सुशोभीत करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये देवीची मोठी पाषाणातील मूर्ती असून मूर्तीच्या गाभाऱ्याभोवती वेगवेगळ्या पार्श्वनाथ मूर्ती दिसून येतात.

सागरेश्वर बीच

सोनेरी वाळू, नितळ पाणी, निरव शांतता आणि स्वच्छता तसेच छोट्या छोट्या खेकड्यांचे दर्शन ज्या ठिकाणी घडते तो म्हणजे सागरेश्वर बीच. या ठिकाणी आपल्याला डॉल्फिन देखील पहावयास मिळतात

सागरेश्वर मंदिर

सागरेश्वर बीच वरून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर उभा दांडा येथे सागरेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे.

येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला या ठिकाणी हे वेतोबाचे मंदिर आहे. वेंगुर्ला म्हटले की, मालवणी खाद्यपदार्थ आलेच. या मालवणी खाद्यपदार्थांमध्ये खाजे, शेंगदाणे लाडू, शेवाचे लाडू, कुळीथचे पीठ, मालवणी मसाले, त्याचप्रमाणे कोलंबीचे लोणचे, काजू आणि त्याचे विविध पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मालवणी मांसाहारी पदार्थ सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत.

या ठिकाणी विविध प्रकारचे मासे त्याचप्रमाणे कोंबडी वडे, मोरी मटण, भाकरी, वडे, तिसऱ्या मसाला, कर्ली फ्राय, कोलंबी मसाला, सोलकढी यासारखे बरेच पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत. हळदीच्या पानातील पातोळ्या, घावन रस, नारळाची चटणी, तांदळाची भाकरी, फणसाची भाजी यासारखे प्रसिद्ध पदार्थ या ठिकाणी मिळतात. दुपारच्या वेळी उकड्या तांदळाची पेज प्रत्येक घराघरांमध्ये केली जाते.

कोंडुरा बीचला भेट देण्याचा हंगाम

कोंडुरा बीच ला साधारणतः दिवाळीपासून मार्च महिन्यापर्यंतचा सगळ्यात उत्तम हंगाम असतो. कारण या महिन्यांमध्ये तेथील हवामान उबदार असते. आणि तेथील गर्दी सुद्धा कमी प्रमाणात आढळून येते. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा हा बीच एकदम चांगला आणि आरामदायी आहे. तिथले पाणी सुद्धा स्फटिका सारखे स्वच्छ असते.

येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय

कोकणातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतोच परंतु आता काही अंशी लोक पर्यटनावर सुद्धा अवलंबून आहेत.

वॉटर ऍक्टिव्हिटीज | Kondura Water Activities

स्नोर्कलिंग

हा प्रकार स्कुबा सारखाच आहे. हा प्रकार लहान मुलेसुद्धा करु शकतात. समुद्राच्या खाली रंगीत प्रवाळ, खडक, चमचमणारे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारची घटकांची झालेली रचना यामुळे स्नॉर्कलिंग करण्याचा अनुभव वेगळाच असतो. यासाठी लागणाऱ्या फ्लीपर्स संच, गॉगल आणि स्मॉल्कन खरेदी किंवा भाड्याने घेऊन वापरले पाहिजे. स्नॉर्कलिंग मुळे माशांच्या विविध प्रजाती आणि इतर अनेक जीवांचे निरीक्षण करण्यास मिळते. हा एक वेगळा अनुभव असतो जो तुम्हाला तुम्ही कधीही विसरू शकत नाही.

तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स

स्पीड बोटिंग

वॉटर ऍक्टिव्हिटीज मधला स्पीड बोटिंग हा सुद्धा एक धाडसी प्रकार आहे या स्पीड बोटिंग च्या सहाय्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आपण गतीने समुद्र सफर करू शकतो. पंधरा ते वीस मैल प्रति वेगाने स्पीड बोट समुद्रावर चालवू शकतो. स्पीड बोटिंगचेही प्रकार असतात काही स्पीड बोटि वर फक्त एक किंवा दोन माणसेच बसू शकतात तर काही स्पीड बोटिंग वर आपण चार ते पाच जणांचा ग्रुप घेऊनही जाऊ शकतो. लाटांवरच्या या वेगाचा अनुभव घ्या घ्यायचा असेल तर स्पीड बोटिंग एकदा तरी करून बघायलाच पाहिजे. स्पीड बोटिंग करताना त्यांचे सुरक्षारक्षक आपल्याबरोबर असतातच शिवाय आपण त्यांनी दिलेली लाईफ जॅकेट घालणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

कयाकिंग

या प्रकारात कयाक नावाची छोटी बोट असून ही पर्यटकांना फिरण्यासाठी दिली जाते. या कयाक मध्ये बसून, हातात वल्ही घेउन आपण फिरू शकतो.

बंपर राईड

बंपर राईड ही एक अशी रोमांचकारी प्रकारामध्ये रबरापासून बनवलेल्या बंपर सीटवर पर्यटक झोपू शकतात किंवा बसू शकतात. याला वेगाने चालणाऱ्या बोटीला जोडले जाते. वेगाने चालणाऱ्या बोटीला ही बंपर सीट जोडल्यामुळे याच्या वेगा मुळे पर्यटकांना मजा येते आणि एक वेगळाच अनुभव प्राप्त होतो.

जेट स्की

जेट स्कीइंग ची राईड करण्यासाठी आपल्याला थोडेफार कौशल्य असावे लागते त्या आपली जर तयारी असेल तर आपण ते शिकूही शकतो ती राईड पूर्ण सिंधुदुर्गात सगळ्या बीचवर उपलब्ध आहे. ही राईड थोडी खिशाला परवडणारी नसते परंतु या राईडने एक वेगळीच मजा येते.

बनाना राईड

ह्या प्रकारात केळ्याच्या आकाराची एक लांब रबरी हवेने भरलेली पिशवी असते. त्या रबरी पिशवीवर एका वेळी चार ते सहा जण बसू शकतात. आणि त्यांना पकडण्यासाठी समोर दोरीची सोय केलेली असते. ही हवा भरलेले बनाना बोट एका स्पीड बोटीला बांधली जाते. स्पीड बोट जेवढ्या जोराने जाईल, तेवढ्या जोरात, हवेमध्ये उसळ्या घेत ही बनाना बोट त्या मागून ओढली जाते. आणखी थ्रिल चा अनुभव देण्यासाठी स्पीड बोट चालवणारा अचानक वळण घेऊन गुडघाभर पाण्यात सर्व पर्यटकांना भिजवून काढतो.

पॅरासेलिंग

वॉटर स्पोर्ट्स या प्रकारांमध्ये सर्वात थरारक असणारा असा हा प्रकार म्हणजे पॅरासेलिंग होय. आपण जर धाडसी असाल आणि उंचीची भीती वाटत नसेल, तर पॅरासेलिंग आपल्यासाठी अतिशय योग्य आहे वेगाने जाणाऱ्या बोटीच्या गतीमुळे आपण दोरीला अडकून समुद्रावर उंच उडतो. या पॅरासेलिंग मध्ये एकाच वेळी एक किंवा दोन माणसे समुद्राच्या पाण्यावरून उंच उडण्याचा अनुभव घेऊ शकतात. आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांनी फ्लायर बांधलेले असतात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही.

बोट टेकऑफ झाल्यावर तुमच्या मागे असलेले एक विशाल पॅराशुट वारा पकडते. आणि तुम्हाला हवेत उचलू लागते. आपण जवळपास ५०० ते ८०० फूट हवेत उचलले जातो. हा हवेत उडण्याचा अनुभव अतिशय मनोरंजक असतो.

डॉल्फिन राईड

डॉल्फिन राईड करण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये फारच थोडी ठिकाणी आहेत. ही राईड करण्यासाठी साधारणपणे ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. एका बोटीच्या फेरीमध्ये साधारण आठ ते नऊ जण जाऊ शकतात. ही राईड साधारणपणे सकाळच्या वेळेला भरती- ओहोटी प्रमाणे असते. आपल्याला मोठ्या प्रमाणावर डॉल्फिन उड्या मारताना दिसतात.

फिशिंग

मासेमारी हा अनेकांचा आवडता मनोरंजक असा प्रकार आहे. तुम्ही खाण्यासाठी मासेमारी करत असाल किंवा पकडण्यासाठी आणि सोडण्यासाठी करीत असाल, तर तो एक तुम्हाला मोहक आनंद देऊन जातो. प्रत्येक प्रकारच्या मासेमारीची स्वतःची अशी तंत्र आणि उपकरणे असतात. तलावातील मासेमारी, नदीतील मासेमारी, महासागरातील मासेमारी आणि जलाशयातील मासेमारी असेही मासेमारीचे प्रकार आहेत.

नद्या आणि तलावांमध्ये केली जाणारी मासेमारी ही आरामदायी असते. तुमच्याकडे आवश्यक ती परवानगी असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मासेमारी करू शकता. समुद्रात केली जाणारी मासेमारी ही थोडी कष्ट प्रद असते.

स्कुबा डायविंग

स्कुबा डायविंग हा समुद्रात पाण्याखालील जीवसृष्टी पाहण्याचा एक अद्वितीय प्रकार आहे. स्कुबा डायविंग करताना पाण्याखाली जाणारा डायव्हर श्वास घेण्याच्या उपकरणांसहित पाण्याखाली जातो. ही उपकरणे वापरल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ चांगल्या प्रकारे श्वास घेता येतो. या उपकरणांमध्ये मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, नोज आणि माऊथ मास्क, स्कुबा सूट आणि पेडल असतात.

कोंडुरा समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला असणारे किनारे

रेडी

महाराष्ट्राच्या समुद्र किना-यावरील दक्षिण टोकाचे शेवटचे गाव म्हणजे रेडी. पूर्वी हे रेडीबंदर म्हणून प्रसिध्द होते. परदेशी जाणा-या, येणा-या बोटी इथे थांबत. सध्या याठिकाणी मोठया बोटींची वाहतुक बंद आहे. त्यामुळे छायाचित्रात दिसणा-या जेटीजवळ बोटी दिसत नाहीत. रेडी हे खाणीसाठी देखील प्रसिध्द आहे. ‘उषा इस्पात’ हा प्रचंड प्रकल्प याठिकाणी सुरू आहे. वर्षानुवर्षे या मँगेनीजच्या खाणी असंख्य लोकांना रोजगार देत आहेत. रेडी खाणीच्या मुखाशी ऐतिहासिक यशवंतगड किल्ला देखील आहे.

वेंगुर्ला

वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास सांस्कृतिक, धार्मिक आणि परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला या शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती. परंतु आता बोटिंमार्गे होणार व्यापार बंद झाल्यामुळे केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.

मोचेमाड

मोचेमाड अतिशय छोटासा असणारा समुद्रकिनारा आहे. त्याच्या एका टोकाला पर्वत आणि दुसऱ्या टोकाला नदीची खाडी आहे. तसे हे गाव मच्छीमारांचे असून या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला जास्तीत जास्त मच्छिमार दिसून येतात हा समुद्रकिनारा स्वच्छ असून पोहण्यासाठी सुरक्षित आहे.

शिरोडा

शिरोडा हे वेंगुर्ला तालुक्यातील, दक्षिण कोकणातील एक लहानसे गाव आहे. हे गाव तेथील मोठा समुद्रकिनारा, सोनेरी वाळू, गणेशोत्सव, साप्ताहिक बाजारपेठ (दर रविवारी), मत्स्य बाजार, जेट्टी, मिठागर, खारपट्टी, समुद्रकिनाऱ्यावर सुरूची आणि नारळाच्या बागा, छोट्या डोंगररांगांमध्ये तसेच आंबा आणि काजूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

या गावात श्रीदेवी माऊली देवस्थानची प्रतिष्ठित गावदेवता, त्यानंतर दत्त मंदिरे, हनुमान मंदिर आणि गिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. शिरोडा-आरवली गावात वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. जिथे सध्या टीव्ही मालीका सुरू आहे. शिरोडा गावचा समुद्रकिनारा हा आधी वेळागर म्हणून प्रसिद्ध होता, आणि आता पॅराडाईज बीच म्हणून प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर पांढरी- सोनेरी वाळू पर्यटकांना आकर्षित करते. अवघ्या ६-७ किलोमीटर अंतरावर गोवा असल्यामुळे या गावाला विदेशी पर्यटक सुद्धा पसंती दर्शवतात.

कोंडुरा कादंबरी

चिं. त्रिं. खानकरांनी आपल्या कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे कोंडुरा हे एक न सुटणारं कोडंच आहे. हा किनारा सहज आपण भुरळ घालतो. या ठिकाणी समुद्र नुसता बोकाळला आहे. समुद्र अगदी अंगावर येताना दिसतो. ती कमाल लाट आपल्याला आत ओढून घेणार नाही ! ही एक अनामिक भीती मनाला स्पर्श करून जाते. कोंडुरा एक विलक्षण अनुभव आहे तो खानोलकरांनी आपल्या बहुप्रतिभेने पेलला आहे.

खानोलकरांनी ‘आरती प्रभू’ नावाने कविता लेखन केलं, ते देखील या कोंडुरा सारखं ठाव न लागू देणारं. कोंडुरा एक विलक्षण अनुभव आहे तो खानोलकरांनी आपल्या प्रचंड प्रतिभेने दिलेला आहे. सर्वस्वी पतिव्रता असणारी अनुसया, पार्वती आणि स्वतःला पापात बुडवणारा नारोबा अशी पात्रे कादंबरीत आपल्याला भेटतात आणि आपल्याला संपूर्ण वाचनात गुंतून ठेवतात.

कोंडुरा बीच जवळील हॉटेल्स | Kondura Beach Hotels

कोंडुरा बीच हा जसा फिरण्या साठी आपल्याला प्रोत्साहित करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध प्रकारचे हॉटेल रेस्टॉरंट गेस्ट हाऊस बघायला मिळतात. या परिसरात विविध प्रकारचे कॉटेज देखील विकसित केलेली आहे ही सर्व ठिकाणी पर्यटकांच्या आगमनासाठी उत्कृष्ट प्रदान करतात त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागत नाही अगदी ही हॉटेल्स पारंपारिक आणि सी फूड साठी प्रसिद्ध आहे या व्यतिरिक्त तेथे असणाऱ्या हॉटेलच्या खोल्या देखील व्यवस्थित आणि स्वच्छ तसेच अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होतात.

 • सॅम अँड सॅंड रिसॉर्ट
 • दर्याराज बीच रिसॉर्ट
 • श्री हॉटेल
 • दुर्गा रिसॉर्ट
 • यशधारा
 • शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट

प्रश्न

कोंडूरा बीच कुठे आहे?

कोंडूरा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात, वेंगुर्ला तालुक्यात, कोंडूरा गावात आहे.

कोंडुरा बीचवर राहण्यासाठी रिसॉर्ट उपलब्ध आहेत का?

कोंडुरा बीचवर राहण्यासाठी आपल्याला परवडतील अशी एसी, नॉन एसी रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

कोंडुरा बीच कशासाठी प्रसिद्ध आहे?

कोंडुरा बीच तेथील वॉटर ऍक्टिव्हिटीज आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

कोंडुरा बीचवर कसे पोहोचता येते?

कोंडुरा बीचवर जाण्यासाठी कुडाळ हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही खाजगी वाहनाने किंवा बसने येऊ शकता.

कोंडुरा बीच माहिती मराठी निष्कर्ष

मित्रांनो, आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला तालुक्यातील, कोंडुरा गावातील, कोंडुरा बीच याची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला कोंडुरा बीच माहिती ही माहिती वाचून कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील, तर त्या देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment