संत जनाबाई माहिती मराठी Sant Janabai Information In Marathi

संत जनाबाई माहिती मराठी Sant Janabai Information In Marathi – आपल्या भारत देशाला विविध संतांची साथ लाभली. त्यामधीलच एक प्रसिद्ध विठ्ठल भक्त, संत जनाबाई. संत जनाबाई या नामदेवांच्या घरी दासी होत्या.

नामदेवांच्या घरी त्या कपडे धुणे, पाणी भरणे, भांडी धुणे, घर झाडणे, इत्यादी. सर्व कामे करत. संत जनाबाई या संत नामदेवांच्या दासी म्हणजेच नामायकी दासी किंवा संत नामदेवांची दासी म्हणून प्रसिद्ध आहेत.

तसेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संत जनाबाई या प्रमुख कवियित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या कवितेमधून स्नेह, योग्य मार्ग, धर्म रक्षणासाठी अवताराचे कार्य, त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

संत जनाबाई या नेहमी काबाडकष्ट करत आल्या. पण त्यांना या कामात मदत केली ती, प्रत्यक्ष विठूरायाने. जनाबाई यांचे जातं, मडकी, चूल, असा सगळा जनाबाईंचा संसारच पंढरपूरकरांनी जपून ठेवला आहे. त्यांचा हा संसार पाहिल्याशिवाय, वारकरी पंढरपुरातून परत येत नाही.

देवाला अंकित करणारी नाम्याची दासी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, अशा श्री संत जनाबाई यांचा जीवन वृत्तांत आज आपण पाहणार आहोत.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत जनाबाई यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

संत जनाबाई माहिती मराठी Sant Janabai Information In Marathi

पूर्ण नाव संत जनाबाई
जन्म तारीख अंदाजे इ.स. १२५८
जन्म स्थळ गंगाखेड
प्रसिद्धी संत
आईचे नाव करुंड
वडिलांचे नाव दमा
मृत्यू अंदाजे इ.स. १३५०

संत जनाबाई यांचा जन्म

  • मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात, गंगाखेड नावाचे एक गाव आहे. तेथे दमा या नावाचा एक व्यक्ती राहत असे, तो भागवत भक्त असून, पंढरीची वारी अनेक वर्षे करीत असे. त्याची बायको करुंड ही पतीव्रता स्त्री असून ती ही नवऱ्याबरोबर, पंढरपूरची यात्रा करी. या दाम्पत्याला मुल नसल्याने, ते मनातून खिन्न असत.

हे वाचा –

  • एक वर्षी त्यांनी पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाला नवस केला आणि विठ्ठलाने ही दम्याची उत्कट भक्ती पाहून त्याला दृष्टांत दिला. जनाबाईंचे वडील आपल्या झोपडीत एके संध्याकाळी विठ्ठलाचे उत्कट भक्तीने नामस्मरण करीत होते.
  • पांडुरंगाची अगदी एकरूप होऊन गेले, एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. समोर पांडुरंग उभा असे पाहून, पांडुरंग पांडुरंग अस त्यांनी नामस्मरण केल.  
  • पांडुरंगाने त्यांची आतुरता पाहून, दम्याला सांगितले, दमा तुझ्या कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या होणार आहे. दमा अतिशय आनंदीत झाला. त्याने ही घटना आपल्या बायकोला सांगितली. दोघेही खूप आनंदित झाले. कालांतराने जनाबाई या भूतलावर अवतरल्या. देवाने आपला शब्द खरा केला.
Sant Janabai Information In Marathi
  • जनाबाई थोडी मोठी होताच तिच्या आई-वडिलांबरोबर ती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली. देवळामध्ये टाळ मृदुंगांचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरु झाला. विठ्ठलाला जनी च्या आई बाबांनी मनोभावे नमस्कार करण्यास सांगितले.
  • जणीने विठ्ठलाच हात जोडून अनन्य भावाने नमस्कार केला आणि जनाबाई त्याच्याकडे एकट पाहू लागली. क्षणात तिची तेथे समाधी लागली. तेथून ती हलेना. वडील एकसारखे तिला चला आता, आपण जाऊया असे म्हणत होते.
  • पण तिचे आपले एकच तुम्ही, जा मी येत नाही. अगं असं काय करतेस, आपण पुन्हा येऊ. आता घरी गेले पाहिजे. मुलीचा हा आगळा हट्ट पाहून आईला रडू आले.
  • अग तुला एकटीला सोडून कसे जाऊ आम्ही? तुझ्याकडे कोण बघणार, जनी उत्तरली जनीचा हा अगदी आगळा हट्ट पाहून नाईलाजाने आई-वडील जड अंतकरणाने परत फिरले.

जनाबाई नामदेवांच्या घरी आली

  • विठ्ठलाचे ध्यान करीत, जनीने देवळातच रात्र काढली. पहाट झाली. देवळाच्या कडेला रडवेली होऊन, ती एकटी उभी राहिली.
  • नित्य नियमाप्रमाणे नामदेवांचे वडील दामाशेठ पहाटे देवदर्शनाला आले आणि एकटीच उभी असलेली ती पोर पाहून, त्यांनी तिला विचारले, कोण ग तू ? आणि एकटीच कशी आली.
  • जनीचे डोळे पाण्याने भरून आले आणि म्हणाली, मीच आई-वडिलांना जा म्हणून सांगितले. मी येत नाही. मी इथेच राहील. पण आता मला वाईट वाटतंय, मी चुकलेच आणि तिला पुन्हा रडायला आले.
Sant Janabai
  • दामाशेठ तिची दया आली. ते म्हणाले, अग तू रात्री कुठे होतीस ? ती म्हणाली, इथेच, पांडुरंगा जवळ. दामाशेठ दचकले आणि ते तिला म्हणाले, बाळ रडू नकोस, तू चल माझ्याबरोबर, आमच्या घरी. ती दामाशेठ बरोबर त्यांच्या घरी गेली.
  • घरी आल्यावर नामदेवाने विचारले, ही कोण ? दामाशेठ म्हणाले , तिचे नाव जनाबाई. सबंध रात्र हिने पांडुरंगाच्या देवळात काढली. तिला आपल्याकडेच रहावे असे मी सांगितले आहे. नामदेवांनी तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि ते तिथून निघून गेले.
  • त्यांच्या आईच्या, गोणाईच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या. ती म्हणाली आपण गरीब खायची १४ तोंडे आणि हि पंधरावी आणलात.
  • दामाशेठ शांतपणे उद्गारले, अगं हे देवाघरचे लेकरू. आपण जे खातो, तेच दे खायला. शिवाय तुला हिची कामाला मदत होईल. जनाबाई घाबरून गेली.
  • जनी म्हणाली, आई मी तुम्हाला जड होणार नाही. तुमच्या सर्व कामात तुम्हाला मी मदत करीन, दोन घास कमी खाईन, घरातला केरकचरा काढीन, भांडी घाशीन, धुणे धुविन, दळण करीन.
  • जनाबाई कामाला लागली. पण काम करताना तोंडातून सदैव विठ्ठलाचे नाव. अशा रीतीने जनाबाई आता नामदेवाच्या कुटुंबात सामावून गेली.
  • नामदेवाबरोबर ती नित्य नियमाने देवळात जाई. भक्तीयुक्त अंतकरणाने देवाचे भजन करी. देव मनातून संतोष होऊन जाईल देव भावाचा भुकेला.

संत जनाबाई व गोवऱ्यांची गोष्ट

  • संत जनाबाई यांचे अभंग, खूप लोकप्रिय झाले. दूर दूर पर्यंत त्यांची ख्याती पोहोचली आणि त्यांचीही ख्याती कबीरांच्या कानावर गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी एके दिवशी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरपूरला आले.
  • तिथे आल्यावर त्यांना कळाले की, नामदेवांच्या घरी जनी कामास आहे. गोपाळपुरास गोवर थापायला गेली आहे. तिला येण्यास काही वेळ लागेल, दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई, अभंग रचते याचे संत कबीर यांना फार आश्चर्य वाटले आणि तिची वाट बघत तिथे न थांबता ते गोपाळपुरला गेले.
संत जनाबाई
  • तिथे नदी काठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे, दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गौर्यांचा मोठा वाद झाला होता आणि गौर्या चोरल्याचा एकमेकींवरती आरोप करीत होत्या. कबीर काही काळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले,
  • नंतर काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का ? त्या दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, हीच की जनी, चोरटी. माझ्या गोवऱ्या चोरून, माझ्याशी भांडण करते. वर तोंड करून मला शहाणपणा शिकवते.
  • त्या बाईचे शब्द ऐकताच, संत कबीर यांना थोडासा धक्काच बसला. कारण त्यांच्या मनात जनाबाईंचे वेगळेच चित्र उभे राहिले, तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही, ते तेथेच उभे राहिले आणि त्यांचे भांडण पाहत होते.
  • त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनाबाई आहेस का ? हातातल्या गोवऱ्या खाली टाकून, जनाबाई बोलती झाली, होय. मी जनी.
  • तुला काही त्रास आहे का माझा , तिच्या उत्तराने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून, तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले.
  • ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाऊक नाही, पण तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या गोवऱ्या आहेत, तुम्ही आमच्या दोघींच्याही गोवऱ्या निवडून वेचून द्या. आता गोवऱ्या एकसारख्या दिसतात.
  • शेणाच्या गोल आकाराच्या, गोवऱ्या कुठली कोणाची, कस ठरवणार, याचं कोडं कबीरांना पडलं. संत कबीर यांना कोड्यात पड पडलेले बघून जनाबाई म्हणाली, यात काहीतरी विचार करायचा, अगदी सोप्प काम आहे.
  • आता तर कबीर चकितच झाले, सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या कुठली गोवरी कोणाची, हे ओळखता येणे कसे काय सोपे आहे.
  • कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाबाई हसून म्हणाल्या, अहो महाराज हे अगदी सोपं आहे. सर्व गोवऱ्या एका ठिकाणी करा आणि प्रत्येक गोवरी कानाला लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, ती गोवरी माझी आणि जिच्यातून आवाज येणार नाही, ती गोवर तिची.
  • कबीर यांचा चेहरा एकदम फुलून गेला ते पुढे गेले आणि त्यांनी त्या भागातील दोन गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य , त्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता.
  • आपण इथे येऊन काहीही चूक केली नाही, आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या आणि बहुतांश गोवऱ्या जनाबाईंच्या होत्या.

संत जनाबाई व विठ्ठल

  • दिवसभराच्या कष्टाने जनाबाई दमून जाई. एके दिवशी रात्री सहज त्या पडल्या, त्यांना झोप लागली, पण थोडी जागी होतास त्यांना कोणीतरी हाक मारण्याचा भास झाला. आवाज तर ओळखीचा वाटला, पण अशावेळी एवढ्या रात्री कोण येणार, जनाच्या मनात थोडी चलबिचल झाली. इतक्यात, अगं मी आलो आहे.
  • तुझा पांडुरंग. दळण दळायचा आहे ना. तुला मदत करायला आलो आहे. असा आवाज तिच्या कानी पडला. जना पूर्ण जागी होऊन, ती दाराकडे गेली. प्रत्यक्ष परमेश्वर दारात उभा. शेजारी धान्याचे तुडुंब भरलेले भांडे पाहून, तिलाही आनंद झाला. आणि ती दळायला बसली.
  • पांडुरंगानेही तिच्या जात्याच्या खुंट्याला हात लावला. जाते फार हलके लागत असून, ते भराभर फिरत होते. जनाबाई गोड गळ्याने ओव्या म्हणत होती.
  • त्या गोड आवाजात पांडुरंग ही सुखावत होते. पण या गाण्याच्या आवाजाने, गोणाईला जाग आली, ती जनाबाई जवळ आली. जात्यातून पडलेला पिठाचा ढिगारा पाहिला. भांडी तुडुंब भरलेले पाहिले, तरीही जनाबाई शांत हे सगळे पाहिल्यावर, तिला राग चढला आणि ती कडाडली.
  • यावेळी दळण दळतात. लोकांची झोपायची वेळ, कोठून एवढे धान्य आणलेस ? चोरी केलीस की काय ? आणि जोडीला हा कोण ग ? जनाबाई काहीच बोलत नाही, असे पाहून तिच्या रागाचा पारा चढला. तावा तावाने जाऊन कोपऱ्यातली काठी घेऊन, तिने ती जनाबाईकडे भिरकावली.
  • तिचा नेम चुकला आणि जनाबाईला काठी न  लागता, देवाच्या कपाळाचा अबीर बुक्का त्या काठीने खाली पडला आणि आश्चर्य घडले, त्या झोपडीतील सगळे वातावरण त्या सुवासाच्या घमघमाटाने भरून गेले.
  • मी विठाई, विठाई, असा आवाज दुमदुमला. गोणाई मात्र या अकल्पित घटनेने, गांगरून गेली आणि मागच्या मागे पसार झाली. जनाबाई कडे पाहून देव मात्र हसत होते.
  • श्रमल्यामुळे जनाबाई तेथेच पडली. देवा नाही तेथेच पडावे असे वाटले, अंगावर एक वाकळ घेऊन तेथेच पडले आणि त्यांना झोप लागली. पहाट झाली जनाबाई जागी झाली. उठली आणखी इथे कोण झोपली आहे, म्हणून विचार करू लागली.
  • झोपलेल्याच्या अंगावरची वाकळ बाजूला केली, आणि आश्चर्यचकित झाली. प्रत्यक्ष पांडुरंग तिथे झोपलेले तिने पाहिले. ती घाबरली.
  • लोक काय म्हणतील ? रुक्मिणी देवीला काय वाटेल ? या विचारांनी ती गडबडली. काकड आरतीची वेळ झाली आणि देव इथेच. तिने विठ्ठलाला गदगद हलवून, उठविले. देव घाई घाईने निघून गेले.

जनाबाईंवर चोरीचा आळ

  • विठ्ठलाने अंगावर घेतलेली वाकळ तशीच त्यांच्या अंगावर राहील पहाटेच्या काकड आरतीची वेळ झाली. देवळात घंटा घणघणू लागल्या, लोक जागे झाले.
  • भक्तमंडळी देवळाकडे येऊ लागली, फुले आणि इतर साहित्य घेऊन पुजाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप काढले आणि ते आत शिरले.
  • काकड आरतीची सर्व सिद्धता झाली. देवाला हार घालण्याच्या तयारीतच पुजारी असताना, एकदम तो दचकला मागे सरला, थक्क झाला. त्याला बोलवेना, भीतीने गांगरून गेला. हा काय प्रकार, देवाच्या अंगावर साधी वाकाळ कोणी घातली ही, अंगावरचे भारी वस्त्र कुठे आहेत ? गळ्यातले रत्न पदक तर दिसतच नाही, आणि हार ही नाही.
  • या चमत्काराचा अर्थ काय ? कोणी चोरले ? अशा विस्मयकारक विचारांनी, पुजारी आणि भक्तगण घाबरून गेले. शेवटी ही वाकळ कोणाची याचा ते विचार करू लागले, नाना कूर्तक सुरू झाले आणि आणि शेवटी ती वाकळ जनीची ठरली.
  • पण ती देवाजवळ कशी गेली, रात्रभर तर दरवाजा बंद होता. हा चमत्कार घडला तरी कसा ? सगळेजण आश्चर्यचकित झाले. जनी दोषी ठरली.
  • आणि तिच्यावर चोरीचा आळ आला. हा सगळा गोंधळ ऐकून, जनाबाई हतबुद्ध झाली. तिला काही सुचेना, ती स्तब्ध बसून राहिली, लोक जनाबाईंच्या घरी गेले, तिला बाहेर बोलावले आणि तिच्यावर देवाचा हार आणि रत्नपदक चोरल्याचा आरोप लावण्यात आला.
  • जनाबाईंच्या अंतःकरणात कालवाकालव सुरू झाली. अंतकरण फुटते की काय, अशी तिला भीती वाटली. दुःखाच्या भराती देवाला दोष देऊ लागली. पांडुरंगा हे काय झाले, मी काय करू आता, खरच मी पदक चोरले नाही, असे ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली.
  • नामदेवांबरोबर ती देवळात गेली. पांडुरंगाचे पाय भिजवले, त्यांच्याकडे एकटक बघत राहील. काही सूचना काहीच कळेना, देवाच्या पायावर डोके आपटून, तिला जीव द्यावासा वाटला. आईबाप सोडताना, पांडुरंग पाहील, असे विश्वासाने तिने त्यांना सांगितले होते.
  • आता तर आईबाप नाही, काय करू मरण पत्करेण, पण हा चोरीचा आळ माझ्यावर नको. मरणापेक्षा दुष्किर ते तिला जाचू लागली. अंतकरण फुटायची वेळ आली. तिने पांडुरंगाचा धावा सुरू केला.पांडुरंग, पांडुरंग.

संत जनाबाईवरील पांडुरंगाची माया

  • लोकांनी जनाबाईला फाशी देण्याचे ठरवले. अपराधच भयंकर होता. देवाच्या अंगावरचे दागिने चोरले होते. लोकांनी तिला देवापुढून ओढून बाहेर काढले, चंद्रभागेच्या तिरावर तिच्या फाशीचा सुळ ठोकण्यात आला होता.
  • तिथे जनाला फरफटत नेण्यात आले, जनाबाई स्थब्ध उभी राहिली. पुढे काय काय होत आहे, हे मन घट्ट करून बघत राहिली. पण देव काही झोपले नव्हते, ते तिथेच होते, तिच्या पाठीशी उभे होते.
  • इतक्यात मोठा चमत्कार घडला, सगळे वातावरण अभिराच्या सुगंधाने भरून गेले. इतका घमघमाट सुटला की, लोक आश्चर्याने इकडे तिकडे बघू लागले आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे, समोरचा लोखंडाचा सूळ वितळू लागला.
  • तेथे अबीर बुक्का सांडलेला होता. लोक अगदी थक्क होऊन गेले, भांबावून गेले, जनाबाई कडे बघत राहीले. जनाबाई मात्र इतका वेळ डोळे घट्ट मिटून बसली होती. मनात मात्र ध्यान पांडुरंगाचे, जमलेल्या समुदायाने जनाबाईंचा जयजयकार केला.
  • त्यामुळे ती इतकी गुदमरून गेली, किती काही काळ बेशुद्ध पडली. नामदेवाने तिला कसेतरी घरी आणले, तिची पुण्याई, तिची भक्तीची होती. याबद्दल लोकांची खात्री पटली. या सर्व घटनेने जनाबाई अगदी थकून गेली. पांडुरंग माझा आणि मी पांडुरंगाची याची तिला मनोमन खात्री पटली.
  • पांडुरंग या पोरीला फार जपत होते. त्याचे बारकाव्याने तिच्याकडे आणि तिच्या कामाकडे लक्ष होते. तिने केर काढला की, जमलेल्या केरासाठी ढीग व्हायचा, तिने धुनी धुतली कि ती पिळून निघायची, इतकेच काय पांडुरंग हाती तेल, फनी घेऊन केस विंचुरुनी वेणी घालीत.
  • तुम्ही इतके जनाबाईंचे करतात, असे रुक्मिणीने विचारले, ही कोण तुमची ? पांडुरंग उत्तरले, ही पंढरीची माहेरवाशी निराधार, पण गोड पोरगी. माझ्या आश्रयाला आलेली.
  • जनाबाईंचा पाठीराखा पांडुरंग सगळे कामे उरकून, जनाई एकटी बसली असता पांडुरंगाचे चिंतन करत करत अंतकरणातील परमेश्वराच्या स्तवनाचे उमाळे बाहेर पडत ते काव्यरूपात शब्दांकित होत.
  • हृदयातील विचारांचे कल्लोळ ओठांमधून, बाहेर पडत. कल्लोळाचे विषय विविध नाम, महात्म्य, विठ्ठल महिमा, भक्ती स्वरूप, आत्मस्वरूप, निश्चिती, संत स्तुती, परमार्थ जीवन, हा भावनांचा अविष्कार इतका गोड, इतका आकर्षक, की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांनी मोहिनी घातली.
  • आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगांनी जनीच्या हृदयातील खळबळीचे आविष्कार टिपण्या करता, स्वतः हातात लेखणी घेतली.

संत जनाबाई यांची काव्यरचना

संत जनाबाई माहिती मराठी Sant Janabai Information In Marathi – संत जनाबाई यांची भावपूर्ण कविता ईश्वर प्रेमाने भरलेली आहे. संत जनाबाई यांच्या साधारणतः ३५० अभंग सकाळ संत गाथेमध्ये प्रकाशित केले गेले आहे.

याशिवाय संत जनाबाई यांच्या बाल क्रीडा, दशावतार, कृष्णजन्म प्रल्हाद चरित्र, हरिश्चंद्रख्यान, द्रोपदी वस्त्रहरण व काकड आरती, तसेच भारुड, पद, पलाना, इत्यादी.

जनाबाईंनी संगीतबद्ध केल आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत चोखोबा, संत सेना महाराज, इत्यादी. तत्कालीन संतांच्या जीवनावर श्लोक रचून, संत जनाबाई यांनी पुढील पिढ्यांसाठी महत्वाचे कार्य केले आहे.

संत जनाबाई पांडुरंगात विलीन

संत जनाबाई माहिती मराठी Sant Janabai Information In Marathi – एका शत्रू कुळात जन्मलेली, अल्पवयात माता-पित्यांच्या सुखाला आसुसलेली, विशेष कर्तुत्वाने, कुळाचा उद्धार करणारी, ही तेजस्वी ज्योत पांडुरंगाच्या शीतल ज्योतीत विलीन झाली. या जनाबाईने २०० च्या वर अभंग रचना केल्या.

मराठी साहित्यात, संत जनाबाईं इतकी लोकप्रिय कवयित्री दुसरी कोणीही झाली नाही. आयुष्यभर नामदेवाच्या भक्ती मार्गाच्या पावलांवर, प्रवास करणाऱ्या, संत जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिल्या.

इ.स. १३५० आषाढ महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशीच्या मुहूर्तावर, नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नामाच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीवर पांडुरंगात विलीन झाल्या.

संत जनाबाई यांचे अभंग

१. जनी बैसली न्हायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥
घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥
ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥

२. झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥

३. ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥

४. भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी । सर्वाहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
वान्नर अवघे भुभुःकार । बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा करावी आह्मांसी । रावण आणितों तुह्मापासीं ॥५॥
तुझ्या नामच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करुनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥

५. द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कबिराच्या बैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्‍टी ॥३॥
चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥

जनाबाईंवरील पुस्तके

  • संत जनाबाई – लेखन – संत जनाबाई शिक्षण संस्था; गंगाखेड
  • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक – प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका – मंजुश्री गोखले)
  • संत जनाबाई – सुहासिनी इर्लेकर
  • संत जनाबाई – अभंग संग्रह १
  • संत जनाबाई – अभंग संग्रह २
  • संतचरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर
  • जनाबाईंचे निवडक अभंग, भालेराव इंद्रजित
  • जनाबाईचा थालीपाक, ले.शिवराम महादेव परांजपे
  • संत जनाबाई : चरित्र व काव्य, नंदुरकर मो.द.
  • जनाबाई, आजगावकर जगन्नाथ रघुनाथ,
  • संत जनाबाई आणि मुक्तेश्वर, नांदापूरकर ना.गो.
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, भवाळकर तारा
  • समर्थाची दासी संत जनाबाई, हेमंत विष्णू इनामदार

जनाबाईंवरील चित्रपट

  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन – राजू फुलकर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक – गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका – हंसा वाडकर)

FAQ

१. संत जनाबाईंचे गुरु कोण आहेत?

संत नामदेव. संत जनाबाई आयुष्यभर नामदेवाच्या भक्ती मार्गाच्या पावलांवर, प्रवास करणाऱ्या, संत जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिल्या.

२. संत जनाबाई यांचा मृत्यू कधी झाला?

इ.स. १३५० आषाढ महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशीच्या मुहूर्तावर, नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नामाच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीवर पांडुरंगात विलीन झाल्या.

३. संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे?

संत जनाबाई देखील त्याच वेळी नामाच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीवर पांडुरंगात विलीन झाल्या.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत जनाबाई यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करुन आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment