Gauri Avahan Information In Marathi | गौरी आवाहन पूजा माहिती मराठी – ज्यांच्या आगमनाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असतो, अशा लाडक्या गणपती बाप्पाचे यावर्षी १९ सप्टेंबर या दिवशी जल्लोषात आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते जेष्ठा गौरी आवाहनचे. २१ सप्टेंबर गुरुवार या दिवशी जेष्ठा गौरी आवाहन होत असून पुढे गौरी पूजन आणि विसर्जन असा त्या व्रताचा विधी असतो.
ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन माहिती मराठी | Gauri Avahan Information In Marathi
गणपती बाप्पाची जितकी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात, तितक्याच आतुरतेने जेष्ठा गौरीच्या गौरी आवाहनाची देखील भक्त वाट पाहत असतात. आपण गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन म्हणजेच गौरीच्या रुपात येणाऱ्या पार्वतीची आपण सगळे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पुजा अर्चा करून, नैवेद्य दाखवून, रीतसर विसर्जन करतो. ही गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई आहे. ती आपल्या बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरी येते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घरी परतते. महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचा तीन दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
नक्की वाचा👉 गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
प्रत्येक कुटुंबात आपल्या रितीरिवाजाप्रमाणे गौरी बसविल्या जातात. अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी, समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. नवविवाहितेसाठी हा सण खूप मोठा आणि खास असतो. या दिवशी तिला पाच ओवसे द्यावे आणि घ्यावे लागतात.
ही माहेरवाशिणी असल्याने आपण सर्वजण तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करतो. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते. फुलांची आरास, तर कोणी दिवे आणि थर्माकॉलच्या मखराची आरास तर काही ठिकाणी गणपतीसाठी केलेल्या मखरात गणपती बाप्पाजवळ बसवले जाते. हल्ली तर गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळीच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात.
काही ठिकाणी केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच तिच्या आवडीचे पदार्थ करुन तिला नैवेद्य दाखवले जातात. तसेच जेष्ठा गौरीच्या पुजेनिमित्त आपण सगळे नाच गाण्यात रात्र जागवतो.
गौरी पूजनाचा इतिहास
हिंदु धर्मशास्त्रांमध्ये नमुद केल्याप्रमाणे गौरी म्हणजेच पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पाच्या माता आहेत. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. ह्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये देखील आढळून येतो. पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले.
वाचा सविस्तर👉 गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर
त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो, त्यामुळे या व्रताला जेष्ठा गौरी पूजन म्हणतात. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण असून तो मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
गौरी शब्दाचा अर्थ
संस्कृतमधील शब्दकोशांच्या अनुसार गौरी ह्या शब्दाचा अर्थ आठ वर्षाची असलेली कन्या असा होतो. आणि गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे. तेरडयाची जी फुले असतात त्यांना देखील काही ठिकाणी गौरी असे संबोधिले जाते. आणि गौरीला महालक्ष्मी देखील म्हटले जाते. लक्ष्मी ह्या दोन आहेत.
एक भगवान विष्णु यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती ह्या दोघींनाही लक्ष्मी म्हणुन आपण पुजत असतो. पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणुन ओळखल्या जातात. गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. म्हणूनच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.
गौरी पूजा धार्मिक महत्त्व
भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते. हा उत्सव तीन दिवस चालतो. महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात.एक भगवान विष्णु यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती ह्या दोघींनाही लक्ष्मी म्हणुन आपण पुजत असतो. पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणुन ओळखल्या जातात.
नवमीला गौरीपूजन होते. गौरीला सोळा प्रकारच्या भाज्या, पंचपक्वान्नांचा नेवेद्य केला जातो. दशमीला गौरी विसर्जन होते. घरात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे गौरीपूजन करत असतो.
ज्येष्ठा गौरी आवाहन 2023 आणि मुहूर्त
- ज्येष्ठा गौरी आवाहन – गुरुवार २१ सप्टेंबर २०२३
- ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त – सकाळी ०६.१२ ते दुपारी ०३.३४ वाजेपर्यंत
- ज्येष्ठ गौरी पूजन – शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ रोजी
- ज्येष्ठ गौरी विसर्जन – शनिवार २३ सप्टेंबर २०२३ रोजी
- अनुराधा नक्षत्र प्रारंभ – 20-सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी०२.५८ वाजता
- अनुराधा नक्षत्र समाप्ती – २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३.३४ वाजता
जेष्ठा गौरी आवाहन माहिती
गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेंव्हा तो उत्साह वेगळाच असतो. गौरीच्या आवाहनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करुन दिलेले असल्यामुळे भाद्रपद शुक्ल अष्टमीला येतात, दूसऱ्या दिवशी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघतात. गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं.
अनुराधा नक्षत्रावर मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापणा केल्यास अधिक मंगलदायक ठरते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे असते, त्यांनी त्या दिवसभरात केव्हाही गौरींची प्रतिष्ठापना करु शकतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन तर काही ठिकाणी गौरी, गणपती असेही म्हणतात. गौरींचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात.
माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरीचे आवाहन वाजतगाजत, दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीला घरात आणले जातात. गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी. शक्यतो माहेरवाणीच्या हातूनच गौरीची स्थापना होते, तिला साडी नेसवली जाते, तिला नटवले जाते आणि घरातील माहेरवाशिणीच्या हातूनच गौरी आवाहन करण्यात येते. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. त्याचप्रमाणे गोडाधोडाचे जेवण करून नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये १६ भाज्या, आणि पंचपक्वानांचा बेत केला जातो.
राज्यातील विविध भागात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत गौरी आवाहनाचा सोहळा थाटामाटात पार पडतो. असुरांपासून गौरीने अत्याचार मुक्त केले असल्यामुळेच सुहासिनी स्त्रिया गौरीचे या दिवशी आवाहन करतात. कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी गौरीपूजनामध्ये ‘ओवसा’ ही एक महत्त्वाची परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात.
गौरी आवाहनच्या दिवशी १६ अंक हा शुभ मानण्यात येतो आणि म्हणूनच या दिवशी १६ सवाष्णींना बोलावून त्यांची पूजा करण्यात येते आणि १६ श्रृंगारांच्या वस्तूंचे वाटप करण्यात येते आणि याशिवाय १६ प्रकारची फळं, मिठाई, पदार्थांचा नैवेद्य ज्येष्ठ गौरीसाठी दाखविण्यात येतो.दुसऱ्या दिवशी गौरींचे संपूर्ण पूजन करण्याचे विधी असतात आणि त्यानंतर गौरीचे विसर्जन असते.
गौरी आवाहन (दिवस पहिला)
हिंदू धर्मशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा संदर्भ आढळून येतो. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे,असे सांगितले जाते. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना केली जाते.
कोकणात गौरीच्या मुखवट्याला साडी नेसवून दागिने घालून गणपतीच्या बाजूला बसवले जाते.त्यानंतर पूजा आणि नैवेद्य दाखवला जातो.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात .पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आहे.
गौरी पूजन (दिवस दुसरा)
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (बेसनलाडू, करंजी, रव्याचा लाडू, गुळपापडीचा लाडू, चकली, शेव ) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पापड, पडवळ भाजी, ताकाची कढी, कटाची आमटी,पंचामृत, वेगवेगळ्या प्रकारची भजी, लोणचे इत्यादी पदार्थ केले जातात . केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवून नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो.
कोणत्याही प्रदेशात आणि जाती जमातीमध्ये यादिवशी सोळा प्रकारच्या भाज्या करण्याची प्रथा आहे. गोड नैवेद्य म्हणजे घाटावर पुरणपोळी, कोकणात घावन-घाटले, खीर तर काही ठिकाणी चक्क तिखट नैवेद्य दाखवला जातो. जुन्या रीतीप्रमाणे काही समुदायात नैवेद्य म्हणून मद्यही दाखवले जाते.
गौरी विसर्जन 2023 (दिवस तिसरा)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा आरती करून पोवत्याच्या/सुताच्या गाठी बांधतात. त्या सुतात हळदीकुंकू,रेशमी धागा, सुकामेवा, फुले, झेंडूची पाने, बेलफळ, काशीफळाचे फूल, असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.
गौरींची पूजा, आरती करून पूजा करण्यात काही चुका झाल्यास तशी क्षमा मागून पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. आणि त्यांचे विसर्जन केले जाते. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी माती, वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.
महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गौरीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना पूजले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे गणपतीसह विसर्जन करण्यात येते. पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी, सौभाग्य प्राप्तीसाठी आणि घरादारात सुख समाधान आणण्यासाठीही गौरी पूजनाचे महत्त्व सांगण्यात येते. आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा म्हणूनही अनेक जण ज्येष्ठ गौरी पूजन करतात.
ज्येष्ठा गौरीपुजन विधी 2023
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या रितिरिवाजाप्रमाणे प्रमाणे महालक्ष्मी/गौरीचे मुखवते बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
प्रत्येक ठिकाणी गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात,दागिने घालतात. आणि त्यांची पूजा करतात. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एक दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात.
काही ठिकाणी गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात.
ग्रामीण क्षेत्रामध्ये पाहावयास गेले तर ह्या दिवशी सर्व सवाशिन स्त्रिया नदीवर जातात आणि जाता जाता गाणी म्हणतात आणि त्या गाण्यांमध्ये त्यांनी आपापल्या माहेराचा उल्लेख देखील करतात. मग गाणी म्हणता म्हणता त्या नदीवर जातात आणि मग तिथे नदीतुनच चार पाच खडे उचलतात आणि तिरडयाचे पान वाहत आपली पुजा संपन्न कतात आणि मग उचललेले खडेच गौर म्हणुन आपल्या घरी घेऊन जातात. अशा पदधतीने ग्रामीण क्षेत्रात गौरीपुजन केले जाते.
ह्या दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळी देखील काढली जाते. मग गौराईचा आपल्या घरात सदैव निवास राहावा यासाठी तिला संपूर्ण घरातुन फिरवले जाते. मग तिला गणपतीच्या बाजूला स्थानापन्न केले जाते. आणि तिने सदैव आपल्या घरातच वास करीत राहावे यासाठी हात जोडुन तिला प्रार्थना करायची असते.पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी पूजा करून नैवेद्य दाखवुन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीला शेवटचा निरोप दिला जातो. म्हणजेच तिचे विसर्जन केले जाते.
- सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान केले जातात.
- दारावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात.
- घर फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते.
- मूर्ती घरी आणली जाते.
- मूर्तीला नवीन कपडे, सिंदूर, दागिने, मंगळसूत्र इत्यादींनी सजवले जाते.
- गौरीला प्रसन्न करण्यासाठी गौरीची आराधना, आरती आणि भजन केले जाते.
- त्यानंतर फळे, मिठाई पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटणे.
- विसर्जनाच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करावे.
ज्येष्ठ गौरी पूजन विधी
महाराष्ट्रात विवाहित महिलांद्वारे हे ज्येष्ठ गौरी पूजन अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. साधारण तीन दिवस हे करण्यात येते. माता गौरीला सजवून आणि साज-श्रृंगार करूनच ही पूजा करण्यात येते. ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी पूजन करण्यात येते.
- सकाळी लवकर उठून, स्वच्छ स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान केले जातात.
- पूजेची तयारी करून सर्वप्रथम घरातील देवाची आणि नंतर गणपतीची पूजा करून घ्यावी.
- या दिवशी देवीची प्रतिमा पंचामृत आणि शुद्ध पाण्याने धुवावी. त्यावर अभिषेक करावा.
- अभिषेक आणि स्नान घातल्यानंतर एका चौरंगावर स्वच्छ कपडा घालून ती प्रतिमा स्थापन करावी.
- गौरीला व्यवस्थित साडी नेसवावी. साडी नेसून झाल्यावर गौराईला आपल्या हौसेप्रमाणे दागदागिने घालून सजवावे. गजरा किंवा वेणी माळवी.
- माता गौरील हळद – कुंकू वाहून त्यावर अक्षता आणि फूलं वाहावीत. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी.
- यानंतर गौरी पूजनासाठी १६ प्रकारचे पदार्थ आणि गोड पदार्थांचा वापर करून गौरीला नेवैद्य दाखवावा.
- गौरी पूजनादरम्यान माता गौरीचा जप करावा आणि कथा सर्वांना सांगावी आणि त्यानंतर गणपती आणि गौरीची आरती करावी.
- आरतीनंतर नैवेद्याचा प्रसाद सगळ्यांना वाटावा.
- घरात सकारात्मक ऊर्जा राहील असे वातावरण असावे.
ज्येष्ठा गौरी विसर्जनाचे महत्त्व
ज्येष्ठा गौरींचे आवाहन आणि पूजन झाल्यानंतर ज्येष्ठा गौरींचे रीतसर विसर्जन करण्यात येते. त्यामुळे गौरी विसर्जन या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे. साधारणतः तीन दिवस गौरींचा वास घरामध्ये असतो. त्यामुळे केवळ आवाहन आणि पूजन करून हा विधी पूर्ण होत नाही, तर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करण्याचा विधीही असतो. काही ठिकाणी गणपतींसह गौरींचे विसर्जन होते तर काही ठिकाणी गौरींचे आधी विसर्जन होते आणि त्यानंतर दहा दिवसांनी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते.
जेष्ठा गौरी विसर्जन विधी 2023
- गौरी विसर्जन विधीसाठी महिलांनी पहाटे उठावे आणि स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करावे.
- पूजेची सर्व तयारी करावी.
- विसर्जन करण्याच्या अगोदर गौरीची पुजा करावी. त्यांच्यासमोर दिवे लावावे, त्यांना सुगंधित पुष्प देखील अर्पित करावे.
- गौरी आवाहनाच्या दिवशीप्रमाणेच पुन्हा एकदा गौरींची पूजा करावी.
- गौरी पूजनानंतर फळ, मिठाई आणि नैवेद्य दाखवून धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आरती करावी.
- गौरी आवाहानाप्रमाणेच वाजत गाजत गौरींचे विसर्जन करावे.
- नदी, तळी, विहीर अथवा समुद्राच्या ठिकाणी पाण्यात गौरींचे विसर्जन करावे.
- पर्यावरणाला हानी पोहचू नये, म्हणून आजकाल घरातच शुद्ध पाण्यात बादलीत किंवा मोठ्या हौदात विसर्जन करून हे पाणी झाडांना घालण्याची नवी पद्धतही सुरू झाली आहे.
- विसर्जन करताना माता गौरीचा मंत्र जप करावा.
- विसर्जन करून आल्यानंतर घरात सर्वांना प्रसाद वाटावा आणि पुन्हा आरती करावी.
गौरी पूजन कसे साजरे केले जाते
गौरी पूजनाचा कार्यक्रम हा तीन दिवस चालत असतो. पहिल्या दिवशी गौरी आवाहन करतात. प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत आहे. घराच्या उंबऱ्यातुन आणतांना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहे. त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. त्यावेळी ते चमच्याने ताट किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. कोकणात गौरीच्या मुखवट्याला साडी नेसवून दागिने घालून गणपतीच्या बाजूला बसवले जाते. त्यानंतर पूजा,आरती करून नैवेद्य दाखवला जातो.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा केली जाते. आरती करून झाल्यावर केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर संध्याकाळी आरती करतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी सुहासिनी स्त्रियांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ही केला जातो. सुहासिनी स्त्रिया आणि मुली विविध प्रकारची झिम्मा-फुगडी यांचा खेळ खेळतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी लक्ष्मीचे विसर्जन करतात.
साजरा होणार सण
भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरीचे आगमन होते. त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबात शेकडो वर्षांपासून हा सण अखंडपणे साजरा होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातील लक्ष्मी दुसरी गौरी बाहेरून आणली जाते, ती ज्येष्ठागौरी होय.
गौरी पूजा मुखवटे
- आवाहनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि गौरींची स्थापना करण्यात येते.
- विदर्भ आणि मराठवड्याच्या ठिकाणी महालक्ष्मी देवीचे मुखवटे तयार करण्यात येतात.
- काही ठिकाणी हे मुखवटे असतात. तर काही ठिकाणी मुखवट्यांसह संपूर्ण उभ्या गौरी असतात.
- काही ठिकाणी तेरड्याची रोपं ही मुळासकट आणून त्यांना गौरी म्हणून पूजले जाते.
- काही ठिकाणी मातीचे मुखवटे तयार करण्यात येतात.
- काही ठिकाणी धातूची प्रतिमा करून मुखवटे करण्यात येतात.
- कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.
- काही ठिकाणी घरातील गहू, तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
- काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात.
गौरी गणपती विविध प्रांतामध्ये कशी साजरी केली जात असते?
दक्षिण भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी गौरीचे आगमन होत असते. आणि ह्या सणाला प्रत्येक गावागावात मुर्त्या तयार केल्या जातात. आणि त्यांची पुजा केली जाते.
कोकणस्थ ब्राह्मणात व कर्नाटकात अनेक ठिकाणी पाणवठ्यावरून किंवा तुळशीच्या रोपाजवळचे दोन खडे कलशात घालून मिरवत आणून तेच गौर म्हणून पूजतात.
कोळी समाजात ह्या दिवशी महाराष्टात वास्तव्यास असलेले कोकण भागातील रहिवासी असलेले कोळी लोक तेरडयाची लक्ष्मी म्हणुन पुजा करत असतात. आणि ह्या सणाला कोळी समाजातील लोक देवीला नैवैद्य म्हणुन मासे दाखवतात. ह्या दिवशी कोळी समाजातील महिला रात्रभर जागरण करतात. आणि कोळी समाजातील पारंपारीक नृत्य देखील करतात. विसर्जनाच्या दिवशी आपली पारंपारीक वेशभुषा परिधान करून गौरी आणि शंकर ह्या दोघांची वाजत गाजत मिरवणुक काढतात.
गौरीपुजनाचे वैशिष्टय काय आहे? Gauri poojan
- अविवाहीत मुलींना त्यांना हवा तसा जोडीदार प्राप्त होत असतो.
- घरात सुख समाधान लबहण्यासाठी तसेच गौरीपुजन केल्याने विवाहीत स्त्रीला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशिर्वाद मिळत असतो.
- गौरीपुजन केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचे आगमन देखील होत असते.
- बहतेक स्त्रिया हे व्रत संतान सुख मिळण्यासाठी करीत असतात.
दोरकाची पूजा
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.
गौरीचा ओवसा
अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही एक प्रथा गौरी पूजणाच्या दिवशी केली जाते. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नवीन लग्न झाले की, नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात.
नव्या सुपात चोळ, खण, विडा, पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी नेसून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात.
त्यानंतर नाववधुकडून वाडवडिलांच्या नमस्कार केला जातो. घरातील मोठी माणसे आशीर्वाद म्हणून काही रक्कम सुपात ठेवतात. मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा उत्सव ही मराठी संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे, असे म्हणता येईल.
ज्येष्ठा गौरी आवाहनासाठी नैवेद्य
- ज्येष्ठा गौरीला सगळयात पहिले आगमनाच्या दिवशी स्त्रिया भाजी भाकरी नैवेद्य म्हणुन दाखवत असतात.
- दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रांतामध्ये आपापल्या पद्धतीनुसार ज्येष्ठा गौरीसाठी फळ, बर्फी, लाडु इत्यादींचा समावेश केला जात असतो.
- दुपारच्या वेळेला जेवणासाठी खीर, घावन घाटले, पुरणपोळया केल्या जात असतात.
- काही ठिकाणी १६ वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, ५ प्रकारच्या कोशिंबीर, पंचपक्वान्न ज्यामध्ये शेवयांची खीर, गव्हल्यांची खीर, पुरण, लाडू, काकडीचे गोड पातोळे याचा समावेश असतो.
- वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे गोड पदार्थ उदा. घावन – घाटले, पुरणपोळी, लाडू, सांजोऱ्या, करंजी आणि परंपरेनुसार भाजी बनविण्यात येते.
- पदार्थांप्रमाणेच फळे, मिठाई, फराळाचे विविध पदार्थ याचाही समावेश नैवेद्यामध्ये करण्यात येतो.
- माहेरवाशीणींचा हा सण असल्यामुळे सहसा तिच्या आवडीचे पदार्थ यामध्ये करण्यात येतात.
- साधारणतः या दिवशी १६ हा शुभ अंक असल्यामुळे १६ पदार्थ बनविण्यात येतात.
- अनेक ठिकाणी गौरीला आणि माहेरी आलेल्या लेकीसाठी मटणाचाही नैवेद्य करतात. मात्र ही प्रथा प्रत्येक प्रांत आणि भागानुसार वेगवेगळी असते.
गौरीची आरती
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा, अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा ।
गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१।।
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी ।
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेवी जयदेवी ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा, षडरस पक्वान्ने होती सुखधामा ।
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।
उत्थापन मूळावर होता अगजाई, वर देती झाली देवी विप्राचे गृही ।
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी, वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।
गौरी कथा
एका गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहत होता. एकदा भाद्रपद महिन्यात घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या. हे ब्राह्मणाच्या मुलांना समजले. त्यामुळे घरी येऊन आईला विचारू लागली की, आपण आपल्या घरी गौरी का नाही आणत?त्यावेळी त्यांची आई म्हणाली, बाळांनो घरी गौरी आणून काय करू? तिची पूजा चर्चा केली पाहिजे, घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा, बाजारातील सामान आणायला सांगा, सामान आणलं म्हणजे मी गौरी आणिन. मुले लगेच आपल्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा बाजारात जाऊन घावण घाटल्याचे सामान घेऊन या. म्हणजे आई आपल्या घरी गौरी आणील.
हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले. सोन्यासारखी मुले आहेत, पण आपण त्याचे हट्ट पूर्ण करू शकत नाही. कोणाकडे काही मागायला जावे तर मिळत नाही, गरीबी पुढे काहीही उपाय नाही, त्यापेक्षा मरण बरे म्हणून तो गरीब ब्राह्मण उठला आणि एका तळ्याच्या काठी जीव द्यावा असा निश्चय करून गेला. अर्ध्या वाटेवर गेला असेल तोवर संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशिण त्याला भेटली तिने त्याची चाहूल ऐकली. म्हणून तिने विचारले, त्यावेळी ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगितली.
म्हातारीने त्याचे समाधान केले आणि बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. त्यामुळे ब्राह्मणाने त्या म्हातारीला घरी आणले. घरी आल्यावर त्या ब्राह्मणाच्या बायकोने आपल्या नवऱ्याजवळ या पाहुण्या बाई कोण? असे विचारले. त्यावेळी नवऱ्याने आजी असे उत्तर दिले. त्या ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि आंबील करता मडके उघडले. त्यावेळी ते मडके कण्यांनी भरलेले तिच्या दृष्टीस पडले. तिला फार आश्चर्य वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही फार आनंद झाला.
पुढे तिने पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने झोपले. सकाळ झाली तशी, त्या म्हाताऱ्या आजीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला तुझ्या बायकोला आंघोळ घालायला सांग. आणि आज घावन घाटले कर. नाही म्हणू नकोस, रडगाणे गाऊ नकोस. त्यामुळे ब्राह्मण तसाच उठला आणि आपल्या बायकोला सांगायला लागला की, आजीबाईंना आंघोळ घाल. असे म्हणून तो उठून भिक्षेला गेला. भिक्षा त्यादिवशी खूप मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला फार आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. सगळे आनंदाने जेवले. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारून उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले.
ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली. तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील, तितके खुंट पुर. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन, त्यांना हाका मार. म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरून जाईल. यांचे दूध काढ. ब्राह्मणाने त्या आजीने सांगितल्याप्रमाणेच केले. आणि गाई म्हशींना हाका मारल्या. त्याचबरोबर गाई म्हशी धावत आल्या. आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला.
ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. आणि दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली. मुला मला आता पोचते कर. तिकडे ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोहोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही,
ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आज पोहोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावे असा काही उपाय सांग. त्याबरोबर त्या आजीने सांगितले की, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यांवर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत, गोठ्यात टाक. असे केलेस म्हणजे कधी काहीही कमी होणार नाही.
ब्राह्मणाने तिचे ऐकले. आणि तिची पूजा केली. तिने आपले गौरीचे व्रत त्याला सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जाऊन दोन खडे आणावे. ऊन आणि पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन घाटले दुसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाशणीची ओटी भरावी. जेऊ घालावे. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे अक्षय सुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. असे हे व्रत आजीने ब्राह्मणाला सांगितले.
आमचे हे लेख सुद्धा नक्की वाचा 👇
- गणेश चतुर्थी 2023 तारीख, इतिहास, मुहूर्त, शुभ योग, मंत्र आणि पूजाविधी, विसर्जन
- कोकणातील गणेशोत्सव : एक अद्भुत आनंद सोहळा
- गणपतीच्या पूजेतील 21 पत्री
- गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
- ऋषिपंचमी संपूर्ण माहिती
- हरतालिका तीज पूजा व्रत कथा मराठी
- श्री गणेश विसर्जन संपूर्ण माहिती
प्रश्न
गणेश चतुर्थीमध्ये किती दिवसांनी ज्येष्ठा गौरी बसते ?
गणेश चतुर्थीमध्ये तीन दिवसांनी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठा गौरी बसते.
ज्येष्ठा गौरीला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखतात?
ज्येष्ठा गौरीला महाराष्ट्रात महालक्ष्मी या नावाने ओळखतात.
ज्येष्ठा गौरी म्हणजे नक्की कोण आहे?
ज्येष्ठा गौरी म्हणजेच पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पाच्या माता आहेत. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे.
पार्वतीचे दुसरे नाव काय?
पार्वतीचे दुसरे नाव गौरी आहे.
गौरी पूजन करण्याचा हेतू काय आहे?
घरात शांती, सुख-समृद्धी, समाधान यावे आणि अखंड सौभाग्य लाभावे यासाठी विवाहित महिला हे व्रत करतात आणि गौरी पूजन करतात. तर आयुष्यात चांगला जोडीदार लाभावा यासाठी अविवाहित मुली गौरी पूजनाचे व्रत करतात.
गौरी पूजनाचा मुहूर्त असतो का?
गौरी आवाहन, गौरी पूजन आणि अगदी गौरी विसर्जनाही मुहूर्त असतो. हा मुहूर्त तुम्हाला तुमच्या पुरोहितांकडून,पंचांग, अथवा कॅलेंडरवरूनही कळू शकतो. तुम्हाला तारीख कळल्यानंतर तुम्ही याचा मुहूर्तही जाणून घेऊ शकता.
२०२३ ला ज्येष्ठा गौरी (Avahan) कोणत्या तारखेला आहे ?
२०२३ ला ज्येष्ठा गौरी (Avahan) २१ सप्टेंबर गुरुवार या तारखेला आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, गौरी पूजनाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही या लेखातून गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाची महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तसेच गौरीची पूजा आणि आवाहन विधी, विसर्जन विधी कसा असावा? याबाबतची माहिती आम्ही दिली आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुनः भेटू असाच नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.