रमाबाई आंबेडकर माहिती मराठी Ramabai Ambedkar Information In Marathi

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोलाची साथ देणाऱ्या महान माता रमाई यांनी अत्यंत कष्ट सहन करून, प्रसंगी उपाशी राहून, आपले कुटुंब सांभाळले व बाबासाहेबांचा शिक्षण, समाज व देश कार्यात अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली. अशा या आदर्श माते विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

भीमराव ते भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रवासात बाबासाहेबांना मोलाची साथ देणाऱ्या, त्यांना सदोदित प्रोत्साहित करणाऱ्या, त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या व त्यांना एक महान क्रांतिकारी घडविणाऱ्या, त्यांच्या सहचरणी. म्हणजे आदर्श माता रमाई.

आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणस रमाबाई आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. अशा या आदर्श मातेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की नक्की वाचा.

Table of Contents

रमाबाई आंबेडकर माहिती मराठी | Ramabai Ambedkar Information In Marathi

पूर्ण नाव रमाबाई आंबेडकर
जन्म तारीख दि . ७ फेब्रुवारी १८९८
जन्म स्थळ वणदगांव, रत्नागिरी
आईचे नाव रुक्मणी
वडिलांचे नाव भिकु धुत्रे
वैवाहिक स्थिती विवाहित
विवाहाची तारीख एप्रिल १९०६
पतीचे नाव डॉ . बाबासाहेब आंबेडकर
अपत्य यशवंत आंबेडकर
वय३७ (मृत्यूच्या वेळी)
जातमराठा
मृत्यूदि. २७ मे १९३५

रमाबाई यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

रमाईंचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वंदणगाव या गावी माता रुक्मिणी व पिता भिक्खू धोत्रे, यांच्या पोटी दि. ०७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला. रमाला अक्का, गौरी व शंकर ही भावंडे होते.

रमाचे नाव मामाने पार्वती असे ठेवले होते. पण पुढे रमा हेच नाव प्रसिद्ध झाले. भिकू धोत्रे दाभोळच्या धक्क्यावर, माशांच्या टोपल्या वाहून नेण्याचे काम करत असे. या सतत अवघड कामामुळे भिकू धोत्रेला छातीचा आजार झाला. त्यांना काम बंद करून, घरीच राहावे लागले. त्यामुळे रुक्मिणी बाईंवर चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडली. त्याही आपल्या कुटुंबासाठी अपार कष्ट करू लागल्या.

त्यातच धोत्र्यांची प्रकृती अधिकच खालावली, हे सर्व पाहून रुक्मिणीबाई चिंतेने ग्रासून गेल्या व त्यांची ही प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा अंत झाला. आई विना ही चार मुले पोरगी झाली. मात्र मरण्यापूर्वी आईने रमावर उत्तम संस्कार केले, त्याचप्रमाणे कष्टाची सवय ही लावली. आता सर्व जबाबदारी रमावर पडली.

तिने सर्वांना धीर दिला. रुक्मिणी बाईंच्या मृत्यूमुळे भिकू धोत्रे ही फारच खचले व त्यांच्या आजाराने ही त्यांचा भोवतीचा पास अधिकच आवळायला सुरुवात केली. एके दिवशी त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावले व रमाला त्यांची काळजी करण्यास सांगितले. रमाच्या जीवावर मुलांची जबाबदारी टाकून भिकू धोत्रे यांनी प्राण सोडला. आता रमाला बालवयातच प्रौढ व्हावे लागले होते. भिकू धोत्रेंचा मृत्यू झाल्यावर त्यांचा भाऊ व रुक्मिणी बाईंचा भाऊ दोघेही मुंबईला भायखळा मार्केट जवळ राहत होते.

त्यांनी या मुलांना मुंबईला घेऊन, जायचा निश्चित केला. त्यानुसार या काका मामांनी त्यांना मुंबईला आणून ठेवले. काका मामांचा आधाराने ही मुले वाढू लागली.

Ramabai Ambedkar Information In Marathi

हे वाचा –

रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचा विवाह

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे व सैन्यात सुभेदार असलेले, रामजी सकपाळांचे कुटुंब ही या काळात मुंबईला होते. सुभेदारांचे सुपुत्र भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांचा सत्कार समाजाने केला. सगळीकडे त्यांचे नाव झाले. ज्याला त्याला त्यांचे कौतुक वाटत होतं. भीमराव मॅट्रिक झाल्यावर, त्यांच्या लग्नाचा विचार सुभेदार व त्यांची बहीण मीराबाईंनी सुरू केला.

सुभेदार रामजी बाबांनी आपल्या मुलाला अनुरूप अशी मुलगी शोधण्याची सुरुवात केली. एके दिवशी रमा आपल्या मामांसोबत, भायखळा मार्केटमध्ये आली असता, तिथे रामजी बाबांनी तिला पाहिले. मामांसोबत झालेल्या चर्चेतून, त्यांना आपल्या मुलासाठी हीच मुलगी योग्य आहे असे रामजी बाबांनी सांगितले.

मामांनी रामजी बाबांना आपल्या घरी बोलावले या मुलांविषयीचा सर्व वृत्तांत कथन केला. रामजी बाबांनाही या मुलांविषयी करुणा दाटून आली. त्याचवेळी त्यांनी लग्नाची तारीख निश्चय करा. मच्छी मार्केट मधील जागेत १९०६ साली रमाबाई व भीमराव यांचा विवाह पार पडला.

Ramabai Ambedkar

लग्नानंतरचा काळ

गरीब व पोरक्या मुलीला सुशिक्षित रूपाने सुंदर असा पती मिळाल्याबद्दल सर्व उपस्थित आनंदी झाले होते. लग्नानंतर रमाई परळ कोळबावडी येथील शाळेमध्ये राहिल्या. भिमराव सतत आपला अभ्यास करीत असत. मात्र रमाईकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घेत असत. त्यांनी रमाईंनाही लिहायला व वाचायला शिकवलं. सन १९१२ साली भीमराव बी.ए. झाले.

त्याच काळात त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव भीमराव आणि यशवंत असे ठेवले. या नावाविषयी रमाईंनी विचारल्यावर, त्यांनी त्यांचे गुरु महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व त्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

रामजी बाबांनी अत्यंत कष्टात दिवस काढले होते, पण भीमरावांच्या शिक्षणात व्यस्त येऊन दिला नाही. आता भीमराव बी.ए झाले होते. आपण नोकरी करून घरची परिस्थिती सुधारूया, या विचाराने ते बडोदा सरकारकडे नोकरीसाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना फार वाईट दिवस काढावे लागले. अस्पृश्यतेचे चटके त्यांना फार बसले. याच काळात रामजी बाबा आजारी असल्याची, तार भिमरावांना गेली. भीमराव परत आले. बाबासाहेबांची तब्येत पाहून, गहिवरले. रामजी बाबांनी भीमरावांना डोळे भरून पाहिले. आणि दि. ०२ फेब्रुवारी १९१३ रोजी या जगाचा निरोप घेतला.

रमाबाई आंबेडकर

रमाबाई आंबेडकर यांचा संघर्ष

भीमराव बडोद्याचे सरकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. या काळात रमाईंना संसाराचा गाडा ओढावा लागला. त्यांना फार कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. रामजी बाबा असताना त्यांच्या पेन्शनवरच घर चालेल, आता काय करावे ? असा प्रश्न त्यांना पडला.

त्यांनी कोळबावडी ते वरळी विलेज येथे पायी जाऊन, शेण थापून सुकलेल्या शेणी विकून येणाऱ्या पैशातून, कुटुंबाचा खर्च चालवला. येताना त्या दादर मधून लाकडाचा भारा घेऊन येत, परदेशात शिक्षण घेण्यास गेलेल्या माणसाची पत्नी सरपणाचे भारे वाहते, असे लोकांनी म्हणू नये यासाठी त्या सूर्योदयापूर्वी जात व सूर्यास्तानंतर परतत. परदेशातून बाबासाहेब आपल्या शिष्यवृत्तीतील पैसे वाचवून, इकडे पाठवत असत. ते किती पुरणार, बऱ्याच वेळा या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येई.

चक्कीतील पीठ आणून, त्याच्या भाकऱ्या करून रमाबाई यशवंत, पुतण्या मुकुंद, भाऊ शंकर, यांना देत व जाऊ लक्ष्मीबाई, बहिण गौरा व स्वतः एक भाकरी तिघीत वाटून घेत असत. अशा प्रकारचे कष्टाचे जीवन त्यांना त्या काळात जगावे लागले. मात्र याची मुळीच कल्पना त्यांनी बाबासाहेबांना दिली नाही.

१९१६ साली एम.एचा अभ्यासक्रम पूर्ण करून, आपण येत आहोत असे बाबासाहेबांनी कळवले. समाजातील अनेक व्यक्ती त्यांना आणण्यासाठी, बोटीवर गेले होते. रमाबाई  फार खुश होत्या. बाबासाहेब घरी आल्यावर, त्यांचे रूप पाहताना त्या भान हरपून गेल्या.

बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेऊन आल्यामुळे मुंबईच्या कार्यकर्ते सत्कारासाठी पैसे खर्च करणार होते ते मात्र बाबासाहेबांनी नाकारले. ते त्या कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्ही जे पैसे माझ्या सत्कारासाठी खर्च करणार आहात, तेच पैसे आपल्या समाजातील गरीब हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करा. त्यांचा उत्कर्ष साधा. ते पैसे त्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी उपयोगात आणा. बाबासाहेब परदेशातून आल्यावर नोकरीसाठी बडोद्याला गेले. त्यावेळी सनातन्यांनी त्यांना फार त्रास दिला. त्या मुळे बाबासाहेब नोकरी सोडून परत आले.

यानंतर सिडनहम कॉलेजमध्ये, प्रोफेसर म्हणून नोकरी करू लागले. आता घर खर्चाचा प्रश्न मिटला होता. महिन्याला ४५० रुपये पगारातून, फक्त शंभर रुपये रमाबाई यांना घर खर्चासाठी देत होते.घरात पैसे येत होते. हळूहळू दारिद्र्य दूर होत होते. मात्र राहिलेला शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी लंडनला जाण्याचे निश्चित केले. तर १९१७ ला शाहू महाराजांच्या मदतीने इंग्लंडला गेले. कठोर परिश्रम घेऊन, शिक्षणक्रम पूर्ण केला.

लंडन विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी पदवी बहाल केली/ रमाई आता महा विद्वानाची पत्नी झाली होती. याचा त्यांना फार अभिमान वाटला. सासरे रामजी बाबांची इच्छा पूर्ण झाली. आपले कष्ट सार्थकी लागले, असे त्यांना वाटले. आता आल्यानंतर बाबासाहेब नोकरी करून संसारात लक्ष देतील, आपली परिस्थिती सुधारेल, अशी आशा रमाईंना होती. लंडन हून परतल्यानंतर, रमाईंनी आपली इच्छा बाबासाहेबां जवळ बोलावून दाखवली. बाबासाहेब येत आहेत, अशी तार आली.

मात्र त्यांना ठरलेल्या बोटीने येता आले नाही, त्यांनी त्या बोटीतून ३२ पेट्या भरून पुस्तके पाठवून देली. मात्र जर्मन पानबुडी सुरुंगाने, ती बोट बुडवली. रमाईंना हे कळल्यावर त्यांनी हंबर्डे फोडला.बाबासाहेब त्या बोटीत नाहीत, असा रमाबाई यांना तिकडून निरोप आला. बाबासाहेब दुसऱ्या बोटीने सुखरूप येत आहे, आता रमाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. बाबासाहेब आल्यावर त्यांनी त्यांना डोळे भरून पाहिले व त्या समाधानी झाल्या.

रमाईने ठरवल्याप्रमाणे आता नोकरी करून, कुटुंबाकडे लक्ष द्यावे अशी विनंती बाबासाहेबांना केली. मात्र बाबासाहेबांनी त्यांना व्यवस्थित रित्या समजावून सांगितले, पतीच्या शिक्षणाची धडपड व महत्त्व त्यांना समजली यानंतर रमाईंची अनुमती घेऊन, बाबासाहेब पुन्हा, ०५ जुलै १९२० रोजी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले.आता पुन्हा रमाबाईनवर संसाराची जबाबदारी पडली. पुन्हा दारिद्र आली. रमाईंना मिळेल ते काम करावे लागत होते. याच काळात बाबासाहेबांचे वडील बंधू आनंदरावांचे निधन झाले. त्यामुळे अधिकच प्रश्न निर्माण झाले, तरीही न डगमगता केवळ आपल्या पतीच्या शिक्षणासाठी, येणाऱ्या सर्व प्रसंगांना तोंड देत होत्या.

रमाबाई व भीमराव आंबेडकर

आंबेडकरांचे प्रेरणास्तंभ

एप्रिल १९२३ साली बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात आले. त्यावेळी सर्व जनता बाबासाहेबांच्या स्वागताला आली. रमाबाईनजवळ चांगले लुगडे नव्हते परंतु, जाणे तर भाग होते. बाबा साहेब यांचा शाहू महाराजांनी सत्कार केला, त्या प्रसंगी दिलेल लुगडे नेसून त्या तेथे गेल्या.

बाबासाहेबांचा चाणक्य नजरेतून, हे सुटले नाही. त्यांना फार वाईट वाटले. अपार कष्टामुळे व प्रसंगी उपाशी राहून, दिवस काढल्याने, रमाईंचे प्रकृती वेळोवेळी बिघडत होती. रमाईंनी घेतलेले कष्ट बाबासाहेबांना सतत आठवत असत.

ते नेहमी म्हणत रमाई तू कष्ट केले, म्हणूनच मी प्रगती करू शकलो. तूच माझी प्रेरणाशक्ती आहे. असे बाबासाहेब म्हणत असत.

रमाबाई त्यागाची मूर्ती

बाबासाहेब आता हायकोर्टात वकिली करू लागले. संसाराकडे लक्ष देऊ लागले. रमाई आता समाधानी होत्या. पैसेही घरात येत होते. एकदा बाबासाहेबांनी एक नोटांचे बंडल आणून, रमाईंच्या हातात दिले. रमाई पैसे मोजू लागल्या, परंतु पूर्ण रक्कम त्यांना मोजता आली नाही.

रमाई म्हणाल्या मुकुंदा व यशवंत यांना चांगले कपडे घेईन. तुम्ही आपल्यासाठीही चांगले कपडे घ्या. तेव्हा बाबासाहेब म्हणाले. रमा स्वतःसाठी काहीच घेणार नाहीस का ? तेव्हा रमाई म्हणायला, मला काय करायचं नवीन कपडे. तुम्ही बाहेर जात असतात, मिटींगला जात असतात, त्यामुळे तुम्हालाच ख़री गरज आहे. त्यातच मी समाधानी आहे. रमाईंचे हे उत्तर ऐकून, बाबासाहेब क्षणभर स्तब्ध झाले. खरोखरच रमाई म्हणजे त्यागाची मूर्ती होती.

आंबेडकर कुटुंबावर मृत्यूचा थैमान

रमाईंना आपल्या आयुष्यात दुःखाचे डोंगर पार करावे लागले, अपार कष्ट करावे लागले, त्याचबरोबर लहानपणी माता मातापित्यांचा मृत्यू, त्यांचा खंबीर आधार रामजी बाबांचा मृत्यू,  मुलगा गंगाधराचा महिन्याच्या आत, मुलगा रमेश याचा एक वर्षाच्या आत, मुलगी हिंदूचा दीड वर्षांत झालेला मृत्यू, बाबासाहेबांचे वडील बंधू आनंदरावांचा मृत्यू, या सर्व घटना म्हणजे आंबेडकर कुटुंबात मृत्यूने घातलेले थैमान.

यातील जवळजवळ सर्व घटने दरम्यान बाबासाहेब बाहेरगावी होते. रमाईला एकटीला सहन करावे लागले होते. आपल्या दुःखाची झळ त्यांनी बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिली नव्हती. बाबासाहेबांच्या ज्ञानरचनेवर खंड पडू दिला नाही.

आयुष्यभर एकटीने सर्व सोसले. बाबासाहेबांनाही या सर्व गोष्टींची जाणीव सतत होती. आता चांगल्या दिवसाच्या काळात रमाईंना जास्तीत जास्त सुखी ठेवण्यासाठी बाबासाहेब धडपडत होते.

रमाईंची सदाचारी आणि धार्मिक प्रवृत्ती

रमाईंची पंढरपूरच्या पांडुरंगावर, नितांत श्रद्धा होती. पांडुरंगाने चोकोबाच्या बायकोचे बाळंतपण केले, जनाईचे दळण कांडण केले, गोऱ्या थापल्या, हे सर्व तिला ऐकून होते. आषाढी एकाद्शीला, आषाढी-कार्तिकेला पंढरपूरला मोठी यात्रा भरते, सारा महाराष्ट्र दर्शनासाठी धावून जातो, आपणही पंढरपूरला जाऊन, पांडुरंगाचे दर्शन घ्यावे, आपल्या पती राजांना सुखी ठेवण्यासाठी, पांडुरंगाला साकड घालावी, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.

एके दिवशी रमाईंनी आपली इच्छा बाबासाहेबांमुळे बोलून दाखवली. त्यांनी सर्व ऐकून घेतले व ते रमाबाई यांना म्हणाले, ज्या पांडुरंगाने चोखा मेळाला कधी दर्शन दिले नाही, खालच्या जातीतील लोकांना कधी दर्शन दिले नाही, त्या देवाकडे आपण कशासाठी जायचं, बडवे, पंडे, पुजारी अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाही, पांडुरंग ही त्यांना बदलू शकत नाही. काय कामाचा असा पांडुरंगा आणि काय करायचे, ते पंढरपूर.रामू माझं ऐक तू आता पंढरपुरातून डोकं आणि डोक्यातून पंढरपूर काढून टाक. रामू आपल्या त्यागाने गोरगरिबांच्या सेवेन, आपण दुसरं नाव पंढरपूर उभ करू.

परिवर्तनाच पंढरपूर. जिथे लोक भक्तीसाठी नाहीतर, क्रांतीसाठी येतील, बुद्धिवादाचा पंढरपूर आपण निर्माण करू. जिथे विज्ञान निष्ठेची गरज होईल, जागर होईल, ती विवेकाची पेठ होईल, तिथे संस्थेचा बंधुत्वाचा सुगंध देशाला मिळेल. तिथे घडतील न्यायाची उपासक म्हणून, असं पंढरपूर आपण घडवून. त्या पंढरपुरात देव असणार नाही, ते माणसांचं पंढरपूर असेल.

माणसाला माणूस भेटणार ते पंढरपूर असेल, ते कोणाला नकार देणार नाही, आपलं पंढरपूर माणसांचा गौरव करील, रमाईना बाबासाहेबांचं बोलणं पटलं. पंढरपूरला जायचं नाही, हा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या निर्णयाने, बाबासाहेब आंबेडकरांना खूप आनंद झाला.

रमाबाई शांतता व सहनशीलतेची मूर्ती

बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेतून २९ जानेवारी १९३१ ला परत आले. तेव्हा रमाई हजारो बांधवांसह स्वागतासाठी उपस्थित होत्या बाबासाहेबांचे त्यांनीही पुष्पहार देऊन, स्वागत केले. अस्पृश्य समाजासाठी बाबासाहेब लढा देत असताना, त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. स्त्रियांची संघटना तयार करून तिचे नेतृत्व रमाईंनी केले.

रमाबाई यांनी जे जे हॉस्पिटलच्या आवारात स्त्रियांसाठी दिलेले मार्गदर्शन पर भाषण आजही बहुजन समाजातील स्त्रियांसाठी मार्गदर्शक ठरेल. रमाबाई यांना स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे, गरीब कुटुंबाची ही कळकळ वाटली, दारूमुळे लोकांच्या संसाराची होणारी दूरदशा, पाहून त्यांचे मन बैचेन होई. त्याविषयी खंतही त्यांनी बाबासाहेबांकडे बोलून दाखवली. त्यांचे संपूर्ण आयुष्य दुःख आणि दारिद्र्याचे सामना करण्यात गेले. कुटुंबासाठी समाजासाठी काळजी करण्यात गेले. बाबासाहेबांनी पुढील काळात राजगृहासारखा राजवाडा बांधला. पण तरी रमाबाई यांच्या नम्र व साधेपणात फरक पडला नाही.

रमाबाई यांना आजारांनी ग्रासले

बॅरिस्टर बाबासाहेब आता हायकोर्टात वकिली करू लागले होते, घरात पैसा होता. सर्व गरजा पुऱ्या होत होत्या. याच काळात रमाई व बाबासाहेबांच्या सर्वात लाडका पुत्र राजरत्न बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे सुंदर होता, त्याचे वय पावणेदोन वर्षे होते, अचानक त्याला ताप आला.

त्याचे रूपांतर टायफाईड मध्ये झाले. खूप औषधोपचार झाला, परंतु तब्येत काही बरी होत नव्हती. एके दिवशी तब्येत जास्त बिघडली बाबासाहेबांना कोर्टातून बोलावून घेतले. मांडीवरच त्याने प्राण सोडले. बाबासाहेब व रमाईंनी हंबरडा फोडला. त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नाही.

दोघेही प्रसंगाने खचून गेले. रमाईंनी तर अन्न पाणी सोडले, याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. आधीच तब्येत ठीक नव्हती, त्यात अधिकच औषध उपचाराने न बर वाटल्या मुळे डॉक्टरांनी हवा बदलण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार त्यांना धारवाड्याला मुलांच्या वस्तीगृहात बाबासाहेब घेऊन गेले. रमाई मुलांमध्ये आपली दुःखे व आजारपण विसरून, त्यांच्या रमत होत्या. मुलांना जीव लावत होत्या. एके दिवशी धान्य संपल्याने, मुलांनी जेवण तयार केले नव्हते.

रमाईने हे पाहिल्यावर ताबडतोब वराळे मामा हे व्यवस्थापक म्हणून काम करत होते, त्यांना बोलावून घेतले व चौकशी केली. दोन महिने सरकारी अनुदान मिळालेले नाही, हे कळल्यावर रमाईंनी हातातील सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवायला दिले. त्यातून मुलांसाठी धान्य खरेदी करायला लावले.

१९३० साली इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब व मद्रासी राव यांना निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी रमाईंना फार आनंद झाला. त्यांना आपल्या साहेबांच्या विद्वत्तेचा अभिमान वाटला. बाबासाहेब इंग्लंडला गेले,

बाबासाहेब सतत हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरांवर, टीका करत असत. आपल्या हक्कांसाठी समस्त बहुजन समाजाला जागृत करत असत, संपूर्ण भारतभर त्यांची चळवळीच्या माध्यमातून फिरती होत असे. सनातनी लोक बाबासाहेबांच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असत.

त्यांच्या जीवावरही ते उठले होते. सतत धमक्याही देत होते, त्यामुळे रमाई सतत चिंतेत होत्या. बाबासाहेब त्यांना समजावंत समता, सैनिक दलाचे शूर सैनिक, माझ्यासाठी आपला जीव द्यायला तयार असताना तू घाबरतेस कशाला ? म्हणून त्यांना धीर देत असत, मात्र रमाईंचे मन सतत बाबासाहेबांची काळजी करत असे.

१९३२ ला बाबासाहेबांना सतत धमक्यांची पत्र येत होती. सनातनी लोक त्यांच्या जीवावर टपून बसले होते. बाबासाहेबांच्या चिंतेने, रमाईंचे काळीज कापले जात होते. बाबासाहेब बाहेरून घरी येईपर्यंत, त्या चिंतेत असत.

सन १९३४  साली बाबासाहेब सिंहगडावर गेले, अस्पृश्यांनी शिवरायांचा गड बाठवला असा आरडाओरडा करत सनातनी गुंड काटे घेऊन, बाबासाहेबांना मारायला धावून आले. मात्र बाबासाहेबांनी स्वतः या माथे फिरूंना शांत केले. ही घटना समजताच रमाई फार घाबरल्या. बाबासाहेब घरी येईपर्यंत, त्यांच्या जीवात जीव नव्हता. अशा प्रकारे रमाई स्वतःची तब्येत ठीक नसतानाही, सतत बाबासाहेबांची काळजी करत असत.

रमाबाईंचा मृत्यू

सततच्या काळजीने, रमाईंची प्रकृती अधिकच खालावली. सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांना दाखवले पण प्रकृतीत फरक पडला नाही. आता रमाई अगदी अंथरुणाला खेळ्या होत्या. आयुष्यभर रमाईंनी कष्ट उपसले होते, लहानपणापासूनच सतत त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली असल्याने, ही जबाबदारी पार पाडताना त्यांना फार त्रास झाला होता.

तसेच रमाई यांनी बाबासाहेबांसाठी आयुष्यभर उपास तापास व चिंता केल्याने, त्याचाही परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता. त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे इतरांच्या सुखासाठी झिजवला होता.परिणामी रमाबाई यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. बाबासाहेब सतत रमाई जवळ बसून राहत असत. ते त्यांना धीर देत असत.

दि. २७ मे १९३५  रोजी बाबासाहेब रमाबाई जवळ बसले असताना बाबासाहेबांच्या मांडीवर रमाईंने प्राण सोडले.

रमाईंवरील पुस्तके

  • “हिमालयाची सावली माता रमाई” ‎– बाबूराव वाघ
  • त्यागवंती रमामाऊली – नाना ढाकुलकर
  • प्रिय रामू – योगीराज बागूल
  • रमाई – यशवंत मनोहर

रमाबाईंच्या नावाने शैक्षणिक संस्था

  • रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली
  • मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद
  • माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

रमाईंवरील चित्रपट

  • रमाई : हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईंच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत.
  • रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
  • रमाबाई (चित्रपट)

FAQ

१. रमाबाई आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते?

रमाईंचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वंदणगाव या गावी माता रुक्मिणी व पिता भिक्खू धोत्रे, यांच्या पोटी दि. ०७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला.

२. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह कधी झाला?

१९०६ साली रमाबाई व भीमराव यांचा विवाह पार पडला.

३. कोण होत्या रमाबाई आंबेडकर ?

भीमराव ते भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रवासात बाबासाहेबांना मोलाची साथ देणाऱ्या, त्यांना सदोदित प्रोत्साहित करणाऱ्या, त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या व त्यांना एक महान क्रांतिकारी घडविणाऱ्या, त्यांच्या सहचरणी. म्हणजे आदर्श माता रमाई.

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्थंब कोण होते ?

रमाईंनी घेतलेले कष्ट बाबासाहेबांना सतत आठवत असत. ते नेहमी म्हणत रमाई तू कष्ट केले, म्हणूनच मी प्रगती करू शकलो. तूच माझी प्रेरणाशक्ती आहे. असे बाबासाहेब म्हणत असत.

५. रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ?

दि. २७ मे १९३५  रोजी बाबासाहेब रमाबाई जवळ बसले असताना बाबासाहेबांच्या मांडीवर रमाईंने प्राण सोडले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास रमाई म्हणजे थोर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला , हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment